मला भावलेले पु.ल. १

जपानच्या मुक्कामात मला जो जो जपानी भेटला त्याला भारताविषयी खूप प्रेम आहे असे मला दिसले. त्यांना ही त्यांच्या बुद्धाची पवित्र भूमी वाटते. भारतीय दार्शनिकांनी त्यांना अध्यात्माचा कणा दिला याची त्यांच्या विद्वानांना जाण आहे. दूरच्या रस्त्याने आम्हांला आणल्याबद्दल स्वतःलाच दंड म्हणून आमच्याकडून निम्मे पैसे घेणारा जपामी टॅक्सीवाला त्याच्या देशाविषयी आमच्या मनात आदर निर्माण करून गेला. हॉटेलात, दुकाना, विद्यापीठात, थिएटरात, जिथे जिथे आम्ही गेलो तिथे तिथे  आम्हांला जिव्हाळाच मिळाला. हे लोक फार लाघवी. आग्नेय आशियातले प्रमुख देश मी पाहिले पण जपानने अंतःकरणात घर केले. अनेकांना जपानी माणूस हा कोड्यासारखा वाटतो. पाश्चात्य उद्योगतज्ज्ञांनी तर जपानी कारखानदारांची आणि व्यापा-यांची नालस्ती करणारी पुस्तके लिहिली आहेत. जपानी स्वभाव अगम्य आहे असे ते म्हणतात. अगम्य सारा मानवी स्वभावच आहे. ज्या जपानी हॉटेलात आम्ही आमच्या खोल्यांना कधी कुलपे लावली नाहीत, टेबलावर पैसे विसरुन गेलो तर खोली झाडायला येणा-या बाईने एका सुरेख पुरचुंडीत ते बांधून ठेवले, त्याच जपानात गुन्हेगारी आहे. शेवटी मनुष्यस्वभावचे उत्तर सांगणरे गणित कोणी मांडावे ?

ह्यात टोकियोमध्ये एका बसमधून आम्ही प्रेक्षणीय स्थळांची सहल करीत होतो. माझ्या शेजारी एक अमेरिकन प्रवासी बसला होता. पन्नाशीच्या घरातला होता.  इतका खप्पड अमेरिकन पुरुष त्यापूर्वी आणि त्यानंतर मी पाहिला नाही. आमच्याच दाई- इची हॉटेलात उतरला होता. दुपारी दोन अडीचला आम्ही नगरपर्यटनाला निघालो, त्या वेळी तो दाबून प्यालेला होता. अर्धोन्मीलित डोळ्यांनी तो टोकियोत काय पाहणार होता ते कळेना. शुद्धीबेशुद्धीच्या सीमारेषेवर होता. बोलत होता चालत होता. पण अडखळत. मला म्हणाला “तू इंडीयन आहेस की अफ्रिकन ?”  “इंडीयन!” सगळा राग गिळत मी म्हणालो. आता माझा वर्ण गोरा नाही हे कबूल, म्हणून काय इतके खंडांतर व्हायला नको होते. ‘पियेला आदमी है’ म्हणून सोडून दिले. पण त्याने त्या अवस्थेत गप्पा सुरू केल्या. तो काय बोलत होता ते मला मी शुद्धीवर असूनही नीट कळत नव्हते, आम्ही निरनिराळी स्थळे पाहून येत होतो. हा मात्र बसमध्येच बसून राही. तासाभराने डोक्याला गार वाराबिरा लागल्यामुळे की काय कोण जाणे, स्वारी नीट शुद्धीवर आली.

“किती दिवस आहात आपण जपानात ?” त्याने सवाल केला.
“झाला एक महिना.”
“खूप जपानी भेटले का ?”
“भेटले थोडे.”
“नशीबवान आहात ! मी आठ दिवस इथे आहे. मला कुणीच भेटयला, बोलायला मिळाला नाही. मला ह्या जपानी बागा आणि देवळे पाहण्यात गोडी नाही. त्या फिल्ममध्येही पाहू शकलो असतो मी. मला जपानी माणसे भेटायला हवी आहेत. मला जपानी कुटुंबात जायला हवे आहे. मी गेले वर्षभर जगाचा प्रवास करतोय.”
आस्थेवाईक श्रोता मिळाल्याबरोबर त्याने आपले आत्मचरित्र सांगायला सुरुवात केली. अमेरिकेत त्याचा कोककोला, सोडा, लेमन यांसारखी पेये बाटल्यांत भरायचा व्यापार आहे. लाखो डॉलर्सची कमाई आहे. पण हा पैशाला विटून निघाला होता. पण धंदाच असा की पैसा ह्याच्यामागे धावत होता. आपण आयुष्यभर फक्त पैसेच केले याची खंत वाटून तो सुखाच्या शोधात निघाला होता. चर्चवरचा त्याचा विश्वास उडाला होता. त्याने कुठल्याशा चर्चला हजारो डॉलर्स दिले. त्या पाद्र्यांनी ह्याच्या इच्छेविरुद्ध चर्चवर नवा कळस बांधला.
“स्वाईन्स! डुक्कर लेकाचे! इमारती बांधणे एवढाच उद्योग करतात. माणसं माणसाला भेटत नाहीत. मी त्यांना पैसे दिले आणि सांगितले, माणसामाणसांच्या भेटी एकमेकांच्या घरात करा. सभा नको. समारंभ नको. आपल्या गावच्या माणसाला दुस-या घरी पाहुणा म्हणून पाठवा. त्याचा खर्च द्या. ख्रिस्ताचं नाव घ्यायला एवढ्या इमारती कशाला ? पण प्रत्येकाला पब्लिसिटी हवी. ख्रिस्ताच्या घराचा कळस उंच करून त्याची देखील पब्लिसिटी करतात. स्वाइन्स! (हा त्याचा लाडका शब्द होता.) मला जपानी माणूस भेटत नाही. माणूस भेटत नाही, आय वॉंट टु मीट मेन! मेन इन फ्लेश न् ब्लड यू सी!”
काही वेळाने तो चांगलाच शुद्धीवर आला. आदल्या रात्री कोणी तरी त्याला गेयशाकडे नेतो असे सांगून कुठल्या तरी वेश्येकडे नेले होते. तिथे हा दारू पिऊन बेहोष झाला. त्याला पुन्हा कोणी तरी हॉटेलात आणून सोडले. त्याला आठवत नव्हते. पण आणणा-याने त्याचे पाकीट मारले होते. दोनतीनशे डॉलर्स अंगावर होते. ते पळवले होते. त्याची त्याला खंत नव्हती. आपल्याला हॉटेलात आणून सोडल्याबद्दल कृतज्ञता होती. त्याच्या देशात अशी सज्जन माणसे नाहीत असे त्याचे मत होते. शेवटी त्याने खिशातून एक कागद काढला आणि मला विचारले,
“हे गाव कुठे आहे?”
हिंदुस्थानातल्याच मसुरीच्या एका ख्रिस्ती शाळेचा पत्ता होता. मी विचारले, “हा पत्ता तुमच्यापाशी कसा?”
“इथे माझा एक मुलगा शिकतो. त्याला मी भेटणार आहे. जगातल्या सोळासतरा देशांत माझी मुलं शिकताहेत. पण तुमच्या देशात शिक्षण अगदीच स्वस्त. ह्या माझ्या मुलाला मी महिना फक्त पंचवीस डॉलर्स धाडतो.” मग त्याने खिशातून एक डायरी काढली. त्यात खूप पोरांचे फोटो डकवले होते. हिंदी, चिनी, निग्रो, गौरकाय अशी त्याची आंतरराष्ट्रीय स्वरुपाची संतती पाहून मी जरासा बुचकळ्यात पडलो. “हे दोघे अमेरिकेतच आहेत. त्यांना मी पाहिले आहे. आत्ता हा हॉंगकॉंगचा पाहिला. हा बॅंकॉकचा पाहिला.” माझा गोंघळ फारच वाढला. शेवटी कळले की, हा गृहस्थ निरनिराळ्या देशांतल्या सोळासतरा अनाथ पोरांचे शिक्षण करतोय. त्यांची त्याला ‘ डिअर डॅड  ‘ अशी मायना असलेली पत्रे येतात. ह्या गृहस्थाला देशोदेशींच्या कुटुंबात जाऊन राहण्याची तीव्र इच्छा होती. “ही मुलं मोठी झाली की, त्यांची लग्नं होतील. मग प्रत्येक देशात मला घर होईल.” हे सांगताना तो आनंदाने फुलून आला होता. त्याची स्वतःची लग्नाची बायको त्याला सोडून गेली होती. त्यामुळे अमेरिकन ‘स्त्री’ या विषयावरची त्याची मते चारचौघात उच्चारण्यासारखी नव्हती.
“तुझ्या देशात मला तू घरी बोलावशील का?”
“जरूर बोलावीन ——” मी त्याला आश्वासन दिले. “पण मुंबईत तुला दारु देता येणार नाही मला. आमच्याकडे दारुबंदी आहे.” माझे बोलणे ऐकल्यावर एखादी विनोदी गोष्ट ऐकावी तसा तो खदखदून हसला.

रात्री मी दाइ-इची हॉटेलमध्ये जेवून लाउंजमध्ये सहज बसलो होतो. तेवढ्यात स्वागतकक्षासमोरच घोळका जमलेला दिसला. मीही इतरांप्रमाणे धावत गेलो. पाहतो तर हा सोळा पोरांचा धर्मपिता चिक्कार पिउन जमिनीवर तोंडघशी पडला होता. मी झटकन पुढे जाऊन त्याला उचलायला मदत केली. त्या अवस्थेत त्याने माझ्याकडे पाहिले. त्याचे डोळे विस्फारल्यासारखे झाले. चमत्कारिक नजरेने माझ्याकडे पाहात तो म्हणाला, “ओSS यूSS  इंडिया …. यस वूई मेट, भेटलो होतो आपण. गॉड ब्लेस यू!” लोक माझ्याकडे पाहू लागले. माझ्या डायरीत त्याचे कार्ड होते. हॉटेलमधल्या नोकरांनी त्याच्या नावावरून खोली हुडकली. आम्ही त्याला खोलीत उचलून नेले आणि पलंगावर निजवले. माणसाचा शोध घेण्यासाठी जगभर हिंडणारा, अज्ञात देशींच्या अनाथ पोरांना शिकून म्हातारपणी त्यांच्या कुटुंबांत आजोबा होऊन राहू इच्छिणारा हा एक सह्रदय माणूस आहे हे फक्त मला ठाऊक होते. बाकीच्यांच्या दृष्टीला तो एक प्रमाणाबाहेस पिणारा दारुडा एवढेच दिसत होते. भोवतालचे लोक ‘पेलत नाही तर एवढी पिता का लेको?’ अशा चेह-याने ती उचलबांगडी पाहात होते. त्या अमेरिकन माणसाने माझा हात घट्ट दाबून धरला होता. कुणी तरी माणूस त्याच्या हाती लागला होता. त्याला त्या अवस्थेतही तो सोडवत नव्हता. मी काही वेळ माझा हात त्याच्या हातात तसाच राहू दिला. त्याच्या सुखदुःखाच्या कथा मी ऐकल्या होत्या. ‘पैशात काय आहे ?’ ह्या त्याच्या तत्त्वज्ञानाशी मी घटकाभर सहमत झालो होतो. ख्रिस्त चर्चमध्येच नसतो हे त्याचे मत मी मान्य केले होते आणि अनाथ पोरांचा तुम्ही प्रतिपाळ करता हीच तुमची थोर ईश्वरसेवा आहे वगैरे वगैरे म्हणालो होतो. रोज दारूच्या पेल्यात आपले एकाकी आयुष्य बुडवणा-या त्या धनिक अमेरिकन प्रवाशाला माझ्यारख्या सर्वस्वी परक्या माणसाकडून मिळालेला हा चिमूटभर जिव्हाळा उदंड वाटला असावा आणि म्हणूनच की काय कोण जाणे, त्या बेहोषीतही मला ओळखून त्याने माझा हात घट्ट दाबून धरला होता.  

एकदोनच दिवसीं आम्ही टोकियो सोडणार होतो. तेवढ्यात त्या गृहस्थाला भेटायचा मी प्रयत्न केला. पण तो गायब झाला होता. जगभर माणसांच्या शोधात निघालेला हा एकाकी माणूस दिवसातले चोवीस तास बेहोष असायचा. त्याचे पुढे काय झाले देव जाणे……

……………………………….पू र्व रं ग

Published by

sheetaluwach

एका देशात जन्म, दुस-या देशाचा नागरीक, तिस-याच देशात स्थायिक, २० वर्षांचे करीअर, ४ देशात नोकरी, १० हून अधिक देशात मुसाफीरी, ४ भाषांची ओळख. शिक्षक, व्यवसायिक, भाषांतरकार, हौशी गाईड, वाचक, श्रोता, वाचाळ, खादाड................. मी एक अनेक.................... Born somewhere, registered elsewhere, settled somewhere else, 20 years’ career, worked in 4 countries, travelled across 10 or more countries, communicates in 4 languages, a teacher, businessman, translator, amateur travel guide, bookworm, audiophile, loquacious, foody………… I am one many……….

8 thoughts on “मला भावलेले पु.ल. १”

  1. प्रत्येक जण शोधात असतोच….
    शोकांतिका अशी की सगळ्यांनीच स्वतःभोवती भिंती उभारल्यात…

    Like

    1. धन्यवाद सुनीलजी. माझ्या मते पाश्चात्य आणि पौर्वात्य संस्कृतींमध्ये एक अतिशय महत्वाचा फरक होता, तो म्हणजे भौतिक सुबत्तेबरोबरच असणारा मानसिक संयम आणि अध्यात्मिक शुचिता. विज्ञान आणि तत्वज्ञान या दोन्हीचा सुरेख संगम समाजात होता. ना विज्ञानाचा अतिरेक होता ना तत्वज्ञानाचा. त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर संपन्न असूनही आपला समाज मानसिक आणि शारीरीक पातळीवर सुखी होता. परंतु आज मात्र दोनही संस्कृतींमधला हा फरक नष्ट होत चालला आहे. भौतिक सुखाच्या मागे धावता धावता आपण आपली माणूसकी, जिव्हाळा विसरत जात आहोत. आपली आत्मकेंद्रित मनोवृत्ती एक दिवस विनाशाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणार आहे.

      Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s