नमस्कार मित्रहो,
तुमचं स्वागत आहे. या चॅनलवर आपण ज्ञान, तत्त्वज्ञान आणि संस्कृती या विषयांवर बोलणार आहोत. विषयाचा पसारा खुप मोठा वाटतो नाही!? काय आहे, एकदा विषयात विस्ताराला वाव ठेवला की मग जे काही मांडू ते आपल्या चौकटीतच आहे असे सांगता येते! म्हणजे मग एखादा विषय यायला हवा होता की नाही वगैरे ठरवण्यात वेळ वाया न घालवता तुम्ही केवळ चॅनलचा आनंद घेउ शकता. मग करायची सुरुवात?
गीता ही श्लोकांच्या स्वरुपात बांधलेली आहे. एकूण श्लोकसंख्या ७०० आहे. यात बोलणा-या व्यक्तीरेखा ४ आहेत.
धृतराष्ट्र – कौरवांचा पिता आणि हस्तिनापूरचा सम्राट. हा जन्मांध असतो. गीतेत याच्या मुखी एकच श्लोक आहे तो म्हणजे गीतेचा पहीला श्लोक. ‘आजोबा गोष्ट सांगा’ या धर्तीवर तो फक्त ‘संजया, कुरुक्षेत्रावर काय चालु आहे’ असा प्रश्न विचारतो आणि गीता सुरु होते. धृतराष्ट्राचे पात्र येथेच आटपते.
संजय – धृतराष्ट्राचा सारथी आणि त्यावेळचा तात्पुरता युद्धवार्ताहार. हा कुरुक्षेत्रावर चाललेल्या कौरव पांडव युद्धाचे धावते वर्णन (Live Commentary) धृतराष्ट्राला सांगत असतो. याला गीतेत ४१ श्लोक आहेत.
अर्जुन – पांडवातला धनुर्धारी भाऊ. याच्या मुखी ८४ श्लोक आहेत. यातील बहुसंख्य पहील्या अध्यायात आले आहेत.
श्रीकृष्ण – प्रत्यक्ष भगवान ज्याने हे तत्त्वज्ञान अर्जुनाला युद्धभूमीवर सांगीतले. गीतेतील सगळ्यात जास्त श्लोक म्हणजेच ५७४ श्लोक अर्थातच श्रीकृष्णाच्या तोंडी आहेत.
गीता एकूण १८ अध्यायांमध्ये विभागली आहे. या प्रत्येक अध्यायाचे नावात ‘योग’ आहे. म्हणजे अर्जुनविषादयोग, सांख्ययोग, कर्मयोग वगैरे. प्रत्येक योग हा त्या त्या अध्यायाचा प्रमुख विषय आहे. उदाहरणार्थ १४ व्या अध्यायाचे नाव ‘गुणत्रयविभागयोग’ असे आहे. यात अर्थातच तीन गुण आणि त्यांची लक्षणे इत्यादींची वर्णने आहेत.
एकुण काय तर एका पानावर १० श्लोक छापले तर केवळ ७० पाने; म्हणजे गीता हे एका छोट्या गोष्टीच्या पुस्तकाइतके लहान पुस्तक आहे. उत्तम कलाकृती म्हणून गाजलेले पुस्तक किंवा चित्रपटसुद्धा काही वर्षांनंतर विस्मृतीच्या पडद्याआड जातात. गाणी किंवा चित्रपटाचे संगीत तर रोज नवीन येते आणि जुन्याला मागे ढकलते. पण मग हजारो वर्षे टिकून रहाण्याइतके आणि आजही लोकांना आकर्षक वाटावे असे गीतेत आहे तरी काय? उत्तर अगदी सोपे आहे.
खरंतर हा प्रश्नच त्याचे उत्तर आहे. हजारो वर्षांपुर्वीच्या माणसाला आयुष्याविषयी जे प्रश्न पडलेले होते आणि आजच्या माणसालाही पडलेले आहेत ते सारखेच आहेत. त्यावेळी अर्जुनाला काय प्रश्न पडले होते? आणि आज आपण जेव्हा अधून मधून अर्जुनासारखे गोंधळात पडतो तेव्हा आपल्याला पडणारे प्रश्न हे सारखेच आहेत. थोड्याफार फरकाने आपल्याला अजूनही खुप मुलभूत प्रश्नच अडचणीत आणतात. गीता याच प्रश्नांवर भाष्य करते. गीत तेच तत्त्वज्ञान सांगते जे तेव्हाच्या आणि आत्ताच्या मानवाला लागू पडते. म्हणून गीता काल, आज आणि उद्याही होती आणि असणार आहे.
प्रश्न………….अर्जुनविषाद……………. पुढील भागात
(Read in English https://wp.me/pGdGC-12)
Copyright sheetaluwach.com 2020 ©
आरंभ उत्तम, पुढची उत्सुकता!!
LikeLiked by 1 person