अंतरंग – भगवद्गीता – भाग ९

राका व त्याची पत्नी बाका हे दोघे एका झोपडीत देवाची भक्ती करत आनंदाने रहात असतात. एके दिवशी रानात लाकडे गोळा करण्यासाठी फिरत असता राकाला एक सोन्याचे कंकण दिसते. राका विचार करतो की ‘आपण स्वतः तर मोहापासून दूर आहोत परंतु आपल्या बायकोला कदाचित याचा मोह होईल आणि ती आपल्याला हे कंकण घेण्याचा आग्रह करेल. तेव्हा आपण या कंकणावर माती टाकू यात म्हणजे मग तिला हे दिसणारच नाही आणि पुढचा प्रसंगही टळेल’. तो कंकणावर माती टाकू लागतो तेव्हा बाका तेथे येते आणि विचारते “हे तू काय करत आहेस?” राका सांगतो, “तूला मोह होऊ नये म्हणून सोन्याच्या कंकणावर माती टाकतो आहे.” बाका आश्चर्याने म्हणते, “म्हणजे तुला अजूनही सोने आणि माती वेगवेगळे दिसते तर!!”…..

अनासक्त कर्म करीत योग (ज्ञान) प्राप्त करणे म्हणजे कर्मयोग याची आता अर्जुनाला कल्पना आलेली आहे. तरीही त्याचे पुरेसे समाधान झालेले नाही. त्याच्या (आणि आपल्याही) आजूबाजूला अनेक लोक असे आहेत जे या मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात. योग्यायोग्य कर्म जाणणे, ते आचरणात आणणे, वृत्तीने अनासक्त राहणे आणि ज्ञानप्राप्ती करणे अशा निरनिराळ्या पायऱ्यांवर ते धडपडत असतात…. आपल्या गोष्टीतला राकासुद्धा असाच अजूनही संभ्रमातच आहे. वास्तविक त्याला मोहाचा स्पर्शही झालेला नाही परंतु अंतर्बाह्य निर्विकार वृत्ती अजूनही त्याच्या ठायी दिसत नाही.
अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की मग ज्याला ‘योगारुढ’ म्हणावे अशी अवस्था प्राप्त झालेला योगी कसा ओळखावा? मनोविजय दिसतो तितका सहजसाध्य नाही मग ज्याला तो साधला नाही त्याची गती काय होते? त्याच्या प्रयत्नांचे फलित काय?

आत्मसंयम……..

आपल्या उत्तरात भगवंत आत्मन्, संयम आणि संयमन अशी शब्दांची विभागणी करून अर्जुनाचे समाधान करतात.
सर्वप्रथम आत्मन् म्हणजे आपण स्वतः.. .
योगारुढ पुरुषाची त्याच्या मार्गावरील निष्ठा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. जोपर्यंत व्यक्ती आपल्या ध्येयाकडे निग्रहाने आणि अहर्निश वाटचाल करत नाही तोपर्यंत कोणत्याही बाह्य घटकाची मदत त्याला उपयुक्त ठरणार नाही.

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्‌। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः।
स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण मनुष्य हा स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे.

यशस्वी लोकात आणि इतरांत असणारा फरक हा या ‘आत्मन्’ चा आहे. ध्येयप्राप्तीची अनिवार ओढ असणे ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. भगवंत सांगतात की हीच व्यक्तीच्या यशाची गुरुकिल्ली आहे. भगवंताची अनिवार ओढ असणारा भक्तच त्याला प्राप्त करण्याचा मार्ग हरतऱ्हेने साधतो. ज्याला हा आत्मन् साधत नाही तो स्वतःचीच मदत करण्यात अपयशी ठरलेला स्वतःचाच शत्रु होय.
पुढचा टप्पा अर्थातच संयमाचा…. भगवंत सांगतात की स्वतःवर विजय मिळविणारा साधक भौतिक संसारातील चढ उतारांनी विचलित होत नाही. सुखात आणि दुःखात, लाभ आणि नुकसानातही शांत राहतो. एकाच निर्विकार वृत्तीने तो सोने आणि मातीकडे पाहू शकतो. कारण त्याच्या मनात त्याच्या ध्येयापलिकडे दुसरे काही नसते.

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः। युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः।
ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती व सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते.
परमात्मतत्वाचा स्पर्श झालेला असा व्यक्ती नित्य समाधानी असतो.

हे साधावे कसे? तर……….. संयमन

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता। योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः।
वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या चित्ताला दिली गेली आहे.

आपले चित्त जर दिव्याची ज्योत मानली तर त्याला विचलित करणारा वारा म्हणजे आपल्या इंद्रियांची ओढ! भगवंत सांगतात योगाभ्यासाने चित्त नियमन करता येते. एकांतात स्थिर आसनावर बसून मन एकाग्र करणारा योगी विचलित न होता कालांतराने शांततेचा अनुभव घेतो.

योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः।
मन व इंद्रिय यांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरिच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लीन करावे.
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः। उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये।
त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा.
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः। सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्‌।
शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून अन्य दिशांकडे न पाहता आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून स्थिर व्हावे.

येथे प्रत्येकाला चटकन् पडणारा प्रश्न अर्जुनालाही पडतो की मन हे अशाप्रकारे सहज ताब्यात येईल का? अर्थातच नाही. भगवंत सांगतात मनावर ताबा मिळविण्यासाठी ज्या शरीरात ते मन वास करते आधी ते शरीरही ताब्यात हवे……
त्यावरील श्रीकृष्णाचे विवेचन पुढील भागात…..

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ८

अन्नमयादन्नमयमथवा, चैतन्यमेव चैतान्यात्| द्विजवर दूरीकर्तुम् वान्छसि, किम् ब्रूहि गच्छ गच्छेति।।

प्रातःकालचे गंगास्नान करुन देवदर्शनासाठी निघालेल्या शंकराचार्यांच्या मार्गात एक चांडाळ आपल्या कुत्र्यांसह आडवा येतो. सवयीने त्याला ‘दुर हो’ असे आचार्य म्हणतात. तेव्हा तो चांडाळ त्यांना प्रश्न करतो – “हे महात्मन् नक्की काय दूर करू? माझे शरीर? ते तर तुमच्यासारखेच पंचमहाभूतांनी बनलेले आहे आणि नश्वरही आहे. बरं शरीरस्थ चैतन्य/आत्मा दूर करू? तो तर तुमच्या माझ्यासकट सर्व विश्व व्यापून आहे मग त्याला त्याच्यातूनच दूर कसा करणार?” आपल्या सिद्धांताचे व्यावहारीक दर्शन घडवणाऱ्या त्या शब्दांनी भानावर आलेले शंकराचार्य त्या चांडाळातील ईशतत्व जाणून त्याला प्रणाम करतात.
या एका छोट्या कथेतून कित्येक गोष्टींचा उलगडा होतो!! चांडाळ असो वा आचार्य, कर्मयोगी असो वा संन्यासी, परमतत्वाचा स्पर्श झालेला प्रत्येक व्यक्ती समान असतो. त्यांच्या साध्याच्या आड त्यांच्या मार्गाचे भिन्नत्व येत नाही. चांडाळाला झालेले ज्ञान आणि संन्यस्त आचार्यांना झालेले ज्ञान हे एकाच परमेश्वराशी निगडीत आहे. प्राप्तीचा मार्ग भिन्न असणे हे त्यांच्या अंतःप्रेरणेशी निगडीत आहे पण त्यांचे साध्य एकच आहे त्यामुळेच त्यांनी अंगिकारलेले मार्गही तितकेच श्रेष्ठ आहेत. ज्ञान मोठे आणि कर्म गौण असा भेद येथे नाही.
आपल्यालाही असा अनुभव अनेकदा येतो जेव्हा एखाद्या सिद्धांतामागील तत्व उमगलेले असते परंतू व्यवहारात ती गोष्ट अंगिकारणे साधलेले नसते. साधे उदाहरण घ्यायचे तर रस्त्यावरील रहदारीच्या नियमांचे पालन!! हे नियम पाळणे हे प्रत्येकाला तत्व म्हणून पटलेले असते परंतू ते प्रत्यक्ष व्यवहारात आणणे जमत नसते. त्यासाठी अर्थातच प्रत्येकाची आपली कारणेही असतात. मग ते तत्व चुकीचे आहे असे मानायचे का? तर ते तर्काला पटत नाही. अशी मग गोंधळाची अवस्था माणसाला अनुभवाला येते. जे रहदारीच्या साध्या नियमांच्या बाबतीत खरे आहे ते आत्मज्ञानासारख्या दुष्प्राप्य गोष्टीत वेगळे कसे असेल? त्या बाबतचा गोंधळ अर्जुनाचाही होतो. मग येथे चुकते काय…..? तर तत्वावरील निष्ठा…. चांडाळाच्या शब्दांनी भानावर आलेले आचार्य त्याला प्रणाम करून अद्वैतावरील आपली निष्ठा सिद्ध करतात. बहुसंख्य व्यक्ती मात्र येथे गोंधळून जातात. काय करावे आणि काय करु नये हे ठरवता येत नाही. सोपा पण तर्काला न पटणारा मार्ग स्वीकारावा की कठीण पण शाश्वत कल्याण करणारा मार्ग स्वीकारावा? बहुतांशी लोक चटकन सोपा मार्ग स्वीकारतात आणि सिग्नल तोडून निघून जातात!! असे अनेक सिग्नल, प्रसंग, विचार चुकवून तर्काला मागे सारत एके दिवशी आयुष्यात अशा ठिकाणी येऊन पोचतात की जेथे तर्काला मागे सारणे अशक्य होते आणि वैचारीक गोंधळापेक्षा सिग्नलला थांबणे सोपे वाटायला लागते. अर्जुनही याच संभ्रमात आहे. कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे त्याला कर्माचे बंधन टाळून कर्म करायचे आहे पण मग त्यापेक्षा कर्मच टाळणे सोपे नाही का?
गीतेचा पाचवा अध्याय याच प्रश्नावर सुरु होतो. अर्जुन कृष्णाला प्रश्न करतो की एकीकडे कर्म टाकण्याचा उपदेश करतोस आणि कर्माची प्रशंसाही करतोस असे कसे. दोन्हीपैकी कल्याणकारक असे एक काहितरी सांग.

संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि । यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्‌।।

यावर कृष्णाचे उत्तर आजच्या परिस्थितीला सुसंगत असेच आहे. संन्यास आणि कर्मयोगात, कर्मयोग आचरण्यास सुलभ आहे असे कृष्ण सांगतो.
सर्वप्रथम आत्मज्ञानासारखे उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी निवडलेला मार्ग मग तो ज्ञान असो कर्म असो की भक्ती यात उणेअधिक काहीच नसते. ध्येय जितके उन्नत त्याच्या प्राप्तीचा मार्गही तितकाच श्रेष्ठ आहे असे आग्रही प्रतिपादन या अध्यायातून श्रीकृष्ण करतो. अर्थात व्यक्तीच्या परिस्थिती प्रमाणे मार्ग हे आचरण्यास सुलभ किंवा कठीण असू शकतात.

संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ । तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते।।

संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही कल्याणकारक आहेत. परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे.

श्रीकृष्णाच्या मते निष्क्रियता आणि निष्कर्मता यातील फरक जाणून खरी संन्यस्त वृत्ती अंगिकारणे हे प्रत्येकाला साध्य होणे कठीण आहे. त्यापेक्षा कर्मयोग आचरणात आणणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे अधिक सुलभ आहे. परंतु येथे हे नीट ध्यानात घेतले पाहीजे की कर्मयोग आणि संन्यस्त वृत्ती या दोन भिन्न गोष्टी असल्याचे समजणे हे मात्र चुकीचे आहे. कारण कर्मयोगी व्यक्ती शरीराने कर्म करत असते परंतु वृत्तीने संन्यस्त असते तर संन्यस्त व्यक्ती यातील कर्माच्या भागातूनही निवृत्ती पत्करते. त्यामुळे केवळ सर्वसंगपरित्याग करून अंगाला राख फासून ध्यानस्थ बसणे म्हणजेच संन्यास असे जर कोणी मानत असेल तर ते अयोग्य आहे. भगवंत पुढे असेही म्हणतात की संन्यस्त किंवा कर्मयोगी व्यक्तीला वेगवेगळी फळे मिळतात असे मानणेही मूर्खपणाचे आहे. दोन्हीतही मिळणारे फलित हे एकच असते. जो हे जाणतो तो खरा ज्ञाता.
मग कर्मयोगाला सुलभ म्हणायचे कारण काय? याचे विवेचन भगवंत पुढे करतात.

संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः। योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति॥

परंतु हे महाबाहो अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. भगवत्स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो.

इंद्रियांशी निगडीत कर्म करत राहणे परंतु त्या कर्माचे कर्तेपण स्वतःकडे न घेणे ही कला साध्य होणे अतिशय कठीण असते. त्यासाठी लागणारी साधना कर्मयोगाने सुलभ होते. व्यक्ती कर्माच्या बंधनाचे स्वरुप कर्म करता करता जाणायला लागते, आपल्या मनावर संयम प्राप्त करण्यास सक्षम होते आणि कालांतराने कर्म करूनही त्यापासून अलिप्त राहण्याचे ज्ञान प्राप्त करते.
आजच्या युगात व्यक्तीला शिक्षण, व्यवसाय, चरितार्थ, संसार आणि संगोपन अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडाव्या लागतात अशा वेळी आपले विहित कर्म प्रामाणिकपणे पार पाडणे त्याचवेळी मन कर्मफलाच्या बंधनातून मुक्त ठेवण्याचा यत्न करणे हे जास्त तर्कसंगत आहे असे भगवंत सांगतात. यातूनच कर्माचे कर्तेपण नाकारणे ही ज्ञात्याची अवस्था कर्मयोगीही प्राप्त करतो. फलाची आसक्ती नष्ट झाल्याने तो निरंतर मनःशांतीचा अनुभव घेतो आणि कमळावरील जलबिंदूप्रमाणे पापापासून अलिप्तही राहतो असे भगवंत सांगतात.

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः।लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा॥

अशा चिरंतन मनःशांतीचा अनुभव घेणाऱ्या ज्ञात्याला भगवंत योगी आणि मुनी अशा संज्ञा वापरतात. अशा व्यक्तीला बाह्य विषयांची आसक्ती नसते, काम आणि क्रोध यामुळे उत्पन्न होणारा आवेग आवरण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी असते. इच्छा, भय आणि क्रोध या विकारांना दूर सारून परमात्म्याचे ध्यान करणारा असा व्यक्ती सात्विक आणि अक्षय आनंदात लीन असतो असे श्रीकृष्ण प्रतिपादन करतो.

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्‌ । अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्‌॥

गीता वाचत/शिकवत असताना अनेक प्रश्न असे येतात की त्यातून प्रश्नकर्त्याची गोंधळाची अवस्था ध्यानात येते. पहिल्याच लेखात आपण असे म्हणालो होतो की – बहुसंख्य वाचक गीतेचा तयार उत्तराच्या (Instant Remedy) अपेक्षेने अभ्यास करतात. त्यातील ज्ञान समजून घेण्याचा पुरेसा प्रयत्न करतातच असे नाही. खरी मेख येथे आहे. गीता एका विशिष्ट दृष्टीकोनाचे समर्थन करत नाही. किंबहूना गीता केवळ योग्य दृष्टीकोन विकसित करण्याचा मार्ग सुचवते. त्यानुसार वागून योग्य तो मार्ग निवडणे हे अभ्यासकाचे कार्य आहे. गीतेत ज्ञानयोग, कर्मयोग या दोन्ही योगांवर भगवंताने भाष्य केलेले आहे. व्यक्तीने आपल्या अंतःप्रेरणेने आणि परिस्थितीनुरुप भगवत्प्राप्तीचा कोणताही एक मार्ग निवडणे अपेक्षित आहे. याचा अर्थ निवडलेला एक मार्ग योग्य आणि दुसरा अयोग्य किंवा आपल्यापेक्षा भिन्न मार्गाने जाणारे चूक असा घेतला जातो. हे अभ्यासातले अपरिपक्वतेचे लक्षण आहे. ज्ञानयोग उजवा आणि कर्मयोग उणा असे मानणे मूर्खपणाचे आहे असे गीता स्पष्टपणे म्हणते. आत्मज्ञ होण्यासाठी व्यक्ती कोणता मार्ग निवडते यापेक्षा त्या मार्गावरून किती निष्ठेने वाटचाल करते हे जास्त महत्वाचे आहे. मार्ग हा व्यक्तीपरत्वे भिन्न असणार यात शंकाच नाही. अचल राहते ती निष्ठा जी कर्ममार्गी व्यक्तीला इंद्रियनिग्रह आणि ज्ञानी संन्यासाला नैष्कर्म्याप्रत नेते. ज्ञानकर्मसंन्यास, कर्मसंन्यास आणि आत्मसंयमयोग हे याच दृष्टीकोनाचे समर्थन करतात.

Copyright sheetaluwach.com 2021 ©

अथेन्स – भाग ४ – लोक आणि लोकशाही

अथेनियन अगोरा (Ancient Agora – Athens)

पाश्चात्य जगाला ज्ञात असणाऱ्या लोकशाहीचे अथेन्स हे उगमस्थान मानले जाते. साधारण इ.स.पू. ६ व्या शतकापासून अथेन्स राज्यात लोकशाही अस्तीत्त्वात आली आणि नंतर इतर ग्रीक राज्यांध्येही त्याचेच अनुकरण केले गेले असे मानतात. गंमतीचा भाग असा की गुलामगिरी आणि लोकशाही दोघीही प्राचीन अथेन्समध्ये एकत्र नांदत होत्या!! निवडणूकीपासून ते व्यापारावरील सरकारी नियंत्रणापर्यंत आपल्याला आज ज्ञात असणाऱ्या अनेक व्यवस्था अथेन्सी लोकशाहीचा भाग होत्या. पालिका, कार्यालये, समित्या, नोकरशहा, लोकप्रतिनिधी, समर्थक, विरोधक,मतदार आणि मतदान अशा सर्व संस्था अथेन्सवासीयांनी उभ्या केल्या होत्या. सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रौढ अथेन्सवासीयांनाच फक्त मतदानाचा अधिकार होता. मतदानाप्रमाणेच आपली मते मांडणे, सभा घेणे, भाषणे , वादविवाद करणे हा अथेन्सवासीयांचा आवडता कार्यक्रम होता. वादविवादासाठी प्रसिद्ध असलेले सॉक्रेटीस (Socrates), डेमॉस्थेनस (Demosthenes) सारखे तत्वज्ञ याच परंपरेतले. अशा भाषण, वादाविवाद, चर्चा, सभा, परिषदा इ. शहरांच्या मध्यवर्ती भागात होत असत. प्रशासक, नगरपालिका सदस्य, प्रतिष्ठित नागरीक, या सगळ्यांचा राबता असणारे हे ठिकाण म्हणजे अगोरा (Agora) किंवा आजच्या भाषेत शहराचा मध्यवर्ती भाग (मराठीत City Centre, किंवा CBD!). प्राचीन ग्रीकांच्या प्रत्येक शहरात असे ठिकाण असे. बाजारपेठ, सरकारी कार्यालये, सांस्कृतीक कार्यक्रम आणि गप्पांचे अड्डे यांचे एकत्रित संकुल म्हणजे अगोरा (Agora). अथेन्सच्या मधोमध ॲक्रॉप्लिसच्या दिशेने जाणाऱ्या प्राचीन अथेन्स महामार्गाच्या (Panathenaic Highway) दोन्ही बाजूला हे अगोरा (Agora) बांधले गेले होते. ज्याचे अवशेष आजही पहायला मिळतात. काय काय आहे या संकुलात…
निरनिराळ्या काळात बांधलेली नाट्यगृहे, चर्चेसाठीची आवारे, सरकारी कचेऱ्या, दुकाने, कारंजी, बागा, मंदिरे इतकेच काय पण एक टांकसाळ सुद्धा होती. ग्रीकांच्या व्यवस्था किती प्रगल्भ होत्या हे दर्शवणारी काही विशेष कार्यालये होती. जसे – दुकानांत तोलल्या जाणाऱ्या मालासाठीची प्रमाणीत वजने बाळगणारे पालिकेचे कार्यालय होते. येथे येऊन ग्राहक आपल्याला दिलेला माल योग्य वजनाचा असल्याची खात्री करू शकत असे. नगरपरीषदेच्या सदस्यांना बसण्यासाठी एक कार्यालय होते. त्यात राहण्याचीही सोय होती. नगरपरिषदेचा किमान एकतरी सदस्य येथे आळीपाळीने वास्तव्यास असे. जेणेकरून जनतेचा प्रतिनिधी नागरीकांना कोणत्याही वेळी उपलब्ध होई. याच ठिकाणावरून अथेन्सपासूनची भौगोलिक अंतरे प्रमाणीत केली जात असत. उदा. अथेन्सपासून स्पार्टापर्यंतचे अंतर मोजायचे तर त्याचा आरंभबिंदू (zero point) अगोरा (Agora) मानला जाई!! ग्रीकांची लोकशाही किती विचारपूर्वक उभी केलेली होती हे या व्यवस्थेवरून स्पष्ट होते.
पारंपारीक अथेन्स-उत्सवाच्या दिवशी काढलेली मिरवणूक याच परीसरातील मार्गावरून पार्थेनॉनला जात असे. दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या नलिका, चढण असलेल्या मार्गाला आधार, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी असे संपूर्ण नियोजित बांधकाम अगोरात आढळते. शेकडो वर्षे हा भाग त्याचं महत्व टिकवून होता आणि सतत नवनवीन बांधकामं स्वीकारत होता. लहान मुलांच्या खेळणी, स्वयंपाकाची उपकरणे, विक्रीला आलेल्या वस्तू, विनिमयाच्या नाण्यांपासून ते पार कालमापक घटीका आणि मतदान/निवडणूक यंत्रापर्यंत अनेक वस्तू येथे केलेल्या प्रदीर्घ उत्खननात सापडल्या आहेत. वादविवाद, चर्चा, परिषदा, नाटके, जत्रा तसेच दुकाने, शासनयंत्रणेचा आणि विद्वानांचा राबता यामुळे अगोराचे संकुल हे सतत गजबजलेले सांस्कृतिक केंद्रच होते.

Panathenaic Highway_Ancient Agora_Athens
प्राचीन अगोराच्या मधोमध – पॅन अथेनियन महामार्ग – अथेन्स उत्सवाची मिरवणूक याच मार्गावरून वर टेकडीवर दिसणाऱ्या पार्थेनॉनला जाई.
Panoramic View_Ancient Agora_Athens
काही एकरात पसरलेला अगोराचा उत्थनन केलेला परीसर. उजव्या बाजूला बाजारपेठेची पुनर्बांधणी केलेली इमारत
Ruins_Ancient Agora_Athens
प्राचीन बांधकामांचे अवशेष
Middle Stoa_Ancient Agora_Athens_Greece
अगोराच्या मध्यभागात इ.स.पू. १०० मध्ये बांधलेल्या बाजारपेठ आणि फेरफटका मारायच्या जागेचे अवशेष
Tholos_Ancient Agora_Athens_Greece
(थॉलस) Tholos या गोलाकार इमारतीचे अवशेष. नगरसेवक येथेच वास्तव्यास असत
Great Drain_Ancient Agora_Athens_Greece
मोहेंजोदारोची आठवण करून देणारी, पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या कडेने बांधलेली गटारे.
Water Well_Ancient Agora_Athens_Greece
विहीर – पाणी ओढून काढल्याने उमटलेले दोरीच्या खुणाही दिसत आहेत.
Corinthian PIllar_Odeon of Agrippa_Ancient Agora_Athens_Greece
इ.स.पू १५ मध्ये रोमन सिनेटर अग्रिपा (Agrippa) ने बांधून दिलेल्या थिएटरच्या बांधकामातील एक स्तंभ (कोरिंथिअन शैली)
Altar of twelve Gods_Ancient Agora_Athens_Greece
अगोराच्या मध्यभागी, बारा ऑलिंपिअन देवतांचे पुतळे स्थापन केलेले मंदिर. इ.स.पू. ५२२
Altar of the Twelve Gods_Ancient Agora_Athens_Greece
ग्रीक कोरीव कामाच उत्कृष्ट नमुना दाखवणारा ऑलिंपिअन देव. हाच अथेन्सचा भौगोलिक मध्य (Zero Point) मानला जाई
Temple of Hephaestus_Ancient Agora_Athens_Greece
(ग्रीकांचा लोहार, आग आणि तंत्रशाळेचा देव) – (Hephaestus) हेफेस्टसचे देऊळ. अथेन्समधील प्राचीन मंदिरातील सगळ्यात जास्त सुस्थितीत राहिलेले मंदिर. इ.स.पू. ४४९
Wall Inscriptions_Temple of Hephaestus_Ancient Agora_Athens_Greece
भिंतींवरील शिल्पे ग्रीक शैलीतील मंदिरांची खास रचना
Temple of Hephaestus_Ancient Agora_Athens_Greece
मंदिराचा अंतर्भागातील रचना
Centaur_Temple of Hephaestus_Ancient Agora_Athens_Greece
भिंतींच्याच संगमरवरी दगडातील खास कोरीव कला… सेन्टॉर (Centaur) (आपले हॅरी पॉटरवाले!)
Temple of Hephaestus_Ancient Agora_Athens_Greece
मंदिराच्या आतील स्तंभ आणि गर्भगृहाचा भाग
Temple of Hephaestus_Ancient Agora_Athens_Greece
गर्भगृह, हा भाग इ.स. ७ व्या शतकापासून बराच काळ चर्च म्हणून वापरला गेला.

जवळपास १२ स्तरांपर्यंत केलेल्या उत्खनातून अथेन्सच्या अगोराच्या परीसरात अनेक अवशेष, वास्तू आणि वस्तू सापडल्या. साधारण इ.स.पू. ३००० पासून ते इ.स. १५०० पर्यंतच्या अशा अनेक वस्तूंचे एक संग्रहालय अगोराच्याच परिसरात उभे आहे. पर्गमॉन (Pergamon) चा राजा अटोलास (Attalos) याने इ.स.पू. १५० च्या आसपास बांधून दिलेल्या बाजारपेठेच्या जागेची पुनर्बांधणी करून त्यात हे म्युझियम वसवले आहे. जवळपास १५०० च्या आसपास वस्तुंचा संग्रह येथे आहे त्यातील केवळ प्राचीन अथेन्सच्या मोजक्या खुणा पाहू…

Kleroterion_Ancient Agora_Athens_Greece
Kleroterion क्लॅरोटेरिअन – प्राचीन ग्रीक निवडणूक यंत्र.
ॲरिस्टॉटलच्या Constitution of the Athenians या ग्रंथात वर्णन केलेल्या  निवडणूकीच्या यंत्राचे उत्खननात मिळालेले अवशेष. संपूर्ण उभ्या आयताकृती यंत्रात जवळपास ५०० खाचा आणि एक नलिका असून त्याला लाकडी चौकटही असे. एकाच वेळी ५०० इच्छुक सदस्य किंवा नागरीकांमधून न्याय, अर्थ, प्रशासन वगैरे निरनिराळ्या समित्यांचे अधिकारी निष्पक्षपणे निवडण्याचे काम या यंत्रातून केले जाई. बाजूला ठेवलेल्या चकत्यांवर इच्छुक आपले नाव लिहून चकती यंत्रात खोचून ठेवत असे. नंतर फासे किंवा दोन रंगातील गोळे वापरून यंत्रातील चकत्या यादृच्छिकपणे (Randomly) निवडल्या जात असत.
Time Keeper_Ancient Agora_Athens_Greece
वेळ मोजण्यासाठी वापरले जाणारे प्राचीन घटिकापात्र. इ.स.पू. ५वे शतक वरच्या पात्रातील सगळं पाणी खाल्यच्या पात्रात पडलं की वेळ संपली. चित्रातील पात्रात ६.४ ली पाणी मावते म्हणजे साधारण सहा मिनिटांसाठी वापरत असत. शेवटचा थेंब पडला की वक्त्याची किंवा भाषणाची वेळ संपली…
Cooking equipment_Ancient Agora_Athens_Greece
स्वयंपाकाची प्राचीन साधने (आधुनिक साधने तरी काय वेगळी असतात म्हणा!) इ.स.पू. ६वे शतक
Barbecue Grill _Ancient Agora_Athens_Greece
प्राचीन भट्टी (Barbecue ?!) आणि ट्रे. इ.स.पू. ६वे शतक धातूच्या सळ्या आधुनिक आहेत, उपयोग समजण्यासाठी
Child Toilet_Ancient Agora_Athens_Greece
हे काय आहे हे सांगण्याची गरज नाही, बाजूचे चित्र पुरेसे बोलके आहे… इ.स.पू ६५०

अथेन्समधील अशीच इतर म्युझियम्स अंतिम भागात पाहू……

Copyright sheetaluwach.com 2020 ©

अथेन्स – भाग ३ – संस्कृतीचे स्तंभ

अथेन्समध्ये वावरताना ग्रीसला पाश्चात्यांच्या संस्कृतीचा पाया का म्हणतात, याची सतत प्रचीती येते. धर्म, शिक्षण, कला आणि क्रीडा या संस्कृतीच्या प्रत्येक अंगाची पाश्चात्य घडण ग्रीकांच्या भूमीत झाली हे पटवणारी अनेक प्राचीन स्मारकं अथेन्समध्येच पहायला मिळतात. प्राचीन मंदिरं, उत्कृष्ट वाचनालयं, प्लेटोच्या – ॲरिस्टॉटलच्या शाळा, स्टेडियम आणि नाट्यगृहं याचा आढावा घेता घेता दिवसच्या दिवस जातात. त्यातलीच काही खास ठिकाणं..

पोसायडनचे देऊळ – केप सुन्यो (Temple of Poseidon, Cape Sounion)
अथेन्सवासीयांनी बांधलेले एक नितांत सुंदर मंदिर म्हणजे पोसायडनचे केप सुन्यो येथील मंदिर. पोसायडन (Poseidon) हा ग्रीकांचा समुद्र, वादळ, भूकंप आणि घोड्यांचा देव. आपल्या शंकरासारखं याच्याही हातात त्रिशुळ असतं. अथेन्सच्या ईशान्येला साधाराण ७० किमी अंतरावर समुद्रकिनाऱ्यावरील एका टेकाडावर हे मंदिर उभे आहे. पर्शियन आक्रमकांनी इ.स.पू. ४८० मध्ये उध्वस्त केलेल्या प्राचीन (इ.स.पू ४८० त प्राचीन!!) मंदिराच्या जागेवरच इ.स.पू ४४० मध्ये अथेन्सवासीयांनी नवीन मंदिर बांधले. तेही पर्शियनांचा पराभव करूनच! आपल्या विजयाची खूण म्हणून शत्रुची लुटलेली एक नौकाही तिथेच समुद्रात उभी केली.
२० फुट उंच आणि पायाशी ३ फुट रुंद अशा जवळपास ४० (अर्थात संगमरवरी) डोरीक स्तंभांवर उभे असलेले आणि पोसायडनची भव्य मूर्ती मिरवणारे हे मंदिर समुद्राच्या पार्श्वभूमीवर अतिशय खुलुन दिसते. आशियातून ग्रीसच्या आसपास समुद्रातून प्रवास करणाऱ्यांच्या नजरेस हे मंदिर पडल्याचे उल्लेख आहेत.
या मंदिराच्या सौंदर्याचा मोह इतका मोठा आहे की लॉर्ड बायरन (Lord Byron) सारख्या थोर कवीने येथील वास्तव्यात या मंदिराच्या अवशेषातील एका स्तंभावर चक्क आपलं नाव कोरलंय!! ही जागा प्राचीन इतिहासाचा ठेवा आहे हे माहिती असूनही!!! (असले उद्योग करणारे फक्त भारतातच असतात असे नाही हो, या क्षेत्रातही इंग्लंडनेच बाजी मारली आहे!!)

View of Cape Sounion - Athens
केप सुन्योचा रम्य परिसर
Temple of Poseidon, Cape Sounion, Full View
पोसायडनचे मंदिर… शब्दातीत…
Temple of Poseidon, on background of  Cape Sounion
केप सुन्योच्या पार्श्वभूमीवर मंदिराचा देखावा.
Pillars - Temple of Poseidon, Cape Sounion, Athens , Greece
मंदिराच्या स्तंभाची रचना
Pillars - Temple of Poseidon, Cape Sounion, Athens , Greece
Pillars - Temple of Poseidon, Cape Sounion, Athens , Greece
संगमरवरी कोरीव दगडांचे स्तंभ
Byron's Grafitti -Temple of Poseidon, Cape Sounion, Athens , Greece
खुणेच्या लाल रेषेचा भाग झूम केल्यास उचापती बायरनचे नाव दिसेल!!!

झ्यूसचं देऊळ (Temple of Olympian Zeus)
काहीएक हेतू मनात ठेऊन एखादा उपक्रम उभा करावा आणि तो चांगला हेतू बाजूला राहून भलत्याच कारणासाठी त्या उपक्रमाला प्रसिद्धी मिळाली तर कसे वाटेल? उदाहरणार्थ, आपली बिर्ला मंदिरंच घ्या, चांगल्या हेतूने बांधलेली देवाची देवळं. पण लोकांनी त्याला आतल्या देवाच्या नावाऐवजी बांधणाऱ्या बिर्लांचं नाव दिलं. पर्यटकांना काय सांगणार बिर्ला मंदिर म्हणजे काय?! आता कोणाची मूर्ती असायला हवी?.. दुर्दैव त्या बिर्लांचं आणि देवाचंही!
असंच, म्हणजे खरंतर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून उभं करण्यात आलेलं पण रखडलेल्या बांधकामासाठी जास्त प्रसिद्ध झालेले दुर्दैवी मंदिर म्हणजे झ्यूसचे मंदिर. गंमतीचा भाग म्हणजे झ्यूस हा ग्रीकांचा सगळ्यात मोठा देव, त्याच्याच मंदिराची अशी अवस्था व्हावी हे ही नवलच.
इ.स.पू ६ व्या शतकात अथेनीयन आक्रमकांनी या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली, तेव्हा अथेन्सच्या मधोमध उभे असणारे हे मंदिर त्याकाळचे सगळ्यात भव्य मंदिर असणार होते. पण मंदिराचे बांधकाम रखडत राहिले आणि पूर्ण कधी झाले तर फक्त ६३८ वर्षांनी!! इ.स. २ ऱ्या शतकात रोमन काळात सम्राट हेड्रियनने हे काम पूर्ण करवले. जवळपास १०४ स्तंभांवार उभे असलेले हे मंदिर तेव्हाही त्याकाळातले सगळ्यात मोठेच होते. पार्थेनॉनच्या जवळपास दुप्पट.. (वाचा – पार्थेनॉन). पण बांधून झाल्यावरही या मंदिराचे दुर्दैव संपले नाही. काही वर्षातच अथेन्सवरच्या आक्रमणात टोळ्यांनी मंदिराची लूट आणि नासधूस केली. त्यानंतर एखाद्या पडक्या वाड्याप्रमाणे हे मंदिर ओस पडलं. मंदिराचे कोरीव पाषाण लोकांनी इतर बांधकामासाठी वापरले. रोमच्या ज्युपीटरच्या मंदिरासाठी वापरलेले काही दगड येथूनच नेले गेले. १४ व्या शतकापर्यंत मंदिराचे केवळ २१ स्तंभ शिल्लक राहिले होते. नंतर ऑटोमन तुर्कांनी त्यातले काही स्तंभ स्फोटके वापरून पाडले आणि मशिदींच्या बांधकामात वापरले. आज दिसतात ते एकूण १६ स्तंभ ज्यातला एक स्तंभ १८५२ सालच्या वादळात कोसळला. तो पडलेल्या स्थितीतच जतन करून ठेवण्यात आला आहे. याही अवस्थेत मंदिराचे आवार आणि स्तंभ पाहून त्याच्या भव्यतेची कल्पना येते.

Full View - Temple of Olympian Zeus, Athens, Greece
१०४ स्तंभापैकी आज उभ्या असलेले १५ स्तंभही मंदिराच्या भव्य आकाराची कल्पना करून द्यायला पुरेसे आहेत.
Broken 16th Pillar - Temple of Olympian Zeus, Athens, Greece
वादळात कोसळलेला १६ वा स्तंभ. यातही संगमरवारच्या कोरीव दगडांची रास किती कौशल्याने रचली जात असे हे कळून येते.
Pillars and Inner Structure - Temple of Olympian Zeus, Athens, Greece
मंदिराच्या दर्शनी भागातील आणि गर्भगृहातील स्तंभ

पॅन-अथेनिक स्टेडियम (Panathenaic Stadium) – (आधुनिक ऑलिंपिकचे जन्मस्थान)
इ.स.पू. ३३० मध्ये लायकर्गसने (Lycurgus) हे स्टेडियम अथेन्सवासीयांसाठी बांधले ऑलिंपिया किंवा डेल्फीप्रमाणे येथेही निरनिराळ्या खेळांच्या स्पर्धा होत असत. इ.स. ११४ मध्ये हिरोडस ॲट्टीकस (Herodes Atticus) याने त्याची संपूर्ण संगमरवरात पुनर्बांधणी केली. त्या काळात (आणि आजही) ५०,००० लोक मावतील इतकी या स्टेडियमची क्षमता आहे. जे झ्यूसच्या देवळाच्याही नशीबात नव्हतं ते या स्टेडियमच्या नशीबात होतं. ख्रिश्चन धर्माचा वाढत्या प्रभावाच्या काळात ओस पडलेलं हे स्टेडियम पुन्हा समोर आलं ते थेट १८६९ च्या उत्खननानंतर… त्या काळात ऑलिंपिक चे आधुनिक पुनरुज्जीवन करण्याचे घाटत होते. ६ एप्रिल १८९६ रोजी याच स्टेडियमवर आधुनिक ऑलिंपिकचे उद्घाटन झाले. स्टेडियमला पुन्हा आपल्या गतकाळाचं वैभव प्राप्त झालं. ऑलिंपिकची परंपरा, जी आज इतकी मोठी चळवळ बनलीय त्याची सुरुवात याच स्टेडियमवर झाली. आजही ज्या देशात ऑलिंपिक होणार आहे त्या देशाच्या प्रतिनिधींकडे ऑलिंपिक ज्योत हस्तांतरण करण्याचा सोहळा याच स्टेडियमवर होतो.

Full View - Panathenaic Stadium - Athens, Greece
आजही वापरात असणाऱ्या २००० वर्ष जुन्या स्टेडियमचा विहंगम देखावा
Herm - Panathenaic Stadium - Athens, Greece
स्टेडियमच्या ट्रॅकजवळ उभे केलेले Herm – दोन्ही बाजूला चेहरा कोरलेले शिल्प, हे उत्खननात सापडले.
Seating - Panathenaic Stadium - Athens, Greece
पहिल्या रांगेत खास आसनव्यवस्था..
Players Tunnel - Panathenaic Stadium - Athens, Greece
खेळाडूंनी प्रवेश करण्याचा बोगदा, हा व्हीआयपी आसनांच्या बरोबर समोरच्या बाजूस आहे.
Olympic Altar - Panathenaic Stadium - Athens, Greece
या पात्रातून घेतलेली ज्योत समारंभपूर्वक ऑलिंपिक भरवणाऱ्या देशाला दिली जाते.

ॲरीस्टॉटलची शाळा ( Lyceum of Aristotle)
अथेन्ससारख्या अतिप्राचीन नगरांची एक अडचण असते. आजच्या नागरीकांनी वसाहतीसाठी जिथे कुठे खोदकाम करायला सुरुवात करावी तिथे त्यांच्याच थोर पूर्वजांच्या खुणा सापडायला लागतात. साध्या बस स्टॉपपासून ते सरकारी इमारतींपर्यंत सगळ्याच बांधकामांच्या जागी काही ना काही सापडलंय आणि आजही सापडतंय. मग नव्या बांधकामाची पुनर्रचना करायची आणि जुनं अभिमानाने जतन करायचं ही ग्रीकांची पद्धत. अख्खं अथेन्स नगर असं प्राचीन अवशेषांच्या खुणा आंगाखांद्यावरच नाही तर पायाखालीही बाळगून जगतं!
त्यातलंच एक उदाहरण म्हणजे ॲरीस्टॉटलची शाळा ( Lyceum of Aristotle). अथेन्सच्या मॉडर्न आर्ट म्युझियमसाठी पाया खोदताना तेथे अवशेष सापडायला लागले ते ॲरीस्टॉटलच्या शाळेचे आहेत लक्षात आलं. खरंतर या जागी कोणतेही बांधकामाचे अवशेष आता उरलेले नाहीत पण प्राचीन संदर्भावरून आणि जागेच्या अभ्यासावरुन जिमखाना आणि ॲरिस्टॉटलची शाळा येथे होती याची खात्री पटली आणि मग उत्खनन करून ॲरिस्टॉटलच्या शाळेची जागा जतन केली गेली. म्युझियम अर्थातच थोड्या दुरवर बांधलं. ही घटना आहे १९९६ सालची.
अलेक्झांडर आशियात युद्ध करत असताना ॲरिस्टॉटल येथे शिकवत होता. फेरफटका मारत विद्यार्थ्यांच्या घोळक्याला शिकवण्याची ॲरिस्टॉटलची पद्धत येथलीच. असे म्हणतात की अलेक्झांडर स्वारीसाठी ज्या ज्या भागात जात असे त्या त्या भागातील वनस्पती आणि प्राण्यांचे नमुने आपल्या या गुरुंच्या अभ्यासासाठी पाठवत असे. त्याचे एक संग्रहालय पण या शाळेत बांधले होते. सुसज्ज अशी तालीम आणि जिमखानाही येथे होता. आज येथे केवळ जमीनीचा तुकडाच दिसतो पण याच भूमीवर विख्यात ॲरिस्टॉटल शिकवत असल्याने त्याचे महत्व (माझ्यासाठी तरी) एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही.
(जाता हे ही सांगायला हरकत नाही, की अथेन्स राज्याचा नागरीक नसल्याने ॲरिस्टॉटलला अथेन्समध्ये जागा विकत घ्यायला परवानगी नव्हती!! अलेक्झांडर मरण पावल्यानंतर मॅसेडोनीयन्स बरोबर ॲरिस्टॉटलाही अथेन्स सोडावे लागले.)

Site of Excavation - Lyceum of Aristotle
उत्खननात गवसलेले विद्यापीठ
Site of excavation - Lyceum of Aristotle
ॲरिस्टॉटलच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी

प्लेटोची अकॅडमी (Platonic Academy)
प्लेटोची जगप्रसिद्ध अकॅडमी जेथे होती ती जागाच आता केवळ उरली आहे. त्यावर छोटेखानी दृक् श्राव्य म्युझियम आणि प्लेटोचा पुतळा इतकेच काय ते उभे आहे. दुर्दैवाने अथेन्समध्ये या ठिकाणाची माहिती खुप कमी लोकांना आहे. टॅक्सीवाल्यालाही गूगल मॅप्स वापरून तिकडे न्यावे लागले.

Museum - Platonic Academy, Athens, Greece
म्युझियमचेे प्रवेशद्वार
Statue of Plato - Platonic Academy, Athens, Greece
प्लेटोचा पुतळा आणि संस्करण

हेड्रियनचे वाचनालय (Hadrian’s Library)
सम्राट हेड्रियनने रोमन फोरमच्या धर्तीवर बांधलेली एक अप्रतिम इमारत. काळ इ.स. १३२. भव्य पण शांत आणि धीरगंभीर अशी ही जागा. वाचनालय, पपायरस (Papyrus) म्हणजे जुन्या कागदाच्या पुस्तकांची दालने, चर्चेसाठीची छोटी सभागृहे आणि एक सुंदर तरण तलाव (मराठीत स्विमिंग पूल!). आजकालच्या लायब्ररी आणि अभ्यासिकांच्या एकत्रित रचनेला मिळती जुळती अशी ही रचना ग्रीकांच्या अभ्यासू वृत्तीची झलक दाखवते. नंतर अर्थातच इमारतीची पडझड झाली, काही भागात चर्च बांधली गेली. आज केवळ प्रवेशद्वाराचा भाग आणि आतल्या काही बांधकामाचे अवशेष शिल्लक आहेत. त्यातूनही या जुन्या अभ्यासवास्तूच्या थोरवीचा अंदाज येतो.

Entrance Wall -  Hadrian's Library, Athens, Greece
भव्य प्रवेशद्वार
Structure and Pillar - Hadrian's Library, Athens, Greece
लायब्ररीचा आराखडा डावीकडे… इमारतीच्या आकाराची कल्पना बाहेरील खांबांची उंची पाहून येते.
Ruins of Hadrian's Library, Athens, Greece
लायब्ररीच्या आतील रचना दर्शवणारे अवशेष
Marble Mosaic - Hadrian's Library, Athens, Greece
जमिनीवर संगमरवराचे तुकडे वापरून केलेले सुंदर नक्षीकाम (Mosaic)
Beautiful Marble Mosaic - Hadrian's Library, Athens, Greece

ज्ञान, कला आणि क्रीडा… प्राचीन ग्रीकांची संस्कृती सर्वार्थाने समृद्ध होती. आजच्याही ग्रीसला आपल्या दैदिप्यमान परंपरेचा अभिमान तर आहेच तसेच या संस्कृतीच्या खुणा जतन करुन ठेवण्यात आणि अभ्यासण्यातही तितकाच रस आहे. डॉ. अल्किस राफ्टीस (Alkis Raftis)1 हा असाच एक अवलिया. इन्व्हेस्टमेंट बॅंकिंगमधील उच्च पगाराची नोकरी सोडून उर्वरीत आयुष्य ग्रीक नृत्यकलेला समर्पित करणारा संशोधक. त्याच्या अकस्मात भेटीमुळे, अथेन्समध्ये केवळ नृत्यकलेसाठी कार्य करणारी कंपनी आणि त्यांचे याच कार्यासाठी वाहिलेले थिएटर पाहण्याचा योग आला. डोरा स्ट्राटेऊ ग्रीक डान्स थिएटर (Dora Stratou Greek Dance Theatre) ही संस्था ॲक्रॉप्लिसच्या परिसरातच ग्रीक अर्वाचीन लोकनृत्ये जतन करण्याचे आणि प्रसार करण्याचे कार्य करते. (हो… जुन्या लोककलांना तुच्छ/त्याज्य मानण्याची पद्धत अजून ग्रीक लोकात आलेले नाहीत!!) अनेक स्थानिक आणि जगभर पसरलेले ग्रीक तसेच इतरही लोक येथे येऊन, राहून पारंपारीक ग्रीक नृत्ये शिकतात. अशा विद्यार्थ्यांचे एक वर्कशॉप नुकतेच संपले होते. डॉ. राफ्टीस यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे देण्याचा आणि अर्थातच नृत्याचा कार्यक्रम पहायचा योग डॉ. राफ्टीस यांच्याच निमंत्रणामुळे आला. विविध नृत्यप्रकार, बहुरंगी पोषाख आणि बहुढंगी वाद्यवृंद आणि त्यावर थिरकणारा नवीन पण उत्साही नर्तकांचा संच. जवळपास प्रत्येकजण वेगवेगळ्या देशातून केवळ आपली पारंपारीक नृत्ये शिकण्यासाठी आणि जतन करण्यासाठी आला होता. नृत्याबरोबरच त्यांच्या या भावनेलाही दाद द्यावीशी वाटली…..

The show begins - Orchestra and Singer - Dora Stratou Greek Dance Theatre - Athens, Greece
कार्यक्रमाची सुरुवात…. वादक आणि गायक प्रवेश करताना. पार्श्वभूमीवर घनदाट झाडी..
Full Orchestra - Dora Stratou Greek Dance Theatre - Athens, Greece
संपूर्ण वाद्यवृंद आणि गायिका
वाद्यमेळ आणि कर्णमधूर लोकसंगीत
Greek Folk Dancers with Colourful Dresses -  Dora Stratou Greek Dance Theatre - Athens, Greece
पारंपारिक रंगीबेरंगी पोषाखातील नर्तक
Greek Folk Dancers with Colourful Dresses -  Dora Stratou Greek Dance Theatre - Athens, Greece
पारंपारिक रंगीबेरंगी पोषाखातील नर्तक
Dance Feats by a lead dancer - Folk Dance -  Dora Stratou Greek Dance Theatre - Athens, Greece
समूह नृत्यात साखळीतील अग्रणी नर्तक वेगवेगळ्या करामती करतो…
मुख्य नर्तकाचा असाच एक मनोहर नृत्याविष्कार
लाकडी चमचे वाजवत केलेले नृत्य
एक समूहनृत्य
The Show ends -  Dora Stratou Greek Dance Theatre - Athens, Greece
कार्यक्रम संपल्यावरची आपलेपणाची छोटेखानी मैफल… वेश बदलून कलाकारही यात सामील होतात…..

भव्य नाट्यगृहे, उत्कृष्ट वाचनालये, सुसज्ज क्रीडांगणे, विद्यापीठांची मालिका, उत्तुंग देवस्थाने आणि त्यांच्याही आश्रयाने होणारा नाट्य, नृत्य आणि खेळांचा आविष्कार… संस्कृतीचे स्तंभ असणारी ही संकुले. ग्रीकांच्या अष्टपैलुत्वाची झलक या वेगवेगळ्या संकुलांमधून येते. एकट्या अथेन्समध्ये अशा अनेक वास्तूंची रचना हजारो वर्षांच्या काळात होत राहिली. यावरूनच विविध अंगानी आयुष्याचा आनंद घेण्याची ग्रीकांची चतुरस्त्र वृत्ती प्रकट होत राहते. ज्या उमेदीने ग्रीकांनी हे सगळे जतन करून ठेवले आहे त्याला खरोखर तोड नाही. उत्खननात सापडलेला खापराचा तुकडा असो की मोठ्या इमारतीचे अवशेष, त्याची संगतवार जपणूक ग्रीकांनी केलीय ती त्याच जागी किंवा अथेन्सभर पसरलेल्या म्युझियम्समध्ये. अशाच काही संग्रहालयांची आणि वास्तूंची सफर पुढील भागात…

तळटीप-
1. Dr. Alkis Raftishttps://www.instagram.com/alkis.raftis/, #alkisraftis

Copyright sheetaluwach.com 2020 ©

अथेन्स – भाग २ – गुढरम्य डेल्फी

डेल्फी…….

जग जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा ग्रीसचा नवा तरुण सत्ताधीश अलेक्झांडर डेल्फीच्या देवळाच्या दारात उभा होता. डेल्फीच्या महान पुजारीणीने (ओरॅकल) आपले भविष्य वर्तवावे या इच्छेने. जग जिंकण्यासाठी अपोलोच्या देवळाचा कौल त्याला आवश्यक वाटत होता. ओरॅकलच्या केवळ एका शब्दावर त्याचा आणि त्याच्या सैन्याचा जोम कैकपटीने वाढला असता!! आजवर कित्येक महान सम्राटांनी या देवळाच्या पायरीवर आपली डोकी टेकवली होती. डेल्फीच्या शब्दाचं महत्व आणि सामर्थ्य साऱ्या जगानं अनुभवलं होतं. अलेक्झांडरला याची जाणीव होती म्हणून तर तो या देवळाच्या चौथऱ्यावर तिष्ठत होता.
“नाही……!!ओरॅकल आज होणार नाही………….!!!!” आतून निरोप आला…
वर्षातून केवळ काही दिवसच भविष्यवाणी वर्तवण्याची परंपरा होती ओरॅकलची. त्यातही देवाचा कौल घेणं न घेणं, भविष्य वर्तवणं न वर्तवणं हा पुजारीणींच्या लहरीचा भाग होता. दारात कोण उभा आहे याची फिकीर करण्याची त्यांची पद्धत नव्हती. गेली ५०० वर्ष लायकर्गससारख्या (Lycurgus) थोर राजापासून ते अगदी अलेक्झांडरच्या वडलांपर्यंत सगळ्यांनी याच लहरी स्वभावापुढे मान तुकवून भविष्यं ऐकली होती.
नाही……….??
असं काही ऐकायची अलेक्झांडरलाही सवय नव्हती… त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ओरॅकलइतकाच तोही लहरी आणि माथेफिरू होता. जग जिंकायचं तर सत्ता गाजवण्याची उर्मी किती प्रबळ असावी लागते हे त्याने दाखवूनच दिलं. केसाला धरून पुजारीणीला फरफटत मंदिराच्या आवारात त्याने आणलं आणि बळजबरीने भविष्य तिच्या तोंडून बाहेर पडलं……

“ἀνίκητος εἶ ὦ παῖ. (बाळा तू अजिंक्य आहेस)”

ओरॅकलने बळजबरीने वर्तवलेलं भविष्यही खरं ठरलं आणि अलेक्झांडर, ‘द ग्रेट’ झाला.
अशा खिळवून ठेवणाऱ्या अनेक कथा दंतकथांचं डेल्फी…….. भविष्याचा वेध घेणारं. गुढ, दुर्बोध, लहरी आणि तरीही आकर्षक…… ग्रीकांच्या अपोलोचं देवस्थान! अपोलो हा ग्रीकांचा कला, ज्ञान, सूर्यप्रकाश, भविष्यकथन, पशुपक्ष्यांचे कळप आणि थवे यांचा देव.
अथेन्सपासून साधारण २०० कि.मी. अंतरावर असणाऱ्या पार्नासस ( Mount Parnassus) डोंगरांवर डेल्फीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या परिसराबद्दल ग्रीक पुराणांत अनेक गोष्टी आहेत. देवांचा राजा झ्यूसने पृथ्वीचा मध्यभाग शोधण्यासाठी दोन गरुड सोडले. पृथ्वीच्या दोन टोकांकडून एकाच वेळी एकाच वेगाने जाणारे हे गरुड ज्या ठिकाणी एकमेकांला भेटतील तो पृथ्वीचा मध्य किंवा नाभी असे त्याने ठरवले. ते गरुड डेल्फीच्या डोंगरावर समोरासमोर आले. म्हणूनच हा भाग संपुर्ण जगाचा मध्यभाग (नाभी) आहे असे म्हटले गेले. अशी एक कथा आहे. या भागाच्या संरक्षणासाठी असलेल्या सापावरून (Python) या भागाला पायथो (Pytho) असे नाव पडले आणि म्हणून डेल्फीच्या प्रसिद्ध पुजारीणीला पिथिया (Pythia) म्हणतात. अशीही एक कथा आहे.
इ.स.पू ८ व्या शतकापासून डेल्फी आणि ओरॅकलच्या अस्तीत्वाबद्दल उल्लेख सापडतात. म्हणजे अलेक्झांडरच्याही आधी जवळपास ५०० वर्ष….!! आणि तेव्हापासून अनेक थोर ग्रीक, रोमन,इतर सम्राट, राज्यकर्ते आणि प्रशासक डेल्फीला आपले भविष्य जाणून घेण्यासाठी आले. यात प्राचीन स्पार्टाच्या लायकर्ग (Lycurgus) पासून ते पार रोमच्या निरोपर्यंत (फिडलवाला!) बऱ्यावाईट अनेक सम्राटांचा समावेश होतो. साहित्यिकांनाही डेल्फीचं आकर्षण होतंच. असिक्लिस, ॲरिस्टॉटलपासून ते पार शेक्सपिअरपर्यंत अनेकांनी आपल्या ग्रंथात, नाटकात डेल्फीचा उल्लेख केलाय. थेमिस्टोक्लेआ (Themistoclea) ही पुजारीण तर आपल्या प्रमेयवाल्या पायथॅगोरसची (Pythagoras) गुरु होती असे म्हणतात. सॉक्रेटिस (Socrates) हा जगातला सगळ्यात बुद्धीमान/शहाणा व्यक्ती असल्याची आकाशवाणीही अशाच एका पुजारीणीने केली होती. प्राचीन जगतात इतकी प्रसिद्ध असणारी दुसरी जागा क्वचितच आढळते.
डेल्फीला येऊन ओरॅकल ऐकणे हा एक पारंपारीक सोहळाच होता. जातकांची क्रमवारी लावणे, त्यांना प्रश्न नीट तयार करून देणे, त्यांना शुचिर्भूत करणे, ओरॅकलसमोर वागायचे तसेच नजराणा अर्पण करण्याचे शिष्टाचार शिकवणे, ओरॅकलच्या काव्यात्म भविष्याचा अर्थ लावणे ही सर्व कामे करणारी व्यवस्थाच अस्तीत्त्वात होती. भेटी आणि नजरण्यांच्या राशीच्या राशी डेल्फीत येऊन पडायच्या. अथेनियन्स, स्पार्टन्स, आर्केडियन्स, मॅसेडोनियन्स – प्रत्येक ग्रीक राज्यांमध्ये डेल्फीवर आपली छाप पाडण्याची स्पर्धाच असायची. भव्य पुतळे, सभागृहं, स्तंभ अशा अनेक डोळे दिपवणाऱ्या भेटींचा वर्षाव डेल्फीवर व्हायचा. युद्धातले विजय, नवीन राज्यारोहण, डेल्फीतील खेळांच्या स्पर्धा, अपोलोचा उत्सव अशा प्रत्येक प्रसंगाची आठवण म्हणून देवस्थानाला भेटी दिल्या जात असत. एका राज्याने मोठी भेट दिली की दुसऱ्याने त्यापेक्षा काहीतरी आगळेवेगळे करायचा प्रयत्न केलाच म्हणून समजा. डेल्फीचा डोंगर चढताना प्रत्येक वळणावर असलेले खजिन्यांची (treasury) बांधकामं देवस्थान किती संपन्न होते हे दर्शवते. इतकं करूनही आपलं भविष्य ऐकण्याची संधी मिळण्याची खात्री नाही ती नाहीच!!!
प्रत्यक्ष भविष्यकथनाच्या दिवशी व्रतस्थ पिथिया देवळातल्या एका विशिष्ट गाभाऱ्यात एका तिपईवर बसून काव्यात्म वाणीत भविष्य सांगत असे. असं म्हणतात की या गाभाऱ्यात एक विवर होते ज्यातील वाफ किंवा धुरामुळे ओरॅकल संमोहीत होत असे आणि तिच्याकरवी देव अपोलो स्वतः भविष्य वर्तवत असे. त्या काव्याचा अर्थ लावण्याचे काम तिच्या इतर सहकाऱ्यांकडे असे.
मंदिराच्या दर्शनी भागात ही वाक्यं कोरलेली होती……
γνῶθι σεαυτόν – Know Thyself – स्वतःला ओळखा
Μηδὲν ἄγαν – Nothing in Excess – (गरजेपेक्षा) जास्त नाही.
डेल्फी मोठं का होतं याची खूण ही वाक्यं पटवून देतात. महत्वाकांक्षेपायी डेल्फीच्या पायरीवर येणाऱ्या प्रत्येक लहानथोर व्यक्तीला त्याच्या क्षणिक अस्तीत्वाची जाणीव करुन देणारी वाक्यं………..
डेल्फी केवळ गुढ भविष्य सांगणारी जादूची गुहा नव्हती तर ज्ञानाचा प्रकाश देणारी अपोलोची शाळा होती. डेल्फीच्या पुजारीणी जितक्या लहरी तितक्याच बुद्धीमान आणि द्रष्ट्या होत्या. निर्भिडपणे सत्य सांगणाऱ्या होत्या. स्वतःच्या आईला ठार मारणाऱ्या रोमन सम्राट नीरोला ‘तुझं येणं मंदिराला लांच्छनास्पद आहे, चालता हो’ असं स्पष्टपणे सांगण्याची धमक त्यांच्या अंगी होती. निरोने त्याच पुजारीणीला जिवंत जाळण्याची शिक्षा दिली. याची पुरेपुर जाणीव असूनही मंदिराच्या लौकीकाला बाधा येईल असं वर्तन त्यांनी केलं नाही.

Panoramic View - Temple of Apollo - Delphi
डोंगरमाथ्यावर वसलेले हेच ते अपोलोचे मंदीर आणि जगाचा मध्यभाग (नाभी)
Stoa of the Athenians Delphi
पायथ्याशी आलेल्या जातकांचा पहिला स्टॉप…
Stoa of the Athenians - Delphi
पायथ्याशी असणाऱ्या याच खोल्यांमध्ये (Chambers) जातकांची वर्गवारी, प्राथमिक शिक्षण आणि प्रश्न लिहून देणाऱ्या पाट्या (Tablet!!) इ. कार्ये होत. व्हीआयपी भक्तांची रांग निराळी असे!!!!
Sacred way leading to the temple of Apollo - Delphi
मुख्य देवळाकडे जाणारी चढण, याच्या प्रत्येक वळणावर एक किंवा अधिक खजिने (Treasury) बांधलेले असत. बांधणाऱ्या राज्याच्या किंवा राजाच्या नावाने हे खजिने ओळखले जात.
Sacred way leading to the temple of Apollo - Delphi
भविष्याचा प्राचीन मार्ग चढताना आधुनिक भाविक. वळणावर खजिन्याचे बांधकाम दिसतंय
Treasury of Athenians - Delphi
ही अथेन्सवासीयांच्या खजिन्याची इमारत (Treasury of Athenians)
Inscription - Temple of Apollo - Delphi
असे अनेक शिलालेख वाटेत उभे असत. डेल्फीची वारी केलेल्यांची, तत्कालीन व्यवस्थेची माहीती यातून मिळते. काही शिलालेखात गुलामांंना स्वातंत्र्य दिल्याचेही उल्लेख आहेत, अगदी गुलामांच्या आणि मालकांच्या नावासकट
Serpent Column - Temple of Apollo - Delphi
सर्पस्तंभ – २७ फूट उंचीचा, ३ सापांच्या वेटोळ्याचा विजयस्तंभ. प्लॅटीया (Plataea) येथल्या पर्शियन युद्धातील विजयाची खूण. या स्तंभावर युद्धात मदत केलेल्या गावांची नावे कोरली आहेत. मूळ स्तंभ रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनने उखडून नेला जो आताच्या इस्तंबूलमध्ये आहे. स्तंभाच्या टोकावर ३ सापांनी उचलून धरलेले त्रिकोणी पात्र होते. पिथिया बसायला वापरत असे त्या प्रकारचे
Front View - Temple of Apollo - Main Chamber - Delphi
अपोलोच्या मंदिराचा दर्शनी भाग!! यात्रेचा अंतिम टप्पा….
Temple of Apollo - Delphi
भवितव्याचं गुढ उकलण्याचं प्रवेशद्वार….. यावरूनच मुख्य मंदिरात प्रवेश केला जाई… अनेक थोर सम्राट, विद्वान आणि प्रशासकांना खुणावणारी वाट.
Pillar, Temple of Apollo - Delphi
मुख्य मंदिराचे स्तंभ. याच परीसरात डेल्फीची प्रसिद्ध वाक्यं कोरलेली होती..
View from the chasm side, Temple of Apollo - Delphi
गर्भगृहाच्या बाजूने प्रवेशद्वाराचे दृष्य….
The ancient theatre at Delphi
देवस्थान म्हटलं की उत्सव आलाच…. नाट्य, नृत्य आणि खेळही आलेच…. डेल्फीचं थिएटर
The ancient theatre at Delphi
पाच हजार प्रेक्षकांना सामावून घेणारं थिएटर, येथे बसल्यावर पुढील मंदिराचं आणि डोंगराचंही दर्शन होतं.
Temple of Apollo - with the hills at the background - Delphi
डेल्फीच्या थिएटरपासून दिसणारा संपूर्ण मंदिराचा विहंगम देखावा…
Omphalos - Archaeological Museum Delphi
डेल्फीतल्या उत्खननात सापडलेले पृथ्वीच्या मध्यभागाचे – नाभीचे संगमरवरी शिल्प. काळ अज्ञात
Dancers of Delphi - Archaeological Museum Delphi
असं मानतात की नाभीचं शिल्प या अप्सरांच्या डोक्यावर उभं असावं काळ इ.स.पु. ३७३
Torso of the chryselephantine sculpture of Apollo and Artemis - Archaeological Museum Delphi
उत्खननात मिळालेले अपोलो आणि अर्टेमिस (चंद्र, शिकार इ. ची ग्रीक देवता) यांच्या पुतळ्यांचे अलंकृत अवशेष
Statue of a Bull - Archaeological Museum Delphi
बैलाच्या चांदीच्या पुतळ्याचे अवशेष……
Charioteer of Delphi - Archaeological Museum Delphi
सहा फूट उंचीचा, रथांची शर्यत जिंकलेल्या सारथ्याचा ब्रॉन्झचा पुतळा. इ.स.पू. ४७५ डेल्फीतल्या उत्खननाच्या पहिल्या काही प्रयत्नातले यश… त्याच्या डोळ्याचा, दातांचा आणि शिरपेचाचा भाग चांदीचा आहे. त्याचा रथ आणि घोडे मिळाले नाहीत पण लगाम आणि त्याची पकड कलेचा अप्रतिम नमुना आहेत.
 Sphinx of the Naxians - Archaeological Museum Delphi
स्फिंक्स – हो, आपली इजिप्तवालीच …. पण स्त्रीचं मुख, पक्षाचे उभे पंख आणि सिंहाचे धड…. डेल्फीच्या देवळाच्या जवळ उभ्या केलेल्या १० मीटर उंच स्तंभावर हे २.२ मीटर उंचीचं शिल्प उभं होतं. इ.स.पू ५६० … पायाखाली स्तंभाचा अवशिष्ट भाग….
Statue of a philosopher - Plutarch or Plato - Archaeological Museum Delphi
प्लुटार्क की प्लेटो!? इ.स.पू. १९०
Model of the Apollo Sanctuary - Archaeological Museum Delphi
डेल्फीच्या देवस्थानाचा संपूर्ण आराखडा (दोन भागात मिळून) . पायथा आणि मुख्य मंदिर लाल रेघेने अधोरेखित केले आहे. मार्गावरील लहान लहान चौकोनी इमारती या खजिन्याच्या (Treasury) आहेत.

Copyright sheetaluwach.com 2020 ©

ज्ञानपीठ अथेन्स – भाग १

ग्रीस…. शालेय अभ्यासातील जवळपास प्रत्येक विषयाचा किंवा विषयाच्या नावाचा उगम ज्या देशात झाला असे आपण वाचतो असा देश म्हणजे ग्रीस. युरोपीय आणि पर्यायाने जगाच्या संस्कृतीवर ज्याची छाप आहे असा देश. गंमतीचा भाग म्हणजे, युरोप हिंडवणाऱ्या एकाच छापाच्या जवळपास सर्व टुरांमधील शेकडा दहा टुर्समध्येही ग्रीसचा समावेशच नसतो किंवा असलाच तर अतिशय त्रोटक असतो. युरोप टुर म्हणजे लंडन, पॅरीस, रोम, व्हेनिस, फारतर प्राग आणि व्हिएन्ना इ. असे साधारणपणे मानले जाते. या सर्व शहरांना पुरुन उरेल इतकी माया केवळ एकट्या ग्रीसमध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
थक्क करून टाकतील इतक्या प्रेक्षणीय, वाचनीय, श्रवणीय आणि अर्थातच वंदनीय (अभ्यासकांसाठी) गोष्टींचं आगार म्हणजे ग्रीस. पाश्चात्य साहित्य, संगीत, कला, राजकारण, विज्ञान, तत्वज्ञान, तंत्रज्ञान सगळ्यांचे उगमस्थान… तात्पर्य, शास्त्रापासून शस्त्रापर्यंत पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रत्येक अंगाचा उगम आणि विकास ग्रीकांपासून झाला. सॉक्रेटीस (Socrates), प्लेटो (Plato), ॲरिस्टॉटल (Aristotle), सोफोक्लिस (Sophocles), युरिपिडिस (Euripides), अरिस्टोफेनस (Aristophanes), पायथागोरस (Pythagoras), हेराक्लिटस् (Heraclitus), डेमॉक्रेटस (Democritus)…….. नुसती नावं जरी घेतली तरी ग्रीसच्या भव्य परंपरेची दबदबा जाणवायला लागतो.
अथेन्स या ग्रीसच्या मानबिंदुची ही १० दिवसांची भेट. १० दिवसात अथेन्स पाहणे म्हणजे पाच ओळीत महाभारत बसविण्याइतकं सोपं!!! ३० च्या आसपास तर नुसती खरोखर बघण्यासारखी म्युझियम्स आहेत. प्रत्यक्ष पुरातन अवशेष मोजायचे झाले तर त्यातच दहा दिवस जातील. असो….
चतुरंग अथेन्स पाहण्याचा निदान प्रयत्न केला हे त्यातल्या त्यात समाधान.पाहुयात हे १० दिवस नीट मांडता येतात का ते.

ॲक्रॉप्लिस (Acropolis)

ग्रीक भाषेत गावातील सगळ्यात उंच भागाला ॲक्रॉप्लिस म्हणतात. त्यातली प्रसिद्ध म्हणजे अथेन्सची टेकडी कारण अर्थातच त्यावरचे पार्थेनॉन…(Parthenon) म्हणजे अथेन्स च्या ग्रामदेवतेचे अथेना/अथिना (Athena) चे मंदिर.
(हो ग्रीकही भारतीयांसारखे देऊळवाले होते. देवपूजा, नैवेद्य, नवस करण्यापासून ते पार बळी देण्यापर्यंत सगळं सेम!!!)

View of Acropolis from Monastiraki Square
दुरुन (आणि जवळूनही) साजरा डोंगर – ॲक्रॉप्लिस अथेन्स

पार्थेनॉन (Parthenon)

इ.स.पु ४८० च्या आसपास पर्शियन (आजचे इराणी) आक्रमकांच्या स्वारीत जुने पार्थेनॉन मंदीर ध्वस्त झाले. तेव्हा त्याच जागी नवे आणि अधिक भव्य मंदिर बांधायचे अथेन्सवासीयांनी ठरवले.
साधारण २२८ फूट लांब आणि १०१ फूट रुंद अशा आयताकृती चौथऱ्यावर ६ फूट व्यासाचे आणि ३४ फूट उंचीचे ४६ खांब हे भव्य मंदिर घेऊन उभे आहेत. असेच काही खांब आतल्या भागातही होते. कठीण असा संगमरवरी दगड कातून अजोड वाटावेत असे मजबूत स्तंभ रचणं हा एक चमत्कारच वाटतो. असे तब्बल १३,४०० दगड वापरून हे मंदिर उभं केलं आहे. असं म्हणतात की संपूर्ण संगमरवरात बांधलेल्या या मंदिरात मंदिराइतकीच उत्तुंग अशी देवी अथेनाची सोन्याची(?) मुर्ती होती.
कठीण दगड आणि भक्कम बांधकामामुळे युद्धजन्य परीस्थिती असूनही अनेक वर्ष पार्थेनॉन टिकून राहीलं. थोडीफार पडझड आणि बदल होत राहिले. रोमन लोकांनी काही काळ त्याचं चर्चमध्ये रुपांतर केलं तर ऑटोमॉन तुर्कांनी त्यांच्या काळात मशिद केली!! १६८७ मध्ये एका युद्धात याच तुर्कांनी देवळाचा उपयोग दारूगोळ्याचं कोठार म्हणून केला. शत्रुचा एक तोफगोळा याच कोठारावर नेमका पडला आणि पार्थेनॉनचं छत आणि बऱ्याचशा भागाच्या ठिकऱ्या उडाल्या. त्यातूनही उरलेला भाग उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणून टिकून होता.

खेदाची गोष्ट म्हणजे त्यातील काही अत्यंत मौल्यवान व दुर्मिळ शिल्पे इ.स. १८०३ च्या आसपास एल्जिन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने खोटी कागदपत्रे सादर करून, चक्क खोदून इंग्लंडला नेली आणि आपली वैयक्तिक मालमत्ता म्हणून घरी ठेवली!! नंतर काही कारणास्तव त्याला म्हणे ती विकावी लागली. म्हणून मग इंग्रज सरकारने ती विकत घेतली आणि लंडनच्या म्युझियमध्ये ठेवली!! जगभरातून लुटुन आणलेल्या मालाचं प्रदर्शन भरवायचं आणि ती लुट तिकिट लावून मूळ मालकांनाच दाखवायची याला म्हणतात व्यवसायिक चातूर्य (मराठीत बिझनेस सेन्स)!! अर्थात भारतीयांसाठी यात नवल ते काय?!! अर्ध ब्रिटिश म्युझियम आणि लुव्र अशाच वस्तूंनी तर भरलंय!!!) असो….

ग्रीकांनी स्वातंत्र्योत्तर काळात पार्थेनॉनमधील सगळे नवे बदल चर्च, मशिद वगैरे हटवून त्याचं मूळ स्वरूप उभं केलं, तेही वास्तूला कोणताही धोका न पोचवता. आज आपल्याला दिसतं ते मंदिर हे कोणतेही बदल नसलेलं आणि फरक न केलेलं अवशिष्ट मुळ बांधकाम आहे.

First view of Parthenon from the entrance
पार्थेनॉन…. पाहताच क्षणी भुरळ पाडणारं पहिलंच भव्य दर्शन
East Side Pediment view of Parthenon
remains of sculptor on East Pediment of Parthenon
मंदिराचा पूर्वेकडील त्रिकोणी दर्शनी भाग आणि शिल्लक राहीलेले शिल्प. मूळ शिल्पसमूह खालील चित्रात.
Model of actual sculptors on East pediment of Parthenon
डावीकडील बसलेला पुतळा सोडला तर बाकी शिल्प खोदून नेले. ही प्रतिकृती आहे. मूळ शिल्प आता ब्रिटिश म्युझियमध्ये आहे.
Side View Parthenon Pillars
भव्यता अधोरेखित करणारे खांब डोरिक (Doric) शैली
External and internal Doric Pillar Structure  Parthenon
देवळाच्या बाह्य आणि गर्भगृहातील खांब
Magnificent Pillars Parthenon
Beautiful view of Parthenon on a blue sky background
निळ्याशार आभाळाच्या पार्श्वभूमीवर पार्थनॉनचे संगमरवरी खांब अधिक खुलुन दिसतात!
Model of Actual Parthenon structure side and front. Acropolis Museum
पार्थेनॉनची म्युझियममधली प्रतिकृती

ॲक्रोपोलिस ही अथेन्सवासीयांची केवळ उपासनेची नव्हे तर उत्सवाचीही जागा होती. त्यामुळे केवळ पार्थनॉनच नव्हे तर इतर काही मंदिरे आणि मनोरंजनाची ठिकाणेही या परीसरात उभी केली गेली.

एरेक्थिऑन (Erechtheion)

ॲक्रॉप्लिसच्या उत्तरेला अथेना (Athena) आणि पोसायडन (Poseidon) या देवांना समर्पित केलेले हे मंदिर आहे. रचना पार्थेनॉनशी मिळती जुळती असली तरी याचे एक प्रसिद्ध वैशिष्ट्य म्हणजे अप्सरांचे स्तंभ (Porch of the Caryatids). मंदिराच्या दक्षिणेकडचा भार सांभाळणारे खांब हे सहा वस्त्रांकित अप्सरांच्या प्रतिमा आहेत. जणूकाही त्या अप्सरांनी हा भाग डोक्यावर पेलला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अप्सरा एक शिल्प म्हणून वेगळी आहे. प्रत्येकीची चेहेरपट्टी,वस्त्र,केशभूषा इतरांपेक्षा आगळी आहे.
मूळ आराखड्यात एकूण सहा अप्सरा असल्याचे स्पष्ट दिसते. त्यातील सहाही अप्सरांच्या प्रतिकृती सध्याच्या मंदिरात जोडलेल्या आहेत.ॲक्रॉप्लिसच्या म्युझियममध्ये मूळ पाच अप्सरास्तंभ पहायला मिळतात. सहावा स्तंभ एल्जिनने इंग्लंडला नेला, तो आता ब्रिटिश म्युझियमध्ये आहे. त्याचा रिकामा पाया ॲक्रॉप्लिसच्या म्यझियममध्येच आहे!

Porch of the Caryatids in Erechtheion
Longshot Porch of the Caryatids in Erechtheion
Location of Statue of Athena on Acropolis between Parthenon and Erechtheion

एरेक्थिऑन (Erechtheion) आणि पार्थेनॉन (Parthenon) दोन्ही मंदिरांचे एकत्रित दृष्य दाखवणाऱ्या या भागातही देवी अथेनाचा एक पुतळा होता असे म्हणतात.

डिओनिसिसचे सभागृह ( Theatre of Dionysus )

ॲक्रॉप्लिसच्या दक्षिणेकडील उताराच्या शेवटी एक उघडे नाट्यगृह आहे. डिओनिसिस (Dionysus) हा ग्रीकांचा द्राक्ष आणि वाईनचा देव. याच सभागृहात त्याचा उत्सव अथेन्सवासी साजरा करत असत. त्यात अनेक नाटकांचे आणि नृत्यांचे प्रयोग होत आणि विजेत्यांना पारितोषकेही दिली जात. सोफोक्लिस, अरिस्टोफेनस, युरिपिडिस यांची गाजलेली नाटकं येथे प्रदर्शित केली गेली. असं म्हणतात की सोफोक्लिसने जवळपास १८ वेळा येथे स्पर्धा जिंकल्या होत्या. इ.स.पू ६ व्या शतकापासून हे नाट्यगृह उभे आहे. त्यानंतर जवळजवळ इ.स. १ ल्या शतकापर्यंत प्रत्येक सत्ताकाळात त्यात कमीजास्त बदल केले गेले. आजचे स्वरूप हे रोमन कालापासूनचे आहे.

View of Theatre of Dionysus from the acropolis
ॲक्रॉप्लिसवरून दिसणारे डिओनिसिसचे सभागृह ( Theatre of Dionysus )
The stage facing audience at Theatre of Dionysus
सोफोक्लिसच्या इडिपस रेक्स चा प्रिमीयर याच रंगमंचावरून झाला
Royal sitting plan Theatre of Dionysus
व्हीव्हीआयपी बैठक!!
Sitting plan Theatre of Dionysus
सिनेटर्स आणि इतर मान्यवराची विशेष आसनव्यवस्था असणारी पहीली रांग

Odeon of Herodes Atticus (हिरोडस ॲट्टिकसचे प्रेक्षागार)

ॲक्रॉप्लिस संकुलातील सर्वात नवीन, म्हणजेच फक्त १८०० वर्षांपुर्वी बांधलेले हे प्रेक्षागार! ग्रीक राजकारणी हिरोडस ॲट्टिकसने (Herodes Atticus) आपल्या बायकोच्या स्मरणार्थ ही वास्तू इ.स. १६१ बांधली. जवळपास ५००० प्रेक्षक समावून घेणारे हे भव्य प्रेक्षागृह बांधताना आवाज आणि प्रतिध्वनीसाठी ॲक्रॉप्लिसचा उत्तम वापर करण्यात आला. नाट्यगृहाला समोरून तीन मजली भिंत आणि अत्यंत मौल्यवान लाकडाचे छतही होते जे आज नाही. हे नाट्यगृह आजही वापरात असून अनेक ऑपेरा आणि महोत्सव याच्या रंगमंचावर होतात.

View of Odeon of Herodes Atticus from the Acropolis
ॲक्रॉप्लिसवरून दिसणारे हिरोडसचे थिएटर आणि दर्शनी भिंत
Odeon of Herodes Atticus
५००० लोक कवेत घेणारे मुग्धागार! टेकडीच्या वक्राकार भाग Echo Effect साठी वापरला आहे.
ऑपेराची तयारी चालू आहे!!
Stage and ancient back wall Odeon of Herodes Atticus
रंगमंचाच्या मागील संगमरवरी भिंत. ही ३ मजली होती. पोकळ कमानी अर्थातच ध्वनीप्रभावासाठी उपयुक्त
ऑपेराची तयारी होतेय!!
Opera at the Odeon of Herodes Atticus
स्वर्गीय…..२००० वर्ष जुन्या थिएटरात प्रत्यक्ष ऑपेरा अनुभवताना!!!

अथेन्समध्ये कुठेही असलात तरी ॲक्रॉप्लिस सहसा नजरेतून सुटत नाही. एका टेकडीवर संस्कृतीच्या इतक्या जिवंत पाऊलखुणा एकत्र क्वचितच पहायला मिळतात. पायथ्याशी अर्थातच ॲक्रॉप्लिसचं म्युझियम आहे ज्यात त्याचा पूर्ण आराखडा असलेले मॉडेल, अथेनाचे पुतळा (प्रतिकृती) आणि इतर अनेक वस्तु आणि अवशेष पहायला मिळतात. म्युझियम जेथे उभं केलंय त्या भागात पार्थेनॉनपूर्व आणि त्यापेक्षाही जुन्या काळाचे अवशेष उत्खननात सापडले आहेत. ते उत्खनन वरून पाहता यावं म्हणून त्या साईटच्या काही भागावर काचेचं छत टाकलंय. त्यातून पुरातन अवशेष प्रत्यक्ष पहायला मिळतात.
इतिहास अथेन्सच्या जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी !!.. सर्वत्र दडलेला आहे!!!! उर्वरीत अथेन्स आणि डेल्फी पुढील भागात…….

Model of Acropolis, Athens
अक्रॉप्लिसचं मॉडेल. यातलं समोरचं छत असलेलं थिएटर हिरोडसचं आहे तर मागे डिओनिसिसचे. पार्थेनॉन, एरेक्थिऑन आणि सुरुवातीचे भव्य प्रवेशद्वार नजरेत सहज भरतात.
Statue of Athena, Acropolis museum Athens
इ.स.२ ऱ्या शतकातला देवी अथेनाचा छोटा पुतळा. पार्थेनॉनमधील भव्य पुतळ्यातील जवळपास सगळी वैशिष्ट्ये या मूर्तीत आढळतात.
Excavation at Acropolis
उत्खननात मिळालेले अवशेष, जमिनीत पाणी किंवा धान्य साठविण्यासाठी केलेेला खड्डा दिसत आहे.
Ancient remains at an excavation site near  Acropolis
घराची रचना

तळटीप –
१. सोफोक्लिस, अरिस्टोफेनस, युरिपिडिस – प्राचीन ग्रीक नाटककार. ॲरीस्टॉटलच्या Tragedy वरच्या प्रसिद्ध संस्करणात सोफोक्लिसच्या इडिपस रेक्स (Oedipus Rex) चे नाव प्राधान्याने येते.

Copyright sheetaluwach.com 2020 ©

वेदवाङ्मयाची थोरवी

If I were to look over the whole world to find out the country most richly endowed with all the wealth, power, and beauty that nature can bestow—in some parts a very paradise on earth—I should point to India. If I were asked under what sky the human mind has most fully developed some of its choicest gifts, has most deeply pondered on the greatest problems of life, and has found solutions of some of them which well deserve the attention even of those who have studied Plato and Kant—I should point to India.
And if I were to ask myself from what literature we, here in Europe, we who have been nurtured almost exclusively on the thoughts of Greeks and Romans, and of one Semitic race, the Jewish, may draw that corrective which is most wanted in order to make our inner life more perfect, more comprehensive, more universal, in fact more truly human, a life, not for this life only, but a transfigured and eternal life—again I should point to India.1 ………..Friedrich Max Müller

मॅक्सम्युल्लर ने केम्ब्रिज विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानातील या एका वाक्यातूनच वेद, वेदवाङ्मय आणि पर्यायाने भारतीय संस्कृतीचा प्रभाव किती क्षितिजांवर विस्तारला होता हे लख्खपणे दिसते. केवळ तत्वज्ञानच नव्हे तर साहित्य, संगीत, कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सर्व विद्याशाखांत मानवाने साधलेला समतोल पहायचा तर भारताकडे पहा असे तो म्हणतो. सर्वार्थाने पृथ्वीवरील स्वर्ग अशी उपमा भारतीय भूमीला तो देतो.
एक पाश्चात्य विद्वान प्राचीन भारतीय भाषा आणि वाङ्मयाची बाजू इतकी पोटतिडकीने मांडतो हे विस्मयकारक आहे. त्याहीपेक्षा ज्या अर्थी तो ही बाजू मांडतोय त्या अर्थी आपण जुनं म्हणून दुर्लक्षित केलेल्या वाङ्मय तितकं टाकाऊ नक्कीच नसणार. बरं ही भाषणं तो पुराणातल्या गोष्टी ऐकायला आलेल्या भजनी मंडळातल्या बायकांसमोर देत नाहीये. केम्ब्रिज सारख्या मान्यवर विद्यापीठाने इ.स. १८८० च्या दशकात खास आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील भाषणांत त्याने हे उद्गार काढलेत. व्याख्यान ऐकणारे श्रोते केवळ पुस्तकी प्राध्यापक नव्हते. भारतात नुकतीच स्थिरावलेली इंग्रजी सत्ता राबवणारे मंत्री, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी (Civil Servants) असे भारताशी प्रत्यक्ष संबंध येणारे आणि भारतात काम करणारे इंग्लिश लोकही त्यात होते.
भाषणात अनेक विषयांचा उल्लेख मॅक्सम्युल्लर करतो. जसे भूशास्त्र? (Geology), वनस्पतीशास्त्र (Botany), प्राणीशास्त्र (Zoology), मानवंशशास्त्र (Ethnology), पुरातत्वशास्त्र (Archaeology), नाणकशास्त्र (Numismatics), न्यायशास्त्र (Jurisprudence) आणि अर्थातच तत्वज्ञान (Philosophy). या आणि अशा अऩेक विद्यांच्या अभ्यासासाठी भारत ही एक मोठी प्रयोगशाळाच आहे. केवळ अभ्यासाचा विषय म्हणून नव्हे तर अनेक मार्गदर्शक तत्वांचा उगम या भूमीत होतो म्हणून भारताकडे पहावे असे तो सांगतो. इतकेच काय पण पाश्चात्य जगताच्या ज्ञानाचा उगम मानल्या जाणाऱ्या ग्रीसमधील्या अनेक बोधकथा, दंतकथा मूळच्या भारतीय बौद्ध आणि इतर संप्रदायातील असू शकतात असा तर्क तो मांडतो.
गेल्या आठ लेखात आपण वेद आणि वेदवाङ्मयाची ओळख करून घेतली. आपण हेही पाहिलं की केवळ अध्यात्म नव्हे तर ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा अनेक विद्या शाखांचा विचार आणि अभ्यास प्राचीन भारतीय ऋषीमुनी करत होते हे ही वेदवाङ्मयात दिसून येते. वेदकालीन ऋषींनी मानव जीवनाशी संबंधीत जवळपास सर्व विषयांवर भाष्य केलेले आहे. यात शिकारीपासून ते शेतीपर्यंत, युद्धापासून ते वैद्यकापर्यंत आणि यज्ञापासून ते ज्योतिषापर्यंत अनेकविध विषय कौशल्याने हाताळले गेले आहेत. इतके की त्या विषयांचे सखोल ज्ञान या ऋषींना होते हे सहज कळून येते.
पण मग वैद्यक, ज्योतिष, तत्त्वज्ञान वगैरे विषयांवरील ग्रंथ पाश्चात्य संस्कृतीतही आहेतच की! आजच्या लेखात आपण इतकंच पाहणार आहोत की विज्ञान आणि तंत्रज्ञानानी समृद्ध होणाऱ्या पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीत असा काय फरक आहे की ज्यायोगे आज हजारो वर्षानंतरही जगभरातील विद्वान त्या वाङ्मयाचा अभ्यास करतात? केवळ तत्त्वज्ञानच नव्हे तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकासारख्या अत्याधुनिक ज्ञानशाखातील संशोधकही कमी अधिक प्रमाणात वेदवाङ्मयाचा अभ्यास करतात. त्यांना मार्गदर्शक असे कोणते ज्ञान किंवा विचार वेदवाङ्मय पुरवते?
दृष्टिकोन……..
एखाद्या विषयाची पद्धतशीर हाताळणी करून त्याची वेगळी विद्याशाखा बनवणे आणि त्याचा काटेकोर अभ्यास करणे ही तर पाश्चात्यांची देणगी आहे. अगदी उदाहरण द्यायचे तर आधुनिक विज्ञानाची कोणतीही शाखा घ्या, जसे जीवशास्त्र (Biology) या विषयाची पद्धतशीर हाताळणी करून वनस्पतीशास्त्र(Botany), सूक्ष्मजीवशास्त्र(Microbiology), जनुकिय विज्ञान(Genetics) वगैरे विद्याशाखा पाश्चात्यांनी बनवल्या, त्याचे अभ्यासक्रम बनवले, पदव्या (मराठीत डिग्र्या!) निर्माण केल्या. वैद्यकातही डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाची वेगळी शाखा बनवली. अगदी चव आणि गंध निर्माण करणारी शास्त्रेही विकसित केली गेली. वैज्ञानिक प्रगती हे ध्येय समोर ठेऊन विभागशः अनेक विद्याशाखा पाश्चात्यांनी दिल्या. अशा वैज्ञानिक प्रगतीचा मुख्य उद्देश अर्थातच मानव जातीचे कल्याण हा होता. मग तो उद्देश साधला गेला का? खरंतर नाही.
विज्ञान जितके अधिक प्रगल्भ आणि प्रगत झाले तितकेच ते संहारकही झाले. मानवजातीचे कल्याण हा मूळ उद्देश बाजूला पडला आणि मानवजात किंवा विशिष्ट मानव समुदायाला इतर समुदाय आणि जीवजंतूंपेक्षा अधिक शक्तीमान बनवणे हा स्वार्थी उद्देश प्रबळ झाला. वर्चस्वाच्या हव्यासापोटी विज्ञानाच्या शाखांची इतकी अजस्त्र वाढ झाली की प्रत्येक शाखा मानवाच्याच नव्हे संपूर्ण जीवसृष्टीच्या मुळावर उठावी इतकी संहारक होऊ लागली. आधी अण्वस्त्रे, मग रासायनिक अस्त्रे(Chemical Weapons), जैविक अस्त्रे(Biological Weapons) आणि आता तर जनुकिय तंत्रज्ञान (Genetics) यासारख्या अत्याधुनिक आयुधांनी मानवाच्या सुखापेक्षा चिंताच अधिक वाढवल्या. निसर्गाचा घटक म्हणून जन्माला आलेला मानव निसर्गावरच विजय मिळविण्याच्या अघोरी मार्गाला लागला आणि आता ते थांबवणे त्याच्या स्वतःच्याही हातात राहिले नाही. वैज्ञानिक प्रगती हा देशागणिक मानवी संस्कृतींच्या स्पर्धेचा विषय बनला. या स्पर्धेत टिकण्याची आणि जिंकण्याची इर्षा इतकी पराकोटीला गेली की मानवानेच त्याच्या आणि पर्यायाने पृथ्वीच्याही संहाराची बीजे पेरली. परीणामी आज आपण प्रदूषण(ध्वनी, वायु, पाणी आणि विचारसुद्धा), अस्त्र-शस्त्र, रोगराई, विकृत-दहशतवाद अशा अनेक समस्यांनी घेरलो गेलो आहोत.
समतोल…….
वैदिक ऋषीमुनी हे जसे तत्त्ववेत्ते होते तसेच शास्त्रवेत्तेही होते. वैज्ञानिक प्रगती वेदकाळातही होत होतीच. परंतु भारतीय शास्त्रवेत्त्यांचे मोठेपण यात आहे की त्यांनी या प्रगतीचा आणि निसर्गाचा योग्य समतोल राखणे महत्वाचे आहे हे जाणले आणि प्रत्येक शास्त्र हे विकसित होताना त्यातून निसर्ग, पर्यावरण आणि व्यापक सृष्टीशी माणसाची नाळ तुटणार नाही याची खबरदारी घेतली. त्यांनी वैद्यक विकसित केले पण औषधांनी होणारे अनुषंगिक परीणाम (Side Effects) टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूनच. औषधी विकसित केल्या पण त्या नैसर्गिक तत्त्वांशी तादात्म्य बाळगून. त्यांनी आयुर्वेद हा निरोगी आयुष्य जगण्यासाठीचे शास्त्र म्हणून विकसित केला. रोगांवर इलाज करण्याची पॅथी म्हणून नव्हे. त्यामुळे आहार(Diet), व्यायाम(Exercise), साधना (Meditation) आणि औषधी(Medicine) अशा सर्व अंगांनी समतोल साधणारी ज्ञानशाखा म्हणून आयुर्वेदाकडे पाहीले जाते. याच प्रकारे योग असो ज्योतिष असो किंवा अध्यात्म…..
प्रगती साधताना तिची दिशा आणि ध्येय हे एका सूत्रात बांधून निसर्गाच्या सर्व घटकांच्या कल्याणाचे उद्दीष्ट्य साध्य करणे ही वेदवाङ्मय आणि पर्यायाने भारतीय शास्त्रांची देणगी आहे. विद्या, कला आणि तंत्र अतिरेकी अनियंत्रित आणि संहारक न होता विकसित करण्याचे तारतम्य वेदवाङ्मयाने जगाला शिकवले.
त्यामुळेच रसायनशास्त्र (Chemistry), पदार्थविज्ञान(Physics), वैद्यक(Medicine), जीवशास्त्र(Biology), वनस्पतीशास्त्र(Botany), धातुशास्त्र (Metallurgy) असो किंवा अगदी अणुविज्ञान (Automic Science), या सर्व शास्त्रांचा भारतीय भूमीतील उगम आणि विकास हा याच तत्त्वांना अनुसरुन झाला. तुकड्या तुकड्यात वेगवेगळी शास्त्रे म्हणून विकसित न होता ती कल्याणकारक आणि सर्वसमावेशक जीवनवेद म्हणून विकसित झाली. आपल्याला वेदांसह अनेक ग्रंथात हे सर्वच विषय कमीअधीक प्रमाणात आढळतात ते यामुळेच. जीवनाशी संबंधीत असे ज्ञान असल्याने त्याचा केवळ वेगळी विद्याशाखा म्हणून अभ्यास करणे जितके गरजेचे आहे तितकेच ते ज्ञान सृष्टीचा समतोल राखण्यात किती यशस्वी ठरते हेही काटेकोरपणे अभ्यासणे गरजेचे मानले गेले. त्यामुळे शास्त्रे विकसितही झाली आणि त्यांची अनुषंगिक संहारकताही सीमीत केली गेली. वैज्ञानिक प्रगती आणि विवेकी तत्वज्ञान यांचा हा समतोल…..
आधुनिक जगात सातत्याने नवनवीन शोध लागत आहेत, तंत्रज्ञान विकसित होत आहे पण ते विवेकाने वापरण्याचे किंवा त्याचा गैरवापर टाळण्याचे शिक्षण देणारी मुल्यव्यवस्थाच अस्तीत्व हरवून बसली आहे. त्यामुळे प्रगतीच्या पायरीगणीक आपण विनाशाच्या चिंतेने अधिकाधिक ग्रासले गेलो आहोत. हा विवेक जागवणारी आणि प्रसृत करणारी तत्वप्रणाली वेदवाङ्मयाने दिली.
सर्वेSपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग्भवेत्। किंवा
……सह नौ भुनक्तु।
किंवा
..वसुधैव कुटुम्बकम्। असो

यासारख्या प्रार्थनातून साधकाच्या मनावर हे तत्त्व कायम बिंबवले गेले की प्रत्येक कार्य, प्रत्येक पाऊल हे विश्वकल्याणाच्या हेतूतून उचलायचे आहे. संपुर्ण वसुधा (पृथ्वी) हे एकच कुटुंब आहे. यातील भूतमात्रांसह आपण सर्वजण एकाच साखळीतील कड्या आहोत. एक जरी कडी कमकुवत झाली तरी ही संपूर्ण साखळी दुर्बल होणार आहे. त्यामुळे प्रगती मग ती वैज्ञानिक असो तांत्रिक असो किंवा तात्त्विक तिच्यातून ही साखळी अधिक मजबूतच झाली पाहीजे. भौतिक आणि अध्यात्मिक प्रगती, मानवी जीवन आणि निसर्ग तसेच पर्यायाने मन आणि शरीर यांचा समतोल साधला तरच ज्या सुखाच्या अपेक्षेने अधिकाधिक विकासाची ईर्षा आपण बाळगतो ते चिरंतन सुख प्राप्त होईल. हा विचार निःसंशयपणे प्राचीन भारतीय वेदवाङ्मयाने जगाला दिला.
तात्पर्य काय तर आज विकसनशील वगैरे शिक्का असलेल्या भारताने स्वतःच जगाला दिलेल्या विवेकी अभ्यासकाच्या भूमिकेत परत शिरुन आपल्याच प्राचीन वाङ्मयाचा आणि आधुनिक विद्यांचा तारतम्याने अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. धर्मग्रंथ म्हणून नुसते अंधश्रद्धेने कवटाळून बसणे हे जसे चुकीचे आहे तसेच ते जुने कालबाह्य वाङ्मय म्हणून झिडकारणेही तितकेच चुकीचे आहे. कोणत्याही टोकाच्या भूमिकेपेक्षा विवेकी वृत्तीने चतुरस्त्र अभ्यास करून वेद आणि वैदिक साहित्यातून मिळणारे सर्वांगीण ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
समारोपापुर्वी मॅक्सम्युल्लरच्या भाषणातील काही उतारे जसेच्या तसे वानगीदाखल देत आहे. त्याच्या भाषांतराची गरज पडू नये कारण अर्थातच आपल्याकडे इंग्रजी मराठीपेक्षा अधिक अभ्यासली जाते!!

If you care for geology, there is work for you from the Himalayas to Ceylon.
If you are a zoologist, think of Haeckel, who is just now rushing through Indian forests and dredging in Indian seas, and to whom his stay in India is like the realization of the brightest dream of his life.
The study of Mythology has assumed an entirely new character, chiefly owing to the light that has been thrown on it by the ancient Vedic Mythology of India. But though the foundation of a true Science of Mythology has been laid, all the detail has still to be worked out, and could be worked out nowhere better than in India.
Again, if you are a student of Jurisprudence, there is a history of law to be explored in India, very different from what is known of the history of law in Greece, in Rome, and in Germany, yet both by its contrasts and by its similarities full of suggestions to the student of Comparative Jurisprudence.
You know how some of the best talent and the noblest genius of our age has been devoted to the study of the development of the outward or material world, the growth of the earth, the first appearance of living cells, their combination and differentiation, leading up to the beginning of organic life, and its steady progress from the lowest to the highest stages. Is there not an inward and intellectual world also which has to be studied in its historical development, from the first appearance of predicative and demonstrative roots, their combination and differentiation, leading up to the beginning of rational thought in its steady progress from the lowest to the highest stages? And in that study of the history of the human mind, in that study of ourselves, of our true selves, India occupies a place second to no other country. Whatever sphere of the human mind you may select for your special study, whether it be language, or religion, or mythology, or philosophy, whether it be laws or customs, primitive art or primitive science, everywhere, you have to go to India, whether you like it or not, because some of the most valuable and most instructive materials in the history of man are treasured up in India, and in India only.

तळटीप:

1. INDIA: WHAT CAN IT TEACH US? (A Course of Lectures – DELIVERED BEFORE THE UNIVERSITY OF CAMBRIDGE BY – F. MAX MÜLLER, K.M.)

Copyright sheetaluwach.com 2020 ©
#sheetaluwach

ओळख वेदांची – भाग ८

आरण्यक या नावातून अनेक अर्थ ध्वनीत होतात. त्या सर्व अर्थांचा समुच्चय केला तर आरण्यक म्हणजे काय हे समजणे सोपे जाईल.
पहिला अर्थ – अर्थातच अरण्यात किंवा जंगलात लिहिले गेलेले ग्रंथ, असा सोपा अर्थ निघतो. ‘अरण्ये भवम् इति आरण्यकम्।‘
दुसरा अर्थ सायणाचार्यांच्या भाष्यात येतो तो म्हणजे – वेदाचा जो अंश अरण्यात पठण/मनन केला जातो त्याला आरण्यक म्हणता येईल.

आरण्याध्ययनादेतद् आरण्यकमितिर्यते। अरण्ये तदधीयीतेत्येवं वाक्यं प्रवक्ष्यते।
(तैत्तिरिय आरण्यक भाष्य श्लोक ६)

हे झाले शब्दाची फोड करणारे अर्थ. अरण्यात माणूस कशासाठी जातो? शांतता मिळविण्यासाठी, चिंतन/तप करण्यासाठी. निसर्गाच्या सहवासात माणसाला परमात्म्याचा सहवास अधिक प्रकर्षाने जाणवतो. (**जंगलातील शांततेचा अनुभव घेतलेल्यांना हे चटकन् पटावे) अर्थातच नागरी जीवन आणि मोहाचा त्याग करून तत्वचिंतनात आयुष्य घालविण्यासाठी लोक अरण्याची वाट धरतात. म्हणूनच तत्वचिंतन हा विषय सांभाळणारे कोणते वैदिक ग्रंथ त्याने वाचावेत तर आरण्यके! हा आरण्यकांचा विषय सांगणारा अर्थ आहे.
आधीच्या भागात (वाचा – ब्राह्मण ग्रंथ) आपण पाहिलेत की वेदातील मंत्रांचा यज्ञीय कर्मकांडाशी निगडीत अर्थ लावण्याचे काम ब्राह्मण ग्रंथ करतात. याच कर्मकांडांचा तात्विक अभिप्राय मांडण्याचे काम आरण्यके करतात. कर्मकांड सांगणाऱ्या ब्राह्मण ग्रंथांना पूरक असे तत्वज्ञान सांगणे आणि पुढे येणा-या उपनिषदांची नांदी करणे असे दुहेरी कार्य आरण्यके करतात. त्यामुळे आरण्यके ही वेदवाङ्मयातीला कर्मकांड आणि ज्ञानकांड यांची सांगड घालणारा दुवा आहेत. वेदवाङ्मयात आरण्यकांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. उपनिषदे जर भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया मानली तर आरण्यके ही या उपनिषदांचा पाया मानायला हरकत नाही असे म्हणतात.
(**जाता जाता हे ही सांगायला हवे की भाषिकदृष्ट्या पाहिल्यास आरण्यके ही वैदिक आणि लौकिक संस्कृत भाषेतीला दुवा मानली जातात)

रचना/स्वरूप

सर्वसाधारणपणे ब्राह्मण किंवा उपनिषदांप्रमाणेच प्रत्येक वेदांशी निगडीत अशीच आरण्यकांची रचना झाली असे मानतात त्यामुळेच ब्राह्मण ग्रंथांप्रमाणेच शाखा उपशाखा व्यापून आरण्यकांची संख्याही ११३० च्या आसपास असावी असा विचार मांडला जातो. परंतू दुर्दैवाने आज उपलब्ध असणाऱ्या आरण्यकांची संख्या केवळ ७ आहे.
ऋग्वेद – ऐतरेय आरण्यक, शांखायन आरण्यक
शुक्लयजुर्वेद – माध्यंदिन बृहदारण्यक, काण्व बृहदारण्यक
(बृहदारण्यक हे वास्तविक आरण्यक आहे. परंतु त्याचा आकार, विषयव्याप्ती इ. अनेक कारणांमुळे त्याची गणना उपनिषदांमध्ये होते.)
कृष्णयजुर्वेद – तैत्तिरिय आरण्यक, मैत्रायणी आरण्यक
सामवेद – तवलाकर(तवल्कर?) (जैमिनीय) आरण्यक, छान्दोग्य आरण्यक
अथर्ववेदाची आरण्यके उपलब्ध नाहीत किंवा त्याबद्दल पुरेशी माहितीही नाही.

विषय

नवनीतं यथा दध्नो मलयाच्चंदनं यथा, आरण्यकं च वेदेभ्य ओषधिभ्योsमृतं यथा।
(साधारण अर्थ) – दह्याचे (सार) जसे लोणी, मलयवृक्षाचे (सार) जसे चंदन किंवा औषधी(वनस्पतीं)चे (सार) जसे अमृत तसे वेदांचे (सार) आरण्यकांमध्ये आहे.

महाभारतातील या श्लोकातील उक्ती योग्य की अतिशयोक्ती, यात न पडता जर अर्थ पाहिला तर आरण्यकांचा विषय आणि त्याचे महत्व दोन्ही लक्षात येते. वर सांगितल्याप्रमाणे यज्ञकर्म आणि तत्वज्ञान हे आरण्यकांचे प्रमुख विषय आहेत. यज्ञातील विधी, त्यातील वैदिक मंत्र आणि त्यांचे तत्त्वज्ञान असा एक विषय आहे. ब्राह्मण ग्रंथातील यज्ञ हे अनेक विधी, समारंभ इ. नी परीपूर्ण आणि गुंतागुंतीचे आहेत. आरण्यकातील यज्ञ मात्र अतिशय साधे व सोपे असून अरण्यवासी ऋषीमुनी किंवा सामान्य माणसालाही सहज साध्य आहेत.
सृष्टीची उत्पत्ती या विषयावर विस्तृत मंथन आरण्यकात आढळते. वेदांप्रमाणेच आरण्यकातही ‘प्राण’ याच तत्त्वाला दृष्य अदृष्य सृष्टी आणि महाभूतांचे मूळ मानले गेले आहे. ऐतरेय आरण्यकात –
स्थूल आणि सूक्ष्म सर्वकाही प्राण तत्वातून उगम पावते, अंतरीक्ष आणि वायुचेही सर्जन प्राणातूनच होते असे वर्णन आहे.

प्राणेन सृष्टावन्तरिक्षं च वायुच्क्षान्तरिक्षं वा……….। 2

मैत्रायणी संहितेत प्राण तत्वालाच सर्व तत्वांचा जनक म्हणले आहे.

त्वं ब्रह्म त्वं च वै विष्णुः, त्वं रुद्रस्त्वं प्रजापति। त्वमाग्नि वरुणो वायुः, त्वार्मन्द्रस्त्वं निशाकरः।

मनुष्यासह संपूर्ण चराचर सृष्टीच्या मुळाशी प्राण हे एकच तत्व आहे. त्यामुळेच सृष्टीतील या सर्व घटकांशी सहभावनेने राहणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे हा विचार ऐतरेय आरण्यकात येतो. केवळ माणसा माणसात नव्हे तर सृष्टीच्या प्रत्येक दृष्य अदृष्य घटकातील हे साधर्म्य लक्षात घेऊन त्यांच्यासह कृतज्ञभावनेने राहण्याचा आग्रह आरण्यके करतात. याच कर्तव्याचा विसर पडल्याने मनुष्याला आज पर्यावरण आणि निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागतोय. आजकाल पर्यावरण, प्रदुषण, वायु उत्सर्जन, कार्बन न्युट्रल वगैरे शब्द वापरून सर्वत्र प्रसिद्ध होत चाललेल्या चळवळी ज्या गोष्टी घसा फोडून सांगत आहेत त्याचे मूळ तत्व आरण्यकात अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात उभं केलंय. आरण्यकात याच तत्वाला अनुसरुन पंचमहाभूत यज्ञाची कल्पना मांडली आहे. हे पाच यज्ञ किंवा त्याला अनुसरुन नेहमी वागले पाहिजे असे आरण्यकात आवर्जून सांगितले आहे

पंच वा एते महायज्ञः सतति प्रजायन्ते।3

हे यज्ञ म्हणजे केवळ हवन नसून वर सांगितल्याप्रमाणे चराचर सृष्टीशी बांधिलकी जपण्याचे कार्य आहे. ब्रह्मयज्ञ – ऋषींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
पितृयज्ञ – पूर्वज/पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
देवयज्ञ – देवतांबद्दल यज्ञाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
भूतयज्ञ – प्राणीमात्र आणि वनस्पतींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
अतिथियज्ञ – अभ्यागतांचा आदर करणे.

या यज्ञांच्या माध्यमातून भोवतालच्या परिसरासह पर्यावरणाशी एकरूप राहणे महत्वाचे आहे हे आज भयानक वास्तव म्हणून समोर आलेले ज्ञान आरण्यकांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितले आहे. सृष्टीतील प्रत्येक तत्व जसे वायु, पाणी, अग्नि आणि वनस्पती यांचे महत्व जवळपास सर्व आरण्यकांमध्ये येते. वायुचे महत्व सांगताना अशुद्ध वायुमुळे आजारपण येते हे ऐतरेय आरण्यक सांगते. इतकेच नव्हे तर यज्ञातील समिधा निवडताना भोवतालचा वायु शुद्ध करणाऱ्या औदुंबर किंवा पळसासारख्या वनस्पती वापराव्यात असे सांगून यज्ञकर्माचेही महत्व स्पष्ट करते. यज्ञकर्म आणि तत्वज्ञान याची सांगड घालून वेद आणि उत्तरवेदकालीन समाजाला संतुलित धर्म कसा असतो याचा वस्तुपाठ आरण्यके घालून देतात. म्हणूनच ज्ञानकर्मसमुच्चय या उपनिषदांच्या प्रमुख विषयाची बीजे आरण्यकात आढळतात असे म्हटले जाते.
अशाप्रकारे वेदवाङ्मय ही केवळ कोणत्याही एका धर्मासाठी किंवा विशिष्ट पंथासाठी रचलेली धार्मिक ग्रंथसंपदा नसून विश्वकल्याणाच्या उदात्त हेतून प्रेरित झालेल्या तत्कालिन ऋषीमुनीनी उभे केलेले जीवनकोश आहेत. वेदवाङ्मयाच्या महत्वाविषयी पुढील भागात……

तळटीप
१. महाभारत, शांतिपर्व ३३१-३
२. ऐतरेय आरण्यक २/१/७
३. तैत्तिरिय आरण्यक

Copyright sheetaluwach.com 2020

ओळख वेदांची – भाग ७

उपनिषदे

छान्दोग्य उपनिषदात एक सुंदर गोष्ट आहे. गुरुगृही शिक्षण समाप्त करून श्वेतकेतु आश्रमातून परत येतो. ज्ञानप्राप्तीचा गर्व त्याच्या चेहेऱ्यावर दिसत असतो. त्याचे वडील आरुणि ऋषी चिंतेत पडतात. केवळ लौकिक शिक्षणानंतर आपला मुलगा अहंकारी बनला तर पारलौकिक किंवा आत्मविद्येचे ज्ञान त्याला कसे होणार? त्याला पुढील टप्पा गाठायला उद्युक्त कसे करणार? त्यांना एक युक्ती सुचते. ते श्वेतकेतुला बोलावतात. छाती पुढे काढून अतिशय उत्साहात श्वेतकेतु येतो.

आरुणि – बाळ श्वेतकेतु, गुरुकुलातून आल्यापासून तू किंचित गर्विष्ठ वाटत आहेस.
श्वेतकेतु – नाही बाबा, मी सखोल अभ्यासाने विद्या प्राप्त केली आहे. या ज्ञानामुळे मी परीपक्व झालोय. मला याचा अभिमान आहे गर्व नाही.
आरुणि – तू गुरुकुलातून उच्च ज्ञान प्राप्त करून आला आहेस. इतक्याच अभ्यासाचा तूला अभिमान वाटतोय? हरकत नाही, तर मग मला हे सांग की अशी कोणती गोष्ट आहे जी जाणल्यावर अप्राप्यही प्राप्त होते किंवा अज्ञातही ज्ञात होते ?
हा प्रश्न ऐकल्यावर श्वेतकेतु गोंधळात पडतो. अज्ञातही ज्ञात होण्याची विद्या कोणती? हे त्याला गुरुकुलात शिकवलेले नसते.
आरुणि – बाळा, विद्या शिकल्याने प्राप्त होणारे ज्ञान हे श्रेष्ठ असतेच परंतू ते अंतिम ज्ञान नव्हे. तू गुरुकुलात जे ज्ञान शिकलास ते बाह्य जगाबद्दलचे ज्ञान होते. ते जग जे आपल्याला पाहता येते तसेच स्पर्श, रस आणि गंध यांच्या माध्यमातून अनुभवता येते. परंतु त्या जगाचे अंतरंग आपल्या दृष्टीस पडत नाही. ते जाणून घेण्याची विद्या साध्य करता आली पाहिजे.
श्वेतकेतु – मी पुरेसे समजलो नाही बाबा. आपण थोडे विस्ताराने सांगाल काय?
आरुणि – हे तांब्याचे पात्र पहा. आपल्या डोळ्यांसमोर हे पात्र आहे. त्याचा उपयोग आपण करतो. अशा अनेक तांब्याच्या वस्तू आपण वापरतो. ही पात्रे आणि त्याचे उपयोग वेगवेगळे आहेत. मात्र त्याचे मूळ मात्र ‘ताम्र’ हा एकमेव धातूच आहे. तसेच आपल्याला दिसणारे जग हे सुद्धा वेगवेगळ्या स्वरुपात दिसत असले तरी त्याचे मूळ हे एकच तत्त्व आहे. ते तत्वच एकदा जाणले की संपूर्ण सृष्टीचे स्वरूप उलगडेल. पाण्यात विरघळलेले मीठ आपल्याला दिसत नाही परंतु त्याच्या खारट चवीवरून आपण ओळखतो तसेच सृष्टीतील प्रत्येक घटकात हे तत्व अंतर्भूत आहेच. सृष्टीच्या अंतरंगात शिरून ते जाणण्याचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान.

छान्दोग्य उपनिषदातील ही कथा/संवाद केवळ छान्दोग्यच नव्हे तर सर्वच उपनिषदांच्या विषयावर प्रकाश टाकते. सृष्टीचे कोडे उलगडण्यासाठी तिच्या अंतरंगात डोकावण्याचे कार्य उपनिषदे करतात. त्यामुळेच उपनिषदांचे विषय हे अदृष्याचे ज्ञान, आत्मज्ञान, तत्त्वज्ञान, ज्ञानोपासना असेच आहेत.

(** यावरून हे ही लक्षात यायला हरकत नाही की उपनिषदांचा विषय फक्त आणि फक्त आत्मानुभूतीचे तत्वज्ञान आहे. कोणत्याही देवाची उपासना किंवा पर्यायाने धर्माचा उपदेश प्रमुख उपनिषदात येत नाही. त्यामुळेच जगातील जवळपास सर्व जाती, धर्म आणि पंथाच्या तत्त्वज्ञांना उपनिषदे आकर्षित करतात.)

संवाद अर्थात (One on One Discussion)

आपण मागच्या लेखात पाहिले की उपनिषद शब्दाचा अर्थ (गुरुजवळ) बसून प्राप्त केलेले ज्ञान असा होतो. याच अर्थाला साजेसे असे हे संवाद सर्व प्रमुख उपनिषदांमध्ये येतात. गुरु-शिष्य, पिता-पूत्र, पती-पत्नी किंवा देव-मानव अशा अनेक प्रकारच्या संवादातून उपनिषदे अतिशय सहज सोप्या भाषेत गहन तत्वज्ञान मांडतात. आजकाल जसे Talk Shows किंवा Expert Interviews/Dialogues होतात तसेच.

आरुणि – श्वेतकेतु प्रमाणेच
याज्ञवल्क्य – मैत्रेयी (बृहदारण्यक उपनिषद),
याज्ञवल्क्य – गार्गी (बृहदारण्यक उपनिषद),
याज्ञवल्क्य – जनक राजा
(*सीता फेम नसावा पण त्याच वंशातला) (बृहदारण्यक उपनिषद),
अजातशत्रु – गार्ग्य बालाकि (कौषितकी उपनिषद),
यमराज-नचिकेता (कठोपनिषद),
शौनक – अंगिरस (मुण्डकोपनिषद),
कामलायन – सत्यकाम जाबाल (छान्दोग्य उपनिषद),
नारद – सनत्कुमार (छान्दोग्य उपनिषद)

असे अनेक संवाद उपनिषदांमध्ये येतात.

संख्या –

उपनिषदांची एकूण संख्या किती आणि त्यातील प्रमुख उपनिषदे कोणती हा नेहेमीच चर्चेचा विषय राहिला आहे. वेदवाङ्मयाचा भाग असल्याकारणाने प्रत्येक वेद व त्याच्या सर्व शाखांची उपनिषदे होती असा एक मतप्रवाह आहे. त्यानुसार उपनिषदांची संख्या जवळपास ११८० च्या आसपास भरते. मुक्तिकोपनिषदात १०८ उपनिषदांची नावे सांगितली आहेत त्यातील पहिल्या श्लोकात दहा प्रमुख प्राचीन उपनिषदे येतात. ती अशी

ईशकेनकठप्रश्नमुण्डमाण्डूक्यतित्तिरिः । ऐतरेयम् च छान्दोग्यं बृहदारण्यकम् तथा।। (ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्ड/मुण्डक, माण्डूक्य, तैत्तिरिय, ऐतरेय , छान्दोग्य तसेच बृहदारण्यक)

आदि शंकराचार्यांनी ११ उपनिषदांवर भाष्ये लिहीली यात वरील १० आणि श्वेताश्वतर उपनिषदाचा समावेश होतो. याखेरीज निरनिराळ्या विद्वानांनी गौरवलेली कौषीतकी, प्रश्न, मैत्री अशी इतरही काही उपनिषदे प्रमुख मानली जातात. यातील ईश, कठ आणि मुण्डक ही उपनिषदे पद्य तर बाकीची गद्य स्वरूपात आहेत.

विषय

संख्या आणि विषयाची खोली लक्षात घेता उपनिषदातील विषयांवर भाष्य करणे हे एका लेखाचे काम नव्हे. बाह्य सृष्टी आणि ब्रह्मरुप आत्मा या दोन्हीचे यथार्थ स्वरूप उपनिषदे मांडतात. श्वेतकेतु, मैत्रेयी, नचिकेत या सारख्या अनेक जिज्ञासुंच्या शंका आणि त्याचे गुरुतुल्य ऋषींनी विस्तृतपणे केलेले समाधान अशी मांडणीची सोपी पद्धत उपनिषदे अंमलात आणतात. मी कोण? हे जग कसे निर्माण झाले? याचा कर्ता कोण आहे? अशा वरवर साध्या वाटणाऱ्या परंतु अत्यंत गुढ अशा या शंका आहेत.

याखेरीज उत्कृष्ट वचने (वाक्ये), गोष्टी, वर्णने आणि भाष्य या माध्यमांचाही उपनिषदात उपयोग होतो.

आत्मा आणि ब्रह्मज्ञान हा उपनिषदांचा मुख्य विषय असला तरी त्या अनुषंगाने सृष्टीच्या जवळपास प्रत्येक घटकाचा तात्त्विक अंगाने उपनिषदे अभ्यास करतात.

साधे उदाहरण घ्यायचे तर आजकाल प्रसिद्धीस आलेल्या ‘योग’ (आजच्या भाषेत योगा (Yoga)) चे मूळ हे श्वेताश्वतर उपनिषदात आढळते. प्राणाचा अवरोध, इंद्रियदमन आणि समाधी स्थिती यावर विस्तृत भाष्य या उपनिषदाच्या दुसऱ्या अध्यायात येते. अगदि योगाभ्यासासाठी योग्य जागेच्या निवडीपासून ते समाधी स्थितीतील जीवात्म्याला होणाऱ्या परमात्म्याच्या दर्शनपर्यंतचे विचार या उपनिषदात मांडले आहेत. अशाच प्रकारे ॐकार (प्रणव) तसेच इतर प्रतीकांची उपासना, यज्ञ, कर्म, वर्तन, वाणी, विचार अशा असंख्य विषयांवरचे तत्वज्ञान उपनिषदातून मिळते.

महावाक्ये

ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत. तांब्याच्या पात्राच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे – स्वतः कोण आहोत याचे रहस्य जाणणे म्हणजेच सृष्टीचे रहस्य जाणणे होय. ही उपनिषदांची शिकवण आहे. या अर्थाची जी वाक्ये उपनिषदात येतात त्यांना महावाक्ये म्हणतात. प्रत्येक वाक्य एकेका वेदाशी संबंधित उपनिषदात येते.

१. प्रज्ञानं ब्रह्म। (ऐतरेय उपनिषद) (प्रकट ज्ञान हेच ब्रह्म आहे)
२. अहं ब्रह्मास्मि। (बृहदारण्यक उपनिषद) (मी (आत्मा) ब्रह्म आहे),
सोSहम्। (ईशोपनिषद) (तो मीच आहे)
३. तत्त्वमसि। (छान्दोग्य उपनिषद) (ते (ब्रह्म) तू आहेस)
४. अयमात्मा ब्रह्म। (माण्डूक्य उपनिषद) (हा आत्मा ब्रह्म आहे)
गूढ तसेच अर्थगर्भ अशी ही वाक्ये वाचली की उपनिषदांना भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया का म्हणतात ते लक्षात येते.

आपल्या परिचयाचे

आपल्या भारताच्या राष्ट्रीय चिन्हातील ‘सत्यमेव जयते’ हे वाक्य उपनिषदातलेच आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे याच अर्थाचे Pravda vítězí (सत्याचाच विजय होतो) हे वाक्य चेक प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय चिन्हात येते.

आपण नेहेमी म्हणत आलेला –

भ॒द्रं कर्णे॑भिः श‍ृणुयाम देवा भ॒द्रं प॑श्येमा॒क्षभि॑र्यजत्राः । स्थि॒रैरङ्गै॑स्तुष्टु॒वांस॑स्त॒नूभि॒र्व्य॑शेम दे॒वहि॑तं॒ यदायुः॑।

हा ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातला मंत्र माण्डूक्य उपनिषदाच्या सुरुवातीला येतो. ‘स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः’ हा स्वस्तिमंत्र याच उपनिषदात पुढे येतो.

महत्व

केवळ भारतीयच नव्हे तर तत्वज्ञानाच्या एकूणच इतिहासात उपनिषदांचे स्थान अजोड आहे. दारा शिकोह ने स्वतःच म्हटल्याप्रमाणे ‘नव्याने प्रचलित होणा-या अनेक धर्मांची शिकवण ही केवळ उपनिषदातील तत्वांचेच पुनःप्रक्षेपण आहे.’ पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा सर्वच विद्वानांनी उपनिषदांचा गौरव केला आहे. यात केवळ तत्त्वज्ञच नव्हे तर कवि, लेखक, शास्त्रज्ञांसह सर्व धर्मीय अभ्यासकांचा समावेश होतो. उपनिषदांचा हा प्रचंड प्रभाव १७९६ च्या पहिल्या पाश्चात्य भाषांतरानंतर केवळ गेल्या २०० वर्षात पडलाय. यावरून हजारो वर्षांपूर्वी हे तत्त्वज्ञान सोप्या आणि सहज मांडणाऱ्या भारतीय ऋषींच्या बुद्धीसामर्थ्याची कल्पना येते.

तळटीप

१. सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्‌ सत्यस्य परमं निधानम्‌ ॥ (मुण्डकोपनिषद – तृतीय मुण्डक – खंड १ मंत्र ६)
२. भ॒द्रं कर्णे॑भिः श‍ृणुयाम देवा भ॒द्रं प॑श्येमा॒क्षभि॑र्यजत्राः ।
स्थि॒रैरङ्गै॑स्तुष्टु॒वांस॑स्त॒नूभि॒र्व्य॑शेम दे॒वहि॑तं॒ यदायुः॑ ॥ ऋग्वेद मंडल १.सूक्त ८९ ऋचा ०८

Copyright sheetaluwach.com 2020 ©

ओळख वेदांची – भाग ६

उपनिषदे

शहाजहान बादशहाचे नाव घेतले की दोन गोष्टी अपरिहार्यपणे समोर येतात. एक अर्थातच ताजमहाल आणि दुसरा औरंगजेब! त्यापैकी ताजमहाल हा शहाजहान बादशहाने भारताला दिला की तो आधीपासूनच अस्तीत्वात होता हा वादाचा विषय आहे आणि औरंगजेब………… असो! परंतु फार प्रसिद्ध नसलेली आणि केवळ आपल्या कार्यामुळे भारताला उपयुक्त ठरलेली शहाजहानची आणखी एक देणगी म्हणजे त्याचा ज्येष्ठ पुत्र – दारा शिकोह.

इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात औरंगजेबाने मारलेल्या भावंडाच्या यादीतला एक भाऊ, केवळ इतकाच काय तो दाराचा आणि आपला परिचय. यापेक्षा त्याबद्दल अधिक काही वाचनात येत नाही.

भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया असणारी उपनिषदे पाश्चात्य जगतापर्यंत पोचवण्यात सिंहाचा वाटा असणारा पहिला ऐतिहासिक दुवा म्हणून दारा शिकोह चे नाव घेतले तर आश्चर्य वाटेल की नाही?!

पण हे खरं आहे. हिंदु आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचा तौलनिक अभ्यास दारा शिकोह ने केला होता. १६५७ च्या आसपास दारा शिकोह ने जवळपास ५० उपनिषदांची पर्शियन भाषेत भाषांतरे केली. पाश्चात्यांना पुरेशी माहीती नसणाऱ्या या महान ग्रंथांची ही भाषांतरे अब्राहम अंकेतिल द्युपरॉं (Abraham Hyacinthe Anquetil-Duperron) या फ्रेंच विद्वानाच्या हाती आली. त्याने १७९६ पर्यंत या सर्व भाषांतरीत उपनिषदांची लॅटिन भाषेत Oupnek’hat या नावाने भाषांतरे केली आणि पाश्चात्य जगताला भारतीय तत्त्वज्ञानाच्या या थोर परंपरेची ओळख करून दिली.

उपनिषदांवर खरेतर लिहायला लागू नये इतकी ती आता प्रसिद्ध झाली आहेत. जगभरात भारतीय तत्त्वज्ञानाचा कोणताही उल्लेख हा उपनिषदांशिवाय पूर्णच होत नाही. शॉपेनहाउएर (Arthur Schopenhauer) पासून आजतागायत अनेक पाश्चात्य विद्वानांनी उपनिषदांचा आणि त्यातील तत्त्वज्ञानाचा गौरव केला आहे.

आत्तापर्यंत आपण चारही वेद आणि ब्राह्मण ग्रंथांबाबत माहिती घेतली. यातून वैदिक धर्म, त्यातील देवता, यज्ञसंस्था, वेदकालीन लोक, त्यांचे जीवन या सर्व गोष्टींचा परिचय करून घेतला. यात वैदिक धर्मातील कर्मकांडांचा भागही आला. आता थोडे पुढे जाउयात. वैदिक धर्माची ज्ञानकांडे म्हणजे उपनिषदे.

उत्तरवेदकाळात यज्ञसंस्थेचे महत्व वाढत गेले. निरनिराळ्या देवता यज्ञ केल्याने संतुष्ट होऊन यज्ञ करणाऱ्या यजमानाच्या इच्छा पूर्ण करतात अशी धारणा पक्की होत गेली. परंतु त्यामुळे सुरुवातीला असणारे यज्ञसंस्थेचे उदात्त स्वरूप बदलले. अनेक प्रकारचे यज्ञ प्रचारात येऊन यज्ञसंस्थेची आणि पर्यायाने कर्मकांडाची बेसुमार वाढ होऊ लागली. देवदेवतांचे ‘प्रस्थ’ प्रमाणाबाहेर वाढत गेले. यातूनच देवाच्या अस्तीत्वाबद्दलच संशय निर्माण होऊ लागला. देव किंवा प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे नक्की काय या संदर्भातील जिज्ञासा वाढीस लागली. कर्मकांडरहित शुद्ध ज्ञान, ज्ञानोपासना आणि ब्रह्मजिज्ञासा दृढ होत गेली. हाच उपनिषदांचा आरंभ होय. आत्मा किंवा ब्रह्म यांचे एकरुपत्व स्पष्ट करणारे ज्ञान विस्तृतपणे मांडणे या उद्देशाने उपनिषदांची रचना झाली असे म्हणता येईल.

उपनिषदांमध्ये दोन प्रकारच्या विद्यांचा उल्लेख येतो.

परा विद्या – आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञानाशी संबंधित विद्येला परा विद्या अशी संज्ञा आहे.
अपरा विद्या – आपल्या डोळ्यासमोर असणाऱ्या दृष्यमान जगताशी संबंधित विद्येला अपरा विद्या म्हणता येईल.

**(जाता जात हे ही सांगायला हरकत नाही की परा किंवा परोक्ष म्हणजे मागे किंवा दृष्टीआड आणि अपरा किंवा अपरोक्ष म्हणजे समोर. आपल्याकडे मराठीत हाच अपरोक्ष शब्द सर्वस्वी उलट अर्थाने वापरला जातो!!)

उपनिषदांचा मुख्य विषय पराविद्य़ा हाच आहे.

उपनिषद या शब्दाचेही अनेक अर्थ प्रचलित झाले. यातील समजण्यासाठी सगळ्यात सोपा अर्थ म्हणजे – उप + नि + सद् अर्थात जवळ बसणे, म्हणजेच गुरुच्या जवळ बसून साधकाने प्राप्त केलेले ज्ञान. आदि शंकराचार्यांच्या मते अज्ञान नाहीसे करणारी ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद्.

उपनिषदांचा विषय त्याच्या नावातूनच नीट स्पष्ट होतो. डोळ्यासमोर असणाऱ्या दृष्यमान जगाच्या पलिकडे जाऊन तर्क आणि बुद्धीसामर्थ्याने ही सृष्टी समजून घेण्याचे ज्ञान म्हणजेच उपनिषदे.

वेदान्त – उपनिषदांना वेदान्त अशीही संज्ञा आहे. साधारणपणे वेदवाङ्मयाचे जर भाग पाडायचे झाले तर मंत्र, कर्म आणि ज्ञान असे तीन विभाग करता येतील. याची ग्रंथविभागणी खालीलप्रमाणे होईल.

मंत्र – मंत्रमय संहिता (प्रत्यक्ष वेद) कर्म – कर्मकांड आणि उपासनापद्धतीचे वर्णन करणारी ब्राह्मणे आणि आरण्यके ज्ञान – ज्ञानस्वरूप उपनिषदे

अशाप्रकारे उपनिषदे वेदवाङ्मायाच्या अंतिम टप्प्यात येतात म्हणून त्यास वेदान्त अशी संज्ञा वापरली जाते.

मुक्तिकोपनिषदात भगवान श्रीराम व हनुमंताचा संवाद आहे. कैवल्यरूप मुक्ति कोणत्या उपायाने प्राप्त होईल असे हनुमंताने विचारल्यावर भगवान राम उत्तर देतात –

इयं कैवल्यमुक्तिस्तु केनोपायेन सिद्ध्यति । माण्डूक्यमेकमेवालं मुमुक्षूणां विमुक्तये ॥ २६॥
तथाप्यसिद्धं चेज्ज्ञानं दशोपनिषदं पठ ।ज्ञानं लब्ध्वा चिरादेव मामकं धाम यास्यसि ॥ २७॥

मोक्षाची इच्छा करणाऱ्या साधकांना मुक्ती देण्यासाठी (एकटे) माण्डूक्य उपनिषद पुरेसे आहे. त्यातूनही जर ज्ञान किंवा उपरती साध्य झाली नाही तर (मात्र) दहा उपनिषदांचे अध्ययन कर. त्यामुळे (आत्म)ज्ञानासह माझे परमधाम (वैकुंठ?) प्राप्त होईल.

ही दहा उपनिषदे कोणती आणि त्यात काय सांगितले आहे. हे पुढील भागात……………

तळटिप
१. अथ परा, यया तदक्षरमधिगम्यते । – मुण्डकोपनिषद् १-१-६

Copyright sheetaluwach.com 2020 ©