ग्रीस…. शालेय अभ्यासातील जवळपास प्रत्येक विषयाचा किंवा विषयाच्या नावाचा उगम ज्या देशात झाला असे आपण वाचतो असा देश म्हणजे ग्रीस (Greece). युरोपीय आणि पर्यायाने जगाच्या संस्कृतीवर ज्याची छाप आहे असा देश. गंमतीचा भाग म्हणजे, युरोप हिंडवणाऱ्या एकाच छापाच्या जवळपास सर्व टुरांमधील शेकडा दहा टुर्समध्येही ग्रीसचा समावेशच नसतो किंवा असलाच तर अतिशय त्रोटक असतो. युरोप टुर म्हणजे लंडन, पॅरीस, रोम, व्हेनिस, फारतर प्राग आणि व्हिएन्ना इ. असे साधारणपणे मानले जाते. या सर्व शहरांना पुरुन उरेल इतकी माया केवळ एकट्या ग्रीसमध्ये आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
थक्क करून टाकतील इतक्या प्रेक्षणीय, वाचनीय, श्रवणीय आणि अर्थातच वंदनीय (अभ्यासकांसाठी) गोष्टींचं आगार म्हणजे ग्रीस. पाश्चात्य साहित्य, संगीत, कला, राजकारण, विज्ञान, तत्वज्ञान, तंत्रज्ञान सगळ्यांचे उगमस्थान… तात्पर्य, शास्त्रापासून शस्त्रापर्यंत पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रत्येक अंगाचा उगम आणि विकास ग्रीकांपासून झाला. सॉक्रेटीस (Socrates), प्लेटो (Plato), ॲरिस्टॉटल (Aristotle), सोफोक्लिस (Sophocles), युरिपिडिस (Euripides), अरिस्टोफेनस (Aristophanes), पायथागोरस (Pythagoras), हेराक्लिटस् (Heraclitus), डेमॉक्रेटस (Democritus)…….. नुसती नावं जरी घेतली तरी ग्रीसच्या भव्य परंपरेची दबदबा जाणवायला लागतो.
अथेन्स (Athens) या ग्रीसच्या मानबिंदुची ही १० दिवसांची भेट. १० दिवसात अथेन्स (Athens) पाहणे म्हणजे पाच ओळीत महाभारत बसविण्याइतकं सोपं!!! ३० च्या आसपास तर नुसती खरोखर बघण्यासारखी म्युझियम्स आहेत. प्रत्यक्ष पुरातन अवशेष मोजायचे झाले तर त्यातच दहा दिवस जातील. असो….
चतुरंग अथेन्स पाहण्याचा निदान प्रयत्न केला हे त्यातल्या त्यात समाधान.पाहुयात हे १० दिवस नीट मांडता येतात का ते.
ॲक्रॉप्लिस (Acropolis)
ग्रीक भाषेत गावातील सगळ्यात उंच भागाला ॲक्रॉप्लिस म्हणतात. त्यातली प्रसिद्ध म्हणजे अथेन्सची टेकडी कारण अर्थातच त्यावरचे पार्थेनॉन…(Parthenon) म्हणजे अथेन्स च्या ग्रामदेवतेचे अथेना/अथिना (Athena) चे मंदिर.
(हो ग्रीकही भारतीयांसारखे देऊळवाले होते. देवपूजा, नैवेद्य, नवस करण्यापासून ते पार बळी देण्यापर्यंत सगळं सेम!!!)
पार्थेनॉन (Parthenon)
इ.स.पु ४८० च्या आसपास पर्शियन (आजचे इराणी) आक्रमकांच्या स्वारीत जुने पार्थेनॉन मंदीर ध्वस्त झाले. तेव्हा त्याच जागी नवे आणि अधिक भव्य मंदिर बांधायचे अथेन्सवासीयांनी ठरवले.
साधारण २२८ फूट लांब आणि १०१ फूट रुंद अशा आयताकृती चौथऱ्यावर ६ फूट व्यासाचे आणि ३४ फूट उंचीचे ४६ खांब हे भव्य मंदिर घेऊन उभे आहेत. असेच काही खांब आतल्या भागातही होते. कठीण असा संगमरवरी दगड कातून अजोड वाटावेत असे मजबूत स्तंभ रचणं हा एक चमत्कारच वाटतो. असे तब्बल १३,४०० दगड वापरून हे मंदिर उभं केलं आहे. असं म्हणतात की संपूर्ण संगमरवरात बांधलेल्या या मंदिरात मंदिराइतकीच उत्तुंग अशी देवी अथेनाची सोन्याची(?) मुर्ती होती.
कठीण दगड आणि भक्कम बांधकामामुळे युद्धजन्य परीस्थिती असूनही अनेक वर्ष पार्थेनॉन टिकून राहीलं. थोडीफार पडझड आणि बदल होत राहिले. रोमन लोकांनी काही काळ त्याचं चर्चमध्ये रुपांतर केलं तर ऑटोमॉन तुर्कांनी त्यांच्या काळात मशिद केली!! १६८७ मध्ये एका युद्धात याच तुर्कांनी देवळाचा उपयोग दारूगोळ्याचं कोठार म्हणून केला. शत्रुचा एक तोफगोळा याच कोठारावर नेमका पडला आणि पार्थेनॉनचं छत आणि बऱ्याचशा भागाच्या ठिकऱ्या उडाल्या. त्यातूनही उरलेला भाग उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणून टिकून होता.
खेदाची गोष्ट म्हणजे त्यातील काही अत्यंत मौल्यवान व दुर्मिळ शिल्पे इ.स. १८०३ च्या आसपास एल्जिन (Elgin) नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने खोटी कागदपत्रे सादर करून, चक्क खोदून इंग्लंडला नेली आणि आपली वैयक्तिक मालमत्ता म्हणून घरी ठेवली!! नंतर काही कारणास्तव त्याला म्हणे ती विकावी लागली. म्हणून मग इंग्रज सरकारने ती विकत घेतली आणि लंडनच्या म्युझियमध्ये ठेवली!! आजही एल्जिन मार्बल्स (Elgin Marbles) म्हणून ही शिल्पे प्रसिद्ध आहेत. जगभरातून लुटुन आणलेल्या मालाचं प्रदर्शन भरवायचं आणि ती लुट तिकिट लावून मूळ मालकांनाच दाखवायची याला म्हणतात व्यवसायिक चातूर्य (मराठीत बिझनेस सेन्स)!! अर्थात भारतीयांसाठी यात नवल ते काय?!! अर्ध ब्रिटिश म्युझियम आणि लुव्र अशाच वस्तूंनी तर भरलंय!!!) असो….
ग्रीकांनी स्वातंत्र्योत्तर काळात पार्थेनॉनमधील सगळे नवे बदल चर्च, मशिद वगैरे हटवून त्याचं मूळ स्वरूप उभं केलं, तेही वास्तूला कोणताही धोका न पोचवता. आज आपल्याला दिसतं ते मंदिर हे कोणतेही बदल नसलेलं आणि फरक न केलेलं अवशिष्ट मुळ बांधकाम आहे.
ॲक्रोपोलिस ही अथेन्सवासीयांची केवळ उपासनेची नव्हे तर उत्सवाचीही जागा होती. त्यामुळे केवळ पार्थनॉनच नव्हे तर इतर काही मंदिरे आणि मनोरंजनाची ठिकाणेही या परीसरात उभी केली गेली.
एरेक्थिऑन (Erechtheion)
ॲक्रॉप्लिसच्या उत्तरेला अथेना (Athena) आणि पोसायडन (Poseidon) या देवांना समर्पित केलेले हे मंदिर आहे. रचना पार्थेनॉनशी मिळती जुळती असली तरी याचे एक प्रसिद्ध वैशिष्ट्य म्हणजे अप्सरांचे स्तंभ (Porch of the Caryatids). मंदिराच्या दक्षिणेकडचा भार सांभाळणारे खांब हे सहा वस्त्रांकित अप्सरांच्या प्रतिमा आहेत. जणूकाही त्या अप्सरांनी हा भाग डोक्यावर पेलला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अप्सरा एक शिल्प म्हणून वेगळी आहे. प्रत्येकीची चेहेरपट्टी,वस्त्र,केशभूषा इतरांपेक्षा आगळी आहे.
मूळ आराखड्यात एकूण सहा अप्सरा असल्याचे स्पष्ट दिसते. त्यातील सहाही अप्सरांच्या प्रतिकृती सध्याच्या मंदिरात जोडलेल्या आहेत.ॲक्रॉप्लिसच्या म्युझियममध्ये मूळ पाच अप्सरास्तंभ पहायला मिळतात. सहावा स्तंभ एल्जिनने (Elgin) इंग्लंडला नेला, तो आता ब्रिटिश म्युझियमध्ये आहे. त्याचा रिकामा पाया ॲक्रॉप्लिसच्या म्यझियममध्येच आहे!
एरेक्थिऑन (Erechtheion) आणि पार्थेनॉन (Parthenon) दोन्ही मंदिरांचे एकत्रित दृष्य दाखवणाऱ्या या भागातही देवी अथेनाचा एक पुतळा होता असे म्हणतात.
डिओनिसिसचे सभागृह ( Theatre of Dionysus )
ॲक्रॉप्लिसच्या दक्षिणेकडील उताराच्या शेवटी एक उघडे नाट्यगृह आहे. डिओनिसिस (Dionysus) हा ग्रीकांचा द्राक्ष आणि वाईनचा देव. याच सभागृहात त्याचा उत्सव अथेन्सवासी साजरा करत असत. त्यात अनेक नाटकांचे आणि नृत्यांचे प्रयोग होत आणि विजेत्यांना पारितोषकेही दिली जात. सोफोक्लिस (Sophocles), अरिस्टोफेनस (Aristophanes), युरिपिडिस (Euripides) १ यांची गाजलेली नाटकं येथे प्रदर्शित केली गेली. असं म्हणतात की सोफोक्लिसने जवळपास १८ वेळा येथे स्पर्धा जिंकल्या होत्या. इ.स.पू ६ व्या शतकापासून हे नाट्यगृह उभे आहे. त्यानंतर जवळजवळ इ.स. १ ल्या शतकापर्यंत प्रत्येक सत्ताकाळात त्यात कमीजास्त बदल केले गेले. आजचे स्वरूप हे रोमन कालापासूनचे आहे.
Odeon of Herodes Atticus (हिरोडस ॲट्टिकसचे प्रेक्षागार)
ॲक्रॉप्लिस संकुलातील सर्वात नवीन, म्हणजेच फक्त १८०० वर्षांपुर्वी बांधलेले हे प्रेक्षागार! ग्रीक राजकारणी हिरोडस ॲट्टिकसने (Herodes Atticus) आपल्या बायकोच्या स्मरणार्थ ही वास्तू इ.स. १६१ बांधली. जवळपास ५००० प्रेक्षक समावून घेणारे हे भव्य प्रेक्षागृह बांधताना आवाज आणि प्रतिध्वनीसाठी ॲक्रॉप्लिसचा उत्तम वापर करण्यात आला. नाट्यगृहाला समोरून तीन मजली भिंत आणि अत्यंत मौल्यवान लाकडाचे छतही होते जे आज नाही. हे नाट्यगृह आजही वापरात असून अनेक ऑपेरा आणि महोत्सव याच्या रंगमंचावर होतात.
अथेन्समध्ये कुठेही असलात तरी ॲक्रॉप्लिस (Acropolis) सहसा नजरेतून सुटत नाही. एका टेकडीवर संस्कृतीच्या इतक्या जिवंत पाऊलखुणा एकत्र क्वचितच पहायला मिळतात. पायथ्याशी अर्थातच ॲक्रॉप्लिसचं म्युझियम आहे ज्यात त्याचा पूर्ण आराखडा असलेले मॉडेल, अथेनाचे पुतळा (प्रतिकृती) आणि इतर अनेक वस्तु आणि अवशेष पहायला मिळतात. म्युझियम जेथे उभं केलंय त्या भागात पार्थेनॉनपूर्व आणि त्यापेक्षाही जुन्या काळाचे अवशेष उत्खननात सापडले आहेत. ते उत्खनन वरून पाहता यावं म्हणून त्या साईटच्या काही भागावर काचेचं छत टाकलंय. त्यातून पुरातन अवशेष प्रत्यक्ष पहायला मिळतात.
इतिहास अथेन्सच्या जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी !!.. सर्वत्र दडलेला आहे!!!! उर्वरीत अथेन्स आणि डेल्फी पुढील भागात…….
तळटीप –
१. सोफोक्लिस, अरिस्टोफेनस, युरिपिडिस – प्राचीन ग्रीक नाटककार. ॲरीस्टॉटलच्या Tragedy वरच्या प्रसिद्ध संस्करणात सोफोक्लिसच्या इडिपस रेक्स (Oedipus Rex) चे नाव प्राधान्याने येते.
पुढील भाग – गुढरम्य डेल्फी
Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach