अथेनियन अगोरा (Ancient Agora – Athens)
पाश्चात्य जगाला ज्ञात असणाऱ्या लोकशाहीचे अथेन्स (Athens) हे उगमस्थान मानले जाते. साधारण इ.स.पू. ६ व्या शतकापासून अथेन्स (Athens) राज्यात लोकशाही अस्तीत्त्वात आली आणि नंतर इतर ग्रीक राज्यांध्येही त्याचेच अनुकरण केले गेले असे मानतात. गंमतीचा भाग असा की गुलामगिरी आणि लोकशाही दोघीही प्राचीन अथेन्समध्ये एकत्र नांदत होत्या!! निवडणूकीपासून ते व्यापारावरील सरकारी नियंत्रणापर्यंत आपल्याला आज ज्ञात असणाऱ्या अनेक व्यवस्था अथेन्सी लोकशाहीचा भाग होत्या. पालिका, कार्यालये, समित्या, नोकरशहा, लोकप्रतिनिधी, समर्थक, विरोधक,मतदार आणि मतदान अशा सर्व संस्था अथेन्सवासीयांनी उभ्या केल्या होत्या. सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रौढ अथेन्सवासीयांनाच फक्त मतदानाचा अधिकार होता. मतदानाप्रमाणेच आपली मते मांडणे, सभा घेणे, भाषणे , वादविवाद करणे हा अथेन्सवासीयांचा आवडता कार्यक्रम होता. वादविवादासाठी प्रसिद्ध असलेले सॉक्रेटीस (Socrates), डेमॉस्थेनस (Demosthenes) सारखे तत्वज्ञ याच परंपरेतले. अशा भाषण, वादाविवाद, चर्चा, सभा, परिषदा इ. शहरांच्या मध्यवर्ती भागात होत असत. प्रशासक, नगरपालिका सदस्य, प्रतिष्ठित नागरीक, या सगळ्यांचा राबता असणारे हे ठिकाण म्हणजे अगोरा (Agora) किंवा आजच्या भाषेत शहराचा मध्यवर्ती भाग (मराठीत City Centre, किंवा CBD!). प्राचीन ग्रीकांच्या प्रत्येक शहरात असे ठिकाण असे. बाजारपेठ, सरकारी कार्यालये, सांस्कृतीक कार्यक्रम आणि गप्पांचे अड्डे यांचे एकत्रित संकुल म्हणजे अगोरा (Agora). अथेन्सच्या मधोमध ॲक्रॉप्लिसच्या दिशेने जाणाऱ्या प्राचीन अथेन्स महामार्गाच्या (Panathenaic Highway) दोन्ही बाजूला हे अगोरा (Agora) बांधले गेले होते. ज्याचे अवशेष आजही पहायला मिळतात. काय काय आहे या संकुलात…
निरनिराळ्या काळात बांधलेली नाट्यगृहे, चर्चेसाठीची आवारे, सरकारी कचेऱ्या, दुकाने, कारंजी, बागा, मंदिरे इतकेच काय पण एक टांकसाळ (mint) सुद्धा होती. ग्रीकांच्या व्यवस्था किती प्रगल्भ होत्या हे दर्शवणारी काही विशेष कार्यालये होती. जसे – दुकानांत तोलल्या जाणाऱ्या मालासाठीची प्रमाणीत वजने बाळगणारे पालिकेचे कार्यालय होते. येथे येऊन ग्राहक आपल्याला दिलेला माल योग्य वजनाचा असल्याची खात्री करू शकत असे. नगरपरीषदेच्या सदस्यांना बसण्यासाठी एक कार्यालय होते. त्यात राहण्याचीही सोय होती. नगरपरिषदेचा किमान एकतरी सदस्य येथे आळीपाळीने वास्तव्यास असे. जेणेकरून जनतेचा प्रतिनिधी नागरीकांना कोणत्याही वेळी उपलब्ध होई. याच ठिकाणावरून अथेन्सपासूनची भौगोलिक अंतरे प्रमाणीत केली जात असत. उदा. अथेन्सपासून स्पार्टापर्यंतचे (sparta) अंतर मोजायचे तर त्याचा आरंभबिंदू (zero point) अगोरा (Agora) मानला जाई!! ग्रीकांची लोकशाही किती विचारपूर्वक उभी केलेली होती हे या व्यवस्थेवरून स्पष्ट होते.
पारंपारीक अथेन्स-उत्सवाच्या (Athenian Festivals) दिवशी काढलेली मिरवणूक याच परीसरातील मार्गावरून पार्थेनॉनला जात असे. दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या नलिका, चढण असलेल्या मार्गाला आधार, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी असे संपूर्ण नियोजित बांधकाम अगोरात आढळते. शेकडो वर्षे हा भाग त्याचं महत्व टिकवून होता आणि सतत नवनवीन बांधकामं स्वीकारत होता. लहान मुलांच्या खेळणी, स्वयंपाकाची उपकरणे, विक्रीला आलेल्या वस्तू, विनिमयाच्या नाण्यांपासून ते पार कालमापक घटीका आणि मतदान/निवडणूक यंत्रापर्यंत अनेक वस्तू येथे केलेल्या प्रदीर्घ उत्खननात सापडल्या आहेत. वादविवाद, चर्चा, परिषदा, नाटके, जत्रा तसेच दुकाने, शासनयंत्रणेचा आणि विद्वानांचा राबता यामुळे अगोराचे संकुल हे सतत गजबजलेले सांस्कृतिक केंद्रच होते.
जवळपास १२ स्तरांपर्यंत केलेल्या उत्खननातून अथेन्सच्या अगोराच्या परीसरात अनेक अवशेष, वास्तू आणि वस्तू सापडल्या. साधारण इ.स.पू. ३००० पासून ते इ.स. १५०० पर्यंतच्या अशा अनेक वस्तूंचे एक संग्रहालय अगोराच्याच परिसरात उभे आहे. पर्गमॉन (Pergamon) चा राजा अटोलास (Attalos) याने इ.स.पू. १५० च्या आसपास बांधून दिलेल्या बाजारपेठेच्या जागेची पुनर्बांधणी करून त्यात हे म्युझियम (museum) वसवले आहे. जवळपास १५०० च्या आसपास वस्तुंचा संग्रह येथे आहे त्यातील केवळ प्राचीन अथेन्सच्या मोजक्या खुणा पाहू…
अथेन्समधील अशीच इतर म्युझियम्स अंतिम भागात पाहू……
मागील भाग – संस्कृतीचे स्तंभ – अथेन्स
Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach