पाश्चात्य जगाला ज्ञात असणाऱ्या लोकशाहीचे अथेन्स (Athens) हे उगमस्थान मानले जाते. साधारण इ.स.पू. ६ व्या शतकापासून अथेन्स (Athens) राज्यात लोकशाही अस्तीत्त्वात आली आणि नंतर इतर ग्रीक राज्यांध्येही त्याचेच अनुकरण केले गेले असे मानतात. गंमतीचा भाग असा की गुलामगिरी आणि लोकशाही दोघीही प्राचीन अथेन्समध्ये एकत्र नांदत होत्या!! निवडणूकीपासून ते व्यापारावरील सरकारी नियंत्रणापर्यंत आपल्याला आज ज्ञात असणाऱ्या अनेक व्यवस्था अथेन्सी लोकशाहीचा भाग होत्या. पालिका, कार्यालये, समित्या, नोकरशहा, लोकप्रतिनिधी, समर्थक, विरोधक,मतदार आणि मतदान अशा सर्व संस्था अथेन्सवासीयांनी उभ्या केल्या होत्या. सैनिकी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रौढ अथेन्सवासीयांनाच फक्त मतदानाचा अधिकार होता. मतदानाप्रमाणेच आपली मते मांडणे, सभा घेणे, भाषणे , वादविवाद करणे हा अथेन्सवासीयांचा आवडता कार्यक्रम होता. वादविवादासाठी प्रसिद्ध असलेले सॉक्रेटीस (Socrates), डेमॉस्थेनस (Demosthenes) सारखे तत्वज्ञ याच परंपरेतले. अशा भाषण, वादाविवाद, चर्चा, सभा, परिषदा इ. शहरांच्या मध्यवर्ती भागात होत असत. प्रशासक, नगरपालिका सदस्य, प्रतिष्ठित नागरीक, या सगळ्यांचा राबता असणारे हे ठिकाण म्हणजे अगोरा (Agora) किंवा आजच्या भाषेत शहराचा मध्यवर्ती भाग (मराठीत City Centre, किंवा CBD!). प्राचीन ग्रीकांच्या प्रत्येक शहरात असे ठिकाण असे. बाजारपेठ, सरकारी कार्यालये, सांस्कृतीक कार्यक्रम आणि गप्पांचे अड्डे यांचे एकत्रित संकुल म्हणजे अगोरा (Agora). अथेन्सच्या मधोमध ॲक्रॉप्लिसच्या दिशेने जाणाऱ्या प्राचीन अथेन्स महामार्गाच्या (Panathenaic Highway) दोन्ही बाजूला हे अगोरा (Agora) बांधले गेले होते. ज्याचे अवशेष आजही पहायला मिळतात. काय काय आहे या संकुलात…
निरनिराळ्या काळात बांधलेली नाट्यगृहे, चर्चेसाठीची आवारे, सरकारी कचेऱ्या, दुकाने, कारंजी, बागा, मंदिरे इतकेच काय पण एक टांकसाळ (mint) सुद्धा होती. ग्रीकांच्या व्यवस्था किती प्रगल्भ होत्या हे दर्शवणारी काही विशेष कार्यालये होती. जसे – दुकानांत तोलल्या जाणाऱ्या मालासाठीची प्रमाणीत वजने बाळगणारे पालिकेचे कार्यालय होते. येथे येऊन ग्राहक आपल्याला दिलेला माल योग्य वजनाचा असल्याची खात्री करू शकत असे. नगरपरीषदेच्या सदस्यांना बसण्यासाठी एक कार्यालय होते. त्यात राहण्याचीही सोय होती. नगरपरिषदेचा किमान एकतरी सदस्य येथे आळीपाळीने वास्तव्यास असे. जेणेकरून जनतेचा प्रतिनिधी नागरीकांना कोणत्याही वेळी उपलब्ध होई. याच ठिकाणावरून अथेन्सपासूनची भौगोलिक अंतरे प्रमाणीत केली जात असत. उदा. अथेन्सपासून स्पार्टापर्यंतचे (sparta) अंतर मोजायचे तर त्याचा आरंभबिंदू (zero point) अगोरा (Agora) मानला जाई!! ग्रीकांची लोकशाही किती विचारपूर्वक उभी केलेली होती हे या व्यवस्थेवरून स्पष्ट होते.
पारंपारीक अथेन्स-उत्सवाच्या (Athenian Festivals) दिवशी काढलेली मिरवणूक याच परीसरातील मार्गावरून पार्थेनॉनला जात असे. दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी बांधलेल्या नलिका, चढण असलेल्या मार्गाला आधार, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी असे संपूर्ण नियोजित बांधकाम अगोरात आढळते. शेकडो वर्षे हा भाग त्याचं महत्व टिकवून होता आणि सतत नवनवीन बांधकामं स्वीकारत होता. लहान मुलांच्या खेळणी, स्वयंपाकाची उपकरणे, विक्रीला आलेल्या वस्तू, विनिमयाच्या नाण्यांपासून ते पार कालमापक घटीका आणि मतदान/निवडणूक यंत्रापर्यंत अनेक वस्तू येथे केलेल्या प्रदीर्घ उत्खननात सापडल्या आहेत. वादविवाद, चर्चा, परिषदा, नाटके, जत्रा तसेच दुकाने, शासनयंत्रणेचा आणि विद्वानांचा राबता यामुळे अगोराचे संकुल हे सतत गजबजलेले सांस्कृतिक केंद्रच होते.
प्राचीन अगोराच्या मधोमध – पॅन अथेनियन महामार्ग – अथेन्स उत्सवाची मिरवणूक याच मार्गावरून वर टेकडीवर दिसणाऱ्या पार्थेनॉनला जाई. काही एकरात पसरलेला अगोराचा उत्थनन केलेला परीसर. उजव्या बाजूला बाजारपेठेची पुनर्बांधणी केलेली इमारतप्राचीन बांधकामांचे अवशेषअगोराच्या मध्यभागात इ.स.पू. १०० मध्ये बांधलेल्या बाजारपेठ आणि फेरफटका मारायच्या जागेचे अवशेष(थॉलस) Tholos या गोलाकार इमारतीचे अवशेष. नगरसेवक येथेच वास्तव्यास असतमोहेंजोदारोची आठवण करून देणारी, पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या कडेने बांधलेली गटारे. विहीर – पाणी ओढून काढल्याने उमटलेले दोरीच्या खुणाही दिसत आहेत. इ.स.पू १५ मध्ये रोमन सिनेटर अग्रिपा (Agrippa) ने बांधून दिलेल्या थिएटरच्या बांधकामातील एक स्तंभ (कोरिंथिअन शैली)अगोराच्या मध्यभागी, बारा ऑलिंपिअन देवतांचे पुतळे स्थापन केलेले मंदिर. इ.स.पू. ५२२ग्रीक कोरीव कामाच उत्कृष्ट नमुना दाखवणारा ऑलिंपिअन देव. हाच अथेन्सचा भौगोलिक मध्य (Zero Point) मानला जाई(ग्रीकांचा लोहार, आग आणि तंत्रशाळेचा देव) – (Hephaestus) हेफेस्टसचे देऊळ. अथेन्समधील प्राचीन मंदिरातील सगळ्यात जास्त सुस्थितीत राहिलेले मंदिर. इ.स.पू. ४४९भिंतींवरील शिल्पे ग्रीक शैलीतील मंदिरांची खास रचनामंदिराचा अंतर्भागातील रचनाभिंतींच्याच संगमरवरी दगडातील खास कोरीव कला… सेन्टॉर (Centaur) (आपले हॅरी पॉटरवाले!)मंदिराच्या आतील स्तंभ आणि गर्भगृहाचा भागगर्भगृह, हा भाग इ.स. ७ व्या शतकापासून बराच काळ चर्च म्हणून वापरला गेला.
जवळपास १२ स्तरांपर्यंत केलेल्या उत्खननातून अथेन्सच्या अगोराच्या परीसरात अनेक अवशेष, वास्तू आणि वस्तू सापडल्या. साधारण इ.स.पू. ३००० पासून ते इ.स. १५०० पर्यंतच्या अशा अनेक वस्तूंचे एक संग्रहालय अगोराच्याच परिसरात उभे आहे. पर्गमॉन (Pergamon) चा राजा अटोलास (Attalos) याने इ.स.पू. १५० च्या आसपास बांधून दिलेल्या बाजारपेठेच्या जागेची पुनर्बांधणी करून त्यात हे म्युझियम (museum) वसवले आहे. जवळपास १५०० च्या आसपास वस्तुंचा संग्रह येथे आहे त्यातील केवळ प्राचीन अथेन्सच्या मोजक्या खुणा पाहू…
Kleroterion क्लॅरोटेरिअन – प्राचीन ग्रीक निवडणूक यंत्र. ॲरिस्टॉटलच्या Constitution of the Athenians या ग्रंथात वर्णन केलेल्या निवडणूकीच्या यंत्राचे उत्खननात मिळालेले अवशेष. संपूर्ण उभ्या आयताकृती यंत्रात जवळपास ५०० खाचा आणि एक नलिका असून त्याला लाकडी चौकटही असे. एकाच वेळी ५०० इच्छुक सदस्य किंवा नागरीकांमधून न्याय, अर्थ, प्रशासन वगैरे निरनिराळ्या समित्यांचे अधिकारी निष्पक्षपणे निवडण्याचे काम या यंत्रातून केले जाई. बाजूला ठेवलेल्या चकत्यांवर इच्छुक आपले नाव लिहून चकती यंत्रात खोचून ठेवत असे. नंतर फासे किंवा दोन रंगातील गोळे वापरून यंत्रातील चकत्या यादृच्छिकपणे (Randomly) निवडल्या जात असत.वेळ मोजण्यासाठी वापरले जाणारे प्राचीन घटिकापात्र. इ.स.पू. ५वे शतक वरच्या पात्रातील सगळं पाणी खाल्यच्या पात्रात पडलं की वेळ संपली. चित्रातील पात्रात ६.४ ली पाणी मावते म्हणजे साधारण सहा मिनिटांसाठी वापरत असत. शेवटचा थेंब पडला की वक्त्याची किंवा भाषणाची वेळ संपली…स्वयंपाकाची प्राचीन साधने (आधुनिक साधने तरी काय वेगळी असतात म्हणा!) इ.स.पू. ६वे शतकप्राचीन भट्टी (Barbecue ?!) आणि ट्रे. इ.स.पू. ६वे शतक धातूच्या सळ्या आधुनिक आहेत, उपयोग समजण्यासाठी हे काय आहे हे सांगण्याची गरज नाही, बाजूचे चित्र पुरेसे बोलके आहे… इ.स.पू ६५०
अथेन्समध्ये (Athens) वावरताना ग्रीसला पाश्चात्यांच्या संस्कृतीचा पाया का म्हणतात, याची सतत प्रचीती येते. धर्म, शिक्षण, कला आणि क्रीडा या संस्कृतीच्या प्रत्येक अंगाची पाश्चात्य घडण ग्रीकांच्या भूमीत झाली हे पटवणारी अनेक प्राचीन स्मारकं अथेन्समध्येच पहायला मिळतात. प्राचीन मंदिरं, उत्कृष्ट वाचनालयं, प्लेटोच्या – ॲरिस्टॉटलच्या शाळा, स्टेडियम आणि नाट्यगृहं याचा आढावा घेता घेता दिवसच्या दिवस जातात. त्यातलीच काही खास ठिकाणं..
पोसायडनचे देऊळ – केप सुन्यो (Temple of Poseidon, Cape Sounion)
अथेन्सवासीयांनी बांधलेले एक नितांत सुंदर मंदिर म्हणजे पोसायडनचे केप सुन्यो येथील मंदिर. पोसायडन (Poseidon) हा ग्रीकांचा समुद्र, वादळ, भूकंप आणि घोड्यांचा देव. आपल्या शंकरासारखं याच्याही हातात त्रिशुळ असतं. अथेन्सच्या ईशान्येला साधाराण ७० किमी अंतरावर समुद्रकिनाऱ्यावरील एका टेकाडावर हे मंदिर उभे आहे. पर्शियन आक्रमकांनी इ.स.पू. ४८० मध्ये उध्वस्त केलेल्या प्राचीन (इ.स.पू ४८० त प्राचीन!!) मंदिराच्या जागेवरच इ.स.पू ४४० मध्ये अथेन्सवासीयांनी नवीन मंदिर बांधले. तेही पर्शियनांचा पराभव करूनच! आपल्या विजयाची खूण म्हणून शत्रुची लुटलेली एक नौकाही तिथेच समुद्रात उभी केली. २० फुट उंच आणि पायाशी ३ फुट रुंद अशा जवळपास ४० (अर्थात संगमरवरी) डोरीक स्तंभांवर उभे असलेले आणि पोसायडनची भव्य मूर्ती मिरवणारे हे मंदिर समुद्राच्या पार्श्वभूमीवर अतिशय खुलुन दिसते. आशियातून ग्रीसच्या आसपास समुद्रातून प्रवास करणाऱ्यांच्या नजरेस हे मंदिर पडल्याचे उल्लेख आहेत. या मंदिराच्या सौंदर्याचा मोह इतका मोठा आहे की लॉर्ड बायरन (Lord Byron) सारख्या थोर कवीने येथील वास्तव्यात या मंदिराच्या अवशेषातील एका स्तंभावर चक्क आपलं नाव कोरलंय!! ही जागा प्राचीन इतिहासाचा ठेवा आहे हे माहिती असूनही!!! (असले उद्योग करणारे फक्त भारतातच असतात असे नाही हो, या क्षेत्रातही इंग्लंडनेच बाजी मारली आहे!!)
केप सुन्योचा रम्य परिसरपोसायडनचे मंदिर… शब्दातीत…केप सुन्योच्या पार्श्वभूमीवर मंदिराचा देखावा.मंदिराच्या स्तंभाची रचनासंगमरवरी कोरीव दगडांचे स्तंभखुणेच्या लाल रेषेचा भाग झूम केल्यास उचापती बायरनचे नाव दिसेल!!!
झ्यूसचं देऊळ (Temple of Olympian Zeus) काहीएक हेतू मनात ठेऊन एखादा उपक्रम उभा करावा आणि तो चांगला हेतू बाजूला राहून भलत्याच कारणासाठी त्या उपक्रमाला प्रसिद्धी मिळाली तर कसे वाटेल? उदाहरणार्थ, आपली बिर्ला मंदिरंच घ्या, चांगल्या हेतूने बांधलेली देवाची देवळं. पण लोकांनी त्याला आतल्या देवाच्या नावाऐवजी बांधणाऱ्या बिर्लांचं नाव दिलं. पर्यटकांना काय सांगणार बिर्ला मंदिर म्हणजे काय?! आता कोणाची मूर्ती असायला हवी?.. दुर्दैव त्या बिर्लांचं आणि देवाचंही!
असंच, म्हणजे खरंतर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून उभं करण्यात आलेलं पण रखडलेल्या बांधकामासाठी जास्त प्रसिद्ध झालेले दुर्दैवी मंदिर म्हणजे झ्यूसचे मंदिर. गंमतीचा भाग म्हणजे झ्यूस (Zeus) हा ग्रीकांचा सगळ्यात मोठा देव, त्याच्याच मंदिराची अशी अवस्था व्हावी हे ही नवलच.
इ.स.पू ६ व्या शतकात अथेनीयन आक्रमकांनी या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली, तेव्हा अथेन्सच्या मधोमध उभे असणारे हे मंदिर त्याकाळचे सगळ्यात भव्य मंदिर असणार होते. पण मंदिराचे बांधकाम रखडत राहिले आणि पूर्ण कधी झाले तर फक्त ६३८ वर्षांनी!! इ.स. २ ऱ्या शतकात रोमन काळात सम्राट हेड्रियनने हे काम पूर्ण करवले. जवळपास १०४ स्तंभांवार उभे असलेले हे मंदिर तेव्हाही त्याकाळातले सगळ्यात मोठेच होते. पार्थेनॉनच्या (Parthenon) जवळपास दुप्पट.. (वाचा – पार्थेनॉन). पण बांधून झाल्यावरही या मंदिराचे दुर्दैव संपले नाही. काही वर्षातच अथेन्सवरच्या आक्रमणात टोळ्यांनी मंदिराची लूट आणि नासधूस केली. त्यानंतर एखाद्या पडक्या वाड्याप्रमाणे हे मंदिर ओस पडलं. मंदिराचे कोरीव पाषाण लोकांनी इतर बांधकामासाठी वापरले. रोमच्या ज्युपीटरच्या मंदिरासाठी वापरलेले काही दगड येथूनच नेले गेले. १४ व्या शतकापर्यंत मंदिराचे केवळ २१ स्तंभ शिल्लक राहिले होते. नंतर ऑटोमन तुर्कांनी (Ottomon) त्यातले काही स्तंभ स्फोटके वापरून पाडले आणि मशिदींच्या बांधकामात वापरले. आज दिसतात ते एकूण १६ स्तंभ ज्यातला एक स्तंभ १८५२ सालच्या वादळात कोसळला. तो पडलेल्या स्थितीतच जतन करून ठेवण्यात आला आहे. याही अवस्थेत मंदिराचे आवार आणि स्तंभ पाहून त्याच्या भव्यतेची कल्पना येते.
१०४ स्तंभापैकी आज उभ्या असलेले १५ स्तंभही मंदिराच्या भव्य आकाराची कल्पना करून द्यायला पुरेसे आहेत.वादळात कोसळलेला १६ वा स्तंभ. यातही संगमरवारच्या कोरीव दगडांची रास किती कौशल्याने रचली जात असे हे कळून येते. मंदिराच्या दर्शनी भागातील आणि गर्भगृहातील स्तंभ
पॅन-अथेनिक स्टेडियम (Panathenaic Stadium) – (आधुनिक ऑलिंपिकचे जन्मस्थान)
इ.स.पू. ३३० मध्ये लायकर्गसने (Lycurgus) हे स्टेडियम अथेन्सवासीयांसाठी बांधले ऑलिंपिया किंवा डेल्फीप्रमाणे येथेही निरनिराळ्या खेळांच्या स्पर्धा होत असत. इ.स. ११४ मध्ये हिरोडस ॲट्टीकस (Herodes Atticus) याने त्याची संपूर्ण संगमरवरात पुनर्बांधणी केली. त्या काळात (आणि आजही) ५०,००० लोक मावतील इतकी या स्टेडियमची क्षमता आहे. जे झ्यूसच्या देवळाच्याही नशीबात नव्हतं ते या स्टेडियमच्या नशीबात होतं. ख्रिश्चन धर्माचा वाढत्या प्रभावाच्या काळात ओस पडलेलं हे स्टेडियम पुन्हा समोर आलं ते थेट १८६९ च्या उत्खननानंतर… त्या काळात ऑलिंपिक चे आधुनिक पुनरुज्जीवन करण्याचे घाटत होते. ६ एप्रिल १८९६ रोजी याच स्टेडियमवर आधुनिक ऑलिंपिकचे (Modern Olympic) उद्घाटन झाले. स्टेडियमला पुन्हा आपल्या गतकाळाचं वैभव प्राप्त झालं. ऑलिंपिकची परंपरा, जी आज इतकी मोठी चळवळ बनलीय त्याची सुरुवात याच स्टेडियमवर झाली. आजही ज्या देशात ऑलिंपिक होणार आहे त्या देशाच्या प्रतिनिधींकडे ऑलिंपिक ज्योत हस्तांतरण करण्याचा सोहळा याच स्टेडियमवर होतो.
आजही वापरात असणाऱ्या २००० वर्ष जुन्या स्टेडियमचा विहंगम देखावास्टेडियमच्या ट्रॅकजवळ उभे केलेले Herm – दोन्ही बाजूला चेहरा कोरलेले शिल्प, हे उत्खननात सापडले. पहिल्या रांगेत खास आसनव्यवस्था..खेळाडूंनी प्रवेश करण्याचा बोगदा, हा व्हीआयपी आसनांच्या बरोबर समोरच्या बाजूस आहे. या पात्रातून घेतलेली ज्योत समारंभपूर्वक ऑलिंपिक भरवणाऱ्या देशाला दिली जाते.
ॲरीस्टॉटलची शाळा ( Lyceum of Aristotle) अथेन्ससारख्या अतिप्राचीन नगरांची एक अडचण असते. आजच्या नागरीकांनी वसाहतीसाठी जिथे कुठे खोदकाम करायला सुरुवात करावी तिथे त्यांच्याच थोर पूर्वजांच्या खुणा सापडायला लागतात. साध्या बस स्टॉपपासून ते सरकारी इमारतींपर्यंत सगळ्याच बांधकामांच्या जागी काही ना काही सापडलंय आणि आजही सापडतंय. मग नव्या बांधकामाची पुनर्रचना करायची आणि जुनं अभिमानाने जतन करायचं ही ग्रीकांची पद्धत. अख्खं अथेन्स नगर असं प्राचीन अवशेषांच्या खुणा आंगाखांद्यावरच नाही तर पायाखालीही बाळगून जगतं! त्यातलंच एक उदाहरण म्हणजे ॲरीस्टॉटलची शाळा ( Lyceum of Aristotle). अथेन्सच्या मॉडर्न आर्ट म्युझियमसाठी (Modern Art Museum) पाया खोदताना तेथे अवशेष सापडायला लागले ते ॲरीस्टॉटलच्या शाळेचे आहेत लक्षात आलं. खरंतर या जागी कोणतेही बांधकामाचे अवशेष आता उरलेले नाहीत पण प्राचीन संदर्भावरून आणि जागेच्या अभ्यासावरुन जिमखाना आणि ॲरिस्टॉटलची शाळा येथे होती याची खात्री पटली आणि मग उत्खनन करून ॲरिस्टॉटलच्या शाळेची जागा जतन केली गेली. म्युझियम अर्थातच थोड्या दुरवर बांधलं. ही घटना आहे १९९६ सालची. अलेक्झांडर आशियात युद्ध करत असताना ॲरिस्टॉटल (Aristotle) येथे शिकवत होता. फेरफटका मारत विद्यार्थ्यांच्या घोळक्याला शिकवण्याची ॲरिस्टॉटलची पद्धत येथलीच. असे म्हणतात की अलेक्झांडर स्वारीसाठी ज्या ज्या भागात जात असे त्या त्या भागातील वनस्पती आणि प्राण्यांचे नमुने आपल्या या गुरुंच्या अभ्यासासाठी पाठवत असे. त्याचे एक संग्रहालय पण या शाळेत बांधले होते. सुसज्ज अशी तालीम आणि जिमखानाही (Gym) येथे होता. आज येथे केवळ जमीनीचा तुकडाच दिसतो पण याच भूमीवर विख्यात ॲरिस्टॉटल (Aristotle) शिकवत असल्याने त्याचे महत्व (माझ्यासाठी तरी) एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. (जाता हे ही सांगायला हरकत नाही, की अथेन्स राज्याचा नागरीक नसल्याने ॲरिस्टॉटलला अथेन्समध्ये जागा विकत घ्यायला परवानगी नव्हती!! अलेक्झांडर मरण पावल्यानंतर मॅसेडोनीयन्स (Macedonians) बरोबर ॲरिस्टॉटलाही अथेन्स सोडावे लागले.)
उत्खननात गवसलेले विद्यापीठ ॲरिस्टॉटलच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी
प्लेटोची अकॅडमी (Platonic Academy)
प्लेटोची जगप्रसिद्ध अकॅडमी जेथे होती ती जागाच आता केवळ उरली आहे. त्यावर छोटेखानी दृक् श्राव्य म्युझियम आणि प्लेटोचा पुतळा इतकेच काय ते उभे आहे. दुर्दैवाने अथेन्समध्ये या ठिकाणाची माहिती खुप कमी लोकांना आहे. टॅक्सीवाल्यालाही गूगल मॅप्स वापरून तिकडे न्यावे लागले.
म्युझियमचेे प्रवेशद्वारप्लेटोचा पुतळा आणि संस्करण
हेड्रियनचे वाचनालय (Hadrian’s Library)
सम्राट हेड्रियनने (Hadrian) रोमन फोरमच्या धर्तीवर बांधलेली एक अप्रतिम इमारत. काळ इ.स. १३२. भव्य पण शांत आणि धीरगंभीर अशी ही जागा. वाचनालय, पपायरस (Papyrus) म्हणजे जुन्या कागदाच्या पुस्तकांची दालने, चर्चेसाठीची छोटी सभागृहे आणि एक सुंदर तरण तलाव (मराठीत स्विमिंग पूल!). आजकालच्या लायब्ररी आणि अभ्यासिकांच्या एकत्रित रचनेला मिळती जुळती अशी ही रचना ग्रीकांच्या अभ्यासू वृत्तीची झलक दाखवते. नंतर अर्थातच इमारतीची पडझड झाली, काही भागात चर्च बांधली गेली. आज केवळ प्रवेशद्वाराचा भाग आणि आतल्या काही बांधकामाचे अवशेष शिल्लक आहेत. त्यातूनही या जुन्या अभ्यासवास्तूच्या थोरवीचा अंदाज येतो.
भव्य प्रवेशद्वारलायब्ररीचा आराखडा डावीकडे… इमारतीच्या आकाराची कल्पना बाहेरील खांबांची उंची पाहून येते.लायब्ररीच्या आतील रचना दर्शवणारे अवशेषजमिनीवर संगमरवराचे तुकडे वापरून केलेले सुंदर नक्षीकाम (Mosaic)
ज्ञान, कला आणि क्रीडा… प्राचीन ग्रीकांची संस्कृती सर्वार्थाने समृद्ध होती. आजच्याही ग्रीसला आपल्या दैदिप्यमान परंपरेचा अभिमान तर आहेच तसेच या संस्कृतीच्या खुणा जतन करुन ठेवण्यात आणि अभ्यासण्यातही तितकाच रस आहे. डॉ. अल्किस राफ्टीस (Alkis Raftis)1 हा असाच एक अवलिया. इन्व्हेस्टमेंट बॅंकिंगमधील उच्च पगाराची नोकरी सोडून उर्वरीत आयुष्य ग्रीक नृत्यकलेला समर्पित करणारा संशोधक. त्याच्या अकस्मात भेटीमुळे, अथेन्समध्ये केवळ नृत्यकलेसाठी कार्य करणारी कंपनी आणि त्यांचे याच कार्यासाठी वाहिलेले थिएटर पाहण्याचा योग आला. डोरा स्ट्राटेऊ ग्रीक डान्स थिएटर (Dora Stratou Greek Dance Theatre) ही संस्था ॲक्रॉप्लिसच्या (Acropolis) परिसरातच ग्रीक अर्वाचीन लोकनृत्ये जतन करण्याचे आणि प्रसार करण्याचे कार्य करते. (हो… जुन्या लोककलांना तुच्छ/त्याज्य मानण्याची पद्धत अजून ग्रीक लोकात आलेले नाहीत!!) अनेक स्थानिक आणि जगभर पसरलेले ग्रीक तसेच इतरही लोक येथे येऊन, राहून पारंपारीक ग्रीक नृत्ये शिकतात. अशा विद्यार्थ्यांचे एक वर्कशॉप नुकतेच संपले होते. डॉ. राफ्टीस यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे देण्याचा आणि अर्थातच नृत्याचा कार्यक्रम पहायचा योग डॉ. राफ्टीस यांच्याच निमंत्रणामुळे आला. विविध नृत्यप्रकार, बहुरंगी पोषाख आणि बहुढंगी वाद्यवृंद आणि त्यावर थिरकणारा नवीन पण उत्साही नर्तकांचा संच. जवळपास प्रत्येकजण वेगवेगळ्या देशातून केवळ आपली पारंपारीक नृत्ये शिकण्यासाठी आणि जतन करण्यासाठी आला होता. नृत्याबरोबरच त्यांच्या या भावनेलाही दाद द्यावीशी वाटली…..
कार्यक्रमाची सुरुवात…. वादक आणि गायक प्रवेश करताना. पार्श्वभूमीवर घनदाट झाडी..संपूर्ण वाद्यवृंद आणि गायिका
वाद्यमेळ आणि कर्णमधूर लोकसंगीतपारंपारिक रंगीबेरंगी पोषाखातील नर्तकपारंपारिक रंगीबेरंगी पोषाखातील नर्तक
समूहनृत्यसमूह नृत्यात साखळीतील अग्रणी नर्तक वेगवेगळ्या करामती करतो…
मुख्य नर्तकाचा असाच एक मनोहर नृत्याविष्कार
लाकडी चमचे वाजवत केलेले नृत्य
एक युगल समूहनृत्यकार्यक्रम संपल्यावरची आपलेपणाची छोटेखानी मैफल… वेश बदलून कलाकारही यात सामील होतात…..
भव्य नाट्यगृहे, उत्कृष्ट वाचनालये, सुसज्ज क्रीडांगणे, विद्यापीठांची मालिका, उत्तुंग देवस्थाने आणि त्यांच्याही आश्रयाने होणारा नाट्य, नृत्य आणि खेळांचा आविष्कार… संस्कृतीचे स्तंभ असणारी ही संकुले. ग्रीकांच्या अष्टपैलुत्वाची झलक या वेगवेगळ्या संकुलांमधून येते. एकट्या अथेन्समध्ये (Athens) अशा अनेक वास्तूंची रचना हजारो वर्षांच्या काळात होत राहिली. यावरूनच विविध अंगानी आयुष्याचा आनंद घेण्याची ग्रीकांची चतुरस्त्र वृत्ती प्रकट होत राहते. ज्या उमेदीने ग्रीकांनी हे सगळे जतन करून ठेवले आहे त्याला खरोखर तोड नाही. उत्खननात सापडलेला खापराचा तुकडा असो की मोठ्या इमारतीचे अवशेष, त्याची संगतवार जपणूक ग्रीकांनी केलीय ती त्याच जागी किंवा अथेन्सभर पसरलेल्या म्युझियम्समध्ये. अशाच काही संग्रहालयांची आणि वास्तूंची सफर पुढील भागात…
तळटीप- 1. Dr. Alkis Raftis – https://www.instagram.com/alkis.raftis/, #alkisraftis