वेद म्हटलं की प्रत्येक भारतीयाचे हात जोडले जातात. यातले श्रद्धेने जितके असतात तितकेच अज्ञानाने! वेद हे काहीतरी अतिशय अवघड आणि गुंतागुंतीचे प्रकरण असून त्याच्या वाटेला न जाणे बरे! ते काम विद्वान, अभ्यासक आणि पुरोहीत इत्यादिंवर सोपवून त्यानी सांगितले की हात जोडायचे इतकंच काम अनेकजण करतात. एकदा वेदात सांगितलंय म्हटलं की झालं मग कोणी त्याच्या वाटेला जाणार नाही!!वेद खरोखर इतके अगम्य आणि अवघड आहेत का? एकाच वेळी अत्युच्च दर्जाचे तत्त्वज्ञान सांगणारे आणि साहित्याचा अजोड नमुना असणारे वेदांसारखे दुसरे ग्रंथ सापडणे खरोखर कठीण आहे. केवळ अगम्य धार्मिक पुस्तके इतके तोकडे स्वरूप वेदांचे नक्की नाही.अत्यंत सुंदर प्रार्थना, रसाळ कथा, मजेदार वर्णने, कलाकुसर, तत्कालीन तंत्रज्ञान, चालीरिती, समारंभ आणि अर्थातच गहन तत्त्वज्ञान हे सर्वकाही वेदात आढळते. या लेखमालेत सर्वप्रथम वेद आणि वेदवाङ्मयाची प्राथमिक माहिती करून देणे हा उद्देश आहे.
ओळख वेदांची
चांदोबातसुद्धा नसतील इतक्या रंजक कथा ऋग्वेदात आहेत. निसर्गाशी, देवतांशी आणि आपापसातल्या संवादाच्या, सण समारंभांच्या, भक्तीच्या, युद्धांच्या, धर्माच्या अगदी लग्न, शर्यती, राजकारण, शाब्दिक कोट्यांपासून ते थेट देवतांच्या उत्पत्तीपर्यंत अनेक गोष्टी वेदात आढळतात.
ओळख वेदांची – भाग २
मनोरंजनासह आयुष्याचा आनंद घेत तत्त्वज्ञान शिकवणारा यजुर्वेद. अगम्य तर नाहीच किंबहूना चतुरस्त्र जीवनशैली शिकवणा-या आजच्या युगातील कोणत्याही पुस्तकावर मात करणारा पुस्तकरुपी जीवनवेदच आहे
ओळख वेदांची – भाग ३
देवळात गायलेल्या आरतीपासून ते मैफिलीत गायलेल्या रागापर्यंत भारतीय संगीताचे मूळ सामगायनातच आहे. गायन हा देवाच्या उपासनेचा सर्वोत्तम मार्ग आहे त्यामुळे संगीताला नादब्रह्म मानले जाते. वेदातील आकाराने लहान भावंड असूनही भारतीय संगीत आणि उपासना पद्धतीचा पाया सामवेदाने उभा केला. म्हणूनच तर श्रीकृष्णासह जवळपास प्रत्येक थोर ऋषीमुनींनी सामवेदाला भारतीय ज्ञानवाङ्मयात उच्च स्थान दिलेले आहे.
ओळख वेदांची – भाग ४
अशा प्रकारे अनेक रंजक, गुढ आणि अभ्यासपूर्ण विषयांचे उगमस्थान असणारा अथर्ववेद हा तत्कालिन समाजाचे चित्रण आणि आजच्या समाजाला मार्गदर्शन असे दोन्ही हेतू साध्य करतो.
ओळख वेदांची – भाग ५
वेदवाङ्मय समृद्ध करून त्याचा दैनंदिन जीवनाशी संबंध ब्राह्मण ग्रंथ जोडतात. उपनिषदांसारखे तत्त्वचिंतन करणारे ग्रंथही ब्राह्मण ग्रंथाचाच भाग म्हणून विकसित होतात.
ओळख वेदांची – भाग ६
डोळ्यासमोर असणाऱ्या दृष्यमान जगाच्या पलिकडे जाऊन तर्क आणि बुद्धीसामर्थ्याने ही सृष्टी समजून घेण्याचे ज्ञान म्हणजेच उपनिषदे.
ओळख वेदांची – भाग ७
केवळ भारतीयच नव्हे तर तत्वज्ञानाच्या एकूणच इतिहासात उपनिषदांचे स्थान अजोड आहे. दारा शिकोह ने स्वतःच म्हटल्याप्रमाणे ‘नव्याने प्रचलित होणा-या अनेक धर्मांची शिकवण ही केवळ उपनिषदातील तत्वांचेच पुनःप्रक्षेपण आहे.’ पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा सर्वच विद्वानांनी उपनिषदांचा गौरव केला आहे. यात केवळ तत्त्वज्ञच नव्हे तर कवि, लेखक, शास्त्रज्ञांसह सर्व धर्मीय अभ्यासकांचा समावेश होतो. उपनिषदांचा हा प्रचंड प्रभाव १७९६ च्या पहिल्या पाश्चात्य भाषांतरानंतर केवळ गेल्या २०० वर्षात पडलाय. यावरून हजारो वर्षांपूर्वी हे तत्त्वज्ञान सोप्या आणि सहज मांडणाऱ्या भारतीय ऋषींच्या बुद्धीसामर्थ्याची कल्पना येते.
ओळख वेदांची – भाग ८
यज्ञकर्म आणि तत्वज्ञान याची सांगड घालून वेद आणि उत्तरवेदकालीन समाजाला संतुलित धर्म कसा असतो याचा वस्तुपाठ आरण्यके घालून देतात. म्हणूनच ज्ञानकर्मसमुच्चय या उपनिषदांच्या प्रमुख विषयाची बीजे आरण्यकात आढळतात असे म्हटले जाते.
वेदवाङ्मयाची थोरवी
धर्मग्रंथ म्हणून नुसते अंधश्रद्धेने कवटाळून बसणे हे जसे चुकीचे आहे तसेच ते जुने कालबाह्य वाङ्मय म्हणून झिडकारणेही तितकेच चुकीचे आहे. कोणत्याही टोकाच्या भूमिकेपेक्षा विवेकी वृत्तीने चतुरस्त्र अभ्यास करून वेद आणि वैदिक साहित्यातून मिळणारे सर्वांगीण ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शितल जी मला संस्कृत शिकायचे आहे, कुठून सुरुवात करू ?
LikeLike
प्रशांत, संस्कृत भाषा शिकणे अवघड नाही. भाषेची आणि व्याकरणाची प्राथमिक ओळख होण्यासाठी इयत्ता ८वी, ९वी ची क्रमिक पुस्तके वाचायला सुरुवात करा. प्रत्येक धडा, त्याचे भाषांतर आणि व्याकरण असा पद्धतशीर आणि ससंदर्भ अभ्यास त्यातून होईल. एकदा शब्दार्थ आणि व्याकरणाची साधारण ओळख झाली की वाचनाच्या सरावाने भाषा अवगत करणे कठीण नाही. परंतु हे काम अतिशय चिकाटीने करावे लागते. काही मदत लागल्यास https://sheetaluwach.com/registration/ या लिंकवरून माझ्याशी संपर्क साधा.
LikeLike