समग्र वेदवाङ्मयाचा परिचय करुन घेण्याच्या उपक्रमात आपण सर्वप्रथम चारही वेदांची ओळख करून घेतली. वेदांनंतर अर्थातच क्रमाने ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदांचा समावेश होतो. यातील ब्राह्मण ग्रंथांचा परिचय करून घेऊयात. (जातीने ब्राह्मण असण्याचा आणि या ग्रंथांच्या नावाचा आपापसात काही संबंध नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे.)
वेदवाङ्मयातील वेद आणि उपनिषदे ही सर्वसाधारणपणे आपल्या बोलण्यात किंवा ऐकण्यात येतात. त्यांचा थोडाफार परिचयही आपल्याला असतो. परंतु ब्राह्मण ग्रंथ हे त्यामानाने किंचित कमी परिचयाचे आणि ऐकण्यातही कमी येतात. याचे मुख्य कारण अर्थातच त्यांचे विषय आहेत. वेदांचे महत्त्व अर्थातच वेगळे सांगायला नको. उपनिषदे ही भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया म्हणून प्रसिद्ध आहेतच. ब्राह्मण ग्रंथांचा विषय हा प्रामुख्याने यज्ञ आणि यज्ञप्रक्रिया यांचे विस्तृत विवेचन हा असल्याने याज्ञिकी जाणणाऱ्या, आचरणाऱ्या किंवा अभ्यासणाऱ्या लोकांव्यतिरिक्त या ग्रंथांबद्दल माहित असणारे लोक खुप कमी आढळतात. गंमतीचा भाग असा की आपल्या नैमित्तिक पूजाकर्मात किंवा निरनिराळ्या व्रतांच्या संदर्भातील पूजनांमधील अनेक विधींचे मूळ हे ब्राह्मण ग्रंथांतील यज्ञविधीच्या विवेचनात आढळते पण ते आपल्या ध्यानात येत नाही. आपण आधीच्या लेखात पाहिल्याप्रमाणे रोजच्या पठणातील अऩेक मंत्र जसे वेदातील आहेत हे आपल्याला ठाऊक नसते तसेच.
उत्तरवेदकालामध्ये यज्ञसंस्थेचे महत्त्व वाढत गेले. यज्ञसंस्थेतील प्रत्येक अंगाची सांगोपांग माहिती असणे हे अतिशय आवश्यक कार्यच झाले. यज्ञ, यज्ञातील मंत्र, त्यांची पठण पद्धती, त्या अनुषंगाने केले जाणारे विधी, विधी करण्यामागची भूमिका, त्यासाठी लागणारी साधने, विधी सिद्ध करण्याचे योग्य तंत्र यासाठी अचूक संहितांची आवश्यकता भासत गेली. ब्राह्मण ग्रंथांची रचना याच कारणाने करण्यात आली असे मानले जाते.
काही तासांच्या छोट्या यज्ञापासून ते १५ किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचे यज्ञ हे – आयोजन, शेकडो व्यक्ती, वस्तू आणि विधी यांचा बारीक सारीक गोष्टींचा विचार करून अत्यंत नियोजनबद्ध पार पाडले जात असत.कार्यक्रमाच्या रुपरेषेपासून ते उपकराणांच्या मांडणीपर्यंत प्रत्येक चरण (step) पूर्वनियोजित असे. यावरून कार्यक्रम व्यवस्थापन (Event Management) सारख्या आजकालीन शास्त्रातील तत्कालीन लोकांनी केलेली प्रगती ठळकपणे दिसून येते.
व्याख्या किंवा अर्थ –
ब्राह्मण शब्दाची उत्पत्ती किंवा अर्थ काय असावा यावर अनेक विद्वानांची भाष्ये आहेत. ब्रह्म या शब्दाच्या दोन प्रचलित अर्थांचा संदर्भ येथे घेतला जातो. ब्रह्म म्हणजे मंत्र किंवा यज्ञ. शतपथ ब्राह्मणात ‘ब्रह्म वै मन्त्रः’ असा उल्लेख आहे. याचा अर्थ वैदिक मंत्रांचे (ब्रह्म) विवेचन करतात ते ब्राह्मण असा होतो.
विषय –
आधी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण ग्रंथांमध्ये प्रामुख्याने यज्ञ आणि यज्ञ प्रयोगाची माहिती येते. याचे अर्थातच दोन भाग पडतात. एक विधी आणि दुसरा अर्थवाद. साधारणतः विधी म्हणजेच यज्ञाच्या सविस्तर प्रयोगाची माहिती तर अर्थवाद म्हणजे प्रयोगाचा उद्देश, त्यातील तंत्र, मंत्र आणि कृतीचे समर्थन करणारा युक्तिवाद किंवा माहिती. ब्राह्मण ग्रंथांचा विषय आणि त्याची विभागणी कशी आहे यावर शाबरभाष्यात स्पष्टिकरण मिळते. ऋषी शबरांच्या मते ब्राह्मणग्रंथात यज्ञविधीचा विस्तार आणि विचार दहा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून केला जातो.
हेतु, निर्वचन, निंदा, प्रशंसा, संशय, विधि, परकृति, पुराकल्प, व्यवधारणकल्पना आणि उपमान.
यातील प्रमुख संकल्पना सहा आहेत त्यांची थोडक्यात माहिती पाहू
१. विधि – कोणताही यज्ञ कधी आणि कसा करावा तसेच त्याची साधने काय असावीत, यज्ञातील प्रमुख पुरोहित कोण असावेत इ. चा विचार येथे केला जाई. तैत्तिरिय संहितेत औदुंबराची फांदी वापरण्याचा उल्लेख आहे. यजमानेन सम्मिता औदुम्बरी भवति।१ यात ही फांदी यजमानाच्या मापाची असावी असे म्हटले आहे. यावरून यज्ञसाधनांचा किती खोलवर विचार केला जाई हे समजून येते.
२. विनियोग – विनियोग म्हणजे अर्थातच उपयोग किंवा वापर. कोणत्या मंत्राच्या विनियोगाने (वापराने/उच्चारणाने) कोणता उद्देश सफल होतो याचा विचार म्हणजे विनियोग. उदाहरणार्थ प्राण्यांच्या रोगनिवारणार्थ ‘सः नः पवस्व शं गवे’२ हा मंत्र म्हटला जावा.
३. हेतु – हेतु म्हणजे अर्थातच कारण. एखादा विशिष्ट विधी करण्यासाठीचे कारण किंवा एखादे उपकरण किंवा मंत्र वापरण्यामागचा हेतू काय आहे याचा येथे विचार केला जाई.
४. अर्थवाद – अर्थवाद म्हणजे यज्ञविधीसाठी उपयुक्त गोष्टींची प्रशंसा आणि निषिद्ध किंवा त्याज्य गोष्टींची निंदा करणे. उदाहरणार्थ यज्ञात उडीद हे निषिद्ध मानले जातात म्हणून तैत्तिरिय संहितेत ‘अमेध्या वै माषा’ असा उल्लेख आहे.
५. निरुक्ति – निरुक्त या यास्काचार्यांच्या प्रसिद्ध ग्रंथाच्या संदर्भातीलच अर्थ येथे येतो. निरुक्ति म्हणजे शब्दांची व्याख्या. यज्ञादि कर्माच्या संदर्भात वापरल्या जाणा-या शब्दांचा अर्थ स्पष्ट करणे म्हणजे निरुक्ति. ब्राह्मण ग्रंथात याचा खुप खोलवर विचार झाल्याचे दिसते.
६. आख्यान – आख्यान म्हणजे खरंतर गोष्ट किंवा कथा. येथेही यज्ञविधीचा विषय रंजक पद्धतीने मांडणे म्हणजे आख्यान होय. यात यज्ञातील विधी त्यामागील उद्देश यांच्या संदर्भातील कथा येतात. अशाप्रकारे बोध करून देणाऱ्या अनेक सुंदर कथांचा संग्रह ब्राह्मण ग्रंथातून आपल्याला पहायला मिळतो. उदाहरणार्थ – स्वार्थ आणि निःस्वार्थ प्रवृत्तीवर भाष्य करणारी शुनःशेपाची कथा (ऐतरेय ब्राह्मण), अपात्री विद्यादान न करण्यासंदर्भातील दध्यंग अथर्वणाची कथा इ.
या विवेचनावरून हे ध्यानात येईल की भारतीय संस्कृतीचे प्रत्येक अंग मग ते तत्त्वज्ञान असो की यज्ञासारखे कर्मकांड, अतिशय विचारपूर्वक व सर्वसमावेशक पद्धतीने मांडले जात असे. यज्ञविधीत वापरल्या जाणा-या साध्या पळी पासून ते यज्ञाच्या अंतिम टप्प्यात केल्या जाणा-या अवभृथस्नानापर्यंत प्रत्येक विधी, मंत्र, साहित्य, वस्तू आणि व्यक्तीच्या संदर्भात या १० वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून मगच त्याचा स्वीकार केला जात असे. यावरून तत्कालीन ऋषीमुनींची जीवनदृष्टी किती सखोल होती हे लक्षात येते. आजही आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा संकल्पापासून ते क्षमापनापर्यंतचे सर्व विधी करतो त्या प्रत्येक कृती, कर्म आणि मंत्रामागचा विचार हा ब्राह्मण ग्रंथांची देणगी आहे.
ब्राह्मण ग्रंथांची विभागणी –
प्रत्येक वेदात आणि वेदशाखेत ब्राह्मण ग्रंथांची रचना करण्यात आली. आजही विभागशः जवळपास १८ ब्राह्मण ग्रंथ उपलब्ध आहेत ते असे
ऋग्वेद – ऐतरेय ब्राह्मण आणि शांखायन/कौषीतकि ब्राह्मण
शुक्लयजुर्वेद – शतपथ ब्राह्मण
कृष्णयजुर्वेद – तैत्तिरिय ब्राह्मण
सामवेद – सामवेदाची ताण्ड्य, षड्विंश, सामविधान, आर्षेय, देवताध्याय, उपनिषद, संहितोपनिषद, वंश, जैमिनीय अशी एकूण ९ ब्राह्मणे मानतात.
अथर्ववेद – गोपथ ब्राह्मण
वेदातील मंत्रांचे अर्थ, यज्ञातील विधी आणि प्रयोग याबरोबरच ब्राह्मण ग्रंथात भारतीय उपखंडाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचीही माहिती मिळते. विशेषतः प्राचीन तसेच उत्तरवेदकालीन इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये ऋगवेदाइतकेच शतपथ ब्राह्मण प्रसिद्ध आहे. आकाराने सर्वात मोठ्या अशा या ब्राह्मणात यज्ञविधी तर आहेतच पण त्याबरोबरच इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा कुरु, पांचाल, कोसल, विदेह या राज्यांचा तसेच जनक, दुष्यन्त, जनमेजय इ. राजांचेही उल्लेख आढळतात. एकूण काय तर वेदवाङ्मय समृद्ध करून त्याचा दैनंदिन जीवनाशी संबंध ब्राह्मण ग्रंथ जोडतात. उपनिषदांसारखे तत्त्वचिंतन करणारे ग्रंथही ब्राह्मण ग्रंथाचाच भाग म्हणून विकसित होतात. त्या उपनिषदांबद्दल पुढच्या भागात.
तळटिप
१ तैत्तिरिय संहिता ६/२/१०/३
२ ताण्ड्य ब्राह्मण
मागील भाग – ओळख वेदांची – अथर्ववेद पुढील भाग – ओळख वेदांची – उपनिषद (क्रमशः)
Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach