अथेन्स – भाग २ – गुढरम्य डेल्फी

डेल्फी (Delphi)…….

जग जिंकण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा ग्रीसचा नवा तरुण सत्ताधीश अलेक्झांडर (Alexander the Great) डेल्फीच्या (Delphi) देवळाच्या दारात उभा होता. डेल्फीच्या महान पुजारीणीने (ओरॅकल) (Oracle) आपले भविष्य वर्तवावे या इच्छेने. जग जिंकण्यासाठी अपोलोच्या (Apollo) देवळाचा कौल त्याला आवश्यक वाटत होता. ओरॅकलच्या केवळ एका शब्दावर त्याचा आणि त्याच्या सैन्याचा जोम कैकपटीने वाढला असता!! आजवर कित्येक महान सम्राटांनी या देवळाच्या पायरीवर आपली डोकी टेकवली होती. डेल्फीच्या शब्दाचं महत्व आणि सामर्थ्य साऱ्या जगानं अनुभवलं होतं. अलेक्झांडरला याची जाणीव होती म्हणून तर तो या देवळाच्या चौथऱ्यावर तिष्ठत होता.
“नाही……!!ओरॅकल (Oracle) आज होणार नाही………….!!!!” आतून निरोप आला…
वर्षातून केवळ काही दिवसच भविष्यवाणी वर्तवण्याची परंपरा होती ओरॅकलची. त्यातही देवाचा कौल घेणं न घेणं, भविष्य वर्तवणं न वर्तवणं हा पुजारीणींच्या लहरीचा भाग होता. दारात कोण उभा आहे याची फिकीर करण्याची त्यांची पद्धत नव्हती. गेली ५०० वर्ष लायकर्गससारख्या (Lycurgus) थोर राजापासून ते अगदी अलेक्झांडरच्या वडलांपर्यंत सगळ्यांनी याच लहरी स्वभावापुढे मान तुकवून भविष्यं ऐकली होती.
नाही……….??
असं काही ऐकायची अलेक्झांडरलाही सवय नव्हती… त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ओरॅकलइतकाच तोही लहरी आणि माथेफिरू होता. जग जिंकायचं तर सत्ता गाजवण्याची उर्मी किती प्रबळ असावी लागते हे त्याने दाखवूनच दिलं. केसाला धरून पुजारीणीला फरफटत मंदिराच्या आवारात त्याने आणलं आणि बळजबरीने भविष्य तिच्या तोंडून बाहेर पडलं……

“ἀνίκητος εἶ ὦ παῖ. (बाळा तू अजिंक्य आहेस)”

ओरॅकलने बळजबरीने वर्तवलेलं भविष्यही खरं ठरलं आणि अलेक्झांडर, ‘द ग्रेट’ झाला.
अशा खिळवून ठेवणाऱ्या अनेक कथा दंतकथांचं डेल्फी (Delphi)…….. भविष्याचा वेध घेणारं. गुढ, दुर्बोध, लहरी आणि तरीही आकर्षक…… ग्रीकांच्या अपोलोचं देवस्थान! अपोलो (Apollo) हा ग्रीकांचा कला, ज्ञान, सूर्यप्रकाश, भविष्यकथन, पशुपक्ष्यांचे कळप आणि थवे यांचा देव.
अथेन्सपासून साधारण २०० कि.मी. अंतरावर असणाऱ्या पार्नासस ( Mount Parnassus) डोंगरांवर डेल्फीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या परिसराबद्दल ग्रीक पुराणांत अनेक गोष्टी आहेत. देवांचा राजा झ्यूसने पृथ्वीचा मध्यभाग शोधण्यासाठी दोन गरुड सोडले. पृथ्वीच्या दोन टोकांकडून एकाच वेळी एकाच वेगाने जाणारे हे गरुड ज्या ठिकाणी एकमेकांला भेटतील तो पृथ्वीचा मध्य किंवा नाभी असे त्याने ठरवले. ते गरुड डेल्फीच्या डोंगरावर समोरासमोर आले. म्हणूनच हा भाग संपुर्ण जगाचा मध्यभाग (नाभी) आहे असे म्हटले गेले. अशी एक कथा आहे. या भागाच्या संरक्षणासाठी असलेल्या सापावरून (Python) या भागाला पायथो (Pytho) असे नाव पडले आणि म्हणून डेल्फीच्या प्रसिद्ध पुजारीणीला पिथिया (Pythia) म्हणतात. अशीही एक कथा आहे.
इ.स.पू ८ व्या शतकापासून डेल्फी (Deplhi) आणि ओरॅकलच्या (Oracle) अस्तीत्वाबद्दल उल्लेख सापडतात. म्हणजे अलेक्झांडरच्याही आधी जवळपास ५०० वर्ष….!! आणि तेव्हापासून अनेक थोर ग्रीक, रोमन,इतर सम्राट, राज्यकर्ते आणि प्रशासक डेल्फीला आपले भविष्य जाणून घेण्यासाठी आले. यात प्राचीन स्पार्टाच्या लायकर्ग (Lycurgus) पासून ते पार रोमच्या निरोपर्यंत (फिडलवाला!) बऱ्यावाईट अनेक सम्राटांचा समावेश होतो. साहित्यिकांनाही डेल्फीचं आकर्षण होतंच. असिक्लिस (Aeschylus), ॲरिस्टॉटलपासून (Aristotle) ते पार शेक्सपिअरपर्यंत (Shakeshpeare) अनेकांनी आपल्या ग्रंथात, नाटकात डेल्फीचा उल्लेख केलाय. थेमिस्टोक्लेआ (Themistoclea) ही पुजारीण तर आपल्या प्रमेयवाल्या पायथॅगोरसची (Pythagoras) गुरु होती असे म्हणतात. सॉक्रेटिस (Socrates) हा जगातला सगळ्यात बुद्धीमान/शहाणा व्यक्ती असल्याची आकाशवाणीही अशाच एका पुजारीणीने केली होती. प्राचीन जगतात इतकी प्रसिद्ध असणारी दुसरी जागा क्वचितच आढळते.
डेल्फीला येऊन ओरॅकल ऐकणे हा एक पारंपारीक सोहळाच होता. जातकांची क्रमवारी लावणे, त्यांना प्रश्न नीट तयार करून देणे, त्यांना शुचिर्भूत करणे, ओरॅकलसमोर वागायचे तसेच नजराणा अर्पण करण्याचे शिष्टाचार शिकवणे, ओरॅकलच्या काव्यात्म भविष्याचा अर्थ लावणे ही सर्व कामे करणारी व्यवस्थाच अस्तीत्त्वात होती. भेटी आणि नजरण्यांच्या राशीच्या राशी डेल्फीत येऊन पडायच्या. अथेनियन्स, स्पार्टन्स, आर्केडियन्स, मॅसेडोनियन्स – प्रत्येक ग्रीक राज्यांमध्ये डेल्फीवर आपली छाप पाडण्याची स्पर्धाच असायची. भव्य पुतळे, सभागृहं, स्तंभ अशा अनेक डोळे दिपवणाऱ्या भेटींचा वर्षाव डेल्फीवर व्हायचा. युद्धातले विजय, नवीन राज्यारोहण, डेल्फीतील खेळांच्या स्पर्धा, अपोलोचा उत्सव अशा प्रत्येक प्रसंगाची आठवण म्हणून देवस्थानाला भेटी दिल्या जात असत. एका राज्याने मोठी भेट दिली की दुसऱ्याने त्यापेक्षा काहीतरी आगळेवेगळे करायचा प्रयत्न केलाच म्हणून समजा. डेल्फीचा डोंगर चढताना प्रत्येक वळणावर असलेले खजिन्यांची (treasury) बांधकामं देवस्थान किती संपन्न होते हे दर्शवते. इतकं करूनही आपलं भविष्य ऐकण्याची संधी मिळण्याची खात्री नाही ती नाहीच!!!
प्रत्यक्ष भविष्यकथनाच्या दिवशी व्रतस्थ पिथिया देवळातल्या एका विशिष्ट गाभाऱ्यात एका तिपईवर बसून काव्यात्म वाणीत भविष्य सांगत असे. असं म्हणतात की या गाभाऱ्यात एक विवर होते ज्यातील वाफ किंवा धुरामुळे ओरॅकल संमोहीत होत असे आणि तिच्याकरवी देव अपोलो स्वतः भविष्य वर्तवत असे. त्या काव्याचा अर्थ लावण्याचे काम तिच्या इतर सहकाऱ्यांकडे असे.
मंदिराच्या दर्शनी भागात ही वाक्यं कोरलेली होती……
γνῶθι σεαυτόν – Know Thyself – स्वतःला ओळखा
Μηδὲν ἄγαν – Nothing in Excess – (गरजेपेक्षा) जास्त नाही.
डेल्फी (Delphi) मोठं का होतं याची खूण ही वाक्यं पटवून देतात. महत्वाकांक्षेपायी डेल्फीच्या पायरीवर येणाऱ्या प्रत्येक लहानथोर व्यक्तीला त्याच्या क्षणिक अस्तीत्वाची जाणीव करुन देणारी वाक्यं………..
डेल्फी केवळ गुढ भविष्य सांगणारी जादूची गुहा नव्हती तर ज्ञानाचा प्रकाश देणारी अपोलोची शाळा होती. डेल्फीच्या पुजारीणी जितक्या लहरी तितक्याच बुद्धीमान आणि द्रष्ट्या होत्या. निर्भिडपणे सत्य सांगणाऱ्या होत्या. स्वतःच्या आईला ठार मारणाऱ्या रोमन सम्राट नीरोला ‘तुझं येणं मंदिराला लांच्छनास्पद आहे, चालता हो’ असं स्पष्टपणे सांगण्याची धमक त्यांच्या अंगी होती. निरोने त्याच पुजारीणीला जिवंत जाळण्याची शिक्षा दिली. याची पुरेपुर जाणीव असूनही मंदिराच्या लौकीकाला बाधा येईल असं वर्तन त्यांनी केलं नाही.

Panoramic View - Temple of Apollo - Delphi
डोंगरमाथ्यावर वसलेले हेच ते अपोलोचे मंदीर आणि जगाचा मध्यभाग (नाभी)
Stoa of the Athenians Delphi
पायथ्याशी आलेल्या जातकांचा पहिला स्टॉप…
Stoa of the Athenians - Delphi
पायथ्याशी असणाऱ्या याच खोल्यांमध्ये (Chambers) जातकांची वर्गवारी, प्राथमिक शिक्षण आणि प्रश्न लिहून देणाऱ्या पाट्या (Tablet!!) इ. कार्ये होत. व्हीआयपी भक्तांची रांग निराळी असे!!!!
Sacred way leading to the temple of Apollo - Delphi
मुख्य देवळाकडे जाणारी चढण, याच्या प्रत्येक वळणावर एक किंवा अधिक खजिने (Treasury) बांधलेले असत. बांधणाऱ्या राज्याच्या किंवा राजाच्या नावाने हे खजिने ओळखले जात.
Sacred way leading to the temple of Apollo - Delphi
भविष्याचा प्राचीन मार्ग चढताना आधुनिक भाविक. वळणावर खजिन्याचे बांधकाम दिसतंय
Treasury of Athenians - Delphi
ही अथेन्सवासीयांच्या खजिन्याची इमारत (Treasury of Athenians)
Inscription - Temple of Apollo - Delphi
असे अनेक शिलालेख वाटेत उभे असत. डेल्फीची वारी केलेल्यांची, तत्कालीन व्यवस्थेची माहीती यातून मिळते. काही शिलालेखात गुलामांंना स्वातंत्र्य दिल्याचेही उल्लेख आहेत, अगदी गुलामांच्या आणि मालकांच्या नावासकट
Serpent Column - Temple of Apollo - Delphi
सर्पस्तंभ – २७ फूट उंचीचा, ३ सापांच्या वेटोळ्याचा विजयस्तंभ. प्लॅटीया (Plataea) येथल्या पर्शियन युद्धातील विजयाची खूण. या स्तंभावर युद्धात मदत केलेल्या गावांची नावे कोरली आहेत. मूळ स्तंभ रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनने उखडून नेला जो आताच्या इस्तंबूलमध्ये आहे. स्तंभाच्या टोकावर ३ सापांनी उचलून धरलेले त्रिकोणी पात्र होते. पिथिया बसायला वापरत असे त्या प्रकारचे
Front View - Temple of Apollo - Main Chamber - Delphi
अपोलोच्या मंदिराचा दर्शनी भाग!! यात्रेचा अंतिम टप्पा….
Temple of Apollo - Delphi
भवितव्याचं गुढ उकलण्याचं प्रवेशद्वार….. यावरूनच मुख्य मंदिरात प्रवेश केला जाई… अनेक थोर सम्राट, विद्वान आणि प्रशासकांना खुणावणारी वाट.
Pillar, Temple of Apollo - Delphi
मुख्य मंदिराचे स्तंभ. याच परीसरात डेल्फीची प्रसिद्ध वाक्यं कोरलेली होती..
View from the chasm side, Temple of Apollo - Delphi
गर्भगृहाच्या बाजूने प्रवेशद्वाराचे दृष्य….
The ancient theatre at Delphi
देवस्थान म्हटलं की उत्सव आलाच…. नाट्य, नृत्य आणि खेळही आलेच…. डेल्फीचं थिएटर
The ancient theatre at Delphi
पाच हजार प्रेक्षकांना सामावून घेणारं थिएटर, येथे बसल्यावर पुढील मंदिराचं आणि डोंगराचंही दर्शन होतं.
Temple of Apollo - with the hills at the background - Delphi
डेल्फीच्या थिएटरपासून दिसणारा संपूर्ण मंदिराचा विहंगम देखावा…
Omphalos - Archaeological Museum Delphi
डेल्फीतल्या उत्खननात सापडलेले पृथ्वीच्या मध्यभागाचे – नाभीचे संगमरवरी शिल्प. काळ अज्ञात
Dancers of Delphi - Archaeological Museum Delphi
असं मानतात की नाभीचं शिल्प या अप्सरांच्या डोक्यावर उभं असावं काळ इ.स.पु. ३७३
Torso of the chryselephantine sculpture of Apollo and Artemis - Archaeological Museum Delphi
उत्खननात मिळालेले अपोलो आणि अर्टेमिस (चंद्र, शिकार इ. ची ग्रीक देवता) यांच्या पुतळ्यांचे अलंकृत अवशेष
Statue of a Bull - Archaeological Museum Delphi
बैलाच्या चांदीच्या पुतळ्याचे अवशेष……
Charioteer of Delphi - Archaeological Museum Delphi
सहा फूट उंचीचा, रथांची शर्यत जिंकलेल्या सारथ्याचा ब्रॉन्झचा पुतळा. इ.स.पू. ४७५ डेल्फीतल्या उत्खननाच्या पहिल्या काही प्रयत्नातले यश… त्याच्या डोळ्याचा, दातांचा आणि शिरपेचाचा भाग चांदीचा आहे. त्याचा रथ आणि घोडे मिळाले नाहीत पण लगाम आणि त्याची पकड कलेचा अप्रतिम नमुना आहेत.
 Sphinx of the Naxians - Archaeological Museum Delphi
स्फिंक्स – हो, आपली इजिप्तवालीच …. पण स्त्रीचं मुख, पक्षाचे उभे पंख आणि सिंहाचे धड…. डेल्फीच्या देवळाच्या जवळ उभ्या केलेल्या १० मीटर उंच स्तंभावर हे २.२ मीटर उंचीचं शिल्प उभं होतं. इ.स.पू ५६० … पायाखाली स्तंभाचा अवशिष्ट भाग….
Statue of a philosopher - Plutarch or Plato - Archaeological Museum Delphi
प्लुटार्क की प्लेटो!? इ.स.पू. १९०
Model of the Apollo Sanctuary - Archaeological Museum Delphi
डेल्फीच्या देवस्थानाचा संपूर्ण आराखडा (दोन भागात मिळून) . पायथा आणि मुख्य मंदिर लाल रेघेने अधोरेखित केले आहे. मार्गावरील लहान लहान चौकोनी इमारती या खजिन्याच्या (Treasury) आहेत.

मागील भाग – ॲक्रॉप्लिस – अथेन्स पुढील भाग – संस्कृतीचे स्तंभ – अथेन्स

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact