अपि क्रियार्थं सुलभं समित्कुशं जलान्यपि स्नानविधिक्षमाणि ते।
अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।।
महादेवाच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करणाऱ्या पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मचाऱ्याच्या वेषात भगवान शंकर प्रकटतात. पार्वतीच्या घोर तपस्येकडे पाहून म्हणतात की ‘तपःसाधनेसाठी आवश्यक अशी सामग्री, स्नानासाठी पाणी इ. सोयी उपलब्ध आहेत ना? कारण तू हे जाणतेस की शरीर हे धर्म (येथे ध्येय) साध्य करण्याचे प्रथम साधन आहे.’
कालिदासाच्या कुमारसंभवातील पाचव्या सर्गात खरेतर मजेदार संवाद आहेत. परंतु नांदीचा हा श्लोक मात्र एक गंभीर बोधवाक्य बनून गेला! त्याचे कारण या श्लोकाचा अंतिम चरण
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।।
शरीर हे धर्मसाधनेचे आद्य साधन आहे….
योगारूढ व्यक्ती आपल्या इंद्रियांवर पर्यायाने मनावर ताबा मिळवते त्याची सुरुवात ही अर्थातच ते मन ज्या शरीरात वास करते ते शरीर संयमन करुन होते.
भगवंत सांगतात की अर्जुना हा योग साध्य करण्यासाठी संयमनाची आवश्यकता आहे. जे व्यक्तीच्या सर्व शारीर क्रियांमध्ये प्रथम हवे. कारण
नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः।
न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन।
हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला तसेच अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपणाऱ्या तसेच सदा जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही.
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा।
दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार-विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा-जागरण करणाऱ्याला साध्य होतो
‘अति सर्वत्र वर्जयेत्’ असे एक संस्कृत वचन आहे. श्रीकृष्णालाही हेच सांगायचे आहे. शरीर संयमन करणे म्हणजे शारिरीक क्रियातील अती ला दूर सारणे. आहार-अनाहार, निद्रा-जागरण यासारख्या क्रिया संतुलित केल्याने शरीर निरोगी आणि उत्साही राहते. असे शरीरच मग मन एकाग्र करण्याची साधना करू शकते.
अशा प्रकारे भौतिक आणि अधिभौतिकाचा सुंदर मेळ घालण्याचे कार्य श्रीकृष्ण करतो.
अनेकदा असा प्रश्न पडतो की मानवासहित निसर्गातील प्रत्येक घटक हा ईश्वराचीच देणगी असेल तर मग त्याचा अव्हेर करून संन्यासी बनण्यात काय हशील आहे? श्रीकृष्णाच्या लेखी योगी यातील कशाचाच अव्हेर करत नाही. रंग, रस, गंध,नाद या सर्व माध्यमातून जीवनातला आनंद योगीही लुटतोच परंतु त्याचे मन या कशाचाही आहारी जात नाही, अतिरेक करत नाही. बाह्य सृष्टीतील सुख आणि त्याचप्रमाणे दुःखही नश्वर आहे याची त्याला जाणीव असते. परमात्मप्राप्तीचा आनंदच केवळ शाश्वत असा आनंद आहे हे तो जाणतो आणि त्यासाठी जागरुकतेने प्रयत्न करतो.
भारतीय तत्वज्ञानाच्या बाबत असा एक गैरसमज पसरलेला दिसतो की त्यात केवळ संन्यस्त वृत्तीचा अंगिकार केलेला आहे. भौतिक किंवा गोचर सृष्टी म्हणजे माया आणि तिचा त्याग करणे म्हणजेच खरा संन्यासी होणे असा टोकाचा अर्थ घेतला जातो. भारत म्हणजे संन्यासी, साधू, अन्नपाणी त्यागून तपश्चर्या करणे, अस्थिपंजर झालेले योगी….. असेच चित्र रंगवले जाते.
श्रीकृष्णाचे मत या विचाराला छेद देते. वेदकालापासून प्रत्येक तत्वज्ञाचा दृष्टिकोन हा सृष्टीचे अंतर्बाह्य स्वरूप जाणण्याचा होता. ब्रह्म जाणणे केवळ अंगाला राख फासून साधू झाल्यानेच प्राप्त होते असे त्यांनी कधीच मानले नाही. आनंद देणा-या प्रत्येक तत्त्वाला त्यांनी जाणलं आणि त्याला ब्रह्म मानलं. जसं नादब्रह्म, अन्नब्रह्म, अक्षरब्रह्म… गायनाचार्य पलुस्करांच्या एक गोष्टीचा संदर्भ येथे पुन्हा देण्याचा मोह आवरत नाही.
एकदा गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर जंगलातून प्रवास करत असताना एका देवळात विश्रांतीसाठी थांबतात. तेव्हा तेथे एक संन्यासी येतो. संध्याकाळची वेळ असते. आपल्याच विश्वात रममाण झालेला तो संन्यासी गायला लागतो. पलुस्करांना असं जाणवतं की जिकडंतिकडं केवळ ते गाणंच भरून राहीलंय. सगळं जग मंत्रमुग्ध होउन केवळ ते गायन ऐकतंय आणि देउळ लख्ख प्रकाशाने भरून गेलंय. काही काळानंतर ते जेव्हा भानावर येतात तेव्हा गाणं संपलेलं असतं आणि तो प्रकाशही निवलेला असतो. त्या संन्यासाला पलुस्कर विचारतात की “असा अलौकीक प्रभाव पाडणारं गाणं मला शिकवाल का? मी यासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी संन्यासीसुद्धा व्हायला तयार आहे.” तो संन्यासी उत्तरतो – “संन्यासी झाल्यामुळे असं गाणं येणार नाही. पण असं गाणं आल्यावर तू आपसुकच संन्यासी झाला असशील!!”
येथे नादब्रह्माची उपासना करणारा गायक आणि परब्रह्माची उपासना करणारा संन्यासी दोघेही योगीच मानले गेले आहेत. कलाकारालाही आणि संन्यास्तालाही पथ्ये पाळून आणि अति टाळून योगी होता येते हेच श्रीकृष्णाला येथे सांगायचे आहे. एकाला साधनेसाठी शरीरनियमन आवश्यक आहे तर दुसऱ्याला रियाजासाठी! भगवत्प्राप्तीसाठी प्रत्येकाने संन्यास घेऊन जंगलाचाच मार्ग स्वीकारायला हवा इतका एकांगी विचार मांडण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली नाही.
हे अर्थातच सोपे नाही याची श्रीकृष्णाला जाण आहेच. अर्जुनही ती बोलून दाखवतो. सगळेच जण गायनाचार्य किंवा सिद्धयोगी होत नाहीत. प्रयत्न करुनही अनेकजण मनावर विजय मिळवू शकत नाहीत मग असे लोक मार्गातून विचलित होतात. त्यांना पापी समजायचे का?
अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥
कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि।।
जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे; परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योगसिद्धीला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो?भगवत्प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला पुरुष छिन्न-विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत?
अर्थातच नाही. आत्मोद्धारासाठी कर्म करणारी व्यक्ती अधोगतीला प्राप्त होत नाही. जरी तो आपल्या उद्दीष्ट्यापर्यंत पोचू शकला नाही तरी केलेल्या श्रेष्ठ कर्माच्या फलस्वरुप त्याला उत्तम गती प्राप्त होते आणि कालांतराने तो आपले ध्येय साध्य करतो असे श्रीकृष्ण सांगतो. कर्मसिद्धांताच्या तर्कानेही पाहिले तर हे पटावे की उत्तम कर्माची फलेही उत्तमच असतात. मग ते कर्म जर भगवत्प्राप्तीच्या उद्देशाने केले तर त्याचे फलस्वरूप सकाम कर्म करणारा भक्तही कालांतराने भगवंताशी एकरुप होतोच.
प्रत्येक मनुष्य मग तो सामान्य गृहस्थ असो, असामान्य कलाकार किंवा व्रतस्थ योगी आत्मसंयमनाच्या मार्गाने कोणीही भगवंताशी एकरुप होऊ शकतो हेच श्रीकृष्ण अर्जुनाला पटवून देतो. जीवनाचा आस्वाद घेत प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाणे हे खरे ज्ञान आहे कारण सर्वाभूती परमेश्वर आहेच म्हणूनच मग त्याचे स्वरुप कलेतून, तपस्येतून, कर्मातून किंवा निव्वळ भक्तीतूनही जाणता येईल. आवश्यक आहे तो त्या त्या मार्गावरील साधकाचा आत्मसंयम…….
मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ९ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग
Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach