जपानच्या मुक्कामात मला जो जो जपानी भेटला त्याला भारताविषयी खूप प्रेम आहे असे मला दिसले. त्यांना ही त्यांच्या बुद्धाची पवित्र भूमी वाटते. भारतीय दार्शनिकांनी त्यांना अध्यात्माचा कणा दिला याची त्यांच्या विद्वानांना जाण आहे. दूरच्या रस्त्याने आम्हांला आणल्याबद्दल स्वतःलाच दंड म्हणून आमच्याकडून निम्मे पैसे घेणारा जपामी टॅक्सीवाला त्याच्या देशाविषयी आमच्या मनात आदर निर्माण करून गेला. हॉटेलात, दुकाना, विद्यापीठात, थिएटरात, जिथे जिथे आम्ही गेलो तिथे तिथे आम्हांला जिव्हाळाच मिळाला. हे लोक फार लाघवी. आग्नेय आशियातले प्रमुख देश मी पाहिले पण जपानने अंतःकरणात घर केले. अनेकांना जपानी माणूस हा कोड्यासारखा वाटतो. पाश्चात्य उद्योगतज्ज्ञांनी तर जपानी कारखानदारांची आणि व्यापा-यांची नालस्ती करणारी पुस्तके लिहिली आहेत. जपानी स्वभाव अगम्य आहे असे ते म्हणतात. अगम्य सारा मानवी स्वभावच आहे. ज्या जपानी हॉटेलात आम्ही आमच्या खोल्यांना कधी कुलपे लावली नाहीत, टेबलावर पैसे विसरुन गेलो तर खोली झाडायला येणा-या बाईने एका सुरेख पुरचुंडीत ते बांधून ठेवले, त्याच जपानात गुन्हेगारी आहे. शेवटी मनुष्यस्वभावचे उत्तर सांगणरे गणित कोणी मांडावे ?
ह्यात टोकियोमध्ये एका बसमधून आम्ही प्रेक्षणीय स्थळांची सहल करीत होतो. माझ्या शेजारी एक अमेरिकन प्रवासी बसला होता. पन्नाशीच्या घरातला होता. इतका खप्पड अमेरिकन पुरुष त्यापूर्वी आणि त्यानंतर मी पाहिला नाही. आमच्याच दाई- इची हॉटेलात उतरला होता. दुपारी दोन अडीचला आम्ही नगरपर्यटनाला निघालो, त्या वेळी तो दाबून प्यालेला होता. अर्धोन्मीलित डोळ्यांनी तो टोकियोत काय पाहणार होता ते कळेना. शुद्धीबेशुद्धीच्या सीमारेषेवर होता. बोलत होता चालत होता. पण अडखळत. मला म्हणाला “तू इंडीयन आहेस की अफ्रिकन ?” “इंडीयन!” सगळा राग गिळत मी म्हणालो. आता माझा वर्ण गोरा नाही हे कबूल, म्हणून काय इतके खंडांतर व्हायला नको होते. ‘पियेला आदमी है’ म्हणून सोडून दिले. पण त्याने त्या अवस्थेत गप्पा सुरू केल्या. तो काय बोलत होता ते मला मी शुद्धीवर असूनही नीट कळत नव्हते, आम्ही निरनिराळी स्थळे पाहून येत होतो. हा मात्र बसमध्येच बसून राही. तासाभराने डोक्याला गार वाराबिरा लागल्यामुळे की काय कोण जाणे, स्वारी नीट शुद्धीवर आली.
“किती दिवस आहात आपण जपानात ?” त्याने सवाल केला.
“झाला एक महिना.”
“खूप जपानी भेटले का ?”
“भेटले थोडे.”
“नशीबवान आहात ! मी आठ दिवस इथे आहे. मला कुणीच भेटयला, बोलायला मिळाला नाही. मला ह्या जपानी बागा आणि देवळे पाहण्यात गोडी नाही. त्या फिल्ममध्येही पाहू शकलो असतो मी. मला जपानी माणसे भेटायला हवी आहेत. मला जपानी कुटुंबात जायला हवे आहे. मी गेले वर्षभर जगाचा प्रवास करतोय.”
आस्थेवाईक श्रोता मिळाल्याबरोबर त्याने आपले आत्मचरित्र सांगायला सुरुवात केली. अमेरिकेत त्याचा कोककोला, सोडा, लेमन यांसारखी पेये बाटल्यांत भरायचा व्यापार आहे. लाखो डॉलर्सची कमाई आहे. पण हा पैशाला विटून निघाला होता. पण धंदाच असा की पैसा ह्याच्यामागे धावत होता. आपण आयुष्यभर फक्त पैसेच केले याची खंत वाटून तो सुखाच्या शोधात निघाला होता. चर्चवरचा त्याचा विश्वास उडाला होता. त्याने कुठल्याशा चर्चला हजारो डॉलर्स दिले. त्या पाद्र्यांनी ह्याच्या इच्छेविरुद्ध चर्चवर नवा कळस बांधला.
“स्वाईन्स! डुक्कर लेकाचे! इमारती बांधणे एवढाच उद्योग करतात. माणसं माणसाला भेटत नाहीत. मी त्यांना पैसे दिले आणि सांगितले, माणसामाणसांच्या भेटी एकमेकांच्या घरात करा. सभा नको. समारंभ नको. आपल्या गावच्या माणसाला दुस-या घरी पाहुणा म्हणून पाठवा. त्याचा खर्च द्या. ख्रिस्ताचं नाव घ्यायला एवढ्या इमारती कशाला ? पण प्रत्येकाला पब्लिसिटी हवी. ख्रिस्ताच्या घराचा कळस उंच करून त्याची देखील पब्लिसिटी करतात. स्वाइन्स! (हा त्याचा लाडका शब्द होता.) मला जपानी माणूस भेटत नाही. माणूस भेटत नाही, आय वॉंट टु मीट मेन! मेन इन फ्लेश न् ब्लड यू सी!” पुढे वाचा!