Bhagvad Gita Chapter 1

अंतरंग – भगवद्गीता – भाग ९

राका व त्याची पत्नी बाका हे दोघे एका झोपडीत देवाची भक्ती करत आनंदाने रहात असतात. एके दिवशी रानात लाकडे गोळा करण्यासाठी फिरत असता राकाला एक सोन्याचे कंकण दिसते. राका विचार करतो की ‘आपण स्वतः तर मोहापासून दूर आहोत परंतु आपल्या बायकोला कदाचित याचा मोह होईल आणि ती आपल्याला हे कंकण घेण्याचा आग्रह करेल. तेव्हा आपण या कंकणावर माती टाकू यात म्हणजे मग तिला हे दिसणारच नाही आणि पुढचा प्रसंगही टळेल’. तो कंकणावर माती टाकू लागतो तेव्हा बाका तेथे येते आणि विचारते “हे तू काय करत आहेस?” राका सांगतो, “तूला मोह होऊ नये म्हणून सोन्याच्या कंकणावर माती टाकतो आहे.” बाका आश्चर्याने म्हणते, “म्हणजे तुला अजूनही सोने आणि माती वेगवेगळे दिसते तर!!”…..

अनासक्त कर्म करीत योग (ज्ञान) प्राप्त करणे म्हणजे कर्मयोग याची आता अर्जुनाला कल्पना आलेली आहे. तरीही त्याचे पुरेसे समाधान झालेले नाही. त्याच्या (आणि आपल्याही) आजूबाजूला अनेक लोक असे आहेत जे या मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात. योग्यायोग्य कर्म जाणणे, ते आचरणात आणणे, वृत्तीने अनासक्त राहणे आणि ज्ञानप्राप्ती करणे अशा निरनिराळ्या पायऱ्यांवर ते धडपडत असतात…. आपल्या गोष्टीतला राकासुद्धा असाच अजूनही संभ्रमातच आहे. वास्तविक त्याला मोहाचा स्पर्शही झालेला नाही परंतु अंतर्बाह्य निर्विकार वृत्ती अजूनही त्याच्या ठायी दिसत नाही.
अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की मग ज्याला ‘योगारुढ’ म्हणावे अशी अवस्था प्राप्त झालेला योगी कसा ओळखावा? मनोविजय दिसतो तितका सहजसाध्य नाही मग ज्याला तो साधला नाही त्याची गती काय होते? त्याच्या प्रयत्नांचे फलित काय?

आत्मसंयम……..

आपल्या उत्तरात भगवंत आत्मन्, संयम आणि संयमन अशी शब्दांची विभागणी करून अर्जुनाचे समाधान करतात.
सर्वप्रथम आत्मन् म्हणजे आपण स्वतः.. .
योगारुढ पुरुषाची त्याच्या मार्गावरील निष्ठा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. जोपर्यंत व्यक्ती आपल्या ध्येयाकडे निग्रहाने आणि अहर्निश वाटचाल करत नाही तोपर्यंत कोणत्याही बाह्य घटकाची मदत त्याला उपयुक्त ठरणार नाही.

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्‌। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः।
स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण मनुष्य हा स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे.

यशस्वी लोकात आणि इतरांत असणारा फरक हा या ‘आत्मन्’ चा आहे. ध्येयप्राप्तीची अनिवार ओढ असणे ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. भगवंत सांगतात की हीच व्यक्तीच्या यशाची गुरुकिल्ली आहे. भगवंताची अनिवार ओढ असणारा भक्तच त्याला प्राप्त करण्याचा मार्ग हरतऱ्हेने साधतो. ज्याला हा आत्मन् साधत नाही तो स्वतःचीच मदत करण्यात अपयशी ठरलेला स्वतःचाच शत्रु होय.
पुढचा टप्पा अर्थातच संयमाचा…. भगवंत सांगतात की स्वतःवर विजय मिळविणारा साधक भौतिक संसारातील चढ उतारांनी विचलित होत नाही. सुखात आणि दुःखात, लाभ आणि नुकसानातही शांत राहतो. एकाच निर्विकार वृत्तीने तो सोने आणि मातीकडे पाहू शकतो. कारण त्याच्या मनात त्याच्या ध्येयापलिकडे दुसरे काही नसते.

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः। युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः।
ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती व सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते.
परमात्मतत्वाचा स्पर्श झालेला असा व्यक्ती नित्य समाधानी असतो.

हे साधावे कसे? तर……….. संयमन

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता। योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः।
वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या चित्ताला दिली गेली आहे.

आपले चित्त जर दिव्याची ज्योत मानली तर त्याला विचलित करणारा वारा म्हणजे आपल्या इंद्रियांची ओढ! भगवंत सांगतात योगाभ्यासाने चित्त नियमन करता येते. एकांतात स्थिर आसनावर बसून मन एकाग्र करणारा योगी विचलित न होता कालांतराने शांततेचा अनुभव घेतो.

योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः।
मन व इंद्रिय यांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरिच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लीन करावे.
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः। उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये।
त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा.
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः। सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्‌।
शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून अन्य दिशांकडे न पाहता आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून स्थिर व्हावे.

येथे प्रत्येकाला चटकन् पडणारा प्रश्न अर्जुनालाही पडतो की मन हे अशाप्रकारे सहज ताब्यात येईल का? अर्थातच नाही. भगवंत सांगतात मनावर ताबा मिळविण्यासाठी ज्या शरीरात ते मन वास करते आधी ते शरीरही ताब्यात हवे……
त्यावरील श्रीकृष्णाचे विवेचन पुढील भागात…..

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ८ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग १०

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Leave a Reply

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact