ओळख वेदांची – सामवेद

मागील दोन भागात आपण ऋग्वेद आणि यजुर्वेदाची माहिती करून घेतली. वेद परिवारातले तिसरे भावंड म्हणजे ‘सामवेद’. मुर्ती लहान पण किर्ती महान असे हे बालक आहे. प्रत्यक्ष भगवंताने गीतेतील विभूतियोगात “वेदानां सामवेदोऽस्मि” असं म्हणून सामवेदाचं महत्व अधोरेखित केलं आहे. शतपथ ब्राह्मण, बृहद्देवता असे अनेक ग्रंथ सामवेदाचा गौरव करतात. मुख्यतः भारतीय संगीताचा उगम म्हणून सामवेदाकडे पाहिले जाते.

साम हा शब्द सा (ऋचा) + अम् (आलाप) असा तयार होतो. वेदातील ज्या ऋचांवर आलाप किंवा गायन करायचे त्यांचा संग्रह म्हणजे सामवेद असे म्हणता येईल. ऋचा आणि साम हे एकमेकांशिवाय असूच शकत नाहीत. त्यामुळे हे दोघे जणु पति पत्नीच आहेत असे म्हटले आहे! याचाच अर्थ गायन हे आपल्या उपासनापद्धतीचा एक अविभाज्य अंगच होते.

सामवेदाची रचना कशी आहे?

पूर्वार्चिक व उत्तरार्चिक असे सामवेदाचे दोन भाग आहेत. सामवेदातील मंत्रांची संख्या साधारण १८७५ असून त्यातील ९९ मंत्र सोडले तर बाकी सर्व मंत्र ऋग्वेदातील आहेत. पुर्वार्चिकात देवतांच्या स्तुतीपर मंत्र आहेत तर उत्तरार्चिकात यज्ञात आवश्यक असणा-या ऋचांचा संग्रह आहे.

ज्या मंत्रांच्या आधारावर गायन केले जाते त्याला योनिमंत्र म्हणतात. यालाच आपण आजच्या भाषेत थाट म्हणू शकतो. अशा एका योनिमंत्रावर अनेक गाणी गायली जाऊ शकतात. ऋग्वेदातील एकाच मंत्राचे गायन गौतम किंवा कश्यप असे ऋषीं त्यांच्या त्यांच्या शैलीने करत असत. जसे आज दोन भिन्न घराण्यातील गायक एकच राग त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मांडतात.

उदाहरणार्थ ऋग्वेदातील एक मंत्र आपण सामयोनिच्या नोटेशनसकट पाहुयात

मूळ मंत्र –

अग्न॒ आया॑हि वी॒तये॑ गृणा॒नो ह॒व्यदा॑तये ।नि होता॑ सत्सि ब॒र्हिषि॑ ॥ (ऋ ६.०१६.१०)

आता हाच मंत्र गाण्यासाठी योनिमंत्र म्हणून सामवेदात कसा दिसतो ते पाहु

सामवेद योनिमंत्र

अक्षरांच्या वरील अंक हे उदात्त, अनुदात्त, स्वरित इ. स्वर दर्शवतात. हा झाला योनिमंत्र किंवा थाट. आता या चलनाचा आधार घेऊन जेव्हा मंत्र म्हटले जात तेव्हा त्याचा मूळ गाभा तसाच ठेऊनही वेगवेगळ्या प्रकारे गायन मांडले जायचे. यात शब्दांची किंचित ओढाताण होत असे.

उदाहरणार्थ हाच मंत्र गौतम कुलाच्या गायनात असा दिसेल

गौतमस्य पर्कम् ।

अशाप्रकारे सामगायनाचे किमान एक हजार प्रकार अस्तीत्वात होते, असे उल्लेख आहेत. यावरून त्याकाळची गायनकला किती समृद्ध होती याचा अंदाज येतो. भारतीय संगीतातील श्रुतींसारख्या सूक्ष्म आणि घराण्यांसारख्या व्यापक विविधतेचे मूळ अशाप्रकारे सामवेदात आढळते.

हा गायनाचा प्रकार त्याकाळी नक्की कसा असावा याचा अंदाज आज करणे अवघड आहे. कारण सामगायन करणा-या परंपरा जवळपास लुप्त झाल्या आहेत. परंतु मौखिक परंपरेने जे जतन केले गेले आहे त्यातील एक छोटी क्लिप ऐकून आपण अंदाज घेऊ शकतो.

https://sheetaluwach.com/wp-content/uploads/2020/08/saamved.mp3
सामवेद गायन Source – Alaap-A Discovery Of Indian Classical Music

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिंदु धर्म अभिमानाने मिरविणा-या बाली बेटावर एका केचक नृत्यामध्ये असाच रंगलेला आलाप अलिकडेच ऐकायला मिळाला.

सामवेदात आपल्याला परिचयाचे काय आहे?

साम, दाम, दंड, भेद या म्हणीतील साम या शब्दाचा अर्थ गोड बोलणे असा होतो. सामगायनातील गोडवा या अर्थानेच हा शब्द रुढ झाला.

कुंदनलाल सैगल (चित्रपट – तानसेन) आणि मन्ना डे (चित्रपट – संगीत सम्राट तानसेन) यानी अजरामर केलेले सप्त सुरन तीन ग्राम हे गाणं आठवतंय का? या गाण्यातील स्वरमंडलाचे वर्णन हे सामवेदातील स्वरमंडलाचे नारदीय शिक्षेत आलेले वर्णन आहे.

सप्तस्वराः त्रयो ग्रामाः मूर्छनास्त्वेकविंशति। ताना एकोनपंचाशत् इत्येतत्स्वरमण्डलम्।

देवळात गायलेल्या आरतीपासून ते मैफिलीत गायलेल्या रागापर्यंत भारतीय संगीताचे मूळ सामगायनातच आहे. गायन हा देवाच्या उपासनेचा सर्वोत्तम मार्ग आहे त्यामुळे संगीताला नादब्रह्म मानले जाते. वेदातील आकाराने लहान भावंड असूनही भारतीय संगीत आणि उपासना पद्धतीचा पाया सामवेदाने उभा केला. म्हणूनच तर श्रीकृष्णासह जवळपास प्रत्येक थोर ऋषीमुनींनी सामवेदाला भारतीय ज्ञानवाङ्मयात उच्च स्थान दिलेले आहे.

तळटिप

१.गीता अध्या. १० श्लोक २२
२. सर्वेषामं वा एष वेदानाम् रसो यत् साम (शतपथ ब्राह्मण १२.८.३.२३)
३. सामानि यो वेत्ति त वेद तत्त्वम् । (बृहद्देवता)
४. अमोSहमस्मि सा त्वं, सामाहमस्मि ऋक् त्वं। द्यौरहं पृथिवी त्वं। ताविह संभवाव, प्रजामाजनयावहै (अथर्ववेद १४/२/७१)
५. सामवेद – म.म पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर (पृ,क्र ६)
६. एकशतमध्वर्युशाखाः, सहस्रवर्त्मा सामवेदः ॥ महाभाष्य

मागील भाग – ओळख वेदांची – यजुर्वेद पुढील भाग – ओळख वेदांची – अथर्ववेद

Copyright sheetaluwach.com 2020 ©

ओळख वेदांची – यजुर्वेद

ऋग्वेदाची ओळख मागील भागात आपण करून घेतली. पहिला वेद म्हणून त्यातल्या त्यात ऋग्वेद आपल्याला माहिती असतो. यजुर्वेदाच्या नशीबात ते नाही. देशस्थ कोकणस्थ वादाशिवाय यजुर्वेद किंवा यजुर्वेदी वगैरे शब्दच कानी पडत नाहीत! वास्तविक सर्वांगीण जीवनाचे दर्शन घडवणारा जीवनवेदच म्हणावा इतकं यजुर्वेदाचं महात्म्य आहे. ते शब्दात मांडायचा प्रयत्न करु यात.

यजुर्वेदातील मंत्रांना ‘यजु’ असे म्हणतात हे मंत्र गद्यात्मक आहेत. यजुर्वेदातले पद्यात्मक मंत्र प्रामुख्याने ऋग्वेद आणि अथर्ववेदातून घेतले आहेत. यज् या संस्कृत धातूपासून यजु शब्द तयार होते. यज् याचे तीन अर्थ पाणिनी सांगतो. देवाची पूजा, एकत्र येणे आणि दान. यजुर्वेदाचा प्रमुख वापर हा यज्ञकर्मासाठी केला जातो. ऋचांनी प्रशंसा करावी व यजुंनी यज्ञ अशा अर्थाचे संस्कृत वचन निरुक्तात आढळते.
यज्ञामध्ये प्रत्येक वेदाचा भाग सांभाळणारा एक प्रमुख वैदिक/ पुरोहीत असतो त्याला ऋत्विज असे म्हणतात. ऋत्विजांची वेदानुसार नावे अशी –
ऋग्वेद – होता (हे नाव आहे), यजुर्वेद – अध्वर्यु, सामवेद – उद्गाता, अथर्ववेद – ब्रह्मा. अध्वर्यु ज्या वेद मंत्रांचा प्रयोग करतात तोच यजुर्वेद म्हणून यजुर्वेदाला ‘अध्वर्युवेद’ असेही म्हणतात.

शुक्ल आणि कृष्ण असे यजुर्वेदाचे दोन भाग पडतात. शुक्लयजुर्वेदात केवळ मंत्र आहेत तर कृष्णयजुर्वेदात मंत्र आणि त्यांच्या विनियोगाची माहीती आहे.
कृष्णयजुर्वेदाच्या निर्मितीची एक कथा आहे. वैशंपायन ऋषींनी याज्ञवल्क्यांना वेदाचे शिक्षण दिले. परंतु दोघांमध्ये वेदार्थनिर्णयावरून काही वाद निर्माण झाला. वाद वाढल्यावर संतप्त झालेल्या वैशंपायन ऋषींनी याज्ञवल्क्यांना दिलेले ज्ञान परत मागितले. याज्ञवलक्यांनी ते ज्ञान ओकून टाकले. वैशंपायनांच्या काही शिष्यांनी तित्तिर पक्षाचे रुप घेऊन ते ज्ञान ग्रहण केले. वैशंपायनांनी याज्ञवल्क्यांना जे ज्ञान दिले ती मूळ संहिता म्हणजे शुक्लयजुर्वेद तर तित्तिर पक्षांनी ग्रहण करून जे स्वीकारले ते ज्ञान म्हणजे कृष्ण यजुर्वेद असे मानतात. नवे व जुने ज्ञान आणि त्यांचे संपादन यामुळे यजुर्वेदाच्या काही शाखा आणि त्यांच्या संहिता निर्माण झाल्या जसे वाजसनेयी, तैत्तिरीय इ. याच्या अधिक तपशीलात न जाता आपण दोन्ही मिळून यजुर्वेदाची ओळख करून घेउ यात.

काय आहे यजुर्वेदात?…..
यजुर्वेदाची रचना अध्यायात केली आहे. एकूण ४० अध्याय आहेत. त्यात मुख्यत्वेकरून यज्ञासंबंधी माहिती आहे.

यज्ञ– यज्ञासाठी वेदी, कुंड तसेच इतर साधने तयार करणे, हवन, हवनसामग्री तसेच त्यासंबंधीचे नियम आणि मंत्र यजुर्वेदात विस्ताराने येतात. गाईचे दूध काढणे, पाणी आणणे येथपासून ते यज्ञकुंडाची जागा, वेदी उभी करणे, यज्ञसाहित्य निवडणे, वेगवेगळ्या आहुति देणे येथपर्यंत प्रत्येक बारीक सारीक कृतींची माहीती यजुर्वेदात येते.
आपल्या ऐकण्यात विशेषकरून येणारे ‘अश्वमेध’ आणि ‘राजसूय’ (युधिष्ठिराने महाभारतात केलेला) हे यज्ञ संपूर्ण विधिवत यजुर्वेदात येतात. याखेरीज दर्श पूर्णमास (अमावस्या आणि पौर्णिमेला करायचे याग/यज्ञ), अग्निष्टोम (पाच दिवसांचा मिनि यज्ञ), चातुर्मास्य, काम्येष्टी, वाजपेय, नक्षत्रेष्टि अशा अनेक छोट्या मोठ्या यज्ञांचा अंतर्भाव यजुर्वेदात होतो.

यजुर्वेदातील माहितीचा परीघ किती मोठा होता हे समजून घेण्यासाठी यज्ञ ही काय संस्था होती हे पाहिले पाहिजे. त्याकाळातील यज्ञ हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता. आधी सांगितल्याप्रमाणे ‘यज’ याचा एक अर्थ एकत्र येणे असाही होतो. त्यामुळेच यज्ञ हा एक प्रकारचे सामाजिक समारंभ (मराठीत सोशल गॅदरींग) असे. यात विविध विधींसह अनेक मनोरंजक खेळ किंवा स्पर्धाही असत. जसे सामगायन असेल, रथांची शर्यत असेल, वाद्य वादन असेल अगदी पाण्याच्या घागरी घेतलेल्या दासींच्या नृत्यापासून ते रस्सीखेच सारख्या खेळांपर्यंत मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम यज्ञात होत. यज्ञ हे संपुर्ण समाजाचे एकत्रिकरण करणे, त्यांचे मनोरंजन करणे, त्यांच्यात एकी आणि समभाव वाढवणे आणि त्यांचे सर्वांगिण कल्याण साधणे अशी उद्दीष्ट्ये साध्य करण्याचे साधन होते. हिलेब्रॅन्ट (Hillebrandt) सारखा विद्वान या खेळांची तुलना थेट ऑलिम्पिकशी (प्राचीन) करतो .

अश्वमेध किंवा राजसूय यज्ञ करणारा राजा आहुति देताना म्हणत असे
आ ब्रह्म॑न् ब्राह्म॒णो ब्र॑ह्मवर्च॒सी जा॑यता॒मा रा॒ष्ट्रे रा॑ज॒न्यः शूर॑ इष॒व्योऽतिव्या॒धी म॑हार॒थो जा॑यतां॒ योगक्षे॒मो न॑: कल्पताम् ।।यजुर्वेद मा.वा संहिता अ २२.२२ ।।
संपूर्ण मंत्र मोठा आहे पण याचा अर्थ असा की – ‘ब्रह्मतेजाने संपन्न आणि शूर असे वीर आमच्या राष्ट्रात उत्पन्न होवोत, आमचा योगक्षेम (निर्वाह) उत्तम चालो.’

गोष्टी – यजुर्वेदाचा प्रमुख विषय यज्ञ असल्याने ऋग्वेदाइतक्या गोष्टी यजुर्वेदात नाहीत. पण निरनिराळ्या विषयांवरील काही आख्यायिका यजुर्वेदाच्या चर्चेत येतात. इंद्राने वायुदेवतेच्या मदतीने देवांच्या भाषेचे व्याकरण लिहिले अशी एक आख्यायिका यजुर्वेदात आहे. पुर्वी देव जी भाषा बोलत असत ती काहीशी नियमविरहीत किंवा व्याकरणरहीत होती. देवांच्या विनंतीवरून इंद्राने वायुदेवतेच्या सहाय्याने त्या भाषेला नियमबद्ध व व्याकृत केले असा उल्लेख यजुर्वेदात आहे.यजुर्वेदात मांडलेल्या विषयांचा विस्तारही यातून लक्षात येतो.

यजुर्वेदात आपल्या परीचयाचे काय आहे?…..

खुप काही…
आपण निरनिराळ्या वेळी ऐकलेला आणि वापरलेला –
भूर्भुव॒: स्व॒: तत्स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि ।धियो॒ यो न॑: प्रचो॒दया॑त्। हा गायत्री मंत्र यजुर्वेदातला आहे. (अध्याय ३६, मंत्र ३)

ग॒णानां॑ त्वा ग॒णप॑ति हवामहे। हा अजून एक माहितीतला मंत्र यजुर्वेदातीलच आहे. (अध्याय२३-मंत्र १९)

आपण घरी किंवा महादेवाच्या देवळात ऐकलेले ‘रुद्र पठण’ हे यजुर्वेदातील आहे. (अध्याय १६)

भाषेतील चमत्कृती म्हणून सांगायचे तर वाजपेय या यज्ञात सहभागी असणारे किंवा तो यज्ञ करणारे म्हणून ‘वाजपेयी’ हे नाव रुढ झाले.

हाच वाजपेय यज्ञ पुण्यात १९५५ साली संपुर्ण विधिवत अगदी रथांच्या शर्यतीसकट एक प्रयोग म्हणून करण्यात आला हे ही जाता जाता सांगायला हरकत नाही.

तत्त्वज्ञान –
वैदिकांच्या कर्मकांडाचे स्वरूप, त्यामागचा उदात्त विचार आणि त्याचे व्यापक तत्त्वज्ञान यजुर्वेदाच्या सर्व म्हणजे ४० अध्यायात येतेच. विशेषतः आपल्याला माहिती असलेला भाग म्हणजे ‘ईशावास्योपनिषद’ जे यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेचा ४० वा अध्याय आहे.
ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्।
या प्रसिद्ध मंत्रातून परमेश्वर सर्वव्यापी आहे. माणसाने संग्रह न करता आवश्यकतेनुसार पदार्थांचा उपभोग घ्यावा असा उपदेश केला आहे.

अशाप्रकारे मनोरंजनासह आयुष्याचा आनंद घेत तत्त्वज्ञान शिकवणारा यजुर्वेद… अगम्य तर नाहीच किंबहूना चतुरस्त्र जीवनशैली (मराठीत वर्क लाईफ बॅलन्स) शिकवणा-या आजच्या युगातील कोणत्याही पुस्तकावर मात करणारा पुस्तकरुपी जीवनवेदच आहे.

तळटीप
१. यज देवपूजा – संगतिकरण – दानेषु (अष्टाध्यायी ३.३.९०)
२. यजुर्भिः सामभिः यत् एनम् ऋग्भिः शंसन्ति यजुर्भिः यजन्ति सामभिः स्तुवन्ति ।निरुक्त १३.७।
३. Alfred Hillebrandt एक जर्मन विद्वान त्याच्या Vedische Mythologie (१, २४७) या पुस्तकात हा उल्लेख आढळतो.
४. तैत्तिरिय संहिता ७/४

मागील भाग – ओळख वेदांची – ऋग्वेद                                                        पुढील भाग – ओळख वेदांची – सामवेद 

Copyright sheetaluwach.com 2020 ©

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact
Exit mobile version