अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)

मग पिकलिया सुखाचा परिमळु । कीं निवालिया अमृताचा कल्लोळु ।
तैसा कोंवळा आणि रसाळु । बोलु बोलिला॥

प्रत्ययकारी शब्द आणि प्रेमळ भाव दोन्ही प्रकट करणाऱ्या श्रीकृष्णाच्या वाणीचे ज्ञानदेवांनी केलेले हे वर्णन….
साधं ‘आणि कृष्ण पुढे म्हणाला’ असं लिहीणं आणि ‘सुखाचा परिमळु, अमृताचा कल्लोळु’ म्हणणं यातील अनुभवाचा फरक ज्याला कळला त्याला ब्रह्म अक्षर असते आणि अक्षर ब्रह्म असते हे दोन्ही पटावे!!
ब्रह्म आणि अध्यात्म यांचे अर्थ स्पष्ट केल्यानंतर श्रीकृष्ण अधिभूत, अधिदेैव आणि अधियज्ञ या संज्ञांकडे वळतो.

अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम्‌ । अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर॥
उत्पत्ती-विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे अर्जुना, या शरीरात मीच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे.

जर ब्रह्म अ-क्षर आहे तर जे क्षर आहे ते अधिभूत आहे.

तैसें असतेपण आहाच । नाहीं होइजे हें साच । जयांतें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां।
भूतांतें अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगें तरि दिसे । जे वियोगवेळे भ्रंशे । नामरूपादिक।

ज्ञानदेवांनी दोन ओळीत अधिभूताचे सुंदर वर्णन केलंय. पाच महाभूतांपासून जे बनते (पांच पांच मिळोनिया). जे दृष्य आहे. ज्याला आपण पाहतो आणि नावाने ओळखतो (नामरुपादिक) ते नाशवंत (वियोगवेळे भ्रंशे) भूतमात्र म्हणजे अधिभूत.

अधिदैवत म्हणजे काय?

जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशीचा अध्यक्षु । जो देहास्तमनीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा।
जो परमात्माचि परि दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा । म्हणोनि स्वप्नींचिया बोरबारा । संतोषें शिणे।

अधिदैवताला ज्ञानदेवांनी दुसरा परमात्माच म्हटले आहे. अधिदैव म्हणजे इंद्रियांना कार्यरत करणारी शक्ती. डोळ्यांना दृष्टी, त्वचेला स्पर्श किंवा नाकाला गंध देणारे तत्व म्हणजे अधिदैव.

अधियज्ञ
अधियज्ञ म्हणजे मी स्वतः असे श्रीकृष्ण सांगतो.
येथे अधिभूत किंवा अधिदैव या कल्पना समजणे तितकेसे कठीण नाही. अधियज्ञ समजणे काहीसे अवघड आहे. मुळात त्यासाठी आधी ‘यज्ञ’ समजून घेणे अधिक आवश्यक आहे.

यज्ञ
सर्वसाधारणपणे यज्ञ याचे आपल्या डोळ्यासमोर उभे राहणारे चित्र म्हणजे एक चौकोनी वेदी आहे ज्यात अग्नि तेवत आहे आणि ऋषीमुनी त्यात वरुन पळीने तुप ओतत आहेत. धार्मिक टिव्ही सिरियलमध्ये वगैरे याच कृतीला यज्ञ म्हणतात!! हल्ली अग्निहोत्र नावाचा एक घरगुती यज्ञाचा प्रकारही प्रसिद्ध (मराठीत पॉप्युलर) होत आहे. हा यज्ञ आहे का तर याचे उत्तर नाही असे आहे. केवळ अग्निमध्ये आहुती देणे म्हणजे यज्ञ नव्हे. किंबहूना अग्नीमध्ये आहुती देणे ही एक प्रतिकात्मक कृती आहे यज्ञ नाहीच. हे प्रतिक आले कुठुन मग?
यासाठी पुन्हा अक्षरब्रह्माकडे वळावे लागेल. अग्निला संस्कृतात ‘पावक’ असा शब्द आहे. पावक याचा अर्थ पावन किंवा शुद्ध करणारा. आपल्याला हे माहिती आहे की – सोने शुद्ध करण्यासाठी त्याला अग्निमध्ये झाळतात. त्यामुळे त्यातील अशुद्ध तत्वे भस्मीभूत होऊन शुद्ध सोने प्राप्त होते. लोखंडही गाळून त्याचे पोलाद करताना शुद्धीकरणासाठी हाच अग्नि वापरतात. म्हणून कोणतीही गोष्ट शुद्ध करण्यासाठी, मग ते वातावरण का असेना, अग्निची योजना केली जाते. हे तथ्य आपल्या पूर्वजांना ज्ञात होते. म्हणूनच अग्नि आणि शुद्धीकरण (आहुती) यांचा संबंध जोडून यज्ञाचे प्रतीक निर्माण करण्यात आले. यज्ञ हा शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. मग ते वस्तु, वातावरण किंवा मनाचेही शुद्धीकरण असो. मन शुद्ध करणे किंवा शुद्ध मनाने किंवा उदात्त हेतूने केलेले कार्य म्हणजे यज्ञ….
म्हणूनच यज्ञाला यजुर्वेदात विश्वतोधार म्हटले आहे.

स्व॒र्यन्तो॒ नापे॑क्षन्त॒ आ द्या रो॑हन्ति॒ रोद॑सी । य॒ज्ञं ये वि॒श्वतो॑धार॒ सुवि॑द्वा सो वितेनि॒रे।

निघण्टुत यज्ञाची १५ अर्थपूर्ण नावे/प्रकार येतात.
यज्ञः, वेनः, अध्वरः, मेधः, विदर्थः, नार्यः, सवनम्, होत्रा, इष्टिः, देवताता, मखः, विष्णुः, इन्दुः, प्रजापतिः, धर्मः इति पञ्चदश यज्ञनामानि।।

(**जाता जाता हे सांगायला हरकत नाही की यातील ‘अध्वरः’ या शब्दाचा अर्थ तैत्तिरिय ब्राह्मणात अहिंसा असा दिलाय. यज्ञ हिंसेचे समर्थन करत नाही हे ध्यानात यावा हा हेतू)

कर्मयोगात म्हणूनच श्रीकृष्ण निष्काम कर्माला यज्ञाची उपमा देतो किंबहुना कर्म हे यज्ञ समजून इदं न मम या भावनेने केल्यास त्याचे बंधन लागत नाही असे म्हणतो ते याच अर्थाने. सगळ्या निसर्गाच्या चक्राचा आधार हे असे यज्ञकर्म किंवा कर्मयज्ञ आहे हे ही तो सांगतो. (पहा कर्मयोग)

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः।।
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ । तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्।

आता अधियज्ञ म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर हे समजणे कठीण जाणार नाही!
जीव आणि अजीव या दोन्हीच्याही द्वैतातून ही सर्व सृष्टी निर्माण झाली. या दोन्हीच्याही सहाय्याने सृष्टीचे सर्जन करणारा मी या दोन्हीच्याही पलिकडे असणारे तत्व आहे. जीव आणि अजीवाचे वास्तविक स्वरुप जाणून घेणाराच त्या दोन्हीच्याही पलिकडे असणारे तत्व जाणू शकतो. अधियज्ञ हा वास्तविक यज्ञ मानला तर अधिभूत आणि अधिदैव या त्यातील आहुती आहेत.
साधे उदाहरण घेउ भक्त पायाने चालत देवदर्शनाला जातो. येथे भक्ताचे पाय हे ‘अधिभूत (जड तत्व)’ आहे. देऊळ जेथे देवाचे वास्तव्य (शक्ती/चैतन्य) आहे ते गन्तव्य स्थान हे ‘अधिदैव’ आहे. प्रत्यक्ष देवाचा साक्षात्कार हा ‘अधियज्ञ’ आहे. आता देवळात गेल्यावर आपल्याला जे पवित्र, शुद्ध आणि सात्विक वगैरे वाटते ते अव्यक्त असते. केवळ देवळात गेल्यावरच तसा अनुभव यावा का? देव तर सगळीकडे आहे. प्रत्यक्ष आपल्यातही आहे. मग पावित्र्य, सात्विक भाव हे आपल्याच अंतरी आहेत याची जेव्हा जाणीव होते तेव्हा जड आणि चैतन्य दोन्ही तत्वांच्या पार दिसायला लागते. जणु त्यांची आहुती पडते, बुद्धी शुद्ध होते आणि अधियज्ञ साकार होतो. म्हणजे आपल्याला आपल्यातीलच परब्रह्माची जाणीव होते.
अधियज्ञ म्हणजे मी स्वतः हे श्रीकृष्ण म्हणतो ते या अर्थाने. अधि-आत्म (अध्यात्म) म्हणजे स्व-भाव जाणणे. अधियज्ञ म्हणजे स्वतःच स्वतःला पावन करणारा यज्ञ.
आता राहीला अर्जुनाचा शेवटचा प्रश्न. प्रयाणकाली किंवा मरतेसमयी स्थिरमती व्यक्तीने काय जाणायचे आहे. उत्तर अगदी सोपे आहे. श्रीकृष्ण त्याला एक साधे तत्व सांगतो.

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्‌ । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः।
हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला त्याला तो जाऊन मिळतो. कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो.

मनुष्य अनन्यभावनेने ज्या गोष्टीचे चिंतन करत असतो तो अंतिमतः त्या अवस्थेला जाऊन मिळतो.
मराठीत एक छान म्हण आहे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस… ज्या व्यक्तीच्या मनात भीती असते त्याला सतत त्याचेच प्रतिबिंब आजूबाजूला दिसते. वरवर धाडसीपणाचा आव आणणारे असे कितीतरी शूर वीर आपण आजूबाजूला पाहतो! ज्याच्या मनात शांत समाधानी भाव असतात त्याला आसमंतात त्याचाच प्रत्यय येतो. मग जो सातत्याने अनन्यभावाने परमात्म्याचे चिंतन करेल त्याला परमात्मा प्राप्त होणे सहाजिकच नाही का? तत्व साधे आहे. जसा भाव तसा देव! एकनाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे.
भाव तोंचि देव ।ये अर्थी संदेह धरूं नका।
भाव भक्ति फळे भावें देव मिळे। निजभावें सोहाळे स्वानंदाचे।
भावचि कारण भावचि कारण ।यापरतें साधन नाहीं नाहीं।
एका जनार्दनीं भावाच्या आवडी ।मनोरथ कोडी पुरती तेथें।
म्हणूनच श्रीकृष्ण सांगतो की,

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्‌ । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः।
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्‌।

जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्वकाळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन-बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निःसंशय मलाच येऊन मिळशील.

(गंमतीचा भाग असा की या श्लोकांतील अनन्यभक्तीचा भाव वगळून केवळ ‘मामनुस्मर युध्य च’ हा भाग प्रसिद्ध करुन त्यायोगे गीतेत हिंसेचा प्रसार केला आहे असा भास करुन दिला जातो!! गीता किंवा एकूणच प्राचीन भारतीय वाङ्मयाच्या अयोग्य अन्वयार्थाबद्दल पुन्हा कधीतरी…..)

परमेश्वराच्या साक्षात्कार घडविणाऱ्या गीतेतील अध्यायांच्या गटातील अक्षरब्रह्मयोग येथेच संपन्न करुयात.

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग

ज्ञानविज्ञानयोग

पाप पुण्य की शंका नाही, स्वर्ग-नर्क नही जाही।।
कहहि कबीर सुनो हो सन्तों, जहां का पद तहाँ समाई।।

अर्जुनविषादापासून आरंभलेला आपला प्रवास आता एक टप्पा पार करत आहे. आतापर्यंतच्या दहा भागात आपण भगवद्गीतेतील आत्मतत्व जाणण्याचा प्रयत्न केला. एका विशिष्ट क्रमाने श्रीकृष्ण संभ्रमावस्थेत असलेल्या अर्जुनाला उपदेश करतो. केवळ युद्धच नव्हे तर एकुणच आयुष्यात माणसाचा दृष्टीकोन कसा असावा याचे मार्गदर्शन या उपदेशाने प्राप्त होते.
माणसाचे आयुष्य हे एक निरंतर चालणारे द्वंद्वच आहे. दृष्य जगतातील बरेवाईट प्रसंग म्हणजेच ते द्वंद्व, असे मानून माणूस त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यामुळे केवळ एका पाठोपाठ एक अशा प्रसंगातून स्वतःला निभावून नेण्याचे कसब तो प्राप्त करतो. अखेर अनेक वर्षांच्या या अशा चकमकींनंतर त्याला हे उमगते की, ते युद्ध बाह्य जगाशी नसून अदृष्य अशा ‘स्व’शी आहे.
अर्जुनाला हीच जाणीव श्रीकृष्ण करून देतो. महाभारतात सतत युद्धे जिंकणाऱ्या अर्जुनाला कुरुक्षेत्रातही विजय मिळवण्याची खात्री असते. परंतु तरीही त्याला समाधान प्राप्त होत नसते. म्हणजे मग आपण आयुष्यभर केलेल्या युद्धांचे, युद्धकलेच्या अभ्यासाचे आणि एकुणच पार पाडलेल्या सर्व प्रसंगांचे फलित काय? जगण्यासाठीची धडपड करणाऱ्या लहानमोठ्या प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच की – जन्मापासून शिक्षण, व्यवसाय, कुटुंब, उपजिविका, मालमत्ता, या सगळ्यांसाठी सतत संघर्ष करूनही जर अल्पजीवी समाधान मिळत असेल तर नक्कीच ते समाधान या सगळ्यांत नाहीये. खरं समाधान अंतरी आहे जे द्वंद्व आपण लढलोच नाही!
गीतेच्या अभ्यासाला याच प्रश्नावर अर्जुनाची आणि आपलीही सुरुवात होते. मग युद्ध करण्यास तयार नसलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण सर्वप्रथम शरीर आणि आत्मा यांचे द्वैत समजावून सांगतो. देह नश्वर आहे आणि आत्मा शाश्वत आहे याचे ज्ञान करून देतो. मनुष्याचा केवळ कर्मावर अधिकार आहे त्याच्या फळावर नाही. त्यामुळे त्याने केवळ निःसंग वृत्तीने कर्म केले पाहीजे. त्यासाठी स्थिर प्रज्ञा हवी. अशी बुद्धी प्राप्त करण्यासाठी लागणारी संन्यस्त वृत्ती आणि त्यासाठीचा आत्मसंयम… अशाप्रकारे एकेका अध्यायातून आत्मज्ञानाची उतरंड श्रीकृष्ण अर्जुनाच्या समोर उभी करतो.
गीतेच्या अध्यायांची विभागणी करायची झाल्यास पहिले सहा अध्याय हा एक विभाग होईल. यात आत्मज्ञान किंवा स्वतःला जाणण्याची प्रक्रिया विस्तृतपणे मांडली आहे. माणसाच्या शाश्वत सुखाचा मार्ग अंतस्थ द्वंद्वात आहे आणि ते द्वंद्व कसे लढायचे याचे ज्ञान म्हणजे गीतेचा पहिल्या सहा अध्यायांचा विभाग. यात अर्जुनविषादाखेरीज सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यास,कर्मसंन्यास आणि आत्मसंयमयोगाचा समावेश होतो. आत्मज्ञान म्हणजे स्वतःतील ईशतत्व जाणण्याचे ज्ञान. अशा ज्ञानी व्यक्तीला हेच ईशतत्व आपल्यासह प्रत्येक चराचर सृष्टीत अंशरुपाने वास करून राहते याचा प्रत्यय येतो. दृष्य सृष्टी ही भगवंताच्या मायेचा भाग आहे. त्या मायेच्याही पलिकडे असणाऱ्या परमात्म्याचा साक्षात्कार होणे म्हणजे विज्ञान. प्राप्त ज्ञानाचा प्रत्यय येणे म्हणजे विज्ञानयोग.
ज्ञानविज्ञानयोगात भगवंत पदार्थातील आपल्या वास्तव्याचे स्वरुप समजावून सांगतात. आत्मज्ञान प्राप्त केलेल्या व्यक्तीला सृष्टीचे व्यापक स्वरूप जाणता येते. चराचर सृष्टीचे आधारभूत तत्व एकच आहे हे त्याला जाणवते. ज्याला आपण विज्ञान (विशेष ज्ञान) म्हणुयात. जे दिसते ते आणि जे असते ते या दोन गोष्टींची जाण असणे म्हणजे विज्ञान. असे भगवंत सांगतात. आपण Science (विज्ञान) म्हणतो ते तरी दुसरे काय सांगते! दृष्य पदार्थ आणि त्यामागचे तत्व.
आपल्या स्वरुपाचे वर्णन करताना श्रीकृष्ण परा आणि अपरा अशा दोन प्रकृतींचा उल्लेख करतो. अपरा म्हणजेच समोर दिसणारी. जे आपल्याला समोर दिसते आणि जे आपल्या मन आणि बुद्धीने जाणता येते त्याला अपरा म्हटले आहे.

(**जाता जात हे ही सांगायला हरकत नाही की परा किंवा परोक्ष म्हणजे मागे किंवा दृष्टीआड आणि अपरा किंवा अपरोक्ष म्हणजे समोर. आपल्याकडे मराठीत हाच अपरोक्ष शब्द सर्वस्वी उलट अर्थाने वापरला जातो!!)

पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारात विभागलेली दृष्य प्रकृती म्हणजे अपरा होय.

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च । अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा।

पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश या पंचमहाभूतांनी बनलेली दृष्य सृष्टी जी मन, बुद्धी आणि अहंकाराच्या माध्यमातून आपण जाणतो.
परा म्हणजे याच सृष्टीला गतिमान करणारे चैतन्य. जे आपल्याला दिसत नाही परंतु त्याचे अस्तीत्व जाणवते. परा म्हणजे दृष्टीच्या पलिकडे असणारे.

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्‌ । जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्‌।

साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास
जिवंत व्यक्ती डोळ्यांच्या माध्यमातून पाहते. हाच अवयव मृत व्यक्तीलाही असतो पण त्याला दिसत नाही. मग दोन्हीत फरक कशाचा आहे तर चैतन्याचा…
परा म्हणजेच आपल्याला न दिसणारी परंतु अस्तीत्व असणारी माझी प्रकृती आहे असे श्रीकृष्ण सांगतो. याची उदाहरणे देत म्हणतो – “मी पाण्यातील रस आहे ,अग्नीतले तेज आहे आणि चंद्रसूर्यातील उर्जा…..”

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः । प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु।

दृष्याच्या पलिकडची ही प्रकृती जाणणे हे विज्ञान आहे. श्रीकृष्ण म्हणतो सृष्टीतील परा किंवा चैतन्य म्हणजे माझाच अंश असल्याने सृष्टीचे सनातन कारण मीच आहे. मग हे जाणण्यात चुकते कुठे. माया…..
श्रीकृष्ण पुढे सांगतो या सृष्टीत मनुष्याला आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्ती या गोष्टींच्या आसक्तीत अडकतो आणि त्यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत राहतो. आसक्तीच्या पलिकडे जाऊन शाश्वत काय आणि नश्वर काय याचा विचारच बहुसंख्यांना पडत नाही. असे मोहावश लोक केवल प्राप्य वस्तूकडे पहात राहातात आणि दृष्याच्या पलिकडील चैतन्यस्वरूपाकडे पाठ फिरवतात. कृष्ण म्हणतो अशी ही अलौकीक माया तरून जाणे केवळ अशाच व्यक्तीला शक्य आहे जो अनन्यभावाने माझी निरंतर भक्ती करतो.

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते।

भक्त….
भक्तांचे चार प्रकार श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासु आणि ज्ञानी.

चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन । आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ।

अर्थार्थी हा काहीएक प्राप्तीसाठी भक्ती करतो, तर आर्त भक्त संकटात देवाला आळवतो, जिज्ञासु भक्त भगवंताला जाणण्यासाठी भक्ती करतो तर ज्ञानी भक्त मात्र अनन्य भगवंताचे स्वरूप तत्वतः जाणतो आणि त्या स्वरुपाची भक्ती करतो. म्हणून भगवंताला तो अधिक प्रिय आहे असे श्रीकृष्ण म्हणतो.
पण मग इतर भक्त गैर आहेत का? अर्थातच नाहीत. ज्यांचे देव वेगळे आहेत ते चुकत आहेत का? तर तसेही नाही. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात एक ऋचा आहे

इन्द्रं मित्रं वरुणमग्निमाहुरथो दिव्य: स सुपर्णो गरुत्मान्।
एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु:।

सत्य किंवा परमात्मा एकच आहे. त्याला लोक वेगवेगळ्या नावांनी संबोधतात.
श्रीकृष्ण सांगतो की काळाच्या ओघात धर्मामध्ये अनेक देव, देवता, अवतारांचा उगम झाला. जसे ऋग्वेदातही इंद्र, मित्र, वरुण यासारख्या देवता होत्या. परंपरेनुसार लोक यातील कोणत्या ना कोणत्या देवतेची भक्ती करत आले आहेत. हे अर्थार्थी, आर्त किंवा जिज्ञासु भक्त होत. जे आपल्या कामनापुर्तीसाठी कोण्या एका देवतेची प्रामाणिकपणे भक्ती करतात. यात गैर काहीच नाही. किंबहुना अशा भक्तांना त्यांच्या भक्तीनुसार योग्य ते फळही मी देतो. जेणेकरून त्या भक्ताची त्या देवतेमधील श्रद्धा दृढ होते.

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति । तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्।
‌ स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते। लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान्‌।

अशा भक्तांचा मार्ग हा किंचीत अधिक लांबतो. निरनिराळ्या नावाच्या मूर्त स्वरूपातील देवतांची भक्ती करणारा भक्तालाही शेवटी भगवद्स्वरूप एकच आहे याचा बोध होतो. दृष्य आणि नश्वर फल देणारा देवही अंतिमतः त्याच परमात्म्याचा अंश आहे हे जाणल्यानंतर मग तो भक्त सकाम भक्तीतून निष्काम भक्तीकडे वळतो.
ज्ञानी भक्ताला मात्र या नश्वर सृष्टीतला कोणताच लाभ नको असतो. या मायेपासून दूर रहात केवळ अनन्यभावनेने परमात्म्याची भक्ती करतो. म्हणून तो मला अधिक प्रिय आहे असे श्रीकृष्ण सांगतो.

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते । प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः।

अशाप्रकारे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या दृष्य सृष्टीतही भगवंताचे अंशात्मक अधिष्ठान आहे हे जाणणे म्हणजे ज्ञान आणि त्या सृष्टीचा मोह त्यागून तिच्या मायेपलीकडच्या भगवंताला जाणणे म्हणजे विज्ञान हे भगवंत स्पष्ट करतात.
अशा विज्ञानी भक्तीचे उदाहरणच कबीराच्या सुंदर शब्दात पाहूयात.

पंडित शोधि कहो समुझाई, जाते आवागमन नशाई।
अर्थ धर्म औ काम मोक्ष कहु, कौन दिशा बसे भाई।
उत्तर कि दक्षिण पूरब की पश्चिम, स्वर्ग पताल कि माहीं।
बिना गोपाल ठौर नही कतहुँ, नर्क जात धौं काही।
अनजाने को स्वर्ग नर्क है, हरि जाने को नाही।
जेहि डर से भव लोग डरतु है, सो डर हमरे नाही।
कहहि कबीर सुनो हो सन्तों, जहां का पद तहाँ समाई।

पोकळ शास्त्रचर्चा करणाऱ्याला कबीर म्हणतात हे पंडीता असे काही ज्ञान दे की ज्याने जन्ममरणाचे बंधन (आवागमन) नष्ट होईल. हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, स्वर्ग, नरक वगैरे मंडळी कोठे असतात बाबा? आम्हाला काय कळणार? जर तुझे हे ब्रह्म सर्वत्र आहे तर मग जिथे नास्तिक मंडळी जातात तो नरक कुठे असतो? बाबा रे जो अंतरीच्या ‘हरी’ ला जाणत नाही त्याला स्वर्गही नरकच आहे आणि जो त्याला जाणतो त्याला स्वर्ग काय आणि नरक काय!!!!! आम्हाला हे ठाऊक आहे की आमच्या अंतरंगात ‘तो’ आहे म्हणून आम्हाला ना स्वर्ग हवा ना नरक…..

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग १० पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact