Bhagavad Gita Chapter 8 Aksharbrahma Yoga - अक्षरब्रह्मयोग

अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)

मग पिकलिया सुखाचा परिमळु । कीं निवालिया अमृताचा कल्लोळु ।
तैसा कोंवळा आणि रसाळु । बोलु बोलिला॥

प्रत्ययकारी शब्द आणि प्रेमळ भाव दोन्ही प्रकट करणाऱ्या श्रीकृष्णाच्या वाणीचे ज्ञानदेवांनी केलेले हे वर्णन….
साधं ‘आणि कृष्ण पुढे म्हणाला’ असं लिहीणं आणि ‘सुखाचा परिमळु, अमृताचा कल्लोळु’ म्हणणं यातील अनुभवाचा फरक ज्याला कळला त्याला ब्रह्म अक्षर असते आणि अक्षर ब्रह्म असते हे दोन्ही पटावे!!
ब्रह्म आणि अध्यात्म यांचे अर्थ स्पष्ट केल्यानंतर श्रीकृष्ण अधिभूत, अधिदेैव आणि अधियज्ञ या संज्ञांकडे वळतो.

अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम्‌ । अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर॥
उत्पत्ती-विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे अर्जुना, या शरीरात मीच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे.

जर ब्रह्म अ-क्षर आहे तर जे क्षर आहे ते अधिभूत आहे.

तैसें असतेपण आहाच । नाहीं होइजे हें साच । जयांतें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां।
भूतांतें अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगें तरि दिसे । जे वियोगवेळे भ्रंशे । नामरूपादिक।

ज्ञानदेवांनी दोन ओळीत अधिभूताचे सुंदर वर्णन केलंय. पाच महाभूतांपासून जे बनते (पांच पांच मिळोनिया). जे दृष्य आहे. ज्याला आपण पाहतो आणि नावाने ओळखतो (नामरुपादिक) ते नाशवंत (वियोगवेळे भ्रंशे) भूतमात्र म्हणजे अधिभूत.

अधिदैवत म्हणजे काय?

जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशीचा अध्यक्षु । जो देहास्तमनीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा।
जो परमात्माचि परि दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा । म्हणोनि स्वप्नींचिया बोरबारा । संतोषें शिणे।

अधिदैवताला ज्ञानदेवांनी दुसरा परमात्माच म्हटले आहे. अधिदैव म्हणजे इंद्रियांना कार्यरत करणारी शक्ती. डोळ्यांना दृष्टी, त्वचेला स्पर्श किंवा नाकाला गंध देणारे तत्व म्हणजे अधिदैव.

अधियज्ञ
अधियज्ञ म्हणजे मी स्वतः असे श्रीकृष्ण सांगतो.
येथे अधिभूत किंवा अधिदैव या कल्पना समजणे तितकेसे कठीण नाही. अधियज्ञ समजणे काहीसे अवघड आहे. मुळात त्यासाठी आधी ‘यज्ञ’ समजून घेणे अधिक आवश्यक आहे.

यज्ञ
सर्वसाधारणपणे यज्ञ याचे आपल्या डोळ्यासमोर उभे राहणारे चित्र म्हणजे एक चौकोनी वेदी आहे ज्यात अग्नि तेवत आहे आणि ऋषीमुनी त्यात वरुन पळीने तुप ओतत आहेत. धार्मिक टिव्ही सिरियलमध्ये वगैरे याच कृतीला यज्ञ म्हणतात!! हल्ली अग्निहोत्र नावाचा एक घरगुती यज्ञाचा प्रकारही प्रसिद्ध (मराठीत पॉप्युलर) होत आहे. हा यज्ञ आहे का तर याचे उत्तर नाही असे आहे. केवळ अग्निमध्ये आहुती देणे म्हणजे यज्ञ नव्हे. किंबहूना अग्नीमध्ये आहुती देणे ही एक प्रतिकात्मक कृती आहे यज्ञ नाहीच. हे प्रतिक आले कुठुन मग?
यासाठी पुन्हा अक्षरब्रह्माकडे वळावे लागेल. अग्निला संस्कृतात ‘पावक’ असा शब्द आहे. पावक याचा अर्थ पावन किंवा शुद्ध करणारा. आपल्याला हे माहिती आहे की – सोने शुद्ध करण्यासाठी त्याला अग्निमध्ये झाळतात. त्यामुळे त्यातील अशुद्ध तत्वे भस्मीभूत होऊन शुद्ध सोने प्राप्त होते. लोखंडही गाळून त्याचे पोलाद करताना शुद्धीकरणासाठी हाच अग्नि वापरतात. म्हणून कोणतीही गोष्ट शुद्ध करण्यासाठी, मग ते वातावरण का असेना, अग्निची योजना केली जाते. हे तथ्य आपल्या पूर्वजांना ज्ञात होते. म्हणूनच अग्नि आणि शुद्धीकरण (आहुती) यांचा संबंध जोडून यज्ञाचे प्रतीक निर्माण करण्यात आले. यज्ञ हा शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. मग ते वस्तु, वातावरण किंवा मनाचेही शुद्धीकरण असो. मन शुद्ध करणे किंवा शुद्ध मनाने किंवा उदात्त हेतूने केलेले कार्य म्हणजे यज्ञ….
म्हणूनच यज्ञाला यजुर्वेदात विश्वतोधार म्हटले आहे.

स्व॒र्यन्तो॒ नापे॑क्षन्त॒ आ द्या रो॑हन्ति॒ रोद॑सी । य॒ज्ञं ये वि॒श्वतो॑धार॒ सुवि॑द्वा सो वितेनि॒रे।

निघण्टुत यज्ञाची १५ अर्थपूर्ण नावे/प्रकार येतात.
यज्ञः, वेनः, अध्वरः, मेधः, विदर्थः, नार्यः, सवनम्, होत्रा, इष्टिः, देवताता, मखः, विष्णुः, इन्दुः, प्रजापतिः, धर्मः इति पञ्चदश यज्ञनामानि।।

(**जाता जाता हे सांगायला हरकत नाही की यातील ‘अध्वरः’ या शब्दाचा अर्थ तैत्तिरिय ब्राह्मणात अहिंसा असा दिलाय. यज्ञ हिंसेचे समर्थन करत नाही हे ध्यानात यावा हा हेतू)

कर्मयोगात म्हणूनच श्रीकृष्ण निष्काम कर्माला यज्ञाची उपमा देतो किंबहुना कर्म हे यज्ञ समजून इदं न मम या भावनेने केल्यास त्याचे बंधन लागत नाही असे म्हणतो ते याच अर्थाने. सगळ्या निसर्गाच्या चक्राचा आधार हे असे यज्ञकर्म किंवा कर्मयज्ञ आहे हे ही तो सांगतो. (पहा कर्मयोग)

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः।।
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ । तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्।

आता अधियज्ञ म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर हे समजणे कठीण जाणार नाही!
जीव आणि अजीव या दोन्हीच्याही द्वैतातून ही सर्व सृष्टी निर्माण झाली. या दोन्हीच्याही सहाय्याने सृष्टीचे सर्जन करणारा मी या दोन्हीच्याही पलिकडे असणारे तत्व आहे. जीव आणि अजीवाचे वास्तविक स्वरुप जाणून घेणाराच त्या दोन्हीच्याही पलिकडे असणारे तत्व जाणू शकतो. अधियज्ञ हा वास्तविक यज्ञ मानला तर अधिभूत आणि अधिदैव या त्यातील आहुती आहेत.
साधे उदाहरण घेउ भक्त पायाने चालत देवदर्शनाला जातो. येथे भक्ताचे पाय हे ‘अधिभूत (जड तत्व)’ आहे. देऊळ जेथे देवाचे वास्तव्य (शक्ती/चैतन्य) आहे ते गन्तव्य स्थान हे ‘अधिदैव’ आहे. प्रत्यक्ष देवाचा साक्षात्कार हा ‘अधियज्ञ’ आहे. आता देवळात गेल्यावर आपल्याला जे पवित्र, शुद्ध आणि सात्विक वगैरे वाटते ते अव्यक्त असते. केवळ देवळात गेल्यावरच तसा अनुभव यावा का? देव तर सगळीकडे आहे. प्रत्यक्ष आपल्यातही आहे. मग पावित्र्य, सात्विक भाव हे आपल्याच अंतरी आहेत याची जेव्हा जाणीव होते तेव्हा जड आणि चैतन्य दोन्ही तत्वांच्या पार दिसायला लागते. जणु त्यांची आहुती पडते, बुद्धी शुद्ध होते आणि अधियज्ञ साकार होतो. म्हणजे आपल्याला आपल्यातीलच परब्रह्माची जाणीव होते.
अधियज्ञ म्हणजे मी स्वतः हे श्रीकृष्ण म्हणतो ते या अर्थाने. अधि-आत्म (अध्यात्म) म्हणजे स्व-भाव जाणणे. अधियज्ञ म्हणजे स्वतःच स्वतःला पावन करणारा यज्ञ.
आता राहीला अर्जुनाचा शेवटचा प्रश्न. प्रयाणकाली किंवा मरतेसमयी स्थिरमती व्यक्तीने काय जाणायचे आहे. उत्तर अगदी सोपे आहे. श्रीकृष्ण त्याला एक साधे तत्व सांगतो.

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्‌ । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः।
हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला त्याला तो जाऊन मिळतो. कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो.

मनुष्य अनन्यभावनेने ज्या गोष्टीचे चिंतन करत असतो तो अंतिमतः त्या अवस्थेला जाऊन मिळतो.
मराठीत एक छान म्हण आहे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस… ज्या व्यक्तीच्या मनात भीती असते त्याला सतत त्याचेच प्रतिबिंब आजूबाजूला दिसते. वरवर धाडसीपणाचा आव आणणारे असे कितीतरी शूर वीर आपण आजूबाजूला पाहतो! ज्याच्या मनात शांत समाधानी भाव असतात त्याला आसमंतात त्याचाच प्रत्यय येतो. मग जो सातत्याने अनन्यभावाने परमात्म्याचे चिंतन करेल त्याला परमात्मा प्राप्त होणे सहाजिकच नाही का? तत्व साधे आहे. जसा भाव तसा देव! एकनाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे.
भाव तोंचि देव ।ये अर्थी संदेह धरूं नका।
भाव भक्ति फळे भावें देव मिळे। निजभावें सोहाळे स्वानंदाचे।
भावचि कारण भावचि कारण ।यापरतें साधन नाहीं नाहीं।
एका जनार्दनीं भावाच्या आवडी ।मनोरथ कोडी पुरती तेथें।
म्हणूनच श्रीकृष्ण सांगतो की,

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्‌ । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः।
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्‌।

जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्वकाळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन-बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निःसंशय मलाच येऊन मिळशील.

(गंमतीचा भाग असा की या श्लोकांतील अनन्यभक्तीचा भाव वगळून केवळ ‘मामनुस्मर युध्य च’ हा भाग प्रसिद्ध करुन त्यायोगे गीतेत हिंसेचा प्रसार केला आहे असा भास करुन दिला जातो!! गीता किंवा एकूणच प्राचीन भारतीय वाङ्मयाच्या अयोग्य अन्वयार्थाबद्दल पुन्हा कधीतरी…..)

परमेश्वराच्या साक्षात्कार घडविणाऱ्या गीतेतील अध्यायांच्या गटातील अक्षरब्रह्मयोग येथेच संपन्न करुयात.

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

One thought on “अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)”

  1. मला गीतेमधला यज्ञाचा अर्थ आजपर्यंत व्यवस्थित समजला नव्हता पण तुम्ही दिलेल्या विषलेष्णामुळे आता समजला. धन्यवाद…

Leave a Reply

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact