अंतरंग-भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग (अंतिम)

सातव्या अध्यायाच्या अंतिम श्लोकात, भक्तीचे आणि भगवंताच्या साक्षात्काराचे स्वरुप सांगत असताना, श्रीकृष्ण ‘अधिभूत’, ‘अधिदैव’ आणि ‘अधियज्ञ’ अशा संज्ञा वापरतो. त्यांचे अर्थ पुरसे न समजल्याने अर्जुन त्याला अध्यात्मासह सर्व संज्ञांचा अर्थ विचारतो. त्यामुळे आठव्या अध्यायात श्रीकृष्ण त्याला या सर्व संकल्पना विस्ताराने समजावून सांगतो. त्यानंतर अर्थातच तो आपली वि-ज्ञानाची चर्चा पुढे चालू ठेवतो. म्हणूनच ‘राजविद्याराजगुह्ययोग’ हा अध्याय खरंतर ज्ञानविज्ञानयोगाचा पुढील भागच म्हणायला हवा. या अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकात श्रीकृष्ण हे स्पष्ट करतो.

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌॥
दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू अ-शुभापासून मुक्त होशील.

ज्ञानविज्ञानात सांगितलेले विशेष ज्ञान असो किंवा त्याही आधी विषद केलेले ज्ञान आणि कर्मयोग, श्रीकृष्ण वारंवार त्याच तत्वांचा पुनरुच्चार करतो, उदाहरणे देतो. त्यामुळे अर्जुनाच्या मनातील शंका दूर होतात आणि आपल्याही!
नवव्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतो की –
‘प्रत्येक युगाच्या अंती सर्व भूतमात्र मला येऊन मिळतात आणि नवीन युगाच्या आरंभी मी त्यांचे पुनः सर्जन करतो.’
येथे हे ध्यानात घेतले पाहीजे की – या श्लोकातील ‘मी’ हा सृष्टीकर्ता परमात्मा आहे. श्रीकृष्ण हे त्या परमात्म्याने धारण केलेले एक मूर्त रूप (अवतार) आहे.
येथे अवतार या शब्दाचा नीट अर्थ समजून घेणे उचित ठरेल. अव + तृ याचा अर्थ (खाली) उतरणे असा होतो. परमात्मा जेव्हा मूर्त रुपाने खाली (येथे भूलोकात) उतरतो तेव्हा त्यास अवतार असे म्हणतात. एका अर्थाने परमात्म्याच्या अंशरुपाने अवतीर्ण झालेले मूर्त रुप (अवतार) हे आपल्यासारखेच भूतमात्र आहे. कारण आपल्यातही त्याच परमात्म्याचा अंश आहे. म्हणूनच राम काय किंवा कृष्ण काय हे भूतलावर अवतीर्ण झाल्यानंतर सामान्य मनुष्याप्रमाणे जीवन व्यतीत करतात, सुखदुःख भोगतात. आपल्यात आणि त्यांच्यात फरक इतकाच की जे तत्व जाणायला आपल्याला अनेक जन्म लागतात ते तत्व त्यांना याच जन्मी उमगते. त्याप्रमाणे आयुष्य व्यतीत करून ते पुन्हा परमात्म्यात विलिन होतात.
श्रीकृष्णही अर्जुनाला हेच सांगतोय.

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्‌ । कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्‌॥
हे कौन्तेया (कुंतीपुत्रा), कल्पाच्या (युगाच्या) शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो.

मी जरी त्यांना उत्पन्न करत असलो तरी या कर्माचे फल मला बाधत नाही. कारण हे सर्जन अत्यंत निष्काम वृत्तीनेच मी करतो. कर्मसिद्धांतानुसार फळाच्या अपेक्षेशिवाय, निष्काम वृत्तीने केलेल्या कर्माचे बंधन बाधत नाही. म्हणूनच श्रीकृष्ण पुढे म्हणतो की प्रत्येक भूतमात्र हे कर्माच्या फलस्वरुप माझ्यापासून उत्पन्न होतात. परंतु मी त्यांच्यात नसतो. कारण प्रत्येकाच्या कर्मफलानुसार त्याचे सर्जन होते आणि हे कर्म मी निष्काम भावनेने करतो.

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः॥
अव्यक्त (अशा) मी (परमात्म्याने) हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत. पण मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही.

म्हणूनच जसा मी, कर्माच्या ठायी उदासीन असतो तसे उदासीन राहणारा व्यक्तीही जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्त होऊन मला येऊन मिळतो.परंतु याउलट हा भाव न जाणणारे मूढ लोक, अवतार घेऊन कर्म करणाऱ्या मला सामान्य मनुष्य समजतात. सकाम भक्ती करणारे लोकही याच प्रकारे कर्मबंधनाने बाधित होतात, असे श्रीकृष्ण म्हणतो.
ज्ञानविज्ञानयोगात श्रीकृष्णाने भक्तांचे चार प्रकार सांगितले आहेत. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासु आणि ज्ञानी. यातील सकाम भक्ती करणारे अर्थार्थी, आर्त आणि जिज्ञासु भक्त परमेश्वराला तत्वतः जाणत नाहीत. ते काही एक उद्दीष्ट्य समोर ठेवून भक्ती/उपासना करतात. म्हणूनच मग आपल्या कर्मासंबंधी उदासीनता प्राप्त होत नसल्याने जन्ममृत्युच्या चक्रात अडकतात. आपल्या कर्माच्या फलस्वरुप पुण्य प्राप्त करुन स्वर्गात जातात. पुण्यक्षय झाल्यानंतर पुन्हा मृत्युलोकात येतात.

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति। एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते।
ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्युलोकात येतात. अशा रीतीने तिन्ही वेदात सांगितलेल्या, सकाम कर्मांचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये-जा करीत असतात. (अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्युलोकात येतात.)

अतिशय साधे परंतु परिणामकारक तत्व येथे श्रीकृष्ण सांगतो. जो ज्याची इच्छा, कामना किंवा भक्ती करतो तो त्या गतीला प्राप्त होतो.

(आपला शाहरुख ते …कायनात वगैरे वाल्या शेरात तरी दुसरे काय सांगतो म्हणा :P)

यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रताः । भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्‌।
देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही.

अशाप्रकारे जे ज्याचे उपास्य दैवत तो त्या गतीला पोचतो. भौतिक सुख हवे तर त्याची उपासना करा, वस्तु किंवा पद हवे तर त्याची. व्यक्ती जसे आणि जितके प्रयत्न करेल त्यानुसार फळ त्याला मिळेल यात शंका नाही.
मग जर परमात्म्याला प्राप्त करायचे तर भक्तीही परमात्म्याचीच करायला हवी!

तानसेनाची एक सुंदर कथा आहे.
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने तानसेन दरबाराला मोहून टाकत असतो. अकबराला असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन त्या तुलनेत काहीच नाही. माझ्या गुरुंचे गाणे हे अलौकीक असा साक्षात्कार देणारे गाणे असते. मी त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. अकबराच्या हट्टापायी दोघेही तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेत गुरुदेवांची भेट घडते. एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय आणि निसर्गासह आपल्या शरीरातील कणन् कण केवळ गाणं ऐकतोय असा अलौकिक अनुभव अकबराला येतो! संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव निघुन गेलेले असतात. सहाजिकच अकबर तानसेनाला विचारतो की अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो, “मी भूतलावरील अनेकांपैकी एका राजाला प्रसन्न करण्यासाठी गातो तर माझे गुरुदेव हे एकमेवाद्वितीय अशा अनन्य भगवंताला प्रसन्न करण्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला! जो ज्याची उपासना करतो त्याला तशी गती प्राप्त होते.

येथे शेवटचे वाक्य नीट समजून घेतले पाहीजे. अनेकदा असे सांगितले जाते की खुप पुण्य केले की मोक्ष प्राप्ती होते. हे अर्धसत्य आहे. पुण्याची प्राप्त केल्याने उत्तम गती प्राप्त होते कारण ते एक चांगले कर्म आहे. चांगले कर्म चांगली गती असे साधे सूत्र आहे. म्हणून मग पुण्यात्मा स्वर्गस्थ होईल आणि पुण्यक्षय झाला की पुन्हा भूलोकी जन्म घेईल. पाप पुण्य, सुखदुःख किंवा चांगले वाईट हे परस्परविरोधी अवस्था दाखविणारे हे भोग आहेत. पाप केलं दुःख प्राप्त होते, पुण्य केले सुख प्राप्त होते. मोक्ष याच्या पलिकडे आहे. मोक्ष म्हणजे पाप आणि पुण्य या दोन्हीच्याही पुढची अवस्था आहे. म्हणून त्याच्या विरुद्धार्थी अवस्थाच नसते! परमात्म्याची प्राप्ती ही अनन्यसाधारण अवस्था आहे म्हणूनच त्याची भक्ती ही अनन्यभावनेनेच केली पाहीजे.
हे झाले सकाम भक्तीबद्दल…
श्रीकृष्णाला आवडणारा ज्ञानी भक्त मात्र भगवंताचे अनन्य स्वरुप जाणतो आणि त्याची निष्काम उपासना करतो. त्यामुळे कर्माची बंधने टाळून परमगती प्राप्त करतो.

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्‌।
परंतु हे पार्था, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षरस्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात.

म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतो की जे अशा प्रकारे अनन्यभावाने माझी भक्ती करतात त्यांना त्यांची योग्य गती मी प्राप्त करून देतो.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌।
जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.

योगक्षेमम् वहाम्यहम्। या उक्तीचा असा अर्थ घ्यायचा आहे.
अशाप्रकारे ज्ञानविज्ञानयोगात प्रारंभ केलेले परमात्म्याच्या साक्षात्काराचे विवेचन येथे नवव्या अध्यायात श्रीकृष्ण पूर्ण करतो.

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः।

परस्परविरोधी वाटणारे परंतु कर्मसिद्धांताचे समर्थन करणारे हे तत्व जाणणे ही खरी श्रेष्ठ विद्या आहे म्हणून याला राजविद्या असे म्हटले आहे. पाप पुण्याच्या कोष्टकातील सकाम भक्तीच्याही पुढे जाऊन निष्काम भावनेने परमात्म्याची भक्ती केल्यासच त्याची प्राप्ती होते हे खरे गुह्य (गुपित किंवा गुढ तत्व) म्हणूनच या अध्यायाचे नाव राजविद्याराजगुह्ययोग असे ठेवले आहे.

**गंमतीचा भाग असा की राजगुह्य या शब्दाचे दोन्ही भाग हे एकमेकांचे हिंदी आणि मराठी प्रतिशब्दच आहेत.

असो भगवंताच्या साक्षात्काराबद्दल पुढील भागात.

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

Copyright https://sheetaluwach.com/2021 © #sheetaluwach

अंतरंग-भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

अध्याय नववा

बघता बघता, भगवद्गीतेचे अंतरंग समजून घेण्याच्या प्रयत्नात आता आपण जवळपास अर्धे अंतर पार केलं. १८ अध्यायांच्या गीतेच्या मध्यभाग म्हणजे नववा अध्याय असं मानायला हरकत नाही. (याच अध्यायातील १३ वा आणि १४वा श्लोक हे गीतेच्या मध्यभागी येतात. त्याबद्दल पुढे कधीतरी) ‘राजविद्याराजगुह्ययोग’ असे भले मोठे नाव असणारा हा अध्याय, अक्षय कुमारच्या ओह माय गॉड (Oh My God) या सिनेमामुळे अचानक प्रकाशात (मराठीत – लाईमलाईट!) आला. या सिनेमात परेश रावल आपल्या युक्तीवादात नवव्या अध्यायातल्या आठव्या श्लोकाचा उल्लेख करतो. त्यामुळे या अध्यायाच्या वाचकात अचानक वाढ झाली! पण मग लोक केवळ या अध्यायाचेच भाषांतर किंवा निरुपण वाचून गीतेत ‘…असे म्हटले आहे’ किंवा ‘…तसे म्हटले आहे’ असे सांगायला लागले. गंमतीचा भाग असा की बाकीचे अध्याय सोडून एकदम नवव्या अध्यायात जे म्हटले आहे त्याचा अर्थ लावल्याने समजापेक्षा गैरसमज अधिक फोफावले!

जिना चढताना एकदम नववी पायरी घ्यावी आणि पाय अवास्तव ताणल्याने पडावे किंवा अवघडावे तशी अनेकांची अवस्था झाली! आपण आधी पाहिल्याप्रमाणे गीतेच्या १८ अध्यायांचा सोपान ही अतिशय जाणीवपूर्वक रचलेली विचारांची साखळी आहे. कोणत्याची श्लोकाचा त्याच्या आधीच्या आणि चालू अध्यायाच्या योग्य संदर्भाशिवाय उल्लेख केल्यास त्याच्या अर्थाचा विपर्यास होण्याचा धोका असतो. हे आपण मागच्या अध्यायात पाहिलेच आहे. (पहा – अक्षरब्रह्मयोग). या अध्यायातही अशी उदाहरणे मिळतील. वानगीदाखल नवव्या अध्यायातले एक उदाहरण घेऊ.
आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला एलआयसी (LIC) चे बोधवाक्य ठाऊक आहे.
योगक्षेमं वहाम्यहम्।।
या उद्गारांचा शब्दशः अर्थ –
‘मी (अहम्) उपजिविकेचा भार (योगक्षमम्) वहन करेन (वहामि)’
असा होतो.याचा अर्थ तुमच्या उपजिविकेचा भार एलआयसी वाहणार आहे. आता हे बोधवाक्य वाचून जर प्रत्येकजण एलआयसीच्या दारात उभा रहायला लागला तर त्याला काय म्हणावे!!?
हे बोधवाक्य आहे. त्यातून बोध घ्यायचा आहे गैरसमज नव्हे. बोध घ्यायचा तर त्या वाक्याचा ससंदर्भ अर्थ ध्यानात घ्यायला हवा.
पूर्ण श्लोक असा आहे

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌।
जे अनन्य प्रेमी भक्त माझे (परमेश्वराचे) निरंतर चिंतन करीत (मला) निष्काम भावाने भजतात, त्या नित्य चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.

म्हणजे काय, तर जे लोक नित्यनियमितपणे एलआयसीची भक्ती करतात (पॉलिसीचे हप्ते भरतात) त्यांच्या उपजिविकेची काळजी एलआयसी करेल. जे अर्थातच खरे आहे. पण केवळ अर्धेच वचन वाचून त्याचा अर्थ घ्यायला जाणाऱ्याची फजिती होणे सहाजिकच नाही का?
(पुलंना घर दाखवणारा कुळकर्णी जेव्हा ‘हा वर जायचा रस्ता! ’ असे म्हणतो तेव्हा घर दाखविण्याचा संदर्भ लक्षात न घेता अर्थ घेतला तर भलताच समज व्हायचा… (पहा – मी आणि माझा शत्रुपक्ष)

आता सिनेमातल्या श्लोकाकडे पहा

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः । भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्।
आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूतसमुदायाला मी वारंवार उत्पन्न करतो.

येथे ‘मी उत्पन्न करतो’ इतकाच अर्थ घेऊन ‘सृष्टीची उत्पत्ती आणि नाश भगवंताच्या इच्छेने होतो’ असे म्हणणे हे केवळ अर्धसत्य झाले. व्यक्तीच्या कर्मानुरुप गती त्याला प्राप्त होते हे श्रीकृष्णाने आधीच्या अध्यायात सांगून ठेवले आहे. तसेच या आधीच्या सातव्या श्लोकात (९-७)

‘कल्पाच्या किंवा युगाच्या आरंभी संपूर्ण भूतमात्र माझ्यात विलिन होते आणि मी त्याचे पुनः सर्जन करतो’

असेही श्रीकृष्ण सांगतो. याचा अर्थ व्यक्ती जसे कर्म करेल तसे फळ त्याला मिळेल.
संपूर्ण सृष्टीचक्राला हा नियम लागू पडतो. जरूरीपेक्षा जास्त वाढलेली वृक्षाची फांदी बुंध्याला वजन न पेलल्यामुळे तुटुन पडते. आवश्यकतेपेक्षा जास्तीचे अतिक्रमणाने निसर्गाचा समतोल ढळतो व त्याच्या परिणामस्वरुप नैसर्गिक आपत्ती येते. म्हणूनच बेसुमार वृक्षतोड, खाणकाम किंवा प्रदुषण करणाऱ्या माणसांच्या समुहाला पूर, ज्वालामुखी, भूकंप किंवा त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागते हे त्याच्या स्वतःच्या कर्माचे फळ नव्हे काय? तेथे ईश्वराच्या शक्तीला दोष देणे, तेही एका वेगळ्या काढलेल्या श्लोकाच्या संदर्भाने, हे अयोग्य आहे.
मौजेचा भाग म्हणजे सिनेमाच्या अंतिम भागात प्रत्यक्ष देवच माणसाच्या मूर्खपणाचे वाभाडे काढतो. श्रीकृष्ण (कुमार अक्षय!) श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला भेद सांगतो. धर्माच्या नावाखाली मानवाने देवावर कसे अतिक्रमण केले हे तो दाखवून देतो. म्हणूनच मग सृष्टीच्या सर्जनामागचे मूळ तत्व एकच आहे हे विसरून अनेक धर्म, अनेक पंथ आणि अनेक देव(!) कसे निर्माण केले जातात, याच निर्मात्यांचे भाऊबंद असणारे उरलेले मानव याला कसे बळी पडतात हेही तो सांगतो! जे श्लोकाचा, धर्मग्रंथाचा आणि पर्यायाने ईश तत्वाचा विपरीत अर्थ खरा समजून अंधश्रद्धेत गुरफटून जातात. त्यांच्या विनाशाला ते स्वतः च कारणीभूत ठरतात देव नाही.
सिनेमात शेवटी श्रीकृष्ण जे सांगतो ते गुपित म्हणजेच राजविद्या-राजगुह्य-योग. त्याबद्दल अधिकचे पुढील भागात…

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact
Exit mobile version