भगवद्गीता – अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग

अर्जुन उवाच
संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्‌ ॥ ५-१ ॥
अन्वय

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, कृष्ण = हे कृष्णा, कर्मणाम्‌ = कर्मांच्या, संन्यासम्‌ = संन्यासाची, च = तसेच, पुनः = त्यानंतर, योगम्‌ = कर्मयोगाची, शंससि = प्रशंसा करीत आहात, (अतः) = म्हणून, एतयोः = या दोहोंतील, यत्‌ = जे, एकम्‌ = एक, मे = माझ्यासाठी, सुनिश्चितम्‌ = चांगल्याप्रकारे निश्चित, श्रेयः = कल्याणकारक साधन (होईल), तत्‌ = ते, ब्रूहि = तुम्ही (मला) सांगा
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता! तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल, ते सांगा.
/ श्रीभगवानुवाच
संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ ५-२ ॥
अन्वय

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, संन्यासः = कर्मसंन्यास, च = आणि, कर्मयोगः = कर्मयोग, उभौ = हे दोन्हीही, निःश्रेयसकरौ = परम कल्याण करणारे आहेत, तु = परंतु, तयोः = त्या दोन्हींमध्येही, कर्मसंन्यासात्‌ = कर्मसंन्यासापेक्षा, कर्मयोगः = कर्मयोग (हा साधण्यास सुगम असल्यामुळे), विशिष्यते = श्रेष्ठ आहे
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत. परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे.
ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति । निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥ ५-३ ॥
अन्वय

महाबाहो = हे महाबाहो अर्जुना, यः = जो मनुष्य, न द्वेष्टि = (कोणाचाही) द्वेष करीत नाही, न काङ्क्षति = कशाचीही आकांक्षा करीत नाही, सः = तो कर्मयोगी, नित्यसंन्यासी = सदा संन्यासीच, ज्ञेयः = समजण्यास योग्य आहे, हि = कारण, निर्द्वन्द्वः = राग-द्वेषादि द्वंद्वांनी रहित असा तो, बन्धात्‌ = संसारबंधनातून, सुखम्‌ = सुखाने, प्रमुच्यते = मुक्त होऊन जातो
अर्थ
हे महाबाहो अर्जुना, जो मनुष्य कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण राग-द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला मनुष्य सुखाने संसारबंधनातून मुक्त होतो.
सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम्‌ ॥ ५-४ ॥
अन्वय

बालाः = मूर्ख लोकच, सांख्ययोगौ = संन्यास व कर्मयोग हे, पृथक्‌ = वेगवेगळी फळे देणारी आहेत असे, प्रवदन्ति = म्हणतात (परंतु), न पण्डिताः = पंडितजन तसे म्हणत नाहीत, (हि) = कारण दोन्हीतील, एकम्‌ अपि = एकामध्येही, सम्यक्‌ = योग्य प्रकाराने, आस्थितः = स्थित असणारा मनुष्य, उभयोः = दोन्हींचे, फलम्‌ = फळरूप (परमात्मा), विन्दते = प्राप्त करून घेतो
अर्थ
वर सांगितलेले संन्यास आणि कर्म योग वेगवेगळी फळे देणारे आहेत, असे मूर्ख लोक म्हणतात; पंडित नव्हेत. कारण दोहोंपैकी एकाच्या ठिकाणीसुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला मनुष्य दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो.
यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ ५-५ ॥
अन्वय

यत्‌ = जे, स्थानम्‌ = परमधाम, सांख्यैः = ज्ञानयोग्यांकडून, प्राप्यते = प्राप्त करून घेतले जाते, तत्‌ = तेच, (स्थानम्‌) = परमधाम, योगैः = कर्मयोग्यांकडून, अपि = सुद्धा, गम्यते = प्राप्त करून घेतले जाते, सांख्यम्‌ = ज्ञानयोग, च = आणि, योगम्‌ = कर्मयोग (हे फलरूपाने), एकम्‌ = एक आहेत असे, यः = जो मनुष्य, पश्यति = पाहतो, सः च = तोच, पश्यति = यथार्थ पाहतो
अर्थ
ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते; तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत, असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो.
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ॥ ५-६ ॥
अन्वय

तु = परंतु, महाबाहो = हे महाबाहो अर्जुना, अयोगतः = कर्मयोगाशिवाय, संन्यासः = संन्यास म्हणजे मन, इंद्रिये व शरीर यांच्या द्वारे होणाऱ्या सर्व कर्मांच्या कर्तेपणाचा त्याग, आप्तुम्‌ = प्राप्त होणे, दुःखम्‌ = कठीण आहे, मुनिः = भगवत्स्वरूपाचे चिंतन करणारा, योगयुक्तः = कर्मयोगी, ब्रह्म = परब्रह्म परमात्म्याला, नचिरेण = लवकरच, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो
अर्थ
परंतु हे महाबाहो अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. आणि भगवत्स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो.
योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ५-७ ॥
अन्वय

विशुद्धात्मा = ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे, विजितात्मा = ज्याचे मन त्याच्या स्वाधीन आहे, जितेन्द्रियः = जो जितेंद्रिय आहे, (च) = आणि, सर्वभूतात्मभूतात्मा = सर्व सजीवांचा आत्मरूप परमात्मा हाच ज्याचा आत्मा आहे असा, योगयुक्तः = कर्मयोगी, कुर्वन्‌ अपि = कर्म करीत असताना सुद्धा, न लिप्यते = लिप्त होत नाही
अर्थ
ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रियनिग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व सजीवांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहातो.
नैव किञ्चित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्‌ ।
पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन्‌ ॥ ५-८ ॥
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्‌ ॥ ५-९ ॥
अन्वय

पश्यन्‌ = पाहाताना, शृण्वन्‌ = ऐकताना, स्पृशन्‌ = स्पर्श करताना, जिघ्रन्‌ = वास घेताना, अश्नन्‌ = भोजन करताना, गच्छन्‌ = गमन करताना, स्वपन्‌ = झोपताना, श्वसन्‌ = श्वास घेताना, प्रलपन्‌ = बोलताना, विसृजन्‌ = त्याग करताना, गृह्णन्‌ = घेताना, (तथा) = तसेच, उन्मिषन्‌ = डोळे उघडताना, (च) = आणि, निमिषन्‌ = डोळे मिटताना, अपि = सुद्धा, इन्द्रियाणि = सर्व इंद्रिये, इन्द्रियार्थेषु = आपापल्या विषयांत, वर्तन्ते = व्यवहार करीत आहेत, इति = असे, धारयन्‌ = समजून, तत्त्ववित्‌ = तत्त्व जाणणाऱ्या, युक्तः = सांख्यायोगी मनुष्याने, एव = निःसंदेहपणे, इति = असा, मन्येत = विचार करावा की, किञ्चित्‌ = काही सुद्धा, न करोमि = मी करीत नाही
अर्थ
सांख्यायोगी तत्त्ववेत्त्याने पाहात असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोच्छ्वास करीत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, तसेच डोळ्यांनी उघडझाप करीत असतानाही सर्व इंद्रिये आपापल्या विषयांत वावरत आहेत, असे समजून निःसंशय असे मानावे की, मी काहीच करीत नाही.
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥ ५-१० ॥
अन्वय

ब्रह्मणि = परमात्म्यामध्ये, कर्माणि = सर्व कर्मे, आधाय = अर्पण करून, (च) = आणि, सङ्गम्‌ = आसक्तीचा, त्यक्त्वा = त्याग करून, यः = जो मनुष्य, (कर्म) = कर्म, करोति = करतो, सः = तो मनुष्य, अम्भसा = पाण्याने, पद्मपत्रम्‌ इव = कमळाच्या पानाप्रमाणे, पापेन = पापाने, न लिप्यते = लिप्त होत नाही
अर्थ
जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही.
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ ५-११ ॥
अन्वय

योगिनः = कर्मयोगी (ममत्व बुद्धीने रहित होऊन), केवलैः = केवळ, आत्मशुद्धये = अंतःकरणाच्या शुद्धीसाठी, इन्द्रियैः = इंद्रियांनी, मनसा = मनाने, बुद्ध्या = बुद्धीने, (च) = तसेच, कायेन अपि = शरीरानेही होणारी, कर्म = सर्व कर्मे, सङ्गम्‌ = आसक्तीचा, त्यक्त्वा = त्याग करून, कुर्वन्ति = करतात
अर्थ
कर्मयोगी ममत्वबुद्धी सोडून केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारे आसक्ती सोडून कर्म करतात.
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्‌ ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥ ५-१२ ॥
अन्वय

कर्मफलम्‌ = कर्माच्या फळाचा, त्यक्त्वा = त्याग करून, युक्तः = कर्मयोगी, नैष्ठिकीम्‌ = भगवत्प्राप्तीरूप, शान्तिम्‌ = शांती, आप्नोति = प्राप्त करून घेतो, (च) = आणि, अयुक्तः = सकाम पुरुष, कामकारेण = कामनेच्या प्रेरणेने, फले = फळामध्ये, सक्तः = आसक्त होऊन, निबध्यते = बंधनात पडतो
अर्थ
कर्मयोगी कर्मांच्या फळांचा त्याग करून भगवत्‌प्राप्तीरूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळांत आसक्त होऊन बद्ध होतो.
सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्‌ ॥ ५-१३ ॥
अन्वय

वशी = ज्याला अंतःकरण वश आहे असा सांख्ययोगाचे आचरण करणारा, देही = पुरुष, न कुर्वन्‌ = काही न करता, (च) = तसेच, न कारयन्‌ एव = काहीही न करविताच, नवद्वारे = नऊ द्वारे असणाऱ्या शरीररूपी, पुरे = घरात, सर्वकर्माणि = सर्व कर्मांचा, मनसा = मनाने, संन्यस्य = त्याग करून, सुखम्‌ = आनंदपूर्वक (सच्चिदानंदघन परमात्म्याच्या स्वरूपात), आस्ते = राहातो
अर्थ
अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे, असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच नऊ दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंदघन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहातो.
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ ५-१४ ॥
अन्वय

लोकस्य = मनुष्यांचे, न कर्तृत्वम्‌ = न कर्तेपण, न कर्माणि = न कर्मे, न कर्मफलसंयोगम्‌ = न कर्मफळाशी संयोग, प्रभुः = परमेश्वर, सृजति = निर्माण करतो, तु = परंतु, स्वभावः = प्रकृतीच, प्रवर्तते = सर्व काही करते
अर्थ
परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण, कर्मे आणि कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाही; तर प्रकृतीच खेळ करीत असते.
नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ ५-१५ ॥
अन्वय

विभुः = सर्वव्यापी परमेश्वरसुद्धा, न कस्यचित्‌ पापम्‌ = ना कोणाचे पापकर्म, च = तसेच, न सुकृतम्‌ = ना (कोणाचे) शुभकर्म, एव = सुद्धा, आदत्ते = ग्रहण करतो, (किंतु) = परंतु, अज्ञानेन = अज्ञानाच्या द्वारे, ज्ञानम्‌ = ज्ञान, आवृतम्‌ = झाकले गेले आहे, तेन = त्यामुळे, जन्तवः = सर्व अज्ञानी माणसे, मुह्यन्ति = मोहित होतात
अर्थ
सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही. परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले गेले आहे. त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात.
ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्‌ ॥ ५-१६ ॥
अन्वय

तु = परंतु, येषाम्‌ = ज्यांचे, तत्‌ = ते, अज्ञानम्‌ = अज्ञान, आत्मनः = परमात्म्याच्या, ज्ञानेन = तत्त्वज्ञानाद्वारे, नाशितम्‌ = नष्ट केले गेले आहे, तेषाम्‌ = त्यांचे, (तत्‌) = ते, ज्ञानम्‌ = ज्ञान, आदित्यवत्‌ = सूर्याप्रमाणे, तत्परम्‌ = त्या सच्चिदानंदघन परमात्म्याला, प्रकाशयति = प्रकाशित करते
अर्थ
परंतु ज्यांचे ते अज्ञान परमात्मज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंदघन परमात्म्याला प्रकाशित करते.
तद्‍बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः ।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ ५-१७ ॥
अन्वय

तद्‍बुद्धयः = ज्यांची बुद्धी तद्रूप होत असते, तदात्मानः = ज्यांचे मन तद्रूप होत असते, (च) = आणि, तन्निष्ठाः = सच्चिदानंदघन परमात्म्यामध्येच ज्यांची सतत एकीभावाने स्थिती आहे असे, तत्परायणाः = तत्परायण पुरुष, ज्ञाननिर्धूतकल्मषाः = ज्ञानाच्या द्वारे पापरहित होऊन, अपुनरावृत्तिम्‌ = अपुनरावृत्ति म्हणजेच परमगति, गच्छन्ति = प्राप्त करून घेतात
अर्थ
ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानंदघन परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परम गतीला प्राप्त होतात.
विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ ५-१८ ॥
अन्वय

विद्याविनयसम्पन्ने = विद्या व विनय यांनी युक्त अशा, ब्राह्मणे = ब्राह्मणाच्या ठिकाणी, च = तसेच, गवि = गाईच्या ठायी, हस्तिनि = हत्तीच्या ठायी, शुनि = कुत्र्याच्या ठिकाणी, च = तसेच, श्वपाके = चांडाळाच्या ठिकाणी (सुद्धा), पण्डिताः = ज्ञानी लोक, समदर्शिनः एव = समदर्शीच (होतात)
अर्थ
ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहातात.
इहैव तैर्जितः सर्गो एषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिताः ॥ ५-१९ ॥
अन्वय

येषाम्‌ = ज्यांचे, मनः = मन, साम्ये = समभावामध्ये, स्थितम्‌ = स्थित आहे, तैः = त्यांच्याकडून, इह एव = या जीवित अवस्थेमध्येच, सर्गः = संपूर्ण संसार, जितः = जिंकला गेला आहे, हि = कारण, ब्रह्म = सच्चिदानंदघन परमात्मा, निर्दोषम्‌ = दोषरहित, (च) = आणि, समम्‌ = सम आहे, तस्मात्‌ = त्या कारणाने, ते = ते, ब्रह्मणि = सच्चिदानंदघन परमात्म्यामध्येच, स्थिताः = स्थित असतात
अर्थ
ज्यांचे मन समभावात स्थिर झाले आहे, त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला. कारण सच्चिदानंदघन परमात्मा निर्दोष आणि सम आहे. म्हणून ते सच्चिदानंदघन परमात्म्यातच स्थिर असतात.
न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्‌ ।
स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद्‌ ब्रह्मणि स्थितः ॥ ५-२० ॥
अन्वय

(यः) = जो पुरुष, प्रियम्‌ = प्रिय गोष्ट, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, न प्रहृष्येत्‌ = आनंदित होत नाही, च = तसेच, अप्रियम्‌ = अप्रिय गोष्ट, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, न उद्विजेत्‌ = उद्विग्न होत नाही, (सः) = तो, स्थिरबुद्धिः = स्थिरबुद्धी, असम्मूढः = संशयरहित, ब्रह्मवित्‌ = ब्रह्मवेत्ता, ब्रह्मणि = सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्यामध्ये, स्थितः = एकीभावाने नित्य स्थित असतो
अर्थ
जो पुरुष प्रिय वस्तु मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तु प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला, संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नित्य स्थित असतो.
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम्‌ ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥ ५-२१ ॥
अन्वय

बाह्यस्पर्शेषु = बाहेरच्या विषयांमध्ये, असक्तात्मा = आसक्तिरहित अंतःकरण असणारा साधक, आत्मनि = आत्म्यामध्ये (स्थित), यत्‌ = जो (ध्यान-जनित) सात्त्विक, सुखम्‌ = आनंद आहे, (तत्‌) = तो, विन्दति = प्राप्त करून घेतो, (तदनंतरम्‌) = त्यानंतर, सः = तो, ब्रह्मयोगयुक्तात्मा = सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगामध्ये अभिन्न भावाने स्थित असलेला पुरुष, अक्षयम्‌ = अक्षय, सुखम्‌ = आनंदाचा, अश्नुते = अनुभव घेतो
अर्थ
ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते, असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्त्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो.
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ ५-२२ ॥
अन्वय

संस्पर्शजा = इंद्रिये आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे, ये = जितके, भोगाः = भोग आहेत, ते = ते सर्व (जरी विषयलोलुप पुरुषांना सुखरूप वाटत असतात तरीसुद्धा), हि = निःसंदेहपणे, दुःखयोनयः एव = फक्त दुःखालाच कारण आहेत, (च) = आणि, आद्यन्तवन्तः = आदि-अन्त असणारे म्हणजे अनित्य आहेत, (अतः) = म्हणून, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, बुधः = बुद्धिमान विवेकी पुरुष, तेषु = त्यांच्या ठिकाणी, न रमते = रमत नाहीत
अर्थ
जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत, ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, बुद्धिमान विवेकी पुरुष त्यात रमत नाहीत.
शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात्‌ ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥ ५-२३ ॥
अन्वय

इह = या मनुष्यशरीरामध्ये, यः = जो साधक, शरीरविमोक्षणात्‌ प्राक्‌ एव = शरीराचा नाश होण्यापूर्वीच, कामक्रोधोद्भवम्‌ = काम व क्रोध यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या, वेगम्‌ = वेगाला, सोढुम्‌ = सहन करण्यास, शक्नोति = समर्थ होतो, सः = तोच, नरः = पुरुष, युक्तः = योगी आहे, (च) = आणि, सः = तोच, सुखी = सुखी आहे
अर्थ
जो साधक या मनुष्यशरीरात शरीर पडण्याआधीच काम-क्रोध यांमुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय आणि तोच सुखी होय.
योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ ५-२४ ॥
अन्वय

यः = जो पुरुष, एव = ब्रह्माच्या शिवाय काहीही नाही असा निश्चय करून, अन्तः सुखः = अंतरात्म्यातच आनंदानुभव करणारा आहे, अन्तरारामः = आत्म्यामध्येच रममाण होणारा आहे, तथा = त्याचप्रमाणे, यः = जो, अन्तर्ज्योतिः = आत्म्याच्या ज्योतीमध्ये ज्याचे ज्ञान प्रकाशित होते, सः = तो, ब्रह्मभूतः = सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याबरोबर एकीभाव प्राप्त करून घेतलेला, योगी = सांख्ययोगी, ब्रह्मनिर्वाणम्‌ = शांत ब्रह्माला, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो
अर्थ
जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, तो सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो.
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ ५-२५ ॥
अन्वय

क्षीणकल्मषाः = ज्यांची सर्व पापे नष्ट होऊन गेली आहेत, छिन्नद्वैधाः = ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे निवृत्त झालेले आहेत, सर्वभूतहिते = जे सर्व सजीवांच्या हितामध्ये, रताः = रत आहेत, (च) = आणि, यतात्मानः = ज्यांचे जिंकलेले मन हे निश्चलभावाने परमात्म्यात स्थित आहे (असे ते), ऋषयः = ब्रह्मवेत्ते पुरुष, ब्रह्मनिर्वाणम्‌ = शांत ब्रह्म, लभन्ते = प्राप्त करून घेतात
अर्थ
ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहेत, जे सजीवमात्रांच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते, ते ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात.
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्‌ ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्‌ ॥ ५-२६ ॥
अन्वय

कामक्रोधवियुक्तानाम्‌ = जे काम व क्रोध यांनी रहित आहेत, यतचेतसाम्‌ = ज्यांनी चित्त जिंकले आहे, विदितात्मनाम्‌ = ज्यांना परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार झाला आहे अशा, यतीनाम्‌ = ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत, अभितः = सर्व बाजूंनी, ब्रह्मनिर्वाणम्‌ = शांत परब्रह्म परमात्माच, वर्तते = परिपूर्ण भरलेला असतो
अर्थ
काम-क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांच्या सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण भरलेला असतो.
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥ ५-२७ ॥
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ ५-२८ ॥
अन्वय

बाह्यान्‌ = बाह्य, स्पर्शान्‌ = विषयभोगांना (त्यांचे चिंतन न करता), बहिः एव = बाहेरच, कृत्वा = सोडून देऊन, च = आणि, चक्षुः = नेत्रांची दृष्टी, भ्रुवोः = (दोन) भुवयांच्या, अन्तरे = मध्ये (स्थिर करून), (तथा) = तसेच, नासाभ्यन्तरचारिणौ = नासिकेमध्ये संचार करणाऱ्या, प्राणापानौ = प्राण व अपान या वायूंना, समौ = सम, कृत्वा = करून, यतेन्द्रियमनोबुद्धिः = ज्याने इंद्रिये, मन आणि बुद्धी जिंकलेली आहेत असा, यः = जो, मोक्षपरायणः = मोक्षपरायण, मुनिः = मुनी, विगतेच्छाभयक्रोधः = इच्छा, भय व क्रोध यांनी रहित झाला आहे, सः = तो, सदा = नेहमी, मुक्तः एव = मुक्तच असतो
अर्थ
बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून, दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान वायू सम करून, ज्याने इंद्रिये, मन व बुद्धी जिंकली आहेत, असा मोक्षतत्पर मुनी इच्छा, भय आणि क्रोध यांनी रहित झाला की, तो सदोदित मुक्तच असतो. ॥ ५-२७, ५-२८ ॥
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्‌ ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ ५-२९ ॥
अन्वय

यज्ञतपसाम्‌ = सर्व यज्ञ आणि तप यांचा, भोक्तारम्‌ = भोक्ता मी आहे, सर्वलोकमहेश्वरम्‌ = सर्व लोकांतील ईश्वरांचासुद्धा ईश्वर म्हणजे सर्वलोकमहेश्वर मी आहे, (तथा) = तसेच, सर्वभूतानाम्‌ = सर्व सजीवांचा, सुहृदम्‌ = सुहृद म्हणजे स्वार्थरहित दयाळू व प्रेम करणारा असा, माम्‌ = मी आहे हे, ज्ञात्वा = तत्त्वतः जाणून (माझा भक्त), शान्तिम्‌ = परम शांती, ऋच्छति = प्राप्त करून घेतो
अर्थ
माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, सजीवमात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमी, असे तत्त्वतः समजून शांतीला प्राप्त होतो.

अध्याय – ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग

श्रीभगवानुवाच
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्‌ ।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत्‌ ॥ ४-१ ॥
अन्वय
श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, इमम्‌ = हा, अव्ययम्‌ = अविनाशी, योगम्‌ = योग, अहम्‌ = मी, विवस्वते = सूर्याला, प्रोक्तवान्‌ = सांगितला होता, विवस्वान्‌ = सूर्याने (तो योग), मनवे = (आपला पुत्र वैवस्वत) मनू याला, प्राह = सांगितला, (च) = आणि, मनुः = मनूने, इक्ष्वाकवे = (आपला पुत्र) इक्ष्वाकू राजाला, अब्रवीत = सांगितला
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला.
एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप ॥ ४-२ ॥
अन्वय

परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना अर्जुना), एवम्‌ = अशाप्रकारे, परम्पराप्राप्तम्‌ = परंपरेने प्राप्त, इमम्‌ = हा योग, राजर्षयः = राजर्षींनी, विदुः = जाणला (परंतु त्यानंतर), सः = तो, योगः = योग, महता कालेन = काळाच्या मोठ्या ओघात, इह = या पृथ्वीलोकावर, नष्टः = जवळ जवळ नाहीसा झाला
अर्थ
हे परंतपा (अर्थात शत्रुतापना अर्जुना), अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी जाणला. परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला.
स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्‌ ॥ ४-३ ॥
अन्वय

(त्वम्‌) = तू, मे = माझा, भक्तः = भक्त, च = आणि, सखा = प्रिय मित्र, असि = आहेस, इति = म्हणून, सः एव = तोच, अयम्‌ = हा, पुरातनः = पुरातन, योगः = योग, अद्य = आज, मया = मी, ते = तुला, प्रोक्तः = सांगितला आहे, हि = कारण, एतत्‌ = हे, उत्तमम्‌ = मोठेच उत्तम, रहस्यम्‌ = रहस्य आहे म्हणजे गुप्त ठेवण्यास योग्य असा विषय आहे
अर्थ
तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस. म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे. कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे. अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे.
अर्जुन उवाच
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः ।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४-४ ॥
अन्वय

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, भवतः = तुमचा, जन्म = जन्म (तर), अपरम्‌ = अर्वाचीन म्हणजे अलीकडच्या काळातील आहे, (च) = आणि, विवस्वतः = सूर्याचा, जन्म = जन्म, परम्‌ = फार प्राचीन आहे म्हणजे कल्पाच्या आरंभी झालेला होता (तर मग), इति = ही गोष्ट, कथम्‌ = कशी, विजानीयाम्‌ = मी समजू की, त्वम्‌ = तुम्हीच, आदौ = कल्पाच्या आरंभी, (सूर्यम्‌) = सूर्याला, एतत्‌ = हा योग, प्रोक्तवान्‌ = सांगितलेला होता
अर्थ
अर्जुन म्हणाला, आपला जन्म तर अलीकडचा; आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता. तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता, असे कसे समजू?
श्रीभगवानुवाच
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप ॥ ४-५ ॥
अन्वय

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, परन्तप अर्जुन = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) अर्जुना, मे = माझे, च = आणि, तव = तुझे, बहूनि = पुष्कळ, जन्मानि = जन्म, व्यतीतानि = होऊन गेले आहेत, तानि = ते, सर्वाणि = सर्व, त्वम्‌ = तू, न वेत्थ = जाणत नाहीस, (किंतु) = परंतु, अहम्‌ = मी, वेद = जाणतो
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत. ते सर्व तुला माहीत नाहीत, पण मला माहीत आहेत.
अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्‌ ॥
प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया ॥ ४-६ ॥
अन्वय

(अहम्‌) = मी, अजः = जन्मरहित, (च) = आणि, अव्ययात्मा = अविनाशी स्वरूप असणारा, सन्‌ अपि = असून सुद्धा, (तथा) = तसेच, भूतानाम्‌ = सर्व प्राण्यांचा, ईश्वरः = ईश्वर, सन्‌ अपि = असूनही, स्वाम्‌ = स्वतःच्या, प्रकृतिम्‌ = प्रकृतीला, अधिष्ठाय = अधीन करून घेऊन, आत्ममायया = आपल्या योगमायेने, सम्भवामि = प्रकट होत असतो
अर्थ
मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥
अन्वय

भारत = हे भारता(भरतवंशी अर्जुना), यदा यदा = जेव्हा जेव्हा, धर्मस्य = धर्माची, ग्लानिः = हानि, (च) = आणि, अधर्मस्य = अधर्माची, अभ्युत्थानम्‌ = वृद्धी, भवति = होते, तदा हि = तेव्हा तेव्हा, अहम्‌ = मी, आत्मानम्‌ = आपले रूप, सृजामि = रचतो म्हणजे साकाररूपाने लोकांच्या समोर प्रकट होतो
अर्थ
हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥
अन्वय

साधूनाम्‌ = साधूंचा म्हणजे चांगल्या मनुष्यांचा, परित्राणाय = उद्धार करण्यासाठी, दुष्कृताम्‌ = पापकर्म करणाऱ्यांचा, विनाशाय = विनाश करण्यासाठी, च = आणि, धर्मसंस्थापनार्थाय = धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी, युगे युगे = युगायुगात, सम्भवामि = मी प्रकट होतो
अर्थ
सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो.
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ४-९ ॥
अन्वय

अर्जुन = हे अर्जुना, मे = माझा, जन्म = जन्म, च = आणि, कर्म = कर्म, दिव्यम्‌ = दिव्य अर्थात निर्मल व अलौकिक आहेत, एवम्‌ = अशाप्रकारे, यः = जो मनुष्य, तत्त्वतः = तत्त्वतः, वेत्ति = जाणून घेतो, सः = तो, देहम्‌ = शरीराचा, त्यक्त्वा = त्याग केल्यावर, पुनः जन्म = पुनर्जन्माला, न एति = येत नाही, (सः) = तो, माम्‌ = मलाच, एति = प्राप्त करून घेतो
अर्थ
हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्त्वतः जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो.
वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ ४-१० ॥
अन्वय

वीतरागभयक्रोधाः = (पूर्वीसुद्धा) ज्यांचे राग, भय आणि क्रोध हे सर्व प्रकारे नष्ट झाले होते, (च) = आणि, मन्मयाः = जे माझ्या ठिकाणी अनन्य प्रेमाने स्थित राहिले होते (अशा), माम्‌ = माझ्या, उपाश्रिताः = आश्रयाने राहाणाऱ्या, बहवः = पुष्कळ भक्तांनी, ज्ञानतपसा = उपर्युक्त ज्ञानरूपी तपाने, पूताः = पवित्र होऊन, मद्भावम्‌ = माझे रूप, आगताः = प्राप्त करून घेतले होते
अर्थ
पूर्वीसुद्धा ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहात होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत.
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्‌ ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ४-११ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ये = जे भक्त, माम्‌ = मला, यथा = ज्या प्रकाराने, प्रपद्यन्ते = भजतात, तथा एव = त्याचप्रकाराने, अहम्‌ = मी सुद्धा, तान्‌ = त्यांना, भजामि = भजतो (कारण), मनुष्याः = सर्व माणसे, सर्वशः = सर्व प्रकारांनी, मम = माझ्याच, वर्त्म = मार्गाचे, अनुवर्तन्ते = अनुसरण करतात
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जे भक्त मला जसे भजतात, मीही त्यांना तसेच भजतो. कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात.
काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ ४-१२ ॥
अन्वय

इह = या, मानुषे लोके = मनुष्यलोकात, कर्मणाम्‌ = कर्मांच्या, सिद्धिम्‌ = फळाची, काङ्क्षन्तः = इच्छा करणारे लोक, देवताः = देवतांचे, यजन्ते = पूजन करतात, हि = कारण (त्यांना), कर्मजा = कर्मांपासून उत्पन्न होणारी, सिद्धिः = सिद्धी, क्षिप्रम्‌ = शीघ्र, भवति = मिळून जाते
अर्थ
या मनुष्यलोकात कर्मांच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात. कारण त्यांना कर्मांपासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते.
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ ४-१३ ॥
अन्वय

चातुर्वर्ण्यं = ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णांचा समूह, गुणकर्मविभागशः = गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार, मया = माझ्याकडून, सृष्टम्‌ = रचला गेला आहे, तस्य = त्या सृष्टी-रचना इत्यादी कर्माचा, कर्तारम्‌ अपि = कर्ता असूनसुद्धा, अव्ययम्‌ = अविनाशी परमात्मा अशा, माम्‌ = मला, अकर्तारम्‌ = (खरे पाहता) अकर्ताच आहे, विद्धि = असे तू जाण
अर्थ
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांचा समूह, गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टिरचना इत्यादी कर्मांचा मी कर्ता असूनही मला-अविनाशी परमात्म्याला-तू वास्तविक अकर्ताच समज.
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥
अन्वय

कर्मफले = कर्मांच्या फळांमध्ये, मे = माझी, स्पृहा = स्पृहा, न = नसते, (अतः) = म्हणून, माम्‌ = मला, कर्माणि = कर्मे, न लिम्पन्ति = लिप्त करीत नाहीत, इति = अशाप्रकारे, यः = जो, माम्‌ = मला, अभिजानाति = तत्त्वतः जाणून घेतो, सः = तोसुद्धा, कर्मभिः = कर्मांनी, न बध्यते = बांधला जात नाही
अर्थ
कर्मांच्या फळांची मला स्पृहा नाही, त्यामुळे कर्मे मला लिप्त करीत नाहीत. अशा प्रकारे जो मला तत्त्वतः जाणतो, त्यालाही कर्मांचे बंधन होत नाही.
एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः ।
कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्‌ ॥ ४-१५ ॥
अन्वय

एवम्‌ = अशाप्रकारे, ज्ञात्वा = जाणूनच, पूर्वैः = पूर्वकालीन, मुमुक्षुभिः अपि = मुमुक्षूंच्याकडूनही, कर्म = कर्म, कृतम्‌ = केले गेले आहे, तस्मात्‌ = म्हणून, पूर्वैः = पूर्वजांनी, पूर्वतरम्‌ कृतम्‌ = नेहमी केलेली, कर्म एव = कर्मेच, त्वम्‌ (अपि) = तू सुद्धा, कुरु = कर
अर्थ
पूर्वीच्या मुमुक्षूंनीसुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्मे केली आहेत. म्हणून तूही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेच कर.
किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ ४-१६ ॥
अन्वय

कर्म किम्‌ = कर्म काय आहे, (च) = आणि, अकर्म = अकर्म, किम्‌ = काय आहे, इति = या बाबतीत, अत्र = निर्णय करण्यामध्ये, कवयः अपि = बुद्धिमान मनुष्यासुद्धा, मोहिताः = मोहित होऊन जातात, (अतः) = म्हणून, यत्‌ = जे, ज्ञात्वा = जाणल्यावर, अशुभात्‌ = अशुभापासून म्हणजे कर्मबंधनातून, मोक्ष्यसे = तू मोकळा होशील, तत्‌ = ते, (कर्म) = कर्मतत्त्व, ते = तुला, प्रवक्ष्यामि = नीटपणे समजावून सांगेन
अर्थ
कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील.
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ ४-१७ ॥
अन्वय

कर्मणः अपि = कर्माचे स्वरूपसुद्धा, बोद्धव्यम्‌ = जाणले पाहिजे, च = आणि, अकर्मणः = अकर्माचे स्वरूपसुद्धा, बोद्धव्यम्‌ = जाणून घ्यावयास हवे, च = तसेच, विकर्मणः = विकर्माचे स्वरूपसुद्धा, बोद्धव्यम्‌ = जाणले पाहिजे, हि = कारण, कर्मणः = कर्माची, गतिः = गती, गहना = गहन आहे
अर्थ
कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. कारण कर्मांचे तात्त्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे.
कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्‌ ॥ ४-१८ ॥
अन्वय

यः = जो माणूस, कर्मणि = कर्मामध्ये, अकर्म = अकर्म, पश्येत्‌ = पाहतो, च = आणि, यः = जो, अकर्मणि = अकर्मात, कर्म = कर्म, पश्येत्‌ = पाहतो, सः = तो, मनुष्येषु = मनुष्यांमध्ये, बुद्धिमान्‌ = बुद्धिमान आहे, (च) = आणि, सः = तो, युक्तः = योगी, कृत्स्नकर्मकृत्‌ = सर्व कर्मे करणारा आहे
अर्थ
जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहील आणि अकर्मामध्ये कर्म पाहील, तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे.
यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ ४-१९ ॥
अन्वय

यस्य = ज्याची, सर्वे = सर्व, समारम्भाः = शास्त्रसंमत कर्मे, कामसङ्कल्पवर्जिताः = कामना व संकल्प यांच्या विना असतात, (तथा) = तसेच, ज्ञानाग्निदग्धकर्माणम्‌ = ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारे भस्म झालेली असतात, तम्‌ = त्या महामनुष्याला, बुधाः = ज्ञानी, (अपि) = सुद्धा, पण्डितम्‌ = पंडित, आहुः = म्हणतात
अर्थ
ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित असतात, तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत, त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात.
त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥ ४-२० ॥
अन्वय

कर्मफलासङ्गम्‌ = सर्व कर्मे आणि त्यांची फळे यातील आसक्ती, त्यक्त्वा = (संपूर्णपणे) सोडून देऊन, (यः) = जो मनुष्य, निराश्रयः = भौतिक आश्रयाने रहित झालेला आहे, (च) = आणि, नित्यतृप्तः = परमात्म्यामध्ये नित्यतृप्त आहे, सः = तो, कर्मणि = कर्मांमध्ये, अभिप्रवृत्तः अपि = व्यवस्थितपणे वावरत असतानाही (वस्तुतः), न एव किञ्चित्‌ करोति = काहीही करत नाही
अर्थ
जो मनुष्य सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्यतृप्त असतो, तो कर्मांमध्ये उत्तमप्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही.
निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्‌ ॥ ४-२१ ॥
अन्वय

यतचित्तात्मा = ज्याने आपले अंतःकरण आणि इंद्रियांसहित शरीर जिंकले आहे, (च) = आणि, त्यक्तसर्वपरिग्रहः = सर्व भोगांच्या सामग्रीचा ज्याने परित्याग केला आहे असा, निराशीः = आशारहित असा सांख्ययोगी, केवलम्‌ = केवळ, शारीरम्‌ = शरीर-संबंधी, कर्म = कर्म, कुर्वन्‌ = करीत असताना, (अपि) = सुद्धा, किल्बिषम्‌ = त्याला पाप, न आप्नोति = लागत नाही
अर्थ
ज्याने अंतःकरण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोगसामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरसंबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही.
यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः ।
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥ ४-२२ ॥
अन्वय

(यः) = जो मनुष्य, यदृच्छालाभसन्तुष्टः = इच्छा नसताना आपोआप प्राप्त झालेल्या पदार्थांमध्ये संतुष्ट राहातो, विमत्सरः = ज्याच्या ठिकाणी ईर्ष्येचा संपूर्ण अभाव झालेला आहे, द्वन्द्वातीतः = जो हर्ष-शोक इत्यादी द्वंद्वांच्या पलीकडे संपूर्णपणे गेला आहे, सिद्धौ = सिद्धी, च = आणि, असिद्धौ = असिद्धी यांच्याबाबतीत, समः = समतोल राहाणारा कर्मयोगी, कृत्वा = कर्म करीत असताना, अपि = सुद्धा (त्या कर्मांनी), न निबध्यते = बद्ध होत नाही
अर्थ
जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थांत नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही.
गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ ४-२३ ॥
अन्वय

गतसङ्गस्य = ज्याची आसक्ती संपूर्णपणे नष्ट झाली आहे, मुक्तस्य = जो देहाभिमान आणि ममता यांनी रहित झाला आहे, ज्ञानावस्थितचेतसः = ज्याचे चित्त निरंतर परमात्म्याच्या ज्ञानामध्ये स्थित राहात आहे, यज्ञाय = (केवळ) यज्ञ संपादन करण्यासाठी, आचरतः = जो कर्म करीत आहे अशा माणसाचे, समग्रम्‌ = संपूर्ण, कर्म = कर्म, प्रविलीयते = पूर्णपणे विलीन होऊन जाते
अर्थ
ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात.
ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्‌ ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ ४-२४ ॥
अन्वय

(यस्मिन्‌ यज्ञे) = ज्या यज्ञात, अर्पणम्‌ (अपि) = अर्पण म्हणजे स्रुवा इत्यादी सुद्धा, ब्रह्म = ब्रह्म आहेत, (च) = आणि, हविः (अपि) = हवन करण्यास योग्य असे द्रव्य (सुद्धा), ब्रह्म = ब्रह्म आहे, (तथा) = तसेच, ब्रह्मणा = ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारे, ब्रह्माग्नौ = ब्रह्मरूप अग्नीमध्ये, हुतम्‌ = आहुति देणे (ही क्रिया सुद्धा ब्रह्म आहे), तेन = त्या, ब्रह्मकर्मसमाधिना = ब्रह्मकर्मामध्ये स्थित असणाऱ्या योग्याला, गन्तव्यम्‌ = प्राप्त करून घेण्यास योग्य (असे फळ सुद्धा), ब्रह्म एव = ब्रह्मच आहे
अर्थ
ज्या यज्ञात अर्पण अर्थात स्रुवा आदी ही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे, त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे.
दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥ ४-२५ ॥
अन्वय

अपरे = दुसरे, योगिनः = योगी लोक, दैवम्‌ = देवतांचे पूजनरूपी, यज्ञम्‌ एव = यज्ञाचेच, पर्युपासते = चांगल्याप्रकारे अनुष्ठान करीत राहतात, अपरे = दुसरे (योगी लोक), ब्रह्माग्नौ = परब्रह्म परमात्मरूप अग्नीमध्ये, यज्ञेन एव = (अभेद दर्शनरूपी) यज्ञाच्या द्वारेच, यज्ञम्‌ = आत्मरूप यज्ञाचे, उपजुह्वति = हवन करतात
अर्थ
दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात. तर इतर योगी परब्रह्म परमात्मारूपी अग्नीत अभेददर्शनरूप यज्ञाच्या द्वारेच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात.
श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥ ४-२६ ॥
अन्वय

अन्ये = अन्य योगी जन, श्रोत्रादीनि = श्रोत्र इत्यादी, इन्द्रियाणि = सर्व इंद्रियांचे, संयमाग्निषु = संयमरूपी अग्नीमध्ये, जुह्वति = हवन करतात, (च) = आणि, अन्ये = दुसरे योगी लोक, शब्दादीन्‌ = शब्द इत्यादी, विषयान्‌ = विषयांचे, इन्द्रियाग्निषु = इंद्रियरूपी अग्नीमध्ये, जुह्वति = हवन करतात
अर्थ
दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयमरूप अग्नीत हवन करतात तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात.
सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥ ४-२७ ॥
अन्वय

अपरे = दुसरे (योगीलोक), सर्वाणि इन्द्रियकर्माणि = इंद्रियांच्या संपूर्ण क्रिया, च = आणि, प्राणकर्माणि = प्राणांच्या संपूर्ण क्रिया, ज्ञानदीपिते = ज्ञानाने प्रकाशित झालेल्या, आत्मसंयमयोगाग्नौ = आत्मसंयमयोगरूपी अग्नीमध्ये, जुह्वति = हवन करतात
अर्थ
अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयमयोगरूपी अग्नी त्यात हवन करतात.
द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ ४-२८ ॥
अन्वय

अपरे = काही मनुष्य, द्रव्ययज्ञाः = द्रव्यासंबंधी यज्ञ करणारे आहेत, तपोयज्ञाः = तपस्यारूपी यज्ञ करणारे आहेत, तथा = तसेच (दुसरे काही लोक), योगयज्ञाः = योगरूपी यज्ञ करणारे आहेत, च = आणि, संशितव्रताः = अहिंसा इत्यादी कडक व्रतांनी युक्त (असे), यतयः = प्रयत्‍नशील मनुष्य, स्वाध्यायज्ञानयज्ञाः = स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे आहेत
अर्थ
काही मनुष्य द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काहीजण तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात. तसेच दुसरे काहीजण योगरूप यज्ञ करणारे असतात. अहिंसा इत्यादी कडकव्रते पाळणारे कितीतरी यत्‍नशील मनुष्य स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात.
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥ ४-२९ ॥
अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति ।
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ४-३० ॥
अन्वय

अपरे = दुसरे कितीतरी योगीजन, अपाने = अपान वायूमध्ये, प्राणम्‌ = प्राण वायूचे, जुह्वति = हवन करतात, तथा = त्याचप्रमाणे (इतर योगीलोक), प्राणे = प्राण वायूमध्ये, अपानम्‌ = अपान वायूचे, (जुह्वति) = हवन करतात, अपरे = अन्य कित्येक, नियताहाराः = नियमित आहार करणारे, प्राणायामपरायणाः = प्राणायाम-परायण मनुष्य, प्राणापानगती = प्राण व अपान यांच्या गतीचा, रुद्ध्वा = रोध करून, प्राणान्‌ = प्राणांचे, प्राणेषु = प्राणांमध्येच, जुह्वति = हवन करतात, एते = हे, सर्वे अपि = सर्व साधकही, यज्ञक्षपितकल्मषाः = यज्ञांच्या द्वारे पापांचा नाश करणारे, (च) = आणि, यज्ञविदः = यज्ञ जाणणारे असतात
अर्थ
अन्य काही योगीजन अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात. तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर मनुष्य प्राण व अपान यांची गती थांबवून, प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञांच्या द्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत.
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्‌ ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥ ४-३१ ॥
अन्वय

कुरुसत्तम = हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञशिष्टामृतभुजः = यज्ञ झाल्यावर शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी लोक, सनातनम्‌ = सनातन, ब्रह्म = परब्रह्म परमात्म्याप्रत, यान्ति = जातात, (च) = आणि, अयज्ञस्य = यज्ञ न करणाऱ्या मनुष्यासाठी तर, अयम्‌ = हा, लोकः = मनुष्यलोक सुद्धा (सुखदायक), न अस्ति = राहात नाही (तर मग), अन्यः = परलोक, कुतः = कसा बरे (सुखदायक होऊ शकेल)
अर्थ
हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्यलोक सुद्धा सुखदायक होत नाही; तर परलोक कसा सुखदायक होईल?
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥
अन्वय

एवम्‌ = अशाप्रकारे, बहुविधाः = आणखीसुद्धा नानाप्रकारचे, यज्ञाः = यज्ञ, ब्रह्मणः = वेदाच्या, मुखे = वाणीमध्ये, वितताः = विस्ताराने सांगितले गेले आहेत, तान्‌ = ते, सर्वान्‌ = सर्व, कर्मजान्‌ = मन, इंद्रिय व शरीर यांच्या क्रियांद्वारे संपन्न होणारे आहेत, विद्धि = (असे) तू जाण, एवम्‌ = अशाप्रकारे, ज्ञात्वा = तत्त्वतः जाणून (त्यांच्या अनुष्ठानाद्वारे संपूर्ण कर्मबंधनातून), विमोक्ष्यसे = तू मुक्त होशील
अर्थ
अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत, असे समज. अशाप्रकारे तत्त्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील.
श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परन्तप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ४-३३ ॥
अन्वय

परन्तप पार्थ = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), द्रव्यमयात्‌ = द्रव्यमय, यज्ञात्‌ = यज्ञापेक्षा, ज्ञानयज्ञः = ज्ञानयज्ञ, श्रेयान्‌ = अत्यंत श्रेष्ठ आहे, (तथा) = तसेच, अखिलम्‌ = जितकी म्हणून, सर्वम्‌ = सर्व, कर्म = कर्मे (आहेत ती), ज्ञाने = ज्ञानामध्ये, परिसमाप्यते = समाप्त होऊन जातात
अर्थ
हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच यच्चयावत्‌ सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात.
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥
अन्वय

तत्‌ = ते ज्ञान (तत्त्वदर्शी ज्ञानी माणसांच्या जवळ जाऊन), विद्धि = तू जाणून घे, प्रणिपातेन = (त्यांना) यथायोग्यपणे दंडवत प्रणाम करण्याने, सेवया = त्यांची सेवा करण्याने (आणि त्यांना), परिप्रश्नेन = कपट सोडून सरळपणे प्रश्न करण्याने, तत्त्वदर्शिनः = परमात्म-तत्त्व व्यवस्थितपणे जाणणारे, ते = ते, ज्ञानिनः = ज्ञानी महात्मे (तुला त्या), ज्ञानम्‌ = तत्त्वज्ञानाचा, उपदेक्ष्यन्ति = उपदेश करतील
अर्थ
ते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील.
यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥ ४-३५ ॥
अन्वय

यत्‌ = जे, ज्ञात्वा = जाणल्यावर, पुनः = पुन्हा, एवम्‌ = अशाप्रकारे, मोहम्‌ = मोहाप्रत, न यास्यसि = तू जाणार नाहीस, पाण्डव = हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), येन = ज्या ज्ञानाच्या द्वारे, भूतानि = सर्व सजीवांना, अशेषेण = संपूर्णपणे, आत्मनि = आपल्यामध्ये, अथो = नंतर, मयि = सच्चिदानंदघन मज परमात्म्यामध्ये, द्रक्ष्यसि = तू पाहशील
अर्थ
जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस, तसेच हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), ज्या ज्ञानामुळे तू सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंदघन परमात्म्यात पाहशील.
अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि ॥ ४-३६ ॥
अन्वय

चेत्‌ = जरी, सर्वेभ्यः = सर्व, पापेभ्यः = पापी माणसापेक्षा, अपि = सुद्धा, पापकृत्तमः = अधिक पाप करणारा असा, असि = तू असलास (तरी सुद्धा), ज्ञानप्लवेन = ज्ञानरूपी नौकेने, एव = निःसंशयपणे, सर्वम्‌ = संपूर्ण, वृजिनम्‌ = पापसमुद्र, सन्तरिष्यसि = तू चांगल्याप्रकारे तरून जाशील
अर्थ
जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास, तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पापसमुद्रातून चांगल्याप्रकारे तरून जाशील.
यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥ ४-३७ ॥
अन्वय

अर्जुन = हे अर्जुना, यथा = ज्याप्रमाणे, समिद्धः = प्रज्वलित, अग्निः = अग्नी, एधांसि = सर्पणाला, भस्मसात्‌ = भस्ममय, कुरुते = करतो, तथा = त्याप्रमाणे, ज्ञानाग्निः = ज्ञानरूपी अग्नी, सर्वकर्माणि = संपूर्ण कर्मांना, भस्मसात्‌ = भस्ममय, कुरुते = करून टाकतो
अर्थ
कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राखरांगोळी करतो. ॥
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ४-३८ ॥
अन्वय

इह = या संसारात, ज्ञानेन = ज्ञानाशी, सदृशम्‌ = समान, पवित्रम्‌ = पवित्र करणारे, हि = निःसंदेहपणे, न विद्यते = काहीही नाही, तत्‌ = ते ज्ञान, कालेन = दीर्घ काळाने, योगसंसिद्धः = कर्मयोगाच्या द्वारे अंतःकरण शुद्ध झालेला मनुष्य, स्वयम्‌ = आपण स्वतःच, आत्मनि = आत्म्यामध्ये, विन्दति = प्राप्त करून घेतो
अर्थ
या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो.
श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ४-३९ ॥
अन्वय

संयतेन्द्रियः = जितेंद्रिय, तत्परः = साधन-तत्पर, (च) = आणि, श्रद्धावान्‌ = श्रद्धावान असा मनुष्य, ज्ञानम्‌ = ज्ञान, लभते = प्राप्त करून घेतो, ज्ञानम्‌ = ज्ञानाची, लब्ध्वा = प्राप्ती झाल्यावर, (सः) = तो मनुष्य, अचिरेण = विनाविलंब तत्काळ, पराम्‌ शान्तिम्‌ = भगवत्‌-प्राप्तिरूप परम शांती, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो
अर्थ
जितेंद्रिय, साधनतत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो. आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ भगवत्प्राप्तिरूप परम शांतीला प्राप्त होतो.
अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४-४० ॥
अन्वय

अज्ञः = जो विवेकहीन, च = आणि, अश्रद्दधानः = श्रद्धारहित असतो, संशयात्मा = असा संशययुक्त मनुष्य, विनश्यति = परमार्थापासून निश्चितपणे भ्रष्ट होऊन जातो, संशयात्मनः = अशा संशययुक्त माणसाला, अयम्‌ लोकः = हा लोक, न अस्ति = नसतो, न परः = परलोक नसतो, च = आणि, न सुखम्‌ = सुखही नसते
अर्थ
अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आणि ना सुख.
योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम्‌ ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ॥ ४-४१ ॥
अन्वय

धनञ्जय = हे धनंजया(अर्जुना), योगसंन्यस्तकर्माणम्‌ = कर्मयोगाच्या द्वारे ज्याने विधिपूर्वक सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत, ज्ञानसञ्छिन्नसंशयम्‌ = विवेकाच्या द्वारे ज्याने सर्व संशयांचा नाश केला आहे, आत्मवन्तम्‌ = ज्याने अंतःकरण वश करून घेतले आहे अशा मनुष्याला, कर्माणि = कर्मे, न निबध्नन्ति = बद्ध करीत नाहीत
अर्थ
हे धनंजया(अर्जुना), ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे, अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मे बंधनकारक होत नाहीत.
तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४-४२ ॥
अन्वय

तस्मात्‌ = म्हणून, भारत = हे भरतवंशी अर्जुना, हृत्स्थम्‌ = हृदयामध्ये असणाऱ्या, एनम्‌ = या, अज्ञानसम्भूतम्‌ = अज्ञानाने निर्माण झालेल्या, आत्मनः संशयम्‌ = आपल्या संशयाला, ज्ञानासिना = विवेकज्ञानरूपी तलवारीने, छित्त्वा = कापून टाकून, योगम्‌ = समत्वरूप कर्मयोगात, आतिष्ठ = स्थित होऊन जा (आणि युद्धासाठी), उत्तिष्ठ = उठून उभा राहा
अर्थ
म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेकज्ञानरूपी तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा.

अध्याय – ३ – कर्मयोग

अर्जुन उवाच
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ ३-१ ॥
अन्वय

अर्जुन= अर्जुन, उवाच = म्हणाला, जनार्दन = हे जनार्दन श्रीकृष्णा, चेत्‌ = जर, कर्मणः = कर्माच्या अपेक्षेने, बुद्धिः = ज्ञान, ज्यायसी = श्रेष्ठ (आहे), ते मता = असे तुम्हाला मान्य असेल, तत्‌ = तर मग, केशव = हे केशवा (श्रीकृष्णा), माम्‌ = माझी, घोरे = भयंकर, कर्मणि = कर्म करण्यात, किम्‌ = का बरे, नियोजयसि = तुम्ही योजना करीत आहात
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे जनार्दन श्रीकृष्णा, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग हे केशवा (श्रीकृष्णा), मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात?
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्‌ ॥ ३-२ ॥
अन्वय

व्यामिश्रेण इव = जणू मिश्रित अशा, वाक्येन = वाक्यांनी, मे = माझ्या, बुद्धिम्‌ = बुद्धीला, मोहयसि इव = तुम्ही जणू मोहित करीत आहात, (अतः) = म्हणून, येन = ज्यामुळे, अहम्‌ = मी, श्रेयः = कल्याण, आप्नुयाम्‌ = प्राप्त करून घेईन, तत्‌ एकम्‌ = अशी ती एक गोष्ट, निश्चित्य = निश्चित करून, वद = सांगा
अर्थ
तुम्ही मिश्रितशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल.
श्रीभगवानुवाच
लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्‌ ॥ ३-३ ॥
अन्वय

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, अनघ = हे निष्पापा, अस्मिन्‌ लोके = या जगात, मया = मी, द्विविधा = दोन प्रकारची, निष्ठा = निष्ठा, पुरा = पूर्वी, प्रोक्ता = सांगितली आहे, साङ्ख्यानाम्‌ = सांख्ययोग्यांची, (निष्ठा) = निष्ठा, ज्ञानयोगेन = ज्ञानयोगाद्वारे (होते), (च) = आणि, योगिनाम्‌ = योग्यांची, (निष्ठा) = निष्ठा, कर्मयोगेन = कर्मयोगाद्वारे होते
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पापा, या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्ययोग्यांची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते.
न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ३-४ ॥
अन्वय

कर्मणाम्‌ = कर्मांचे, अनारम्भात्‌ = आचरण केल्याशिवाय, पुरुषः = मनुष्य, नैष्कर्म्यम्‌ = निष्कर्मता म्हणजे योगनिष्ठा, न अश्नुते = प्राप्त करून घेत नाही, च = तसेच, संन्यसनात्‌ एव = कर्मांचा केवळ त्याग केल्यामुळे, सिद्धिम्‌ = सिद्धी म्हणजे सांख्यनिष्ठा, न समधिगच्छति = प्राप्त करून घेत नाही
अर्थ
मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि फक्त कर्मांचा त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही.
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ३-५ ॥
अन्वय

कश्चित्‌ = कोणीही मनुष्य, जातु = कोणत्याही वेळी, हि = निःसंदेहपणे, क्षणम्‌ अपि = क्षणमात्र सुद्धा, अकर्मकृत्‌ = कर्म न करता, न तिष्ठति = राहात नाही, हि = कारण, प्रकृतिजैः = प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या, गुणैः = गुणांनी, अवशः = परतंत्र झालेला, सर्वः = सर्व मनुष्यसमुदाय हा, कर्म कार्यते = कर्म करण्यास भाग पाडला जातो
अर्थ
निःसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहात नाही. कारण सर्व मनुष्यसमुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो.
कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्‌ ।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ३-६ ॥
अन्वय

विमूढात्मा = मूढ बुद्धीचा मनुष्य, कर्मेन्द्रियाणि = सर्व इंद्रियांना, संयम्य = जबरदस्तीने वरवर रोखून, यः = जो, मनसा = मनाने, इन्द्रियार्थान्‌ = त्या इंद्रियांच्या विषयांचे, स्मरन्‌ आस्ते = चिंतन करीत असतो, सः = तो, मिथ्याचारः = मिथ्याचारी म्हणजे दांभिक, उच्यते = म्हटला जातो
अर्थ
जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो.
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ३-७ ॥
अन्वय

तु = परंतु, अर्जुन = हे अर्जुना, यः = जो मनुष्य, मनसा = मनाच्या योगे, इन्द्रियाणि = इंद्रियांना, नियम्य = वश करून घेऊन, असक्तः = अनासक्त होऊन, कर्मेन्द्रियैः = सर्व इंद्रियांच्या द्वारा, कर्मयोगम्‌ = कर्मयोगाचे, आरभते = आचरण करतो, सः = तो मनुष्य, विशिष्यते = श्रेष्ठ होय
अर्थ
परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय.
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥ ३-८ ॥
अन्वय

त्वम्‌ = तू, नियतम्‌ = शास्त्रविहित, कर्म = कर्तव्यकर्म, कुरु = कर, हि = कारण, अकर्मणः = कर्म न करण्याच्या अपेक्षेने, कर्म = कर्म करणे, ज्यायः = श्रेष्ठ आहे, च = तसेच, अकर्मणः = कर्म न केल्यास, ते = तुझा, शरीरयात्रा अपि = शरीरनिर्वाहसुद्धा, न प्रसिद्ध्येत्‌ = सिद्ध होणार नाही
अर्थ
तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत.
यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ३-९ ॥
अन्वय

यज्ञार्थात्‌ = यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या, कर्मणः = कर्मांव्यतिरिक्त, अन्यत्र = दुसऱ्या कर्मांमध्ये (गुंतलेला), अयम्‌ = हा, लोकः = मनुष्यांचा समुदाय, कर्मबन्धनः = कर्मांनी बांधला जातो, (अतः) = म्हणून, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, (त्वम्‌) = तू, मुक्तसङ्गः = आसक्तिरहित होऊन म्हणजे फळाची अपेक्षा सोडून, तदर्थम्‌ = त्या यज्ञासाठी, कर्म समाचर = कर्तव्यकर्म चांगल्याप्रकारे कर
अर्थ
यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्मांशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्यसमुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्यकर्म कर.
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्‌ ॥ ३-१० ॥
अन्वय

पुरा = कल्पाच्या पूर्वी, सहयज्ञाः = यज्ञाच्या बरोबर, प्रजाः = प्रजा, सृष्ट्वा = निर्माण करून, प्रजापतिः = प्रजापती ब्रह्मदेव, उवाच = (त्यांना) म्हणाले, (यूयम्‌) = तुम्ही लोक, अनेन = या यज्ञाच्या द्वारे, प्रसविष्यध्वम्‌ = उत्कर्ष प्राप्त करून घ्या, (च) = आणि, एषः = हा यज्ञ, वः = तुम्हा लोकांचे, इष्टकामधुक्‌ = इष्ट भोग देणारा, अस्तु = होवो
अर्थ
प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की, तुम्ही या यज्ञाच्या द्वारे उत्कर्ष प्राप्त करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो.
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥ ३-११ ॥
अन्वय

अनेन = या यज्ञाच्या द्वारे, देवान्‌ = देवतांना, भावयत = तुम्ही उन्नत करा, (च) = आणि, ते देवाः = त्या देवता, वः = तुम्हा लोकांना, भावयन्तु = उन्नत करोत, (एवम्‌) = अशाप्रकारे निःस्वार्थ भावनेने, परस्परम्‌ = एकमेकांना, भावयन्तः = उन्नत करीत, परम्‌ = परम, श्रेयः = कल्याण, अवाप्स्यथ = तुम्ही प्राप्त करून घ्याल
अर्थ
तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निःस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल.
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥ ३-१२ ॥
अन्वय

यज्ञभाविताः = यज्ञाने पुष्ट झालेल्या, देवाः = देवता, वः = तुम्हा लोकांना (न मागता), इष्टान्‌ = इष्ट, भोगान्‌ = भोग, हि दास्यन्ते = निश्चितपणे देत राहातील (अशाप्रकारे), तैः = त्या देवतांनी, दत्तान्‌ = दिलेले भोग, यः = जो मनुष्य, एभ्यः = त्यांना, अप्रदाय = न देता (स्वतःच), भुङ्क्ते = भोगतो, सः = तो, स्तेनः एव = चोरच आहे
अर्थ
यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहातील. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो स्वतःच उपभोगतो, तो चोरच आहे.
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः ।
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्‌ ॥ ३-१३ ॥
अन्वय

यज्ञशिष्टाशिनः = यज्ञ झाल्यावर शिल्लक राहिलेले अन्न खाणारे, सन्तः = श्रेष्ठ मनुष्य, सर्वकिल्बिषैः = सर्व पापांतून, मुच्यन्ते = मुक्त होऊन जातात (परंतु), ये पापाः = जे पापी लोक, आत्मकारणात्‌ = स्वतःच्या शरीर पोषणासाठीच (अन्न), पचन्ति = शिजवितात, ते तु = ते तर, अघम्‌ = पापच, भुञ्जते = खातात
अर्थ
यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे पापी लोक केवळ स्वतःच्या शरीरपोषणासाठी अन्न शिजवितात, ते तर पापच खातात.
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ ३-१४ ॥
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ ३-१५ ॥
अन्वय

अन्नात्‌ = अन्नापासून, भूतानि = संपूर्ण प्राणी, भवन्ति = उत्पन्न होतात, पर्जन्यात्‌ = पर्जन्यवृष्टीपासून, अन्नसम्भवः = अन्नाची उत्पत्ती होते, यज्ञात्‌ = यज्ञापासून, पर्जन्यः = पर्जन्यवृष्टी, भवति = होते, यज्ञः = यज्ञ, कर्मसमुद्भवः = विहित कर्मांपासून उत्पन्न होणारा आहे, कर्म = कर्मसमुदाय हा, ब्रह्मोद्भवम्‌ = वेदांपासून उत्पन्न होणारा (आणि), ब्रह्म = वेद हे, अक्षरसमुद्भवम्‌ = अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न होणारे आहेत (असे), विद्धि = तू जाण, तस्मात्‌ = म्हणून (यावरून सिद्ध होते की), सर्वगतम्‌ = सर्वव्यापी, ब्रह्म = परम अक्षर परमात्मा, नित्यम्‌ = नेहमीच, यज्ञे = यज्ञामध्ये, प्रतिष्ठितम्‌ = प्रतिष्ठित आहे
अर्थ
सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्ननिर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो. आणि यज्ञ विहित कर्मांमुळे घडतो. कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत, असे समज. यावरून हेच सिद्ध होते की, सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो.
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ ३-१६ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), इह = या जगामध्ये, एवम्‌ = अशा प्रकारे, प्रवर्तितम्‌ = परंपरेने प्रचलित असणाऱ्या, चक्रम्‌ = सृष्टिचक्राला अनुकूल, यः = जो मनुष्य, न अनुवर्तयति = असे वर्तन करीत नाही म्हणजे आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, सः = तो मनुष्य, इन्द्रियारामः = इंद्रियांच्या द्वारे भोगांमध्ये रमणारा, अघायुः = पापी आयुष्याचा (असून), मोघम्‌ = व्यर्थच, जीवति = जिवंत राहातो
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जो मनुष्य या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टिचक्राला अनुसरून वागत नाही म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारे भोगांत रमणारा पापी आयुष्य असलेला मनुष्य व्यर्थच जगतो.
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ ३-१७ ॥
अन्वय

तु = परंतु, यः = जो, मानवः = मनुष्य, आत्मरतिः एव = आत्म्यामध्येच रमणारा, च = आणि, आत्मतृप्तः = आत्म्यामध्येच तृप्त, च = तसेच, आत्मनि एव = आत्म्यामध्येच, सन्तुष्टः = संतुष्ट, स्यात्‌ = असतो, तस्य = त्याच्यासाठी, कार्यम्‌ = कोणतेही कर्तव्य, न विद्यते = नसते
अर्थ
परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा आणि आत्म्यामध्येच तृप्त तसेच आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही.
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ ३-१८ ॥
अन्वय

तस्य = त्या महामनुष्याचे, इह = या विश्वामध्ये, कृतेन = कर्म करण्यात, कश्चन = कोणतेही, अर्थः न = प्रयोजन असत नाही, (च) = तसेच, अकृतेन एव च = कर्म न करण्यातही कोणतेही प्रयोजन असत नाही, च = तसेच, सर्वभूतेषु = संपूर्ण प्राणिमात्रात सुद्धा, अस्य = याचा, कश्चित्‌ = किंचितही, अर्थव्यपाश्रयः = स्वार्थाचा संबंध, न = राहात नाही
अर्थ
त्या महामनुष्याला या विश्वात कर्मे करण्याचे काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्याचेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणिमात्रातही त्याचा जरादेखील स्वार्थाचा संबंध असत नाही.
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ ३-१९ ॥
अन्वय

तस्मात्‌ = म्हणून, सततम्‌ = निरंतरपणे, असक्तः = आसक्तीने रहित होऊन, कार्यम्‌ कर्म = कर्तव्य कर्म, समाचर = नीटपणे तू करीत राहा, हि = कारण, असक्तः = आसक्तीने रहित होऊन, कर्म = कर्म, आचरन्‌ = करणारा, पूरुषः = मनुष्य, परम्‌ = परमात्म्याला, आप्नोति = प्राप्त करून घेतो
अर्थ
म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो.
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः ।
लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ॥ ३-२० ॥
अन्वय

कर्मणा एव = (आसक्तिरहित) कर्माचरणाद्वारेच, जनकादयः = जनक इत्यादी ज्ञानीजन सुद्धा, संसिद्धिम्‌ = परमसिद्धीला, आस्थिताः = प्राप्त झाले होते, हि = म्हणून, (तथा) = तसेच, लोकसङ्ग्रहम्‌ = लोकसंग्रहाकडे, सम्पश्यन्‌ अपि = दृष्टी ठेवून सुद्धा, कर्तुम्‌ एव = कर्म करण्यासच, अर्हसि = तू योग्य आहेस म्हणजे तुला कर्म करणे हेच उचित आहे
अर्थ
जनकादी ज्ञानी लोकही आसक्तिरहित कर्मांनीच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊनदेखील तू कर्म करणेच योग्य आहे.
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ ३-२१ ॥
अन्वय

श्रेष्ठः = श्रेष्ठ मनुष्य, यत्‌ यत्‌ = जे जे, आचरति = आचरण करतो, इतरः जनः = अन्य लोकसुद्धा, तत्‌ तत्‌ एव = त्या त्या प्रमाणे (आचरण करतात), सः = तो, यत्‌ = ज्या गोष्टी, प्रमाणम्‌ = प्रमाण (म्हणून मान्य), कुरुते = करतो, लोकः = सर्व मनुष्यसमुदाय, तत्‌ = त्यालाच, अनुवर्तते = अनुसरून वागतो
अर्थ
श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो, त्या त्या प्रमाणेच इतर लोकही आचरण करतात; तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्यसमुदाय वागू लागतो.
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ ३-२२ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), त्रिषु लोकेषु = तिन्ही लोकांत, मे = मला, किञ्चन कर्तव्यम्‌ = कोणतेही कर्तव्य, न अस्ति = नाही, च = तसेच, अवाप्तव्यम्‌ = प्राप्त करून घेण्यास योग्य वस्तू, अनवाप्तम्‌ न = मिळालेली नाही असेही नाही, (तथापि) = तरीसुद्धा, कर्मणि एव = कर्मांचे आचरण, वर्ते = मी करीतच आहे
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो.
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ३-२३ ॥
अन्वय

हि = कारण, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), यदि = जर, जातु = कदाचित, अहम्‌ = मी, अतन्द्रितः = सावध राहून, कर्मणि = कर्मे, न वर्तेयम्‌ = केली नाहीत (तर मोठी हानी होईल, कारण), मनुष्याः = सर्व माणसे, सर्वशः = सर्व प्रकारांनी, मम = माझ्याच, वर्त्म = मार्गाचे, अनुवर्तन्ते = अनुकरण करतात
अर्थ
कारण हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत, तर मोठे नुकसान होईल, कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात.
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्‌ ।
सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ ३-२४ ॥
अन्वय

(अतः) = म्हणून, चेत्‌ = जर, अहम्‌ = मी, कर्म = कर्मे, न कुर्याम्‌ = केली नाहीत (तर), इमे = ही, लोकाः = सर्व माणसे, उत्सीदेयुः = नष्ट-भ्रष्ट होऊन जातील, च = आणि, सङ्करस्य = संकराचा, कर्ता = कर्ता, स्याम्‌ = मी होईन, (तथा) = तसेच, इमाः = या, प्रजाः = सर्व प्रजांचा, उपहन्याम्‌ = मी घात करणारा होईन
अर्थ
म्हणून जर मी कर्मे केली नाहीत, तर ही सर्व माणसे नष्ट-भ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे कारण होईन, तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन.
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।
कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम्‌ ॥ ३-२५ ॥
अन्वय

भारत = हे भारता (भरतवंशी अर्जुना), कर्मणि = कर्मांमध्ये, सक्ताः = आसक्त असणारे, अविद्वांसः = अज्ञानी लोक, यथा = ज्याप्रमाणे, (कर्म) = कर्मे, कुर्वन्ति = करतात, तथा = त्याचप्रमाणे, असक्तः = आसक्तिरहित (अशा), विद्वान्‌ = विद्वानाने सुद्धा, लोकसङ्ग्रहम्‌ = लोकसंग्रह, चिकीर्षुः = करण्याच्या इच्छेने, (कर्म) = कर्मे, कुर्यात = करावीत
अर्थ
हे भारता(भरतवंशी अर्जुना), कर्मांत आसक्त असणारे अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात, त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्‌ ।
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्‌ ॥ ३-२६ ॥
अन्वय

युक्तः = परमात्म्याच्या स्वरूपात अढळपणे स्थित असणाऱ्या, विद्वान्‌ = ज्ञानी मनुष्याने, कर्मसङ्गिनाम्‌ = शास्त्रविहित कर्मांमध्ये आसक्ती असणाऱ्या, अज्ञानाम्‌ = अज्ञानी मनुष्यांचा, बुद्धिभेदम्‌ = बुद्धिभ्रम म्हणजेच कर्मांमध्ये अश्रद्धा, न जनयेत्‌ = उत्पन्न करू नये (या उलट), सर्वकर्माणि = शास्त्रविहित सर्व कर्मे, समाचरन्‌ = नीटपणे (स्वतःच) आचरण करावीत (तशीच त्यांच्याकडूनही कर्मे), जोषयेत्‌ = करवून घ्यावीत
अर्थ
परमात्मस्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी मनुष्याने शास्त्रविहित कर्मांत आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्मांविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तमप्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावीत.
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ ३-२७ ॥
अन्वय

कर्माणि = सर्व कर्मे (खरे पाहाता), सर्वशः = सर्व प्रकारांनी, प्रकृतेः = प्रकृतीच्या, गुणैः = गुणांच्या द्वारे, क्रियमाणानि = केली जातात, (तथापि) = तरीसुद्धा, अहङ्कारविमूढात्मा = अहंकारामुळे ज्याचे अंतःकरण मोहित झाले आहे असा अज्ञानी मनुष्य, अहम्‌ कर्ता = मी कर्ता आहे, इति = असे, मन्यते = मानतो
अर्थ
वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकारामुळे मोहित झाले आहे, असा अज्ञानी मनुष्य मी कर्ता आहे, असे मानतो.
तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ ३-२८ ॥
अन्वय

तु = परंतु, महाबाहो = हे महाबाहो(अर्जुना), गुणकर्मविभागयोः = गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे, तत्त्ववित्‌ = तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी हा, गुणाः = सर्व गुण हेच, गुणेषु = गुणांमध्ये, वर्तन्ते = वावरतात, इति = असे, मत्वा = जाणून (त्यामध्ये), न सज्जते = अडकत नाही
अर्थ
पण हे महाबाहो (अर्जुना), गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणांत वावरत असतात, हे लक्षात घेऊन त्यांमध्ये आसक्त होत नाही.
प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत्‌ ॥ ३-२९ ॥
अन्वय

प्रकृतेः = प्रकृतीच्या, गुणसम्मूढाः = गुणांनी अत्यंत मूढ झालेली माणसे, गुणकर्मसु = गुणांमध्ये आणि कर्मांमध्ये, सज्जन्ते = आसक्त होतात, अकृत्स्नविदः = पूर्णपणे न जाणणाऱ्या, मन्दान्‌ = मंदबुद्धी अज्ञानी अशा, तान्‌ = त्या माणसांना, कृत्स्नवित्‌ = संपूर्णपणे जाणणाऱ्या ज्ञानी मनुष्याने, न विचालयेत्‌ = विचलित करू नये
अर्थ
प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणांत आणि कर्मांत आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानी मनुष्यांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानी मनुष्याने बुद्धिभेद करू नये.
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३-३० ॥
अन्वय

अध्यात्मचेतसा = अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताच्या द्वारे, सर्वाणि = सर्व, कर्माणि = कर्मे, मयि = मला, सन्यस्य = अर्पण करून, निराशीः = आशारहित, निर्ममः = ममतारहित, (च) = आणि, विगतज्वरः = संतापरहित, भूत्वा = होऊन, युध्यस्व = तू युद्ध कर
अर्थ
अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संताप रहित होऊन तू युद्ध कर.
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३-३१ ॥
अन्वय

ये = जे कोणी, मानवाः = मानव, अनसूयन्तः = दोषदृष्टीने रहित, (च) = आणि, श्रद्धावन्तः = श्रद्धायुक्त होऊन, मे = माझ्या, इदम्‌ = या, मतम्‌ = मताचे, नित्यम्‌ = नेहमी, अनुतिष्ठन्ति = अनुसरण करतात, ते अपि = तेसुद्धा, कर्मभिः = संपूर्ण कर्मांतून, मुच्यन्ते = सुटून जातात
अर्थ
जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात, तेही सर्व कर्मांपासून मुक्त होतात.
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्‌ ।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३-३२ ॥
अन्वय

तु = परंतु, ये = जे मानव, अभ्यसूयन्तः = माझ्यावर दोषारोपण करीत, मे = माझ्या, एतत्‌ = या, मतम्‌ = मताला, न अनुतिष्ठन्ति = अनुसरून आचरण करीत नाहीत, सर्वज्ञानविमूढान्‌ = संपूर्ण ज्ञानाच्या बाबतीत मोहित झालेल्या अशा, तान्‌ = त्या, अचेतसः = मूर्खांना, नष्टान्‌ = नष्ट झालेले असेच, विद्धि = समज
अर्थ
परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत, त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज.
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३-३३ ॥
अन्वय

भूतानि = सर्वच प्राणी, प्रकृतिम्‌ यान्ति = प्रकृतीप्रत जातात म्हणजे आपल्या स्वभावाला परवश होऊन कर्मे करतात, ज्ञानवान्‌, अपि = ज्ञानी माणूस सुद्धा, स्वस्याः = आपल्या, प्रकृतेः = प्रकृतीला, सदृशम्‌ = अनुसरून, चेष्टते = क्रिया करीत राहातो (मग अशा स्थितीत स्वभावापुढे), निग्रहः = हट्ट, किम्‌ = काय, करिष्यति = करणार
अर्थ
सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयांत कोणाचाही हट्टीपणा काय करील?
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ३-३४ ॥
अन्वय

इन्द्रियस्य इन्द्रियस्य अर्थे = इंद्रिय-इंद्रियाच्या म्हणजे प्रत्येक इंद्रियाच्या विषयांमध्ये, रागद्वेषौ = राग आणि द्वेष, व्यवस्थितौ = लपून राहिलेले असतात, तयोः = त्या दोघांच्या, वशम्‌ = ताब्यात, (मनुष्यः) = माणसाने, न आगच्छेत्‌ = येता कामा नये, हि = कारण, तौ = ते दोघेही, अस्य = या(माणसा)चे, परिपन्थिनौ = (कल्याणमार्गात) विघ्न करणारे महान शत्रू आहेत
अर्थ
प्रत्येक इंद्रियाचे इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये. कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याणमार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत.
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्‌ ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३-३५ ॥
अन्वय

स्वनुष्ठितात्‌ = चांगल्याप्रकारे आचरणात आणलेल्या, परधर्मात्‌ = दुसऱ्याच्या धर्मापेक्षा, विगुणः = गुणरहित असासुद्धा, स्वधर्मः = स्वतःचा धर्म, श्रेयान्‌ = अति उत्तम आहे, स्वधर्मे = आपल्या धर्मात, निधनम्‌ = मरणे हे सुद्धा, श्रेयः = कल्याणकारक आहे, (च) = आणि, परधर्मः = दुसऱ्याचा धर्म, भयावहः = भय निर्माण करणारा आहे
अर्थ
चांगल्याप्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे. पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे.
अर्जुन उवाच
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३-३६ ॥
अन्वय

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, वार्ष्णेय = हे वार्ष्णेया(श्रीकृष्णा), अथ = तर मग, अयम्‌ = हा, पूरुषः = मनुष्य, अनिच्छन्‌ अपि = स्वतःची इच्छा नसताना सुद्धा, बलात्‌ = बळजबरीने, नियोजितः इव = जणू भाग पाडल्यामुळे, केन = कोणाकडून, प्रयुक्तः = प्रेरित होऊन, पापम्‌ = पापाचे, चरति = आचरण करतो
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे वार्ष्णेया(श्रीकृष्णा), तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो?
श्रीभगवानुवाच
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्‌ ॥ ३-३७ ॥
अन्वय

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, रजोगुणसमुद्भवः = रजोगुणापासून उत्पन्न झालेला, एषः = हा, कामः = कामच, क्रोधः = क्रोध आहे, एषः = हा, महाशनः = पुष्कळ खाणारा म्हणजे भोगांनी कधीही तृप्त न होणारा, (च) = तसेच, महापाप्मा = महापापी आहे, इह = या विषयात, एनम्‌ वैरिणम्‌ विद्धि = काम हाच खरोखर वैरी आहे असे तू जाण
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे, असे तू जाण.
धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च ।
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्‌ ॥ ३-३८ ॥
अन्वय

यथा = ज्या प्रकारे, धूमेन = धुराने, वह्निः = अग्नी, च = आणि, मलेन = धुळीने, आदर्शः = आरसा, आव्रियते = झाकला जातो, (तथा) = तसेच, यथा = ज्या प्रकारे, उल्बेन = वारेने, गर्भः = गर्भ, आवृतः = झाकलेला असतो, तथा = त्या प्रकारे, तेन = त्या कामाचे द्वारा, इदम्‌ = हे ज्ञान, आवृतम्‌ = झाकले जाते
अर्थ
ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहाते.
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ ३-३९ ॥
अन्वय

च = आणि, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, अनलेन = अग्नीप्रमाणे, दुष्पूरेण = कधीही पूर्ण न होणाऱ्या, (च) = आणि, एतेन = या, कामरूपेण = कामरूपी, ज्ञानिनः = ज्ञानी लोकांच्या, नित्यवैरिणा = नित्य शत्रूच्या द्वारा, ज्ञानम्‌ = (मनुष्याचे) ज्ञान, आवृतम्‌ = झाकून टाकलेले असते
अर्थ
आणि हे कुंतीपुत्र अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूपी अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने मनुष्यांचे ज्ञान झाकले आहे.
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्‌ ॥ ३-४० ॥
अन्वय

इन्द्रियाणि = इंद्रिये, मनः = मन, (च) = आणि, बुद्धिः = बुद्धी (हे सर्व), अस्य = या कामाचे, अधिष्ठानम्‌ = निवासस्थान, उच्यते = म्हटले जातात, एषः = हा काम, एतैः = या मन, बुद्धी व इंद्रिये यांच्या द्वारेच, ज्ञानम्‌ = ज्ञानाला, आवृत्य = झाकून टाकून, देहिनम्‌ = जीवात्म्याला, विमोहयति = मोहित करतो
अर्थ
इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी व इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो.
तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्‌ ॥ ३-४१ ॥
अन्वय

तस्मात्‌ = म्हणून, भरतर्षभ = हे अर्जुना, त्वम्‌ = तू, आदौ = प्रथम, इन्द्रियाणि = इंद्रियांना, नियम्य = वश करून घेऊन, ज्ञानविज्ञाननाशनम्‌ = ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या, एनम्‌ = या, पाप्मानम्‌ = महान पापी अशा कामाला, हि = निश्चितपणे, प्रजहि = बळ वापरून मारून टाक
अर्थ
म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून, या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या, मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक.
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ३-४२ ॥
अन्वय

इन्द्रियाणि = इंद्रिये ही (स्थूलशरीरापेक्षा), पराणि = पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म आहेत, आहुः = असे म्हणतात, इन्द्रियेभ्यः = इंद्रियांपेक्षा, मनः = मन हे, परम्‌ = पर आहे, मनसः तु = मनापेक्षा, बुद्धिः = बुद्धी ही, परा = पर आहे, तु = आणि, यः = जो, बुद्धेः = बुद्धीच्यासुद्धा, परतः = अत्यंत पर, सः = तो (आत्मा) आहे
अर्थ
इंद्रियांना स्थूलशरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियांहून मन पर आहे. मनाहून बुद्धी पर आहे. आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे, तो आत्मा होय.
एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्‌ ॥ ३-४३ ॥
अन्वय

एवम्‌ = अशा प्रकारे, बुद्धेः = बुद्धीपेक्षा, परम्‌ = पर म्हणजे सूक्ष्म, बलवान आणि अत्यंत श्रेष्ठ अशा आत्म्याला, बुद्ध्वा = जाणून, (च) = आणि, आत्मना = बुद्धीच्या द्वारा, आत्मानम्‌ = मनाला, संस्तभ्य = वश करून घेऊन, महाबाहो = हे महाबाहो, कामरूपम्‌ = (या) कामरूपी, दुरासदम्‌ = दुर्जय, शत्रुम्‌ = शत्रूला, जहि = तू ठार कर
अर्थ
अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे, हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून, हे महाबाहो, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक.

भगवद्गीता – अध्याय १ – अर्जुनविषादयोग

धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥ १-१ ॥

अन्वय
धृतराष्ट्र = धृतराष्ट्र, उवाच = म्हणाले, सञ्जय = हे संजया, धर्मक्षेत्रे = धर्मभूमी असणाऱ्या, कुरुक्षेत्रे = कुरुक्षेत्रावर, समवेताः = एकत्र जमलेल्या, युयुत्सवः = युद्धाची इच्छा करणाऱ्या, मामकाः = माझ्या मुलांनी, च = आणि, एव = तसेच, पाण्डवाः = पांडूच्या मुलांनी, किम्‌ = काय, अकुर्वत = केले
अर्थ
धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले? ॥ १-१ ॥
सञ्जय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्‌ ॥ १-२ ॥
अन्वय
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, तदा = त्यावेळी, व्यूढम्‌ = व्यूहरचनेने युक्त, पाण्डवानीकम्‌ = पांडवांचे सैन्य, दृष्ट्वा = पाहून, तु = आणि, आचार्यम्‌ = द्रोणाचार्यांच्या, उपसङ्गम्य = जवळ जाऊन, राजा = राजा, दुर्योधनः = दुर्योधन, वचनम्‌ = असे वचन, अब्रवीत = बोलला
अर्थ
संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचर्यांजवळ जाऊन असे म्हणाला ॥ १-२ ॥
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्‌ ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ १-३ ॥
अन्वय
आचार्य = अहो आचार्य, तव = तुमच्या, धीमता = बुद्धिमान, शिष्येण = शिष्याने, द्रुपदपुत्रेण = द्रुपदपुत्र धष्टद्युम्नाने, व्युढाम्‌ = व्युहरचना करून सिद्ध केलेली, एताम्‌ = ही, पाण्डुपुत्राणाम्‌ = पांडूच्या पुत्रांची, महतीम्‌ = विशाल, चमूम्‌ = सेना, पश्य = पाहा
अर्थ
अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने-द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने-व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पाहा. ॥ १-३ ॥
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ १-४ ॥
धृष्टकेतुश्‍चेकितानः काशिराजश्च वीर्यवान्‌ ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ॥ १-५ ॥
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्‌ ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥ १-६ ॥
अन्वय

अत्र = येथे, महेष्वासाः = मोठीमोठी धनुष्ये धारण केलेले, च = आणि, युधि = युद्धात, भीमार्जुनसमाः = भीम व अर्जुन याप्रमाणे असणारे, शूराः = शूर-वीर, युयुधानः = सात्यकी, च = आणि, विराटः = विराट, च = तसेच, महारथः = महारथी, द्रुपदः = द्रुपद, धृष्टकेतुः = धृष्टकेतू, चेकितानः = चेकितान, च = आणि, वीर्यवान्‌ = बलवान, काशिराजः = काशिराज, पुरुजित्‌ = पुरुजित, कुन्तिभोजः = कुन्तिभोज, च = आणि, नरपुङ्गवः = नरश्रेष्ठ, शैब्यः = शैब्य, च = आणि, विक्रान्तः = पराक्रमी, युधामन्युः = युधामन्यू, च = तसेच, वीर्यवान्‌ = शक्तिमान, उत्तमौजाः = उत्तमौजा, सौभद्रः = सुभद्रेचा पुत्र, च = आणि, द्रौपदेयाः = द्रौपदीचे पाच पुत्र, सर्व एव = हे सर्वच, महारथाः = महारथी, (सन्ति) = आहेत
अर्थ
या सैन्यात मोठीमोठी धनुष्ये घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, बलवान काशिराज, पुरुजित, कुंतिभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत. ॥ १-४, १-५, १-६ ॥
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥ १-७ ॥
अन्वय

द्विजोत्तम = हे ब्राह्मणश्रेष्ठ, अस्माकम्‌ = आमच्या पक्षात, तु = सुद्धा, ये = जे, विशिष्टाः = महत्त्वाचे, (सन्ति) = आहेत, तान्‌ = त्यांना, निबोध = आपण जाणून घ्या, मम = माझ्या, सैन्यस्य = सैन्याचे, नायकाः = जे सेनापती आहेत, तान्‌ = ते, ते = तुमच्या, संज्ञार्थम्‌ = माहितीसाठी, ब्रविमी = मी सांगतो
अर्थ
हे ब्राह्मणश्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत, ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत, ते मी आपल्याला सांगतो. ॥ १-७ ॥
भवान्‌ भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥ १-८ ॥
अन्वय

भवान्‌ = तुम्ही द्रोणाचार्य, च = आणि, भीष्मः = भीष्म, च = तसेच, कर्णः = कर्ण, च = आणि, समितिञ्जयः = युद्धात विजयी होणारे, कृपः = कृपाचार्य, च = तसेच, अश्वत्थामा = अश्वत्थामा, च = तसेच, विकर्णः = विकर्ण, तथैव च = आणि त्याचप्रमाणे, सौमदत्तिः = सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा
अर्थ
आपण-द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. ॥ १-८ ॥
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ १-९ ॥
अन्वय

अन्ये = इतर, च = सुद्धा, मदर्थे = माझ्यासाठी, त्यक्तजीविताः = जीवावर उदार झालेले, बहवः = पुष्कळ, शूराः = शूरवीर, (सन्ति) = आहेत, सर्वे = ते सर्व, नानाशस्त्रप्रहरणाः = निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज, युद्धविशारदाः = युद्धात पारंगत, (सन्ति) = आहेत
अर्थ
इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. ॥ १-९ ॥
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्‌ ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्‌ ॥ १-१० ॥
अन्वय

भीष्माभिरक्षितम्‌ = भीष्म-पितामहांकडून रक्षिले गेलेले, अस्माकम्‌ = आमचे, तत्‌ = ते, बलम्‌ = सैन्य, अपर्याप्तम्‌ = सर्व प्रकारांनी अजिंक्य आहे, तु = आणि, भीमाभिरक्षितम्‌ = भीमाकडून रक्षिले गेलेले, एतेषाम्‌ = या पांडवांचे, इदम्‌ = हे, बलम्‌ = सैन्य, पर्याप्तम्‌ = जिंकण्यास सोपे आहे
अर्थ
भीष्मपितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे; तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे. ॥ १-१० ॥
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ १-११ ॥
अन्वय

च = म्हणून, सर्वेषु = सर्व, अयनेषु = व्यूहद्वारात, यथाभागम्‌ = आपापल्या जागेवर, अवस्थिताः = राहून, भवन्तः = आपण, सर्वे एव = सर्वांनीच, हि = निःसंदेहपणे, भीष्मम्‌ एव = भीष्म पितामहांचेच, अभिरक्षन्तु = सर्व बाजूंनी रक्षण करावे
अर्थ
म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निःसंदेह भीष्मपितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. ॥ १-११ ॥
तस्य सञ्जनयन्‌ हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्यौच्चै: शङ्खं दध्मौ प्रतापवान्‌ ॥ १-१२ ॥
अन्वय

तस्य = त्या(दुर्योधना)चा(च्या हृदयात), हर्षम्‌ = आनंद, सञ्जनयन्‌ = निर्माण करीत, कुरुवृद्धः = कौरवातील वृद्ध, प्रतापवान्‌ = महापराक्रमी(अशा), पितामहः = पितामह भीष्मांनी, उच्चैः = मोठ्या सुरात, सिंहनादम्‌ = सिंहाच्या आरोळीप्रमाणे, विनद्य = गर्जना करून, शङ्खम्‌ = शंख, दध्मौ = वाजविला
अर्थ
कौरवांतील वृद्ध, महापराक्रमी, पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला.
ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत्‌ ॥ १-१३ ॥
अन्वय

ततः = त्यानंतर, शङ्खाः = शंख, च = आणि, भेर्यः = नगारे, च = तसेच, पणवानकगोमुखाः = ढोल, मृदंग व शिंगे (इत्यादी रणवाद्ये), सहसा एव = एकदमच, अभ्यहन्यन्त = वाजू लागली, (तेषां) = (त्यांचा), सः = तो, शब्दः = आवाज, तुमुलः = फार भयंकर, अभवत्‌ = झाला
अर्थ
त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा तो आवाज प्रचंड झाला. ॥ १-१३ ॥
ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवाश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ॥ १-१४ ॥
अन्वय

ततः = त्यानंतर, श्वेतैः = पांढऱ्या, हयैः = घोड्यांनी, युक्ते = युक्त अशा, महति = उत्तम, स्यन्दने = रथात, स्थितौ = बसलेल्या, माधवः = श्रीकृष्ण महाराजांनी, च = आणि, पाण्डवः = पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने), एव = सुद्धा, दिव्यौ = अलौकिक, शङ्खौ = शंख, प्रदध्मतुः = वाजविले
अर्थ
यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने) ही दिव्य शंख वाजविले. ॥ १-१४ ॥
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ॥ १-१५ ॥
अन्वय

हृषीकेशः = श्रीकृष्ण महाराजांनी, पाञ्चजन्यम्‌ = पांचजन्य नावाचा, धनञ्जयः = अर्जुनाने, देवदत्तम्‌ = देवदत्त नावाचा, (च) = आणि, भीमकर्मा = भयानक कर्मे करणाऱ्या, वृकोदरः = भीमसेनाने, पौण्ड्रम्‌ = पौण्ड्र नावाचा, महाशङ्खम्‌ = मोठा शंख, दध्मौ = वाजविला
अर्थ
श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौण्ड्र नावाचा मोठा शंख फुंकला. ॥ १-१५ ॥
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १-१६ ॥
अन्वय

कुन्तीपुत्रः = कुन्तीपुत्र, राजा = राजा, युधिष्ठिरः = युधिष्ठिराने, अनन्तविजयम्‌ = अनंतविजय नावाचा, (च) = आणि, नकुलः = नकुलाने, च = व, सहदेवः = सहदेवाने, सुघोष-मणिपुष्पकौ = सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंङ्ख, (दध्मौ) = वाजविले
अर्थ
कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. ॥ १-१६ ॥
काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥ १-१७ ॥
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक्पृथक्‌ ॥ १-१८ ॥
अन्वय

परमेष्वासः = श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा, काश्यः = काशिराज, च = आणि, महारथः = महारथी, शिखण्डी = शिखंडी, च = व, धृष्टद्युम्नः = धृष्टद्युम्न, च = तसेच, विराटः = राजा विराट, च = आणि, अपराजितः = अजिंक्य, सात्यकिः = सात्यकी, द्रुपदः = राजा द्रुपद, च = आणि, द्रौपदेयाः = द्रौपदीचे पाच पुत्र, च = तसेच, महाबाहुः = मोठ्या भुजा असणारा, सौभद्रः = सुभद्रापुत्र(अभिमन्यू), (एते, सर्वे) = या सर्वांनी, पृथिवीपते = हे राजन्‌, सर्वशः = सर्व बाजूंनी, पृथक्‌-पृथक्‌ = वेगवेगळे, शङ्खान्‌ = शंख, दध्मुः = वाजविले
अर्थ
श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू, या सर्वांनी, हे राजा, सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले. ॥ १-१७, १-१८ ॥
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्‌ ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्‌ ॥ १-१९ ॥
अन्वय

(च) = आणि, नभः = आकाशाला, च = तसेच, पृथिवीं = पृथ्वीला, एव = सुद्धा, व्यनुनादयन्‌ = दुमदुमून टाकीत, सः = त्या, तुमुलः = भयानक, घोषः = आवाजाने, धार्तराष्ट्राणाम्‌ = धार्तराष्ट्रांची म्हणजे आपल्या पक्षातील लोकांची, हृदयानि = हृदये, व्यदारयत्‌ = विदीर्ण करून टाकली
अर्थ
आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली. ॥ १-१९ ॥
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्‌ कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ १-२० ॥
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ १-२१ ॥
अन्वय

महीपते = हे राजा, अथ = त्यानंतर, कपिध्वजः = ज्याच्या ध्वजावर हनुमान आहे (अशा), पाण्डवः = पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने), व्यवस्थितान्‌ = मोर्चा बांधून उभ्या असलेल्या, धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राशी संबंधित लोकांना, दृष्ट्वा = पाहून, तदा = तेव्हा, शस्त्रसम्पाते प्रवृत्ते = शस्त्र चालविण्याच्या तयारीचे वेळी, धनुः = धनुष्य, उद्यम्य = उचलून, हृषीकेशम्‌ = हृषीकेश श्रीकृष्णांना उद्देशून, इदम्‌ = हे, वाक्यम्‌ = वाक्य, आह = उच्चारले, अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, अच्युत = हे अच्युता, मे = माझा, रथम्‌ = रथ, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्यभागी, स्थापय = उभा करा
अर्थ
महाराज, त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने) युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून, शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून, हृषीकेश श्रीकृष्णांना असे म्हटले, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. ॥ १-२०, १-२१ ॥
यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्‌ ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्‌ रणसमुद्यमे ॥ १-२२ ॥
अन्वय

अस्मिन्‌ = या, रणसमुद्यमे = युद्धाच्या उद्योगात, कैः सह = (ज्या) कोणाकोणाबरोबर, मया = मला, योद्धव्यम्‌ = लढणे योग्य आहे, योद्धुकामान्‌ = (त्या) युद्ध करण्याच्या इच्छेने, अवस्थितान्‌ = रणांगणात सज्ज झालेल्या, एतान्‌ = या (शत्रुपक्षातील योद्ध्यां) ना, यावत्‌ अहम्‌ निरीक्षे = (मी) जोपर्यंत नीट पाहून घेत आहे (तोपर्यंत रथ उभा करा.)
अर्थ
मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की, मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तोवर रथ उभा करा. ॥ १-२२ ॥
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥ १-२३ ॥
अन्वय

दुर्बुद्धेः = दुष्टबुद्धी अशा, धार्तराष्ट्रस्य = दुर्योधनाचे, युद्धे = युद्धात, प्रियचिकीर्षवः = हित करू इच्छिणारे, ये = जे जे, एते = हे (राजेलोक), अत्र = या सैन्यात, समागताः = एकत्र आले आहेत (त्या), योत्स्यमानान्‌ = युद्ध करणाऱ्या योद्ध्यांना, अहम्‌ = मी, अवेक्षे = पाहीन
अर्थ
दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत, त्या योद्ध्यांना मी पाहातो. ॥ १-२३ ॥
सञ्जय उवाच
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्‌ ॥ १-२४ ॥
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्‌ ।
उवाच पार्थ पश्यैतान्‌ समवेतान्‌ कुरुनिति ॥ १-२५ ॥
अन्वय

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, भारत = हे धृतराष्ट्र, गुडाकेशेन = अर्जुनाने, एवम्‌ = असे, उक्तः = म्हटले असता, हृषीकेशः = श्रीकृष्णांनी, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्ये, भीष्मद्रोणप्रमुखतः = भीष्म व द्रोण यांच्या समोर, च = तसेच, सर्वेषाम्‌ = सर्व, महीक्षिताम्‌ = राजांच्या समोर, रथोत्तमम्‌ = उत्तम रथ, स्थापयित्वा = उभा करून, इति = असे, उवाच = म्हटले, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथपुत्र अर्जुना), समवेतान्‌ = युद्धासाठी एकत्र जमलेल्या, एतान्‌ = या, कुरून्‌ = कौरवांना, पश्य = पाहा
अर्थ
संजय म्हणाले, धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पाहा. ॥ १-२४, १-२५ ॥
तत्रापश्यत्स्थितान्‌ पार्थः पितॄनथ पितामहान्‌ ।
आचार्यान्मातुलान्‌ भ्रातॄन्‌ पुत्रान्‌ पौत्रान्‌ सखींस्तथा ॥ १-२६ ॥
श्वशुरान्‌ सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
अन्वय

अथ = त्यानंतर, पार्थः = पार्थाने (अर्थात पृथापुत्र अर्जुनाने), तत्र उभयोः अपि = त्या दोन्हीही, सेनयोः = सैन्यांमध्ये, स्थितान्‌ = उभे असलेले, पितॄन्‌ = काका, पितामहान्‌ = आजे, पणजे, आचार्यान्‌ = गुरू, मातुलान्‌ = मामे, भ्रातॄन्‌ = भाऊ, पुत्रान्‌ = मुलगे, पौत्रान्‌ = नातू, तथा = तसेच, सखीन्‌ = मित्र, श्वशुरान्‌ = सासरे, च = आणि, सुहृदः = सुहृद (यांना), एव = च, अपश्यत्‌ = पाहिले
अर्थ
त्यानंतर पार्थाने (अर्थात पृथापुत्र अर्जुनाने) त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे-पणजे, गुरू, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांनाच पाहिले. ॥ १-२६, १-२७(पूर्वार्ध) ॥
तान्‌ समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्‌ बन्धूनवस्थितान्‌ ॥ १-२७ ॥
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्‌ ।
अन्वय

अवस्थितान्‌ = उपस्थित असलेल्या, तान्‌ सर्वान्‌ बन्धून्‌ = त्या सर्व बंधूंना, समीक्ष्य = पाहून, परया = आत्यंतिक, कृपया = करुणेने, आविष्टः = परवश झालेला, सः = तो, कौन्तेयः = कुन्तीपुत्र अर्जुन, विषीदन्‌ = शोक करीत, इदम्‌ = हे(वचन), अब्रवीत्‌ = बोलला ॥ १-२७(उत्तरार्ध),
अर्थ
तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध) ॥
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌ ॥ १-२८ ॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥
अन्वय

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, कृष्ण = हे कृष्णा, युयुत्सुम्‌ = युद्धाची इच्छा धरून, समुपस्थितम्‌ = रणांगणावर उपस्थित असणाऱ्या, इमम्‌ स्वजनम्‌ = या स्वजन समुदायाला, दृष्ट्वा = पाहिल्यावर, मम = माझे, गात्राणि = अवयव, सीदन्ति = गळून जात आहेत, च = आणि, मुखम्‌ = तोंड, परिशुष्यति = कोरडे पडत आहे, च = तसेच, मे = माझ्या, शरीरे = शरीरांच्या ठिकाणी, वेपुथः = कंप, च = व, रोमहर्षः = रोमांच, जायते = निर्माण झाले आहेत ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमवतीव च मे मनः ॥ १-३० ॥
अन्वय

हस्तात्‌ = हातातून, गाण्डीवम्‌ = गांडीव धनुष्य, स्रंसते = गळून पडत आहे, च = व, त्वक्‌ = त्वचा, एव = सुद्धा, परिदह्यते = फार जळजळत आहे, च = तसेच, मे = माझे, मनः = मन, भ्रमति इव = भरकटल्यासारखे होत आहे, (अतः) = त्यामुळे मी, अवस्थातुम्‌ = उभा राहाण्यास, च = सुद्धा, न शक्नोमि = समर्थ नाही
अर्थ
हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. ॥ १-३० ॥
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ १-३१ ॥
अन्वय

केशव = हे केशवा, निमित्तानि = चिन्हे, च = सुद्धा, (अहम्‌) = मी, विपरीतानि = विपरीतच, पश्यामि = पाहात आहे, (च) = तसेच, आहवे = युद्धामध्ये, स्वजनम्‌ = स्वजन-समुदायाला, हत्वा = ठार मारून, श्रेयः च = कल्याण सुद्धा (होईल असे), न अनुपश्यामि = मला दिसत नाही
अर्थ
हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल, असे मला वाटत नाही. ॥ १-३१ ॥
न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ १-३२ ॥
अन्वय

कृष्ण = हे कृष्णा, विजयम्‌ = विजयाची, न काङ्क्षे = मला इच्छा नाही, च = तसेच, न राज्यम्‌ = राज्याची (इच्छा) नाही, च = आणि, सुखानि = सुखांचीही (इच्छा नाही), गोविन्द = हे गोविंदा, नः = आम्हाला, राज्येन = राज्याचे, किम्‌ = काय प्रयोजन आहे, वा = अथवा, भोगैः = भोगांचा, (च) = आणि, जीवितेन = जगण्याचा, किम्‌ = काय उपयोग आहे
अर्थ
हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखांचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? ॥ १-३२ ॥
येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ १-३३ ॥
अन्वय

येषाम्‌ = ज्यांच्या, अर्थे = साठी, नः = आम्हाला, राज्यम्‌ = राज्य, भोगाः = भोग, च = आणि, सुखानि = सुखे (इत्यादी), काङ्क्षितम्‌ = अभीष्ट आहेत, ते = ते, इमे = हे (सर्वजण), धनानि = धन, च = आणि, प्राणान्‌ = प्राण (यांची आशा), त्यक्त्वा = सोडून, युद्धे = युद्धात, अवस्थिताः = उभे आहेत
अर्थ
आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत. ॥ १-३३ ॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ १-३४ ॥
अन्वय

आचार्याः = गुरुजन, पितरः = काका, पुत्राः = मुलगे, च = आणि, तथा एव = त्याचप्रमाणे, पितामहाः = आजे, मातुलाः = मामे, श्वशुराः = सासरे, पौत्राः = नातू, श्यालाः = मेहुणे, तथा = तसेच, सम्बन्धिनः = आप्त लोक, (सन्ति) = आहेत
अर्थ
गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत. ॥ १-३४ ॥
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ १-३५ ॥
अन्वय

मधुसूदन = हे मधुसूदना, घ्नतः अपि = (मला) मारले तरी सुद्धा, (अथवा) = किंवा, त्रैलोक्यराज्यस्य = तीन लोकांच्या राज्याच्या, हेतोः = साठी, अपि = सुद्धा, एतान्‌ = या सर्वांना, हन्तुम्‌ = ठार मारण्याची, न इच्छामि = मला इच्छा नाही (मग), महीकृते = (या) पृथ्वीसाठी (तर), नु किम्‌ = काय सांगावे
अर्थ
हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारु शकत नाही. मग या पृथ्वीची काय कथा? ॥ १-३५ ॥
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान्‌ हत्वैतानाततायिनः ॥ १-३६ ॥
अन्वय

जनार्दन = हे जनार्दना, धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राच्या मुलांना, निहत्य = मारून, नः = आम्हाला, का = कोणते, प्रीतिः = सुख, स्यात्‌ = मिळणार, एतान्‌ = या, आततायिनः = आततायींना, हत्वा = मारल्यावर, अस्मान्‌ = आम्हाला, पापम्‌ एव = पापच, आश्रयेत्‌ = लागेल
अर्थ
हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? या आततायींना मारून आम्हाला पापच लागणार. ॥ १-३६॥
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्‌ स्वबान्धवान्‌ ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ १-३७ ॥
अन्वय

तस्मात्‌ = म्हणून, माधव = हे माधवा, स्वबान्धवान्‌ = आपल्याच बांधवांना (म्हणजे), धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राच्या मुलांना, हन्तुम्‌ = मारण्यास, वयम्‌ = आम्ही, न अर्हाः = योग्य नाही, हि = कारण, स्वजनम्‌ = आपल्याच कुटुंबाला, हत्वा = मारून, कथम्‌ = कसे (बरे), सुखिनः = आम्ही सुखी, स्याम = होऊ
अर्थ
म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना, आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार? ॥ १-३७ ॥
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्‌ ॥ १-३८ ॥
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्‌ ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ १-३९ ॥
अन्वय

यद्यपि = जरी, लोभोपहतचेतसः = लोभाने बुद्धिभ्रष्ट झालेले, एते = हे (लोक), कुलक्षयकृतम्‌ = कुळाच्या नाशाने उत्पन्न झालेला, दोषम्‌ = दोष, च = तसेच, मित्रद्रोहे = मित्राशी द्रोह करण्यातील, पातकम्‌ = पाप, न पश्यन्ति = पाहात नाहीत, (तथापि) = तरी, जनार्दन = हे जनार्दना, कुलक्षयकृतम्‌ = कुळाच्या नाशामुळे उत्पन्न होणाऱ्या, दोषम्‌ = दोषाला, प्रपश्यद्भिः = जाणणाऱ्या, अस्माभिः = आम्ही, अस्मात्‌ पापात्‌ = या पापापासून, निवर्तितुम्‌ = परावृत्त होण्यासाठी, कथम्‌ = का (बरे), न ज्ञेयम्‌ = विचार करू नये
अर्थ
जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये? ॥ १-३८, १-३९ ॥
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥ १-४० ॥
अन्वय

कुलक्षये = कुळाचा नाशामुळे, सनातनाः = सनातन (असे), कुलधर्माः = कुळधर्म, प्रणश्यन्ति = नष्ट होऊन जातात, धर्मे नष्टे = धर्माचा नाश झाल्यावर, कृत्स्नम्‌ = संपूर्ण, कुलम्‌ = कुळात, अधर्मः उत = पापसुद्धा, अभिभवति = मोठ्या प्रमाणात पसरते
अर्थ
कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. ॥ १-४० ॥
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ॥ १-४१ ॥
अन्वय

कृष्ण = हे कृष्णा, अधर्माभिभवात्‌ = पाप अधिक वाढल्याने, कुलस्त्रियः = कुळातील स्त्रिया, प्रदुष्यन्ति = अतिशय दूषित होतात, च = (आणि), वार्ष्णेय = हे वार्ष्णेया, स्त्रीषु दुष्टासु = स्त्रिया दूषित झाल्या असताना, वर्णसङ्करः = वर्णसंकर, जायते = उत्पन्न होतो
अर्थ
हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया, स्त्रिया बिघडल्या असता वर्णसंकर उत्पन्न होतो. ॥ १-४१ ॥
सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥ १-४२ ॥
अन्वय

कुलघ्नानाम्‌ = कुळाचा नाश करणाऱ्यांना, च = आणि, कुलस्य = कुळाला, सङ्करः = संकर (हा), नरकाय एव = नरकालाच घेऊन जाण्यासाठी (असतो), लुप्तपिण्डोदकक्रियाः = पिंड व पाणी यांच्या क्रियांना म्हणजे श्राद्ध व तर्पण यांना मुकलेले (असे), एषाम्‌ = यांचे, पितरः हि = पितरसुद्धा, पतन्ति = अधोगतीस प्राप्त होतात
अर्थ
वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. ॥ १-४२ ॥
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ १-४३ ॥
अन्वय

वर्णसङ्करकारकैः = वर्णसंकर करणाऱ्या, एतैः दोषैः = या दोषांमुळे, कुलघ्नानाम्‌ = कुलघाती लोकांचे, शाश्वताः = सनातन (असे), कुलधर्माः = कुळधर्म, च = आणि, जातिधर्माः = जातिधर्म, उत्साद्यन्ते = नष्ट होऊन जातात
अर्थ
या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातिधर्म व कुळधर्म उध्वस्त होतात. ॥ १-४३ ॥
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ १-४४ ॥
अन्वय

जनार्दन= हे जनार्दना, उत्सन्नकुलधर्माणाम्‌ = ज्यांचा कुळधर्म नष्ट झाला आहे अशा, मनुष्याणाम्‌ = मनुष्यांचा, नरके = नरकातील, वासः = निवास (हा), अनियतम्‌ = अनिश्चित काळापर्यंत, भवति = होतो, इति = असे, अनुशुश्रुम = आम्ही ऎकत आलो आहोत
अर्थ
हे जनार्दना, ज्यांचा कुळधर्म नाहीसा झाला आहे, अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते, असे आम्ही ऎकत आलो आहोत. ॥ १-४४ ॥
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम्‌ ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ १-४५ ॥
अन्वय

अहो = अरेरे, बत = किती वाईट, राज्यसुखलोभेन = राज्य व सुख यांच्या लोभाने, वयम्‌ = आम्ही (बुद्धिमान असूनही), यत्‌ = जे, स्वजनम्‌ = स्वजनांना, हन्तुम्‌ = मारण्यास, उद्यताः = तयार झालो आहोत, (तत्‌) = (ते म्हणजे), महत्‌ = मोठे, पापम्‌ = पाप, कर्तुम्‌ = करण्यास, व्यवसिताः = आम्ही तयार झालो आहोत
अर्थ
अरेरे! किती खेदाची गोष्ट आहे! आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो, हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे! ॥ १-४५ ॥
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्‌ ॥ १-४६ ॥
अन्वय

यदि = जरी, अशस्त्रम्‌ = शस्त्ररहित, अप्रतिकारम्‌ = प्रतिकार न करणाऱ्या (अशा), माम्‌ = मला, शस्त्रपाणयः = हातात शस्त्र घेतलेले, धार्तराष्ट्राः = धृतराष्ट्राचे पुत्र, रणे = युद्धामध्ये, हन्युः = मारतील, (तथापि) = तरी, तत्‌ = ते (मारणे), मे = माझ्यासाठी, क्षेमतरम्‌ = अधिक कल्याणकारक, भवेत्‌ = होईल
अर्थ
जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले, तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. ॥ १-४६ ॥
सञ्जय उवाच
एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत्‌ ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ १-४७॥

अन्वय
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, सङ्ख्ये = रणांगणावर, शोकसंविग्नमानसः = शोकामुळे मन उद्विग्न झालेला, अर्जुनः = अर्जुन, एवम्‌ = असे, उक्त्वा = बोलून, सशरम्‌ = बाणासह, चापम्‌ = धनुष्य, विसृज्य = टाकून, रथोपस्थे = रथाच्या मागील भागी, उपाविशत्‌ = बसला
अर्थ
संजय म्हणाले, रणांगणावर दुःखाने मन उद्विग्न झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला. ॥ १-४७ ॥

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact