अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)

मग पिकलिया सुखाचा परिमळु । कीं निवालिया अमृताचा कल्लोळु ।
तैसा कोंवळा आणि रसाळु । बोलु बोलिला॥

प्रत्ययकारी शब्द आणि प्रेमळ भाव दोन्ही प्रकट करणाऱ्या श्रीकृष्णाच्या वाणीचे ज्ञानदेवांनी केलेले हे वर्णन….
साधं ‘आणि कृष्ण पुढे म्हणाला’ असं लिहीणं आणि ‘सुखाचा परिमळु, अमृताचा कल्लोळु’ म्हणणं यातील अनुभवाचा फरक ज्याला कळला त्याला ब्रह्म अक्षर असते आणि अक्षर ब्रह्म असते हे दोन्ही पटावे!!
ब्रह्म आणि अध्यात्म यांचे अर्थ स्पष्ट केल्यानंतर श्रीकृष्ण अधिभूत, अधिदेैव आणि अधियज्ञ या संज्ञांकडे वळतो.

अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम्‌ । अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर॥
उत्पत्ती-विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे अर्जुना, या शरीरात मीच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे.

जर ब्रह्म अ-क्षर आहे तर जे क्षर आहे ते अधिभूत आहे.

तैसें असतेपण आहाच । नाहीं होइजे हें साच । जयांतें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां।
भूतांतें अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगें तरि दिसे । जे वियोगवेळे भ्रंशे । नामरूपादिक।

ज्ञानदेवांनी दोन ओळीत अधिभूताचे सुंदर वर्णन केलंय. पाच महाभूतांपासून जे बनते (पांच पांच मिळोनिया). जे दृष्य आहे. ज्याला आपण पाहतो आणि नावाने ओळखतो (नामरुपादिक) ते नाशवंत (वियोगवेळे भ्रंशे) भूतमात्र म्हणजे अधिभूत.

अधिदैवत म्हणजे काय?

जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशीचा अध्यक्षु । जो देहास्तमनीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा।
जो परमात्माचि परि दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा । म्हणोनि स्वप्नींचिया बोरबारा । संतोषें शिणे।

अधिदैवताला ज्ञानदेवांनी दुसरा परमात्माच म्हटले आहे. अधिदैव म्हणजे इंद्रियांना कार्यरत करणारी शक्ती. डोळ्यांना दृष्टी, त्वचेला स्पर्श किंवा नाकाला गंध देणारे तत्व म्हणजे अधिदैव.

अधियज्ञ
अधियज्ञ म्हणजे मी स्वतः असे श्रीकृष्ण सांगतो.
येथे अधिभूत किंवा अधिदैव या कल्पना समजणे तितकेसे कठीण नाही. अधियज्ञ समजणे काहीसे अवघड आहे. मुळात त्यासाठी आधी ‘यज्ञ’ समजून घेणे अधिक आवश्यक आहे.

यज्ञ
सर्वसाधारणपणे यज्ञ याचे आपल्या डोळ्यासमोर उभे राहणारे चित्र म्हणजे एक चौकोनी वेदी आहे ज्यात अग्नि तेवत आहे आणि ऋषीमुनी त्यात वरुन पळीने तुप ओतत आहेत. धार्मिक टिव्ही सिरियलमध्ये वगैरे याच कृतीला यज्ञ म्हणतात!! हल्ली अग्निहोत्र नावाचा एक घरगुती यज्ञाचा प्रकारही प्रसिद्ध (मराठीत पॉप्युलर) होत आहे. हा यज्ञ आहे का तर याचे उत्तर नाही असे आहे. केवळ अग्निमध्ये आहुती देणे म्हणजे यज्ञ नव्हे. किंबहूना अग्नीमध्ये आहुती देणे ही एक प्रतिकात्मक कृती आहे यज्ञ नाहीच. हे प्रतिक आले कुठुन मग?
यासाठी पुन्हा अक्षरब्रह्माकडे वळावे लागेल. अग्निला संस्कृतात ‘पावक’ असा शब्द आहे. पावक याचा अर्थ पावन किंवा शुद्ध करणारा. आपल्याला हे माहिती आहे की – सोने शुद्ध करण्यासाठी त्याला अग्निमध्ये झाळतात. त्यामुळे त्यातील अशुद्ध तत्वे भस्मीभूत होऊन शुद्ध सोने प्राप्त होते. लोखंडही गाळून त्याचे पोलाद करताना शुद्धीकरणासाठी हाच अग्नि वापरतात. म्हणून कोणतीही गोष्ट शुद्ध करण्यासाठी, मग ते वातावरण का असेना, अग्निची योजना केली जाते. हे तथ्य आपल्या पूर्वजांना ज्ञात होते. म्हणूनच अग्नि आणि शुद्धीकरण (आहुती) यांचा संबंध जोडून यज्ञाचे प्रतीक निर्माण करण्यात आले. यज्ञ हा शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. मग ते वस्तु, वातावरण किंवा मनाचेही शुद्धीकरण असो. मन शुद्ध करणे किंवा शुद्ध मनाने किंवा उदात्त हेतूने केलेले कार्य म्हणजे यज्ञ….
म्हणूनच यज्ञाला यजुर्वेदात विश्वतोधार म्हटले आहे.

स्व॒र्यन्तो॒ नापे॑क्षन्त॒ आ द्या रो॑हन्ति॒ रोद॑सी । य॒ज्ञं ये वि॒श्वतो॑धार॒ सुवि॑द्वा सो वितेनि॒रे।

निघण्टुत यज्ञाची १५ अर्थपूर्ण नावे/प्रकार येतात.
यज्ञः, वेनः, अध्वरः, मेधः, विदर्थः, नार्यः, सवनम्, होत्रा, इष्टिः, देवताता, मखः, विष्णुः, इन्दुः, प्रजापतिः, धर्मः इति पञ्चदश यज्ञनामानि।।

(**जाता जाता हे सांगायला हरकत नाही की यातील ‘अध्वरः’ या शब्दाचा अर्थ तैत्तिरिय ब्राह्मणात अहिंसा असा दिलाय. यज्ञ हिंसेचे समर्थन करत नाही हे ध्यानात यावा हा हेतू)

कर्मयोगात म्हणूनच श्रीकृष्ण निष्काम कर्माला यज्ञाची उपमा देतो किंबहुना कर्म हे यज्ञ समजून इदं न मम या भावनेने केल्यास त्याचे बंधन लागत नाही असे म्हणतो ते याच अर्थाने. सगळ्या निसर्गाच्या चक्राचा आधार हे असे यज्ञकर्म किंवा कर्मयज्ञ आहे हे ही तो सांगतो. (पहा कर्मयोग)

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः।।
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ । तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्।

आता अधियज्ञ म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर हे समजणे कठीण जाणार नाही!
जीव आणि अजीव या दोन्हीच्याही द्वैतातून ही सर्व सृष्टी निर्माण झाली. या दोन्हीच्याही सहाय्याने सृष्टीचे सर्जन करणारा मी या दोन्हीच्याही पलिकडे असणारे तत्व आहे. जीव आणि अजीवाचे वास्तविक स्वरुप जाणून घेणाराच त्या दोन्हीच्याही पलिकडे असणारे तत्व जाणू शकतो. अधियज्ञ हा वास्तविक यज्ञ मानला तर अधिभूत आणि अधिदैव या त्यातील आहुती आहेत.
साधे उदाहरण घेउ भक्त पायाने चालत देवदर्शनाला जातो. येथे भक्ताचे पाय हे ‘अधिभूत (जड तत्व)’ आहे. देऊळ जेथे देवाचे वास्तव्य (शक्ती/चैतन्य) आहे ते गन्तव्य स्थान हे ‘अधिदैव’ आहे. प्रत्यक्ष देवाचा साक्षात्कार हा ‘अधियज्ञ’ आहे. आता देवळात गेल्यावर आपल्याला जे पवित्र, शुद्ध आणि सात्विक वगैरे वाटते ते अव्यक्त असते. केवळ देवळात गेल्यावरच तसा अनुभव यावा का? देव तर सगळीकडे आहे. प्रत्यक्ष आपल्यातही आहे. मग पावित्र्य, सात्विक भाव हे आपल्याच अंतरी आहेत याची जेव्हा जाणीव होते तेव्हा जड आणि चैतन्य दोन्ही तत्वांच्या पार दिसायला लागते. जणु त्यांची आहुती पडते, बुद्धी शुद्ध होते आणि अधियज्ञ साकार होतो. म्हणजे आपल्याला आपल्यातीलच परब्रह्माची जाणीव होते.
अधियज्ञ म्हणजे मी स्वतः हे श्रीकृष्ण म्हणतो ते या अर्थाने. अधि-आत्म (अध्यात्म) म्हणजे स्व-भाव जाणणे. अधियज्ञ म्हणजे स्वतःच स्वतःला पावन करणारा यज्ञ.
आता राहीला अर्जुनाचा शेवटचा प्रश्न. प्रयाणकाली किंवा मरतेसमयी स्थिरमती व्यक्तीने काय जाणायचे आहे. उत्तर अगदी सोपे आहे. श्रीकृष्ण त्याला एक साधे तत्व सांगतो.

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्‌ । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः।
हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला त्याला तो जाऊन मिळतो. कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो.

मनुष्य अनन्यभावनेने ज्या गोष्टीचे चिंतन करत असतो तो अंतिमतः त्या अवस्थेला जाऊन मिळतो.
मराठीत एक छान म्हण आहे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस… ज्या व्यक्तीच्या मनात भीती असते त्याला सतत त्याचेच प्रतिबिंब आजूबाजूला दिसते. वरवर धाडसीपणाचा आव आणणारे असे कितीतरी शूर वीर आपण आजूबाजूला पाहतो! ज्याच्या मनात शांत समाधानी भाव असतात त्याला आसमंतात त्याचाच प्रत्यय येतो. मग जो सातत्याने अनन्यभावाने परमात्म्याचे चिंतन करेल त्याला परमात्मा प्राप्त होणे सहाजिकच नाही का? तत्व साधे आहे. जसा भाव तसा देव! एकनाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे.
भाव तोंचि देव ।ये अर्थी संदेह धरूं नका।
भाव भक्ति फळे भावें देव मिळे। निजभावें सोहाळे स्वानंदाचे।
भावचि कारण भावचि कारण ।यापरतें साधन नाहीं नाहीं।
एका जनार्दनीं भावाच्या आवडी ।मनोरथ कोडी पुरती तेथें।
म्हणूनच श्रीकृष्ण सांगतो की,

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्‌ । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः।
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्‌।

जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्वकाळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन-बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निःसंशय मलाच येऊन मिळशील.

(गंमतीचा भाग असा की या श्लोकांतील अनन्यभक्तीचा भाव वगळून केवळ ‘मामनुस्मर युध्य च’ हा भाग प्रसिद्ध करुन त्यायोगे गीतेत हिंसेचा प्रसार केला आहे असा भास करुन दिला जातो!! गीता किंवा एकूणच प्राचीन भारतीय वाङ्मयाच्या अयोग्य अन्वयार्थाबद्दल पुन्हा कधीतरी…..)

परमेश्वराच्या साक्षात्कार घडविणाऱ्या गीतेतील अध्यायांच्या गटातील अक्षरब्रह्मयोग येथेच संपन्न करुयात.

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

ओळख वेदांची – आरण्यक

आरण्यक या नावातून अनेक अर्थ ध्वनीत होतात. त्या सर्व अर्थांचा समुच्चय केला तर आरण्यक म्हणजे काय हे समजणे सोपे जाईल.
पहिला अर्थ – अर्थातच अरण्यात किंवा जंगलात लिहिले गेलेले ग्रंथ, असा सोपा अर्थ निघतो. ‘अरण्ये भवम् इति आरण्यकम्।‘
दुसरा अर्थ सायणाचार्यांच्या भाष्यात येतो तो म्हणजे – वेदाचा जो अंश अरण्यात पठण/मनन केला जातो त्याला आरण्यक म्हणता येईल.

आरण्याध्ययनादेतद् आरण्यकमितिर्यते। अरण्ये तदधीयीतेत्येवं वाक्यं प्रवक्ष्यते।
(तैत्तिरिय आरण्यक भाष्य श्लोक ६)

हे झाले शब्दाची फोड करणारे अर्थ. अरण्यात माणूस कशासाठी जातो? शांतता मिळविण्यासाठी, चिंतन/तप करण्यासाठी. निसर्गाच्या सहवासात माणसाला परमात्म्याचा सहवास अधिक प्रकर्षाने जाणवतो. (**जंगलातील शांततेचा अनुभव घेतलेल्यांना हे चटकन् पटावे) अर्थातच नागरी जीवन आणि मोहाचा त्याग करून तत्वचिंतनात आयुष्य घालविण्यासाठी लोक अरण्याची वाट धरतात. म्हणूनच तत्वचिंतन हा विषय सांभाळणारे कोणते वैदिक ग्रंथ त्याने वाचावेत तर आरण्यके! हा आरण्यकांचा विषय सांगणारा अर्थ आहे.
आधीच्या भागात (वाचा – ब्राह्मण ग्रंथ) आपण पाहिलेत की वेदातील मंत्रांचा यज्ञीय कर्मकांडाशी निगडीत अर्थ लावण्याचे काम ब्राह्मण ग्रंथ करतात. याच कर्मकांडांचा तात्विक अभिप्राय मांडण्याचे काम आरण्यके करतात. कर्मकांड सांगणाऱ्या ब्राह्मण ग्रंथांना पूरक असे तत्वज्ञान सांगणे आणि पुढे येणा-या उपनिषदांची नांदी करणे असे दुहेरी कार्य आरण्यके करतात. त्यामुळे आरण्यके ही वेदवाङ्मयातीला कर्मकांड आणि ज्ञानकांड यांची सांगड घालणारा दुवा आहेत. वेदवाङ्मयात आरण्यकांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. उपनिषदे जर भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया मानली तर आरण्यके ही या उपनिषदांचा पाया मानायला हरकत नाही असे म्हणतात.
(**जाता जाता हे ही सांगायला हवे की भाषिकदृष्ट्या पाहिल्यास आरण्यके ही वैदिक आणि लौकिक संस्कृत भाषेतीला दुवा मानली जातात)

रचना/स्वरूप

सर्वसाधारणपणे ब्राह्मण किंवा उपनिषदांप्रमाणेच प्रत्येक वेदांशी निगडीत अशीच आरण्यकांची रचना झाली असे मानतात त्यामुळेच ब्राह्मण ग्रंथांप्रमाणेच शाखा उपशाखा व्यापून आरण्यकांची संख्याही ११३० च्या आसपास असावी असा विचार मांडला जातो. परंतू दुर्दैवाने आज उपलब्ध असणाऱ्या आरण्यकांची संख्या केवळ ७ आहे.
ऋग्वेद – ऐतरेय आरण्यक, शांखायन आरण्यक
शुक्लयजुर्वेद – माध्यंदिन बृहदारण्यक, काण्व बृहदारण्यक
(बृहदारण्यक हे वास्तविक आरण्यक आहे. परंतु त्याचा आकार, विषयव्याप्ती इ. अनेक कारणांमुळे त्याची गणना उपनिषदांमध्ये होते.)
कृष्णयजुर्वेद – तैत्तिरिय आरण्यक, मैत्रायणी आरण्यक
सामवेद – तवलाकर(तवल्कर?) (जैमिनीय) आरण्यक, छान्दोग्य आरण्यक
अथर्ववेदाची आरण्यके उपलब्ध नाहीत किंवा त्याबद्दल पुरेशी माहितीही नाही.

विषय

नवनीतं यथा दध्नो मलयाच्चंदनं यथा, आरण्यकं च वेदेभ्य ओषधिभ्योsमृतं यथा।
(साधारण अर्थ) – दह्याचे (सार) जसे लोणी, मलयवृक्षाचे (सार) जसे चंदन किंवा औषधी(वनस्पतीं)चे (सार) जसे अमृत तसे वेदांचे (सार) आरण्यकांमध्ये आहे.

महाभारतातील या श्लोकातील उक्ती योग्य की अतिशयोक्ती, यात न पडता जर अर्थ पाहिला तर आरण्यकांचा विषय आणि त्याचे महत्व दोन्ही लक्षात येते. वर सांगितल्याप्रमाणे यज्ञकर्म आणि तत्वज्ञान हे आरण्यकांचे प्रमुख विषय आहेत. यज्ञातील विधी, त्यातील वैदिक मंत्र आणि त्यांचे तत्त्वज्ञान असा एक विषय आहे. ब्राह्मण ग्रंथातील यज्ञ हे अनेक विधी, समारंभ इ. नी परीपूर्ण आणि गुंतागुंतीचे आहेत. आरण्यकातील यज्ञ मात्र अतिशय साधे व सोपे असून अरण्यवासी ऋषीमुनी किंवा सामान्य माणसालाही सहज साध्य आहेत.
सृष्टीची उत्पत्ती या विषयावर विस्तृत मंथन आरण्यकात आढळते. वेदांप्रमाणेच आरण्यकातही ‘प्राण’ याच तत्त्वाला दृष्य अदृष्य सृष्टी आणि महाभूतांचे मूळ मानले गेले आहे. ऐतरेय आरण्यकात –
स्थूल आणि सूक्ष्म सर्वकाही प्राण तत्वातून उगम पावते, अंतरीक्ष आणि वायुचेही सर्जन प्राणातूनच होते असे वर्णन आहे.

प्राणेन सृष्टावन्तरिक्षं च वायुच्क्षान्तरिक्षं वा……….। 2

मैत्रायणी संहितेत प्राण तत्वालाच सर्व तत्वांचा जनक म्हणले आहे.

त्वं ब्रह्म त्वं च वै विष्णुः, त्वं रुद्रस्त्वं प्रजापति। त्वमाग्नि वरुणो वायुः, त्वार्मन्द्रस्त्वं निशाकरः।

मनुष्यासह संपूर्ण चराचर सृष्टीच्या मुळाशी प्राण हे एकच तत्व आहे. त्यामुळेच सृष्टीतील या सर्व घटकांशी सहभावनेने राहणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे हा विचार ऐतरेय आरण्यकात येतो. केवळ माणसा माणसात नव्हे तर सृष्टीच्या प्रत्येक दृष्य अदृष्य घटकातील हे साधर्म्य लक्षात घेऊन त्यांच्यासह कृतज्ञभावनेने राहण्याचा आग्रह आरण्यके करतात. याच कर्तव्याचा विसर पडल्याने मनुष्याला आज पर्यावरण आणि निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागतोय. आजकाल पर्यावरण, प्रदुषण, वायु उत्सर्जन, कार्बन न्युट्रल वगैरे शब्द वापरून सर्वत्र प्रसिद्ध होत चाललेल्या चळवळी ज्या गोष्टी घसा फोडून सांगत आहेत त्याचे मूळ तत्व आरण्यकात अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात उभं केलंय. आरण्यकात याच तत्वाला अनुसरुन पंचमहाभूत यज्ञाची कल्पना मांडली आहे. हे पाच यज्ञ किंवा त्याला अनुसरुन नेहमी वागले पाहिजे असे आरण्यकात आवर्जून सांगितले आहे

पंच वा एते महायज्ञः सतति प्रजायन्ते।3

हे यज्ञ म्हणजे केवळ हवन नसून वर सांगितल्याप्रमाणे चराचर सृष्टीशी बांधिलकी जपण्याचे कार्य आहे. ब्रह्मयज्ञ – ऋषींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
पितृयज्ञ – पूर्वज/पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
देवयज्ञ – देवतांबद्दल यज्ञाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
भूतयज्ञ – प्राणीमात्र आणि वनस्पतींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
अतिथियज्ञ – अभ्यागतांचा आदर करणे.

या यज्ञांच्या माध्यमातून भोवतालच्या परिसरासह पर्यावरणाशी एकरूप राहणे महत्वाचे आहे हे आज भयानक वास्तव म्हणून समोर आलेले ज्ञान आरण्यकांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितले आहे. सृष्टीतील प्रत्येक तत्व जसे वायु, पाणी, अग्नि आणि वनस्पती यांचे महत्व जवळपास सर्व आरण्यकांमध्ये येते. वायुचे महत्व सांगताना अशुद्ध वायुमुळे आजारपण येते हे ऐतरेय आरण्यक सांगते. इतकेच नव्हे तर यज्ञातील समिधा निवडताना भोवतालचा वायु शुद्ध करणाऱ्या औदुंबर किंवा पळसासारख्या वनस्पती वापराव्यात असे सांगून यज्ञकर्माचेही महत्व स्पष्ट करते. यज्ञकर्म आणि तत्वज्ञान याची सांगड घालून वेद आणि उत्तरवेदकालीन समाजाला संतुलित धर्म कसा असतो याचा वस्तुपाठ आरण्यके घालून देतात. म्हणूनच ज्ञानकर्मसमुच्चय या उपनिषदांच्या प्रमुख विषयाची बीजे आरण्यकात आढळतात असे म्हटले जाते.
अशाप्रकारे वेदवाङ्मय ही केवळ कोणत्याही एका धर्मासाठी किंवा विशिष्ट पंथासाठी रचलेली धार्मिक ग्रंथसंपदा नसून विश्वकल्याणाच्या उदात्त हेतून प्रेरित झालेल्या तत्कालिन ऋषीमुनीनी उभे केलेले जीवनकोश आहेत. वेदवाङ्मयाच्या महत्वाविषयी पुढील भागात……

तळटीप
१. महाभारत, शांतिपर्व ३३१-३
२. ऐतरेय आरण्यक २/१/७
३. तैत्तिरिय आरण्यक

मागील भाग – ओळख वेदांची – उपनिषद पुढील भाग – वेदवाङ्मयाची थोरवी

Copyright sheetaluwach.com 2020 #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact
Exit mobile version