बाली अर्थात वाली द्विप इंडोनेशियाच्या द्विपसमुहातील एक रत्न.. आपल्या हिंदुसंस्कृतीची नाळ अजूनही जपणारे बेट. राम, सीता, हनुमानाच्या गोष्टी सांगणारं. भव्य मंदिरं, लोककलेने नटलेली पौराणिक पात्रांची नृत्यं, मनोहारी शिल्पं… एकाच वेळी हिरवागार निसर्ग आणि ज्वालामुखी दोन्ही कवेत घेणारं, देवभोळ्या पण उद्यमशील लोकांचं बेट!
बालीत पाहण्यासारखं काय आहे? फक्त डोळे उघडे ठेवा आणि फिरा, बालीत सगळं काही पाहण्यासारखंच आहे!! नाट्य, नृत्य, संगीत, निसर्ग, खानपान, पशु-पक्षी, माणसं………….. पर्यटनातून अर्थव्यवस्था चालवणारे बाली आजही आपले अर्वाचीन रुप अभिमानाने मिरविते.
केचक – रामभक्त वानरांनी केलेले नृत्य आणि गायन. समईचा मंद प्रकाश, ‘चक चक केचक’ हा ध्वनी आणि धीरगंभीर आलापी यातून रंगणारे रामायणातील प्रसंग चितारणारे नाटक. हे फक्त मंदिराच्या आवारातच करायचे.
धीरगंभीर असे वेदपठण किंवा संथ पण लयबद्ध ध्रुपदाची आठवण करून देणारी आलापी, नवीन प्रवेशाची तयारी होताना या अप्रतिम स्वराघाताने प्रेक्षकांना मोहीत करून ठेवते.
रावणवध — ओघवता स्वर, वाढलेली लय, रामलक्ष्मणाची आखीव हालचाल…. केचक जसं अंतिम टप्प्यात येतं आसमंत थरारून उठतो, जणु काही सगळं बाली रामायणच जगते…! #kecak #bali #visitbali
लेगॉंग – तुलनेने आधुनिक असा नृत्यप्रकार. वाद्यवृंद व नर्तक यांचा अप्रतिम मेळ आणि रंगांची उधळण करणारी वेषभुषा…… #legong #bali #visitbali
निसर्गकृपेची मुक्त उधळण….. निसर्ग बालीचा स्थायिभाव आहे. वडीलांनी मुलाला अंगावर खेळवावे तसा निसर्ग अंगाखांद्यावर बाली बेटाला खेळवतो. कॉफी लुवाक हा निसर्गाच्या कृपेचा एक अनोखा अविष्कार. वनस्पती, प्राणी आणि माणूस तिघांनी मिळून केलेला चवीचा चमत्कार……किलोमागे ७०० डॉलर्स मोजायला लावणा-या कॉफीच्या बीया लुवाक नावाच्या प्राण्याच्या विष्ठेतून मिळवाव्या लागतात. त्या प्राण्याने न चावता नुसत्या गिळलेल्या बीयाच सर्वोत्कृष्ट कॉफी देतात. त्या मिळवून स्वच्छ करून ‘कोपि लुवाक’ (Kopi luwak) बनते!! #kopiluwak #luwak #coffee
पेटुलु – उबुद, बालीतील एक छोटा कसबा. असं सांगतात की गावतल्या लोकांनी देवाच्या कृपेसाठी केलेल्या यज्ञानंतर पांढरे हेरॉन पक्षी प्रथम या गावात आले. देवाची भेट म्हणून या पक्षांना मोठ्या श्रद्धेने जपले जाते. गावात त्यांना मुक्तद्वार असते. ती दंतकथा आज गावाची ओळख बनलीय. संध्याकाळी ५ च्या नंतर जवळजवळ २०,००० पांढ-या हेरॉन पक्षांची गावात दाटी होते आणि अर्थात त्यांना पहायला येणा-या पर्यटकांचीही. #petulu #bali
‘मर्कट अभयारण्य’ पाडांगतेगाल #Padangtegal.
एकजीव निसर्ग, प्राणी आणि मानवनिर्मिती…. रामाच्या सेनेचे अरण्य! येथे माक़डांना मुक्तद्वार असते.
वनस्पती, फळे, प्राणी चराचरातील अन्नब्रह्म. #crispyduck #gadogado #fruits
View the post in English #Bali – Contemporary account of an Ancient Dream!
Copyright sheetaluwach.com 2020 ©
Very informative
I love it
Nice information. 👍
वा ! वाचकाला खिळवून ठेवणारी भाषा शैली , मोहक फोटो आणि व्हिडिओ, फोटोंची समर्पक नावं .. आणि रंजक माहिती 👍👍👍. फार छान ..