भगवद्गीता – अध्याय आठवा – अक्षरब्रह्मयोग
गीता शिकवत असताना हा प्रश्न अनेकदा विचारला जातो की श्रीकृष्णाने गीता सांगायला १८ अध्याय का घेतले? जे काही सांगायचं ते श्रीकृष्णासारख्या विद्वानाला थोडक्यात सांगता आलं नसतं का? दोन चार अध्यायात आटपायचं ना! असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. एखादे हसत खेळत गीता, किंवा सुलभ गीता गाईड वगैरे काहीतरी छापायला काय हरकत होती? आजच्या भाषेत सांगायचे तर एक छोटा युट्युब व्हिडीओ करायचा How to understand Gita in 5 minutes!!
सात आंधळ्यांची कथा आपल्यापैकी साधारण प्रत्येकाला माहिती आहे. जगभरातील जवळपास प्रत्येक संस्कृतीत ही कथा येते. कमी अधिक फरकाने या सर्व कथांचा मतितार्थही सारखाच आहे. हत्ती नक्की असतो कसा हे अनुभवण्यासाठी सात अंध व्यक्ती हत्तीला स्पर्श करून आपले मत मांडतात. ज्याच्या हाताला हत्तीचा जो अवयव लागतो त्याला हत्ती त्या आकाराचा असतो असे वाटते. कोणाला तो खांबासारखा तर कोणाला दोरी सारखा वाटतो इ. इ.
तात्पर्य काय की सातही आंधळ्यांना वाटलेले हत्तीचे स्वरुप हे अपूर्ण आहे. बरं सातही आकार जाणले म्हणजे हत्ती कळाला का? तर तसेही नाही. आकार हे केवळ एक परिमाण झाले. हत्ती जाणायाचा तर आकार, रंग, गंध, वृत्ती यासह सर्व बाजू जाणायला ह्व्यात. म्हणजेच माणसाला एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे किंवा घटनेचे खरे स्वरुप जाणून घ्यायचे असेल तर त्याला ते अनेक बाजूंनी समजून घ्यायला हवे. आपल्याला दिसणारी एकच एक बाजू म्हणजे सत्य नव्हे.
जैन दर्शनांतही ‘स्याद् वाद’ नावाचे एक अत्यंत उत्कृष्ट तत्व आहे. त्याला ‘अनेकान्तवाद’ असेही म्हणतात. स्याद्वादी म्हणतात प्रत्येक वस्तुमध्ये (यात सगळे आले) असंख्य गुणावगुण असतात. ज्याला जे गुण अनुभवास येतात तो त्या गुणांच्या आधारे ती वस्तु जाणतो. याचा अर्थ त्याला केवळ व्यक्तीसापेक्ष ज्ञान प्राप्त होते. या असंख्य गुणावगुणांसकट जाणायचे तर त्या वस्तुला सात विविध आयामातून पाहणे आवश्यक आहे. हे सातही आयाम विभिन्न परीस्थितीतून वस्तुच्या गुणावगुणांचे ज्ञान करून देतात.
सोप्या भाषेत सांगायचे तर कित्येकदा असा अनुभव येतो की आपण एखाद्या व्यक्तीला जसे समजत असतो त्याच्या अगदी विरुद्ध असे मत आपल्याला ऐकायला किंवा अनुभवायला मिळते. सार्वजनिक जीवनातल्या प्रसिद्ध व्यक्तींबद्दल आपण अनेक कथा, दंतकथा ऐकत असतो ज्यात एकात ती व्यक्ती नायक असते तर दुसऱ्यात खलनायक. वर्षानुवर्ष एखाद्याच्या संगतीत राहूनही ती व्यक्ती नक्की कशी आहे हे सांगणे कठीण जाते. कारण अनेकान्तवाद!!
संपूर्ण गुणावगुणांसकट एखादी व्यक्ती जाणणे इतके कठीण असेल तर मग प्रत्यक्ष गुणातीत परमेश्वराचे स्वरुप जाणणे किती कठीण असेल? गीता सांगायला श्रीकृष्णाने १८ अध्याय कशाला घेतले या प्रश्नाचे हे उत्तर आहे.
श्रीकृष्ण जसे सांगत जातो तसे अर्जुनाला त्या ज्ञानाचे वेगवेगळे आयाम दिसायला लागतात. त्यावर तो प्रश्न विचारतो आणि मग पुढील अध्यायात कृष्ण त्याचे निरसन करतो. विविध दृष्टिकोनांतून ज्ञान त्याच्यापुढे मांडतो. अशाप्रकारे अर्जुनाला ‘हत्ती’ सर्वबाजूंनी अगदी स्वभावासकट समजतो. आपल्यालाही ‘हत्ती’ जाणायचा तर अशाच प्रकारे प्रत्येक अध्यायातून तो वेगवेळ्या परिमाणातून जाणायला हवा.
गीतेच्या पहील्या सहा अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला स्व किंवा आत्मन् म्हणजे काय, तो कसा जाणायाचा, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्रता कोणती याचे तत्वज्ञान सांगतो. पुढल्या सहा अध्यायातून ते ज्ञान कोणत्या स्वरूपात प्रकट होते याचे वर्णन श्रीकृष्ण करतो. अनेक अंगांनी श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या स्वरुपाचे तसेच स्व किंवा आत्मन् मधील त्या स्वरुपाचा साक्षात्कार घडवतो. ज्याला आपण मागील अध्यायात विज्ञान म्हणालो. सात निरनिराळ्या कल्पनांच्या अनेकान्तवादातून विज्ञान समजून घेणे म्हणजे अक्षरब्रह्मयोग…..
ज्ञानविज्ञानयोगाच्या अंतिम श्लोकात श्रीकृष्ण म्हणतो
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः । प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः।।
जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसह (सर्वांच्या आत्मरूप अशा) मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात.
अर्जुनाला सहाजिक प्रश्न पडतो की अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ म्हणजे काय? आणि अंतकाळी जाणणे म्हणजे काय?
अक्षरब्रह्मयोगाला याच प्रश्नांपासून सुरुवात होते. अर्जुन विचारतो की
किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन । प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः॥
तू ज्या संकल्पना वापरल्यास त्यांचे अर्थ सांग. ते ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव कोणाला म्हणायचे? अधियज्ञ म्हणजे काय आणि तो कोठे असतो? अंतकाळी चित्त स्थिर असणाऱ्या व्यक्तीने काय जाणायचे आहे?
(किती प्रश्न झाले? सात!!! आंधळ्यांची संख्या किती सात…. अनेकान्तवादातील आयाम किती सात……. धर्म, भूगोल किंवा नाव बदलले तरी तत्वज्ञांचे विचार हे अंतिमतः एकाच सत्याच्या दिशेने जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे.)
अर्जुनाच्या सात प्रश्नांची श्रीकृष्णानी दिलेली उत्तरे हा या अध्यायाचा पहिला भाग आहे. दुसऱ्या भागात श्रीकृष्ण, ज्ञानी भक्ताचे आपले निरुपण, जे मागील अध्यायात सुरु केले होते ते पुढे नेतो आणि अंतिम काही श्लोकात परमगती प्राप्त करण्याच्या दोन मार्गांची चर्चा श्रीकृष्ण करतो.
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते। भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः॥
ब्रह्म हे परम (तसेच) अक्षर आहे. स्वभावाला अध्यात्म म्हणावे. भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो.
ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म या तीन संज्ञांचे अर्थ प्रथम श्रीकृष्ण सांगतो.
जे अक्षर आहे ते ब्रह्म आहे. क्षर आणि अक्षर असे दोन शब्द आहेत. यातला अक्षर आपल्याला माहिती आहे. मराठीत असे अनेक शब्द आहेत जे आपण बोलण्यात सहज वापरून जातो परंतु त्यांचे अर्थ खरोखर विलक्षण आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते! अक्षर हा असाच एक शब्द. क्षर याचा अर्थ नाशवंत किंवा ज्याला क्षय आहे असे. तर अक्षर याचा अर्थ ज्याचा नाश होत नाही किंवा जे शाश्वत आहे, अक्षय आहे.
आपल्याला माहित असलेले अक्षर तरी काय आहे. ज्याचा क्षर किंवा भाग पडत नाही ते. वर्णमालेतले कोणतेही अ-क्षर घ्या. जेव्हा आपण अक्षर म्हणतो तेव्हा त्याची अधिक फोड करता येत नाही. ते क्षर नसते म्हणून अक्षर…. म्हणूनच त्याचा उच्चार एका ध्वनीत होतो.
(येथे एक नवलाची गोष्ट सांगायला हरकत नाही. अमृताते पैजा जिंकणारी मराठी भाषा सांगणारी ज्ञानेश्वरांची वाणी अजरामर झाली कारण ती ऐसी अक्षरे रसिके मेळवीन म्हणते. येथे अक्षर शब्दावरचा श्लेष हा भाषा आणि अक्षय तत्व या दोन्ही अर्थाने वापरला जातो. ज्ञानेश्वरीची भाषा आणि ज्ञानेश्वरीतील ज्ञान दोन्ही अक्षर आहे हेच तर ज्ञानदेवांना सुचवायचे आहे. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द किती विचारपूर्वक वापरलाय हे पाहिले की ज्ञानदेव योगीराज होते हे पटावे. असो)
सांख्ययोगात श्रीकृष्णाने सांगितलेल्या जीव-अजीवातील अजीव म्हणजे ब्रह्म.. कारण ते अक्षर आहे. त्याचे विघटन होत नाही त्याची फोड करता येत नाही. त्याचे कितीही भाग केले तरी ते सर्व ब्रह्मच रहातात. अर्धे किंवा पाव ब्रह्म होत नाहीत. अंशात्मक असो की पूर्ण, ब्रह्म हे सर्वथा आणि सर्वत्र पूर्णच असते. बृहदारण्यक उपनिषदातील ॐ पूर्णमदः पूर्णमिदं ही प्रार्थनाही हेच सांगते.
हे झाले ब्रह्म मग अध्यात्म काय आहे?
एकदा ब्रह्म काय आहे हे समजले की अध्यात्म समजणे कठीण नाही. अध्यात्म म्हणजे स्वभाव असे श्रीकृष्ण सांगतो
स्व-भाव हा अजून एक वापरून बोथट झालेला शब्द….
स्वभाव म्हणजे वागण्याची रीत असा आपला वापरातला अर्थ आहे. वास्तविक स्व म्हणजे आपण स्वतः आणि भाव म्हणजे त्याच्या मागचे तत्व. जसे आपण भक्तीभाव किंवा आपपरभाव हे शब्द वापरतो. मग स्व च्या मागचा भाव कोणता? जो स्व ला भाव (जिवंतपणा) प्राप्त करून देतो तो. म्हणजेच चैतन्य किंवा आत्मतत्व. जे शरीराला चलायमान करतं. म्हणूनच मृत शरीराला स्व-भाव नसतो जिवंत शरीराला असतो.
श्रीकृष्ण सांगतो अध्यात्म म्हणजे जड शरीर आणि चैतन्य यांचे द्वैत. ज्या तत्वाने या सृष्टीचे सर्जन झाले ते तत्व म्हणजे अध्यात्म. म्हणूनच अध्यात्म जाणायचे म्हणजेच स्वतःला जाणायचे. स्व-भाव जाणायचा. स्वतःला जाणा, तत्वमसि, Know Thyself वगैरे तत्वज्ञान जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेथे हाच अर्थ अभिप्रेत असतो असे श्रीकृष्ण सांगतो…..
अर्जुनाच्या उरलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात…..
मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)
Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach
खूप छान. पुन्हा छोट्या छोट्या गोष्टींचे नव्याने आकलन होत आहे.
खूप सुंदर व सोप्या भाषेत संकल्पना समजावून सांगितली आहे सर. मी अशाच मार्गदर्शनाची वाट बघत होतो आणि ती मिळाली. धन्यवाद सर. कृपया मला तुमच्या सगळ्या लिंक्स पाठवा.. माझ्या काही शंका असल्यास।मी तुम्हाला विचारीत जाईन ज्याला तुम्ही तुमच्या वेळेनुसार उत्तर द्या..
धन्यवाद अजित,
https://sheetaluwach.com/ येथून सर्व लिंक्स मिळवू शकता.