मागील दोन भागात आपण ऋग्वेद आणि यजुर्वेदाची माहिती करून घेतली. वेद परिवारातले तिसरे भावंड म्हणजे ‘सामवेद’. मुर्ती लहान पण किर्ती महान असे हे बालक आहे. प्रत्यक्ष भगवंताने गीतेतील विभूतियोगात “वेदानां सामवेदोऽस्मि”१ असं म्हणून सामवेदाचं महत्व अधोरेखित केलं आहे. शतपथ ब्राह्मण२, बृहद्देवता३ असे अनेक ग्रंथ सामवेदाचा गौरव करतात. मुख्यतः भारतीय संगीताचा उगम म्हणून सामवेदाकडे पाहिले जाते.
साम हा शब्द सा (ऋचा) + अम् (आलाप) असा तयार होतो. वेदातील ज्या ऋचांवर आलाप किंवा गायन करायचे त्यांचा संग्रह म्हणजे सामवेद असे म्हणता येईल. ऋचा आणि साम हे एकमेकांशिवाय असूच शकत नाहीत. त्यामुळे हे दोघे जणु पति पत्नीच आहेत असे म्हटले आहे!४ याचाच अर्थ गायन हे आपल्या उपासनापद्धतीचा एक अविभाज्य अंगच होते.
सामवेदाची रचना कशी आहे?
पूर्वार्चिक व उत्तरार्चिक असे सामवेदाचे दोन भाग आहेत. सामवेदातील मंत्रांची संख्या साधारण १८७५ असून त्यातील ९९ मंत्र सोडले तर बाकी सर्व मंत्र ऋग्वेदातील आहेत. पुर्वार्चिकात देवतांच्या स्तुतीपर मंत्र आहेत तर उत्तरार्चिकात यज्ञात आवश्यक असणा-या ऋचांचा संग्रह आहे.
ज्या मंत्रांच्या आधारावर गायन केले जाते त्याला योनिमंत्र म्हणतात. यालाच आपण आजच्या भाषेत थाट म्हणू शकतो. अशा एका योनिमंत्रावर अनेक गाणी गायली जाऊ शकतात. ऋग्वेदातील एकाच मंत्राचे गायन गौतम किंवा कश्यप असे ऋषीं त्यांच्या त्यांच्या शैलीने करत असत. जसे आज दोन भिन्न घराण्यातील गायक एकच राग त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मांडतात.
उदाहरणार्थ ऋग्वेदातील एक मंत्र आपण सामयोनिच्या नोटेशनसकट पाहुयात५
मूळ मंत्र –
अग्न॒ आया॑हि वी॒तये॑ गृणा॒नो ह॒व्यदा॑तये ।नि होता॑ सत्सि ब॒र्हिषि॑ ॥ (ऋ ६.०१६.१०)
आता हाच मंत्र गाण्यासाठी योनिमंत्र म्हणून सामवेदात कसा दिसतो ते पाहु
अक्षरांच्या वरील अंक हे उदात्त, अनुदात्त, स्वरित इ. स्वर दर्शवतात. हा झाला योनिमंत्र किंवा थाट. आता या चलनाचा आधार घेऊन जेव्हा मंत्र म्हटले जात तेव्हा त्याचा मूळ गाभा तसाच ठेऊनही वेगवेगळ्या प्रकारे गायन मांडले जायचे. यात शब्दांची किंचित ओढाताण होत असे.
उदाहरणार्थ हाच मंत्र गौतम कुलाच्या गायनात असा दिसेल
अशाप्रकारे सामगायनाचे किमान एक हजार प्रकार अस्तीत्वात होते, असे उल्लेख आहेत६. यावरून त्याकाळची गायनकला किती समृद्ध होती याचा अंदाज येतो. भारतीय संगीतातील श्रुतींसारख्या सूक्ष्म आणि घराण्यांसारख्या व्यापक विविधतेचे मूळ अशाप्रकारे सामवेदात आढळते.
हा गायनाचा प्रकार त्याकाळी नक्की कसा असावा याचा अंदाज आज करणे अवघड आहे. कारण सामगायन करणा-या परंपरा जवळपास लुप्त झाल्या आहेत. परंतु मौखिक परंपरेने जे जतन केले गेले आहे त्यातील एक छोटी क्लिप ऐकून आपण अंदाज घेऊ शकतो.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिंदु धर्म अभिमानाने मिरविणा-या बाली बेटावर एका केचक नृत्यामध्ये असाच रंगलेला आलाप अलिकडेच ऐकायला मिळाला.
सामवेदात आपल्याला परिचयाचे काय आहे?
साम, दाम, दंड, भेद या म्हणीतील साम या शब्दाचा अर्थ गोड बोलणे असा होतो. सामगायनातील गोडवा या अर्थानेच हा शब्द रुढ झाला.
कुंदनलाल सैगल (चित्रपट – तानसेन) आणि मन्ना डे (चित्रपट – संगीत सम्राट तानसेन) यानी अजरामर केलेले सप्त सुरन तीन ग्राम हे गाणं आठवतंय का? या गाण्यातील स्वरमंडलाचे वर्णन हे सामवेदातील स्वरमंडलाचे नारदीय शिक्षेत आलेले वर्णन आहे.
सप्तस्वराः त्रयो ग्रामाः मूर्छनास्त्वेकविंशति। ताना एकोनपंचाशत् इत्येतत्स्वरमण्डलम्।
देवळात गायलेल्या आरतीपासून ते मैफिलीत गायलेल्या रागापर्यंत भारतीय संगीताचे मूळ सामगायनातच आहे. गायन हा देवाच्या उपासनेचा सर्वोत्तम मार्ग आहे त्यामुळे संगीताला नादब्रह्म मानले जाते. वेदातील आकाराने लहान भावंड असूनही भारतीय संगीत आणि उपासना पद्धतीचा पाया सामवेदाने उभा केला. म्हणूनच तर श्रीकृष्णासह जवळपास प्रत्येक थोर ऋषीमुनींनी सामवेदाला भारतीय ज्ञानवाङ्मयात उच्च स्थान दिलेले आहे.
तळटिप
१.गीता अध्या. १० श्लोक २२
२. सर्वेषामं वा एष वेदानाम् रसो यत् साम (शतपथ ब्राह्मण १२.८.३.२३)
३. सामानि यो वेत्ति त वेद तत्त्वम् । (बृहद्देवता)
४. अमोSहमस्मि सा त्वं, सामाहमस्मि ऋक् त्वं। द्यौरहं पृथिवी त्वं। ताविह संभवाव, प्रजामाजनयावहै (अथर्ववेद १४/२/७१)
५. सामवेद – म.म पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर (पृ,क्र ६)
६. एकशतमध्वर्युशाखाः, सहस्रवर्त्मा सामवेदः ॥ महाभाष्य
मागील भाग – ओळख वेदांची – यजुर्वेद पुढील भाग – ओळख वेदांची – अथर्ववेद
Copyright sheetaluwach.com 2020 ©