Difficulty of Being Good

पुस्तक परीक्षण – Difficulty of Being Good – लेखक – गुरुचरण दास…

Difficulty of Being Good हे एका विचारवंताचे चिंतन आहे. लौकीक आयुष्यात अत्यंत यशस्वी ठरलेल्या व्यक्तीलासुदधा न सुटलेल्या कोड्यांची उकल करण्याचा हा एक प्रयत्न आहे. एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असणारे दास हे महाभारताकडे अतिशय विचारपूर्वक व मोठ्या आशेने वळताना दिसतात. मोठ्या पदावर असणारी किंवा समाजात प्रतिष्ठित असणारी माणसेसुद्धा अचानक एखाद्या गुन्ह्यात किंवा आर्थिक घोटाळ्यात सामील होतात तेव्हा त्यामागचा त्यांचा उद्देश काय असू शकतो? सत्यम सारखी एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची कंपनी उभी करून देशापुढे आदर्शवत अशी प्रतिमा उभी करणा-या राजूंसारख्या माणसाचा; आर्थिक घोटाळा करण्यामागे काय उद्देश असू शकतो? यश काय पैसा काय, प्रसिद्धी किंवा सत्ता काय; साध्य करण्यासारखी प्रत्येक गोष्ट तर त्यांच्यासमोर हात जोडून उभी होती. जागतिक किर्तीची एक कंपनी तर त्यांनी स्वतःच उभी केली होती. अशा असामान्य श्रेयाचा अधिकारी गुन्ह्याकडे का वळावा?
अपरिमित संपत्ती आणि अत्यंत नावजलेल्या कंपनीची मालकी असणा-या अंबानी बंधूंमध्ये असणा-या वादाचेही कारण हे केवळ दुस-या भावाकडे जास्त असणारी संपत्ती इतकेच असू शकते? २००७ च्या फोर्बस् अतिश्रीमंतांच्या यादीत अनिल हे पाचव्या तर मुकेश हे त्यापेक्षा किंचीत वरच्या स्थानावर होते. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३%, सरकारच्या एकूण आयकर उत्पन्नाच्या १०% तसेच भारताच्या एकूण निर्यातीच्या १४% वाटा केवळ अंबानी बंधूंच्या कंपन्यातून येतो. २००९ साली मुकेशने जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत ३-या स्थानावर झेप घेतली तर अनिल ७ व्या स्थानावर घसरले. चक्र फिरुन त्याच प्रश्नावर येउन थांबते यश, पैसा, प्रसिद्धी किंवा सत्ता यापैकी कोणतीही गोष्ट असाध्य नसणा-या दोनही भावंडाचे एकमेकांविरुदध शेकडो खटले कोर्टात चालु असावेत ? कशासाठी? सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेऊन चाळीत दिवस कंठलेल्या एका व्यक्तीने अपार कष्ट आणि जिद्दिच्या जोरावर देशातील्याच नव्हे तर जगातील एक अत्यंत यशस्वी अशा कंपन्यांचे जाळे उभे केले. लाखो करोडो भागधारकांचे हितसंबंध गुंतलेल्या अशा कंपन्यांच्या उत्तराधिका-यांनी मात्र एकमेकांविरुद्ध खटले चालवून याच भारधारकांचे भविष्यही पणाला लावावे हेही एक प्रकारचे कुरुक्षेत्रच नव्हे काय ? भावंडांमध्ये निर्माण होणार दुस्वास केवळ अधिक संपत्ती किंवा सत्ता या कारणांमुळे असू शकतो? प्रथितयश व्यक्तिच काय पण सर्वसामान्य माणूसही आज ज्या संभ्रमित अवस्थेत जगतो त्याचेही कारण काय असू शकते? रोजच्या जीवनात सर्वसामान्य माणूसही कधी स्वतःच स्वतःला फसवतो तर कधी इतरांशी खोटे बोलतो, व्यवसायात बरोबरीच्या व्यक्तिंची कधी पाठराखण करतो तर कधी पाय ओढतो. हे एक प्रकारचे नैतिक आंधळेपण आहे, अस्तीत्वाची लढाई आहे, की टाळता न येणारा परिस्थितीचा फेरा? या संभ्रमावर आपण विजय मिळवू शकतो का ? अर्थात आपल्या या दुरवस्थेला काही प्रमाणात समाज किंवा सरकारही जबाबदार असते. मग आपल्या सर्वच संस्थांची नैतिकदृष्ट्या फेररचना करता येईल का जेणेकरून समाजाप्रति अधिक संवेदनाशील राज्यकर्ता मिळवता येईल?
या किंवा यासारख्या अनेक प्रश्नांच्या समाधानकारक निरकरणासाठी लेखक महाभारताकडे वळतो. सहा वर्षांपेक्षा अधिक काळ महाभारत आणि अनुषंगित अनेक ग्रंथांचा अभ्यास करून लेखक या समस्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो.
या किंवा यासारख्या अनेक प्रश्नांच्या समाधानकारक निरकरणासाठी लेखक महाभारताकडे वळतो. सहा वर्षांपेक्षा अधिक काळ महाभारत आणि अनुषंगित अनेक ग्रंथांचा अभ्यास करून लेखक या समस्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो.
महाभारताच्या सखोल अध्ययनानंतर प्रस्तुत समस्यांच्या मुळाशी कारणे काय असू शकतात हेही लेखकाला उमगते आणि पात्रांच्या सद्सद्विवेक बुद्धीचा आंतरीक संघर्ष म्हणजेच Difficulty of Being Good आपल्या समोर येते.
धर्म या महाभारतातील अढळ आणि अविचल अशा संकल्पनेत लेखक आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधतो. महाभारतातील प्रत्येक पात्राचा ‘स्वधर्म’ आणि त्याचा समाजाला अभिप्रेत असणारा ‘समानधर्म’ या दोन्हीचे सखोल विवेचन लेखक करतो. या दोन्हीची सांगड घालत आयुष्य कसे घालवावे हेच या पुस्तकाचे मर्म आहे. युधिष्ठिरासह महाभारतातील सर्व प्रमुख पात्रांचा या अनुषंगाने एक उत्कृष्ट अभ्यास लेखक वाचकांसमोर मांडतो. दुर्योधनाचा टोकाचा मत्सर आणि युधिष्ठिराची कमालीची संयत वृत्ती, भीष्माचा निःस्वार्थ आणि अश्वत्थाम्याचा अघोरी सूड या सर्व घटकांचे सांगोपांग विश्लेषण लेखक करतो. राज्यकर्ता असूनही पुत्रप्रेमासाठी नैतिक अधिष्ठानापासून ढळणारा कुरुसम्राट आणि त्याच भावनेपोटी आर्थिक घोटाळा करणारा सत्यम् सम्राट किंवा मत्सरापोटी कुरुक्षेत्रावरील अपरिमित नरसंहाराला कारणीभूत असणारा राजपूत्र आणि त्याच मत्सरापोटी लाखो भागधारकांचे भविष्य पणाला लावणारे अंबानी बंधू या सर्वच घटनांना एका संघर्षाची पार्श्वभूमी आहे. विवेक आणि अविवेक, धर्म आणि अधर्म यांचा हा सार्वकालिक संघर्ष लेखक निरनिराळ्या विचारवंतांच्या विचारातून, विविध घटनांच्या माध्यमातून आणि महाभारतातील पात्रांच्या मनोभूमिकेतू आपल्यासमोर मांडतो. अंतिमतः सत्याचाच विजय होतो. म्हणूनच विवेकाची कास धरून केलेली चांगली कृतीच परिपूर्ण समाजाचे अधिष्ठान असते. हा विचार Difficult of Being Good मधून प्रकर्षाने पुढे येतो.

* * *

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact