Tatya Tope’s Operation Red Lotus
मुळ लेखक. पराग टोपे
इतिहास हा नेहमी जेत्यांकडून लिहिला जातो. अर्थातच त्यामुळे कोणत्याही ऐतिहासिक घटनेचा त्या लेखकाला अभिप्रेत असणारा अर्थच त्यातून ध्वनित होतो. काळाच्या ओघात एखाद्या घटनेचे किंवा घटनाक्रमाचा अनुषंगिक विषयांच्या संदर्भात जेव्हा सखोल अभ्यास होतो, तेव्हा अनेकदा लिखित इतिहासाच्या विपरित सत्य पुढे येते. दोन विभिन्न मानसिकतेतून केलेल्या इतिहासाच्या लेखनाचे दोन भिन्न वाचकांवर वेगवेगळे किंवा परस्परविरुद्ध परिणाम होताना दिसतात. याचे उत्तम उदाहरण म्हणून शिवाजी महाराजांबद्दल केले गेलेले चित्रण- मुघल सम्राटांच्या बखरीत शिवाजीच्या विद्वेषांचे चित्रण आणि त्याच्या कागाळ्यांचे वर्णन येते, तर सभासद इत्यादि एतद्देशीय बखरींत मात्र याच कारवायांकडे ‘हिंदवी स्वराज्यासाठीचा लढा’ म्हणून पाहिले जाते. बारकाईने अभ्यास केल्यास हे स्पष्ट होते की हिंदवी स्वराज्याचा लढा हा मुघल सम्राटांनी साहजिकच विद्वेषाच्या भावनेतून चित्रित केला होता. ऐतिहासिक घटनांचे हे विविधअंगी चित्रण मोठ्या प्रमाणावर समाजमनावर परिणाम करणारे असते. कारण इतिहासाचा अभ्यास करणारा त्रयस्थ अभ्यासक ज्या संदर्भग्रंथांचा वापर करेल, त्याच अनुषंगाने त्याचे मत तयार होते.
१८५७ चा लढ्याला उद्देशून वापरले गेलेले ‘उठाव’ किंवा ‘स्वातंत्र्यमर’ किंवा ‘बंड’ हे शब्दच या सिद्धांताचे किती समर्पकपणे समर्थन करतात. कोणासाठी हे ‘शिपायांचे बंड’ होते, तर कोणासाठी ‘स्वातंत्र्यसमर’. परंतु यात अतिशय विलक्षण अशी एक गोम आहे. कोणत्याही देशाच्या इतिहासात त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी केला गेलेला प्रत्येक लहानमोठा प्रयत्नही लढा असतो आणि साधी पदरमोडसुद्धा ‘त्याग’ म्हणून गौरवली जाते. परंतु देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी म्हणून केला गेलेला पहिला स्वातंत्र्यलढा मात्र बंड म्हणून पाहिला गेला. केवळ ब्रिटिशांनी नव्हे तर ब्रिटिश शिक्षणपद्धतीचे उत्पादन असणा-या भारतीय इतिहासकारांनीही अनेक वर्षं याच दृष्टिकोनातून या लढ्याकडे पाहिले. स्वतःच्याच देशबांधवांनी उभारलेल्या स्वातंत्र्यलढ्याची बंड म्हणून हेटाळणी करणे ही एक शोकांतिका होती. १९०८ मध्ये सावरकरांनी ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तक लिहून असा सिद्धांत मांडला की, १८५७ चा उठाव हा केवळ शिपायांचे बंड नसून ब्रिटिश अमलाखालील हिंदुस्थानाने एकत्रितपणे उभारलेले पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. शेतक-यांपासून कारागिरांपर्यंत, राजे रजवाड्यांपासून ते शिपायांपर्यंत प्रत्येक लहानमोठ्या व्यक्तींनी संस्थांनी उस्फूर्तपणे पारतंत्र्य लादू पहाणा-या ब्रिटिश सत्तेला दिलेली ती एक सणसणीत चपराक होती. स्वातंत्र्यरूपी तेजाचा स्फुल्लिंग जागवणारा तो पहिला समरसूर्य होता. अतिशय अभिमानाने वर्णन करण्याजोगा आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला चैतन्य देणारा असा हा लढा होता, हे सावरकरांनी मोठ्या प्रयत्नपूर्वक व अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले होते.
पराग टोपेंचे ‘तात्या टोपेज् ऑपरेशन रेड लोटस’ हे पुस्तक याच धर्तीवर अनेक ऐतिहासिक संदर्भांचा खोलवर जाऊन अभ्यास करते. पूर्वजांच्या देदिप्यमान कारकिर्दीचा पट उलगडणे आणि विपरित चित्रण केल्या जाणा-या इतिहासाची ऐतिहासिक संदर्भांसह पुनर्मांडणी करणे हे दोनही उद्देश या पुस्तकातून लेखक साध्य करतो. तात्या टोपे यांचे नेतृत्व आणि रक्तकमल योजना या दोहोंच्या आधारे १८५७ च्या उठावाचे सखोल विवेचन लेखक करतो. परंतु यातही केवळ कथालेखनापेक्षाही समग्र इतिहास अतिशय काटेकोरपणे आणि त्रयस्थ वृत्तीने समोर आणण्याचा स्तुत्य प्रयत्न दिसून येतो. लेखकाने अनेक ऐतिहासिक दस्त ऐवजांचा अभ्यास करून आणि संदर्भग्रंथ चाळून या प्रयत्नाला योग्य ती दिशा दिलेली आहे. १८५७ चा उठाव हे केवळ शिपायांचे बंड नव्हते, तर एका स्वातंत्र्याच्या वैचारिक भूमिकेशी प्रामाणिक राहून रक्तकमलाचे प्रतीक वापरून उभारलेले ते एक स्वातंत्र्युद्ध होते, हे मत पुनःपुन्हा दृढ करण्याचा उपक्रम म्हणूनच हे पुस्तक पुढे येते.
ऐतिहासिक संदर्भ आणि घटनाक्रमांची बांधणी अतिशय सुसूत्रपणे या पुस्तकात आढळते. परंतु इतिहासाचा केलेला पाठपुरावा आणि नाट्यमय घटनांची बांधणी या दोहोंच्या जुगलबंदीमध्ये वाचकाचा काहीसा गोंधळ उडतो. केवळ इतिहासाचा अभ्यास किंवा एक उत्कृष्ट पुस्तक यांपैकी वाचकाने या पुस्तकातून काय साध्य करावे, याचा पुरेसा उलगडा होत नाही. उठावाच्या पार्श्वभूमीचे, तयारीचे, प्रत्यक्ष उठावाचे चित्रण आणि तात्या टोपे, या दोन्हीमध्ये पुस्तकाचा केंद्रबिंदू सतत हलताना दिसतो. इतिहासाच्या अभ्यासकांसाठी या पुस्तकातील संदर्भ आणि पुरावे निश्चितच उपयुक्त आहेत; परंतु तो वाचकवर्ग अतिशय सीमित आहे. सामान्य वाचकासाठी लागणारी रंजकता आणि प्रासादिक शैली कोठेतरी हरवून गेल्यासारखी वाटते. अभ्यासकांसाठी एक संदर्भग्रंथ इतकेच या पुस्तकाचे मर्यादित अस्तित्व राहील की काय अशी भीती वाटते. १८५७ च्या उठावावर आजपर्यंत झालेल्या चर्चा आणि या विषयाचा आवाका, या दोन्हीच्या मानाने पुस्तकाचा आकार काहीसा मोठा भासतो. लेखकही सावरकरांसारखा सिद्धहस्त नसल्याने या पुस्तकाची व्याप्ती वाचकांपर्यंत किती पोहोचेल याची शाश्वती देता येईलसे वाटत नाही.
Copyright sheetaluwach.com 2021 © #sheetaluwach
धन्यवाद रविंद्रजी.
एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती अशी आजही (विशेषतः माझ्या पिढीत) मोठ्याप्रमाणावर इतिहासाचे वाचन, मनन करणारा वर्ग आहे. परंतू आपण लिहील्याप्रमाणे हे युग न वाचता केवळ टिका करणारे अथवा बंदी आणणारे असल्याने चांगला वाचकवर्ग केवळ वाचून आनंद मानण्यात समाधानी आहे. चर्चा अथवा विचारमंथन प्रकटपणे करून कोणतेही वाद उभे होउ नयेत असाच यामागचा उद्देश असतो.
या पुस्काचे लेखक सिद्धहस्त जरी नसले तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर संशोधन करून पूर्वजांचा इतिहास मांडण्याच्या उद्देशाने का होईना पण इतिहासाचे एक पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे.
लेखकाचा उद्देश तात्या टोपे यांचे अनमोल कार्य लोकांपर्यंत आणणे हा एकमेव उद्देश असावा. १८५७ च्या युद्धाला बंड म्हणण्याचा जो प्रयत्न इंग्रजी लेखकांनी केला व त्याला ब्रिटीश धार्जिण्या भारतीय लेखकांनी पाठींबा देऊन १८५७ चा खरा इतिहास लोकांसमोर आणलाच नाही. खरे म्हणजे १८५७ च्या युद्धाचे तात्या टोपे हे एक शिल्पकारच होते. प्रस्तुत पुस्तकात तात्या नी केवळ लढवय्याचे काम केले नसून देशातील अनेक संस्थानांना एकत्र आणायचा एक चांगला व देशात पहिल्यांदा प्रयोग केला. युद्धाची दीर्घकालीन आखणी व त्याचे परिणाम विचारात घेउन केलेली अंमलबजावणी हे खूपच कौतुकास्पद व अभिमानास्पद होते. प्रस्तुत पुस्तकामध्ये झांशीच्या राणीच्या सुटकेसाठी ज्या प्रकाराने आखणी केली त्याला इतिहासात तोड नाही. आपण या पुस्तकाची दखल घेऊन त्याचे एक सुंदर परीक्षण केले आहे त्या बद्दल आपले अभिनंदन. आजकालच्या पुस्तक न वाचण्याचा काळात व इतिहास न वाचता त्यावर नुसते भाष्य नव्हे तर बंदी घालण्याच्या युगात आपण केलेली वटवट मनाला भावली. आपल्या सारखा वाचक वर्ग या पुस्तकाला मिळेल अशी एक अपेक्षा. दुसरे असे कि लेखक कदाचित सिद्धहस्त नसेल पण विचार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत हि एक माफक अपेक्षा.
धन्यवाद रविंद्रजी.
एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती अशी आजही (विशेषतः माझ्या पिढीत) मोठ्याप्रमाणावर इतिहासाचे वाचन, मनन करणारा वर्ग आहे. परंतू आपण लिहील्याप्रमाणे हे युग न वाचता केवळ टिका करणारे अथवा बंदी आणणारे असल्याने चांगला वाचकवर्ग केवळ वाचून आनंद मानण्यात समाधानी आहे. चर्चा अथवा विचारमंथन प्रकटपणे करून कोणतेही वाद उभे होउ नयेत असाच यामागचा उद्देश असतो.
या पुस्काचे लेखक सिद्धहस्त जरी नसले तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर संशोधन करून पूर्वजांचा इतिहास मांडण्याच्या उद्देशाने का होईना पण इतिहासाचे एक पुनर्लेखन करण्याचा प्रयत्न निश्चितच स्तुत्य आहे.
नमस्कार !!
१८५७ च्या स्वातंत्र्यसमराला उजाळा “स्वातंत्र्यसमर १८५७ चा” http://swatantrasamar1857cha.blogspot.com/,
त्यात तुम्हाला बघायला मिळेल दुर्मिळ चित्र आणि त्यांची संक्षिप्त माहीती – १८५७ च्या समराला सुरुवात करणारे विवादीत काडतुस, बंडात वापरलेली पी-५३ रायफल, मंगल पांडेंच्या फाशीचा हुकुमनामा, समरातील काही आठवणी – क्रुरपणे दिली जाणारी फाशी, काश्मिरगेट वरील रणसंग्रांम (दिल्ली), बराखपुर येथील छावणी, शिपायांची कैद, तोफेच्या तोंडी सैनिक, लखनव येथील इंग्रजावर हल्ला, इंग्रज अधिकारी हॅवलॉक यांनी केलेली कत्तल, मंगल पांडे, तात्या टोपे, बहादुरशाह जफर, बेगम हज्ररत महल, कुंवरसिंह, नाना साहेब, राणाबेनी माधवसिंह, १८५७ काळातील इंग्रज अधिकारी – ब्रिटनची महाराणी व्हिक्टोरीया, गर्व्हर्णल जनरल भारत, हेंन्री हॅवलॉक, झाशीच्या राणीचे पत्र, समरातील योध्यांवरील टपाल टिकीटे, ब्रिटीशांची शौर्य पद्क, १८५७ काळातील महत्वपुर्ण नकाशे , १८५७ च्या कालखंडातील चलन, १८५७ सालातील घटनाक्रम इ.
तर मग तुम्ही जरुर भेट द्या, आणि तुमचा अभिप्राय ब्लॉग वर द्या !!
प्रशांत – नाशिक
कदाचित आपण अजुनही तो उठाव म्हणजे एक बंड होते आणि अपराधी सैनिकांना तशी कठोर शिक्षा देणे योग्यच होते असे मानाल,
पण आम्ही भारतीय लोक ते केवळ शिपायांचे बंड होते असे मानत नाही, आम्ही ते आमचे पहिले राष्ट्रीय स्वातंत्र्यसमर मानतो.
-स्वामी विवेकानंद-