अध्याय – ३ – कर्मयोग

अर्जुन उवाच
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ ३-१ ॥
अन्वय

अर्जुन= अर्जुन, उवाच = म्हणाला, जनार्दन = हे जनार्दन श्रीकृष्णा, चेत्‌ = जर, कर्मणः = कर्माच्या अपेक्षेने, बुद्धिः = ज्ञान, ज्यायसी = श्रेष्ठ (आहे), ते मता = असे तुम्हाला मान्य असेल, तत्‌ = तर मग, केशव = हे केशवा (श्रीकृष्णा), माम्‌ = माझी, घोरे = भयंकर, कर्मणि = कर्म करण्यात, किम्‌ = का बरे, नियोजयसि = तुम्ही योजना करीत आहात
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे जनार्दन श्रीकृष्णा, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग हे केशवा (श्रीकृष्णा), मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात?
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्‌ ॥ ३-२ ॥
अन्वय

व्यामिश्रेण इव = जणू मिश्रित अशा, वाक्येन = वाक्यांनी, मे = माझ्या, बुद्धिम्‌ = बुद्धीला, मोहयसि इव = तुम्ही जणू मोहित करीत आहात, (अतः) = म्हणून, येन = ज्यामुळे, अहम्‌ = मी, श्रेयः = कल्याण, आप्नुयाम्‌ = प्राप्त करून घेईन, तत्‌ एकम्‌ = अशी ती एक गोष्ट, निश्चित्य = निश्चित करून, वद = सांगा
अर्थ
तुम्ही मिश्रितशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करीत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल.
श्रीभगवानुवाच
लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्‌ ॥ ३-३ ॥
अन्वय

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, अनघ = हे निष्पापा, अस्मिन्‌ लोके = या जगात, मया = मी, द्विविधा = दोन प्रकारची, निष्ठा = निष्ठा, पुरा = पूर्वी, प्रोक्ता = सांगितली आहे, साङ्ख्यानाम्‌ = सांख्ययोग्यांची, (निष्ठा) = निष्ठा, ज्ञानयोगेन = ज्ञानयोगाद्वारे (होते), (च) = आणि, योगिनाम्‌ = योग्यांची, (निष्ठा) = निष्ठा, कर्मयोगेन = कर्मयोगाद्वारे होते
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पापा, या जगात दोन प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्ययोग्यांची निष्ठा ज्ञानयोगाने आणि योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते.
न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ३-४ ॥
अन्वय

कर्मणाम्‌ = कर्मांचे, अनारम्भात्‌ = आचरण केल्याशिवाय, पुरुषः = मनुष्य, नैष्कर्म्यम्‌ = निष्कर्मता म्हणजे योगनिष्ठा, न अश्नुते = प्राप्त करून घेत नाही, च = तसेच, संन्यसनात्‌ एव = कर्मांचा केवळ त्याग केल्यामुळे, सिद्धिम्‌ = सिद्धी म्हणजे सांख्यनिष्ठा, न समधिगच्छति = प्राप्त करून घेत नाही
अर्थ
मनुष्य कर्मे केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि फक्त कर्मांचा त्याग केल्याने सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही.
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ३-५ ॥
अन्वय

कश्चित्‌ = कोणीही मनुष्य, जातु = कोणत्याही वेळी, हि = निःसंदेहपणे, क्षणम्‌ अपि = क्षणमात्र सुद्धा, अकर्मकृत्‌ = कर्म न करता, न तिष्ठति = राहात नाही, हि = कारण, प्रकृतिजैः = प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या, गुणैः = गुणांनी, अवशः = परतंत्र झालेला, सर्वः = सर्व मनुष्यसमुदाय हा, कर्म कार्यते = कर्म करण्यास भाग पाडला जातो
अर्थ
निःसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभरसुद्धा काम न करता राहात नाही. कारण सर्व मनुष्यसमुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो.
कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्‌ ।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ३-६ ॥
अन्वय

विमूढात्मा = मूढ बुद्धीचा मनुष्य, कर्मेन्द्रियाणि = सर्व इंद्रियांना, संयम्य = जबरदस्तीने वरवर रोखून, यः = जो, मनसा = मनाने, इन्द्रियार्थान्‌ = त्या इंद्रियांच्या विषयांचे, स्मरन्‌ आस्ते = चिंतन करीत असतो, सः = तो, मिथ्याचारः = मिथ्याचारी म्हणजे दांभिक, उच्यते = म्हटला जातो
अर्थ
जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो.
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ३-७ ॥
अन्वय

तु = परंतु, अर्जुन = हे अर्जुना, यः = जो मनुष्य, मनसा = मनाच्या योगे, इन्द्रियाणि = इंद्रियांना, नियम्य = वश करून घेऊन, असक्तः = अनासक्त होऊन, कर्मेन्द्रियैः = सर्व इंद्रियांच्या द्वारा, कर्मयोगम्‌ = कर्मयोगाचे, आरभते = आचरण करतो, सः = तो मनुष्य, विशिष्यते = श्रेष्ठ होय
अर्थ
परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारे कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय.
नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥ ३-८ ॥
अन्वय

त्वम्‌ = तू, नियतम्‌ = शास्त्रविहित, कर्म = कर्तव्यकर्म, कुरु = कर, हि = कारण, अकर्मणः = कर्म न करण्याच्या अपेक्षेने, कर्म = कर्म करणे, ज्यायः = श्रेष्ठ आहे, च = तसेच, अकर्मणः = कर्म न केल्यास, ते = तुझा, शरीरयात्रा अपि = शरीरनिर्वाहसुद्धा, न प्रसिद्ध्येत्‌ = सिद्ध होणार नाही
अर्थ
तू शास्त्रविहित कर्तव्यकर्म कर. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीरव्यवहारही चालणार नाहीत.
यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।
तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ३-९ ॥
अन्वय

यज्ञार्थात्‌ = यज्ञाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या, कर्मणः = कर्मांव्यतिरिक्त, अन्यत्र = दुसऱ्या कर्मांमध्ये (गुंतलेला), अयम्‌ = हा, लोकः = मनुष्यांचा समुदाय, कर्मबन्धनः = कर्मांनी बांधला जातो, (अतः) = म्हणून, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, (त्वम्‌) = तू, मुक्तसङ्गः = आसक्तिरहित होऊन म्हणजे फळाची अपेक्षा सोडून, तदर्थम्‌ = त्या यज्ञासाठी, कर्म समाचर = कर्तव्यकर्म चांगल्याप्रकारे कर
अर्थ
यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्मांशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्यसमुदाय कर्मांनी बांधला जातो. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्यकर्म कर.
सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः ।
अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्‌ ॥ ३-१० ॥
अन्वय

पुरा = कल्पाच्या पूर्वी, सहयज्ञाः = यज्ञाच्या बरोबर, प्रजाः = प्रजा, सृष्ट्वा = निर्माण करून, प्रजापतिः = प्रजापती ब्रह्मदेव, उवाच = (त्यांना) म्हणाले, (यूयम्‌) = तुम्ही लोक, अनेन = या यज्ञाच्या द्वारे, प्रसविष्यध्वम्‌ = उत्कर्ष प्राप्त करून घ्या, (च) = आणि, एषः = हा यज्ञ, वः = तुम्हा लोकांचे, इष्टकामधुक्‌ = इष्ट भोग देणारा, अस्तु = होवो
अर्थ
प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की, तुम्ही या यज्ञाच्या द्वारे उत्कर्ष प्राप्त करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो.
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥ ३-११ ॥
अन्वय

अनेन = या यज्ञाच्या द्वारे, देवान्‌ = देवतांना, भावयत = तुम्ही उन्नत करा, (च) = आणि, ते देवाः = त्या देवता, वः = तुम्हा लोकांना, भावयन्तु = उन्नत करोत, (एवम्‌) = अशाप्रकारे निःस्वार्थ भावनेने, परस्परम्‌ = एकमेकांना, भावयन्तः = उन्नत करीत, परम्‌ = परम, श्रेयः = कल्याण, अवाप्स्यथ = तुम्ही प्राप्त करून घ्याल
अर्थ
तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांनी तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निःस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परम कल्याणाला प्राप्त व्हाल.
इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः ।
तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥ ३-१२ ॥
अन्वय

यज्ञभाविताः = यज्ञाने पुष्ट झालेल्या, देवाः = देवता, वः = तुम्हा लोकांना (न मागता), इष्टान्‌ = इष्ट, भोगान्‌ = भोग, हि दास्यन्ते = निश्चितपणे देत राहातील (अशाप्रकारे), तैः = त्या देवतांनी, दत्तान्‌ = दिलेले भोग, यः = जो मनुष्य, एभ्यः = त्यांना, अप्रदाय = न देता (स्वतःच), भुङ्क्ते = भोगतो, सः = तो, स्तेनः एव = चोरच आहे
अर्थ
यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहातील. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो स्वतःच उपभोगतो, तो चोरच आहे.
यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः ।
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्‌ ॥ ३-१३ ॥
अन्वय

यज्ञशिष्टाशिनः = यज्ञ झाल्यावर शिल्लक राहिलेले अन्न खाणारे, सन्तः = श्रेष्ठ मनुष्य, सर्वकिल्बिषैः = सर्व पापांतून, मुच्यन्ते = मुक्त होऊन जातात (परंतु), ये पापाः = जे पापी लोक, आत्मकारणात्‌ = स्वतःच्या शरीर पोषणासाठीच (अन्न), पचन्ति = शिजवितात, ते तु = ते तर, अघम्‌ = पापच, भुञ्जते = खातात
अर्थ
यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे पापी लोक केवळ स्वतःच्या शरीरपोषणासाठी अन्न शिजवितात, ते तर पापच खातात.
अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ ३-१४ ॥
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ ३-१५ ॥
अन्वय

अन्नात्‌ = अन्नापासून, भूतानि = संपूर्ण प्राणी, भवन्ति = उत्पन्न होतात, पर्जन्यात्‌ = पर्जन्यवृष्टीपासून, अन्नसम्भवः = अन्नाची उत्पत्ती होते, यज्ञात्‌ = यज्ञापासून, पर्जन्यः = पर्जन्यवृष्टी, भवति = होते, यज्ञः = यज्ञ, कर्मसमुद्भवः = विहित कर्मांपासून उत्पन्न होणारा आहे, कर्म = कर्मसमुदाय हा, ब्रह्मोद्भवम्‌ = वेदांपासून उत्पन्न होणारा (आणि), ब्रह्म = वेद हे, अक्षरसमुद्भवम्‌ = अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न होणारे आहेत (असे), विद्धि = तू जाण, तस्मात्‌ = म्हणून (यावरून सिद्ध होते की), सर्वगतम्‌ = सर्वव्यापी, ब्रह्म = परम अक्षर परमात्मा, नित्यम्‌ = नेहमीच, यज्ञे = यज्ञामध्ये, प्रतिष्ठितम्‌ = प्रतिष्ठित आहे
अर्थ
सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्ननिर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो. आणि यज्ञ विहित कर्मांमुळे घडतो. कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत, असे समज. यावरून हेच सिद्ध होते की, सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो.
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ ३-१६ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), इह = या जगामध्ये, एवम्‌ = अशा प्रकारे, प्रवर्तितम्‌ = परंपरेने प्रचलित असणाऱ्या, चक्रम्‌ = सृष्टिचक्राला अनुकूल, यः = जो मनुष्य, न अनुवर्तयति = असे वर्तन करीत नाही म्हणजे आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, सः = तो मनुष्य, इन्द्रियारामः = इंद्रियांच्या द्वारे भोगांमध्ये रमणारा, अघायुः = पापी आयुष्याचा (असून), मोघम्‌ = व्यर्थच, जीवति = जिवंत राहातो
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जो मनुष्य या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टिचक्राला अनुसरून वागत नाही म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियांच्या द्वारे भोगांत रमणारा पापी आयुष्य असलेला मनुष्य व्यर्थच जगतो.
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः ।
आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ ३-१७ ॥
अन्वय

तु = परंतु, यः = जो, मानवः = मनुष्य, आत्मरतिः एव = आत्म्यामध्येच रमणारा, च = आणि, आत्मतृप्तः = आत्म्यामध्येच तृप्त, च = तसेच, आत्मनि एव = आत्म्यामध्येच, सन्तुष्टः = संतुष्ट, स्यात्‌ = असतो, तस्य = त्याच्यासाठी, कार्यम्‌ = कोणतेही कर्तव्य, न विद्यते = नसते
अर्थ
परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा आणि आत्म्यामध्येच तृप्त तसेच आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही.
नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन ।
न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ ३-१८ ॥
अन्वय

तस्य = त्या महामनुष्याचे, इह = या विश्वामध्ये, कृतेन = कर्म करण्यात, कश्चन = कोणतेही, अर्थः न = प्रयोजन असत नाही, (च) = तसेच, अकृतेन एव च = कर्म न करण्यातही कोणतेही प्रयोजन असत नाही, च = तसेच, सर्वभूतेषु = संपूर्ण प्राणिमात्रात सुद्धा, अस्य = याचा, कश्चित्‌ = किंचितही, अर्थव्यपाश्रयः = स्वार्थाचा संबंध, न = राहात नाही
अर्थ
त्या महामनुष्याला या विश्वात कर्मे करण्याचे काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्याचेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणिमात्रातही त्याचा जरादेखील स्वार्थाचा संबंध असत नाही.
तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर ।
असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ ३-१९ ॥
अन्वय

तस्मात्‌ = म्हणून, सततम्‌ = निरंतरपणे, असक्तः = आसक्तीने रहित होऊन, कार्यम्‌ कर्म = कर्तव्य कर्म, समाचर = नीटपणे तू करीत राहा, हि = कारण, असक्तः = आसक्तीने रहित होऊन, कर्म = कर्म, आचरन्‌ = करणारा, पूरुषः = मनुष्य, परम्‌ = परमात्म्याला, आप्नोति = प्राप्त करून घेतो
अर्थ
म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो.
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः ।
लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ॥ ३-२० ॥
अन्वय

कर्मणा एव = (आसक्तिरहित) कर्माचरणाद्वारेच, जनकादयः = जनक इत्यादी ज्ञानीजन सुद्धा, संसिद्धिम्‌ = परमसिद्धीला, आस्थिताः = प्राप्त झाले होते, हि = म्हणून, (तथा) = तसेच, लोकसङ्ग्रहम्‌ = लोकसंग्रहाकडे, सम्पश्यन्‌ अपि = दृष्टी ठेवून सुद्धा, कर्तुम्‌ एव = कर्म करण्यासच, अर्हसि = तू योग्य आहेस म्हणजे तुला कर्म करणे हेच उचित आहे
अर्थ
जनकादी ज्ञानी लोकही आसक्तिरहित कर्मांनीच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊनदेखील तू कर्म करणेच योग्य आहे.
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ ३-२१ ॥
अन्वय

श्रेष्ठः = श्रेष्ठ मनुष्य, यत्‌ यत्‌ = जे जे, आचरति = आचरण करतो, इतरः जनः = अन्य लोकसुद्धा, तत्‌ तत्‌ एव = त्या त्या प्रमाणे (आचरण करतात), सः = तो, यत्‌ = ज्या गोष्टी, प्रमाणम्‌ = प्रमाण (म्हणून मान्य), कुरुते = करतो, लोकः = सर्व मनुष्यसमुदाय, तत्‌ = त्यालाच, अनुवर्तते = अनुसरून वागतो
अर्थ
श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो, त्या त्या प्रमाणेच इतर लोकही आचरण करतात; तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो, त्याप्रमाणेच सर्व मनुष्यसमुदाय वागू लागतो.
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ ३-२२ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), त्रिषु लोकेषु = तिन्ही लोकांत, मे = मला, किञ्चन कर्तव्यम्‌ = कोणतेही कर्तव्य, न अस्ति = नाही, च = तसेच, अवाप्तव्यम्‌ = प्राप्त करून घेण्यास योग्य वस्तू, अनवाप्तम्‌ न = मिळालेली नाही असेही नाही, (तथापि) = तरीसुद्धा, कर्मणि एव = कर्मांचे आचरण, वर्ते = मी करीतच आहे
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो.
यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ३-२३ ॥
अन्वय

हि = कारण, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), यदि = जर, जातु = कदाचित, अहम्‌ = मी, अतन्द्रितः = सावध राहून, कर्मणि = कर्मे, न वर्तेयम्‌ = केली नाहीत (तर मोठी हानी होईल, कारण), मनुष्याः = सर्व माणसे, सर्वशः = सर्व प्रकारांनी, मम = माझ्याच, वर्त्म = मार्गाचे, अनुवर्तन्ते = अनुकरण करतात
अर्थ
कारण हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत, तर मोठे नुकसान होईल, कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात.
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्‌ ।
सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ ३-२४ ॥
अन्वय

(अतः) = म्हणून, चेत्‌ = जर, अहम्‌ = मी, कर्म = कर्मे, न कुर्याम्‌ = केली नाहीत (तर), इमे = ही, लोकाः = सर्व माणसे, उत्सीदेयुः = नष्ट-भ्रष्ट होऊन जातील, च = आणि, सङ्करस्य = संकराचा, कर्ता = कर्ता, स्याम्‌ = मी होईन, (तथा) = तसेच, इमाः = या, प्रजाः = सर्व प्रजांचा, उपहन्याम्‌ = मी घात करणारा होईन
अर्थ
म्हणून जर मी कर्मे केली नाहीत, तर ही सर्व माणसे नष्ट-भ्रष्ट होतील आणि मी संकरतेचे कारण होईन, तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन.
सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।
कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम्‌ ॥ ३-२५ ॥
अन्वय

भारत = हे भारता (भरतवंशी अर्जुना), कर्मणि = कर्मांमध्ये, सक्ताः = आसक्त असणारे, अविद्वांसः = अज्ञानी लोक, यथा = ज्याप्रमाणे, (कर्म) = कर्मे, कुर्वन्ति = करतात, तथा = त्याचप्रमाणे, असक्तः = आसक्तिरहित (अशा), विद्वान्‌ = विद्वानाने सुद्धा, लोकसङ्ग्रहम्‌ = लोकसंग्रह, चिकीर्षुः = करण्याच्या इच्छेने, (कर्म) = कर्मे, कुर्यात = करावीत
अर्थ
हे भारता(भरतवंशी अर्जुना), कर्मांत आसक्त असणारे अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात, त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्‌ ।
जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्‌ ॥ ३-२६ ॥
अन्वय

युक्तः = परमात्म्याच्या स्वरूपात अढळपणे स्थित असणाऱ्या, विद्वान्‌ = ज्ञानी मनुष्याने, कर्मसङ्गिनाम्‌ = शास्त्रविहित कर्मांमध्ये आसक्ती असणाऱ्या, अज्ञानाम्‌ = अज्ञानी मनुष्यांचा, बुद्धिभेदम्‌ = बुद्धिभ्रम म्हणजेच कर्मांमध्ये अश्रद्धा, न जनयेत्‌ = उत्पन्न करू नये (या उलट), सर्वकर्माणि = शास्त्रविहित सर्व कर्मे, समाचरन्‌ = नीटपणे (स्वतःच) आचरण करावीत (तशीच त्यांच्याकडूनही कर्मे), जोषयेत्‌ = करवून घ्यावीत
अर्थ
परमात्मस्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी मनुष्याने शास्त्रविहित कर्मांत आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्मांविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तमप्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावीत.
प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः ।
अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ ३-२७ ॥
अन्वय

कर्माणि = सर्व कर्मे (खरे पाहाता), सर्वशः = सर्व प्रकारांनी, प्रकृतेः = प्रकृतीच्या, गुणैः = गुणांच्या द्वारे, क्रियमाणानि = केली जातात, (तथापि) = तरीसुद्धा, अहङ्कारविमूढात्मा = अहंकारामुळे ज्याचे अंतःकरण मोहित झाले आहे असा अज्ञानी मनुष्य, अहम्‌ कर्ता = मी कर्ता आहे, इति = असे, मन्यते = मानतो
अर्थ
वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकारामुळे मोहित झाले आहे, असा अज्ञानी मनुष्य मी कर्ता आहे, असे मानतो.
तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः ।
गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ ३-२८ ॥
अन्वय

तु = परंतु, महाबाहो = हे महाबाहो(अर्जुना), गुणकर्मविभागयोः = गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे, तत्त्ववित्‌ = तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी हा, गुणाः = सर्व गुण हेच, गुणेषु = गुणांमध्ये, वर्तन्ते = वावरतात, इति = असे, मत्वा = जाणून (त्यामध्ये), न सज्जते = अडकत नाही
अर्थ
पण हे महाबाहो (अर्जुना), गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्त्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणांत वावरत असतात, हे लक्षात घेऊन त्यांमध्ये आसक्त होत नाही.
प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत्‌ ॥ ३-२९ ॥
अन्वय

प्रकृतेः = प्रकृतीच्या, गुणसम्मूढाः = गुणांनी अत्यंत मूढ झालेली माणसे, गुणकर्मसु = गुणांमध्ये आणि कर्मांमध्ये, सज्जन्ते = आसक्त होतात, अकृत्स्नविदः = पूर्णपणे न जाणणाऱ्या, मन्दान्‌ = मंदबुद्धी अज्ञानी अशा, तान्‌ = त्या माणसांना, कृत्स्नवित्‌ = संपूर्णपणे जाणणाऱ्या ज्ञानी मनुष्याने, न विचालयेत्‌ = विचलित करू नये
अर्थ
प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणांत आणि कर्मांत आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानी मनुष्यांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानी मनुष्याने बुद्धिभेद करू नये.
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३-३० ॥
अन्वय

अध्यात्मचेतसा = अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताच्या द्वारे, सर्वाणि = सर्व, कर्माणि = कर्मे, मयि = मला, सन्यस्य = अर्पण करून, निराशीः = आशारहित, निर्ममः = ममतारहित, (च) = आणि, विगतज्वरः = संतापरहित, भूत्वा = होऊन, युध्यस्व = तू युद्ध कर
अर्थ
अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संताप रहित होऊन तू युद्ध कर.
ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३-३१ ॥
अन्वय

ये = जे कोणी, मानवाः = मानव, अनसूयन्तः = दोषदृष्टीने रहित, (च) = आणि, श्रद्धावन्तः = श्रद्धायुक्त होऊन, मे = माझ्या, इदम्‌ = या, मतम्‌ = मताचे, नित्यम्‌ = नेहमी, अनुतिष्ठन्ति = अनुसरण करतात, ते अपि = तेसुद्धा, कर्मभिः = संपूर्ण कर्मांतून, मुच्यन्ते = सुटून जातात
अर्थ
जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात, तेही सर्व कर्मांपासून मुक्त होतात.
ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्‌ ।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३-३२ ॥
अन्वय

तु = परंतु, ये = जे मानव, अभ्यसूयन्तः = माझ्यावर दोषारोपण करीत, मे = माझ्या, एतत्‌ = या, मतम्‌ = मताला, न अनुतिष्ठन्ति = अनुसरून आचरण करीत नाहीत, सर्वज्ञानविमूढान्‌ = संपूर्ण ज्ञानाच्या बाबतीत मोहित झालेल्या अशा, तान्‌ = त्या, अचेतसः = मूर्खांना, नष्टान्‌ = नष्ट झालेले असेच, विद्धि = समज
अर्थ
परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत, त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज.
सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि ।
प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३-३३ ॥
अन्वय

भूतानि = सर्वच प्राणी, प्रकृतिम्‌ यान्ति = प्रकृतीप्रत जातात म्हणजे आपल्या स्वभावाला परवश होऊन कर्मे करतात, ज्ञानवान्‌, अपि = ज्ञानी माणूस सुद्धा, स्वस्याः = आपल्या, प्रकृतेः = प्रकृतीला, सदृशम्‌ = अनुसरून, चेष्टते = क्रिया करीत राहातो (मग अशा स्थितीत स्वभावापुढे), निग्रहः = हट्ट, किम्‌ = काय, करिष्यति = करणार
अर्थ
सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयांत कोणाचाही हट्टीपणा काय करील?
इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ३-३४ ॥
अन्वय

इन्द्रियस्य इन्द्रियस्य अर्थे = इंद्रिय-इंद्रियाच्या म्हणजे प्रत्येक इंद्रियाच्या विषयांमध्ये, रागद्वेषौ = राग आणि द्वेष, व्यवस्थितौ = लपून राहिलेले असतात, तयोः = त्या दोघांच्या, वशम्‌ = ताब्यात, (मनुष्यः) = माणसाने, न आगच्छेत्‌ = येता कामा नये, हि = कारण, तौ = ते दोघेही, अस्य = या(माणसा)चे, परिपन्थिनौ = (कल्याणमार्गात) विघ्न करणारे महान शत्रू आहेत
अर्थ
प्रत्येक इंद्रियाचे इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये. कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याणमार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत.
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्‌ ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३-३५ ॥
अन्वय

स्वनुष्ठितात्‌ = चांगल्याप्रकारे आचरणात आणलेल्या, परधर्मात्‌ = दुसऱ्याच्या धर्मापेक्षा, विगुणः = गुणरहित असासुद्धा, स्वधर्मः = स्वतःचा धर्म, श्रेयान्‌ = अति उत्तम आहे, स्वधर्मे = आपल्या धर्मात, निधनम्‌ = मरणे हे सुद्धा, श्रेयः = कल्याणकारक आहे, (च) = आणि, परधर्मः = दुसऱ्याचा धर्म, भयावहः = भय निर्माण करणारा आहे
अर्थ
चांगल्याप्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे. पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे.
अर्जुन उवाच
अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः ।
अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३-३६ ॥
अन्वय

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, वार्ष्णेय = हे वार्ष्णेया(श्रीकृष्णा), अथ = तर मग, अयम्‌ = हा, पूरुषः = मनुष्य, अनिच्छन्‌ अपि = स्वतःची इच्छा नसताना सुद्धा, बलात्‌ = बळजबरीने, नियोजितः इव = जणू भाग पाडल्यामुळे, केन = कोणाकडून, प्रयुक्तः = प्रेरित होऊन, पापम्‌ = पापाचे, चरति = आचरण करतो
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे वार्ष्णेया(श्रीकृष्णा), तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो?
श्रीभगवानुवाच
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्‌ ॥ ३-३७ ॥
अन्वय

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, रजोगुणसमुद्भवः = रजोगुणापासून उत्पन्न झालेला, एषः = हा, कामः = कामच, क्रोधः = क्रोध आहे, एषः = हा, महाशनः = पुष्कळ खाणारा म्हणजे भोगांनी कधीही तृप्त न होणारा, (च) = तसेच, महापाप्मा = महापापी आहे, इह = या विषयात, एनम्‌ वैरिणम्‌ विद्धि = काम हाच खरोखर वैरी आहे असे तू जाण
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे, असे तू जाण.
धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च ।
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्‌ ॥ ३-३८ ॥
अन्वय

यथा = ज्या प्रकारे, धूमेन = धुराने, वह्निः = अग्नी, च = आणि, मलेन = धुळीने, आदर्शः = आरसा, आव्रियते = झाकला जातो, (तथा) = तसेच, यथा = ज्या प्रकारे, उल्बेन = वारेने, गर्भः = गर्भ, आवृतः = झाकलेला असतो, तथा = त्या प्रकारे, तेन = त्या कामाचे द्वारा, इदम्‌ = हे ज्ञान, आवृतम्‌ = झाकले जाते
अर्थ
ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहाते.
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ ३-३९ ॥
अन्वय

च = आणि, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, अनलेन = अग्नीप्रमाणे, दुष्पूरेण = कधीही पूर्ण न होणाऱ्या, (च) = आणि, एतेन = या, कामरूपेण = कामरूपी, ज्ञानिनः = ज्ञानी लोकांच्या, नित्यवैरिणा = नित्य शत्रूच्या द्वारा, ज्ञानम्‌ = (मनुष्याचे) ज्ञान, आवृतम्‌ = झाकून टाकलेले असते
अर्थ
आणि हे कुंतीपुत्र अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूपी अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने मनुष्यांचे ज्ञान झाकले आहे.
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्‌ ॥ ३-४० ॥
अन्वय

इन्द्रियाणि = इंद्रिये, मनः = मन, (च) = आणि, बुद्धिः = बुद्धी (हे सर्व), अस्य = या कामाचे, अधिष्ठानम्‌ = निवासस्थान, उच्यते = म्हटले जातात, एषः = हा काम, एतैः = या मन, बुद्धी व इंद्रिये यांच्या द्वारेच, ज्ञानम्‌ = ज्ञानाला, आवृत्य = झाकून टाकून, देहिनम्‌ = जीवात्म्याला, विमोहयति = मोहित करतो
अर्थ
इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी व इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो.
तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्‌ ॥ ३-४१ ॥
अन्वय

तस्मात्‌ = म्हणून, भरतर्षभ = हे अर्जुना, त्वम्‌ = तू, आदौ = प्रथम, इन्द्रियाणि = इंद्रियांना, नियम्य = वश करून घेऊन, ज्ञानविज्ञाननाशनम्‌ = ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या, एनम्‌ = या, पाप्मानम्‌ = महान पापी अशा कामाला, हि = निश्चितपणे, प्रजहि = बळ वापरून मारून टाक
अर्थ
म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून, या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या, मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक.
इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ३-४२ ॥
अन्वय

इन्द्रियाणि = इंद्रिये ही (स्थूलशरीरापेक्षा), पराणि = पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म आहेत, आहुः = असे म्हणतात, इन्द्रियेभ्यः = इंद्रियांपेक्षा, मनः = मन हे, परम्‌ = पर आहे, मनसः तु = मनापेक्षा, बुद्धिः = बुद्धी ही, परा = पर आहे, तु = आणि, यः = जो, बुद्धेः = बुद्धीच्यासुद्धा, परतः = अत्यंत पर, सः = तो (आत्मा) आहे
अर्थ
इंद्रियांना स्थूलशरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियांहून मन पर आहे. मनाहून बुद्धी पर आहे. आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे, तो आत्मा होय.
एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्‌ ॥ ३-४३ ॥
अन्वय

एवम्‌ = अशा प्रकारे, बुद्धेः = बुद्धीपेक्षा, परम्‌ = पर म्हणजे सूक्ष्म, बलवान आणि अत्यंत श्रेष्ठ अशा आत्म्याला, बुद्ध्वा = जाणून, (च) = आणि, आत्मना = बुद्धीच्या द्वारा, आत्मानम्‌ = मनाला, संस्तभ्य = वश करून घेऊन, महाबाहो = हे महाबाहो, कामरूपम्‌ = (या) कामरूपी, दुरासदम्‌ = दुर्जय, शत्रुम्‌ = शत्रूला, जहि = तू ठार कर
अर्थ
अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे, हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून, हे महाबाहो, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक.

भगवद्गीता – अध्याय २ – सांख्ययोग

सञ्जय उवाच
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ २-१ ॥
अन्वय

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, तथा = तशाप्रकारे, कृपया = करुणेने, आविष्टम्‌ = व्याप्त, अश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ = ज्याचे डोळे अश्रूंनी युक्त व व्याकूळ झालेले आहेत, (च) = आणि, विषीदन्तम्‌ = शोकयुक्त (अशा), तम्‌ = त्या(अर्जुना)ला, मधुसूदनः = भगवान मधुसूदन, इदम्‌ = हे, वाक्यम्‌ = वचन, उवाच = म्हणाले
अर्थ
संजय म्हणाले, अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवांनी भरलेले व व्याकूळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. ॥ २-१ ॥
श्रीभगवानुवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्‌ ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २-२ ॥
अन्वय

श्रीभगवान = श्रीभगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, अर्जुन = हे अर्जुना, विषमे = अयोग्य वेळी, इदम्‌ = हा, कश्मलम्‌ = मोह, कुतः = कोणत्या कारणाने, त्वा समुपस्थितम्‌ = तुला झाला, (यतः) = कारण, अनार्यजुष्टम्‌ = हा श्रेष्ठ पुरुषांकडून आचरलेला नव्हे, अस्वर्ग्यम्‌ = स्वर्ग प्राप्त करून देणारा नव्हे, (च) = आणि, अकीर्तिकरम्‌ = कीर्ति देणारा पण नव्हे
अर्थ
श्रीभगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा थोरांनी न आचरलेला, स्वर्ग मिळवून न देणारा आणि कीर्तिकारकही नाही. ॥ २-२ ॥
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥
अन्वय

(अतः) = म्हणून, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथपुत्र अर्जुना), क्लैब्यं = नपुंसकपणा, मा स्म गमः = पत्करू नकोस, एतत्‌ = हे, त्वयि = तुला, न उपपद्यते = योग्य नाही, परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना), क्षुद्रम्‌ हृदयदौर्बल्यम्‌ = हृदयाचा तुच्छ दुर्बळपणा, त्यक्त्वा = सोडून देऊन, उत्तिष्ठ = युद्धाला उभा ठाक
अर्थ
म्हणून हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), षंढपणा पत्करू नकोस. हा तुला शोभत नाही. हे परंतपा, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन युद्धाला उभा राहा. ॥ २-३ ॥
अर्जुन उवाच
कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ २-४ ॥
अन्वय

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, मधुसूदन = हे मधुसूदना, सङ्ख्ये = रणभूमीवर, भीष्मम्‌ = भीष्म, च = व, द्रोणम्‌ = द्रोण यांचेबरोबर, अहम्‌ = मी, इषुभिः = बाणांनी, कथम्‌ = कसा बरे, प्रतियोत्स्यामि = (त्यांच्या) विरुद्ध लढू, (यतः) = कारण, अरिसूदन = हे अरिसूदना, (तौ) = ते दोघेही, पूजार्हौ = पूजनीय (आहेत)
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, युद्धात मी भीष्मपितामहांच्या आणि द्रोणाचार्यांच्या विरुद्ध बाणांनी कसा लढू? कारण हे अरिसूदना, ते दोघेही पूज्य आहेत. ॥ २-४ ॥
गुरूनहत्वा हि महानुभावाञ्छ्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान्‌ रुधिरप्रदिग्धान्‌ ॥ २-५ ॥
अन्वय

महानुभावान्‌ = महानुभाव, गुरून्‌ = गुरुजनांना, अहत्वा = न मारता, इह लोके = या जगात, भैक्ष्यम्‌ = भिक्षेचे अन्न, अपि = सुद्धा, भोक्तुम्‌ = खाणे (हे), श्रेयः = कल्याणकारक (आहे असे मला वाटते), हि = कारण, गुरून्‌ = गुरुजनांना, हत्वा = मारून, (अपि) = सुद्धा, इह = या जगात, रुधिरप्रदिग्धान्‌ = रक्ताने माखलेले, अर्थकामान्‌ = अर्थ व कामरूप, भोगान्‌ एव = भोगच, तु = तर, भुञ्जीय = मी भोगेन
अर्थ
म्हणून या महानुभाव गुरुजनांना न मारता मी या जगात भिक्षा मागून खाणेही कल्याणकारक समजतो. कारण गुरुजनांना मारूनही या लोकात रक्ताने माखलेले अर्थ व कामरूप भोगच ना भोगावयाचे. ॥ २-५ ॥
न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ २-६ ॥
अन्वय

एतत्‌ = हे, (च) = सुद्धा, न विद्मः = आम्हाला कळत नाही, यत्‌ = की, कतरत्‌ = (युद्ध करणे वा न करणे यातील) कोणते, नः = आम्हाला, गरीयः = श्रेष्ठ आहे, वा = तसेच, जयेम = आम्ही विजयी होऊ, यदि वा = अथवा, (ते) = ते, नः = आम्हाला, जयेयुः = जिंकतील, यान्‌ = ज्यांना, हत्वा = मारून, न जिजीविषामः = आम्ही जगू इच्छित नाही, ते = ते(हे आत्मीय असणारे), धार्तराष्ट्राः = धृतराष्ट्राचे पुत्र, एव = च, प्रमुखे = आमच्या पुढे युद्धाला, अवस्थिताः = उभे आहेत
अर्थ
युद्ध करणे व न करणे या दोहोंपैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे, हे कळत नाही. किंवा आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील, हेही आम्हाला माहीत नाही. आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही, तेच आमचे बांधव-धृतराष्ट्रपुत्र- आमच्या विरुद्ध उभे आहेत. ॥ २-६ ॥
कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः ।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्‌ ॥ २-७ ॥
अन्वय

कार्पण्यदोषोपहतस्वभावः = कारुण्यरूपी कातरतेच्या दोषामुळे ज्याचा स्वभाव नाहीसा झाला आहे, (च) = आणि, धर्मसम्मूढचेताः = धर्माच्या बाबतीत ज्याचे चित्त मोहित झाले आहे असा मी, त्वाम्‌ = तुम्हाला, पृच्छामि = विचारतो, यत्‌ = जे(साधन), निश्चितम्‌ = निश्चितपणाने, श्रेयः = कल्याणकारक, स्यात्‌ = असेल, तत्‌ = ते, मे = मला, ब्रूहि = (तुम्ही) सांगा, (यत्‌) = कारण, अहम्‌ = मी, ते = तुमचा, शिष्यः = शिष्य (आहे), (अतः) = म्हणून, त्वाम्‌ = तुम्हाला, प्रपन्नम्‌ = शरण आलेल्या (अशा), माम्‌ = मला, शाधि = उपदेश करा
अर्थ
करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा. ॥ २-७ ॥
न हि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम्‌ ।
अवाप्य भूमावसपत्‍नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्‌ ॥ २-८ ॥
अन्वय

हि = कारण, भूमौ = भूमंडळाचे, असपत्‍नम्‌ = निष्कंटक, ऋद्धम्‌ = धनधान्यसंपन्न, राज्यम्‌ = राज्य, च = तसेच, सुराणाम्‌ = देवांचे, आधिपत्यम्‌ = स्वामित्व, अवाप्य = मिळून, अपि = सुद्धा, (यत्‌) = जो (उपाय), मम = माझ्या, इन्द्रियाणाम्‌ = इंद्रियांना, उच्छोषणम्‌ = सुकवून टाकणारा, शोकम्‌ = शोक, अपनुद्यात्‌ = दूर करू शकेल, (तत्‌) = असा उपाय, न प्रपश्यामि = मला दिसत नाही
अर्थ
कारण, पृथ्वीचे शत्रुरहित व धनधान्यसमृद्ध राज्य मिळाले किंवा देवांचे स्वामित्व जरी मिळाले, तरी माझ्या इंद्रियांना शोषून टाकणारा शोक जो दूर करू शकेल, असा उपाय मला दिसत नाही. ॥ २-८ ॥
सञ्जय उवाच एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परन्तप ।
न योत्स्य इति गोविन्दमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ २-९ ॥
अन्वय

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) राजा, गुडाकेशः = निद्रेला जिंकणाऱ्या अर्जुनाने, हृषीकेशम्‌ = अंतर्यामी श्रीकृष्णांना, एवम्‌ = असे, उक्त्वा = सांगून, न योत्स्ये = मी युद्ध करणार नाही, इति = असे, ह = स्पष्टपणे, गोविन्दम्‌ = गोविंदाला, उक्त्वा = म्हणून (मग तो), तूष्णीम्‌ = गप्प, बभूव = झाला ॥ २-९ ॥
अर्थ
संजय म्हणाले, हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) राजा, निद्रेवर ताबा असणाऱ्या अर्जुनाने अंतर्यामी श्रीकृष्णांना एवढे बोलून मी युद्ध करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले व तो गप्प झाला. ॥ २-९ ॥
तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः ॥ २-१० ॥
अन्वय

भारत = हे भरतवंशी धृतराष्ट्रा, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्ये, विषीदन्तम्‌ = शोक करणाऱ्या, तम्‌ = त्या (अर्जुनाला), हृषीकेशः = अंतर्यामी श्रीकृष्ण, प्रहसन्‌ इव = जणू स्मित करून, इदम्‌ = हे, वचः = वचन, उवाच = म्हणाले
अर्थ
हे भरतवंशी धृतराष्ट्र महाराज, अंतर्यामी भगवान श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करणाऱ्या त्या अर्जुनाला हसल्यासारखे करून असे म्हणाले ॥ २-१० ॥
श्रीभगवानुवाच
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ २-११ ॥
अन्वय

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, (अर्जुन) = हे अर्जुना, अशोच्यान्‌ = शोक करण्यास योग्य नसणाऱ्या माणसांसाठी, त्वम्‌ = तू, अन्वशोचः = शोक करीत आहेस, च = आणि, प्रज्ञावादान्‌ = पंडितांच्याप्रमाणे वचने, भाषसे = बोलत आहेस, (परन्तु) = परंतु, गतासून्‌ = ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी, च = आणि, अगतासून्‌ = ज्यांचे प्राण गेलेले नाहीत त्यांच्यासाठी (सुद्धा), पण्डिताः = पंडित लोक, न अनुशोचन्ति = शोक करत नाहीत
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तू ज्यांचा शोक करू नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी, आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत. ॥ २-११ ॥
न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्‌ ॥ २-१२ ॥
अन्वय

जातु = कोणत्याही काळी, अहम्‌ = मी, न आसम्‌ = नव्हतो, त्वम्‌ = तू, न (आसीः) = नव्हतास, (अथवा) = अथवा, इमे = हे, जनाधिपाः = राजेलोक, न (आसन्‌) = नव्हते, (इति) = असे, तु = तर, न एव = मुळीच नाही, च = तसेच, अतः परम्‌ = यापुढे, वयम्‌ = आपण, सर्वे = सर्वजण, न भविष्यामः = असणार नाही, (एवम्‌) न एव = असेही नाही
अर्थ
मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजेलोक नव्हते, असेही नाही. आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही, असेही नाही. ॥ २-१२ ॥
देहिनोऽस्मिन्‌ यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ २-१३ ॥
अन्वय

यथा = ज्याप्रमाणे, देहिनः = जीवात्म्याला, अस्मिन्‌ देहे = या देहात, कौमारम्‌ = बालपण, यौवनम्‌ = तारुण्य, (च) = आणि, जरा = वार्धक्य (येते), तथा = त्याप्रमाणे, देहान्तरप्राप्तिः = दुसरे शरीर मिळते, तत्र = त्या बाबतीत, धीरः = धीर माणूस, न मुह्यति = मोहित होत नाही
अर्थ
ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य, आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही. ॥ २-१३ ॥
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ २-१४ ॥
अन्वय

कौन्तेय = हे कुंतीपुत्रा, शीतोष्णसुखदुःखदाः = थंडी-उष्णता, व सुख-दुःख देणारे, मात्रास्पर्शाः = इंद्रिये आणि विषयांचे संयोग, तु = तर, आगमापायिनः = उत्पत्ति-विनाश-शील, (च) = आणि, अनित्याः = अनित्य (आहेत), (अतः) = म्हणून, भारत = हे भारता, तान्‌ = त्यांना, तितिक्षस्व = तू सहन कर
अर्थ
हे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात, म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता, ते तू सहन कर. ॥ २-१४ ॥
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ २-१५ ॥
अन्वय

हि = कारण, पुरुषर्षभ = हे पुरुषश्रेष्ठा, समदुःखसुखम्‌ = सुखदुःखाला समान मानणाऱ्या, यम्‌ = ज्या, धीरम्‌ = धीर, पुरुषम्‌ = पुरुषाला, एते = हे (इंद्रियांचे विषयांशी संयोग), न व्यथयन्ति = व्याकुळ करीत नाहीत, सः = तो (पुरुष), अमृतत्वाय = मोक्षाला, कल्पते = योग्य ठरतो
अर्थ
कारण हे श्रेष्ठ पुरुषा, सुख-दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो. ॥ २-१५ ॥
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ २-१६ ॥
अन्वय

असतः = असत्‌ वस्तूला, भावः = अस्तित्व, न विद्यते = नसते, तु = आणि, सतः = सत्‌ वस्तूचा, अभावः = अभाव, न विद्यते = असत नाही, (एवम्‌) = अशाप्रकारे, अनायोः उभोयोः अपि = या दोहोंचेही, अन्तः = तत्त्व, तत्त्वदर्शिभिः = तत्त्वज्ञानी पुरुषांनी, दृष्टः = पाहिलेले आहे
अर्थ
असत्‌ वस्तूला अस्तित्व नाही आणि सत्‌ वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्य स्वरूप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. ॥ २-१६ ॥
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम्‌ ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ २-१७ ॥
अन्वय

येन = ज्याने, इदम्‌ = हे, सर्वम्‌ = संपूर्ण जगत (दृश्य वर्ग), ततम्‌ = व्यापून टाकले आहे, तत्‌ = ते, तु = तर, अविनाशि = अविनाशी, (अस्ति) = आहे, (इति) = असे, विद्धि = तू जाण, अस्य = या, अव्ययस्य = अविनाशीचा, विनाशम्‌ = विनाश, कर्तुम्‌ = करण्यास, कश्चित्‌ = कोणीही, न अर्हति = समर्थ नाही
अर्थ
ज्याने हे सर्व जग-दिसणाऱ्या सर्व वस्तू-व्यापल्या आहेत, त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. ॥ २-१७ ॥
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्य भारत ॥ २-१८ ॥
अन्वय

अस्य = या, अनाशिनः = नाशरहित, अप्रमेयस्य = अप्रमेय, नित्यस्य = नित्यस्वरूप (अशा), शरीरिणः = जीवात्म्यांचे, इमे = हे, देहाः = (सर्व) देह, अन्तवन्तः = नाशवंत आहेत, उक्ताः = (असे) म्हटले गेले आहे, तस्मात्‌ = म्हणून, भारत = हे भरतवंशी अर्जुना, युध्यस्व = तू युद्ध कर
अर्थ
या नाशरहित, मोजता न येणाऱ्या, नित्यस्वरूप जीवात्म्यांची ही शरीरे नाशिवंत आहेत, असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. ॥ २-१८॥
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्‌ ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ २-१९ ॥
अन्वय

एनम्‌ = हा, (आत्मानम्‌) = आत्मा, हन्तारम्‌ = मारणारा (आहे), (इति) = असे, यः = जो (कोणी), वेत्ति = समजतो, च = तसेच, एनम्‌ = हा, हतम्‌ = मेला (असे), यः = जो (कोणी), मन्यते = मानतो, तौ = ते, उभौ = दोघे, न विजानीतः = जाणत नाहीत, (यतः) = कारण, अयम्‌ = हा (आत्मा) (वस्तुतः), न हन्ति = (कोणालाही) मारत नाही, च = तसेच, न हन्यते = मारलाही जात नाही
अर्थ
जो या आत्म्याला मारणारा समजतो, तसेच जो हा (आत्मा) मेला असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. ॥ २-१९ ॥
न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २-२० ॥
अन्वय

अयम्‌ = हा (आत्मा), कदाचित्‌ = कोणत्याही काळी, न जायते = जन्मत नाही, वा = तसेच, न म्रियते = मरतही नाही, वा = तसेच (हा), भूत्वा = उत्पन्न होऊन, भूयः = पुन्हा, न भविता = उत्पन्न होणार नाही, (यतः) = कारण, अयम्‌ = हा (आत्मा), अजः = अजन्मा, नित्यः = नित्य, शाश्वतः = सनातन, पुराणः = पुरातन (आहे), शरीरे = शरीर, हन्यमाने = मारले गेलेले असतानाही, (अयम्‌) = हा (आत्मा), न हन्यते = मारला जात नाही
अर्थ
हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही; कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा आत्मा मारला जात नाही. ॥ २-२० ॥
वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्‌ ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम्‌ ॥ २-२१ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), एनम्‌ = हा (आत्मा), अविनाशम्‌ = नाशरहित, नित्यम्‌ = नित्य, अजम्‌ = अजन्मा, (च) = आणि, अव्ययम्‌ = अव्यय (आहे असे), यः = जो कोणी, पुरुषः = पुरुष, वेद = जाणतो, सः = तो (पुरुष), कम्‌ = कोणाला, कथम्‌ = कसा बरे, घातयति = ठार करवील, (तथा) = तसेच, कम्‌ = कोणाला, (कथम्‌) = कसा बरे, हन्ति = मारील
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जो पुरुष हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा आणि न बदलणारा आहे, हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करवील किंवा कोणाला कसा ठार करील? ॥ २-२१ ॥
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २-२२ ॥
अन्वय

यथा = ज्याप्रमाणे, नरः = माणूस, जीर्णानि = जुनी, वासांसि = वस्त्रे, विहाय = टाकून देऊन, अपराणि = दुसरी, नवानि = नवी (वस्त्रे), गृह्णाति = घेतो, तथा = त्याप्रमाणेच, देही = देहात निवास करणारा जीवात्मा, जीर्णानि = जुनी, शरीराणि = शरीरे, विहाय = टाकून देऊन, अन्यानि = दुसऱ्या, नवानि = नवीन शरीरात, संयाति = जातो
अर्थ
ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो. ॥ २-२२ ॥
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २-२३ ॥
अन्वय

एनम्‌ = या(आत्म्या)ला, शस्त्राणि = शस्त्रे, न छिन्दन्ति = कापू शकत नाहीत, एनम्‌ = या(आत्म्या)ला, पावकः = अग्नी, न दहति = जाळू शकत नाही, एनम्‌ = या(आत्म्या)ला, आपः = पाणी, न क्लेदयन्ति = भिजवू शकत नाही, च = तसेच, (एनम्‌) = या आत्म्याला, मारुतः = वारा, न शोषयति = वाळवू शकत नाही
अर्थ
या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही. ॥ २-२३ ॥
अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २-२४ ॥
अन्वय

(यतः) = कारण, अयम्‌ = हा आत्मा, अच्छेद्यः = अच्छेद्य (आहे), अयम्‌ = हा आत्मा, अदाह्यः = अदाह्य, अक्लेद्यः = अक्लेद्य, च = आणि, एव = निःसंदेहपणे, अशोष्यः = अशोष्य (आहे), अयम्‌ = हा आत्मा, नित्यः = नित्य, सर्वगतः = सर्वव्यापी, अचलः = अचल, स्थाणुः = स्थिर राहाणारा, (च) = आणि, सनातनः = सनातन, (अस्ति) = आहे
अर्थ
कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निःसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहाणारा आणि सनातन आहे. ॥ २-२४ ॥
अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २-२५ ॥
अन्वय

अयम्‌ = हा (आत्मा), अव्यक्तः = अव्यक्त (आहे), अयम्‌ = हा (आत्मा), अचिन्त्यः = अचिंत्य (आहे), (च) = तसेच, अयम्‌ = हा (आत्मा), अविकार्यः = विकाररहित (आहे असे), उच्यते = म्हटले जाते, तस्मात्‌ = म्हणून, एनम्‌ = या(आत्म्या)ला, एवम्‌ = अशा वरील प्रकारे, विदित्वा = जाणून, अनुशोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = तू योग्य नाहीस, म्हणजे तुला शोक करणे उचित नाही
अर्थ
हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, आणि विकाररहित आहे, असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे, हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही. ॥ २-२५ ॥
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम्‌ ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥ २-२६ ॥
अन्वय

अथ = परंतु, च = जर, एनम्‌ = हा (आत्मा), नित्यजातम्‌ = नेहमी जन्माला येणारा, वा = तसेच, नित्यम्‌ = सदा, मृतम्‌ = मरणारा (आहे असे), त्वम्‌ = तू, मन्यसे = मानत असशील, तथापि = तरीसुद्धा, महाबाहो = हे महाबाहो, एवम्‌ = अशा प्रकारे, शोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = तू योग्य नाहीस
अर्थ
परंतु, जर तू आत्मा नेहमी जन्माला येणारा व नेहमी मरणारा आहे, असे मानत असशील, तरीसुद्धा हे महाबाहो, तू अशा रीतीने शोक करणे योग्य नाही. ॥ २-२६ ॥
जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २-२७ ॥
अन्वय

हि = कारण (वरीलप्रमाणे मानल्यास), जातस्य = जन्मास आलेल्याला, मृत्युः = मृत्यू, ध्रुवः = निश्चित (आहे), च = तसेच, मृतस्य = मेलेल्याला, जन्म = जन्म, ध्रुवम्‌ = निश्चित आहे, तस्मात्‌ = म्हणूनही, अपरिहार्ये = उपाय नसलेल्या, अर्थे = त्या गोष्टीच्या बाबतीत, त्वम्‌ = तू, शोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = योग्य नाहीस
अर्थ
कारण असे मानल्यास त्यानुसार जन्मास आलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मेलेल्याला जन्म निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टींविषयीही तू शोक करणे योग्य नाही. ॥ २-२७ ॥
अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २-२८ ॥
अन्वय

भारत = हे भरतवंशी अर्जुना, भूतानि = सर्व प्राणी, अव्यक्तादीनि = जन्मापूर्वी अप्रकट (होते), (च) = आणि, अव्यक्तनिधनानि एव = मेल्यानंतरही अप्रकट होणारे (असतात), (केवलम्‌) = केवळ, व्यक्तमध्यानि = मध्ये प्रकट आहेत, (अथ) = मग, तत्र = अशा स्थितीत, का = काय, परिदेवना = शोक (करायचा आहे)
अर्थ
हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात. फक्त मध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा. ॥ २-२८ ॥
आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्‌ ॥ २-२९ ॥
अन्वय

कश्चित्‌ = कोणी विरळ महापुरुषच, एनम्‌ = ह्या आत्म्याला, आश्चर्यवत्‌ = आश्चर्याप्रमाणे, पश्यति = पाहातो, च = आणि, तथा एव = त्याचप्रमाणे, अन्यः = दुसरा एखादा महापुरुषच, आश्चर्यवत्‌ = आश्चर्याप्रमाणे, (एनम्‌) = याचे, वदति = वर्णन करतो, च = तसेच, अन्यः = दुसरा कोणी अधिकारी पुरुषच, एनम्‌ = याच्याविषयी, आश्चर्यवत्‌ = आश्चर्याप्रमाणे, शृणोति = ऐकतो, च = आणि, कश्चित्‌ = कोणी कोणी तर, श्रुत्वा = ऐकून, अपि = सुद्धा, एनम्‌ = याला, न एव वेद = जाणतच नाही
अर्थ
एखादा महापुरुषच या आत्म्याला आश्चर्याप्रमाणे पाहातो आणि तसाच दुसरा एखादा महापुरुष या तत्त्वाचे आश्चर्याप्रमाणे वर्णन करतो. तसेच आणखी एखादा अधिकारी पुरुषच याच्याविषयी आश्चर्याप्रमाणे ऐकतो आणि कोणी कोणी तर ऐकूनही याला जाणत नाहीत. ॥ २-२९ ॥
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ २-३० ॥
अन्वय

भारत = हे भरतवंशी अर्जुना, सर्वस्य = सर्वांच्या, देहे = देहांमध्ये, अयम्‌ = हा, देही = आत्मा, नित्यम्‌ = नेहमीच, अवध्यः = अवध्य आहे, तस्मात्‌ = म्हणून, सर्वाणि = सर्व, भूतानि = प्राण्यांच्यासाठी, त्वम्‌ = तू, शोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = योग्य नाहीस
अर्थ
हे अर्जुना, हा आत्मा सर्वांच्या शरीरात नेहमीच अवध्य असतो. म्हणून सर्व प्राण्यांच्या बाबतीत तू शोक करणे योग्य नाही. ॥ २-३० ॥
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ २-३१ ॥
अन्वय

च = तसेच, स्वधर्मम्‌ = स्वतःचा धर्म, अवेक्ष्य = लक्षात घेऊन, अपि = सुद्धा, विकम्पितुम्‌ = भय बाळगण्यास, न अर्हसि = तू योग्य नाहीस, हि = कारण, क्षत्रियस्य = क्षत्रियाच्या बाबतीत, धर्म्यात्‌ = धर्मयुक्त, युद्धात्‌ = युद्धापेक्षा (वरचढ), अन्यत्‌ = दुसरे कोणतेही, श्रेयः = कल्याणकारी कर्तव्य, न विद्यते = नसते
अर्थ
तसेच स्वतःचा धर्म लक्षात घेऊनही तू भिता कामा नये. कारण क्षत्रियाला, धर्माला अनुसरून असलेल्या युद्धाहून दुसरे कोणतेही कल्याणकारक कर्तव्य नाही. ॥ २-३१ ॥
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम्‌ ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम्‌ ॥ २-३२ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), यदृच्छया = आपोआप, उपपन्नम्‌ = प्राप्त झालेले, च = आणि, अपावृतम्‌ स्वर्गद्वारम्‌ = उघडलेले स्वर्गाचे द्वार असे, ईदृशम्‌ = अशाप्रकारचे, युद्धम्‌ = युद्ध, सुखिनः = भाग्यवान, क्षत्रियाः = क्षत्रिय लोकांनाच, लभन्ते = प्राप्त होते
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), आपोआप समोर आलेले, उघडलेले स्वर्गाचे द्वारच असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभते.
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ २-३३ ॥
अन्वय

अथ = परंतु, चेत्‌ = जर, त्वम्‌ = तू, इमम्‌ = हे, धर्म्यम्‌ = धर्मयुक्त, सङ्ग्रामम्‌ = युद्ध, न करिष्यसि = न करशील, ततः = तर मग, स्वधर्मम्‌ = स्वतःचा धर्म, च = आणि, कीर्तिम्‌ = कीर्ती (यांना), हित्वा = गमावून, पापम्‌ = पाप, अवाप्स्यसि = तू प्राप्त करून घेशील
अर्थ
परंतु जर तू हे धर्मयुक्त युद्ध केले नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ती गमावून पापाला जवळ करशील. ॥ २-३३ ॥
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम्‌ ।
सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ २-३४ ॥
अन्वय

च = तसेच, भूतानि = सर्व लोक, अव्ययाम्‌ = पुष्कळ काळ टिकणारी, ते = तुझी, अकीर्तिम्‌ = अपकीर्ती, अपि = सुद्धा, कथयिष्यन्ति = सांगत सुटतील, च = आणि, सम्भावितस्य = माननीय पुरुषांसाठी, अकीर्तिः = अपकीर्ति (ही), मरणात्‌ = मरणापेक्षा, अतिरिच्यते = अधिक दुःसह असते
अर्थ
तसेच सर्व लोक तुझी चिरकाळ अपकीर्ति सांगत राहातील. आणि सन्माननीय पुरुषाला अपकीर्ती मरणाहून दुःसह वाटते. ॥ २-३४ ॥
भयाद्रणादुपरतरं मंस्यन्ते त्वां महारथाः ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्‌ ॥ २-३५ ॥
अन्वय

च = आणि, येषाम्‌ = ज्यांच्या (दृष्टीने), त्वम्‌ = तू (पूर्वी), बहुमतः = अतिशय माननीय, भूत्वा = होऊन, (इदानीम्‌) = आता, लाघवम्‌ = क्षुद्रतेप्रत, यास्यसि = जाशील, (ते) = ते, महारथाः = महारथी लोक, त्वाम्‌ = तू, भयात्‌ = भीतीमुळे, रणात्‌ = युद्धातून, उपरतम्‌ = मागे फिरलास, (इति) = असे, मंस्यन्ते = मानतील
अर्थ
शिवाय ज्यांच्या दृष्टीने तू आधी अतिशय आदरणीय होतास, त्यांच्या दृष्टीने आता तुच्छ ठरशील. ते महारथी लोक तू भिऊन युद्धातून काढता पाय घेतला, असे मानतील. ॥ २-३५ ॥
अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम्‌ ॥ २-३६ ॥
अन्वय

तव = तुझे, अहिताः = वैरी लोक, तव = तुझ्या, सामर्थ्यम्‌ = सामर्थ्याची, निन्दन्तः = निंदा करीत, बहून्‌ = पुष्कळ, अवाच्यवादान्‌ = सांगण्यासारखी नसणारी वचने, च = सुद्धा, वदिष्यन्ति = बोलतील, ततः = त्यापेक्षा, दुःखतरम्‌ = अधिक दुःखदायक, नु किम्‌ = आणखी काय असेल (बरे)
अर्थ
तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत तुला पुष्कळसे नको नको ते बोलतील. याहून अधिक दुःखदायक काय असणार आहे? ॥ २-३६ ॥
हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्‌ ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ २-३७ ॥
अन्वय

वा = अथवा, (त्वम्‌) = तू, हतः = (युद्धात) मारला जाऊन, स्वर्गम्‌ = स्वर्ग, प्राप्स्यसि = प्राप्त करून घेशील, वा = अथवा, (युद्धे) = युद्धात, जित्वा = जिंकून, महीम्‌ = पृथ्वीचे राज्य, भोक्ष्यसे = तू भोगशील, तस्मात्‌ = म्हणून, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, युद्धाय = युद्ध करण्याचा, कृतनिश्चयः = निश्चय करून, उत्तिष्ठ = उठून उभा राहा
अर्थ
युद्धात तू मारला गेलास तर स्वर्गाला जाशील अथवा युद्धात जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा. ॥ २-३७ ॥
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्य नैवं पापमवाप्स्यसि ॥ २-३८ ॥
अन्वय

जयाजयौ = जय व पराजय, लाभालाभौ = लाभ-हानि, (च) = आणि, सुखदुःखे = सुख व दुःख (यांना), समे = समान, कृत्वा = मानून, ततः = त्यानंतर, युद्धाय = युद्ध करण्यासाठी, युज्यस्व = तयार हो, एवम्‌ = अशाप्रकारे (युद्ध केल्यामुळे), पापम्‌ = पाप, न अवाप्स्यसि = तुला लागणार नाही
अर्थ
जय-पराजय, फायदा-तोटा आणि सुख-दुःख समान मानून युद्धाला तयार हो. अशा रीतीने युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही. ॥ २-३८ ॥
एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ २-३९ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), एषा = ही, बुद्धिः = बुद्धी, (मया) = मी, ते = तुझ्यासाठी, साङ्ख्ये = ज्ञानयोगाच्या बाबतीत, अभिहिता = सांगितली, तु = आणि (आता), योगे = कर्मयोगाच्या बाबतीतील, इमाम्‌ = ही (बुद्धी), शृणु = तु ऐक, यया = ज्या, बुद्ध्या = बुद्धीने, युक्तः = युक्त झालेला (असा तू), कर्मबन्धनम्‌ = कर्मांच्या बंधनाला, प्रहास्यसि = चांगल्या प्रकारे टाकशील म्हणजे तू कर्मबंधनाला पूर्णपणे नष्ट करून टाकशील
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), हा विचार तुला ज्ञानयोगाच्या संदर्भात सांगितला. आणि आता कर्मयोगाविषयी ऐक, ज्या बुद्धीने युक्त झाला असता कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडून टाकशील. ॥ २-३९ ॥
नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्‌ ॥ २-४० ॥
अन्वय

इह = या कर्मयोगामध्ये, अभिक्रमनाशः = आरंभाचा म्हणजे बीजाचा नाश, न अस्ति = होत नाही, (च) = (तसेच), प्रत्यवायः = विपर्यस्त फलरूपी दोष (सुद्धा), न विद्यते = असत नाहीत, अस्य = या कर्मयोगरूपी, धर्मस्य = धर्माचे, स्वल्पम्‌ = थोडे (साधन), अपि = सुद्धा, महतः = महान, भयात्‌ = (जन्ममृत्युरूपी) भयापासून, त्रायते = रक्षण करते
अर्थ
या कर्मयोगात आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही. आणि उलट फळरूपी दोषही नाही. इतकेच नव्हे तर, या कर्मयोगरूप धर्माचे थोडेसेही साधन जन्ममृत्युरूप मोठ्या भयापासून रक्षण करते. ॥ २-४० ॥
व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवसायिनाम्‌ ॥ २-४१ ॥
अन्वय

कुरुनन्दन = हे कुरुवंशी अर्जुना, इह = या कर्मयोगामध्ये, व्यवसायात्मिका = निश्चयात्मिका, बुद्धिः = बुद्धी, एका = एकच, (भवति) = आहे, (परन्तु) = परंतु, अव्यवसायिनाम्‌ = अस्थिर विचार करणाऱ्या विवेकहीन सकाम मनुष्याच्या, बुद्धयः = बुद्धी, हि = निश्चितपणे, बहुशाखाः = पुष्कळ भेद असणाऱ्या, च = आणि, अनन्ताः = अनंत, (सन्ति) = असतात
अर्थ
हे अर्जुना, या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते. परंतु अस्थिर विचार असणाऱ्या, अविचारी, कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेल्या व असंख्य असतात. ॥ २-४१ ॥
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ २-४२ ॥
कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम्‌ ।
क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ २-४३ ॥
भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम्‌ ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ २-४४ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), कामात्मानः = जे भोगात तन्मय झालेले असतात, वेदवादरताः = कर्मफळाची प्रशंसा करणाऱ्या वेदवाक्यांमध्ये ज्यांची प्रीती आहे, स्वर्गपराः = ज्यांच्या बुद्धीला स्वर्गच परम प्राप्य वस्तू वाटते, (च) = आणि, (स्वर्गात्‌ अधिकम्‌) = स्वर्गापेक्षा अधिक, अन्यत्‌ = दुसरी (कोणतीही वस्तूच), न अस्ति = नाही, इति = असे, वादिनः = जे म्हणतात, (ते) = ते, अविपश्चितः = अविवेकी लोक, इमाम्‌ = अशाप्रकारची, याम्‌ = जी, पुष्पिताम्‌ = पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभेने युक्त, वाचम्‌ = वाणी, प्रवदन्ति = उच्चारतात, (यां वाचम्‌) = जी वाणी, जन्मकर्मफलप्रदाम्‌ = जन्मरूपी कर्मफळ देणारी, भोगैश्वर्यगतिं प्रति = भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्तीसाठी, क्रियाविशेषबहुलाम्‌ = पुष्कळशा क्रियांचे वर्णन करणारी आहे, तया = त्या वाणीमुळे, अपहृतचेतसाम्‌ = ज्यांची मने हरण केली गेली आहेत, भोगैश्वर्यप्रसक्तानाम्‌ = जे भोग आणि ऐश्वर्य यांच्यामध्ये अत्यंत आसक्त आहेत, (तेषां पुरुषाणाम्‌) = त्या पुरुषांची, समाधौ = परमात्म्याच्या ठिकाणी, व्यवसायात्मिका = निश्चयात्मिका, बुद्धिः = बुद्धी (ही), न विधीयते = स्थिर असत नाही
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जे भोगात रमलेले असतात, कर्मफलाची स्तुती करणाऱ्या वेदवाक्यांची ज्यांना आवड आहे, ज्यांच्या मते स्वर्ग हीच श्रेष्ठ मिळवण्याजोगी वस्तू आहे, स्वर्गाहून श्रेष्ठ दुसरी कोणतीही गोष्ट नाही, असे जे सांगतात, ते अविवेकी लोक अशा प्रकारची जी पुष्पित म्हणजे दिखाऊ शोभायुक्त भाषा बोलतत असतात, त्यांची ही भाषा जन्मरूप कर्मफळ देणारी तसेच भोग व ऐश्वर्य मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्रियांचे वर्णन करणारी असते. या भाषेने ज्यांचे अंतःकरण आकृष्ट करून घेतले आहे, जे भोग व ऐश्वर्यात अत्यंत आसक्त आहेत, अशा पुरुषांची परमात्म्याविषयी निश्चयी बुद्धी असत नाही. ॥ २-४२, २-४३, २-४४ ॥
त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्‌ ॥ २-४५ ॥
अन्वय

अर्जुन = हे अर्जुना, वेदाः = वेद (हे वरीलप्रकाराने), त्रैगुण्यविषयाः = तीन गुणांचे कार्यरूप असे भोग व त्यांची साधने यांचे प्रतिपादन करणारे आहेत, (अतः) = म्हणून, निस्त्रैगुण्यः = ते भोग व त्यांची साधने यांमध्ये आसक्तिरहित, निर्द्वन्द्वः = हर्ष-शोक इत्यादी द्वंद्वांनी रहित, नित्यसत्त्वस्थः = नित्यवस्तू अशा परमात्म्याचे ठिकाणी स्थित, निर्योगक्षेमः = योग आणि क्षेम यांची इच्छा न करणारा, (च) = आणि, आत्मवान्‌ = अंतःकरण ज्याचे स्वाधीन आहे असा, भव = तू हो
अर्थ
हे अर्जुना, वेद वर सांगितल्याप्रमाणे तिन्ही गुणांची कार्ये असणारे भोग आणि त्यांची साधने सांगणारे आहेत. म्हणून तू ते भोग व त्यांच्या साधनांच्या बाबतीत आसक्ती बाळगू नकोस. तसेच सुख-दुःखादी द्वंद्वांनी रहित नित्यवस्तू असणाऱ्या परमात्म्यात स्थित, योगक्षेमाची इच्छा न बाळगणारा आणि अंतःकरणाला ताब्यात ठेवणारा हो. ॥ २-४५ ॥
यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ २-४६ ॥
अन्वय

सर्वतः = सर्व बाजूंनी, सम्प्लुतोदके = परिपूर्ण असा जलाशय, (प्राप्ते सति) = प्राप्त झाला असताना, उदपाने = लहानशा जलाशयात (माणसाचे), यावान्‌ = जितके, अर्थः = प्रयोजन, (अस्ति) = असते, विजानतः = ब्रह्माला तत्त्वतः जाणणाऱ्या, ब्राह्मणस्य = ब्रह्मज्ञान्याचे, सर्वेषु = समस्त, वेदेषु = वेदांमध्ये, तावान्‌ = तितकेच, (अर्थः) = प्रयोजन, (अस्ति) = असते
अर्थ
सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञान्याला वेदांची उरते. ॥ २-४६ ॥
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥
अन्वय

कर्मणि एव = कर्म करण्याविषयीच, ते = तुला, अधिकारः = अधिकार (आहे), फलेषु = (त्यांच्या) फळांवर, कदाचन = कधीही, मा = नाही (म्हणून), कर्मफलहेतुः = कर्मांच्या फळांचा हेतू, मा भूः = तू होऊ नकोस (तसेच), अकर्मणि = कर्म न करण्याबाबत, (ते) = तुझी, सङ्गः = आसक्ती, मा अस्तु = नको असू देऊस
अर्थ
तुला कर्म करण्याचाच अधिकार आहे. त्यांच्या फळाविषयी कधीही नाही. म्हणून तू कर्मांच्या फळांची इच्छा करणारा होऊ नकोस. तसेच कर्म न करण्याचाही आग्रह धरू नकोस. ॥ २-४७ ॥
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २-४८ ॥
अन्वय

धनञ्जय = हे धनंजय अर्जुना, सङ्गम्‌ = आसक्ति, त्यक्त्वा = सोडून देऊन, (च) = तसेच, सिद्ध्यसिद्ध्योः = सिद्धी आणि असिद्धी यांचे बाबतीत, समः भूत्वा = समान बुद्धी बाळगून, योगस्थः = योगामध्ये स्थित होऊन, कर्माणि = कर्तव्य कर्मे, कुरु = तू कर, समत्वम्‌ = समत्वालाच, योगः = योग (असे), उच्यते = म्हटले जाते
अर्थ
हे धनंजय अर्जुना, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धी यामध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्मे कर. समत्वालाच योग म्हटले जाते. ॥ २-४८ ॥
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय ।
बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः ॥ २-४९ ॥
अन्वय

बुद्धियोगात्‌ = या समत्वरूपी बुद्धियोगापेक्षा, कर्म = सकाम कर्म (हे), दूरेण अवरम्‌ = अत्यंत खालच्या श्रेणीचे (आहे), (अतः) = म्हणून, धनञ्जय = हे धनंजय अर्जुना, बुद्धौ = समत्वबुद्धीमध्येच, शरणम्‌ = रक्षणाचा उपाय, अन्विच्छ = तू शोध (म्हणजे बुद्धीयोगाचा आश्रय घे), हि = कारण, फलहेतवः = फळाचा हेतू बनणारे लोक, कृपणाः = अत्यंत दीन, (सन्ति) = असतात
अर्थ
या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे. म्हणून हे धनंजय अर्जुना, तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचा आश्रय घे. कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यंत दीन असतात. ॥ २-४९ ॥
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्‌ ॥ २-५० ॥
अन्वय

बुद्धियुक्तः = समबुद्धीने युक्त असा पुरुष, इह = याच लोकात, सुकृतदुष्कृते उभे = पुण्य आणि पाप या दोहोंचाही, जहाति = त्याग करतो म्हणजे त्यातून मुक्त होऊन जातो, तस्मात्‌ = म्हणून, योगाय = समत्वरूप योगाला, युज्यस्व = तू लागून राहा, योगः = (हा) समत्वरूप योगच, कर्मसु = कर्मांतील, कौशलम्‌ = कौशल्य आहे म्हणजे कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे
अर्थ
समबुद्धीचा पुरुष पुण्य व पाप या दोहोंचाही याच जगात त्याग करतो. अर्थात त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्वरूप योगाला चिकटून राहा. हा समत्वरूप योगच कर्मांतील कौशल्य आहे, म्हणजेच कर्मबंधनातून सुटण्याचा उपाय आहे.
कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबन्धविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम्‌ ॥ २-५१ ॥
अन्वय

हि = कारण, बुद्धियुक्ताः = समबुद्धीने युक्त (असे), मनीषिणः = ज्ञानी लोक हे, कर्मजम्‌ = कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या, फलम्‌ = फळाचा, त्यक्त्वा = त्याग करून, जन्मबन्धविनिर्मुक्ताः = जन्मरूपी बंधनातून मुक्त होऊन, अनायम्‌ = निर्विकार (असे), पदम्‌ = परमपद, गच्छन्ति = प्राप्त करून घेतात
अर्थ
कारण समबुद्धीने युक्त असलेले ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळाचा त्याग करून जन्मरूप बंधनापासून मुक्त होऊन निर्विकार परमपदाला प्राप्त होतात. ॥ २-५१ ॥
यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति ।
तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ २-५२ ॥
अन्वय

यदा = जेव्हा, ते = तुझी, बुद्धिः = बुद्धी, मोहकलिलम्‌ = मोहरूपी दलदल, व्यतितरिष्यति = चांगल्या प्रकारे पार करून जाईल, तदा = तेव्हा, श्रुतस्य = ऐकलेल्या, च = आणि, श्रोतव्यस्य = ऐकिवात येणाऱ्या (इह-पर लोकातील सर्व भोगांच्या बाबतीत), निर्वेदम्‌ = वैराग्य, गन्तासि = तुला प्राप्त होईल
अर्थ
जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पूर्णपणे पार करून जाईल, तेव्हा तू ऐकलेल्या व ऐकण्यासारख्या इह-पर लोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील. ॥ २-५२ ॥
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ २-५३ ॥
अन्वय

श्रुतिविप्रतिपन्ना = तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकल्यामुळे विचलित झालेली, ते = तुझी, बुद्धिः = बुद्धी, यदा = जेव्हा, समाधौ = परमात्म्याच्या ठिकाणी, निश्चला = अचल, (च) = व, अचला = स्थिर, स्थास्यति = राहील, तदा = तेव्हा, योगम्‌ अवाप्स्यसि = योग तुला प्राप्त होईल म्हणजे परमात्म्याशी तुझा नित्य संयोग होईल
अर्थ
तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी जेव्हा परमात्म्यात अचलपणे स्थिर राहील, तेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजेच तुझा परमात्म्याशी नित्यसंयोग होईल. ॥ २-५३ ॥
अर्जुन उवाच
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम्‌ ॥ २-५४ ॥
अन्वय

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, केशव = हे केशवा, समाधिस्थस्य स्थितप्रज्ञस्य = परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या स्थिरबुद्धी अशा पुरुषाचे, भाषा = लक्षण, का = काय, स्थितधीः = तो स्थिरबुद्धी पुरुष, किम्‌ = कसा, प्रभाषेत = बोलत असतो, किम्‌ = कसा, आसीत = बसत असतो, (च) = आणि, किम्‌ = कसा, व्रजेत = चालत असतो
अर्थ
अर्जुने विचारले, हे केशवा, जो समाधीत परमात्म्याला प्राप्त झालेला आहे, अशा स्थिरबुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो स्थिरबुद्धी पुरुष कसा बोलतो, कसा बसतो, आणि कसा चालतो? ॥ २-५४ ॥
श्रीभगवानुवाच
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान्‌ ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ २-५५ ॥
अन्वय

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), यदा = जेव्हा, (अयं पुरुषः) = हा पुरुष, मनोगतान्‌ = मनातील, सर्वान्‌ = संपूर्ण, कामान्‌ = कामनांचा, प्रजहाति = पूर्णपणे त्याग करतो, (च) = आणि, आत्मना = आत्म्याने, आत्मनि एव = आत्म्यामध्येच, तुष्टः = संतुष्ट होऊन राहातो, तदा = तेव्हा, स्थितप्रज्ञः = तो पुरुष स्थितप्रज्ञ उच्यते = म्हटला जातो
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ज्यावेळी हा पुरुष मनातील सर्व कामना पूर्णपणे टाकतो आणि आत्म्यानेच आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट राहातो, त्यावेळी त्याला स्थितप्रज्ञ म्हटले जाते. ॥ २-५५ ॥
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २-५६ ॥
अन्वय

दुःखेषु = दुःखांची प्राप्ती झाली असताना, अनुद्विग्नमनाः = ज्याच्या मनात उद्वेग येत नाही, सुखेषु = सुखांच्या प्राप्तीच्या बाबतीत, विगतस्पृहः = जो सर्वथा निस्पृह आहे, (तथा) = तसेच, वीतरागभयक्रोधः = ज्याची आसक्ती, भय व क्रोध हे नष्ट होऊन गेले आहेत असा, मुनिः = मुनी, स्थितधीः = स्थिरबुद्धी, उच्यते = म्हटला जातो
अर्थ
दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखांच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याचे प्रीती, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिरबुद्धी म्हटला जातो. ॥ २-५६ ॥
यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभाम्‌ ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-५७ ॥
अन्वय

यः = जो पुरुष, सर्वत्र = सर्वत्र, अनभिस्नेहः = स्नेहरहित असून, तत्‌ तत्‌ = त्या त्या, शुभाशुभाम्‌ = शुभ किंवा अशुभ वस्तू, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, न अभिनन्दति = प्रसन्न होत नाही, (तथा) = तसेच, न द्वेष्टि = द्वेष करीत नाही, तस्य = त्याची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर आहे
अर्थ
जो पुरुष सर्व बाबतीत स्नेहशून्य असून त्या त्या शुभ किंवा अशुभ गोष्टी घडल्या असता प्रसन्नही होत नाही किंवा त्यांचा द्वेषही करीत नाही, त्याची बुद्धी स्थिर असते.
यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-५८ ॥
अन्वय

च = आणि, कूर्मः = कासव, सर्वशः = सर्व बाजूंनी, अङ्गानि = (आपले) अवयव, इव = ज्याप्रमाणे (आत ओढून घेते, त्याप्रमाणे), यदा = जेव्हा, अयम्‌ = हा पुरुष, इन्द्रियार्थेभ्यः = इंद्रियांच्या विषयांपासून, इन्द्रियाणि = (आपली) इंद्रिये, (सर्वशः) = सर्व प्रकाराने, संहरते = आवरून घेतो, (तदा) = तेव्हा, तस्य = त्याची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर आहे (असे समजावे)
अर्थ
कासव सर्व बाजूंनी आपले अवयव जसे आत ओढून धरते, त्याचप्रमाणे जेव्हा हा पुरुष इंद्रियांच्या विषयांपासून इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समजावे. ॥ २-५८ ॥
विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ २-५९ ॥
अन्वय

निराहारस्य = इंद्रियांच्या द्वारा विषयांचे ग्रहण न करणाऱ्या, देहिनः = पुरुषांच्या बाबतीत, विषयाः = (केवळ) विषयच, विनिवर्तन्ते = निवृत्त होतात, (किंतु) = परंतु, रसवर्जम्‌ = विषयातील आसक्ती निवृत्त होत नाही, अस्य = या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर, रसः अपि = आसक्तीसुद्धा, परम्‌ = परमात्म्याचा, दृष्ट्वा = साक्षात्कार झाल्यामुळे, निवर्तते = संपूर्णपणे निवृत्त होऊन जाते
अर्थ
इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात; परंतु त्यांच्याविषयीची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. ॥ २-५९ ॥
यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ २-६० ॥
अन्वय

कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, हि = आसक्तीचा नाश न झाल्यामुळे, प्रमाथीनि = विक्षुब्ध करण्याचा स्वभाव असणारी, इन्द्रियाणि = इंद्रिये (ही), यततः = प्रयत्‍न करणाऱ्या, विपश्चितः = बुद्धिमान, पुरुषस्य = पुरुषाचे, मनः अपि = मनसुद्धा, प्रसभम्‌ = जबरदस्तीने, हरन्ति = हरण करून घेतात
अर्थ
हे कुंतीपुत्र अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्‍न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. ॥ २-६० ॥
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-६१ ॥
अन्वय

(अतः) = म्हणून, तानि सर्वाणि = ती सर्व इंद्रिये, संयम्य = वश करून घेऊन, (साधकः) = साधकाने, युक्तः = चित्त स्थिर करून, मत्परः = माझा आधार घेऊन, आसीत = ध्यानाला बसावे, हि = कारण, यस्य = ज्या पुरुषाची, इन्द्रियाणि = इंद्रिये (ही), वशे = त्याला वश असतात, तस्य = त्याची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर होऊन राहाते
अर्थ
म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून, चित्त स्थिर करून, मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे. कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुद्धी स्थिर होते. ॥ २-६१ ॥
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ २-६२ ॥
अन्वय

विषयान्‌ = विषयांचे, ध्यायतः = चिंतन करणाऱ्या, पुंसः = पुरुषाची, तेषु = त्या विषयांमध्ये, सङ्गः = आसक्ती, उपजायते = उत्पन्न होते, सङ्गात्‌ = त्या आसक्तीमुळे, कामः = (त्या विषयांची) कामना, सञ्जायते = निर्माण होते, (च) = आणि, कामात्‌ = कामनेमध्ये विघ्न आल्यामुळे, क्रोधः = क्रोध, अभिजायते = उत्पन्न होतो
अर्थ
विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की क्रोध म्हणजे राग येतो. ॥ २-६२ ॥
क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद्‌ बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ २-६३ ॥
अन्वय

क्रोद्धात्‌ = क्रोधामुळे, सम्मोहः = अत्यंत मूढभाव, भवति = उत्पन्न होतो, सम्मोहात्‌ = मूढभावामुळे, स्मृतिविभ्रमः = स्मृतीमध्ये भ्रम होतो, स्मृतिभ्रंशात्‌ = स्मृतीमध्ये भ्रम निर्माण झाल्यामुळे, बुद्धिनाशः = बुद्धीचा नाश म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो, (च) = आणि, बुद्धिनाशात्‌ = बुद्धीचा नाश झाल्यामुळे, (सः पुरुषः) = तो पुरुष, प्रणश्यति = आपल्या स्थितीपासून च्युत होतो
अर्थ
रागामुळे अत्यंत मूढता येते अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो. ॥ २-६३ ॥
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ २-६४ ॥
अन्वय

तु = परंतु, विधेयात्मा = ज्याने अंतःकरण आपल्या स्वाधीन करून घेतले आहे असा साधक, आत्मवश्यैः = स्वतःला वश असणाऱ्या, रागद्वेषवियुक्तैः = राग व द्वेष यांनी रहित असणाऱ्या अशा, इन्द्रियैः = इंद्रियांच्या द्वारा, विषयान्‌ = विषयांमध्ये, चरन्‌ = वावर करीत, प्रसादम्‌ = अंतःकरणाची आध्यात्मिक प्रसन्नता, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो
अर्थ
परंतु अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग-द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो. ॥ २-६४ ॥
प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ २-६५ ॥
अन्वय

प्रसादे = अंतःकरणातील प्रसन्नता आल्यावर, अस्य = याच्या, सर्वदुःखानाम्‌ = संपूर्ण दुःखांचा, हानिः = अभाव, उपजायते = होऊन जातो, (च) = आणि, प्रसन्नचेतसः = प्रसन्नचित्त असणाऱ्या कर्मयोग्याची, बुद्धिः = बुद्धी, आशु हि = लौकरच (सर्व बाजूंनी निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच), पर्यवतिष्ठते = उत्तम प्रकारे स्थिर होऊन जाते
अर्थ
अंतःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात. आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते. ॥ २-६५ ॥
नास्ति बुद्धिर‍युक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम्‌ ॥ २-६६ ॥
अन्वय

अयुक्तस्य = ज्यांनी मन व इंद्रिये जिंकलेली नाहीत, अशा पुरुषांच्या ठिकाणी, बुद्धिः = निश्चयात्मिका बुद्धी, न अस्ति = असत नाही, च = आणि, अयुक्तस्य = अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात, भावना = भावनासुद्धा, न = असत नाही, च = तसेच, अभावयतः = भावनाहीन मनुष्याला, शान्तिः न = शांती मिळत नाही, (च) = आणि, अशान्तस्य = शांतिरहित मनुष्याला, सुखम्‌ = सुख, कुतः = कोठून, (भविष्यति) = प्राप्त होईल
अर्थ
मन आणि इंद्रिये न जिंकणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार? ॥ २-६६ ॥
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥ २-६७ ॥
अन्वय

हि = कारण, इव = ज्याप्रमाणे, अम्भसि = पाण्यात चालणाऱ्या, नावम्‌ = नावेला, वायुः = वायू हा, हरति = हरण करून नेतो (त्याप्रमाणे), चरताम्‌ = विषयांमध्ये वावरणाऱ्या, इंद्रियाणाम्‌ = इंद्रियांपैकी, मनः = मन, यत्‌ = ज्या (इंद्रियाच्या), अनु = बरोबर, विधीयते = राहते, तत्‌ = ते (एकच इंद्रिय), अस्य = या (अयुक्त) पुरुषाच्या, प्रज्ञाम्‌ = बुद्धीला, (हरति) = हरण करून घेते
अर्थ
कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयात वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इंद्रियाबरोबर राहते, ते एकच इंद्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते ॥ २-६७ ॥
तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-६८ ॥
अन्वय

तस्मात्‌ = म्हणून, महाबाहो = हे महाबाहो, यस्य = ज्या पुरुषाची, इन्द्रियाणि = इंद्रिये, इन्द्रियार्थेभ्यः = इंद्रियांच्या विषयांपासून, सर्वशः = सर्वप्रकारांनी, निगृहीतानि = निगृहीत केलेली असतात, तस्य = त्या पुरुषाची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर असते
अर्थ
म्हणून हे महाबाहो, ज्याची इंद्रिये इंद्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरून धरलेली असतात, त्याची बुद्धी स्थिर असते. ॥ २-६८ ॥
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ २-६९ ॥
अन्वय

सर्वभूतानाम्‌ = संपूर्ण प्राण्यांच्या संदर्भात, या = जी, निशा = रात्रीप्रमाणे असते, तस्याम्‌ = अशा त्या नित्य ज्ञानस्वरूप परमानंदांच्या प्राप्तीचे ठिकाणी, संयमी = स्थितप्रज्ञ योगी, जागर्ति = जागा असतो, (च) = (आणि), यस्याम्‌ = ज्या नाशवंत सांसारिक सुखाच्या बाबतीत, भूतानि = सर्व प्राणी, जाग्रति = जागे असतात, सा = ती, पश्यतः = परमात्मतत्त्व जाणणाऱ्या, मुनेः = मुनीला, निशा = रात्रीप्रमाणे असते
अर्थ
सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरूप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्त्व जाणणाऱ्या मुनीसाठी रात्रीसारखी असते. ॥ २-६९ ॥
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्‌ ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥ २-७० ॥
अन्वय

आपूर्यमाणम्‌ = सर्व बाजूंनी परिपूर्ण, अचलप्रतिष्ठम्‌ = अचल प्रतिष्ठा असणाऱ्या अशा, समुद्रम्‌ = समुद्रात, यद्वत्‌ = ज्याप्रमाणे, आपः = नाना नद्यांचे पाणी, प्रविशन्ति = त्याला विचलित न करता सामावून जाते, तद्वत्‌ = त्याप्रमाणे, सर्वे = सर्व, कामाः = भोग, यम्‌ = ज्या स्थितप्रज्ञ पुरुषाच्या ठिकाणी, प्रविशन्ति = (कोणताही प्रकारचा विकार त्याच्या ठिकाणी उत्पन्न न करता) सामावून जातात, सः = तोच स्थितप्रज्ञ पुरुष, शान्तिम्‌ = परम शांति, आप्नोति = प्राप्त करून घेतो (याउलट), न कामकामी = भोगांची इच्छा करणारा (शांति प्राप्त करून घेत) नाही
अर्थ
ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी, सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो. भोगांची इच्छा करणारा नव्हे. ॥ २-७० ॥
विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥ २-७१ ॥
अन्वय

सर्वान्‌ = संपूर्ण, कामान्‌ = कामनांचा, विहाय = त्याग करून, यः = जो, पुमान्‌ = पुरुष, निर्ममः = ममतारहित, निरहङ्कारः = अहंकाररहित, (च) = आणि, निःस्पृहः = स्पृहारहित होऊन, चरति = वावरत असतो, सः = तोच (पुरुष), शान्तिम्‌ = शांतीप्रत, अधिगच्छति = प्राप्त होतो, म्हणजे शांती प्राप्त करून घेतो
अर्थ
जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून, ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहात असतो, त्यालाच शांती मिळते. ॥ २-७१ ॥
एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ २-७२ ॥
अन्वय

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), एषा ब्राह्मी स्थितिः = ब्रह्माला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची ही स्थिती आहे, एनाम्‌ = ही स्थिती, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, (योगी) = योगी, (कदापि) = कधीही, न विमुह्यति = मोहित होत नाही, (च) = आणि, अन्तकाले अपि = अंतकाळी सुद्धा, अस्याम्‌ स्थित्वा = या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन, (सः) = तो, ब्रह्मनिर्वाणम्‌ = ब्रह्मानंदाप्रत, ऋच्छति = जातो (म्हणजे ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो)
अर्थ
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधीही मोहित होत नाही. आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवितो. ॥ २-७२ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥

भगवद्गीता – अध्याय १ – अर्जुनविषादयोग

धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥ १-१ ॥

अन्वय
धृतराष्ट्र = धृतराष्ट्र, उवाच = म्हणाले, सञ्जय = हे संजया, धर्मक्षेत्रे = धर्मभूमी असणाऱ्या, कुरुक्षेत्रे = कुरुक्षेत्रावर, समवेताः = एकत्र जमलेल्या, युयुत्सवः = युद्धाची इच्छा करणाऱ्या, मामकाः = माझ्या मुलांनी, च = आणि, एव = तसेच, पाण्डवाः = पांडूच्या मुलांनी, किम्‌ = काय, अकुर्वत = केले
अर्थ
धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनीही काय केले? ॥ १-१ ॥
सञ्जय उवाच
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत्‌ ॥ १-२ ॥
अन्वय
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, तदा = त्यावेळी, व्यूढम्‌ = व्यूहरचनेने युक्त, पाण्डवानीकम्‌ = पांडवांचे सैन्य, दृष्ट्वा = पाहून, तु = आणि, आचार्यम्‌ = द्रोणाचार्यांच्या, उपसङ्गम्य = जवळ जाऊन, राजा = राजा, दुर्योधनः = दुर्योधन, वचनम्‌ = असे वचन, अब्रवीत = बोलला
अर्थ
संजय म्हणाले, त्यावेळी व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहून राजा दुर्योधन द्रोणाचर्यांजवळ जाऊन असे म्हणाला ॥ १-२ ॥
पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम्‌ ।
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥ १-३ ॥
अन्वय
आचार्य = अहो आचार्य, तव = तुमच्या, धीमता = बुद्धिमान, शिष्येण = शिष्याने, द्रुपदपुत्रेण = द्रुपदपुत्र धष्टद्युम्नाने, व्युढाम्‌ = व्युहरचना करून सिद्ध केलेली, एताम्‌ = ही, पाण्डुपुत्राणाम्‌ = पांडूच्या पुत्रांची, महतीम्‌ = विशाल, चमूम्‌ = सेना, पश्य = पाहा
अर्थ
अहो आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्याने-द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने-व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पाहा. ॥ १-३ ॥
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥ १-४ ॥
धृष्टकेतुश्‍चेकितानः काशिराजश्च वीर्यवान्‌ ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः ॥ १-५ ॥
युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान्‌ ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥ १-६ ॥
अन्वय

अत्र = येथे, महेष्वासाः = मोठीमोठी धनुष्ये धारण केलेले, च = आणि, युधि = युद्धात, भीमार्जुनसमाः = भीम व अर्जुन याप्रमाणे असणारे, शूराः = शूर-वीर, युयुधानः = सात्यकी, च = आणि, विराटः = विराट, च = तसेच, महारथः = महारथी, द्रुपदः = द्रुपद, धृष्टकेतुः = धृष्टकेतू, चेकितानः = चेकितान, च = आणि, वीर्यवान्‌ = बलवान, काशिराजः = काशिराज, पुरुजित्‌ = पुरुजित, कुन्तिभोजः = कुन्तिभोज, च = आणि, नरपुङ्गवः = नरश्रेष्ठ, शैब्यः = शैब्य, च = आणि, विक्रान्तः = पराक्रमी, युधामन्युः = युधामन्यू, च = तसेच, वीर्यवान्‌ = शक्तिमान, उत्तमौजाः = उत्तमौजा, सौभद्रः = सुभद्रेचा पुत्र, च = आणि, द्रौपदेयाः = द्रौपदीचे पाच पुत्र, सर्व एव = हे सर्वच, महारथाः = महारथी, (सन्ति) = आहेत
अर्थ
या सैन्यात मोठीमोठी धनुष्ये घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, बलवान काशिराज, पुरुजित, कुंतिभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत. ॥ १-४, १-५, १-६ ॥
अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥ १-७ ॥
अन्वय

द्विजोत्तम = हे ब्राह्मणश्रेष्ठ, अस्माकम्‌ = आमच्या पक्षात, तु = सुद्धा, ये = जे, विशिष्टाः = महत्त्वाचे, (सन्ति) = आहेत, तान्‌ = त्यांना, निबोध = आपण जाणून घ्या, मम = माझ्या, सैन्यस्य = सैन्याचे, नायकाः = जे सेनापती आहेत, तान्‌ = ते, ते = तुमच्या, संज्ञार्थम्‌ = माहितीसाठी, ब्रविमी = मी सांगतो
अर्थ
हे ब्राह्मणश्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत, ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी आपल्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत, ते मी आपल्याला सांगतो. ॥ १-७ ॥
भवान्‌ भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥ १-८ ॥
अन्वय

भवान्‌ = तुम्ही द्रोणाचार्य, च = आणि, भीष्मः = भीष्म, च = तसेच, कर्णः = कर्ण, च = आणि, समितिञ्जयः = युद्धात विजयी होणारे, कृपः = कृपाचार्य, च = तसेच, अश्वत्थामा = अश्वत्थामा, च = तसेच, विकर्णः = विकर्ण, तथैव च = आणि त्याचप्रमाणे, सौमदत्तिः = सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा
अर्थ
आपण-द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. ॥ १-८ ॥
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥ १-९ ॥
अन्वय

अन्ये = इतर, च = सुद्धा, मदर्थे = माझ्यासाठी, त्यक्तजीविताः = जीवावर उदार झालेले, बहवः = पुष्कळ, शूराः = शूरवीर, (सन्ति) = आहेत, सर्वे = ते सर्व, नानाशस्त्रप्रहरणाः = निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज, युद्धविशारदाः = युद्धात पारंगत, (सन्ति) = आहेत
अर्थ
इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. ॥ १-९ ॥
अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम्‌ ।
पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्‌ ॥ १-१० ॥
अन्वय

भीष्माभिरक्षितम्‌ = भीष्म-पितामहांकडून रक्षिले गेलेले, अस्माकम्‌ = आमचे, तत्‌ = ते, बलम्‌ = सैन्य, अपर्याप्तम्‌ = सर्व प्रकारांनी अजिंक्य आहे, तु = आणि, भीमाभिरक्षितम्‌ = भीमाकडून रक्षिले गेलेले, एतेषाम्‌ = या पांडवांचे, इदम्‌ = हे, बलम्‌ = सैन्य, पर्याप्तम्‌ = जिंकण्यास सोपे आहे
अर्थ
भीष्मपितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे; तर भीमाने रक्षण केलेले यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे. ॥ १-१० ॥
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥ १-११ ॥
अन्वय

च = म्हणून, सर्वेषु = सर्व, अयनेषु = व्यूहद्वारात, यथाभागम्‌ = आपापल्या जागेवर, अवस्थिताः = राहून, भवन्तः = आपण, सर्वे एव = सर्वांनीच, हि = निःसंदेहपणे, भीष्मम्‌ एव = भीष्म पितामहांचेच, अभिरक्षन्तु = सर्व बाजूंनी रक्षण करावे
अर्थ
म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निःसंदेह भीष्मपितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. ॥ १-११ ॥
तस्य सञ्जनयन्‌ हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्यौच्चै: शङ्खं दध्मौ प्रतापवान्‌ ॥ १-१२ ॥
अन्वय

तस्य = त्या(दुर्योधना)चा(च्या हृदयात), हर्षम्‌ = आनंद, सञ्जनयन्‌ = निर्माण करीत, कुरुवृद्धः = कौरवातील वृद्ध, प्रतापवान्‌ = महापराक्रमी(अशा), पितामहः = पितामह भीष्मांनी, उच्चैः = मोठ्या सुरात, सिंहनादम्‌ = सिंहाच्या आरोळीप्रमाणे, विनद्य = गर्जना करून, शङ्खम्‌ = शंख, दध्मौ = वाजविला
अर्थ
कौरवांतील वृद्ध, महापराक्रमी, पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजविला.
ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत्‌ ॥ १-१३ ॥
अन्वय

ततः = त्यानंतर, शङ्खाः = शंख, च = आणि, भेर्यः = नगारे, च = तसेच, पणवानकगोमुखाः = ढोल, मृदंग व शिंगे (इत्यादी रणवाद्ये), सहसा एव = एकदमच, अभ्यहन्यन्त = वाजू लागली, (तेषां) = (त्यांचा), सः = तो, शब्दः = आवाज, तुमुलः = फार भयंकर, अभवत्‌ = झाला
अर्थ
त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी रणवाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा तो आवाज प्रचंड झाला. ॥ १-१३ ॥
ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवाश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ॥ १-१४ ॥
अन्वय

ततः = त्यानंतर, श्वेतैः = पांढऱ्या, हयैः = घोड्यांनी, युक्ते = युक्त अशा, महति = उत्तम, स्यन्दने = रथात, स्थितौ = बसलेल्या, माधवः = श्रीकृष्ण महाराजांनी, च = आणि, पाण्डवः = पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने), एव = सुद्धा, दिव्यौ = अलौकिक, शङ्खौ = शंख, प्रदध्मतुः = वाजविले
अर्थ
यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने) ही दिव्य शंख वाजविले. ॥ १-१४ ॥
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ॥ १-१५ ॥
अन्वय

हृषीकेशः = श्रीकृष्ण महाराजांनी, पाञ्चजन्यम्‌ = पांचजन्य नावाचा, धनञ्जयः = अर्जुनाने, देवदत्तम्‌ = देवदत्त नावाचा, (च) = आणि, भीमकर्मा = भयानक कर्मे करणाऱ्या, वृकोदरः = भीमसेनाने, पौण्ड्रम्‌ = पौण्ड्र नावाचा, महाशङ्खम्‌ = मोठा शंख, दध्मौ = वाजविला
अर्थ
श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौण्ड्र नावाचा मोठा शंख फुंकला. ॥ १-१५ ॥
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥ १-१६ ॥
अन्वय

कुन्तीपुत्रः = कुन्तीपुत्र, राजा = राजा, युधिष्ठिरः = युधिष्ठिराने, अनन्तविजयम्‌ = अनंतविजय नावाचा, (च) = आणि, नकुलः = नकुलाने, च = व, सहदेवः = सहदेवाने, सुघोष-मणिपुष्पकौ = सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंङ्ख, (दध्मौ) = वाजविले
अर्थ
कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंतविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजविले. ॥ १-१६ ॥
काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥ १-१७ ॥
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक्पृथक्‌ ॥ १-१८ ॥
अन्वय

परमेष्वासः = श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा, काश्यः = काशिराज, च = आणि, महारथः = महारथी, शिखण्डी = शिखंडी, च = व, धृष्टद्युम्नः = धृष्टद्युम्न, च = तसेच, विराटः = राजा विराट, च = आणि, अपराजितः = अजिंक्य, सात्यकिः = सात्यकी, द्रुपदः = राजा द्रुपद, च = आणि, द्रौपदेयाः = द्रौपदीचे पाच पुत्र, च = तसेच, महाबाहुः = मोठ्या भुजा असणारा, सौभद्रः = सुभद्रापुत्र(अभिमन्यू), (एते, सर्वे) = या सर्वांनी, पृथिवीपते = हे राजन्‌, सर्वशः = सर्व बाजूंनी, पृथक्‌-पृथक्‌ = वेगवेगळे, शङ्खान्‌ = शंख, दध्मुः = वाजविले
अर्थ
श्रेष्ठ धनुष्य धारण करणारा काशिराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू, या सर्वांनी, हे राजा, सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजविले. ॥ १-१७, १-१८ ॥
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्‌ ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्‌ ॥ १-१९ ॥
अन्वय

(च) = आणि, नभः = आकाशाला, च = तसेच, पृथिवीं = पृथ्वीला, एव = सुद्धा, व्यनुनादयन्‌ = दुमदुमून टाकीत, सः = त्या, तुमुलः = भयानक, घोषः = आवाजाने, धार्तराष्ट्राणाम्‌ = धार्तराष्ट्रांची म्हणजे आपल्या पक्षातील लोकांची, हृदयानि = हृदये, व्यदारयत्‌ = विदीर्ण करून टाकली
अर्थ
आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली. ॥ १-१९ ॥
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्‌ कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥ १-२० ॥
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥ १-२१ ॥
अन्वय

महीपते = हे राजा, अथ = त्यानंतर, कपिध्वजः = ज्याच्या ध्वजावर हनुमान आहे (अशा), पाण्डवः = पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने), व्यवस्थितान्‌ = मोर्चा बांधून उभ्या असलेल्या, धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राशी संबंधित लोकांना, दृष्ट्वा = पाहून, तदा = तेव्हा, शस्त्रसम्पाते प्रवृत्ते = शस्त्र चालविण्याच्या तयारीचे वेळी, धनुः = धनुष्य, उद्यम्य = उचलून, हृषीकेशम्‌ = हृषीकेश श्रीकृष्णांना उद्देशून, इदम्‌ = हे, वाक्यम्‌ = वाक्य, आह = उच्चारले, अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, अच्युत = हे अच्युता, मे = माझा, रथम्‌ = रथ, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्यभागी, स्थापय = उभा करा
अर्थ
महाराज, त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या पांडवाने (अर्थात पांडुपुत्र अर्जुनाने) युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून, शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून, हृषीकेश श्रीकृष्णांना असे म्हटले, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. ॥ १-२०, १-२१ ॥
यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान्‌ ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्‌ रणसमुद्यमे ॥ १-२२ ॥
अन्वय

अस्मिन्‌ = या, रणसमुद्यमे = युद्धाच्या उद्योगात, कैः सह = (ज्या) कोणाकोणाबरोबर, मया = मला, योद्धव्यम्‌ = लढणे योग्य आहे, योद्धुकामान्‌ = (त्या) युद्ध करण्याच्या इच्छेने, अवस्थितान्‌ = रणांगणात सज्ज झालेल्या, एतान्‌ = या (शत्रुपक्षातील योद्ध्यां) ना, यावत्‌ अहम्‌ निरीक्षे = (मी) जोपर्यंत नीट पाहून घेत आहे (तोपर्यंत रथ उभा करा.)
अर्थ
मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्ध्यांना जोवर नीट पाहून घेईन की, मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तोवर रथ उभा करा. ॥ १-२२ ॥
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥ १-२३ ॥
अन्वय

दुर्बुद्धेः = दुष्टबुद्धी अशा, धार्तराष्ट्रस्य = दुर्योधनाचे, युद्धे = युद्धात, प्रियचिकीर्षवः = हित करू इच्छिणारे, ये = जे जे, एते = हे (राजेलोक), अत्र = या सैन्यात, समागताः = एकत्र आले आहेत (त्या), योत्स्यमानान्‌ = युद्ध करणाऱ्या योद्ध्यांना, अहम्‌ = मी, अवेक्षे = पाहीन
अर्थ
दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात हित करू इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत, त्या योद्ध्यांना मी पाहातो. ॥ १-२३ ॥
सञ्जय उवाच
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्‌ ॥ १-२४ ॥
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम्‌ ।
उवाच पार्थ पश्यैतान्‌ समवेतान्‌ कुरुनिति ॥ १-२५ ॥
अन्वय

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, भारत = हे धृतराष्ट्र, गुडाकेशेन = अर्जुनाने, एवम्‌ = असे, उक्तः = म्हटले असता, हृषीकेशः = श्रीकृष्णांनी, उभयोः = दोन्ही, सेनयोः = सैन्यांच्या, मध्ये = मध्ये, भीष्मद्रोणप्रमुखतः = भीष्म व द्रोण यांच्या समोर, च = तसेच, सर्वेषाम्‌ = सर्व, महीक्षिताम्‌ = राजांच्या समोर, रथोत्तमम्‌ = उत्तम रथ, स्थापयित्वा = उभा करून, इति = असे, उवाच = म्हटले, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथपुत्र अर्जुना), समवेतान्‌ = युद्धासाठी एकत्र जमलेल्या, एतान्‌ = या, कुरून्‌ = कौरवांना, पश्य = पाहा
अर्थ
संजय म्हणाले, धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांच्या समोर तो उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पाहा. ॥ १-२४, १-२५ ॥
तत्रापश्यत्स्थितान्‌ पार्थः पितॄनथ पितामहान्‌ ।
आचार्यान्मातुलान्‌ भ्रातॄन्‌ पुत्रान्‌ पौत्रान्‌ सखींस्तथा ॥ १-२६ ॥
श्वशुरान्‌ सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
अन्वय

अथ = त्यानंतर, पार्थः = पार्थाने (अर्थात पृथापुत्र अर्जुनाने), तत्र उभयोः अपि = त्या दोन्हीही, सेनयोः = सैन्यांमध्ये, स्थितान्‌ = उभे असलेले, पितॄन्‌ = काका, पितामहान्‌ = आजे, पणजे, आचार्यान्‌ = गुरू, मातुलान्‌ = मामे, भ्रातॄन्‌ = भाऊ, पुत्रान्‌ = मुलगे, पौत्रान्‌ = नातू, तथा = तसेच, सखीन्‌ = मित्र, श्वशुरान्‌ = सासरे, च = आणि, सुहृदः = सुहृद (यांना), एव = च, अपश्यत्‌ = पाहिले
अर्थ
त्यानंतर पार्थाने (अर्थात पृथापुत्र अर्जुनाने) त्या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे-पणजे, गुरू, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांनाच पाहिले. ॥ १-२६, १-२७(पूर्वार्ध) ॥
तान्‌ समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्‌ बन्धूनवस्थितान्‌ ॥ १-२७ ॥
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्‌ ।
अन्वय

अवस्थितान्‌ = उपस्थित असलेल्या, तान्‌ सर्वान्‌ बन्धून्‌ = त्या सर्व बंधूंना, समीक्ष्य = पाहून, परया = आत्यंतिक, कृपया = करुणेने, आविष्टः = परवश झालेला, सः = तो, कौन्तेयः = कुन्तीपुत्र अर्जुन, विषीदन्‌ = शोक करीत, इदम्‌ = हे(वचन), अब्रवीत्‌ = बोलला ॥ १-२७(उत्तरार्ध),
अर्थ
तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला ॥ १-२७(उत्तरार्ध), १-२८(पूर्वार्ध) ॥
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्‌ ॥ १-२८ ॥
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपुथश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥ १-२९ ॥
अन्वय

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, कृष्ण = हे कृष्णा, युयुत्सुम्‌ = युद्धाची इच्छा धरून, समुपस्थितम्‌ = रणांगणावर उपस्थित असणाऱ्या, इमम्‌ स्वजनम्‌ = या स्वजन समुदायाला, दृष्ट्वा = पाहिल्यावर, मम = माझे, गात्राणि = अवयव, सीदन्ति = गळून जात आहेत, च = आणि, मुखम्‌ = तोंड, परिशुष्यति = कोरडे पडत आहे, च = तसेच, मे = माझ्या, शरीरे = शरीरांच्या ठिकाणी, वेपुथः = कंप, च = व, रोमहर्षः = रोमांच, जायते = निर्माण झाले आहेत ॥
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उपस्थित असणाऱ्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥ १-२८(उत्तरार्ध), १-२९ ॥
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमवतीव च मे मनः ॥ १-३० ॥
अन्वय

हस्तात्‌ = हातातून, गाण्डीवम्‌ = गांडीव धनुष्य, स्रंसते = गळून पडत आहे, च = व, त्वक्‌ = त्वचा, एव = सुद्धा, परिदह्यते = फार जळजळत आहे, च = तसेच, मे = माझे, मनः = मन, भ्रमति इव = भरकटल्यासारखे होत आहे, (अतः) = त्यामुळे मी, अवस्थातुम्‌ = उभा राहाण्यास, च = सुद्धा, न शक्नोमि = समर्थ नाही
अर्थ
हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, अंगाचा दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. ॥ १-३० ॥
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥ १-३१ ॥
अन्वय

केशव = हे केशवा, निमित्तानि = चिन्हे, च = सुद्धा, (अहम्‌) = मी, विपरीतानि = विपरीतच, पश्यामि = पाहात आहे, (च) = तसेच, आहवे = युद्धामध्ये, स्वजनम्‌ = स्वजन-समुदायाला, हत्वा = ठार मारून, श्रेयः च = कल्याण सुद्धा (होईल असे), न अनुपश्यामि = मला दिसत नाही
अर्थ
हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल, असे मला वाटत नाही. ॥ १-३१ ॥
न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥ १-३२ ॥
अन्वय

कृष्ण = हे कृष्णा, विजयम्‌ = विजयाची, न काङ्क्षे = मला इच्छा नाही, च = तसेच, न राज्यम्‌ = राज्याची (इच्छा) नाही, च = आणि, सुखानि = सुखांचीही (इच्छा नाही), गोविन्द = हे गोविंदा, नः = आम्हाला, राज्येन = राज्याचे, किम्‌ = काय प्रयोजन आहे, वा = अथवा, भोगैः = भोगांचा, (च) = आणि, जीवितेन = जगण्याचा, किम्‌ = काय उपयोग आहे
अर्थ
हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखांचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? ॥ १-३२ ॥
येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥ १-३३ ॥
अन्वय

येषाम्‌ = ज्यांच्या, अर्थे = साठी, नः = आम्हाला, राज्यम्‌ = राज्य, भोगाः = भोग, च = आणि, सुखानि = सुखे (इत्यादी), काङ्क्षितम्‌ = अभीष्ट आहेत, ते = ते, इमे = हे (सर्वजण), धनानि = धन, च = आणि, प्राणान्‌ = प्राण (यांची आशा), त्यक्त्वा = सोडून, युद्धे = युद्धात, अवस्थिताः = उभे आहेत
अर्थ
आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे ठाकले आहेत. ॥ १-३३ ॥
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥ १-३४ ॥
अन्वय

आचार्याः = गुरुजन, पितरः = काका, पुत्राः = मुलगे, च = आणि, तथा एव = त्याचप्रमाणे, पितामहाः = आजे, मातुलाः = मामे, श्वशुराः = सासरे, पौत्राः = नातू, श्यालाः = मेहुणे, तथा = तसेच, सम्बन्धिनः = आप्त लोक, (सन्ति) = आहेत
अर्थ
गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत. ॥ १-३४ ॥
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥ १-३५ ॥
अन्वय

मधुसूदन = हे मधुसूदना, घ्नतः अपि = (मला) मारले तरी सुद्धा, (अथवा) = किंवा, त्रैलोक्यराज्यस्य = तीन लोकांच्या राज्याच्या, हेतोः = साठी, अपि = सुद्धा, एतान्‌ = या सर्वांना, हन्तुम्‌ = ठार मारण्याची, न इच्छामि = मला इच्छा नाही (मग), महीकृते = (या) पृथ्वीसाठी (तर), नु किम्‌ = काय सांगावे
अर्थ
हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारु शकत नाही. मग या पृथ्वीची काय कथा? ॥ १-३५ ॥
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान्‌ हत्वैतानाततायिनः ॥ १-३६ ॥
अन्वय

जनार्दन = हे जनार्दना, धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राच्या मुलांना, निहत्य = मारून, नः = आम्हाला, का = कोणते, प्रीतिः = सुख, स्यात्‌ = मिळणार, एतान्‌ = या, आततायिनः = आततायींना, हत्वा = मारल्यावर, अस्मान्‌ = आम्हाला, पापम्‌ एव = पापच, आश्रयेत्‌ = लागेल
अर्थ
हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार? या आततायींना मारून आम्हाला पापच लागणार. ॥ १-३६॥
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्‌ स्वबान्धवान्‌ ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥ १-३७ ॥
अन्वय

तस्मात्‌ = म्हणून, माधव = हे माधवा, स्वबान्धवान्‌ = आपल्याच बांधवांना (म्हणजे), धार्तराष्ट्रान्‌ = धृतराष्ट्राच्या मुलांना, हन्तुम्‌ = मारण्यास, वयम्‌ = आम्ही, न अर्हाः = योग्य नाही, हि = कारण, स्वजनम्‌ = आपल्याच कुटुंबाला, हत्वा = मारून, कथम्‌ = कसे (बरे), सुखिनः = आम्ही सुखी, स्याम = होऊ
अर्थ
म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना, आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार? ॥ १-३७ ॥
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम्‌ ॥ १-३८ ॥
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्‌ ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥ १-३९ ॥
अन्वय

यद्यपि = जरी, लोभोपहतचेतसः = लोभाने बुद्धिभ्रष्ट झालेले, एते = हे (लोक), कुलक्षयकृतम्‌ = कुळाच्या नाशाने उत्पन्न झालेला, दोषम्‌ = दोष, च = तसेच, मित्रद्रोहे = मित्राशी द्रोह करण्यातील, पातकम्‌ = पाप, न पश्यन्ति = पाहात नाहीत, (तथापि) = तरी, जनार्दन = हे जनार्दना, कुलक्षयकृतम्‌ = कुळाच्या नाशामुळे उत्पन्न होणाऱ्या, दोषम्‌ = दोषाला, प्रपश्यद्भिः = जाणणाऱ्या, अस्माभिः = आम्ही, अस्मात्‌ पापात्‌ = या पापापासून, निवर्तितुम्‌ = परावृत्त होण्यासाठी, कथम्‌ = का (बरे), न ज्ञेयम्‌ = विचार करू नये
अर्थ
जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करू नये? ॥ १-३८, १-३९ ॥
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥ १-४० ॥
अन्वय

कुलक्षये = कुळाचा नाशामुळे, सनातनाः = सनातन (असे), कुलधर्माः = कुळधर्म, प्रणश्यन्ति = नष्ट होऊन जातात, धर्मे नष्टे = धर्माचा नाश झाल्यावर, कृत्स्नम्‌ = संपूर्ण, कुलम्‌ = कुळात, अधर्मः उत = पापसुद्धा, अभिभवति = मोठ्या प्रमाणात पसरते
अर्थ
कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. ॥ १-४० ॥
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ॥ १-४१ ॥
अन्वय

कृष्ण = हे कृष्णा, अधर्माभिभवात्‌ = पाप अधिक वाढल्याने, कुलस्त्रियः = कुळातील स्त्रिया, प्रदुष्यन्ति = अतिशय दूषित होतात, च = (आणि), वार्ष्णेय = हे वार्ष्णेया, स्त्रीषु दुष्टासु = स्त्रिया दूषित झाल्या असताना, वर्णसङ्करः = वर्णसंकर, जायते = उत्पन्न होतो
अर्थ
हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया, स्त्रिया बिघडल्या असता वर्णसंकर उत्पन्न होतो. ॥ १-४१ ॥
सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥ १-४२ ॥
अन्वय

कुलघ्नानाम्‌ = कुळाचा नाश करणाऱ्यांना, च = आणि, कुलस्य = कुळाला, सङ्करः = संकर (हा), नरकाय एव = नरकालाच घेऊन जाण्यासाठी (असतो), लुप्तपिण्डोदकक्रियाः = पिंड व पाणी यांच्या क्रियांना म्हणजे श्राद्ध व तर्पण यांना मुकलेले (असे), एषाम्‌ = यांचे, पितरः हि = पितरसुद्धा, पतन्ति = अधोगतीस प्राप्त होतात
अर्थ
वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. ॥ १-४२ ॥
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥ १-४३ ॥
अन्वय

वर्णसङ्करकारकैः = वर्णसंकर करणाऱ्या, एतैः दोषैः = या दोषांमुळे, कुलघ्नानाम्‌ = कुलघाती लोकांचे, शाश्वताः = सनातन (असे), कुलधर्माः = कुळधर्म, च = आणि, जातिधर्माः = जातिधर्म, उत्साद्यन्ते = नष्ट होऊन जातात
अर्थ
या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातिधर्म व कुळधर्म उध्वस्त होतात. ॥ १-४३ ॥
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥ १-४४ ॥
अन्वय

जनार्दन= हे जनार्दना, उत्सन्नकुलधर्माणाम्‌ = ज्यांचा कुळधर्म नष्ट झाला आहे अशा, मनुष्याणाम्‌ = मनुष्यांचा, नरके = नरकातील, वासः = निवास (हा), अनियतम्‌ = अनिश्चित काळापर्यंत, भवति = होतो, इति = असे, अनुशुश्रुम = आम्ही ऎकत आलो आहोत
अर्थ
हे जनार्दना, ज्यांचा कुळधर्म नाहीसा झाला आहे, अशा माणसांना अनिश्चित काळापर्यंत नरकात पडावे लागते, असे आम्ही ऎकत आलो आहोत. ॥ १-४४ ॥
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम्‌ ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥ १-४५ ॥
अन्वय

अहो = अरेरे, बत = किती वाईट, राज्यसुखलोभेन = राज्य व सुख यांच्या लोभाने, वयम्‌ = आम्ही (बुद्धिमान असूनही), यत्‌ = जे, स्वजनम्‌ = स्वजनांना, हन्तुम्‌ = मारण्यास, उद्यताः = तयार झालो आहोत, (तत्‌) = (ते म्हणजे), महत्‌ = मोठे, पापम्‌ = पाप, कर्तुम्‌ = करण्यास, व्यवसिताः = आम्ही तयार झालो आहोत
अर्थ
अरेरे! किती खेदाची गोष्ट आहे! आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो, हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे! ॥ १-४५ ॥
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्‌ ॥ १-४६ ॥
अन्वय

यदि = जरी, अशस्त्रम्‌ = शस्त्ररहित, अप्रतिकारम्‌ = प्रतिकार न करणाऱ्या (अशा), माम्‌ = मला, शस्त्रपाणयः = हातात शस्त्र घेतलेले, धार्तराष्ट्राः = धृतराष्ट्राचे पुत्र, रणे = युद्धामध्ये, हन्युः = मारतील, (तथापि) = तरी, तत्‌ = ते (मारणे), मे = माझ्यासाठी, क्षेमतरम्‌ = अधिक कल्याणकारक, भवेत्‌ = होईल
अर्थ
जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले, तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. ॥ १-४६ ॥
सञ्जय उवाच
एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत्‌ ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥ १-४७॥

अन्वय
सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, सङ्ख्ये = रणांगणावर, शोकसंविग्नमानसः = शोकामुळे मन उद्विग्न झालेला, अर्जुनः = अर्जुन, एवम्‌ = असे, उक्त्वा = बोलून, सशरम्‌ = बाणासह, चापम्‌ = धनुष्य, विसृज्य = टाकून, रथोपस्थे = रथाच्या मागील भागी, उपाविशत्‌ = बसला
अर्थ
संजय म्हणाले, रणांगणावर दुःखाने मन उद्विग्न झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात बसला. ॥ १-४७ ॥

अंतरंग – भगवद्गीता – विभूतियोग

शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ ख़ुदा नहीं।
मस्जिद ख़ुदा का घर है, पीने की जगह नहीं, काफिर के दिल में जा, वहाँ ख़ुदा नहीं।
काफिर के दिल से आया हूँ मैं ये देख कर, खुदा मौजूद है वहाँ, पर उसे पता नहीं।

संत नामदेव नित्य नेमाने विठ्ठलाशी संवाद करत असत. एकदा विठ्ठलाने त्यांना सांगितले की ‘जोपर्यंत तुझ्यावर गुरुकृपा होत नाही तोपर्यंत तुला निर्गुण निराकार भगवंताच्या वास्तविक स्वरुपाचे ज्ञान होणार नाही. तेव्हा तू विसोबा खेचर नामक गृहस्थांना भेट. ते तुला उत्तम दृष्टांत देतील.’ नामदेव जेव्हा विसोबा खेचरांना भेटायला गेले तेव्हा त्यांना विलक्षण दृष्य दिसले. विसोबा निवांतपणे पहुडले होते आणि त्यांचे पाय महादेवाच्या पिंडीवर विसावले होते. ते पाहून नामदेवांना सहाजिकच राग आला. ते पाहून विसोबा म्हणाले, “बाबा रे, वार्धक्यामुळे मला पाय उचलणेही कठीण जाते. तूच माझे पाय उचल आणि दुसरीकडे टेकव” नामदेवांनी विसोबांचे पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवले. परंतु तेथेही तेच झाले. पाय टेकताच त्याच्या खाली पुन्हा महादेवाची पिंड दिसायला लागली. नामदेवांना कळेना. हा जागा बदलण्याचा उद्योग चार पाच वेळा करुनही तोच परिणाम दिसायला लागल्यावर नामदेव विसोबांना शरण गेले. विसोबांनी त्यांना सांगितले की – ईश्वर हा सर्वव्यापी सर्वत्र आहे, मग पाय कोठेही ठेवल्याने काय फरक पडतो. फरक आपल्या दृष्टीचा आहे.

“चराचरातील भगवंताचे हे अधिष्ठान जाणणे म्हणजेच त्याच्या शक्तीचे/विभूतिचे स्वरुप जाणणे होय. ते जाणणारा भक्त भगवंताशी एकरुप होतो आणि भूतातेही भगवंताला प्राप्त करतो.”

विभूति हा शब्द पुरेसा जाणल्यास विभूतियोग जाणणे कठीण नाही. रुढार्थाने विभूति हा शब्द मोठ्या महान व्यक्तीसाठी वापरला जातो. परंतू विभूति शब्दाचा मूळ अर्थ विशेष शक्ती, सामर्थ्य किंवा तेज असा आहे. तेज जे सर्वकाही व्यापते.
अगदी साध्या शब्दात सांगायचे तर ‘वि म्हणजे विशेष’ आणि ‘भूत म्हणजे जीव, भूतमात्र किंवा आपण सारे’! त्यामुळे असा जीव ज्यात काही विशेष आहे त्याला विभूति असे म्हणायला हरकत नाही. असे काय आहे जे विशेष आहेच परंतू सर्व भूतमात्रात आहे? अर्थातच आत्मा, चैतन्य किंवा परमात्म्याचा अंश. म्हणूनच आपल्यातील परमात्म्याला जो जाणतो तोच चराचरातील भगवंतालाही जाणतो आणि म्हणूनच तर अशा ज्ञानी माणसाला वि-भूती म्हणले जाते. श्रीकृष्ण अर्जुनालाही हेच सांगतो की – जे जे उत्तम , उदात्त उन्नत आहे त्याच्या ठायी माझा भाव जाणणे म्हणजेच विभूति जाणणे. ते जे उन्नत उदात्त आहे ते स्वतः आणि ते जाणणारा व्यक्ती दोघेही विभूतिमत्वाला पोचतात.

(अशा उदात्ताच्या ध्यासातून मिळणारी मुक्ती किंवा मोक्ष हे प्रत्येक भूताचे ध्येय आहे. म्हणूनच तर सावरकरांनी मोक्ष आणि मुक्ती ही स्वातंत्र्यदेवतेची रुपे आहेत असे म्हटले आहे. केवळ इंग्रजांचे जोखड मानेवरून उखडून टाकणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे तर जे जे उत्तम, उदात्त आणि उन्नत आहे त्याचा ध्यास घेणे हे सावरकरांना अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य होते. विभूति कोणाला म्हणावे हे येथे स्पष्ट व्हावे!! असो)

मुण्डक उपनिषदापासून ते भागवतपुराणापर्यंत तत्वज्ञानाच्या अनेक ग्रंथात आणि अगदी किरातार्जुनीयासारख्या महाकाव्यातही ‘विभूति’ हा शब्द विशेष शक्ती, तेज किंवा परमात्म्याचा अंश याच अर्थाने वापरला आहे. श्रीकृष्णही अर्जुनाला आपल्या विभूतिंचा परिचय अनेक उदाहरणातून करून देतो.
येथे केवळ हे ध्यानात घ्यायचे आहे की ही उदाहरणे आहेत. याचा केवळ भगवंताने वर्णन केलेल्याच विभूतित त्याचे अस्तीत्व जाणवते आणि इतरात नाही असे नाही. विसोबांनी सांगितल्याप्रमाणे भगवंत सर्वाभूती सर्वव्यापी आहे केवळ साधकाला म्हणजे अर्जुनाला (आणि आपल्यालाही) समजण्यास सोपे जावे म्हणून वानगीदाखल घेतलेली नावे ही या अध्यायात येतात. भगवंताच्या विभूति योगाबद्दल पुढील भागात.
तळटीप
१. क्षेत्रज्ञ एता मनसो विभूति जीवस्य मायारचितस्य नित्याः।
आविर्हिताः क्वापि तिरोहिताश्च शुद्धो विचष्टे ह्यविशुद्धकर्तुः ॥ (भागवत – ५/१२)
२. यं यं लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान् ।
तं तं लोकं जयते तांश्च कामांस्तस्मादात्मज्ञं ह्यर्चयेत्भूतिकामः। (मुण्डकोपनिषद – ३.१.१०)
३. हित्वेतरान् प्रार्थयतो विभूतिः। यस्याङ्‌घ्रिरेणुं जुषतेऽनभीप्सोः।(भागवत – ५/१२/२०)
४. त्रीनत्यरोच उपलभ्य ततोविभूतिं लोकान् स मां व्यसृजदुत्स्मयतीं तदन्ते। (भागवत – १/१६/३५)
५. इत्युक्तवन्तं परिरभ्य दोर्भ्यां तनूजं आविष्कृतदिव्यमूर्तिः।<>br अघोपघातं मघवा विभूत्यै भवोद्भवाराधनं आदिदेश । (किरातार्जुनीय ११.८०)

Copyright https://sheetaluwach.com/2021 © #sheetaluwach

अंतरंग-भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग (अंतिम)

सातव्या अध्यायाच्या अंतिम श्लोकात, भक्तीचे आणि भगवंताच्या साक्षात्काराचे स्वरुप सांगत असताना, श्रीकृष्ण ‘अधिभूत’, ‘अधिदैव’ आणि ‘अधियज्ञ’ अशा संज्ञा वापरतो. त्यांचे अर्थ पुरसे न समजल्याने अर्जुन त्याला अध्यात्मासह सर्व संज्ञांचा अर्थ विचारतो. त्यामुळे आठव्या अध्यायात श्रीकृष्ण त्याला या सर्व संकल्पना विस्ताराने समजावून सांगतो. त्यानंतर अर्थातच तो आपली वि-ज्ञानाची चर्चा पुढे चालू ठेवतो. म्हणूनच ‘राजविद्याराजगुह्ययोग’ हा अध्याय खरंतर ज्ञानविज्ञानयोगाचा पुढील भागच म्हणायला हवा. या अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकात श्रीकृष्ण हे स्पष्ट करतो.

इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌॥
दोषदृष्टीरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने तू अ-शुभापासून मुक्त होशील.

ज्ञानविज्ञानात सांगितलेले विशेष ज्ञान असो किंवा त्याही आधी विषद केलेले ज्ञान आणि कर्मयोग, श्रीकृष्ण वारंवार त्याच तत्वांचा पुनरुच्चार करतो, उदाहरणे देतो. त्यामुळे अर्जुनाच्या मनातील शंका दूर होतात आणि आपल्याही!
नवव्या अध्यायात श्रीकृष्ण सांगतो की –
‘प्रत्येक युगाच्या अंती सर्व भूतमात्र मला येऊन मिळतात आणि नवीन युगाच्या आरंभी मी त्यांचे पुनः सर्जन करतो.’
येथे हे ध्यानात घेतले पाहीजे की – या श्लोकातील ‘मी’ हा सृष्टीकर्ता परमात्मा आहे. श्रीकृष्ण हे त्या परमात्म्याने धारण केलेले एक मूर्त रूप (अवतार) आहे.
येथे अवतार या शब्दाचा नीट अर्थ समजून घेणे उचित ठरेल. अव + तृ याचा अर्थ (खाली) उतरणे असा होतो. परमात्मा जेव्हा मूर्त रुपाने खाली (येथे भूलोकात) उतरतो तेव्हा त्यास अवतार असे म्हणतात. एका अर्थाने परमात्म्याच्या अंशरुपाने अवतीर्ण झालेले मूर्त रुप (अवतार) हे आपल्यासारखेच भूतमात्र आहे. कारण आपल्यातही त्याच परमात्म्याचा अंश आहे. म्हणूनच राम काय किंवा कृष्ण काय हे भूतलावर अवतीर्ण झाल्यानंतर सामान्य मनुष्याप्रमाणे जीवन व्यतीत करतात, सुखदुःख भोगतात. आपल्यात आणि त्यांच्यात फरक इतकाच की जे तत्व जाणायला आपल्याला अनेक जन्म लागतात ते तत्व त्यांना याच जन्मी उमगते. त्याप्रमाणे आयुष्य व्यतीत करून ते पुन्हा परमात्म्यात विलिन होतात.
श्रीकृष्णही अर्जुनाला हेच सांगतोय.

सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम्‌ । कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम्‌॥
हे कौन्तेया (कुंतीपुत्रा), कल्पाच्या (युगाच्या) शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो.

मी जरी त्यांना उत्पन्न करत असलो तरी या कर्माचे फल मला बाधत नाही. कारण हे सर्जन अत्यंत निष्काम वृत्तीनेच मी करतो. कर्मसिद्धांतानुसार फळाच्या अपेक्षेशिवाय, निष्काम वृत्तीने केलेल्या कर्माचे बंधन बाधत नाही. म्हणूनच श्रीकृष्ण पुढे म्हणतो की प्रत्येक भूतमात्र हे कर्माच्या फलस्वरुप माझ्यापासून उत्पन्न होतात. परंतु मी त्यांच्यात नसतो. कारण प्रत्येकाच्या कर्मफलानुसार त्याचे सर्जन होते आणि हे कर्म मी निष्काम भावनेने करतो.

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः॥
अव्यक्त (अशा) मी (परमात्म्याने) हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत. पण मी त्यांच्यामध्ये राहिलेलो नाही.

म्हणूनच जसा मी, कर्माच्या ठायी उदासीन असतो तसे उदासीन राहणारा व्यक्तीही जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्त होऊन मला येऊन मिळतो.परंतु याउलट हा भाव न जाणणारे मूढ लोक, अवतार घेऊन कर्म करणाऱ्या मला सामान्य मनुष्य समजतात. सकाम भक्ती करणारे लोकही याच प्रकारे कर्मबंधनाने बाधित होतात, असे श्रीकृष्ण म्हणतो.
ज्ञानविज्ञानयोगात श्रीकृष्णाने भक्तांचे चार प्रकार सांगितले आहेत. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासु आणि ज्ञानी. यातील सकाम भक्ती करणारे अर्थार्थी, आर्त आणि जिज्ञासु भक्त परमेश्वराला तत्वतः जाणत नाहीत. ते काही एक उद्दीष्ट्य समोर ठेवून भक्ती/उपासना करतात. म्हणूनच मग आपल्या कर्मासंबंधी उदासीनता प्राप्त होत नसल्याने जन्ममृत्युच्या चक्रात अडकतात. आपल्या कर्माच्या फलस्वरुप पुण्य प्राप्त करुन स्वर्गात जातात. पुण्यक्षय झाल्यानंतर पुन्हा मृत्युलोकात येतात.

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति। एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते।
ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्युलोकात येतात. अशा रीतीने तिन्ही वेदात सांगितलेल्या, सकाम कर्मांचे अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये-जा करीत असतात. (अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्युलोकात येतात.)

अतिशय साधे परंतु परिणामकारक तत्व येथे श्रीकृष्ण सांगतो. जो ज्याची इच्छा, कामना किंवा भक्ती करतो तो त्या गतीला प्राप्त होतो.

(आपला शाहरुख ते …कायनात वगैरे वाल्या शेरात तरी दुसरे काय सांगतो म्हणा :P)

यान्ति देवव्रता देवान्पितॄन्यान्ति पितृव्रताः । भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्‌।
देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही.

अशाप्रकारे जे ज्याचे उपास्य दैवत तो त्या गतीला पोचतो. भौतिक सुख हवे तर त्याची उपासना करा, वस्तु किंवा पद हवे तर त्याची. व्यक्ती जसे आणि जितके प्रयत्न करेल त्यानुसार फळ त्याला मिळेल यात शंका नाही.
मग जर परमात्म्याला प्राप्त करायचे तर भक्तीही परमात्म्याचीच करायला हवी!

तानसेनाची एक सुंदर कथा आहे.
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने तानसेन दरबाराला मोहून टाकत असतो. अकबराला असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन त्या तुलनेत काहीच नाही. माझ्या गुरुंचे गाणे हे अलौकीक असा साक्षात्कार देणारे गाणे असते. मी त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. अकबराच्या हट्टापायी दोघेही तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेत गुरुदेवांची भेट घडते. एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय आणि निसर्गासह आपल्या शरीरातील कणन् कण केवळ गाणं ऐकतोय असा अलौकिक अनुभव अकबराला येतो! संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव निघुन गेलेले असतात. सहाजिकच अकबर तानसेनाला विचारतो की अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो, “मी भूतलावरील अनेकांपैकी एका राजाला प्रसन्न करण्यासाठी गातो तर माझे गुरुदेव हे एकमेवाद्वितीय अशा अनन्य भगवंताला प्रसन्न करण्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला! जो ज्याची उपासना करतो त्याला तशी गती प्राप्त होते.

येथे शेवटचे वाक्य नीट समजून घेतले पाहीजे. अनेकदा असे सांगितले जाते की खुप पुण्य केले की मोक्ष प्राप्ती होते. हे अर्धसत्य आहे. पुण्याची प्राप्त केल्याने उत्तम गती प्राप्त होते कारण ते एक चांगले कर्म आहे. चांगले कर्म चांगली गती असे साधे सूत्र आहे. म्हणून मग पुण्यात्मा स्वर्गस्थ होईल आणि पुण्यक्षय झाला की पुन्हा भूलोकी जन्म घेईल. पाप पुण्य, सुखदुःख किंवा चांगले वाईट हे परस्परविरोधी अवस्था दाखविणारे हे भोग आहेत. पाप केलं दुःख प्राप्त होते, पुण्य केले सुख प्राप्त होते. मोक्ष याच्या पलिकडे आहे. मोक्ष म्हणजे पाप आणि पुण्य या दोन्हीच्याही पुढची अवस्था आहे. म्हणून त्याच्या विरुद्धार्थी अवस्थाच नसते! परमात्म्याची प्राप्ती ही अनन्यसाधारण अवस्था आहे म्हणूनच त्याची भक्ती ही अनन्यभावनेनेच केली पाहीजे.
हे झाले सकाम भक्तीबद्दल…
श्रीकृष्णाला आवडणारा ज्ञानी भक्त मात्र भगवंताचे अनन्य स्वरुप जाणतो आणि त्याची निष्काम उपासना करतो. त्यामुळे कर्माची बंधने टाळून परमगती प्राप्त करतो.

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः । भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्‌।
परंतु हे पार्था, दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षरस्वरूप जाणून अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात.

म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतो की जे अशा प्रकारे अनन्यभावाने माझी भक्ती करतात त्यांना त्यांची योग्य गती मी प्राप्त करून देतो.

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌।
जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावाने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.

योगक्षेमम् वहाम्यहम्। या उक्तीचा असा अर्थ घ्यायचा आहे.
अशाप्रकारे ज्ञानविज्ञानयोगात प्रारंभ केलेले परमात्म्याच्या साक्षात्काराचे विवेचन येथे नवव्या अध्यायात श्रीकृष्ण पूर्ण करतो.

मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः।

परस्परविरोधी वाटणारे परंतु कर्मसिद्धांताचे समर्थन करणारे हे तत्व जाणणे ही खरी श्रेष्ठ विद्या आहे म्हणून याला राजविद्या असे म्हटले आहे. पाप पुण्याच्या कोष्टकातील सकाम भक्तीच्याही पुढे जाऊन निष्काम भावनेने परमात्म्याची भक्ती केल्यासच त्याची प्राप्ती होते हे खरे गुह्य (गुपित किंवा गुढ तत्व) म्हणूनच या अध्यायाचे नाव राजविद्याराजगुह्ययोग असे ठेवले आहे.

**गंमतीचा भाग असा की राजगुह्य या शब्दाचे दोन्ही भाग हे एकमेकांचे हिंदी आणि मराठी प्रतिशब्दच आहेत.

असो भगवंताच्या साक्षात्काराबद्दल पुढील भागात.

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

Copyright https://sheetaluwach.com/2021 © #sheetaluwach

अंतरंग-भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

अध्याय नववा

बघता बघता, भगवद्गीतेचे अंतरंग समजून घेण्याच्या प्रयत्नात आता आपण जवळपास अर्धे अंतर पार केलं. १८ अध्यायांच्या गीतेच्या मध्यभाग म्हणजे नववा अध्याय असं मानायला हरकत नाही. (याच अध्यायातील १३ वा आणि १४वा श्लोक हे गीतेच्या मध्यभागी येतात. त्याबद्दल पुढे कधीतरी) ‘राजविद्याराजगुह्ययोग’ असे भले मोठे नाव असणारा हा अध्याय, अक्षय कुमारच्या ओह माय गॉड (Oh My God) या सिनेमामुळे अचानक प्रकाशात (मराठीत – लाईमलाईट!) आला. या सिनेमात परेश रावल आपल्या युक्तीवादात नवव्या अध्यायातल्या आठव्या श्लोकाचा उल्लेख करतो. त्यामुळे या अध्यायाच्या वाचकात अचानक वाढ झाली! पण मग लोक केवळ या अध्यायाचेच भाषांतर किंवा निरुपण वाचून गीतेत ‘…असे म्हटले आहे’ किंवा ‘…तसे म्हटले आहे’ असे सांगायला लागले. गंमतीचा भाग असा की बाकीचे अध्याय सोडून एकदम नवव्या अध्यायात जे म्हटले आहे त्याचा अर्थ लावल्याने समजापेक्षा गैरसमज अधिक फोफावले!

जिना चढताना एकदम नववी पायरी घ्यावी आणि पाय अवास्तव ताणल्याने पडावे किंवा अवघडावे तशी अनेकांची अवस्था झाली! आपण आधी पाहिल्याप्रमाणे गीतेच्या १८ अध्यायांचा सोपान ही अतिशय जाणीवपूर्वक रचलेली विचारांची साखळी आहे. कोणत्याची श्लोकाचा त्याच्या आधीच्या आणि चालू अध्यायाच्या योग्य संदर्भाशिवाय उल्लेख केल्यास त्याच्या अर्थाचा विपर्यास होण्याचा धोका असतो. हे आपण मागच्या अध्यायात पाहिलेच आहे. (पहा – अक्षरब्रह्मयोग). या अध्यायातही अशी उदाहरणे मिळतील. वानगीदाखल नवव्या अध्यायातले एक उदाहरण घेऊ.
आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला एलआयसी (LIC) चे बोधवाक्य ठाऊक आहे.
योगक्षेमं वहाम्यहम्।।
या उद्गारांचा शब्दशः अर्थ –
‘मी (अहम्) उपजिविकेचा भार (योगक्षमम्) वहन करेन (वहामि)’
असा होतो.याचा अर्थ तुमच्या उपजिविकेचा भार एलआयसी वाहणार आहे. आता हे बोधवाक्य वाचून जर प्रत्येकजण एलआयसीच्या दारात उभा रहायला लागला तर त्याला काय म्हणावे!!?
हे बोधवाक्य आहे. त्यातून बोध घ्यायचा आहे गैरसमज नव्हे. बोध घ्यायचा तर त्या वाक्याचा ससंदर्भ अर्थ ध्यानात घ्यायला हवा.
पूर्ण श्लोक असा आहे

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‌।
जे अनन्य प्रेमी भक्त माझे (परमेश्वराचे) निरंतर चिंतन करीत (मला) निष्काम भावाने भजतात, त्या नित्य चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.

म्हणजे काय, तर जे लोक नित्यनियमितपणे एलआयसीची भक्ती करतात (पॉलिसीचे हप्ते भरतात) त्यांच्या उपजिविकेची काळजी एलआयसी करेल. जे अर्थातच खरे आहे. पण केवळ अर्धेच वचन वाचून त्याचा अर्थ घ्यायला जाणाऱ्याची फजिती होणे सहाजिकच नाही का?
(पुलंना घर दाखवणारा कुळकर्णी जेव्हा ‘हा वर जायचा रस्ता! ’ असे म्हणतो तेव्हा घर दाखविण्याचा संदर्भ लक्षात न घेता अर्थ घेतला तर भलताच समज व्हायचा… (पहा – मी आणि माझा शत्रुपक्ष)

आता सिनेमातल्या श्लोकाकडे पहा

प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः । भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्।
आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूतसमुदायाला मी वारंवार उत्पन्न करतो.

येथे ‘मी उत्पन्न करतो’ इतकाच अर्थ घेऊन ‘सृष्टीची उत्पत्ती आणि नाश भगवंताच्या इच्छेने होतो’ असे म्हणणे हे केवळ अर्धसत्य झाले. व्यक्तीच्या कर्मानुरुप गती त्याला प्राप्त होते हे श्रीकृष्णाने आधीच्या अध्यायात सांगून ठेवले आहे. तसेच या आधीच्या सातव्या श्लोकात (९-७)

‘कल्पाच्या किंवा युगाच्या आरंभी संपूर्ण भूतमात्र माझ्यात विलिन होते आणि मी त्याचे पुनः सर्जन करतो’

असेही श्रीकृष्ण सांगतो. याचा अर्थ व्यक्ती जसे कर्म करेल तसे फळ त्याला मिळेल.
संपूर्ण सृष्टीचक्राला हा नियम लागू पडतो. जरूरीपेक्षा जास्त वाढलेली वृक्षाची फांदी बुंध्याला वजन न पेलल्यामुळे तुटुन पडते. आवश्यकतेपेक्षा जास्तीचे अतिक्रमणाने निसर्गाचा समतोल ढळतो व त्याच्या परिणामस्वरुप नैसर्गिक आपत्ती येते. म्हणूनच बेसुमार वृक्षतोड, खाणकाम किंवा प्रदुषण करणाऱ्या माणसांच्या समुहाला पूर, ज्वालामुखी, भूकंप किंवा त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागते हे त्याच्या स्वतःच्या कर्माचे फळ नव्हे काय? तेथे ईश्वराच्या शक्तीला दोष देणे, तेही एका वेगळ्या काढलेल्या श्लोकाच्या संदर्भाने, हे अयोग्य आहे.
मौजेचा भाग म्हणजे सिनेमाच्या अंतिम भागात प्रत्यक्ष देवच माणसाच्या मूर्खपणाचे वाभाडे काढतो. श्रीकृष्ण (कुमार अक्षय!) श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला भेद सांगतो. धर्माच्या नावाखाली मानवाने देवावर कसे अतिक्रमण केले हे तो दाखवून देतो. म्हणूनच मग सृष्टीच्या सर्जनामागचे मूळ तत्व एकच आहे हे विसरून अनेक धर्म, अनेक पंथ आणि अनेक देव(!) कसे निर्माण केले जातात, याच निर्मात्यांचे भाऊबंद असणारे उरलेले मानव याला कसे बळी पडतात हेही तो सांगतो! जे श्लोकाचा, धर्मग्रंथाचा आणि पर्यायाने ईश तत्वाचा विपरीत अर्थ खरा समजून अंधश्रद्धेत गुरफटून जातात. त्यांच्या विनाशाला ते स्वतः च कारणीभूत ठरतात देव नाही.
सिनेमात शेवटी श्रीकृष्ण जे सांगतो ते गुपित म्हणजेच राजविद्या-राजगुह्य-योग. त्याबद्दल अधिकचे पुढील भागात…

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)

मग पिकलिया सुखाचा परिमळु । कीं निवालिया अमृताचा कल्लोळु ।
तैसा कोंवळा आणि रसाळु । बोलु बोलिला॥

प्रत्ययकारी शब्द आणि प्रेमळ भाव दोन्ही प्रकट करणाऱ्या श्रीकृष्णाच्या वाणीचे ज्ञानदेवांनी केलेले हे वर्णन….
साधं ‘आणि कृष्ण पुढे म्हणाला’ असं लिहीणं आणि ‘सुखाचा परिमळु, अमृताचा कल्लोळु’ म्हणणं यातील अनुभवाचा फरक ज्याला कळला त्याला ब्रह्म अक्षर असते आणि अक्षर ब्रह्म असते हे दोन्ही पटावे!!
ब्रह्म आणि अध्यात्म यांचे अर्थ स्पष्ट केल्यानंतर श्रीकृष्ण अधिभूत, अधिदेैव आणि अधियज्ञ या संज्ञांकडे वळतो.

अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम्‌ । अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर॥
उत्पत्ती-विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे अर्जुना, या शरीरात मीच अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे.

जर ब्रह्म अ-क्षर आहे तर जे क्षर आहे ते अधिभूत आहे.

तैसें असतेपण आहाच । नाहीं होइजे हें साच । जयांतें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां।
भूतांतें अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगें तरि दिसे । जे वियोगवेळे भ्रंशे । नामरूपादिक।

ज्ञानदेवांनी दोन ओळीत अधिभूताचे सुंदर वर्णन केलंय. पाच महाभूतांपासून जे बनते (पांच पांच मिळोनिया). जे दृष्य आहे. ज्याला आपण पाहतो आणि नावाने ओळखतो (नामरुपादिक) ते नाशवंत (वियोगवेळे भ्रंशे) भूतमात्र म्हणजे अधिभूत.

अधिदैवत म्हणजे काय?

जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशीचा अध्यक्षु । जो देहास्तमनीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा।
जो परमात्माचि परि दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा । म्हणोनि स्वप्नींचिया बोरबारा । संतोषें शिणे।

अधिदैवताला ज्ञानदेवांनी दुसरा परमात्माच म्हटले आहे. अधिदैव म्हणजे इंद्रियांना कार्यरत करणारी शक्ती. डोळ्यांना दृष्टी, त्वचेला स्पर्श किंवा नाकाला गंध देणारे तत्व म्हणजे अधिदैव.

अधियज्ञ
अधियज्ञ म्हणजे मी स्वतः असे श्रीकृष्ण सांगतो.
येथे अधिभूत किंवा अधिदैव या कल्पना समजणे तितकेसे कठीण नाही. अधियज्ञ समजणे काहीसे अवघड आहे. मुळात त्यासाठी आधी ‘यज्ञ’ समजून घेणे अधिक आवश्यक आहे.

यज्ञ
सर्वसाधारणपणे यज्ञ याचे आपल्या डोळ्यासमोर उभे राहणारे चित्र म्हणजे एक चौकोनी वेदी आहे ज्यात अग्नि तेवत आहे आणि ऋषीमुनी त्यात वरुन पळीने तुप ओतत आहेत. धार्मिक टिव्ही सिरियलमध्ये वगैरे याच कृतीला यज्ञ म्हणतात!! हल्ली अग्निहोत्र नावाचा एक घरगुती यज्ञाचा प्रकारही प्रसिद्ध (मराठीत पॉप्युलर) होत आहे. हा यज्ञ आहे का तर याचे उत्तर नाही असे आहे. केवळ अग्निमध्ये आहुती देणे म्हणजे यज्ञ नव्हे. किंबहूना अग्नीमध्ये आहुती देणे ही एक प्रतिकात्मक कृती आहे यज्ञ नाहीच. हे प्रतिक आले कुठुन मग?
यासाठी पुन्हा अक्षरब्रह्माकडे वळावे लागेल. अग्निला संस्कृतात ‘पावक’ असा शब्द आहे. पावक याचा अर्थ पावन किंवा शुद्ध करणारा. आपल्याला हे माहिती आहे की – सोने शुद्ध करण्यासाठी त्याला अग्निमध्ये झाळतात. त्यामुळे त्यातील अशुद्ध तत्वे भस्मीभूत होऊन शुद्ध सोने प्राप्त होते. लोखंडही गाळून त्याचे पोलाद करताना शुद्धीकरणासाठी हाच अग्नि वापरतात. म्हणून कोणतीही गोष्ट शुद्ध करण्यासाठी, मग ते वातावरण का असेना, अग्निची योजना केली जाते. हे तथ्य आपल्या पूर्वजांना ज्ञात होते. म्हणूनच अग्नि आणि शुद्धीकरण (आहुती) यांचा संबंध जोडून यज्ञाचे प्रतीक निर्माण करण्यात आले. यज्ञ हा शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. मग ते वस्तु, वातावरण किंवा मनाचेही शुद्धीकरण असो. मन शुद्ध करणे किंवा शुद्ध मनाने किंवा उदात्त हेतूने केलेले कार्य म्हणजे यज्ञ….
म्हणूनच यज्ञाला यजुर्वेदात विश्वतोधार म्हटले आहे.

स्व॒र्यन्तो॒ नापे॑क्षन्त॒ आ द्या रो॑हन्ति॒ रोद॑सी । य॒ज्ञं ये वि॒श्वतो॑धार॒ सुवि॑द्वा सो वितेनि॒रे।

निघण्टुत यज्ञाची १५ अर्थपूर्ण नावे/प्रकार येतात.
यज्ञः, वेनः, अध्वरः, मेधः, विदर्थः, नार्यः, सवनम्, होत्रा, इष्टिः, देवताता, मखः, विष्णुः, इन्दुः, प्रजापतिः, धर्मः इति पञ्चदश यज्ञनामानि।।

(**जाता जाता हे सांगायला हरकत नाही की यातील ‘अध्वरः’ या शब्दाचा अर्थ तैत्तिरिय ब्राह्मणात अहिंसा असा दिलाय. यज्ञ हिंसेचे समर्थन करत नाही हे ध्यानात यावा हा हेतू)

कर्मयोगात म्हणूनच श्रीकृष्ण निष्काम कर्माला यज्ञाची उपमा देतो किंबहुना कर्म हे यज्ञ समजून इदं न मम या भावनेने केल्यास त्याचे बंधन लागत नाही असे म्हणतो ते याच अर्थाने. सगळ्या निसर्गाच्या चक्राचा आधार हे असे यज्ञकर्म किंवा कर्मयज्ञ आहे हे ही तो सांगतो. (पहा कर्मयोग)

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः।।
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ । तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्।

आता अधियज्ञ म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर हे समजणे कठीण जाणार नाही!
जीव आणि अजीव या दोन्हीच्याही द्वैतातून ही सर्व सृष्टी निर्माण झाली. या दोन्हीच्याही सहाय्याने सृष्टीचे सर्जन करणारा मी या दोन्हीच्याही पलिकडे असणारे तत्व आहे. जीव आणि अजीवाचे वास्तविक स्वरुप जाणून घेणाराच त्या दोन्हीच्याही पलिकडे असणारे तत्व जाणू शकतो. अधियज्ञ हा वास्तविक यज्ञ मानला तर अधिभूत आणि अधिदैव या त्यातील आहुती आहेत.
साधे उदाहरण घेउ भक्त पायाने चालत देवदर्शनाला जातो. येथे भक्ताचे पाय हे ‘अधिभूत (जड तत्व)’ आहे. देऊळ जेथे देवाचे वास्तव्य (शक्ती/चैतन्य) आहे ते गन्तव्य स्थान हे ‘अधिदैव’ आहे. प्रत्यक्ष देवाचा साक्षात्कार हा ‘अधियज्ञ’ आहे. आता देवळात गेल्यावर आपल्याला जे पवित्र, शुद्ध आणि सात्विक वगैरे वाटते ते अव्यक्त असते. केवळ देवळात गेल्यावरच तसा अनुभव यावा का? देव तर सगळीकडे आहे. प्रत्यक्ष आपल्यातही आहे. मग पावित्र्य, सात्विक भाव हे आपल्याच अंतरी आहेत याची जेव्हा जाणीव होते तेव्हा जड आणि चैतन्य दोन्ही तत्वांच्या पार दिसायला लागते. जणु त्यांची आहुती पडते, बुद्धी शुद्ध होते आणि अधियज्ञ साकार होतो. म्हणजे आपल्याला आपल्यातीलच परब्रह्माची जाणीव होते.
अधियज्ञ म्हणजे मी स्वतः हे श्रीकृष्ण म्हणतो ते या अर्थाने. अधि-आत्म (अध्यात्म) म्हणजे स्व-भाव जाणणे. अधियज्ञ म्हणजे स्वतःच स्वतःला पावन करणारा यज्ञ.
आता राहीला अर्जुनाचा शेवटचा प्रश्न. प्रयाणकाली किंवा मरतेसमयी स्थिरमती व्यक्तीने काय जाणायचे आहे. उत्तर अगदी सोपे आहे. श्रीकृष्ण त्याला एक साधे तत्व सांगतो.

यं यं वापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम्‌ । तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः।
हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला त्याला तो जाऊन मिळतो. कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो.

मनुष्य अनन्यभावनेने ज्या गोष्टीचे चिंतन करत असतो तो अंतिमतः त्या अवस्थेला जाऊन मिळतो.
मराठीत एक छान म्हण आहे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस… ज्या व्यक्तीच्या मनात भीती असते त्याला सतत त्याचेच प्रतिबिंब आजूबाजूला दिसते. वरवर धाडसीपणाचा आव आणणारे असे कितीतरी शूर वीर आपण आजूबाजूला पाहतो! ज्याच्या मनात शांत समाधानी भाव असतात त्याला आसमंतात त्याचाच प्रत्यय येतो. मग जो सातत्याने अनन्यभावाने परमात्म्याचे चिंतन करेल त्याला परमात्मा प्राप्त होणे सहाजिकच नाही का? तत्व साधे आहे. जसा भाव तसा देव! एकनाथ महाराजांचा एक सुंदर अभंग आहे.
भाव तोंचि देव ।ये अर्थी संदेह धरूं नका।
भाव भक्ति फळे भावें देव मिळे। निजभावें सोहाळे स्वानंदाचे।
भावचि कारण भावचि कारण ।यापरतें साधन नाहीं नाहीं।
एका जनार्दनीं भावाच्या आवडी ।मनोरथ कोडी पुरती तेथें।
म्हणूनच श्रीकृष्ण सांगतो की,

अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्‌ । यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः।
तस्मात्सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च । मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम्‌।

जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच संशय नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्वकाळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन-बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निःसंशय मलाच येऊन मिळशील.

(गंमतीचा भाग असा की या श्लोकांतील अनन्यभक्तीचा भाव वगळून केवळ ‘मामनुस्मर युध्य च’ हा भाग प्रसिद्ध करुन त्यायोगे गीतेत हिंसेचा प्रसार केला आहे असा भास करुन दिला जातो!! गीता किंवा एकूणच प्राचीन भारतीय वाङ्मयाच्या अयोग्य अन्वयार्थाबद्दल पुन्हा कधीतरी…..)

परमेश्वराच्या साक्षात्कार घडविणाऱ्या गीतेतील अध्यायांच्या गटातील अक्षरब्रह्मयोग येथेच संपन्न करुयात.

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – राजविद्याराजगुह्ययोग

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग

भगवद्गीता – अध्याय आठवा – अक्षरब्रह्मयोग

गीता शिकवत असताना हा प्रश्न अनेकदा विचारला जातो की श्रीकृष्णाने गीता सांगायला १८ अध्याय का घेतले? जे काही सांगायचं ते श्रीकृष्णासारख्या विद्वानाला थोडक्यात सांगता आलं नसतं का? दोन चार अध्यायात आटपायचं ना! असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. एखादे हसत खेळत गीता, किंवा सुलभ गीता गाईड वगैरे काहीतरी छापायला काय हरकत होती? आजच्या भाषेत सांगायचे तर एक छोटा युट्युब व्हिडीओ करायचा How to understand Gita in 5 minutes!!
सात आंधळ्यांची कथा आपल्यापैकी साधारण प्रत्येकाला माहिती आहे. जगभरातील जवळपास प्रत्येक संस्कृतीत ही कथा येते. कमी अधिक फरकाने या सर्व कथांचा मतितार्थही सारखाच आहे. हत्ती नक्की असतो कसा हे अनुभवण्यासाठी सात अंध व्यक्ती हत्तीला स्पर्श करून आपले मत मांडतात. ज्याच्या हाताला हत्तीचा जो अवयव लागतो त्याला हत्ती त्या आकाराचा असतो असे वाटते. कोणाला तो खांबासारखा तर कोणाला दोरी सारखा वाटतो इ. इ.
तात्पर्य काय की सातही आंधळ्यांना वाटलेले हत्तीचे स्वरुप हे अपूर्ण आहे. बरं सातही आकार जाणले म्हणजे हत्ती कळाला का? तर तसेही नाही. आकार हे केवळ एक परिमाण झाले. हत्ती जाणायाचा तर आकार, रंग, गंध, वृत्ती यासह सर्व बाजू जाणायला ह्व्यात. म्हणजेच माणसाला एखाद्या व्यक्तीचे, वस्तूचे किंवा घटनेचे खरे स्वरुप जाणून घ्यायचे असेल तर त्याला ते अनेक बाजूंनी समजून घ्यायला हवे. आपल्याला दिसणारी एकच एक बाजू म्हणजे सत्य नव्हे.
जैन दर्शनांतही ‘स्याद् वाद’ नावाचे एक अत्यंत उत्कृष्ट तत्व आहे. त्याला ‘अनेकान्तवाद’ असेही म्हणतात. स्याद्वादी म्हणतात प्रत्येक वस्तुमध्ये (यात सगळे आले) असंख्य गुणावगुण असतात. ज्याला जे गुण अनुभवास येतात तो त्या गुणांच्या आधारे ती वस्तु जाणतो. याचा अर्थ त्याला केवळ व्यक्तीसापेक्ष ज्ञान प्राप्त होते. या असंख्य गुणावगुणांसकट जाणायचे तर त्या वस्तुला सात विविध आयामातून पाहणे आवश्यक आहे. हे सातही आयाम विभिन्न परीस्थितीतून वस्तुच्या गुणावगुणांचे ज्ञान करून देतात.
सोप्या भाषेत सांगायचे तर कित्येकदा असा अनुभव येतो की आपण एखाद्या व्यक्तीला जसे समजत असतो त्याच्या अगदी विरुद्ध असे मत आपल्याला ऐकायला किंवा अनुभवायला मिळते. सार्वजनिक जीवनातल्या प्रसिद्ध व्यक्तींबद्दल आपण अनेक कथा, दंतकथा ऐकत असतो ज्यात एकात ती व्यक्ती नायक असते तर दुसऱ्यात खलनायक. वर्षानुवर्ष एखाद्याच्या संगतीत राहूनही ती व्यक्ती नक्की कशी आहे हे सांगणे कठीण जाते. कारण अनेकान्तवाद!!
संपूर्ण गुणावगुणांसकट एखादी व्यक्ती जाणणे इतके कठीण असेल तर मग प्रत्यक्ष गुणातीत परमेश्वराचे स्वरुप जाणणे किती कठीण असेल? गीता सांगायला श्रीकृष्णाने १८ अध्याय कशाला घेतले या प्रश्नाचे हे उत्तर आहे.
श्रीकृष्ण जसे सांगत जातो तसे अर्जुनाला त्या ज्ञानाचे वेगवेगळे आयाम दिसायला लागतात. त्यावर तो प्रश्न विचारतो आणि मग पुढील अध्यायात कृष्ण त्याचे निरसन करतो. विविध दृष्टिकोनांतून ज्ञान त्याच्यापुढे मांडतो. अशाप्रकारे अर्जुनाला ‘हत्ती’ सर्वबाजूंनी अगदी स्वभावासकट समजतो. आपल्यालाही ‘हत्ती’ जाणायचा तर अशाच प्रकारे प्रत्येक अध्यायातून तो वेगवेळ्या परिमाणातून जाणायला हवा.
गीतेच्या पहील्या सहा अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला स्व किंवा आत्मन् म्हणजे काय, तो कसा जाणायाचा, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्रता कोणती याचे तत्वज्ञान सांगतो. पुढल्या सहा अध्यायातून ते ज्ञान कोणत्या स्वरूपात प्रकट होते याचे वर्णन श्रीकृष्ण करतो. अनेक अंगांनी श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या स्वरुपाचे तसेच स्व किंवा आत्मन् मधील त्या स्वरुपाचा साक्षात्कार घडवतो. ज्याला आपण मागील अध्यायात विज्ञान म्हणालो. सात निरनिराळ्या कल्पनांच्या अनेकान्तवादातून विज्ञान समजून घेणे म्हणजे अक्षरब्रह्मयोग….. ज्ञानविज्ञानयोगाच्या अंतिम श्लोकात श्रीकृष्ण म्हणतो

साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः । प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः।।
जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसह (सर्वांच्या आत्मरूप अशा) मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात.

अर्जुनाला सहाजिक प्रश्न पडतो की अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ म्हणजे काय? आणि अंतकाळी जाणणे म्हणजे काय?
अक्षरब्रह्मयोगाला याच प्रश्नांपासून सुरुवात होते. अर्जुन विचारतो की

किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥
अधियज्ञः कथं कोऽत्र देहेऽस्मिन्मधुसूदन । प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः॥

तू ज्या संकल्पना वापरल्यास त्यांचे अर्थ सांग. ते ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव कोणाला म्हणायचे? अधियज्ञ म्हणजे काय आणि तो कोठे असतो? अंतकाळी चित्त स्थिर असणाऱ्या व्यक्तीने काय जाणायचे आहे?
(किती प्रश्न झाले? सात!!! आंधळ्यांची संख्या किती सात…. अनेकान्तवादातील आयाम किती सात……. धर्म, भूगोल किंवा नाव बदलले तरी तत्वज्ञांचे विचार हे अंतिमतः एकाच सत्याच्या दिशेने जातात याचे हे उत्तम उदाहरण आहे.)
अर्जुनाच्या सात प्रश्नांची श्रीकृष्णानी दिलेली उत्तरे हा या अध्यायाचा पहिला भाग आहे. दुसऱ्या भागात श्रीकृष्ण, ज्ञानी भक्ताचे आपले निरुपण, जे मागील अध्यायात सुरु केले होते ते पुढे नेतो आणि अंतिम काही श्लोकात परमगती प्राप्त करण्याच्या दोन मार्गांची चर्चा श्रीकृष्ण करतो.

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते। भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः॥
ब्रह्म हे परम (तसेच) अक्षर आहे. स्वभावाला अध्यात्म म्हणावे. भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो.

ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म या तीन संज्ञांचे अर्थ प्रथम श्रीकृष्ण सांगतो.
जे अक्षर आहे ते ब्रह्म आहे. क्षर आणि अक्षर असे दोन शब्द आहेत. यातला अक्षर आपल्याला माहिती आहे. मराठीत असे अनेक शब्द आहेत जे आपण बोलण्यात सहज वापरून जातो परंतु त्यांचे अर्थ खरोखर विलक्षण आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते! अक्षर हा असाच एक शब्द. क्षर याचा अर्थ नाशवंत किंवा ज्याला क्षय आहे असे. तर अक्षर याचा अर्थ ज्याचा नाश होत नाही किंवा जे शाश्वत आहे, अक्षय आहे.
आपल्याला माहित असलेले अक्षर तरी काय आहे. ज्याचा क्षर किंवा भाग पडत नाही ते. वर्णमालेतले कोणतेही अ-क्षर घ्या. जेव्हा आपण अक्षर म्हणतो तेव्हा त्याची अधिक फोड करता येत नाही. ते क्षर नसते म्हणून अक्षर…. म्हणूनच त्याचा उच्चार एका ध्वनीत होतो.
(येथे एक नवलाची गोष्ट सांगायला हरकत नाही. अमृताते पैजा जिंकणारी मराठी भाषा सांगणारी ज्ञानेश्वरांची वाणी अजरामर झाली कारण ती ऐसी अक्षरे रसिके मेळवीन म्हणते. येथे अक्षर शब्दावरचा श्लेष हा भाषा आणि अक्षय तत्व या दोन्ही अर्थाने वापरला जातो. ज्ञानेश्वरीची भाषा आणि ज्ञानेश्वरीतील ज्ञान दोन्ही अक्षर आहे हेच तर ज्ञानदेवांना सुचवायचे आहे. ज्ञानेश्वरीतील प्रत्येक शब्द किती विचारपूर्वक वापरलाय हे पाहिले की ज्ञानदेव योगीराज होते हे पटावे. असो)
सांख्ययोगात श्रीकृष्णाने सांगितलेल्या जीव-अजीवातील अजीव म्हणजे ब्रह्म.. कारण ते अक्षर आहे. त्याचे विघटन होत नाही त्याची फोड करता येत नाही. त्याचे कितीही भाग केले तरी ते सर्व ब्रह्मच रहातात. अर्धे किंवा पाव ब्रह्म होत नाहीत. अंशात्मक असो की पूर्ण, ब्रह्म हे सर्वथा आणि सर्वत्र पूर्णच असते. बृहदारण्यक उपनिषदातील ॐ पूर्णमदः पूर्णमिदं ही प्रार्थनाही हेच सांगते.
हे झाले ब्रह्म मग अध्यात्म काय आहे?
एकदा ब्रह्म काय आहे हे समजले की अध्यात्म समजणे कठीण नाही. अध्यात्म म्हणजे स्वभाव असे श्रीकृष्ण सांगतो स्व-भाव हा अजून एक वापरून बोथट झालेला शब्द….
स्वभाव म्हणजे वागण्याची रीत असा आपला वापरातला अर्थ आहे. वास्तविक स्व म्हणजे आपण स्वतः आणि भाव म्हणजे त्याच्या मागचे तत्व. जसे आपण भक्तीभाव किंवा आपपरभाव हे शब्द वापरतो. मग स्व च्या मागचा भाव कोणता? जो स्व ला भाव (जिवंतपणा) प्राप्त करून देतो तो. म्हणजेच चैतन्य किंवा आत्मतत्व. जे शरीराला चलायमान करतं. म्हणूनच मृत शरीराला स्व-भाव नसतो जिवंत शरीराला असतो. श्रीकृष्ण सांगतो अध्यात्म म्हणजे जड शरीर आणि चैतन्य यांचे द्वैत. ज्या तत्वाने या सृष्टीचे सर्जन झाले ते तत्व म्हणजे अध्यात्म. म्हणूनच अध्यात्म जाणायचे म्हणजेच स्वतःला जाणायचे. स्व-भाव जाणायचा. स्वतःला जाणा, तत्वमसि, Know Thyself वगैरे तत्वज्ञान जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेथे हाच अर्थ अभिप्रेत असतो असे श्रीकृष्ण सांगतो…..
अर्जुनाच्या उरलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात…..

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग (अंतिम)

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग

ज्ञानविज्ञानयोग

पाप पुण्य की शंका नाही, स्वर्ग-नर्क नही जाही।।
कहहि कबीर सुनो हो सन्तों, जहां का पद तहाँ समाई।।

अर्जुनविषादापासून आरंभलेला आपला प्रवास आता एक टप्पा पार करत आहे. आतापर्यंतच्या दहा भागात आपण भगवद्गीतेतील आत्मतत्व जाणण्याचा प्रयत्न केला. एका विशिष्ट क्रमाने श्रीकृष्ण संभ्रमावस्थेत असलेल्या अर्जुनाला उपदेश करतो. केवळ युद्धच नव्हे तर एकुणच आयुष्यात माणसाचा दृष्टीकोन कसा असावा याचे मार्गदर्शन या उपदेशाने प्राप्त होते.
माणसाचे आयुष्य हे एक निरंतर चालणारे द्वंद्वच आहे. दृष्य जगतातील बरेवाईट प्रसंग म्हणजेच ते द्वंद्व, असे मानून माणूस त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यामुळे केवळ एका पाठोपाठ एक अशा प्रसंगातून स्वतःला निभावून नेण्याचे कसब तो प्राप्त करतो. अखेर अनेक वर्षांच्या या अशा चकमकींनंतर त्याला हे उमगते की, ते युद्ध बाह्य जगाशी नसून अदृष्य अशा ‘स्व’शी आहे.
अर्जुनाला हीच जाणीव श्रीकृष्ण करून देतो. महाभारतात सतत युद्धे जिंकणाऱ्या अर्जुनाला कुरुक्षेत्रातही विजय मिळवण्याची खात्री असते. परंतु तरीही त्याला समाधान प्राप्त होत नसते. म्हणजे मग आपण आयुष्यभर केलेल्या युद्धांचे, युद्धकलेच्या अभ्यासाचे आणि एकुणच पार पाडलेल्या सर्व प्रसंगांचे फलित काय? जगण्यासाठीची धडपड करणाऱ्या लहानमोठ्या प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच की – जन्मापासून शिक्षण, व्यवसाय, कुटुंब, उपजिविका, मालमत्ता, या सगळ्यांसाठी सतत संघर्ष करूनही जर अल्पजीवी समाधान मिळत असेल तर नक्कीच ते समाधान या सगळ्यांत नाहीये. खरं समाधान अंतरी आहे जे द्वंद्व आपण लढलोच नाही!
गीतेच्या अभ्यासाला याच प्रश्नावर अर्जुनाची आणि आपलीही सुरुवात होते. मग युद्ध करण्यास तयार नसलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण सर्वप्रथम शरीर आणि आत्मा यांचे द्वैत समजावून सांगतो. देह नश्वर आहे आणि आत्मा शाश्वत आहे याचे ज्ञान करून देतो. मनुष्याचा केवळ कर्मावर अधिकार आहे त्याच्या फळावर नाही. त्यामुळे त्याने केवळ निःसंग वृत्तीने कर्म केले पाहीजे. त्यासाठी स्थिर प्रज्ञा हवी. अशी बुद्धी प्राप्त करण्यासाठी लागणारी संन्यस्त वृत्ती आणि त्यासाठीचा आत्मसंयम… अशाप्रकारे एकेका अध्यायातून आत्मज्ञानाची उतरंड श्रीकृष्ण अर्जुनाच्या समोर उभी करतो.
गीतेच्या अध्यायांची विभागणी करायची झाल्यास पहिले सहा अध्याय हा एक विभाग होईल. यात आत्मज्ञान किंवा स्वतःला जाणण्याची प्रक्रिया विस्तृतपणे मांडली आहे. माणसाच्या शाश्वत सुखाचा मार्ग अंतस्थ द्वंद्वात आहे आणि ते द्वंद्व कसे लढायचे याचे ज्ञान म्हणजे गीतेचा पहिल्या सहा अध्यायांचा विभाग. यात अर्जुनविषादाखेरीज सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यास,कर्मसंन्यास आणि आत्मसंयमयोगाचा समावेश होतो. आत्मज्ञान म्हणजे स्वतःतील ईशतत्व जाणण्याचे ज्ञान. अशा ज्ञानी व्यक्तीला हेच ईशतत्व आपल्यासह प्रत्येक चराचर सृष्टीत अंशरुपाने वास करून राहते याचा प्रत्यय येतो. दृष्य सृष्टी ही भगवंताच्या मायेचा भाग आहे. त्या मायेच्याही पलिकडे असणाऱ्या परमात्म्याचा साक्षात्कार होणे म्हणजे विज्ञान. प्राप्त ज्ञानाचा प्रत्यय येणे म्हणजे विज्ञानयोग.
ज्ञानविज्ञानयोगात भगवंत पदार्थातील आपल्या वास्तव्याचे स्वरुप समजावून सांगतात. आत्मज्ञान प्राप्त केलेल्या व्यक्तीला सृष्टीचे व्यापक स्वरूप जाणता येते. चराचर सृष्टीचे आधारभूत तत्व एकच आहे हे त्याला जाणवते. ज्याला आपण विज्ञान (विशेष ज्ञान) म्हणुयात. जे दिसते ते आणि जे असते ते या दोन गोष्टींची जाण असणे म्हणजे विज्ञान. असे भगवंत सांगतात. आपण Science (विज्ञान) म्हणतो ते तरी दुसरे काय सांगते! दृष्य पदार्थ आणि त्यामागचे तत्व.
आपल्या स्वरुपाचे वर्णन करताना श्रीकृष्ण परा आणि अपरा अशा दोन प्रकृतींचा उल्लेख करतो. अपरा म्हणजेच समोर दिसणारी. जे आपल्याला समोर दिसते आणि जे आपल्या मन आणि बुद्धीने जाणता येते त्याला अपरा म्हटले आहे.

(**जाता जात हे ही सांगायला हरकत नाही की परा किंवा परोक्ष म्हणजे मागे किंवा दृष्टीआड आणि अपरा किंवा अपरोक्ष म्हणजे समोर. आपल्याकडे मराठीत हाच अपरोक्ष शब्द सर्वस्वी उलट अर्थाने वापरला जातो!!)

पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारात विभागलेली दृष्य प्रकृती म्हणजे अपरा होय.

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च । अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा।

पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश या पंचमहाभूतांनी बनलेली दृष्य सृष्टी जी मन, बुद्धी आणि अहंकाराच्या माध्यमातून आपण जाणतो.
परा म्हणजे याच सृष्टीला गतिमान करणारे चैतन्य. जे आपल्याला दिसत नाही परंतु त्याचे अस्तीत्व जाणवते. परा म्हणजे दृष्टीच्या पलिकडे असणारे.

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्‌ । जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्‌।

साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास
जिवंत व्यक्ती डोळ्यांच्या माध्यमातून पाहते. हाच अवयव मृत व्यक्तीलाही असतो पण त्याला दिसत नाही. मग दोन्हीत फरक कशाचा आहे तर चैतन्याचा…
परा म्हणजेच आपल्याला न दिसणारी परंतु अस्तीत्व असणारी माझी प्रकृती आहे असे श्रीकृष्ण सांगतो. याची उदाहरणे देत म्हणतो – “मी पाण्यातील रस आहे ,अग्नीतले तेज आहे आणि चंद्रसूर्यातील उर्जा…..”

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः । प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु।

दृष्याच्या पलिकडची ही प्रकृती जाणणे हे विज्ञान आहे. श्रीकृष्ण म्हणतो सृष्टीतील परा किंवा चैतन्य म्हणजे माझाच अंश असल्याने सृष्टीचे सनातन कारण मीच आहे. मग हे जाणण्यात चुकते कुठे. माया…..
श्रीकृष्ण पुढे सांगतो या सृष्टीत मनुष्याला आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्ती या गोष्टींच्या आसक्तीत अडकतो आणि त्यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत राहतो. आसक्तीच्या पलिकडे जाऊन शाश्वत काय आणि नश्वर काय याचा विचारच बहुसंख्यांना पडत नाही. असे मोहावश लोक केवल प्राप्य वस्तूकडे पहात राहातात आणि दृष्याच्या पलिकडील चैतन्यस्वरूपाकडे पाठ फिरवतात. कृष्ण म्हणतो अशी ही अलौकीक माया तरून जाणे केवळ अशाच व्यक्तीला शक्य आहे जो अनन्यभावाने माझी निरंतर भक्ती करतो.

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते।

भक्त….
भक्तांचे चार प्रकार श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासु आणि ज्ञानी.

चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन । आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ।

अर्थार्थी हा काहीएक प्राप्तीसाठी भक्ती करतो, तर आर्त भक्त संकटात देवाला आळवतो, जिज्ञासु भक्त भगवंताला जाणण्यासाठी भक्ती करतो तर ज्ञानी भक्त मात्र अनन्य भगवंताचे स्वरूप तत्वतः जाणतो आणि त्या स्वरुपाची भक्ती करतो. म्हणून भगवंताला तो अधिक प्रिय आहे असे श्रीकृष्ण म्हणतो.
पण मग इतर भक्त गैर आहेत का? अर्थातच नाहीत. ज्यांचे देव वेगळे आहेत ते चुकत आहेत का? तर तसेही नाही. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात एक ऋचा आहे

इन्द्रं मित्रं वरुणमग्निमाहुरथो दिव्य: स सुपर्णो गरुत्मान्।
एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु:।

सत्य किंवा परमात्मा एकच आहे. त्याला लोक वेगवेगळ्या नावांनी संबोधतात.
श्रीकृष्ण सांगतो की काळाच्या ओघात धर्मामध्ये अनेक देव, देवता, अवतारांचा उगम झाला. जसे ऋग्वेदातही इंद्र, मित्र, वरुण यासारख्या देवता होत्या. परंपरेनुसार लोक यातील कोणत्या ना कोणत्या देवतेची भक्ती करत आले आहेत. हे अर्थार्थी, आर्त किंवा जिज्ञासु भक्त होत. जे आपल्या कामनापुर्तीसाठी कोण्या एका देवतेची प्रामाणिकपणे भक्ती करतात. यात गैर काहीच नाही. किंबहुना अशा भक्तांना त्यांच्या भक्तीनुसार योग्य ते फळही मी देतो. जेणेकरून त्या भक्ताची त्या देवतेमधील श्रद्धा दृढ होते.

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति । तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्।
‌ स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते। लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान्‌।

अशा भक्तांचा मार्ग हा किंचीत अधिक लांबतो. निरनिराळ्या नावाच्या मूर्त स्वरूपातील देवतांची भक्ती करणारा भक्तालाही शेवटी भगवद्स्वरूप एकच आहे याचा बोध होतो. दृष्य आणि नश्वर फल देणारा देवही अंतिमतः त्याच परमात्म्याचा अंश आहे हे जाणल्यानंतर मग तो भक्त सकाम भक्तीतून निष्काम भक्तीकडे वळतो.
ज्ञानी भक्ताला मात्र या नश्वर सृष्टीतला कोणताच लाभ नको असतो. या मायेपासून दूर रहात केवळ अनन्यभावनेने परमात्म्याची भक्ती करतो. म्हणून तो मला अधिक प्रिय आहे असे श्रीकृष्ण सांगतो.

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते । प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः।

अशाप्रकारे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या दृष्य सृष्टीतही भगवंताचे अंशात्मक अधिष्ठान आहे हे जाणणे म्हणजे ज्ञान आणि त्या सृष्टीचा मोह त्यागून तिच्या मायेपलीकडच्या भगवंताला जाणणे म्हणजे विज्ञान हे भगवंत स्पष्ट करतात.
अशा विज्ञानी भक्तीचे उदाहरणच कबीराच्या सुंदर शब्दात पाहूयात.

पंडित शोधि कहो समुझाई, जाते आवागमन नशाई।
अर्थ धर्म औ काम मोक्ष कहु, कौन दिशा बसे भाई।
उत्तर कि दक्षिण पूरब की पश्चिम, स्वर्ग पताल कि माहीं।
बिना गोपाल ठौर नही कतहुँ, नर्क जात धौं काही।
अनजाने को स्वर्ग नर्क है, हरि जाने को नाही।
जेहि डर से भव लोग डरतु है, सो डर हमरे नाही।
कहहि कबीर सुनो हो सन्तों, जहां का पद तहाँ समाई।

पोकळ शास्त्रचर्चा करणाऱ्याला कबीर म्हणतात हे पंडीता असे काही ज्ञान दे की ज्याने जन्ममरणाचे बंधन (आवागमन) नष्ट होईल. हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, स्वर्ग, नरक वगैरे मंडळी कोठे असतात बाबा? आम्हाला काय कळणार? जर तुझे हे ब्रह्म सर्वत्र आहे तर मग जिथे नास्तिक मंडळी जातात तो नरक कुठे असतो? बाबा रे जो अंतरीच्या ‘हरी’ ला जाणत नाही त्याला स्वर्गही नरकच आहे आणि जो त्याला जाणतो त्याला स्वर्ग काय आणि नरक काय!!!!! आम्हाला हे ठाऊक आहे की आमच्या अंतरंगात ‘तो’ आहे म्हणून आम्हाला ना स्वर्ग हवा ना नरक…..

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग १० पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग १०

अपि क्रियार्थं सुलभं समित्कुशं जलान्यपि स्नानविधिक्षमाणि ते।
अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।।

महादेवाच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करणाऱ्या पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मचाऱ्याच्या वेषात भगवान शंकर प्रकटतात. पार्वतीच्या घोर तपस्येकडे पाहून म्हणतात की ‘तपःसाधनेसाठी आवश्यक अशी सामग्री, स्नानासाठी पाणी इ. सोयी उपलब्ध आहेत ना? कारण तू हे जाणतेस की शरीर हे धर्म (येथे ध्येय) साध्य करण्याचे प्रथम साधन आहे.’
कालिदासाच्या कुमारसंभवातील पाचव्या सर्गात खरेतर मजेदार संवाद आहेत. परंतु नांदीचा हा श्लोक मात्र एक गंभीर बोधवाक्य बनून गेला! त्याचे कारण या श्लोकाचा अंतिम चरण

शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।।
शरीर हे धर्मसाधनेचे आद्य साधन आहे….

योगारूढ व्यक्ती आपल्या इंद्रियांवर पर्यायाने मनावर ताबा मिळवते त्याची सुरुवात ही अर्थातच ते मन ज्या शरीरात वास करते ते शरीर संयमन करुन होते.
भगवंत सांगतात की अर्जुना हा योग साध्य करण्यासाठी संयमनाची आवश्यकता आहे. जे व्यक्तीच्या सर्व शारीर क्रियांमध्ये प्रथम हवे. कारण

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः।
न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन।
हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला तसेच अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपणाऱ्या तसेच सदा जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही.

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा।
दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार-विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा-जागरण करणाऱ्याला साध्य होतो

‘अति सर्वत्र वर्जयेत्’ असे एक संस्कृत वचन आहे. श्रीकृष्णालाही हेच सांगायचे आहे. शरीर संयमन करणे म्हणजे शारिरीक क्रियातील अती ला दूर सारणे. आहार-अनाहार, निद्रा-जागरण यासारख्या क्रिया संतुलित केल्याने शरीर निरोगी आणि उत्साही राहते. असे शरीरच मग मन एकाग्र करण्याची साधना करू शकते.
अशा प्रकारे भौतिक आणि अधिभौतिकाचा सुंदर मेळ घालण्याचे कार्य श्रीकृष्ण करतो.
अनेकदा असा प्रश्न पडतो की मानवासहित निसर्गातील प्रत्येक घटक हा ईश्वराचीच देणगी असेल तर मग त्याचा अव्हेर करून संन्यासी बनण्यात काय हशील आहे? श्रीकृष्णाच्या लेखी योगी यातील कशाचाच अव्हेर करत नाही. रंग, रस, गंध,नाद या सर्व माध्यमातून जीवनातला आनंद योगीही लुटतोच परंतु त्याचे मन या कशाचाही आहारी जात नाही, अतिरेक करत नाही. बाह्य सृष्टीतील सुख आणि त्याचप्रमाणे दुःखही नश्वर आहे याची त्याला जाणीव असते. परमात्मप्राप्तीचा आनंदच केवळ शाश्वत असा आनंद आहे हे तो जाणतो आणि त्यासाठी जागरुकतेने प्रयत्न करतो.
भारतीय तत्वज्ञानाच्या बाबत असा एक गैरसमज पसरलेला दिसतो की त्यात केवळ संन्यस्त वृत्तीचा अंगिकार केलेला आहे. भौतिक किंवा गोचर सृष्टी म्हणजे माया आणि तिचा त्याग करणे म्हणजेच खरा संन्यासी होणे असा टोकाचा अर्थ घेतला जातो. भारत म्हणजे संन्यासी, साधू, अन्नपाणी त्यागून तपश्चर्या करणे, अस्थिपंजर झालेले योगी….. असेच चित्र रंगवले जाते.
श्रीकृष्णाचे मत या विचाराला छेद देते. वेदकालापासून प्रत्येक तत्वज्ञाचा दृष्टिकोन हा सृष्टीचे अंतर्बाह्य स्वरूप जाणण्याचा होता. ब्रह्म जाणणे केवळ अंगाला राख फासून साधू झाल्यानेच प्राप्त होते असे त्यांनी कधीच मानले नाही. आनंद देणा-या प्रत्येक तत्त्वाला त्यांनी जाणलं आणि त्याला ब्रह्म मानलं. जसं नादब्रह्म, अन्नब्रह्म, अक्षरब्रह्म… गायनाचार्य पलुस्करांच्या एक गोष्टीचा संदर्भ येथे पुन्हा देण्याचा मोह आवरत नाही.

एकदा गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर जंगलातून प्रवास करत असताना एका देवळात विश्रांतीसाठी थांबतात. तेव्हा तेथे एक संन्यासी येतो. संध्याकाळची वेळ असते. आपल्याच विश्वात रममाण झालेला तो संन्यासी गायला लागतो. पलुस्करांना असं जाणवतं की जिकडंतिकडं केवळ ते गाणंच भरून राहीलंय. सगळं जग मंत्रमुग्ध होउन केवळ ते गायन ऐकतंय आणि देउळ लख्ख प्रकाशाने भरून गेलंय. काही काळानंतर ते जेव्हा भानावर येतात तेव्हा गाणं संपलेलं असतं आणि तो प्रकाशही निवलेला असतो. त्या संन्यासाला पलुस्कर विचारतात की “असा अलौकीक प्रभाव पाडणारं गाणं मला शिकवाल का? मी यासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी संन्यासीसुद्धा व्हायला तयार आहे.” तो संन्यासी उत्तरतो – “संन्यासी झाल्यामुळे असं गाणं येणार नाही. पण असं गाणं आल्यावर तू आपसुकच संन्यासी झाला असशील!!”
येथे नादब्रह्माची उपासना करणारा गायक आणि परब्रह्माची उपासना करणारा संन्यासी दोघेही योगीच मानले गेले आहेत. कलाकारालाही आणि संन्यास्तालाही पथ्ये पाळून आणि अति टाळून योगी होता येते हेच श्रीकृष्णाला येथे सांगायचे आहे. एकाला साधनेसाठी शरीरनियमन आवश्यक आहे तर दुसऱ्याला रियाजासाठी! भगवत्प्राप्तीसाठी प्रत्येकाने संन्यास घेऊन जंगलाचाच मार्ग स्वीकारायला हवा इतका एकांगी विचार मांडण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली नाही.
हे अर्थातच सोपे नाही याची श्रीकृष्णाला जाण आहेच. अर्जुनही ती बोलून दाखवतो. सगळेच जण गायनाचार्य किंवा सिद्धयोगी होत नाहीत. प्रयत्न करुनही अनेकजण मनावर विजय मिळवू शकत नाहीत मग असे लोक मार्गातून विचलित होतात. त्यांना पापी समजायचे का?

अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।
अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥
कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि।।
जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे; परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योगसिद्धीला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो?भगवत्प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला पुरुष छिन्न-विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत?

अर्थातच नाही. आत्मोद्धारासाठी कर्म करणारी व्यक्ती अधोगतीला प्राप्त होत नाही. जरी तो आपल्या उद्दीष्ट्यापर्यंत पोचू शकला नाही तरी केलेल्या श्रेष्ठ कर्माच्या फलस्वरुप त्याला उत्तम गती प्राप्त होते आणि कालांतराने तो आपले ध्येय साध्य करतो असे श्रीकृष्ण सांगतो. कर्मसिद्धांताच्या तर्कानेही पाहिले तर हे पटावे की उत्तम कर्माची फलेही उत्तमच असतात. मग ते कर्म जर भगवत्प्राप्तीच्या उद्देशाने केले तर त्याचे फलस्वरूप सकाम कर्म करणारा भक्तही कालांतराने भगवंताशी एकरुप होतोच.
प्रत्येक मनुष्य मग तो सामान्य गृहस्थ असो, असामान्य कलाकार किंवा व्रतस्थ योगी आत्मसंयमनाच्या मार्गाने कोणीही भगवंताशी एकरुप होऊ शकतो हेच श्रीकृष्ण अर्जुनाला पटवून देतो. जीवनाचा आस्वाद घेत प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाणे हे खरे ज्ञान आहे कारण सर्वाभूती परमेश्वर आहेच म्हणूनच मग त्याचे स्वरुप कलेतून, तपस्येतून, कर्मातून किंवा निव्वळ भक्तीतूनही जाणता येईल. आवश्यक आहे तो त्या त्या मार्गावरील साधकाचा आत्मसंयम…….

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ९ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ९

राका व त्याची पत्नी बाका हे दोघे एका झोपडीत देवाची भक्ती करत आनंदाने रहात असतात. एके दिवशी रानात लाकडे गोळा करण्यासाठी फिरत असता राकाला एक सोन्याचे कंकण दिसते. राका विचार करतो की ‘आपण स्वतः तर मोहापासून दूर आहोत परंतु आपल्या बायकोला कदाचित याचा मोह होईल आणि ती आपल्याला हे कंकण घेण्याचा आग्रह करेल. तेव्हा आपण या कंकणावर माती टाकू यात म्हणजे मग तिला हे दिसणारच नाही आणि पुढचा प्रसंगही टळेल’. तो कंकणावर माती टाकू लागतो तेव्हा बाका तेथे येते आणि विचारते “हे तू काय करत आहेस?” राका सांगतो, “तूला मोह होऊ नये म्हणून सोन्याच्या कंकणावर माती टाकतो आहे.” बाका आश्चर्याने म्हणते, “म्हणजे तुला अजूनही सोने आणि माती वेगवेगळे दिसते तर!!”…..

अनासक्त कर्म करीत योग (ज्ञान) प्राप्त करणे म्हणजे कर्मयोग याची आता अर्जुनाला कल्पना आलेली आहे. तरीही त्याचे पुरेसे समाधान झालेले नाही. त्याच्या (आणि आपल्याही) आजूबाजूला अनेक लोक असे आहेत जे या मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात. योग्यायोग्य कर्म जाणणे, ते आचरणात आणणे, वृत्तीने अनासक्त राहणे आणि ज्ञानप्राप्ती करणे अशा निरनिराळ्या पायऱ्यांवर ते धडपडत असतात…. आपल्या गोष्टीतला राकासुद्धा असाच अजूनही संभ्रमातच आहे. वास्तविक त्याला मोहाचा स्पर्शही झालेला नाही परंतु अंतर्बाह्य निर्विकार वृत्ती अजूनही त्याच्या ठायी दिसत नाही.
अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की मग ज्याला ‘योगारुढ’ म्हणावे अशी अवस्था प्राप्त झालेला योगी कसा ओळखावा? मनोविजय दिसतो तितका सहजसाध्य नाही मग ज्याला तो साधला नाही त्याची गती काय होते? त्याच्या प्रयत्नांचे फलित काय?

आत्मसंयम……..

आपल्या उत्तरात भगवंत आत्मन्, संयम आणि संयमन अशी शब्दांची विभागणी करून अर्जुनाचे समाधान करतात.
सर्वप्रथम आत्मन् म्हणजे आपण स्वतः.. .
योगारुढ पुरुषाची त्याच्या मार्गावरील निष्ठा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. जोपर्यंत व्यक्ती आपल्या ध्येयाकडे निग्रहाने आणि अहर्निश वाटचाल करत नाही तोपर्यंत कोणत्याही बाह्य घटकाची मदत त्याला उपयुक्त ठरणार नाही.

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्‌। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः।
स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण मनुष्य हा स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे.

यशस्वी लोकात आणि इतरांत असणारा फरक हा या ‘आत्मन्’ चा आहे. ध्येयप्राप्तीची अनिवार ओढ असणे ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. भगवंत सांगतात की हीच व्यक्तीच्या यशाची गुरुकिल्ली आहे. भगवंताची अनिवार ओढ असणारा भक्तच त्याला प्राप्त करण्याचा मार्ग हरतऱ्हेने साधतो. ज्याला हा आत्मन् साधत नाही तो स्वतःचीच मदत करण्यात अपयशी ठरलेला स्वतःचाच शत्रु होय.
पुढचा टप्पा अर्थातच संयमाचा…. भगवंत सांगतात की स्वतःवर विजय मिळविणारा साधक भौतिक संसारातील चढ उतारांनी विचलित होत नाही. सुखात आणि दुःखात, लाभ आणि नुकसानातही शांत राहतो. एकाच निर्विकार वृत्तीने तो सोने आणि मातीकडे पाहू शकतो. कारण त्याच्या मनात त्याच्या ध्येयापलिकडे दुसरे काही नसते.

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः। युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः।
ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती व सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते.
परमात्मतत्वाचा स्पर्श झालेला असा व्यक्ती नित्य समाधानी असतो.

हे साधावे कसे? तर……….. संयमन

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता। योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः।
वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या चित्ताला दिली गेली आहे.

आपले चित्त जर दिव्याची ज्योत मानली तर त्याला विचलित करणारा वारा म्हणजे आपल्या इंद्रियांची ओढ! भगवंत सांगतात योगाभ्यासाने चित्त नियमन करता येते. एकांतात स्थिर आसनावर बसून मन एकाग्र करणारा योगी विचलित न होता कालांतराने शांततेचा अनुभव घेतो.

योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः।
मन व इंद्रिय यांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरिच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लीन करावे.
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः। उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये।
त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा.
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः। सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्‌।
शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून अन्य दिशांकडे न पाहता आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून स्थिर व्हावे.

येथे प्रत्येकाला चटकन् पडणारा प्रश्न अर्जुनालाही पडतो की मन हे अशाप्रकारे सहज ताब्यात येईल का? अर्थातच नाही. भगवंत सांगतात मनावर ताबा मिळविण्यासाठी ज्या शरीरात ते मन वास करते आधी ते शरीरही ताब्यात हवे……
त्यावरील श्रीकृष्णाचे विवेचन पुढील भागात…..

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ८ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग १०

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ८

अन्नमयादन्नमयमथवा, चैतन्यमेव चैतान्यात्| द्विजवर दूरीकर्तुम् वान्छसि, किम् ब्रूहि गच्छ गच्छेति।।

प्रातःकालचे गंगास्नान करुन देवदर्शनासाठी निघालेल्या शंकराचार्यांच्या मार्गात एक चांडाळ आपल्या कुत्र्यांसह आडवा येतो. सवयीने त्याला ‘दुर हो’ असे आचार्य म्हणतात. तेव्हा तो चांडाळ त्यांना प्रश्न करतो – “हे महात्मन् नक्की काय दूर करू? माझे शरीर? ते तर तुमच्यासारखेच पंचमहाभूतांनी बनलेले आहे आणि नश्वरही आहे. बरं शरीरस्थ चैतन्य/आत्मा दूर करू? तो तर तुमच्या माझ्यासकट सर्व विश्व व्यापून आहे मग त्याला त्याच्यातूनच दूर कसा करणार?” आपल्या सिद्धांताचे व्यावहारीक दर्शन घडवणाऱ्या त्या शब्दांनी भानावर आलेले शंकराचार्य त्या चांडाळातील ईशतत्व जाणून त्याला प्रणाम करतात.
या एका छोट्या कथेतून कित्येक गोष्टींचा उलगडा होतो!! चांडाळ असो वा आचार्य, कर्मयोगी असो वा संन्यासी, परमतत्वाचा स्पर्श झालेला प्रत्येक व्यक्ती समान असतो. त्यांच्या साध्याच्या आड त्यांच्या मार्गाचे भिन्नत्व येत नाही. चांडाळाला झालेले ज्ञान आणि संन्यस्त आचार्यांना झालेले ज्ञान हे एकाच परमेश्वराशी निगडीत आहे. प्राप्तीचा मार्ग भिन्न असणे हे त्यांच्या अंतःप्रेरणेशी निगडीत आहे पण त्यांचे साध्य एकच आहे त्यामुळेच त्यांनी अंगिकारलेले मार्गही तितकेच श्रेष्ठ आहेत. ज्ञान मोठे आणि कर्म गौण असा भेद येथे नाही.
आपल्यालाही असा अनुभव अनेकदा येतो जेव्हा एखाद्या सिद्धांतामागील तत्व उमगलेले असते परंतू व्यवहारात ती गोष्ट अंगिकारणे साधलेले नसते. साधे उदाहरण घ्यायचे तर रस्त्यावरील रहदारीच्या नियमांचे पालन!! हे नियम पाळणे हे प्रत्येकाला तत्व म्हणून पटलेले असते परंतू ते प्रत्यक्ष व्यवहारात आणणे जमत नसते. त्यासाठी अर्थातच प्रत्येकाची आपली कारणेही असतात. मग ते तत्व चुकीचे आहे असे मानायचे का? तर ते तर्काला पटत नाही. अशी मग गोंधळाची अवस्था माणसाला अनुभवाला येते. जे रहदारीच्या साध्या नियमांच्या बाबतीत खरे आहे ते आत्मज्ञानासारख्या दुष्प्राप्य गोष्टीत वेगळे कसे असेल? त्या बाबतचा गोंधळ अर्जुनाचाही होतो. मग येथे चुकते काय…..? तर तत्वावरील निष्ठा…. चांडाळाच्या शब्दांनी भानावर आलेले आचार्य त्याला प्रणाम करून अद्वैतावरील आपली निष्ठा सिद्ध करतात. बहुसंख्य व्यक्ती मात्र येथे गोंधळून जातात. काय करावे आणि काय करु नये हे ठरवता येत नाही. सोपा पण तर्काला न पटणारा मार्ग स्वीकारावा की कठीण पण शाश्वत कल्याण करणारा मार्ग स्वीकारावा? बहुतांशी लोक चटकन सोपा मार्ग स्वीकारतात आणि सिग्नल तोडून निघून जातात!! असे अनेक सिग्नल, प्रसंग, विचार चुकवून तर्काला मागे सारत एके दिवशी आयुष्यात अशा ठिकाणी येऊन पोचतात की जेथे तर्काला मागे सारणे अशक्य होते आणि वैचारीक गोंधळापेक्षा सिग्नलला थांबणे सोपे वाटायला लागते. अर्जुनही याच संभ्रमात आहे. कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे त्याला कर्माचे बंधन टाळून कर्म करायचे आहे पण मग त्यापेक्षा कर्मच टाळणे सोपे नाही का?
गीतेचा पाचवा अध्याय याच प्रश्नावर सुरु होतो. अर्जुन कृष्णाला प्रश्न करतो की एकीकडे कर्म टाकण्याचा उपदेश करतोस आणि कर्माची प्रशंसाही करतोस असे कसे. दोन्हीपैकी कल्याणकारक असे एक काहितरी सांग.

संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि । यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्‌।।

यावर कृष्णाचे उत्तर आजच्या परिस्थितीला सुसंगत असेच आहे. संन्यास आणि कर्मयोगात, कर्मयोग आचरण्यास सुलभ आहे असे कृष्ण सांगतो.
सर्वप्रथम आत्मज्ञानासारखे उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी निवडलेला मार्ग मग तो ज्ञान असो कर्म असो की भक्ती यात उणेअधिक काहीच नसते. ध्येय जितके उन्नत त्याच्या प्राप्तीचा मार्गही तितकाच श्रेष्ठ आहे असे आग्रही प्रतिपादन या अध्यायातून श्रीकृष्ण करतो. अर्थात व्यक्तीच्या परिस्थिती प्रमाणे मार्ग हे आचरण्यास सुलभ किंवा कठीण असू शकतात.

संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ । तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते।।

संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही कल्याणकारक आहेत. परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे.

श्रीकृष्णाच्या मते निष्क्रियता आणि निष्कर्मता यातील फरक जाणून खरी संन्यस्त वृत्ती अंगिकारणे हे प्रत्येकाला साध्य होणे कठीण आहे. त्यापेक्षा कर्मयोग आचरणात आणणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे अधिक सुलभ आहे. परंतु येथे हे नीट ध्यानात घेतले पाहीजे की कर्मयोग आणि संन्यस्त वृत्ती या दोन भिन्न गोष्टी असल्याचे समजणे हे मात्र चुकीचे आहे. कारण कर्मयोगी व्यक्ती शरीराने कर्म करत असते परंतु वृत्तीने संन्यस्त असते तर संन्यस्त व्यक्ती यातील कर्माच्या भागातूनही निवृत्ती पत्करते. त्यामुळे केवळ सर्वसंगपरित्याग करून अंगाला राख फासून ध्यानस्थ बसणे म्हणजेच संन्यास असे जर कोणी मानत असेल तर ते अयोग्य आहे. भगवंत पुढे असेही म्हणतात की संन्यस्त किंवा कर्मयोगी व्यक्तीला वेगवेगळी फळे मिळतात असे मानणेही मूर्खपणाचे आहे. दोन्हीतही मिळणारे फलित हे एकच असते. जो हे जाणतो तो खरा ज्ञाता.
मग कर्मयोगाला सुलभ म्हणायचे कारण काय? याचे विवेचन भगवंत पुढे करतात.

संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः। योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति॥

परंतु हे महाबाहो अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. भगवत्स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो.

इंद्रियांशी निगडीत कर्म करत राहणे परंतु त्या कर्माचे कर्तेपण स्वतःकडे न घेणे ही कला साध्य होणे अतिशय कठीण असते. त्यासाठी लागणारी साधना कर्मयोगाने सुलभ होते. व्यक्ती कर्माच्या बंधनाचे स्वरुप कर्म करता करता जाणायला लागते, आपल्या मनावर संयम प्राप्त करण्यास सक्षम होते आणि कालांतराने कर्म करूनही त्यापासून अलिप्त राहण्याचे ज्ञान प्राप्त करते.
आजच्या युगात व्यक्तीला शिक्षण, व्यवसाय, चरितार्थ, संसार आणि संगोपन अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडाव्या लागतात अशा वेळी आपले विहित कर्म प्रामाणिकपणे पार पाडणे त्याचवेळी मन कर्मफलाच्या बंधनातून मुक्त ठेवण्याचा यत्न करणे हे जास्त तर्कसंगत आहे असे भगवंत सांगतात. यातूनच कर्माचे कर्तेपण नाकारणे ही ज्ञात्याची अवस्था कर्मयोगीही प्राप्त करतो. फलाची आसक्ती नष्ट झाल्याने तो निरंतर मनःशांतीचा अनुभव घेतो आणि कमळावरील जलबिंदूप्रमाणे पापापासून अलिप्तही राहतो असे भगवंत सांगतात.

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः।लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा॥

अशा चिरंतन मनःशांतीचा अनुभव घेणाऱ्या ज्ञात्याला भगवंत योगी आणि मुनी अशा संज्ञा वापरतात. अशा व्यक्तीला बाह्य विषयांची आसक्ती नसते, काम आणि क्रोध यामुळे उत्पन्न होणारा आवेग आवरण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी असते. इच्छा, भय आणि क्रोध या विकारांना दूर सारून परमात्म्याचे ध्यान करणारा असा व्यक्ती सात्विक आणि अक्षय आनंदात लीन असतो असे श्रीकृष्ण प्रतिपादन करतो.

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्‌ । अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्‌॥

गीता वाचत/शिकवत असताना अनेक प्रश्न असे येतात की त्यातून प्रश्नकर्त्याची गोंधळाची अवस्था ध्यानात येते. पहिल्याच लेखात आपण असे म्हणालो होतो की – बहुसंख्य वाचक गीतेचा तयार उत्तराच्या (Instant Remedy) अपेक्षेने अभ्यास करतात. त्यातील ज्ञान समजून घेण्याचा पुरेसा प्रयत्न करतातच असे नाही. खरी मेख येथे आहे. गीता एका विशिष्ट दृष्टीकोनाचे समर्थन करत नाही. किंबहूना गीता केवळ योग्य दृष्टीकोन विकसित करण्याचा मार्ग सुचवते. त्यानुसार वागून योग्य तो मार्ग निवडणे हे अभ्यासकाचे कार्य आहे. गीतेत ज्ञानयोग, कर्मयोग या दोन्ही योगांवर भगवंताने भाष्य केलेले आहे. व्यक्तीने आपल्या अंतःप्रेरणेने आणि परिस्थितीनुरुप भगवत्प्राप्तीचा कोणताही एक मार्ग निवडणे अपेक्षित आहे. याचा अर्थ निवडलेला एक मार्ग योग्य आणि दुसरा अयोग्य किंवा आपल्यापेक्षा भिन्न मार्गाने जाणारे चूक असा घेतला जातो. हे अभ्यासातले अपरिपक्वतेचे लक्षण आहे. ज्ञानयोग उजवा आणि कर्मयोग उणा असे मानणे मूर्खपणाचे आहे असे गीता स्पष्टपणे म्हणते. आत्मज्ञ होण्यासाठी व्यक्ती कोणता मार्ग निवडते यापेक्षा त्या मार्गावरून किती निष्ठेने वाटचाल करते हे जास्त महत्वाचे आहे. मार्ग हा व्यक्तीपरत्वे भिन्न असणार यात शंकाच नाही. अचल राहते ती निष्ठा जी कर्ममार्गी व्यक्तीला इंद्रियनिग्रह आणि ज्ञानी संन्यासाला नैष्कर्म्याप्रत नेते. ज्ञानकर्मसंन्यास, कर्मसंन्यास आणि आत्मसंयमयोग हे याच दृष्टीकोनाचे समर्थन करतात.

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ७ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ९

Copyright sheetaluwach.com 2021 ©

वेदवाङ्मयाची थोरवी

If I were to look over the whole world to find out the country most richly endowed with all the wealth, power, and beauty that nature can bestow—in some parts a very paradise on earth—I should point to India. If I were asked under what sky the human mind has most fully developed some of its choicest gifts, has most deeply pondered on the greatest problems of life, and has found solutions of some of them which well deserve the attention even of those who have studied Plato and Kant—I should point to India.
And if I were to ask myself from what literature we, here in Europe, we who have been nurtured almost exclusively on the thoughts of Greeks and Romans, and of one Semitic race, the Jewish, may draw that corrective which is most wanted in order to make our inner life more perfect, more comprehensive, more universal, in fact more truly human, a life, not for this life only, but a transfigured and eternal life—again I should point to India.1 ………..Friedrich Max Müller

मॅक्सम्युल्लर ने केम्ब्रिज विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानातील या एका वाक्यातूनच वेद, वेदवाङ्मय आणि पर्यायाने भारतीय संस्कृतीचा प्रभाव किती क्षितिजांवर विस्तारला होता हे लख्खपणे दिसते. केवळ तत्वज्ञानच नव्हे तर साहित्य, संगीत, कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सर्व विद्याशाखांत मानवाने साधलेला समतोल पहायचा तर भारताकडे पहा असे तो म्हणतो. सर्वार्थाने पृथ्वीवरील स्वर्ग अशी उपमा भारतीय भूमीला तो देतो.
एक पाश्चात्य विद्वान प्राचीन भारतीय भाषा आणि वाङ्मयाची बाजू इतकी पोटतिडकीने मांडतो हे विस्मयकारक आहे. त्याहीपेक्षा ज्या अर्थी तो ही बाजू मांडतोय त्या अर्थी आपण जुनं म्हणून दुर्लक्षित केलेल्या वाङ्मय तितकं टाकाऊ नक्कीच नसणार. बरं ही भाषणं तो पुराणातल्या गोष्टी ऐकायला आलेल्या भजनी मंडळातल्या बायकांसमोर देत नाहीये. केम्ब्रिज सारख्या मान्यवर विद्यापीठाने इ.स. १८८० च्या दशकात खास आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील भाषणांत त्याने हे उद्गार काढलेत. व्याख्यान ऐकणारे श्रोते केवळ पुस्तकी प्राध्यापक नव्हते. भारतात नुकतीच स्थिरावलेली इंग्रजी सत्ता राबवणारे मंत्री, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी (Civil Servants) असे भारताशी प्रत्यक्ष संबंध येणारे आणि भारतात काम करणारे इंग्लिश लोकही त्यात होते.
भाषणात अनेक विषयांचा उल्लेख मॅक्सम्युल्लर करतो. जसे भूशास्त्र? (Geology), वनस्पतीशास्त्र (Botany), प्राणीशास्त्र (Zoology), मानवंशशास्त्र (Ethnology), पुरातत्वशास्त्र (Archaeology), नाणकशास्त्र (Numismatics), न्यायशास्त्र (Jurisprudence) आणि अर्थातच तत्वज्ञान (Philosophy). या आणि अशा अऩेक विद्यांच्या अभ्यासासाठी भारत ही एक मोठी प्रयोगशाळाच आहे. केवळ अभ्यासाचा विषय म्हणून नव्हे तर अनेक मार्गदर्शक तत्वांचा उगम या भूमीत होतो म्हणून भारताकडे पहावे असे तो सांगतो. इतकेच काय पण पाश्चात्य जगताच्या ज्ञानाचा उगम मानल्या जाणाऱ्या ग्रीसमधील्या अनेक बोधकथा, दंतकथा मूळच्या भारतीय बौद्ध आणि इतर संप्रदायातील असू शकतात असा तर्क तो मांडतो.
गेल्या आठ लेखात आपण वेद आणि वेदवाङ्मयाची ओळख करून घेतली. आपण हेही पाहिलं की केवळ अध्यात्म नव्हे तर ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा अनेक विद्या शाखांचा विचार आणि अभ्यास प्राचीन भारतीय ऋषीमुनी करत होते हे ही वेदवाङ्मयात दिसून येते. वेदकालीन ऋषींनी मानव जीवनाशी संबंधीत जवळपास सर्व विषयांवर भाष्य केलेले आहे. यात शिकारीपासून ते शेतीपर्यंत, युद्धापासून ते वैद्यकापर्यंत आणि यज्ञापासून ते ज्योतिषापर्यंत अनेकविध विषय कौशल्याने हाताळले गेले आहेत. इतके की त्या विषयांचे सखोल ज्ञान या ऋषींना होते हे सहज कळून येते.
पण मग वैद्यक, ज्योतिष, तत्त्वज्ञान वगैरे विषयांवरील ग्रंथ पाश्चात्य संस्कृतीतही आहेतच की! आजच्या लेखात आपण इतकंच पाहणार आहोत की विज्ञान आणि तंत्रज्ञानानी समृद्ध होणाऱ्या पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीत असा काय फरक आहे की ज्यायोगे आज हजारो वर्षानंतरही जगभरातील विद्वान त्या वाङ्मयाचा अभ्यास करतात? केवळ तत्त्वज्ञानच नव्हे तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकासारख्या अत्याधुनिक ज्ञानशाखातील संशोधकही कमी अधिक प्रमाणात वेदवाङ्मयाचा अभ्यास करतात. त्यांना मार्गदर्शक असे कोणते ज्ञान किंवा विचार वेदवाङ्मय पुरवते?
दृष्टिकोन……..
एखाद्या विषयाची पद्धतशीर हाताळणी करून त्याची वेगळी विद्याशाखा बनवणे आणि त्याचा काटेकोर अभ्यास करणे ही तर पाश्चात्यांची देणगी आहे. अगदी उदाहरण द्यायचे तर आधुनिक विज्ञानाची कोणतीही शाखा घ्या, जसे जीवशास्त्र (Biology) या विषयाची पद्धतशीर हाताळणी करून वनस्पतीशास्त्र(Botany), सूक्ष्मजीवशास्त्र(Microbiology), जनुकिय विज्ञान(Genetics) वगैरे विद्याशाखा पाश्चात्यांनी बनवल्या, त्याचे अभ्यासक्रम बनवले, पदव्या (मराठीत डिग्र्या!) निर्माण केल्या. वैद्यकातही डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाची वेगळी शाखा बनवली. अगदी चव आणि गंध निर्माण करणारी शास्त्रेही विकसित केली गेली. वैज्ञानिक प्रगती हे ध्येय समोर ठेऊन विभागशः अनेक विद्याशाखा पाश्चात्यांनी दिल्या. अशा वैज्ञानिक प्रगतीचा मुख्य उद्देश अर्थातच मानव जातीचे कल्याण हा होता. मग तो उद्देश साधला गेला का? खरंतर नाही.
विज्ञान जितके अधिक प्रगल्भ आणि प्रगत झाले तितकेच ते संहारकही झाले. मानवजातीचे कल्याण हा मूळ उद्देश बाजूला पडला आणि मानवजात किंवा विशिष्ट मानव समुदायाला इतर समुदाय आणि जीवजंतूंपेक्षा अधिक शक्तीमान बनवणे हा स्वार्थी उद्देश प्रबळ झाला. वर्चस्वाच्या हव्यासापोटी विज्ञानाच्या शाखांची इतकी अजस्त्र वाढ झाली की प्रत्येक शाखा मानवाच्याच नव्हे संपूर्ण जीवसृष्टीच्या मुळावर उठावी इतकी संहारक होऊ लागली. आधी अण्वस्त्रे, मग रासायनिक अस्त्रे(Chemical Weapons), जैविक अस्त्रे(Biological Weapons) आणि आता तर जनुकिय तंत्रज्ञान (Genetics) यासारख्या अत्याधुनिक आयुधांनी मानवाच्या सुखापेक्षा चिंताच अधिक वाढवल्या. निसर्गाचा घटक म्हणून जन्माला आलेला मानव निसर्गावरच विजय मिळविण्याच्या अघोरी मार्गाला लागला आणि आता ते थांबवणे त्याच्या स्वतःच्याही हातात राहिले नाही. वैज्ञानिक प्रगती हा देशागणिक मानवी संस्कृतींच्या स्पर्धेचा विषय बनला. या स्पर्धेत टिकण्याची आणि जिंकण्याची इर्षा इतकी पराकोटीला गेली की मानवानेच त्याच्या आणि पर्यायाने पृथ्वीच्याही संहाराची बीजे पेरली. परीणामी आज आपण प्रदूषण(ध्वनी, वायु, पाणी आणि विचारसुद्धा), अस्त्र-शस्त्र, रोगराई, विकृत-दहशतवाद अशा अनेक समस्यांनी घेरलो गेलो आहोत.
समतोल…….
वैदिक ऋषीमुनी हे जसे तत्त्ववेत्ते होते तसेच शास्त्रवेत्तेही होते. वैज्ञानिक प्रगती वेदकाळातही होत होतीच. परंतु भारतीय शास्त्रवेत्त्यांचे मोठेपण यात आहे की त्यांनी या प्रगतीचा आणि निसर्गाचा योग्य समतोल राखणे महत्वाचे आहे हे जाणले आणि प्रत्येक शास्त्र हे विकसित होताना त्यातून निसर्ग, पर्यावरण आणि व्यापक सृष्टीशी माणसाची नाळ तुटणार नाही याची खबरदारी घेतली. त्यांनी वैद्यक विकसित केले पण औषधांनी होणारे अनुषंगिक परीणाम (Side Effects) टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूनच. औषधी विकसित केल्या पण त्या नैसर्गिक तत्त्वांशी तादात्म्य बाळगून. त्यांनी आयुर्वेद हा निरोगी आयुष्य जगण्यासाठीचे शास्त्र म्हणून विकसित केला. रोगांवर इलाज करण्याची पॅथी म्हणून नव्हे. त्यामुळे आहार(Diet), व्यायाम(Exercise), साधना (Meditation) आणि औषधी(Medicine) अशा सर्व अंगांनी समतोल साधणारी ज्ञानशाखा म्हणून आयुर्वेदाकडे पाहीले जाते. याच प्रकारे योग असो ज्योतिष असो किंवा अध्यात्म…..
प्रगती साधताना तिची दिशा आणि ध्येय हे एका सूत्रात बांधून निसर्गाच्या सर्व घटकांच्या कल्याणाचे उद्दीष्ट्य साध्य करणे ही वेदवाङ्मय आणि पर्यायाने भारतीय शास्त्रांची देणगी आहे. विद्या, कला आणि तंत्र अतिरेकी अनियंत्रित आणि संहारक न होता विकसित करण्याचे तारतम्य वेदवाङ्मयाने जगाला शिकवले.
त्यामुळेच रसायनशास्त्र (Chemistry), पदार्थविज्ञान(Physics), वैद्यक(Medicine), जीवशास्त्र(Biology), वनस्पतीशास्त्र(Botany), धातुशास्त्र (Metallurgy) असो किंवा अगदी अणुविज्ञान (Automic Science), या सर्व शास्त्रांचा भारतीय भूमीतील उगम आणि विकास हा याच तत्त्वांना अनुसरुन झाला. तुकड्या तुकड्यात वेगवेगळी शास्त्रे म्हणून विकसित न होता ती कल्याणकारक आणि सर्वसमावेशक जीवनवेद म्हणून विकसित झाली. आपल्याला वेदांसह अनेक ग्रंथात हे सर्वच विषय कमीअधीक प्रमाणात आढळतात ते यामुळेच. जीवनाशी संबंधीत असे ज्ञान असल्याने त्याचा केवळ वेगळी विद्याशाखा म्हणून अभ्यास करणे जितके गरजेचे आहे तितकेच ते ज्ञान सृष्टीचा समतोल राखण्यात किती यशस्वी ठरते हेही काटेकोरपणे अभ्यासणे गरजेचे मानले गेले. त्यामुळे शास्त्रे विकसितही झाली आणि त्यांची अनुषंगिक संहारकताही सीमीत केली गेली. वैज्ञानिक प्रगती आणि विवेकी तत्वज्ञान यांचा हा समतोल…..
आधुनिक जगात सातत्याने नवनवीन शोध लागत आहेत, तंत्रज्ञान विकसित होत आहे पण ते विवेकाने वापरण्याचे किंवा त्याचा गैरवापर टाळण्याचे शिक्षण देणारी मुल्यव्यवस्थाच अस्तीत्व हरवून बसली आहे. त्यामुळे प्रगतीच्या पायरीगणीक आपण विनाशाच्या चिंतेने अधिकाधिक ग्रासले गेलो आहोत. हा विवेक जागवणारी आणि प्रसृत करणारी तत्वप्रणाली वेदवाङ्मयाने दिली.
सर्वेSपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग्भवेत्। किंवा
……सह नौ भुनक्तु।
किंवा
..वसुधैव कुटुम्बकम्। असो

यासारख्या प्रार्थनातून साधकाच्या मनावर हे तत्त्व कायम बिंबवले गेले की प्रत्येक कार्य, प्रत्येक पाऊल हे विश्वकल्याणाच्या हेतूतून उचलायचे आहे. संपुर्ण वसुधा (पृथ्वी) हे एकच कुटुंब आहे. यातील भूतमात्रांसह आपण सर्वजण एकाच साखळीतील कड्या आहोत. एक जरी कडी कमकुवत झाली तरी ही संपूर्ण साखळी दुर्बल होणार आहे. त्यामुळे प्रगती मग ती वैज्ञानिक असो तांत्रिक असो किंवा तात्त्विक तिच्यातून ही साखळी अधिक मजबूतच झाली पाहीजे. भौतिक आणि अध्यात्मिक प्रगती, मानवी जीवन आणि निसर्ग तसेच पर्यायाने मन आणि शरीर यांचा समतोल साधला तरच ज्या सुखाच्या अपेक्षेने अधिकाधिक विकासाची ईर्षा आपण बाळगतो ते चिरंतन सुख प्राप्त होईल. हा विचार निःसंशयपणे प्राचीन भारतीय वेदवाङ्मयाने जगाला दिला.
तात्पर्य काय तर आज विकसनशील वगैरे शिक्का असलेल्या भारताने स्वतःच जगाला दिलेल्या विवेकी अभ्यासकाच्या भूमिकेत परत शिरुन आपल्याच प्राचीन वाङ्मयाचा आणि आधुनिक विद्यांचा तारतम्याने अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. धर्मग्रंथ म्हणून नुसते अंधश्रद्धेने कवटाळून बसणे हे जसे चुकीचे आहे तसेच ते जुने कालबाह्य वाङ्मय म्हणून झिडकारणेही तितकेच चुकीचे आहे. कोणत्याही टोकाच्या भूमिकेपेक्षा विवेकी वृत्तीने चतुरस्त्र अभ्यास करून वेद आणि वैदिक साहित्यातून मिळणारे सर्वांगीण ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
समारोपापुर्वी मॅक्सम्युल्लरच्या भाषणातील काही उतारे जसेच्या तसे वानगीदाखल देत आहे. त्याच्या भाषांतराची गरज पडू नये कारण अर्थातच आपल्याकडे इंग्रजी मराठीपेक्षा अधिक अभ्यासली जाते!!

If you care for geology, there is work for you from the Himalayas to Ceylon.
If you are a zoologist, think of Haeckel, who is just now rushing through Indian forests and dredging in Indian seas, and to whom his stay in India is like the realization of the brightest dream of his life.
The study of Mythology has assumed an entirely new character, chiefly owing to the light that has been thrown on it by the ancient Vedic Mythology of India. But though the foundation of a true Science of Mythology has been laid, all the detail has still to be worked out, and could be worked out nowhere better than in India.
Again, if you are a student of Jurisprudence, there is a history of law to be explored in India, very different from what is known of the history of law in Greece, in Rome, and in Germany, yet both by its contrasts and by its similarities full of suggestions to the student of Comparative Jurisprudence.
You know how some of the best talent and the noblest genius of our age has been devoted to the study of the development of the outward or material world, the growth of the earth, the first appearance of living cells, their combination and differentiation, leading up to the beginning of organic life, and its steady progress from the lowest to the highest stages. Is there not an inward and intellectual world also which has to be studied in its historical development, from the first appearance of predicative and demonstrative roots, their combination and differentiation, leading up to the beginning of rational thought in its steady progress from the lowest to the highest stages? And in that study of the history of the human mind, in that study of ourselves, of our true selves, India occupies a place second to no other country. Whatever sphere of the human mind you may select for your special study, whether it be language, or religion, or mythology, or philosophy, whether it be laws or customs, primitive art or primitive science, everywhere, you have to go to India, whether you like it or not, because some of the most valuable and most instructive materials in the history of man are treasured up in India, and in India only.

तळटीप:

1. INDIA: WHAT CAN IT TEACH US? (A Course of Lectures – DELIVERED BEFORE THE UNIVERSITY OF CAMBRIDGE BY – F. MAX MÜLLER, K.M.)

मागील भाग – ओळख वेदांची – आरण्यक ओळख वेदांची – समग्र लेखमाला

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

ओळख वेदांची – आरण्यक

आरण्यक या नावातून अनेक अर्थ ध्वनीत होतात. त्या सर्व अर्थांचा समुच्चय केला तर आरण्यक म्हणजे काय हे समजणे सोपे जाईल.
पहिला अर्थ – अर्थातच अरण्यात किंवा जंगलात लिहिले गेलेले ग्रंथ, असा सोपा अर्थ निघतो. ‘अरण्ये भवम् इति आरण्यकम्।‘
दुसरा अर्थ सायणाचार्यांच्या भाष्यात येतो तो म्हणजे – वेदाचा जो अंश अरण्यात पठण/मनन केला जातो त्याला आरण्यक म्हणता येईल.

आरण्याध्ययनादेतद् आरण्यकमितिर्यते। अरण्ये तदधीयीतेत्येवं वाक्यं प्रवक्ष्यते।
(तैत्तिरिय आरण्यक भाष्य श्लोक ६)

हे झाले शब्दाची फोड करणारे अर्थ. अरण्यात माणूस कशासाठी जातो? शांतता मिळविण्यासाठी, चिंतन/तप करण्यासाठी. निसर्गाच्या सहवासात माणसाला परमात्म्याचा सहवास अधिक प्रकर्षाने जाणवतो. (**जंगलातील शांततेचा अनुभव घेतलेल्यांना हे चटकन् पटावे) अर्थातच नागरी जीवन आणि मोहाचा त्याग करून तत्वचिंतनात आयुष्य घालविण्यासाठी लोक अरण्याची वाट धरतात. म्हणूनच तत्वचिंतन हा विषय सांभाळणारे कोणते वैदिक ग्रंथ त्याने वाचावेत तर आरण्यके! हा आरण्यकांचा विषय सांगणारा अर्थ आहे.
आधीच्या भागात (वाचा – ब्राह्मण ग्रंथ) आपण पाहिलेत की वेदातील मंत्रांचा यज्ञीय कर्मकांडाशी निगडीत अर्थ लावण्याचे काम ब्राह्मण ग्रंथ करतात. याच कर्मकांडांचा तात्विक अभिप्राय मांडण्याचे काम आरण्यके करतात. कर्मकांड सांगणाऱ्या ब्राह्मण ग्रंथांना पूरक असे तत्वज्ञान सांगणे आणि पुढे येणा-या उपनिषदांची नांदी करणे असे दुहेरी कार्य आरण्यके करतात. त्यामुळे आरण्यके ही वेदवाङ्मयातीला कर्मकांड आणि ज्ञानकांड यांची सांगड घालणारा दुवा आहेत. वेदवाङ्मयात आरण्यकांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. उपनिषदे जर भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया मानली तर आरण्यके ही या उपनिषदांचा पाया मानायला हरकत नाही असे म्हणतात.
(**जाता जाता हे ही सांगायला हवे की भाषिकदृष्ट्या पाहिल्यास आरण्यके ही वैदिक आणि लौकिक संस्कृत भाषेतीला दुवा मानली जातात)

रचना/स्वरूप

सर्वसाधारणपणे ब्राह्मण किंवा उपनिषदांप्रमाणेच प्रत्येक वेदांशी निगडीत अशीच आरण्यकांची रचना झाली असे मानतात त्यामुळेच ब्राह्मण ग्रंथांप्रमाणेच शाखा उपशाखा व्यापून आरण्यकांची संख्याही ११३० च्या आसपास असावी असा विचार मांडला जातो. परंतू दुर्दैवाने आज उपलब्ध असणाऱ्या आरण्यकांची संख्या केवळ ७ आहे.
ऋग्वेद – ऐतरेय आरण्यक, शांखायन आरण्यक
शुक्लयजुर्वेद – माध्यंदिन बृहदारण्यक, काण्व बृहदारण्यक
(बृहदारण्यक हे वास्तविक आरण्यक आहे. परंतु त्याचा आकार, विषयव्याप्ती इ. अनेक कारणांमुळे त्याची गणना उपनिषदांमध्ये होते.)
कृष्णयजुर्वेद – तैत्तिरिय आरण्यक, मैत्रायणी आरण्यक
सामवेद – तवलाकर(तवल्कर?) (जैमिनीय) आरण्यक, छान्दोग्य आरण्यक
अथर्ववेदाची आरण्यके उपलब्ध नाहीत किंवा त्याबद्दल पुरेशी माहितीही नाही.

विषय

नवनीतं यथा दध्नो मलयाच्चंदनं यथा, आरण्यकं च वेदेभ्य ओषधिभ्योsमृतं यथा।
(साधारण अर्थ) – दह्याचे (सार) जसे लोणी, मलयवृक्षाचे (सार) जसे चंदन किंवा औषधी(वनस्पतीं)चे (सार) जसे अमृत तसे वेदांचे (सार) आरण्यकांमध्ये आहे.

महाभारतातील या श्लोकातील उक्ती योग्य की अतिशयोक्ती, यात न पडता जर अर्थ पाहिला तर आरण्यकांचा विषय आणि त्याचे महत्व दोन्ही लक्षात येते. वर सांगितल्याप्रमाणे यज्ञकर्म आणि तत्वज्ञान हे आरण्यकांचे प्रमुख विषय आहेत. यज्ञातील विधी, त्यातील वैदिक मंत्र आणि त्यांचे तत्त्वज्ञान असा एक विषय आहे. ब्राह्मण ग्रंथातील यज्ञ हे अनेक विधी, समारंभ इ. नी परीपूर्ण आणि गुंतागुंतीचे आहेत. आरण्यकातील यज्ञ मात्र अतिशय साधे व सोपे असून अरण्यवासी ऋषीमुनी किंवा सामान्य माणसालाही सहज साध्य आहेत.
सृष्टीची उत्पत्ती या विषयावर विस्तृत मंथन आरण्यकात आढळते. वेदांप्रमाणेच आरण्यकातही ‘प्राण’ याच तत्त्वाला दृष्य अदृष्य सृष्टी आणि महाभूतांचे मूळ मानले गेले आहे. ऐतरेय आरण्यकात –
स्थूल आणि सूक्ष्म सर्वकाही प्राण तत्वातून उगम पावते, अंतरीक्ष आणि वायुचेही सर्जन प्राणातूनच होते असे वर्णन आहे.

प्राणेन सृष्टावन्तरिक्षं च वायुच्क्षान्तरिक्षं वा……….। 2

मैत्रायणी संहितेत प्राण तत्वालाच सर्व तत्वांचा जनक म्हणले आहे.

त्वं ब्रह्म त्वं च वै विष्णुः, त्वं रुद्रस्त्वं प्रजापति। त्वमाग्नि वरुणो वायुः, त्वार्मन्द्रस्त्वं निशाकरः।

मनुष्यासह संपूर्ण चराचर सृष्टीच्या मुळाशी प्राण हे एकच तत्व आहे. त्यामुळेच सृष्टीतील या सर्व घटकांशी सहभावनेने राहणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे हा विचार ऐतरेय आरण्यकात येतो. केवळ माणसा माणसात नव्हे तर सृष्टीच्या प्रत्येक दृष्य अदृष्य घटकातील हे साधर्म्य लक्षात घेऊन त्यांच्यासह कृतज्ञभावनेने राहण्याचा आग्रह आरण्यके करतात. याच कर्तव्याचा विसर पडल्याने मनुष्याला आज पर्यावरण आणि निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागतोय. आजकाल पर्यावरण, प्रदुषण, वायु उत्सर्जन, कार्बन न्युट्रल वगैरे शब्द वापरून सर्वत्र प्रसिद्ध होत चाललेल्या चळवळी ज्या गोष्टी घसा फोडून सांगत आहेत त्याचे मूळ तत्व आरण्यकात अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात उभं केलंय. आरण्यकात याच तत्वाला अनुसरुन पंचमहाभूत यज्ञाची कल्पना मांडली आहे. हे पाच यज्ञ किंवा त्याला अनुसरुन नेहमी वागले पाहिजे असे आरण्यकात आवर्जून सांगितले आहे

पंच वा एते महायज्ञः सतति प्रजायन्ते।3

हे यज्ञ म्हणजे केवळ हवन नसून वर सांगितल्याप्रमाणे चराचर सृष्टीशी बांधिलकी जपण्याचे कार्य आहे. ब्रह्मयज्ञ – ऋषींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
पितृयज्ञ – पूर्वज/पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
देवयज्ञ – देवतांबद्दल यज्ञाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
भूतयज्ञ – प्राणीमात्र आणि वनस्पतींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे
अतिथियज्ञ – अभ्यागतांचा आदर करणे.

या यज्ञांच्या माध्यमातून भोवतालच्या परिसरासह पर्यावरणाशी एकरूप राहणे महत्वाचे आहे हे आज भयानक वास्तव म्हणून समोर आलेले ज्ञान आरण्यकांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितले आहे. सृष्टीतील प्रत्येक तत्व जसे वायु, पाणी, अग्नि आणि वनस्पती यांचे महत्व जवळपास सर्व आरण्यकांमध्ये येते. वायुचे महत्व सांगताना अशुद्ध वायुमुळे आजारपण येते हे ऐतरेय आरण्यक सांगते. इतकेच नव्हे तर यज्ञातील समिधा निवडताना भोवतालचा वायु शुद्ध करणाऱ्या औदुंबर किंवा पळसासारख्या वनस्पती वापराव्यात असे सांगून यज्ञकर्माचेही महत्व स्पष्ट करते. यज्ञकर्म आणि तत्वज्ञान याची सांगड घालून वेद आणि उत्तरवेदकालीन समाजाला संतुलित धर्म कसा असतो याचा वस्तुपाठ आरण्यके घालून देतात. म्हणूनच ज्ञानकर्मसमुच्चय या उपनिषदांच्या प्रमुख विषयाची बीजे आरण्यकात आढळतात असे म्हटले जाते.
अशाप्रकारे वेदवाङ्मय ही केवळ कोणत्याही एका धर्मासाठी किंवा विशिष्ट पंथासाठी रचलेली धार्मिक ग्रंथसंपदा नसून विश्वकल्याणाच्या उदात्त हेतून प्रेरित झालेल्या तत्कालिन ऋषीमुनीनी उभे केलेले जीवनकोश आहेत. वेदवाङ्मयाच्या महत्वाविषयी पुढील भागात……

तळटीप
१. महाभारत, शांतिपर्व ३३१-३
२. ऐतरेय आरण्यक २/१/७
३. तैत्तिरिय आरण्यक

मागील भाग – ओळख वेदांची – उपनिषद पुढील भाग – वेदवाङ्मयाची थोरवी

Copyright sheetaluwach.com 2020 #sheetaluwach

ओळख वेदांची – उपनिषद – भाग २

उपनिषदे

छान्दोग्य उपनिषदात एक सुंदर गोष्ट आहे. गुरुगृही शिक्षण समाप्त करून श्वेतकेतु आश्रमातून परत येतो. ज्ञानप्राप्तीचा गर्व त्याच्या चेहेऱ्यावर दिसत असतो. त्याचे वडील आरुणि ऋषी चिंतेत पडतात. केवळ लौकिक शिक्षणानंतर आपला मुलगा अहंकारी बनला तर पारलौकिक किंवा आत्मविद्येचे ज्ञान त्याला कसे होणार? त्याला पुढील टप्पा गाठायला उद्युक्त कसे करणार? त्यांना एक युक्ती सुचते. ते श्वेतकेतुला बोलावतात. छाती पुढे काढून अतिशय उत्साहात श्वेतकेतु येतो.

आरुणि – बाळ श्वेतकेतु, गुरुकुलातून आल्यापासून तू किंचित गर्विष्ठ वाटत आहेस.
श्वेतकेतु – नाही बाबा, मी सखोल अभ्यासाने विद्या प्राप्त केली आहे. या ज्ञानामुळे मी परीपक्व झालोय. मला याचा अभिमान आहे गर्व नाही.
आरुणि – तू गुरुकुलातून उच्च ज्ञान प्राप्त करून आला आहेस. इतक्याच अभ्यासाचा तूला अभिमान वाटतोय? हरकत नाही, तर मग मला हे सांग की अशी कोणती गोष्ट आहे जी जाणल्यावर अप्राप्यही प्राप्त होते किंवा अज्ञातही ज्ञात होते ?
हा प्रश्न ऐकल्यावर श्वेतकेतु गोंधळात पडतो. अज्ञातही ज्ञात होण्याची विद्या कोणती? हे त्याला गुरुकुलात शिकवलेले नसते.
आरुणि – बाळा, विद्या शिकल्याने प्राप्त होणारे ज्ञान हे श्रेष्ठ असतेच परंतू ते अंतिम ज्ञान नव्हे. तू गुरुकुलात जे ज्ञान शिकलास ते बाह्य जगाबद्दलचे ज्ञान होते. ते जग जे आपल्याला पाहता येते तसेच स्पर्श, रस आणि गंध यांच्या माध्यमातून अनुभवता येते. परंतु त्या जगाचे अंतरंग आपल्या दृष्टीस पडत नाही. ते जाणून घेण्याची विद्या साध्य करता आली पाहिजे.
श्वेतकेतु – मी पुरेसे समजलो नाही बाबा. आपण थोडे विस्ताराने सांगाल काय?
आरुणि – हे तांब्याचे पात्र पहा. आपल्या डोळ्यांसमोर हे पात्र आहे. त्याचा उपयोग आपण करतो. अशा अनेक तांब्याच्या वस्तू आपण वापरतो. ही पात्रे आणि त्याचे उपयोग वेगवेगळे आहेत. मात्र त्याचे मूळ मात्र ‘ताम्र’ हा एकमेव धातूच आहे. तसेच आपल्याला दिसणारे जग हे सुद्धा वेगवेगळ्या स्वरुपात दिसत असले तरी त्याचे मूळ हे एकच तत्त्व आहे. ते तत्वच एकदा जाणले की संपूर्ण सृष्टीचे स्वरूप उलगडेल. पाण्यात विरघळलेले मीठ आपल्याला दिसत नाही परंतु त्याच्या खारट चवीवरून आपण ओळखतो तसेच सृष्टीतील प्रत्येक घटकात हे तत्व अंतर्भूत आहेच. सृष्टीच्या अंतरंगात शिरून ते जाणण्याचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान.

छान्दोग्य उपनिषदातील ही कथा/संवाद केवळ छान्दोग्यच नव्हे तर सर्वच उपनिषदांच्या विषयावर प्रकाश टाकते. सृष्टीचे कोडे उलगडण्यासाठी तिच्या अंतरंगात डोकावण्याचे कार्य उपनिषदे करतात. त्यामुळेच उपनिषदांचे विषय हे अदृष्याचे ज्ञान, आत्मज्ञान, तत्त्वज्ञान, ज्ञानोपासना असेच आहेत.

(** यावरून हे ही लक्षात यायला हरकत नाही की उपनिषदांचा विषय फक्त आणि फक्त आत्मानुभूतीचे तत्वज्ञान आहे. कोणत्याही देवाची उपासना किंवा पर्यायाने धर्माचा उपदेश प्रमुख उपनिषदात येत नाही. त्यामुळेच जगातील जवळपास सर्व जाती, धर्म आणि पंथाच्या तत्त्वज्ञांना उपनिषदे आकर्षित करतात.)

संवाद अर्थात (One on One Discussion)

आपण मागच्या लेखात पाहिले की उपनिषद शब्दाचा अर्थ (गुरुजवळ) बसून प्राप्त केलेले ज्ञान असा होतो. याच अर्थाला साजेसे असे हे संवाद सर्व प्रमुख उपनिषदांमध्ये येतात. गुरु-शिष्य, पिता-पूत्र, पती-पत्नी किंवा देव-मानव अशा अनेक प्रकारच्या संवादातून उपनिषदे अतिशय सहज सोप्या भाषेत गहन तत्वज्ञान मांडतात. आजकाल जसे Talk Shows किंवा Expert Interviews/Dialogues होतात तसेच.

आरुणि – श्वेतकेतु प्रमाणेच
याज्ञवल्क्य – मैत्रेयी (बृहदारण्यक उपनिषद),
याज्ञवल्क्य – गार्गी (बृहदारण्यक उपनिषद),
याज्ञवल्क्य – जनक राजा
(*सीता फेम नसावा पण त्याच वंशातला) (बृहदारण्यक उपनिषद),
अजातशत्रु – गार्ग्य बालाकि (कौषितकी उपनिषद),
यमराज-नचिकेता (कठोपनिषद),
शौनक – अंगिरस (मुण्डकोपनिषद),
कामलायन – सत्यकाम जाबाल (छान्दोग्य उपनिषद),
नारद – सनत्कुमार (छान्दोग्य उपनिषद)

असे अनेक संवाद उपनिषदांमध्ये येतात.

संख्या –

उपनिषदांची एकूण संख्या किती आणि त्यातील प्रमुख उपनिषदे कोणती हा नेहेमीच चर्चेचा विषय राहिला आहे. वेदवाङ्मयाचा भाग असल्याकारणाने प्रत्येक वेद व त्याच्या सर्व शाखांची उपनिषदे होती असा एक मतप्रवाह आहे. त्यानुसार उपनिषदांची संख्या जवळपास ११८० च्या आसपास भरते. मुक्तिकोपनिषदात १०८ उपनिषदांची नावे सांगितली आहेत त्यातील पहिल्या श्लोकात दहा प्रमुख प्राचीन उपनिषदे येतात. ती अशी

ईशकेनकठप्रश्नमुण्डमाण्डूक्यतित्तिरिः । ऐतरेयम् च छान्दोग्यं बृहदारण्यकम् तथा।। (ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्ड/मुण्डक, माण्डूक्य, तैत्तिरिय, ऐतरेय , छान्दोग्य तसेच बृहदारण्यक)

आदि शंकराचार्यांनी ११ उपनिषदांवर भाष्ये लिहीली यात वरील १० आणि श्वेताश्वतर उपनिषदाचा समावेश होतो. याखेरीज निरनिराळ्या विद्वानांनी गौरवलेली कौषीतकी, प्रश्न, मैत्री अशी इतरही काही उपनिषदे प्रमुख मानली जातात. यातील ईश, कठ आणि मुण्डक ही उपनिषदे पद्य तर बाकीची गद्य स्वरूपात आहेत.

विषय

संख्या आणि विषयाची खोली लक्षात घेता उपनिषदातील विषयांवर भाष्य करणे हे एका लेखाचे काम नव्हे. बाह्य सृष्टी आणि ब्रह्मरुप आत्मा या दोन्हीचे यथार्थ स्वरूप उपनिषदे मांडतात. श्वेतकेतु, मैत्रेयी, नचिकेत या सारख्या अनेक जिज्ञासुंच्या शंका आणि त्याचे गुरुतुल्य ऋषींनी विस्तृतपणे केलेले समाधान अशी मांडणीची सोपी पद्धत उपनिषदे अंमलात आणतात. मी कोण? हे जग कसे निर्माण झाले? याचा कर्ता कोण आहे? अशा वरवर साध्या वाटणाऱ्या परंतु अत्यंत गुढ अशा या शंका आहेत.

याखेरीज उत्कृष्ट वचने (वाक्ये), गोष्टी, वर्णने आणि भाष्य या माध्यमांचाही उपनिषदात उपयोग होतो.

आत्मा आणि ब्रह्मज्ञान हा उपनिषदांचा मुख्य विषय असला तरी त्या अनुषंगाने सृष्टीच्या जवळपास प्रत्येक घटकाचा तात्त्विक अंगाने उपनिषदे अभ्यास करतात.

साधे उदाहरण घ्यायचे तर आजकाल प्रसिद्धीस आलेल्या ‘योग’ (आजच्या भाषेत योगा (Yoga)) चे मूळ हे श्वेताश्वतर उपनिषदात आढळते. प्राणाचा अवरोध, इंद्रियदमन आणि समाधी स्थिती यावर विस्तृत भाष्य या उपनिषदाच्या दुसऱ्या अध्यायात येते. अगदि योगाभ्यासासाठी योग्य जागेच्या निवडीपासून ते समाधी स्थितीतील जीवात्म्याला होणाऱ्या परमात्म्याच्या दर्शनपर्यंतचे विचार या उपनिषदात मांडले आहेत. अशाच प्रकारे ॐकार (प्रणव) तसेच इतर प्रतीकांची उपासना, यज्ञ, कर्म, वर्तन, वाणी, विचार अशा असंख्य विषयांवरचे तत्वज्ञान उपनिषदातून मिळते.

महावाक्ये

ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत. तांब्याच्या पात्राच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे – स्वतः कोण आहोत याचे रहस्य जाणणे म्हणजेच सृष्टीचे रहस्य जाणणे होय. ही उपनिषदांची शिकवण आहे. या अर्थाची जी वाक्ये उपनिषदात येतात त्यांना महावाक्ये म्हणतात. प्रत्येक वाक्य एकेका वेदाशी संबंधित उपनिषदात येते.

१. प्रज्ञानं ब्रह्म। (ऐतरेय उपनिषद) (प्रकट ज्ञान हेच ब्रह्म आहे)
२. अहं ब्रह्मास्मि। (बृहदारण्यक उपनिषद) (मी (आत्मा) ब्रह्म आहे),
सोSहम्। (ईशोपनिषद) (तो मीच आहे)
३. तत्त्वमसि। (छान्दोग्य उपनिषद) (ते (ब्रह्म) तू आहेस)
४. अयमात्मा ब्रह्म। (माण्डूक्य उपनिषद) (हा आत्मा ब्रह्म आहे)
गूढ तसेच अर्थगर्भ अशी ही वाक्ये वाचली की उपनिषदांना भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया का म्हणतात ते लक्षात येते.

आपल्या परिचयाचे

आपल्या भारताच्या राष्ट्रीय चिन्हातील ‘सत्यमेव जयते’ हे वाक्य उपनिषदातलेच आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे याच अर्थाचे Pravda vítězí (सत्याचाच विजय होतो) हे वाक्य चेक प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय चिन्हात येते.

आपण नेहेमी म्हणत आलेला –

भ॒द्रं कर्णे॑भिः श‍ृणुयाम देवा भ॒द्रं प॑श्येमा॒क्षभि॑र्यजत्राः । स्थि॒रैरङ्गै॑स्तुष्टु॒वांस॑स्त॒नूभि॒र्व्य॑शेम दे॒वहि॑तं॒ यदायुः॑।

हा ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातला मंत्र माण्डूक्य उपनिषदाच्या सुरुवातीला येतो. ‘स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः’ हा स्वस्तिमंत्र याच उपनिषदात पुढे येतो.

महत्व

केवळ भारतीयच नव्हे तर तत्वज्ञानाच्या एकूणच इतिहासात उपनिषदांचे स्थान अजोड आहे. दारा शिकोह ने स्वतःच म्हटल्याप्रमाणे ‘नव्याने प्रचलित होणा-या अनेक धर्मांची शिकवण ही केवळ उपनिषदातील तत्वांचेच पुनःप्रक्षेपण आहे.’ पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा सर्वच विद्वानांनी उपनिषदांचा गौरव केला आहे. यात केवळ तत्त्वज्ञच नव्हे तर कवि, लेखक, शास्त्रज्ञांसह सर्व धर्मीय अभ्यासकांचा समावेश होतो. उपनिषदांचा हा प्रचंड प्रभाव १७९६ च्या पहिल्या पाश्चात्य भाषांतरानंतर केवळ गेल्या २०० वर्षात पडलाय. यावरून हजारो वर्षांपूर्वी हे तत्त्वज्ञान सोप्या आणि सहज मांडणाऱ्या भारतीय ऋषींच्या बुद्धीसामर्थ्याची कल्पना येते.

तळटीप

१. सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्‌ सत्यस्य परमं निधानम्‌ ॥ (मुण्डकोपनिषद – तृतीय मुण्डक – खंड १ मंत्र ६)
२. भ॒द्रं कर्णे॑भिः श‍ृणुयाम देवा भ॒द्रं प॑श्येमा॒क्षभि॑र्यजत्राः ।
स्थि॒रैरङ्गै॑स्तुष्टु॒वांस॑स्त॒नूभि॒र्व्य॑शेम दे॒वहि॑तं॒ यदायुः॑ ॥ ऋग्वेद मंडल १.सूक्त ८९ ऋचा ०८

मागील भाग – ओळख वेदांची – उपनिषद पुढील भाग – ओळख वेदांची – आरण्यक

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact
Exit mobile version