भगवद्गीता – अध्याय ५ – कर्मसंन्यासयोग

अर्जुन उवाच
संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्‌ ॥ ५-१ ॥
अन्वय

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, कृष्ण = हे कृष्णा, कर्मणाम्‌ = कर्मांच्या, संन्यासम्‌ = संन्यासाची, च = तसेच, पुनः = त्यानंतर, योगम्‌ = कर्मयोगाची, शंससि = प्रशंसा करीत आहात, (अतः) = म्हणून, एतयोः = या दोहोंतील, यत्‌ = जे, एकम्‌ = एक, मे = माझ्यासाठी, सुनिश्चितम्‌ = चांगल्याप्रकारे निश्चित, श्रेयः = कल्याणकारक साधन (होईल), तत्‌ = ते, ब्रूहि = तुम्ही (मला) सांगा
अर्थ
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता! तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल, ते सांगा.
/ श्रीभगवानुवाच
संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ ।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते ॥ ५-२ ॥
अन्वय

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, संन्यासः = कर्मसंन्यास, च = आणि, कर्मयोगः = कर्मयोग, उभौ = हे दोन्हीही, निःश्रेयसकरौ = परम कल्याण करणारे आहेत, तु = परंतु, तयोः = त्या दोन्हींमध्येही, कर्मसंन्यासात्‌ = कर्मसंन्यासापेक्षा, कर्मयोगः = कर्मयोग (हा साधण्यास सुगम असल्यामुळे), विशिष्यते = श्रेष्ठ आहे
अर्थ
भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत. परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे.
ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति । निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥ ५-३ ॥
अन्वय

महाबाहो = हे महाबाहो अर्जुना, यः = जो मनुष्य, न द्वेष्टि = (कोणाचाही) द्वेष करीत नाही, न काङ्क्षति = कशाचीही आकांक्षा करीत नाही, सः = तो कर्मयोगी, नित्यसंन्यासी = सदा संन्यासीच, ज्ञेयः = समजण्यास योग्य आहे, हि = कारण, निर्द्वन्द्वः = राग-द्वेषादि द्वंद्वांनी रहित असा तो, बन्धात्‌ = संसारबंधनातून, सुखम्‌ = सुखाने, प्रमुच्यते = मुक्त होऊन जातो
अर्थ
हे महाबाहो अर्जुना, जो मनुष्य कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण राग-द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला मनुष्य सुखाने संसारबंधनातून मुक्त होतो.
सांख्ययोगौ पृथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः ।
एकमप्यास्थितः सम्यगुभयोर्विन्दते फलम्‌ ॥ ५-४ ॥
अन्वय

बालाः = मूर्ख लोकच, सांख्ययोगौ = संन्यास व कर्मयोग हे, पृथक्‌ = वेगवेगळी फळे देणारी आहेत असे, प्रवदन्ति = म्हणतात (परंतु), न पण्डिताः = पंडितजन तसे म्हणत नाहीत, (हि) = कारण दोन्हीतील, एकम्‌ अपि = एकामध्येही, सम्यक्‌ = योग्य प्रकाराने, आस्थितः = स्थित असणारा मनुष्य, उभयोः = दोन्हींचे, फलम्‌ = फळरूप (परमात्मा), विन्दते = प्राप्त करून घेतो
अर्थ
वर सांगितलेले संन्यास आणि कर्म योग वेगवेगळी फळे देणारे आहेत, असे मूर्ख लोक म्हणतात; पंडित नव्हेत. कारण दोहोंपैकी एकाच्या ठिकाणीसुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला मनुष्य दोहोंचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो.
यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ ५-५ ॥
अन्वय

यत्‌ = जे, स्थानम्‌ = परमधाम, सांख्यैः = ज्ञानयोग्यांकडून, प्राप्यते = प्राप्त करून घेतले जाते, तत्‌ = तेच, (स्थानम्‌) = परमधाम, योगैः = कर्मयोग्यांकडून, अपि = सुद्धा, गम्यते = प्राप्त करून घेतले जाते, सांख्यम्‌ = ज्ञानयोग, च = आणि, योगम्‌ = कर्मयोग (हे फलरूपाने), एकम्‌ = एक आहेत असे, यः = जो मनुष्य, पश्यति = पाहतो, सः च = तोच, पश्यति = यथार्थ पाहतो
अर्थ
ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते; तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत, असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो.
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति ॥ ५-६ ॥
अन्वय

तु = परंतु, महाबाहो = हे महाबाहो अर्जुना, अयोगतः = कर्मयोगाशिवाय, संन्यासः = संन्यास म्हणजे मन, इंद्रिये व शरीर यांच्या द्वारे होणाऱ्या सर्व कर्मांच्या कर्तेपणाचा त्याग, आप्तुम्‌ = प्राप्त होणे, दुःखम्‌ = कठीण आहे, मुनिः = भगवत्स्वरूपाचे चिंतन करणारा, योगयुक्तः = कर्मयोगी, ब्रह्म = परब्रह्म परमात्म्याला, नचिरेण = लवकरच, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो
अर्थ
परंतु हे महाबाहो अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. आणि भगवत्स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो.
योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ५-७ ॥
अन्वय

विशुद्धात्मा = ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे, विजितात्मा = ज्याचे मन त्याच्या स्वाधीन आहे, जितेन्द्रियः = जो जितेंद्रिय आहे, (च) = आणि, सर्वभूतात्मभूतात्मा = सर्व सजीवांचा आत्मरूप परमात्मा हाच ज्याचा आत्मा आहे असा, योगयुक्तः = कर्मयोगी, कुर्वन्‌ अपि = कर्म करीत असताना सुद्धा, न लिप्यते = लिप्त होत नाही
अर्थ
ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रियनिग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व सजीवांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहातो.
नैव किञ्चित्करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्‌ ।
पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन्‌ ॥ ५-८ ॥
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्‌ ॥ ५-९ ॥
अन्वय

पश्यन्‌ = पाहाताना, शृण्वन्‌ = ऐकताना, स्पृशन्‌ = स्पर्श करताना, जिघ्रन्‌ = वास घेताना, अश्नन्‌ = भोजन करताना, गच्छन्‌ = गमन करताना, स्वपन्‌ = झोपताना, श्वसन्‌ = श्वास घेताना, प्रलपन्‌ = बोलताना, विसृजन्‌ = त्याग करताना, गृह्णन्‌ = घेताना, (तथा) = तसेच, उन्मिषन्‌ = डोळे उघडताना, (च) = आणि, निमिषन्‌ = डोळे मिटताना, अपि = सुद्धा, इन्द्रियाणि = सर्व इंद्रिये, इन्द्रियार्थेषु = आपापल्या विषयांत, वर्तन्ते = व्यवहार करीत आहेत, इति = असे, धारयन्‌ = समजून, तत्त्ववित्‌ = तत्त्व जाणणाऱ्या, युक्तः = सांख्यायोगी मनुष्याने, एव = निःसंदेहपणे, इति = असा, मन्येत = विचार करावा की, किञ्चित्‌ = काही सुद्धा, न करोमि = मी करीत नाही
अर्थ
सांख्यायोगी तत्त्ववेत्त्याने पाहात असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोच्छ्वास करीत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, तसेच डोळ्यांनी उघडझाप करीत असतानाही सर्व इंद्रिये आपापल्या विषयांत वावरत आहेत, असे समजून निःसंशय असे मानावे की, मी काहीच करीत नाही.
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा ॥ ५-१० ॥
अन्वय

ब्रह्मणि = परमात्म्यामध्ये, कर्माणि = सर्व कर्मे, आधाय = अर्पण करून, (च) = आणि, सङ्गम्‌ = आसक्तीचा, त्यक्त्वा = त्याग करून, यः = जो मनुष्य, (कर्म) = कर्म, करोति = करतो, सः = तो मनुष्य, अम्भसा = पाण्याने, पद्मपत्रम्‌ इव = कमळाच्या पानाप्रमाणे, पापेन = पापाने, न लिप्यते = लिप्त होत नाही
अर्थ
जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्मे करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही.
कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये ॥ ५-११ ॥
अन्वय

योगिनः = कर्मयोगी (ममत्व बुद्धीने रहित होऊन), केवलैः = केवळ, आत्मशुद्धये = अंतःकरणाच्या शुद्धीसाठी, इन्द्रियैः = इंद्रियांनी, मनसा = मनाने, बुद्ध्या = बुद्धीने, (च) = तसेच, कायेन अपि = शरीरानेही होणारी, कर्म = सर्व कर्मे, सङ्गम्‌ = आसक्तीचा, त्यक्त्वा = त्याग करून, कुर्वन्ति = करतात
अर्थ
कर्मयोगी ममत्वबुद्धी सोडून केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारे आसक्ती सोडून कर्म करतात.
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्‌ ।
अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते ॥ ५-१२ ॥
अन्वय

कर्मफलम्‌ = कर्माच्या फळाचा, त्यक्त्वा = त्याग करून, युक्तः = कर्मयोगी, नैष्ठिकीम्‌ = भगवत्प्राप्तीरूप, शान्तिम्‌ = शांती, आप्नोति = प्राप्त करून घेतो, (च) = आणि, अयुक्तः = सकाम पुरुष, कामकारेण = कामनेच्या प्रेरणेने, फले = फळामध्ये, सक्तः = आसक्त होऊन, निबध्यते = बंधनात पडतो
अर्थ
कर्मयोगी कर्मांच्या फळांचा त्याग करून भगवत्‌प्राप्तीरूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळांत आसक्त होऊन बद्ध होतो.
सर्वकर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्‌ ॥ ५-१३ ॥
अन्वय

वशी = ज्याला अंतःकरण वश आहे असा सांख्ययोगाचे आचरण करणारा, देही = पुरुष, न कुर्वन्‌ = काही न करता, (च) = तसेच, न कारयन्‌ एव = काहीही न करविताच, नवद्वारे = नऊ द्वारे असणाऱ्या शरीररूपी, पुरे = घरात, सर्वकर्माणि = सर्व कर्मांचा, मनसा = मनाने, संन्यस्य = त्याग करून, सुखम्‌ = आनंदपूर्वक (सच्चिदानंदघन परमात्म्याच्या स्वरूपात), आस्ते = राहातो
अर्थ
अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे, असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच नऊ दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंदघन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहातो.
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ ५-१४ ॥
अन्वय

लोकस्य = मनुष्यांचे, न कर्तृत्वम्‌ = न कर्तेपण, न कर्माणि = न कर्मे, न कर्मफलसंयोगम्‌ = न कर्मफळाशी संयोग, प्रभुः = परमेश्वर, सृजति = निर्माण करतो, तु = परंतु, स्वभावः = प्रकृतीच, प्रवर्तते = सर्व काही करते
अर्थ
परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण, कर्मे आणि कर्मफलांशी संयोग उत्पन्न करीत नाही; तर प्रकृतीच खेळ करीत असते.
नादत्ते कस्यचित्पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ ५-१५ ॥
अन्वय

विभुः = सर्वव्यापी परमेश्वरसुद्धा, न कस्यचित्‌ पापम्‌ = ना कोणाचे पापकर्म, च = तसेच, न सुकृतम्‌ = ना (कोणाचे) शुभकर्म, एव = सुद्धा, आदत्ते = ग्रहण करतो, (किंतु) = परंतु, अज्ञानेन = अज्ञानाच्या द्वारे, ज्ञानम्‌ = ज्ञान, आवृतम्‌ = झाकले गेले आहे, तेन = त्यामुळे, जन्तवः = सर्व अज्ञानी माणसे, मुह्यन्ति = मोहित होतात
अर्थ
सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही. परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले गेले आहे. त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात.
ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवज्ज्ञानं प्रकाशयति तत्परम्‌ ॥ ५-१६ ॥
अन्वय

तु = परंतु, येषाम्‌ = ज्यांचे, तत्‌ = ते, अज्ञानम्‌ = अज्ञान, आत्मनः = परमात्म्याच्या, ज्ञानेन = तत्त्वज्ञानाद्वारे, नाशितम्‌ = नष्ट केले गेले आहे, तेषाम्‌ = त्यांचे, (तत्‌) = ते, ज्ञानम्‌ = ज्ञान, आदित्यवत्‌ = सूर्याप्रमाणे, तत्परम्‌ = त्या सच्चिदानंदघन परमात्म्याला, प्रकाशयति = प्रकाशित करते
अर्थ
परंतु ज्यांचे ते अज्ञान परमात्मज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंदघन परमात्म्याला प्रकाशित करते.
तद्‍बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः ।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ ५-१७ ॥
अन्वय

तद्‍बुद्धयः = ज्यांची बुद्धी तद्रूप होत असते, तदात्मानः = ज्यांचे मन तद्रूप होत असते, (च) = आणि, तन्निष्ठाः = सच्चिदानंदघन परमात्म्यामध्येच ज्यांची सतत एकीभावाने स्थिती आहे असे, तत्परायणाः = तत्परायण पुरुष, ज्ञाननिर्धूतकल्मषाः = ज्ञानाच्या द्वारे पापरहित होऊन, अपुनरावृत्तिम्‌ = अपुनरावृत्ति म्हणजेच परमगति, गच्छन्ति = प्राप्त करून घेतात
अर्थ
ज्यांचे मन व बुद्धी तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानंदघन परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परम गतीला प्राप्त होतात.
विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः ॥ ५-१८ ॥
अन्वय

विद्याविनयसम्पन्ने = विद्या व विनय यांनी युक्त अशा, ब्राह्मणे = ब्राह्मणाच्या ठिकाणी, च = तसेच, गवि = गाईच्या ठायी, हस्तिनि = हत्तीच्या ठायी, शुनि = कुत्र्याच्या ठिकाणी, च = तसेच, श्वपाके = चांडाळाच्या ठिकाणी (सुद्धा), पण्डिताः = ज्ञानी लोक, समदर्शिनः एव = समदर्शीच (होतात)
अर्थ
ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहातात.
इहैव तैर्जितः सर्गो एषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थिताः ॥ ५-१९ ॥
अन्वय

येषाम्‌ = ज्यांचे, मनः = मन, साम्ये = समभावामध्ये, स्थितम्‌ = स्थित आहे, तैः = त्यांच्याकडून, इह एव = या जीवित अवस्थेमध्येच, सर्गः = संपूर्ण संसार, जितः = जिंकला गेला आहे, हि = कारण, ब्रह्म = सच्चिदानंदघन परमात्मा, निर्दोषम्‌ = दोषरहित, (च) = आणि, समम्‌ = सम आहे, तस्मात्‌ = त्या कारणाने, ते = ते, ब्रह्मणि = सच्चिदानंदघन परमात्म्यामध्येच, स्थिताः = स्थित असतात
अर्थ
ज्यांचे मन समभावात स्थिर झाले आहे, त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला. कारण सच्चिदानंदघन परमात्मा निर्दोष आणि सम आहे. म्हणून ते सच्चिदानंदघन परमात्म्यातच स्थिर असतात.
न प्रहृष्येत्प्रियं प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम्‌ ।
स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद्‌ ब्रह्मणि स्थितः ॥ ५-२० ॥
अन्वय

(यः) = जो पुरुष, प्रियम्‌ = प्रिय गोष्ट, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, न प्रहृष्येत्‌ = आनंदित होत नाही, च = तसेच, अप्रियम्‌ = अप्रिय गोष्ट, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, न उद्विजेत्‌ = उद्विग्न होत नाही, (सः) = तो, स्थिरबुद्धिः = स्थिरबुद्धी, असम्मूढः = संशयरहित, ब्रह्मवित्‌ = ब्रह्मवेत्ता, ब्रह्मणि = सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्यामध्ये, स्थितः = एकीभावाने नित्य स्थित असतो
अर्थ
जो पुरुष प्रिय वस्तु मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तु प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला, संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्यात ऐक्यभावाने नित्य स्थित असतो.
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम्‌ ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥ ५-२१ ॥
अन्वय

बाह्यस्पर्शेषु = बाहेरच्या विषयांमध्ये, असक्तात्मा = आसक्तिरहित अंतःकरण असणारा साधक, आत्मनि = आत्म्यामध्ये (स्थित), यत्‌ = जो (ध्यान-जनित) सात्त्विक, सुखम्‌ = आनंद आहे, (तत्‌) = तो, विन्दति = प्राप्त करून घेतो, (तदनंतरम्‌) = त्यानंतर, सः = तो, ब्रह्मयोगयुक्तात्मा = सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगामध्ये अभिन्न भावाने स्थित असलेला पुरुष, अक्षयम्‌ = अक्षय, सुखम्‌ = आनंदाचा, अश्नुते = अनुभव घेतो
अर्थ
ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते, असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्त्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो.
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ ५-२२ ॥
अन्वय

संस्पर्शजा = इंद्रिये आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे, ये = जितके, भोगाः = भोग आहेत, ते = ते सर्व (जरी विषयलोलुप पुरुषांना सुखरूप वाटत असतात तरीसुद्धा), हि = निःसंदेहपणे, दुःखयोनयः एव = फक्त दुःखालाच कारण आहेत, (च) = आणि, आद्यन्तवन्तः = आदि-अन्त असणारे म्हणजे अनित्य आहेत, (अतः) = म्हणून, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, बुधः = बुद्धिमान विवेकी पुरुष, तेषु = त्यांच्या ठिकाणी, न रमते = रमत नाहीत
अर्थ
जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत, ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, बुद्धिमान विवेकी पुरुष त्यात रमत नाहीत.
शक्नोतीहैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात्‌ ।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः ॥ ५-२३ ॥
अन्वय

इह = या मनुष्यशरीरामध्ये, यः = जो साधक, शरीरविमोक्षणात्‌ प्राक्‌ एव = शरीराचा नाश होण्यापूर्वीच, कामक्रोधोद्भवम्‌ = काम व क्रोध यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या, वेगम्‌ = वेगाला, सोढुम्‌ = सहन करण्यास, शक्नोति = समर्थ होतो, सः = तोच, नरः = पुरुष, युक्तः = योगी आहे, (च) = आणि, सः = तोच, सुखी = सुखी आहे
अर्थ
जो साधक या मनुष्यशरीरात शरीर पडण्याआधीच काम-क्रोध यांमुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो, तोच योगी होय आणि तोच सुखी होय.
योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ ५-२४ ॥
अन्वय

यः = जो पुरुष, एव = ब्रह्माच्या शिवाय काहीही नाही असा निश्चय करून, अन्तः सुखः = अंतरात्म्यातच आनंदानुभव करणारा आहे, अन्तरारामः = आत्म्यामध्येच रममाण होणारा आहे, तथा = त्याचप्रमाणे, यः = जो, अन्तर्ज्योतिः = आत्म्याच्या ज्योतीमध्ये ज्याचे ज्ञान प्रकाशित होते, सः = तो, ब्रह्मभूतः = सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्याबरोबर एकीभाव प्राप्त करून घेतलेला, योगी = सांख्ययोगी, ब्रह्मनिर्वाणम्‌ = शांत ब्रह्माला, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो
अर्थ
जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो, तो सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्म्यासह ऐक्यभावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो.
लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रताः ॥ ५-२५ ॥
अन्वय

क्षीणकल्मषाः = ज्यांची सर्व पापे नष्ट होऊन गेली आहेत, छिन्नद्वैधाः = ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे निवृत्त झालेले आहेत, सर्वभूतहिते = जे सर्व सजीवांच्या हितामध्ये, रताः = रत आहेत, (च) = आणि, यतात्मानः = ज्यांचे जिंकलेले मन हे निश्चलभावाने परमात्म्यात स्थित आहे (असे ते), ऋषयः = ब्रह्मवेत्ते पुरुष, ब्रह्मनिर्वाणम्‌ = शांत ब्रह्म, लभन्ते = प्राप्त करून घेतात
अर्थ
ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहेत, जे सजीवमात्रांच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते, ते ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात.
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्‌ ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्‌ ॥ ५-२६ ॥
अन्वय

कामक्रोधवियुक्तानाम्‌ = जे काम व क्रोध यांनी रहित आहेत, यतचेतसाम्‌ = ज्यांनी चित्त जिंकले आहे, विदितात्मनाम्‌ = ज्यांना परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार झाला आहे अशा, यतीनाम्‌ = ज्ञानी पुरुषांच्या बाबतीत, अभितः = सर्व बाजूंनी, ब्रह्मनिर्वाणम्‌ = शांत परब्रह्म परमात्माच, वर्तते = परिपूर्ण भरलेला असतो
अर्थ
काम-क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांच्या सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण भरलेला असतो.
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥ ५-२७ ॥
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः ।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ ५-२८ ॥
अन्वय

बाह्यान्‌ = बाह्य, स्पर्शान्‌ = विषयभोगांना (त्यांचे चिंतन न करता), बहिः एव = बाहेरच, कृत्वा = सोडून देऊन, च = आणि, चक्षुः = नेत्रांची दृष्टी, भ्रुवोः = (दोन) भुवयांच्या, अन्तरे = मध्ये (स्थिर करून), (तथा) = तसेच, नासाभ्यन्तरचारिणौ = नासिकेमध्ये संचार करणाऱ्या, प्राणापानौ = प्राण व अपान या वायूंना, समौ = सम, कृत्वा = करून, यतेन्द्रियमनोबुद्धिः = ज्याने इंद्रिये, मन आणि बुद्धी जिंकलेली आहेत असा, यः = जो, मोक्षपरायणः = मोक्षपरायण, मुनिः = मुनी, विगतेच्छाभयक्रोधः = इच्छा, भय व क्रोध यांनी रहित झाला आहे, सः = तो, सदा = नेहमी, मुक्तः एव = मुक्तच असतो
अर्थ
बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून, दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान वायू सम करून, ज्याने इंद्रिये, मन व बुद्धी जिंकली आहेत, असा मोक्षतत्पर मुनी इच्छा, भय आणि क्रोध यांनी रहित झाला की, तो सदोदित मुक्तच असतो. ॥ ५-२७, ५-२८ ॥
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्‌ ।
सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ ५-२९ ॥
अन्वय

यज्ञतपसाम्‌ = सर्व यज्ञ आणि तप यांचा, भोक्तारम्‌ = भोक्ता मी आहे, सर्वलोकमहेश्वरम्‌ = सर्व लोकांतील ईश्वरांचासुद्धा ईश्वर म्हणजे सर्वलोकमहेश्वर मी आहे, (तथा) = तसेच, सर्वभूतानाम्‌ = सर्व सजीवांचा, सुहृदम्‌ = सुहृद म्हणजे स्वार्थरहित दयाळू व प्रेम करणारा असा, माम्‌ = मी आहे हे, ज्ञात्वा = तत्त्वतः जाणून (माझा भक्त), शान्तिम्‌ = परम शांती, ऋच्छति = प्राप्त करून घेतो
अर्थ
माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोक्ता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, सजीवमात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमी, असे तत्त्वतः समजून शांतीला प्राप्त होतो.

अंतरंग – भगवद्गीता – ज्ञानविज्ञानयोग

ज्ञानविज्ञानयोग

पाप पुण्य की शंका नाही, स्वर्ग-नर्क नही जाही।।
कहहि कबीर सुनो हो सन्तों, जहां का पद तहाँ समाई।।

अर्जुनविषादापासून आरंभलेला आपला प्रवास आता एक टप्पा पार करत आहे. आतापर्यंतच्या दहा भागात आपण भगवद्गीतेतील आत्मतत्व जाणण्याचा प्रयत्न केला. एका विशिष्ट क्रमाने श्रीकृष्ण संभ्रमावस्थेत असलेल्या अर्जुनाला उपदेश करतो. केवळ युद्धच नव्हे तर एकुणच आयुष्यात माणसाचा दृष्टीकोन कसा असावा याचे मार्गदर्शन या उपदेशाने प्राप्त होते.
माणसाचे आयुष्य हे एक निरंतर चालणारे द्वंद्वच आहे. दृष्य जगतातील बरेवाईट प्रसंग म्हणजेच ते द्वंद्व, असे मानून माणूस त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यामुळे केवळ एका पाठोपाठ एक अशा प्रसंगातून स्वतःला निभावून नेण्याचे कसब तो प्राप्त करतो. अखेर अनेक वर्षांच्या या अशा चकमकींनंतर त्याला हे उमगते की, ते युद्ध बाह्य जगाशी नसून अदृष्य अशा ‘स्व’शी आहे.
अर्जुनाला हीच जाणीव श्रीकृष्ण करून देतो. महाभारतात सतत युद्धे जिंकणाऱ्या अर्जुनाला कुरुक्षेत्रातही विजय मिळवण्याची खात्री असते. परंतु तरीही त्याला समाधान प्राप्त होत नसते. म्हणजे मग आपण आयुष्यभर केलेल्या युद्धांचे, युद्धकलेच्या अभ्यासाचे आणि एकुणच पार पाडलेल्या सर्व प्रसंगांचे फलित काय? जगण्यासाठीची धडपड करणाऱ्या लहानमोठ्या प्रत्येकाला हा प्रश्न पडतोच की – जन्मापासून शिक्षण, व्यवसाय, कुटुंब, उपजिविका, मालमत्ता, या सगळ्यांसाठी सतत संघर्ष करूनही जर अल्पजीवी समाधान मिळत असेल तर नक्कीच ते समाधान या सगळ्यांत नाहीये. खरं समाधान अंतरी आहे जे द्वंद्व आपण लढलोच नाही!
गीतेच्या अभ्यासाला याच प्रश्नावर अर्जुनाची आणि आपलीही सुरुवात होते. मग युद्ध करण्यास तयार नसलेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण सर्वप्रथम शरीर आणि आत्मा यांचे द्वैत समजावून सांगतो. देह नश्वर आहे आणि आत्मा शाश्वत आहे याचे ज्ञान करून देतो. मनुष्याचा केवळ कर्मावर अधिकार आहे त्याच्या फळावर नाही. त्यामुळे त्याने केवळ निःसंग वृत्तीने कर्म केले पाहीजे. त्यासाठी स्थिर प्रज्ञा हवी. अशी बुद्धी प्राप्त करण्यासाठी लागणारी संन्यस्त वृत्ती आणि त्यासाठीचा आत्मसंयम… अशाप्रकारे एकेका अध्यायातून आत्मज्ञानाची उतरंड श्रीकृष्ण अर्जुनाच्या समोर उभी करतो.
गीतेच्या अध्यायांची विभागणी करायची झाल्यास पहिले सहा अध्याय हा एक विभाग होईल. यात आत्मज्ञान किंवा स्वतःला जाणण्याची प्रक्रिया विस्तृतपणे मांडली आहे. माणसाच्या शाश्वत सुखाचा मार्ग अंतस्थ द्वंद्वात आहे आणि ते द्वंद्व कसे लढायचे याचे ज्ञान म्हणजे गीतेचा पहिल्या सहा अध्यायांचा विभाग. यात अर्जुनविषादाखेरीज सांख्ययोग, कर्मयोग, ज्ञानकर्मसंन्यास,कर्मसंन्यास आणि आत्मसंयमयोगाचा समावेश होतो. आत्मज्ञान म्हणजे स्वतःतील ईशतत्व जाणण्याचे ज्ञान. अशा ज्ञानी व्यक्तीला हेच ईशतत्व आपल्यासह प्रत्येक चराचर सृष्टीत अंशरुपाने वास करून राहते याचा प्रत्यय येतो. दृष्य सृष्टी ही भगवंताच्या मायेचा भाग आहे. त्या मायेच्याही पलिकडे असणाऱ्या परमात्म्याचा साक्षात्कार होणे म्हणजे विज्ञान. प्राप्त ज्ञानाचा प्रत्यय येणे म्हणजे विज्ञानयोग.
ज्ञानविज्ञानयोगात भगवंत पदार्थातील आपल्या वास्तव्याचे स्वरुप समजावून सांगतात. आत्मज्ञान प्राप्त केलेल्या व्यक्तीला सृष्टीचे व्यापक स्वरूप जाणता येते. चराचर सृष्टीचे आधारभूत तत्व एकच आहे हे त्याला जाणवते. ज्याला आपण विज्ञान (विशेष ज्ञान) म्हणुयात. जे दिसते ते आणि जे असते ते या दोन गोष्टींची जाण असणे म्हणजे विज्ञान. असे भगवंत सांगतात. आपण Science (विज्ञान) म्हणतो ते तरी दुसरे काय सांगते! दृष्य पदार्थ आणि त्यामागचे तत्व.
आपल्या स्वरुपाचे वर्णन करताना श्रीकृष्ण परा आणि अपरा अशा दोन प्रकृतींचा उल्लेख करतो. अपरा म्हणजेच समोर दिसणारी. जे आपल्याला समोर दिसते आणि जे आपल्या मन आणि बुद्धीने जाणता येते त्याला अपरा म्हटले आहे.

(**जाता जात हे ही सांगायला हरकत नाही की परा किंवा परोक्ष म्हणजे मागे किंवा दृष्टीआड आणि अपरा किंवा अपरोक्ष म्हणजे समोर. आपल्याकडे मराठीत हाच अपरोक्ष शब्द सर्वस्वी उलट अर्थाने वापरला जातो!!)

पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशा आठ प्रकारात विभागलेली दृष्य प्रकृती म्हणजे अपरा होय.

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च । अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा।

पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश या पंचमहाभूतांनी बनलेली दृष्य सृष्टी जी मन, बुद्धी आणि अहंकाराच्या माध्यमातून आपण जाणतो.
परा म्हणजे याच सृष्टीला गतिमान करणारे चैतन्य. जे आपल्याला दिसत नाही परंतु त्याचे अस्तीत्व जाणवते. परा म्हणजे दृष्टीच्या पलिकडे असणारे.

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्‌ । जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत्‌।

साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास
जिवंत व्यक्ती डोळ्यांच्या माध्यमातून पाहते. हाच अवयव मृत व्यक्तीलाही असतो पण त्याला दिसत नाही. मग दोन्हीत फरक कशाचा आहे तर चैतन्याचा…
परा म्हणजेच आपल्याला न दिसणारी परंतु अस्तीत्व असणारी माझी प्रकृती आहे असे श्रीकृष्ण सांगतो. याची उदाहरणे देत म्हणतो – “मी पाण्यातील रस आहे ,अग्नीतले तेज आहे आणि चंद्रसूर्यातील उर्जा…..”

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः । प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं नृषु।

दृष्याच्या पलिकडची ही प्रकृती जाणणे हे विज्ञान आहे. श्रीकृष्ण म्हणतो सृष्टीतील परा किंवा चैतन्य म्हणजे माझाच अंश असल्याने सृष्टीचे सनातन कारण मीच आहे. मग हे जाणण्यात चुकते कुठे. माया…..
श्रीकृष्ण पुढे सांगतो या सृष्टीत मनुष्याला आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक व्यक्ती या गोष्टींच्या आसक्तीत अडकतो आणि त्यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत राहतो. आसक्तीच्या पलिकडे जाऊन शाश्वत काय आणि नश्वर काय याचा विचारच बहुसंख्यांना पडत नाही. असे मोहावश लोक केवल प्राप्य वस्तूकडे पहात राहातात आणि दृष्याच्या पलिकडील चैतन्यस्वरूपाकडे पाठ फिरवतात. कृष्ण म्हणतो अशी ही अलौकीक माया तरून जाणे केवळ अशाच व्यक्तीला शक्य आहे जो अनन्यभावाने माझी निरंतर भक्ती करतो.

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते।

भक्त….
भक्तांचे चार प्रकार श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. अर्थार्थी, आर्त, जिज्ञासु आणि ज्ञानी.

चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन । आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ।

अर्थार्थी हा काहीएक प्राप्तीसाठी भक्ती करतो, तर आर्त भक्त संकटात देवाला आळवतो, जिज्ञासु भक्त भगवंताला जाणण्यासाठी भक्ती करतो तर ज्ञानी भक्त मात्र अनन्य भगवंताचे स्वरूप तत्वतः जाणतो आणि त्या स्वरुपाची भक्ती करतो. म्हणून भगवंताला तो अधिक प्रिय आहे असे श्रीकृष्ण म्हणतो.
पण मग इतर भक्त गैर आहेत का? अर्थातच नाहीत. ज्यांचे देव वेगळे आहेत ते चुकत आहेत का? तर तसेही नाही. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात एक ऋचा आहे

इन्द्रं मित्रं वरुणमग्निमाहुरथो दिव्य: स सुपर्णो गरुत्मान्।
एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु:।

सत्य किंवा परमात्मा एकच आहे. त्याला लोक वेगवेगळ्या नावांनी संबोधतात.
श्रीकृष्ण सांगतो की काळाच्या ओघात धर्मामध्ये अनेक देव, देवता, अवतारांचा उगम झाला. जसे ऋग्वेदातही इंद्र, मित्र, वरुण यासारख्या देवता होत्या. परंपरेनुसार लोक यातील कोणत्या ना कोणत्या देवतेची भक्ती करत आले आहेत. हे अर्थार्थी, आर्त किंवा जिज्ञासु भक्त होत. जे आपल्या कामनापुर्तीसाठी कोण्या एका देवतेची प्रामाणिकपणे भक्ती करतात. यात गैर काहीच नाही. किंबहुना अशा भक्तांना त्यांच्या भक्तीनुसार योग्य ते फळही मी देतो. जेणेकरून त्या भक्ताची त्या देवतेमधील श्रद्धा दृढ होते.

यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति । तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्।
‌ स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते। लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान्‌।

अशा भक्तांचा मार्ग हा किंचीत अधिक लांबतो. निरनिराळ्या नावाच्या मूर्त स्वरूपातील देवतांची भक्ती करणारा भक्तालाही शेवटी भगवद्स्वरूप एकच आहे याचा बोध होतो. दृष्य आणि नश्वर फल देणारा देवही अंतिमतः त्याच परमात्म्याचा अंश आहे हे जाणल्यानंतर मग तो भक्त सकाम भक्तीतून निष्काम भक्तीकडे वळतो.
ज्ञानी भक्ताला मात्र या नश्वर सृष्टीतला कोणताच लाभ नको असतो. या मायेपासून दूर रहात केवळ अनन्यभावनेने परमात्म्याची भक्ती करतो. म्हणून तो मला अधिक प्रिय आहे असे श्रीकृष्ण सांगतो.

तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते । प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः।

अशाप्रकारे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या दृष्य सृष्टीतही भगवंताचे अंशात्मक अधिष्ठान आहे हे जाणणे म्हणजे ज्ञान आणि त्या सृष्टीचा मोह त्यागून तिच्या मायेपलीकडच्या भगवंताला जाणणे म्हणजे विज्ञान हे भगवंत स्पष्ट करतात.
अशा विज्ञानी भक्तीचे उदाहरणच कबीराच्या सुंदर शब्दात पाहूयात.

पंडित शोधि कहो समुझाई, जाते आवागमन नशाई।
अर्थ धर्म औ काम मोक्ष कहु, कौन दिशा बसे भाई।
उत्तर कि दक्षिण पूरब की पश्चिम, स्वर्ग पताल कि माहीं।
बिना गोपाल ठौर नही कतहुँ, नर्क जात धौं काही।
अनजाने को स्वर्ग नर्क है, हरि जाने को नाही।
जेहि डर से भव लोग डरतु है, सो डर हमरे नाही।
कहहि कबीर सुनो हो सन्तों, जहां का पद तहाँ समाई।

पोकळ शास्त्रचर्चा करणाऱ्याला कबीर म्हणतात हे पंडीता असे काही ज्ञान दे की ज्याने जन्ममरणाचे बंधन (आवागमन) नष्ट होईल. हे धर्म, अर्थ, काम, मोक्ष, स्वर्ग, नरक वगैरे मंडळी कोठे असतात बाबा? आम्हाला काय कळणार? जर तुझे हे ब्रह्म सर्वत्र आहे तर मग जिथे नास्तिक मंडळी जातात तो नरक कुठे असतो? बाबा रे जो अंतरीच्या ‘हरी’ ला जाणत नाही त्याला स्वर्गही नरकच आहे आणि जो त्याला जाणतो त्याला स्वर्ग काय आणि नरक काय!!!!! आम्हाला हे ठाऊक आहे की आमच्या अंतरंगात ‘तो’ आहे म्हणून आम्हाला ना स्वर्ग हवा ना नरक…..

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग १० पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – अक्षरब्रह्मयोग

Copyright https://sheetaluwach.com/2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ९

राका व त्याची पत्नी बाका हे दोघे एका झोपडीत देवाची भक्ती करत आनंदाने रहात असतात. एके दिवशी रानात लाकडे गोळा करण्यासाठी फिरत असता राकाला एक सोन्याचे कंकण दिसते. राका विचार करतो की ‘आपण स्वतः तर मोहापासून दूर आहोत परंतु आपल्या बायकोला कदाचित याचा मोह होईल आणि ती आपल्याला हे कंकण घेण्याचा आग्रह करेल. तेव्हा आपण या कंकणावर माती टाकू यात म्हणजे मग तिला हे दिसणारच नाही आणि पुढचा प्रसंगही टळेल’. तो कंकणावर माती टाकू लागतो तेव्हा बाका तेथे येते आणि विचारते “हे तू काय करत आहेस?” राका सांगतो, “तूला मोह होऊ नये म्हणून सोन्याच्या कंकणावर माती टाकतो आहे.” बाका आश्चर्याने म्हणते, “म्हणजे तुला अजूनही सोने आणि माती वेगवेगळे दिसते तर!!”…..

अनासक्त कर्म करीत योग (ज्ञान) प्राप्त करणे म्हणजे कर्मयोग याची आता अर्जुनाला कल्पना आलेली आहे. तरीही त्याचे पुरेसे समाधान झालेले नाही. त्याच्या (आणि आपल्याही) आजूबाजूला अनेक लोक असे आहेत जे या मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतात. योग्यायोग्य कर्म जाणणे, ते आचरणात आणणे, वृत्तीने अनासक्त राहणे आणि ज्ञानप्राप्ती करणे अशा निरनिराळ्या पायऱ्यांवर ते धडपडत असतात…. आपल्या गोष्टीतला राकासुद्धा असाच अजूनही संभ्रमातच आहे. वास्तविक त्याला मोहाचा स्पर्शही झालेला नाही परंतु अंतर्बाह्य निर्विकार वृत्ती अजूनही त्याच्या ठायी दिसत नाही.
अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो की मग ज्याला ‘योगारुढ’ म्हणावे अशी अवस्था प्राप्त झालेला योगी कसा ओळखावा? मनोविजय दिसतो तितका सहजसाध्य नाही मग ज्याला तो साधला नाही त्याची गती काय होते? त्याच्या प्रयत्नांचे फलित काय?

आत्मसंयम……..

आपल्या उत्तरात भगवंत आत्मन्, संयम आणि संयमन अशी शब्दांची विभागणी करून अर्जुनाचे समाधान करतात.
सर्वप्रथम आत्मन् म्हणजे आपण स्वतः.. .
योगारुढ पुरुषाची त्याच्या मार्गावरील निष्ठा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. जोपर्यंत व्यक्ती आपल्या ध्येयाकडे निग्रहाने आणि अहर्निश वाटचाल करत नाही तोपर्यंत कोणत्याही बाह्य घटकाची मदत त्याला उपयुक्त ठरणार नाही.

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्‌। आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः।
स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण मनुष्य हा स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे.

यशस्वी लोकात आणि इतरांत असणारा फरक हा या ‘आत्मन्’ चा आहे. ध्येयप्राप्तीची अनिवार ओढ असणे ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. भगवंत सांगतात की हीच व्यक्तीच्या यशाची गुरुकिल्ली आहे. भगवंताची अनिवार ओढ असणारा भक्तच त्याला प्राप्त करण्याचा मार्ग हरतऱ्हेने साधतो. ज्याला हा आत्मन् साधत नाही तो स्वतःचीच मदत करण्यात अपयशी ठरलेला स्वतःचाच शत्रु होय.
पुढचा टप्पा अर्थातच संयमाचा…. भगवंत सांगतात की स्वतःवर विजय मिळविणारा साधक भौतिक संसारातील चढ उतारांनी विचलित होत नाही. सुखात आणि दुःखात, लाभ आणि नुकसानातही शांत राहतो. एकाच निर्विकार वृत्तीने तो सोने आणि मातीकडे पाहू शकतो. कारण त्याच्या मनात त्याच्या ध्येयापलिकडे दुसरे काही नसते.

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः। युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाञ्चनः।
ज्याचे अंतःकरण ज्ञान-विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला दगड, माती व सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे, असे म्हटले जाते.
परमात्मतत्वाचा स्पर्श झालेला असा व्यक्ती नित्य समाधानी असतो.

हे साधावे कसे? तर……….. संयमन

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता। योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः।
वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हलत नाही, तीच उपमा ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या चित्ताला दिली गेली आहे.

आपले चित्त जर दिव्याची ज्योत मानली तर त्याला विचलित करणारा वारा म्हणजे आपल्या इंद्रियांची ओढ! भगवंत सांगतात योगाभ्यासाने चित्त नियमन करता येते. एकांतात स्थिर आसनावर बसून मन एकाग्र करणारा योगी विचलित न होता कालांतराने शांततेचा अनुभव घेतो.

योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः।
मन व इंद्रिय यांसह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या निरिच्छ आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लीन करावे.
तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः। उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये।
त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा.
समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः। सम्प्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्‌।
शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत अचल ठेवून अन्य दिशांकडे न पाहता आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून स्थिर व्हावे.

येथे प्रत्येकाला चटकन् पडणारा प्रश्न अर्जुनालाही पडतो की मन हे अशाप्रकारे सहज ताब्यात येईल का? अर्थातच नाही. भगवंत सांगतात मनावर ताबा मिळविण्यासाठी ज्या शरीरात ते मन वास करते आधी ते शरीरही ताब्यात हवे……
त्यावरील श्रीकृष्णाचे विवेचन पुढील भागात…..

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ८ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग १०

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

अंतरंग – भगवद्गीता – भाग ८

अन्नमयादन्नमयमथवा, चैतन्यमेव चैतान्यात्| द्विजवर दूरीकर्तुम् वान्छसि, किम् ब्रूहि गच्छ गच्छेति।।

प्रातःकालचे गंगास्नान करुन देवदर्शनासाठी निघालेल्या शंकराचार्यांच्या मार्गात एक चांडाळ आपल्या कुत्र्यांसह आडवा येतो. सवयीने त्याला ‘दुर हो’ असे आचार्य म्हणतात. तेव्हा तो चांडाळ त्यांना प्रश्न करतो – “हे महात्मन् नक्की काय दूर करू? माझे शरीर? ते तर तुमच्यासारखेच पंचमहाभूतांनी बनलेले आहे आणि नश्वरही आहे. बरं शरीरस्थ चैतन्य/आत्मा दूर करू? तो तर तुमच्या माझ्यासकट सर्व विश्व व्यापून आहे मग त्याला त्याच्यातूनच दूर कसा करणार?” आपल्या सिद्धांताचे व्यावहारीक दर्शन घडवणाऱ्या त्या शब्दांनी भानावर आलेले शंकराचार्य त्या चांडाळातील ईशतत्व जाणून त्याला प्रणाम करतात.
या एका छोट्या कथेतून कित्येक गोष्टींचा उलगडा होतो!! चांडाळ असो वा आचार्य, कर्मयोगी असो वा संन्यासी, परमतत्वाचा स्पर्श झालेला प्रत्येक व्यक्ती समान असतो. त्यांच्या साध्याच्या आड त्यांच्या मार्गाचे भिन्नत्व येत नाही. चांडाळाला झालेले ज्ञान आणि संन्यस्त आचार्यांना झालेले ज्ञान हे एकाच परमेश्वराशी निगडीत आहे. प्राप्तीचा मार्ग भिन्न असणे हे त्यांच्या अंतःप्रेरणेशी निगडीत आहे पण त्यांचे साध्य एकच आहे त्यामुळेच त्यांनी अंगिकारलेले मार्गही तितकेच श्रेष्ठ आहेत. ज्ञान मोठे आणि कर्म गौण असा भेद येथे नाही.
आपल्यालाही असा अनुभव अनेकदा येतो जेव्हा एखाद्या सिद्धांतामागील तत्व उमगलेले असते परंतू व्यवहारात ती गोष्ट अंगिकारणे साधलेले नसते. साधे उदाहरण घ्यायचे तर रस्त्यावरील रहदारीच्या नियमांचे पालन!! हे नियम पाळणे हे प्रत्येकाला तत्व म्हणून पटलेले असते परंतू ते प्रत्यक्ष व्यवहारात आणणे जमत नसते. त्यासाठी अर्थातच प्रत्येकाची आपली कारणेही असतात. मग ते तत्व चुकीचे आहे असे मानायचे का? तर ते तर्काला पटत नाही. अशी मग गोंधळाची अवस्था माणसाला अनुभवाला येते. जे रहदारीच्या साध्या नियमांच्या बाबतीत खरे आहे ते आत्मज्ञानासारख्या दुष्प्राप्य गोष्टीत वेगळे कसे असेल? त्या बाबतचा गोंधळ अर्जुनाचाही होतो. मग येथे चुकते काय…..? तर तत्वावरील निष्ठा…. चांडाळाच्या शब्दांनी भानावर आलेले आचार्य त्याला प्रणाम करून अद्वैतावरील आपली निष्ठा सिद्ध करतात. बहुसंख्य व्यक्ती मात्र येथे गोंधळून जातात. काय करावे आणि काय करु नये हे ठरवता येत नाही. सोपा पण तर्काला न पटणारा मार्ग स्वीकारावा की कठीण पण शाश्वत कल्याण करणारा मार्ग स्वीकारावा? बहुतांशी लोक चटकन सोपा मार्ग स्वीकारतात आणि सिग्नल तोडून निघून जातात!! असे अनेक सिग्नल, प्रसंग, विचार चुकवून तर्काला मागे सारत एके दिवशी आयुष्यात अशा ठिकाणी येऊन पोचतात की जेथे तर्काला मागे सारणे अशक्य होते आणि वैचारीक गोंधळापेक्षा सिग्नलला थांबणे सोपे वाटायला लागते. अर्जुनही याच संभ्रमात आहे. कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे त्याला कर्माचे बंधन टाळून कर्म करायचे आहे पण मग त्यापेक्षा कर्मच टाळणे सोपे नाही का?
गीतेचा पाचवा अध्याय याच प्रश्नावर सुरु होतो. अर्जुन कृष्णाला प्रश्न करतो की एकीकडे कर्म टाकण्याचा उपदेश करतोस आणि कर्माची प्रशंसाही करतोस असे कसे. दोन्हीपैकी कल्याणकारक असे एक काहितरी सांग.

संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि । यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्‌।।

यावर कृष्णाचे उत्तर आजच्या परिस्थितीला सुसंगत असेच आहे. संन्यास आणि कर्मयोगात, कर्मयोग आचरण्यास सुलभ आहे असे कृष्ण सांगतो.
सर्वप्रथम आत्मज्ञानासारखे उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी निवडलेला मार्ग मग तो ज्ञान असो कर्म असो की भक्ती यात उणेअधिक काहीच नसते. ध्येय जितके उन्नत त्याच्या प्राप्तीचा मार्गही तितकाच श्रेष्ठ आहे असे आग्रही प्रतिपादन या अध्यायातून श्रीकृष्ण करतो. अर्थात व्यक्तीच्या परिस्थिती प्रमाणे मार्ग हे आचरण्यास सुलभ किंवा कठीण असू शकतात.

संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ । तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते।।

संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही कल्याणकारक आहेत. परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे.

श्रीकृष्णाच्या मते निष्क्रियता आणि निष्कर्मता यातील फरक जाणून खरी संन्यस्त वृत्ती अंगिकारणे हे प्रत्येकाला साध्य होणे कठीण आहे. त्यापेक्षा कर्मयोग आचरणात आणणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे अधिक सुलभ आहे. परंतु येथे हे नीट ध्यानात घेतले पाहीजे की कर्मयोग आणि संन्यस्त वृत्ती या दोन भिन्न गोष्टी असल्याचे समजणे हे मात्र चुकीचे आहे. कारण कर्मयोगी व्यक्ती शरीराने कर्म करत असते परंतु वृत्तीने संन्यस्त असते तर संन्यस्त व्यक्ती यातील कर्माच्या भागातूनही निवृत्ती पत्करते. त्यामुळे केवळ सर्वसंगपरित्याग करून अंगाला राख फासून ध्यानस्थ बसणे म्हणजेच संन्यास असे जर कोणी मानत असेल तर ते अयोग्य आहे. भगवंत पुढे असेही म्हणतात की संन्यस्त किंवा कर्मयोगी व्यक्तीला वेगवेगळी फळे मिळतात असे मानणेही मूर्खपणाचे आहे. दोन्हीतही मिळणारे फलित हे एकच असते. जो हे जाणतो तो खरा ज्ञाता.
मग कर्मयोगाला सुलभ म्हणायचे कारण काय? याचे विवेचन भगवंत पुढे करतात.

संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः। योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति॥

परंतु हे महाबाहो अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. भगवत्स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो.

इंद्रियांशी निगडीत कर्म करत राहणे परंतु त्या कर्माचे कर्तेपण स्वतःकडे न घेणे ही कला साध्य होणे अतिशय कठीण असते. त्यासाठी लागणारी साधना कर्मयोगाने सुलभ होते. व्यक्ती कर्माच्या बंधनाचे स्वरुप कर्म करता करता जाणायला लागते, आपल्या मनावर संयम प्राप्त करण्यास सक्षम होते आणि कालांतराने कर्म करूनही त्यापासून अलिप्त राहण्याचे ज्ञान प्राप्त करते.
आजच्या युगात व्यक्तीला शिक्षण, व्यवसाय, चरितार्थ, संसार आणि संगोपन अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडाव्या लागतात अशा वेळी आपले विहित कर्म प्रामाणिकपणे पार पाडणे त्याचवेळी मन कर्मफलाच्या बंधनातून मुक्त ठेवण्याचा यत्न करणे हे जास्त तर्कसंगत आहे असे भगवंत सांगतात. यातूनच कर्माचे कर्तेपण नाकारणे ही ज्ञात्याची अवस्था कर्मयोगीही प्राप्त करतो. फलाची आसक्ती नष्ट झाल्याने तो निरंतर मनःशांतीचा अनुभव घेतो आणि कमळावरील जलबिंदूप्रमाणे पापापासून अलिप्तही राहतो असे भगवंत सांगतात.

ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः।लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा॥

अशा चिरंतन मनःशांतीचा अनुभव घेणाऱ्या ज्ञात्याला भगवंत योगी आणि मुनी अशा संज्ञा वापरतात. अशा व्यक्तीला बाह्य विषयांची आसक्ती नसते, काम आणि क्रोध यामुळे उत्पन्न होणारा आवेग आवरण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी असते. इच्छा, भय आणि क्रोध या विकारांना दूर सारून परमात्म्याचे ध्यान करणारा असा व्यक्ती सात्विक आणि अक्षय आनंदात लीन असतो असे श्रीकृष्ण प्रतिपादन करतो.

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्‌ । अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्‌॥

गीता वाचत/शिकवत असताना अनेक प्रश्न असे येतात की त्यातून प्रश्नकर्त्याची गोंधळाची अवस्था ध्यानात येते. पहिल्याच लेखात आपण असे म्हणालो होतो की – बहुसंख्य वाचक गीतेचा तयार उत्तराच्या (Instant Remedy) अपेक्षेने अभ्यास करतात. त्यातील ज्ञान समजून घेण्याचा पुरेसा प्रयत्न करतातच असे नाही. खरी मेख येथे आहे. गीता एका विशिष्ट दृष्टीकोनाचे समर्थन करत नाही. किंबहूना गीता केवळ योग्य दृष्टीकोन विकसित करण्याचा मार्ग सुचवते. त्यानुसार वागून योग्य तो मार्ग निवडणे हे अभ्यासकाचे कार्य आहे. गीतेत ज्ञानयोग, कर्मयोग या दोन्ही योगांवर भगवंताने भाष्य केलेले आहे. व्यक्तीने आपल्या अंतःप्रेरणेने आणि परिस्थितीनुरुप भगवत्प्राप्तीचा कोणताही एक मार्ग निवडणे अपेक्षित आहे. याचा अर्थ निवडलेला एक मार्ग योग्य आणि दुसरा अयोग्य किंवा आपल्यापेक्षा भिन्न मार्गाने जाणारे चूक असा घेतला जातो. हे अभ्यासातले अपरिपक्वतेचे लक्षण आहे. ज्ञानयोग उजवा आणि कर्मयोग उणा असे मानणे मूर्खपणाचे आहे असे गीता स्पष्टपणे म्हणते. आत्मज्ञ होण्यासाठी व्यक्ती कोणता मार्ग निवडते यापेक्षा त्या मार्गावरून किती निष्ठेने वाटचाल करते हे जास्त महत्वाचे आहे. मार्ग हा व्यक्तीपरत्वे भिन्न असणार यात शंकाच नाही. अचल राहते ती निष्ठा जी कर्ममार्गी व्यक्तीला इंद्रियनिग्रह आणि ज्ञानी संन्यासाला नैष्कर्म्याप्रत नेते. ज्ञानकर्मसंन्यास, कर्मसंन्यास आणि आत्मसंयमयोग हे याच दृष्टीकोनाचे समर्थन करतात.

मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ७ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ९

Copyright sheetaluwach.com 2021 ©

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact