ब्लॉग पहावा लिहून!

तुम्हाला लिहायची आवड आहे का? निरनिराळ्या विषयांवर आपले म्हणणे मुद्देसुदपणे मांडणे तुम्हाला जमते का? तसे असेल तर तुम्ही उत्तम ब्लॉग लिहू शकता. याचा अर्थ तुम्ही ब्लॉगर बनू शकता का ? तर त्याचे उत्तर मात्र नाही असे असेल!
केवळ खूप खाणाऱ्याला जसे खवय्या किंवा खूप गाणाऱ्याला गवई म्हणता येत नाही तसेच केवळ खूप लिहिणाऱ्याला ब्लॉगर म्हणता येणार नाही. ब्लॉगर केवळ लिहित नाही. एखाद्या विषयावर उत्तम लेखन करून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची कला साध्य करणे म्हणजे ब्लॉगर बनणे. जर सादरीकरण उत्तम नसेल तर ती कला लोकांपर्यंत पोचणे कठीण होते. ब्लॉगचेही तसेच आहे. अनेक उत्तम ब्लॉग्ज वाचकांपर्यंत नीट न पोचल्याने वाचलेच जात नाहीत! त्यासाठी काय करावे आणि कसे करावे हे आपण पाहणार आहोत. आज ब्लॉगिंग हा केवळ छंद राहिला नसून उत्तम लिखाण, माहिती आणि ज्ञान लोकांपर्यंत पोचवण्याचा यशस्वी व्यवसाय म्हणून ब्लॉगिंगकडे पाहिले जाते.
तुम्ही केवळ छंद म्हणून ब्लॉग लिहित असाल आणि त्याचे वाचन तुमच्याशिवाय इतरांनी करावे किंवा करु नये असा तुमचा बाणा असेल तर तुम्हाला पुढे वाचायची आवश्यकता नाही!! तुमचा छंद हा तुमचा वैयक्तिक मामला आहे. लोकांना वाचायचे असल्यास वाचतील. अर्थात येथेही काही गोष्टी शिकणे क्रमप्राप्त आहे जसे की लेखनाचा मंच (ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म) निवडणे, पानाचे सुशोभिकरण (पेज डिझाईन) करणे इ.इ. त्याबद्दल पुढे येईलच.
परंतु जर तुमचा ब्लॉग हा अधिकाधिक लोकांनी पहावा, वाचावा असे वाटत असेल तर त्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागतील ज्याची आपण माहिती घेणार आहोत. ब्लॉग लिहायला सुरुवात करतानाच त्यातील खाचाखोचा नीट समजावून घेतल्या पाहिजेत नाही का?
ब्लॉगिंगची पहिली पायरी आहे ब्लॉग लिहिण्यासाठीचा मंच किंवा प्लॅटफॉर्म निवडणे. यात अनेक पर्याय आहेत. तुम्हाला ब्लॉगिंगमधून नक्की काय साध्य करायचे आहे यावर तुम्ही कोणता प्लॅटफॉर्म निवडायचा हे ठरते.

Blogging Platforms – ऑनलाईन लेखन करण्याची जागा..

सोप्या भाषेत सांगायचे तर तुमचे लिखाण इंटरनेटवर जाऊन वाचता येईल अशी जागा म्हणजे ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म. यात अनेक पर्याय आहेत. त्यांचे प्रकार खालीलप्रमाणे
१) ऑनलाईन फोरम्स (ऑनलाईन लिखाणाची व्यासपीठे, सोशल मिडीया इ.)
२) ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स (खास ब्लॉगिंगसाठी बनवलेल्या वेबसाईट्स)
३) तुमची स्वतंत्र वेबसाईट
१) ऑनलाईन फोरम्स – वर्तमानपत्रात वाचकांनी लिहिलेल्या लेखांचा एक कॉलम येतो. त्यात लोक आपले विचार, अनुभव इ. मांडत असतात. ऑनलाईन फोरम्स तसेच असतात. इंटरनेटवरती अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्या केवळ तुम्हाला लेखन करण्यासाठी, इतरांच्या लिखाणावर चर्चा करण्यासाठी, प्रश्न उत्तर आणि प्रत्युत्तरासाठी जागा उपलब्ध करून देतात. जसे मराठीत मायबोली, मिसळपाव किंवा कोरा यासारख्या वेबसाईटवरून तुम्ही हव्या त्या विषयांवर लिहू वाचू आणि चर्चा करू शकता. यात वेबसाईट्स तुम्हाला लेख लिहिण्यासाठी लागणारी सर्व प्राथमिक तयारी पुरवतात. तुमच्या लिखाणाला जागा पुरवणे, त्याची विषयवार क्रमवारी लावणे, लिखाणात चित्रे, व्हिडिओज, लिंक्स इ. टाकण्यासाठीची सोय करणे वाचकांच्या प्रतिसादाला जागा देणे इ.इ. याचे फायदे तोटे अनेक आहेत.
फायदे –
• अशा फोरम्सवर एकाचवेळी अनेक लोक लिहित आणि असंख्य लोक वाचत असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लिखाणासाठी आपसूकच वाचक मिळतात.
• तुमचे लिखाण आवडल्यास लोक तुम्हाला फॉलो करू शकतात आणि तुमचा असा स्वतःचा एक वाचकवर्ग यातून तयार होऊ शकतो.
• हे फोरम्स विनामूल्य (फुकट) वापरता येतात.
तोटे –
• अशा फोरम्सवरील लेखन हे पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात नसते. फोरमचे व्यवस्थापन ते फोरमवरून कधीही हटवू शकते.
• एकाच विषयावर अनेक लोक लिहित वाचत असल्याने तुमचे लिखाण चांगले असूनही गर्दीमुळे त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.
• वाचकांशी थेट संपर्क साधण्यावर फोरम्सचे नियंत्रण असते.
तुम्ही जर केवळ आवड म्हणूनच लिहित असाल तर असे फोरम्स उत्तम पर्याय आहेत. फक्त येथे तुम्ही ऑनलाईन लेखकांच्या गर्दीतले एक असल्याने तुम्हाला तुमची ओळख बनवायला बराच काळ जातो.
२) ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स – तुम्हाला जर छंद म्हणून लिहायचे असेल परंतु ते फोरम्सवरच्या गर्दीपेक्षा अधिक स्वतंत्र हवे असल्यास हा उत्तम पर्याय आहे. येथे तुम्ही स्वतःचे पान/साईट तयार करू शकता आणि विविध विषयांवर लिहू शकता. हे प्लॅटफॉर्म्स तुम्हाला लेखन, त्याचे व्यवस्थापन, पानाचे डिझाईन, इंटरनेटवर ते पान कसे दिसेल इ. सर्व सोयी पुरवतात. जसे तुम्ही फेसबुकवर लॉगीन करून स्वतःच्या पानावर जाता तसेच फकत खास लेखनासाठी वापरायचे म्हणून बनवलेले असे हे अनेक प्लॅटफॉर्म्स आजघडीला लाखो ब्लॉगर्स वापरतात. तुम्ही जर नव्यानेच ब्लॉगिंग करत असाल तर अशा प्लॅटफॉर्म्सचा वापर फायदेशीर ठरतो कारण ब्लॉग तयार करणे, त्याचे व्यवस्थापन, मार्केटिंग इ. साठी हे प्लॅटफॉर्म्स अनेक सुविधा पुरवतात. सध्या अनेक कंपन्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म पुरवतात. उदा. वर्डप्रेस(WordPress), ब्लॉगर (Blogger), विक्स (Wix), टम्ब्लर (Tumblr), घोस्ट (Ghost) असे अनेक पर्याय आहेत. हा प्रत्येक पर्याय कमीजास्त प्रमाणात सारख्याच सुविधा पुरवतो. आपल्या सोयीनुसार एक पर्याय निवडायचा. त्याबद्दल विस्ताराने नंतर लिहिनच.
फायदे –
• ब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममुळे फोरम्सवरील गर्दी टाळून तुमची स्वतःची स्वतंत्र ओळख बनवता येते.
• तुमच्या लिखाणावर तुमचे अधिक नियंत्रण राहते. चित्र, व्हिडिओ इ. च्या वापरावर मर्यादा येत नाहीत.
• वाचक आणि तुम्ही एकमेकांशी थेट संपर्क साधू शकता.
तोटे –
• ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या विनामूल्य सुविधा मर्यादित असतात. अधिक सुविधा मिळविण्यासाठी पैसे मोजावे लागतात.
• स्वातंत्र्य मर्यादित असते. उदा. तुमच्या वेबसाईटची लिंक किंवा इतर गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही.
• प्लॅटफॉर्मच्या फ्री अकाउंटवरून जाहिराती दाखवता येत नाहीत.
एकूणातच ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स हे हौशी परंतु व्यवासायिक इच्छा नसलेल्या लेखकांसाठी उत्तम पर्याय आहेत. अर्थातच यात पुढे लेखकाच्या यशाचा आणि लोकप्रियतेचा फायदा लेखकापेक्षा फोरमप्रमाणेच प्लॅटफॉर्मला अधिक होतो. लिखाणाशिवाय इतर काही उद्देश नसल्यास ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स हा एक उत्तम पर्याय आहे.
३. स्वतंत्र वेबसाईट – ब्लॉग लिहिण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे तुमची स्वतःची वेबसाईट तयार करणे. हा पर्याय तांत्रिकदृष्ट्या किचकट असल्याचा गैरसमज उगाचच पसरल्याने अनेकजण याचा विचार करत नाहीत. वास्तविक आजकाल स्वतंत्र वेबसाईट रजिस्टर करणे आणि डिझाईन करणे अतिशय सुलभ झाले आहे. अर्ध्या तासाच्या अवधित या सर्व गोष्टी करता येऊ शकतात. Go Daddy, Bluehost, Hostgator इ. अनेक वेबसाईटवरून तुम्हाला नवीन वेबसाईट नोंद करता येते. त्यासाठी खूप मोजके तांत्रिक ज्ञान लागते. स्वतंत्र वेबसाईट ही ब्लॉगिंग, त्याचे व्यवस्थापन, मार्केटिंग, व्यवसाय अशी सर्व प्रकारची दारे खुली करते ते ही कोणत्याही बंधनांशिवाय. स्वतंत्र वेबसाईट तुम्ही स्वतः डिझाईन करू शकता किंवा येथेही तुम्ही ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स वापरु शकता. ते तुम्हाला तुमची वेबसाईट मॅनेज करणे, डिझाईन, लेखन यासाठी पर्याय उपलब्ध करून देतात. हा कमी खर्चिक आणि अधिक स्वतंत्र पर्याय आहे. यात वर्डप्रेस (WordPress) अग्रगण्य आहे जो जवळपास सर्वप्रकारची साधने विनामूल्य उपलब्ध करून देतो. त्याबद्दल अर्थातच पुढे स्वतंत्र लेख येईल.
फायदे – • कोणत्याही बंधनांशिवाय लेखन करता येते.
• वेबसाईट व्यवस्थापन, डिझाईन, जाहिराती, वाचकांशी संपर्क या गोष्टींवर स्वतःचे पूर्ण नियंत्रण राहते.
• लिखाणाच्या लिंक्स, सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन, स्वतंत्र इमेल, चॅट अशा अनेक सुविधा वापरता येतात.
तोटे – या पर्यायाचे कोणतेही दृष्य तोटे नाहीत.
• डिझाईन, व्यवस्थापन, सुरक्षा, अपडेट्स, ऑप्टिमायझेशन इ. तांत्रिक बाबी स्वतःच सांभाळाव्या लागतात. अर्थात यासाठी ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्स आणि इतर अनेक सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.
ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या मदतीने चालवलेली स्वतंत्र वेबसाईट हा ब्लॉगिंगसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यात तुम्ही लेखनासह डिझाईन, तंत्रज्ञान आणि अर्थकारण या सर्व बाजू स्वतःच्या नियंत्रणात ठेऊ शकता आणि उत्तम ब्लॉगर बनू शकता. स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यासाठीचे पर्याय, ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म्सची तुलना इ. विषयी पुढील भागात.

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact