ओळख वेदांची – उपनिषद

उपनिषदे

शहाजहान बादशहाचे नाव घेतले की दोन गोष्टी अपरिहार्यपणे समोर येतात. एक अर्थातच ताजमहाल आणि दुसरा औरंगजेब! त्यापैकी ताजमहाल हा शहाजहान बादशहाने भारताला दिला की तो आधीपासूनच अस्तीत्वात होता हा वादाचा विषय आहे आणि औरंगजेब………… असो! परंतु फार प्रसिद्ध नसलेली आणि केवळ आपल्या कार्यामुळे भारताला उपयुक्त ठरलेली शहाजहानची आणखी एक देणगी म्हणजे त्याचा ज्येष्ठ पुत्र – दारा शिकोह.

इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात औरंगजेबाने मारलेल्या भावंडाच्या यादीतला एक भाऊ, केवळ इतकाच काय तो दाराचा आणि आपला परिचय. यापेक्षा त्याबद्दल अधिक काही वाचनात येत नाही.

भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया असणारी उपनिषदे पाश्चात्य जगतापर्यंत पोचवण्यात सिंहाचा वाटा असणारा पहिला ऐतिहासिक दुवा म्हणून दारा शिकोह चे नाव घेतले तर आश्चर्य वाटेल की नाही?!

पण हे खरं आहे. हिंदु आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचा तौलनिक अभ्यास दारा शिकोह ने केला होता. १६५७ च्या आसपास दारा शिकोह ने जवळपास ५० उपनिषदांची पर्शियन भाषेत भाषांतरे केली. पाश्चात्यांना पुरेशी माहीती नसणाऱ्या या महान ग्रंथांची ही भाषांतरे अब्राहम अंकेतिल द्युपरॉं (Abraham Hyacinthe Anquetil-Duperron) या फ्रेंच विद्वानाच्या हाती आली. त्याने १७९६ पर्यंत या सर्व भाषांतरीत उपनिषदांची लॅटिन भाषेत Oupnek’hat या नावाने भाषांतरे केली आणि पाश्चात्य जगताला भारतीय तत्त्वज्ञानाच्या या थोर परंपरेची ओळख करून दिली.

उपनिषदांवर खरेतर लिहायला लागू नये इतकी ती आता प्रसिद्ध झाली आहेत. जगभरात भारतीय तत्त्वज्ञानाचा कोणताही उल्लेख हा उपनिषदांशिवाय पूर्णच होत नाही. शॉपेनहाउएर (Arthur Schopenhauer) पासून आजतागायत अनेक पाश्चात्य विद्वानांनी उपनिषदांचा आणि त्यातील तत्त्वज्ञानाचा गौरव केला आहे.

आत्तापर्यंत आपण चारही वेद आणि ब्राह्मण ग्रंथांबाबत माहिती घेतली. यातून वैदिक धर्म, त्यातील देवता, यज्ञसंस्था, वेदकालीन लोक, त्यांचे जीवन या सर्व गोष्टींचा परिचय करून घेतला. यात वैदिक धर्मातील कर्मकांडांचा भागही आला. आता थोडे पुढे जाउयात. वैदिक धर्माची ज्ञानकांडे म्हणजे उपनिषदे.

उत्तरवेदकाळात यज्ञसंस्थेचे महत्व वाढत गेले. निरनिराळ्या देवता यज्ञ केल्याने संतुष्ट होऊन यज्ञ करणाऱ्या यजमानाच्या इच्छा पूर्ण करतात अशी धारणा पक्की होत गेली. परंतु त्यामुळे सुरुवातीला असणारे यज्ञसंस्थेचे उदात्त स्वरूप बदलले. अनेक प्रकारचे यज्ञ प्रचारात येऊन यज्ञसंस्थेची आणि पर्यायाने कर्मकांडाची बेसुमार वाढ होऊ लागली. देवदेवतांचे ‘प्रस्थ’ प्रमाणाबाहेर वाढत गेले. यातूनच देवाच्या अस्तीत्वाबद्दलच संशय निर्माण होऊ लागला. देव किंवा प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे नक्की काय या संदर्भातील जिज्ञासा वाढीस लागली. कर्मकांडरहित शुद्ध ज्ञान, ज्ञानोपासना आणि ब्रह्मजिज्ञासा दृढ होत गेली. हाच उपनिषदांचा आरंभ होय. आत्मा किंवा ब्रह्म यांचे एकरुपत्व स्पष्ट करणारे ज्ञान विस्तृतपणे मांडणे या उद्देशाने उपनिषदांची रचना झाली असे म्हणता येईल.

उपनिषदांमध्ये दोन प्रकारच्या विद्यांचा उल्लेख येतो.

परा विद्या – आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञानाशी संबंधित विद्येला परा विद्या अशी संज्ञा आहे.
अपरा विद्या – आपल्या डोळ्यासमोर असणाऱ्या दृष्यमान जगताशी संबंधित विद्येला अपरा विद्या म्हणता येईल.

**(जाता जात हे ही सांगायला हरकत नाही की परा किंवा परोक्ष म्हणजे मागे किंवा दृष्टीआड आणि अपरा किंवा अपरोक्ष म्हणजे समोर. आपल्याकडे मराठीत हाच अपरोक्ष शब्द सर्वस्वी उलट अर्थाने वापरला जातो!!)

उपनिषदांचा मुख्य विषय पराविद्य़ा हाच आहे.

उपनिषद या शब्दाचेही अनेक अर्थ प्रचलित झाले. यातील समजण्यासाठी सगळ्यात सोपा अर्थ म्हणजे – उप + नि + सद् अर्थात जवळ बसणे, म्हणजेच गुरुच्या जवळ बसून साधकाने प्राप्त केलेले ज्ञान. आदि शंकराचार्यांच्या मते अज्ञान नाहीसे करणारी ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद्.

उपनिषदांचा विषय त्याच्या नावातूनच नीट स्पष्ट होतो. डोळ्यासमोर असणाऱ्या दृष्यमान जगाच्या पलिकडे जाऊन तर्क आणि बुद्धीसामर्थ्याने ही सृष्टी समजून घेण्याचे ज्ञान म्हणजेच उपनिषदे.

वेदान्त – उपनिषदांना वेदान्त अशीही संज्ञा आहे. साधारणपणे वेदवाङ्मयाचे जर भाग पाडायचे झाले तर मंत्र, कर्म आणि ज्ञान असे तीन विभाग करता येतील. याची ग्रंथविभागणी खालीलप्रमाणे होईल.

मंत्र – मंत्रमय संहिता (प्रत्यक्ष वेद) कर्म – कर्मकांड आणि उपासनापद्धतीचे वर्णन करणारी ब्राह्मणे आणि आरण्यके ज्ञान – ज्ञानस्वरूप उपनिषदे

अशाप्रकारे उपनिषदे वेदवाङ्मायाच्या अंतिम टप्प्यात येतात म्हणून त्यास वेदान्त अशी संज्ञा वापरली जाते.

मुक्तिकोपनिषदात भगवान श्रीराम व हनुमंताचा संवाद आहे. कैवल्यरूप मुक्ति कोणत्या उपायाने प्राप्त होईल असे हनुमंताने विचारल्यावर भगवान राम उत्तर देतात –

इयं कैवल्यमुक्तिस्तु केनोपायेन सिद्ध्यति । माण्डूक्यमेकमेवालं मुमुक्षूणां विमुक्तये ॥ २६॥
तथाप्यसिद्धं चेज्ज्ञानं दशोपनिषदं पठ ।ज्ञानं लब्ध्वा चिरादेव मामकं धाम यास्यसि ॥ २७॥

मोक्षाची इच्छा करणाऱ्या साधकांना मुक्ती देण्यासाठी (एकटे) माण्डूक्य उपनिषद पुरेसे आहे. त्यातूनही जर ज्ञान किंवा उपरती साध्य झाली नाही तर (मात्र) दहा उपनिषदांचे अध्ययन कर. त्यामुळे (आत्म)ज्ञानासह माझे परमधाम (वैकुंठ?) प्राप्त होईल.

ही दहा उपनिषदे कोणती आणि त्यात काय सांगितले आहे. हे पुढील भागात……………

तळटिप
१. अथ परा, यया तदक्षरमधिगम्यते । – मुण्डकोपनिषद् १-१-६

मागील भाग – ओळख वेदांची – ब्राह्मण ग्रंथ पुढील भाग – ओळख वेदांची – उपनिषद

Copyright sheetaluwach.com 2020 ©

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact