ओळख वेदांची – उपनिषद – भाग २

उपनिषदे

छान्दोग्य उपनिषदात एक सुंदर गोष्ट आहे. गुरुगृही शिक्षण समाप्त करून श्वेतकेतु आश्रमातून परत येतो. ज्ञानप्राप्तीचा गर्व त्याच्या चेहेऱ्यावर दिसत असतो. त्याचे वडील आरुणि ऋषी चिंतेत पडतात. केवळ लौकिक शिक्षणानंतर आपला मुलगा अहंकारी बनला तर पारलौकिक किंवा आत्मविद्येचे ज्ञान त्याला कसे होणार? त्याला पुढील टप्पा गाठायला उद्युक्त कसे करणार? त्यांना एक युक्ती सुचते. ते श्वेतकेतुला बोलावतात. छाती पुढे काढून अतिशय उत्साहात श्वेतकेतु येतो.

आरुणि – बाळ श्वेतकेतु, गुरुकुलातून आल्यापासून तू किंचित गर्विष्ठ वाटत आहेस.
श्वेतकेतु – नाही बाबा, मी सखोल अभ्यासाने विद्या प्राप्त केली आहे. या ज्ञानामुळे मी परीपक्व झालोय. मला याचा अभिमान आहे गर्व नाही.
आरुणि – तू गुरुकुलातून उच्च ज्ञान प्राप्त करून आला आहेस. इतक्याच अभ्यासाचा तूला अभिमान वाटतोय? हरकत नाही, तर मग मला हे सांग की अशी कोणती गोष्ट आहे जी जाणल्यावर अप्राप्यही प्राप्त होते किंवा अज्ञातही ज्ञात होते ?
हा प्रश्न ऐकल्यावर श्वेतकेतु गोंधळात पडतो. अज्ञातही ज्ञात होण्याची विद्या कोणती? हे त्याला गुरुकुलात शिकवलेले नसते.
आरुणि – बाळा, विद्या शिकल्याने प्राप्त होणारे ज्ञान हे श्रेष्ठ असतेच परंतू ते अंतिम ज्ञान नव्हे. तू गुरुकुलात जे ज्ञान शिकलास ते बाह्य जगाबद्दलचे ज्ञान होते. ते जग जे आपल्याला पाहता येते तसेच स्पर्श, रस आणि गंध यांच्या माध्यमातून अनुभवता येते. परंतु त्या जगाचे अंतरंग आपल्या दृष्टीस पडत नाही. ते जाणून घेण्याची विद्या साध्य करता आली पाहिजे.
श्वेतकेतु – मी पुरेसे समजलो नाही बाबा. आपण थोडे विस्ताराने सांगाल काय?
आरुणि – हे तांब्याचे पात्र पहा. आपल्या डोळ्यांसमोर हे पात्र आहे. त्याचा उपयोग आपण करतो. अशा अनेक तांब्याच्या वस्तू आपण वापरतो. ही पात्रे आणि त्याचे उपयोग वेगवेगळे आहेत. मात्र त्याचे मूळ मात्र ‘ताम्र’ हा एकमेव धातूच आहे. तसेच आपल्याला दिसणारे जग हे सुद्धा वेगवेगळ्या स्वरुपात दिसत असले तरी त्याचे मूळ हे एकच तत्त्व आहे. ते तत्वच एकदा जाणले की संपूर्ण सृष्टीचे स्वरूप उलगडेल. पाण्यात विरघळलेले मीठ आपल्याला दिसत नाही परंतु त्याच्या खारट चवीवरून आपण ओळखतो तसेच सृष्टीतील प्रत्येक घटकात हे तत्व अंतर्भूत आहेच. सृष्टीच्या अंतरंगात शिरून ते जाणण्याचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान.

छान्दोग्य उपनिषदातील ही कथा/संवाद केवळ छान्दोग्यच नव्हे तर सर्वच उपनिषदांच्या विषयावर प्रकाश टाकते. सृष्टीचे कोडे उलगडण्यासाठी तिच्या अंतरंगात डोकावण्याचे कार्य उपनिषदे करतात. त्यामुळेच उपनिषदांचे विषय हे अदृष्याचे ज्ञान, आत्मज्ञान, तत्त्वज्ञान, ज्ञानोपासना असेच आहेत.

(** यावरून हे ही लक्षात यायला हरकत नाही की उपनिषदांचा विषय फक्त आणि फक्त आत्मानुभूतीचे तत्वज्ञान आहे. कोणत्याही देवाची उपासना किंवा पर्यायाने धर्माचा उपदेश प्रमुख उपनिषदात येत नाही. त्यामुळेच जगातील जवळपास सर्व जाती, धर्म आणि पंथाच्या तत्त्वज्ञांना उपनिषदे आकर्षित करतात.)

संवाद अर्थात (One on One Discussion)

आपण मागच्या लेखात पाहिले की उपनिषद शब्दाचा अर्थ (गुरुजवळ) बसून प्राप्त केलेले ज्ञान असा होतो. याच अर्थाला साजेसे असे हे संवाद सर्व प्रमुख उपनिषदांमध्ये येतात. गुरु-शिष्य, पिता-पूत्र, पती-पत्नी किंवा देव-मानव अशा अनेक प्रकारच्या संवादातून उपनिषदे अतिशय सहज सोप्या भाषेत गहन तत्वज्ञान मांडतात. आजकाल जसे Talk Shows किंवा Expert Interviews/Dialogues होतात तसेच.

आरुणि – श्वेतकेतु प्रमाणेच
याज्ञवल्क्य – मैत्रेयी (बृहदारण्यक उपनिषद),
याज्ञवल्क्य – गार्गी (बृहदारण्यक उपनिषद),
याज्ञवल्क्य – जनक राजा
(*सीता फेम नसावा पण त्याच वंशातला) (बृहदारण्यक उपनिषद),
अजातशत्रु – गार्ग्य बालाकि (कौषितकी उपनिषद),
यमराज-नचिकेता (कठोपनिषद),
शौनक – अंगिरस (मुण्डकोपनिषद),
कामलायन – सत्यकाम जाबाल (छान्दोग्य उपनिषद),
नारद – सनत्कुमार (छान्दोग्य उपनिषद)

असे अनेक संवाद उपनिषदांमध्ये येतात.

संख्या –

उपनिषदांची एकूण संख्या किती आणि त्यातील प्रमुख उपनिषदे कोणती हा नेहेमीच चर्चेचा विषय राहिला आहे. वेदवाङ्मयाचा भाग असल्याकारणाने प्रत्येक वेद व त्याच्या सर्व शाखांची उपनिषदे होती असा एक मतप्रवाह आहे. त्यानुसार उपनिषदांची संख्या जवळपास ११८० च्या आसपास भरते. मुक्तिकोपनिषदात १०८ उपनिषदांची नावे सांगितली आहेत त्यातील पहिल्या श्लोकात दहा प्रमुख प्राचीन उपनिषदे येतात. ती अशी

ईशकेनकठप्रश्नमुण्डमाण्डूक्यतित्तिरिः । ऐतरेयम् च छान्दोग्यं बृहदारण्यकम् तथा।। (ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्ड/मुण्डक, माण्डूक्य, तैत्तिरिय, ऐतरेय , छान्दोग्य तसेच बृहदारण्यक)

आदि शंकराचार्यांनी ११ उपनिषदांवर भाष्ये लिहीली यात वरील १० आणि श्वेताश्वतर उपनिषदाचा समावेश होतो. याखेरीज निरनिराळ्या विद्वानांनी गौरवलेली कौषीतकी, प्रश्न, मैत्री अशी इतरही काही उपनिषदे प्रमुख मानली जातात. यातील ईश, कठ आणि मुण्डक ही उपनिषदे पद्य तर बाकीची गद्य स्वरूपात आहेत.

विषय

संख्या आणि विषयाची खोली लक्षात घेता उपनिषदातील विषयांवर भाष्य करणे हे एका लेखाचे काम नव्हे. बाह्य सृष्टी आणि ब्रह्मरुप आत्मा या दोन्हीचे यथार्थ स्वरूप उपनिषदे मांडतात. श्वेतकेतु, मैत्रेयी, नचिकेत या सारख्या अनेक जिज्ञासुंच्या शंका आणि त्याचे गुरुतुल्य ऋषींनी विस्तृतपणे केलेले समाधान अशी मांडणीची सोपी पद्धत उपनिषदे अंमलात आणतात. मी कोण? हे जग कसे निर्माण झाले? याचा कर्ता कोण आहे? अशा वरवर साध्या वाटणाऱ्या परंतु अत्यंत गुढ अशा या शंका आहेत.

याखेरीज उत्कृष्ट वचने (वाक्ये), गोष्टी, वर्णने आणि भाष्य या माध्यमांचाही उपनिषदात उपयोग होतो.

आत्मा आणि ब्रह्मज्ञान हा उपनिषदांचा मुख्य विषय असला तरी त्या अनुषंगाने सृष्टीच्या जवळपास प्रत्येक घटकाचा तात्त्विक अंगाने उपनिषदे अभ्यास करतात.

साधे उदाहरण घ्यायचे तर आजकाल प्रसिद्धीस आलेल्या ‘योग’ (आजच्या भाषेत योगा (Yoga)) चे मूळ हे श्वेताश्वतर उपनिषदात आढळते. प्राणाचा अवरोध, इंद्रियदमन आणि समाधी स्थिती यावर विस्तृत भाष्य या उपनिषदाच्या दुसऱ्या अध्यायात येते. अगदि योगाभ्यासासाठी योग्य जागेच्या निवडीपासून ते समाधी स्थितीतील जीवात्म्याला होणाऱ्या परमात्म्याच्या दर्शनपर्यंतचे विचार या उपनिषदात मांडले आहेत. अशाच प्रकारे ॐकार (प्रणव) तसेच इतर प्रतीकांची उपासना, यज्ञ, कर्म, वर्तन, वाणी, विचार अशा असंख्य विषयांवरचे तत्वज्ञान उपनिषदातून मिळते.

महावाक्ये

ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत. तांब्याच्या पात्राच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे – स्वतः कोण आहोत याचे रहस्य जाणणे म्हणजेच सृष्टीचे रहस्य जाणणे होय. ही उपनिषदांची शिकवण आहे. या अर्थाची जी वाक्ये उपनिषदात येतात त्यांना महावाक्ये म्हणतात. प्रत्येक वाक्य एकेका वेदाशी संबंधित उपनिषदात येते.

१. प्रज्ञानं ब्रह्म। (ऐतरेय उपनिषद) (प्रकट ज्ञान हेच ब्रह्म आहे)
२. अहं ब्रह्मास्मि। (बृहदारण्यक उपनिषद) (मी (आत्मा) ब्रह्म आहे),
सोSहम्। (ईशोपनिषद) (तो मीच आहे)
३. तत्त्वमसि। (छान्दोग्य उपनिषद) (ते (ब्रह्म) तू आहेस)
४. अयमात्मा ब्रह्म। (माण्डूक्य उपनिषद) (हा आत्मा ब्रह्म आहे)
गूढ तसेच अर्थगर्भ अशी ही वाक्ये वाचली की उपनिषदांना भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया का म्हणतात ते लक्षात येते.

आपल्या परिचयाचे

आपल्या भारताच्या राष्ट्रीय चिन्हातील ‘सत्यमेव जयते’ हे वाक्य उपनिषदातलेच आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे याच अर्थाचे Pravda vítězí (सत्याचाच विजय होतो) हे वाक्य चेक प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय चिन्हात येते.

आपण नेहेमी म्हणत आलेला –

भ॒द्रं कर्णे॑भिः श‍ृणुयाम देवा भ॒द्रं प॑श्येमा॒क्षभि॑र्यजत्राः । स्थि॒रैरङ्गै॑स्तुष्टु॒वांस॑स्त॒नूभि॒र्व्य॑शेम दे॒वहि॑तं॒ यदायुः॑।

हा ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातला मंत्र माण्डूक्य उपनिषदाच्या सुरुवातीला येतो. ‘स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः’ हा स्वस्तिमंत्र याच उपनिषदात पुढे येतो.

महत्व

केवळ भारतीयच नव्हे तर तत्वज्ञानाच्या एकूणच इतिहासात उपनिषदांचे स्थान अजोड आहे. दारा शिकोह ने स्वतःच म्हटल्याप्रमाणे ‘नव्याने प्रचलित होणा-या अनेक धर्मांची शिकवण ही केवळ उपनिषदातील तत्वांचेच पुनःप्रक्षेपण आहे.’ पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा सर्वच विद्वानांनी उपनिषदांचा गौरव केला आहे. यात केवळ तत्त्वज्ञच नव्हे तर कवि, लेखक, शास्त्रज्ञांसह सर्व धर्मीय अभ्यासकांचा समावेश होतो. उपनिषदांचा हा प्रचंड प्रभाव १७९६ च्या पहिल्या पाश्चात्य भाषांतरानंतर केवळ गेल्या २०० वर्षात पडलाय. यावरून हजारो वर्षांपूर्वी हे तत्त्वज्ञान सोप्या आणि सहज मांडणाऱ्या भारतीय ऋषींच्या बुद्धीसामर्थ्याची कल्पना येते.

तळटीप

१. सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत्‌ सत्यस्य परमं निधानम्‌ ॥ (मुण्डकोपनिषद – तृतीय मुण्डक – खंड १ मंत्र ६)
२. भ॒द्रं कर्णे॑भिः श‍ृणुयाम देवा भ॒द्रं प॑श्येमा॒क्षभि॑र्यजत्राः ।
स्थि॒रैरङ्गै॑स्तुष्टु॒वांस॑स्त॒नूभि॒र्व्य॑शेम दे॒वहि॑तं॒ यदायुः॑ ॥ ऋग्वेद मंडल १.सूक्त ८९ ऋचा ०८

मागील भाग – ओळख वेदांची – उपनिषद पुढील भाग – ओळख वेदांची – आरण्यक

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

ओळख वेदांची – उपनिषद

उपनिषदे

शहाजहान बादशहाचे नाव घेतले की दोन गोष्टी अपरिहार्यपणे समोर येतात. एक अर्थातच ताजमहाल आणि दुसरा औरंगजेब! त्यापैकी ताजमहाल हा शहाजहान बादशहाने भारताला दिला की तो आधीपासूनच अस्तीत्वात होता हा वादाचा विषय आहे आणि औरंगजेब………… असो! परंतु फार प्रसिद्ध नसलेली आणि केवळ आपल्या कार्यामुळे भारताला उपयुक्त ठरलेली शहाजहानची आणखी एक देणगी म्हणजे त्याचा ज्येष्ठ पुत्र – दारा शिकोह.

इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात औरंगजेबाने मारलेल्या भावंडाच्या यादीतला एक भाऊ, केवळ इतकाच काय तो दाराचा आणि आपला परिचय. यापेक्षा त्याबद्दल अधिक काही वाचनात येत नाही.

भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया असणारी उपनिषदे पाश्चात्य जगतापर्यंत पोचवण्यात सिंहाचा वाटा असणारा पहिला ऐतिहासिक दुवा म्हणून दारा शिकोह चे नाव घेतले तर आश्चर्य वाटेल की नाही?!

पण हे खरं आहे. हिंदु आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचा तौलनिक अभ्यास दारा शिकोह ने केला होता. १६५७ च्या आसपास दारा शिकोह ने जवळपास ५० उपनिषदांची पर्शियन भाषेत भाषांतरे केली. पाश्चात्यांना पुरेशी माहीती नसणाऱ्या या महान ग्रंथांची ही भाषांतरे अब्राहम अंकेतिल द्युपरॉं (Abraham Hyacinthe Anquetil-Duperron) या फ्रेंच विद्वानाच्या हाती आली. त्याने १७९६ पर्यंत या सर्व भाषांतरीत उपनिषदांची लॅटिन भाषेत Oupnek’hat या नावाने भाषांतरे केली आणि पाश्चात्य जगताला भारतीय तत्त्वज्ञानाच्या या थोर परंपरेची ओळख करून दिली.

उपनिषदांवर खरेतर लिहायला लागू नये इतकी ती आता प्रसिद्ध झाली आहेत. जगभरात भारतीय तत्त्वज्ञानाचा कोणताही उल्लेख हा उपनिषदांशिवाय पूर्णच होत नाही. शॉपेनहाउएर (Arthur Schopenhauer) पासून आजतागायत अनेक पाश्चात्य विद्वानांनी उपनिषदांचा आणि त्यातील तत्त्वज्ञानाचा गौरव केला आहे.

आत्तापर्यंत आपण चारही वेद आणि ब्राह्मण ग्रंथांबाबत माहिती घेतली. यातून वैदिक धर्म, त्यातील देवता, यज्ञसंस्था, वेदकालीन लोक, त्यांचे जीवन या सर्व गोष्टींचा परिचय करून घेतला. यात वैदिक धर्मातील कर्मकांडांचा भागही आला. आता थोडे पुढे जाउयात. वैदिक धर्माची ज्ञानकांडे म्हणजे उपनिषदे.

उत्तरवेदकाळात यज्ञसंस्थेचे महत्व वाढत गेले. निरनिराळ्या देवता यज्ञ केल्याने संतुष्ट होऊन यज्ञ करणाऱ्या यजमानाच्या इच्छा पूर्ण करतात अशी धारणा पक्की होत गेली. परंतु त्यामुळे सुरुवातीला असणारे यज्ञसंस्थेचे उदात्त स्वरूप बदलले. अनेक प्रकारचे यज्ञ प्रचारात येऊन यज्ञसंस्थेची आणि पर्यायाने कर्मकांडाची बेसुमार वाढ होऊ लागली. देवदेवतांचे ‘प्रस्थ’ प्रमाणाबाहेर वाढत गेले. यातूनच देवाच्या अस्तीत्वाबद्दलच संशय निर्माण होऊ लागला. देव किंवा प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे नक्की काय या संदर्भातील जिज्ञासा वाढीस लागली. कर्मकांडरहित शुद्ध ज्ञान, ज्ञानोपासना आणि ब्रह्मजिज्ञासा दृढ होत गेली. हाच उपनिषदांचा आरंभ होय. आत्मा किंवा ब्रह्म यांचे एकरुपत्व स्पष्ट करणारे ज्ञान विस्तृतपणे मांडणे या उद्देशाने उपनिषदांची रचना झाली असे म्हणता येईल.

उपनिषदांमध्ये दोन प्रकारच्या विद्यांचा उल्लेख येतो.

परा विद्या – आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञानाशी संबंधित विद्येला परा विद्या अशी संज्ञा आहे.
अपरा विद्या – आपल्या डोळ्यासमोर असणाऱ्या दृष्यमान जगताशी संबंधित विद्येला अपरा विद्या म्हणता येईल.

**(जाता जात हे ही सांगायला हरकत नाही की परा किंवा परोक्ष म्हणजे मागे किंवा दृष्टीआड आणि अपरा किंवा अपरोक्ष म्हणजे समोर. आपल्याकडे मराठीत हाच अपरोक्ष शब्द सर्वस्वी उलट अर्थाने वापरला जातो!!)

उपनिषदांचा मुख्य विषय पराविद्य़ा हाच आहे.

उपनिषद या शब्दाचेही अनेक अर्थ प्रचलित झाले. यातील समजण्यासाठी सगळ्यात सोपा अर्थ म्हणजे – उप + नि + सद् अर्थात जवळ बसणे, म्हणजेच गुरुच्या जवळ बसून साधकाने प्राप्त केलेले ज्ञान. आदि शंकराचार्यांच्या मते अज्ञान नाहीसे करणारी ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद्.

उपनिषदांचा विषय त्याच्या नावातूनच नीट स्पष्ट होतो. डोळ्यासमोर असणाऱ्या दृष्यमान जगाच्या पलिकडे जाऊन तर्क आणि बुद्धीसामर्थ्याने ही सृष्टी समजून घेण्याचे ज्ञान म्हणजेच उपनिषदे.

वेदान्त – उपनिषदांना वेदान्त अशीही संज्ञा आहे. साधारणपणे वेदवाङ्मयाचे जर भाग पाडायचे झाले तर मंत्र, कर्म आणि ज्ञान असे तीन विभाग करता येतील. याची ग्रंथविभागणी खालीलप्रमाणे होईल.

मंत्र – मंत्रमय संहिता (प्रत्यक्ष वेद) कर्म – कर्मकांड आणि उपासनापद्धतीचे वर्णन करणारी ब्राह्मणे आणि आरण्यके ज्ञान – ज्ञानस्वरूप उपनिषदे

अशाप्रकारे उपनिषदे वेदवाङ्मायाच्या अंतिम टप्प्यात येतात म्हणून त्यास वेदान्त अशी संज्ञा वापरली जाते.

मुक्तिकोपनिषदात भगवान श्रीराम व हनुमंताचा संवाद आहे. कैवल्यरूप मुक्ति कोणत्या उपायाने प्राप्त होईल असे हनुमंताने विचारल्यावर भगवान राम उत्तर देतात –

इयं कैवल्यमुक्तिस्तु केनोपायेन सिद्ध्यति । माण्डूक्यमेकमेवालं मुमुक्षूणां विमुक्तये ॥ २६॥
तथाप्यसिद्धं चेज्ज्ञानं दशोपनिषदं पठ ।ज्ञानं लब्ध्वा चिरादेव मामकं धाम यास्यसि ॥ २७॥

मोक्षाची इच्छा करणाऱ्या साधकांना मुक्ती देण्यासाठी (एकटे) माण्डूक्य उपनिषद पुरेसे आहे. त्यातूनही जर ज्ञान किंवा उपरती साध्य झाली नाही तर (मात्र) दहा उपनिषदांचे अध्ययन कर. त्यामुळे (आत्म)ज्ञानासह माझे परमधाम (वैकुंठ?) प्राप्त होईल.

ही दहा उपनिषदे कोणती आणि त्यात काय सांगितले आहे. हे पुढील भागात……………

तळटिप
१. अथ परा, यया तदक्षरमधिगम्यते । – मुण्डकोपनिषद् १-१-६

मागील भाग – ओळख वेदांची – ब्राह्मण ग्रंथ पुढील भाग – ओळख वेदांची – उपनिषद

Copyright sheetaluwach.com 2020 ©

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact