(How to register a domain) डोमेन रजिस्ट्रेशन कसे करावे?

मागच्या भागात आपण मराठीत ब्लॉग कसा तयार करायचा? ब्लॉग लिहिण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत? याची प्राथमिक माहिती घेतली. स्वतंत्र वेबसाईट तयार करणे ही व्यवसायिक ब्लॉगिंगची पहिली पायरी असते हे आपण शिकलो. अशी साईट तयार करण्यासाठची पहिली पायरी म्हणजेच डोमेन रजिस्ट्रेशन (Domain Registration) आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी होस्टिंग प्लॅन Hosting Plan) कसा निवडायचा हे आपण या भागात पहाणार आहोत.
सर्वप्रथम येथे काही तांत्रिक (technical) शब्द सतत आपल्या कानावर येतील त्याची नीट माहिती घेऊ.

डोमेन (Domain) आणि होस्टिंग (hosting).

डोमेन (Domain) – कोणत्याही वेबसाईवर जाण्यासाठी जो पत्ता तुम्ही टाईप करता त्यातले त्या वेबसाईटचे जे अद्वितीय/वेगळे (Unique) नाव म्हणजे डोमेन (Domain) किंवा डोमेन नेम (Domain Name). उदा. तुम्ही फेसबुक उघडताना www.facebook.com टाईप करता. यातले www आणि .com हे शब्द इंटरनेटशी संबंधीत असतात तर facebook हे त्या वेबसाईटचे डोमेन (Domain) असते.
तुम्ही जेव्हा तुमची नवीन वेबसाईट तयार करणार असता तेव्हा त्याचे नाव किंवा डोमेन (Domain) हा अतिशय महत्वाचा भाग असतो. कारण ती तुमच्या ब्लॉगची ओळख असते. जसे माझ्या ब्लॉगचे नाव ‘शीतलउवाच’ आहे. त्यामुळे वेबसाईट उघडताना www.sheetaluwach.com टाईप करावे लागते. या डोमेन (Domain)वरून साईटचे नाव आणि त्याचा उद्देश लक्षात येतो. फेसबुक, ट्विटर किंवा इतर वेबसाईट्सचेही तसेच आहे.
तुमच्या वेबसाईटचे डोमेन नेम (Domain Name) नीट ठरवा ते इतरांपेक्षा वेगळे आणि आधीपासून वापरले गेलेले नसावे. या डोमेन नेम (Domain Name)वरून तुमची ओळख बनणार असल्याने ते काळजीपूर्वक आणि विषयाशी संबंधीत निवडा. डोमेन नेम निवडताना (Domain Name)काही संकेत पाळणे आवश्यक आहे.
ते –
१. कमीतकमी अक्षरांचे असावे. २. उच्चार आणि टाईप करण्यासाठी सोपे असावे ३. नाव सहज ध्यानात राहील असे असावे.
हे नाव टाईप करून लोक तुमच्या ब्लॉगला भेट देणार, त्यामुळे वाचकांना ते सहज भावेल असे असावे. २. होस्टिंग (Hosting) – डोमेन (Domain) किंवा तुमच्या वेबसाईटसंबंधित माहिती फाईल्स जेथे स्टोअर होतात त्या जागेला किंवा प्रक्रियेला होस्टिंग (hosting) असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी तुमच्या वेबसाईटचा डाटा (Data) ठेवलेला असतो. जसे आधार कार्ड काढून देणारी केंद्रे असतात तसेच तुमचे डोमेन (Domain) रजिस्टर करणाऱ्याही वेबसाईट्स असतात. जसे अनेक पर्यायातून आपण डिश टिव्हीचे पॅकेज निवडतो तसे होस्टिंगचेही अनेक पर्याय या वेबसाईटसवरून निवडता येतात.

डोमेन रजिस्ट्रेशन (Domain Registration)

एकदा तुमच्या वेबसाईटचे बारसं झालं म्हणजे डोमेन नेम (Domain Name) तुम्ही ठरवलंत की मग तुम्ही होस्टिंग पुरवणाऱ्या कोणत्याही वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशनक करु शकता. उदाहरणार्थ . Go Daddy, Bluehost, Hostgator यासाठीचा खर्च हा तुम्ही घेत असलेल्या पॅकेजवर अवलंबून आहे. साधारण सर्वच वेबसाईटवर हे प्लॅन्स खाली दिलेल्या दोन चित्रात दाखवले आहेत त्याप्रमाणे दिसतात.

Hosting Plans
Hosting Plans

यातला इमेलचा पर्याय सोडला तर बाकीचे पर्याय हे ब्लॉगिंगसाठी किमान पहिल्या वर्षात तरी फारसे उपयोगाला येत नाहीत असा अनुभव आहे. तेव्हा तुम्हाला जर स्वतंत्र इमेल नको असेल तर स्वस्तात स्वत प्लॅन निवडा. अधिक चिकित्सा करून हातात फारसं काही पडणार नाहीये!
एकदा प्ल्रॅन निवडल्यावर पुढे जा. आवश्यक माहिती भरताना तुम्हाला तुमच्या डोमेन (Domain) चे नाव रजिस्टर करायचा पर्याय उपलब्ध होईल. तुम्ही ठरवलेले डोमेन नेम (Domain Name) जेव्हा तुम्ही टाईप कराल तेव्हा ते नाव उपलब्ध आहे की नाही हे तुम्हाला कळेल. जर नाव उपलब्ध असेल तर प्रश्नच मिटला. परंतु जर नाव आधीच वापरले असेल तर तुम्ही दुसरा पर्याय निवडू शकता जसे .com ऐवजी .in किंवा co.in इ. डोमेन नेम (Domain Name) वापरात असल्याचा आणि इतर पर्यायांची सूचना खालीलप्रमाणे दिसते.

Domain Name Availability

त्यातील एक निवडून पुढील प्रक्रिया पार पाडली की झालं. जाता जाता काही अधिकच्या तांत्रिक संकल्पना पाहूयात. होस्टिंग प्लॅन निवडताना त्याची माहिती असल्यास मदत होईल.
Shared Hosting शेअर्ड होस्टिंग –
हे शेअर रिक्षासारखे प्रकरण आहे. जसे तुम्ही एका रिक्षातली जागा आणि भाडे दोन्ही शेअर करता तसे एकाच सर्व्हरवर जेव्हा तुमच्या वेबसाइटसह इतर वेबसाइटचाही डाटा (Data) म्हणजेच माहिती साठवली जाते त्याला शेअर्ड होस्टिंग (Shared Hosting) म्हणतात. साधारणतः जेव्हा तुम्ही लहान व्यवसाय किवा ब्लॉग चालवता तेव्हा हा पर्याय उपयुक्त असतो कारण हा तुलनेत स्वस्त पर्याय आहे. तुमची वेबसाईट अन्य वेबसाइटसह सर्व्हर स्पेस, साधने इ. शेअर करत असल्याने त्याचा खर्चही वाटून घेतला जातो.
येथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहीजे की इतर वेबसाइट्स बरोबर जागेसह इतर साधनेही शेअर करत असल्याने सर्व्हरच्या कार्यक्षमतेवर सगळ्यांचा एकत्रित परीणाम होतो. त्यामुळे इतर वेबसाईट्च्या ट्रॅफिकचा तुमच्या वेबसाईटच्या वेगावरही परीणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी होस्टींग प्लॅन (Hosting Plan) नामवंत आणि विश्वसनीय साईटवरूनच निवडा. अशा वेबसाईट एका सर्व्हवर त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वेबसाइटस् लोड करत नाहीत जेणेकरून शेअर्ड होस्टींग असले तरी अडचण येत नाही.
Dedicated Server डेडीकेटेड (स्वतंत्र) सर्व्हर – येथे एक संपूर्ण सर्व्हर केवळ तुमची वेबसाईट होस्ट करण्यासाठी वापरला जातो. अर्थातच त्यामुळे हा अत्यंत खर्चिक पर्याय ठरतो. जेव्हा तुमची वेबसाईट उत्तम बिझनेस करत असेल आणि तुम्हाला विना अडथळा ट्रॅफिक हवे असेल तेव्हा हा पर्याय तुम्ही वापरु शकता. डेडीकेटेड (स्वतंत्र) सर्व्हरचे प्लॅन काहीसे खालीलप्रमाणे असतात.

Dedicated Hosting Plans

Uptime अपटाईम – वेबसाईट अपटाईम याचा अर्थ तुमच्या वाचकांना किंवा वापरकर्त्यांना ठरावीक काळात तुमची वेबसाईट वापरण्यासाठी किती वेळ उपलब्ध होती याचे गुणोत्तर.
म्हणजेच साध्या भाषेत दिवसभरातील दुकान चालू असण्याची वेळ आणि दिवसाचे एकूण तास याचे प्रमाण. वेबसाईट ऑनलाईन असल्याने ती सतत कार्यरत असणे अपेक्षित असते. म्हणजेच अपटाईम १००% असावा. परंतु हे लक्ष्य झाले. महिना किंवा वर्षाच्या कालावधीत हे प्रमाण साधारण ९९% पर्यंत असले तरी चांगले मानले जाते.
बॅकअप (Back Up) – जसे तुम्ही तुमच्या संगणकाचा बॅकअप म्हणजे डाटा इतरत्र स्टोअर करून ठेवता तसेच तुमच्या वेबसाईटच्या संपूर्ण फाईल्स, माहिती इ. सुरक्षित करण्यासाठी त्याचा स्नॅपशॉट (Snap Shot)घेतला जातो याला बॅकअप असे म्हणतात.
यात वेबसाईटच्या प्रणाली (Coding)फाईल्स, माहितीसाठा (Database), चित्रे (Pictures) किंवा मिडीया (Media) आणि इतर तांत्रिक गोष्टी जसे की प्लगइन (Plugin), थिम्स (Themes) डिझाईन इ. गोष्टी साठवल्या जातात. दुर्दैवाने जर तुमची वेबसाईट क्रॅश झाली किंवा काही कारणाने केलेले बदल नको असतील तर तुम्ही जुना बॅकअप पुन्हा इंस्टॉल करू शकता आणि तुमची वेबसाईट पूर्ववत करु शकता.
होस्टिंग प्लॅन निवडताना बॅकअप ची सुविधा मिळत असेल तर घ्यायला हरकत नाही. अर्थात यासाठी इतरही पर्याय असतात.
जाता जाता वेब होस्टिंग (Web Hosting) आणि डोमेन (Domain) रजिस्ट्रेशन करतानाच्या प्रमुख टिप्स नीट मनात ठसवा
१. डोमेन नेम (Domain Name) कमीतकमी अक्षरांचे असावे.
२. ते उच्चार आणि टाईप करण्यासाठी सोपे असावे.
३. नाव सहज ध्यानात राहील असे असावे.
४. होस्टींग (Hosting) प्लॅन निवडताना तुमच्या गरजा ध्यानात घेऊन निवड करा.
५. वेबसाईटचा अपटाईम (Up Time) जास्तीत जास्त असावा.
६. होस्टिंग विक्रिपश्चात (Post Sales ), तांत्रिक सेवा (Technical Support) किंवा इतर अडचणी सोडवणारा कस्टमर केअर (Customer Care) विभाग चांगला असावा.
७. वेबसाईचा नियमित बॅकअप (Back Up) घेण्याची सुविधा असलेला प्लॅन निवडा.
८. होस्टिंग प्लॅनमध्येच सुरक्षा (Security), सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) इ. सुविधा मिळत असल्यास उत्तमच.
९. या सर्व सूचनांसह तुमच्या बजेटमध्ये बसणारी आणि साधारण योग्य अशी किंमत देणारा प्लॅन निवडा.

एकदा डोमेन नेम (Domain Name) रजिस्टर झाले आणि होस्टिंग प्लॅन (Hosting Plan) निवडला की किमान वर्षभरासाठी तरी तुमची चिंता मिटली. आता तुम्ही वेबसाईटचे डिझाईन आणि लेखनावरती लक्ष केंद्रित करू शकता. वेबसाईट डिझाईनिंग आणि वापराबद्दल पुढील भागात.

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact