गावातल्या कट्ट्यावर जी इरसाल टोळकी बसतात त्यांची एक गोष्ट आहे. एकदा गावात एक सुशिक्षीत समाजसेवक येतो. दुपारच्या कामाच्या वेळेस पारावर निवांत बसून गप्पा मारणारे टोळके पाहून त्याला मोठे नवल वाटते. तो त्या टोळक्याशी संवाद साधतो.
तो – आज काय सुट्टी आहे का?
ते – नाही.
तो – मग कामावर का जात नाही ?
ते – कामावर ? कामावर कशाला जायचे ?
तो – (विचारात पडतो) कामावर जाउन पैसे कमवायचे….
ते – बरं पुढे ?
तो – पुढे भरपूर पैसे कमावून मग चांगले घर बांधता येईल, कपडालत्ता, जमीनजुमला घेता येईल….
ते –बरं मग?
तो – मग काय, निवान्त बसता येईल ..
ते – मग आत्ता आम्ही निवान्तच बसलोय की….. त्यासाठी इतकी वणवण करायची काय आवश्यकता आहे!?
या गोष्टीतला विनोदाचा भाग सोडला तर त्या टोळक्याला पडलेला प्रश्न विचार करण्यासारखा आहे. निष्क्रियतेचे त्या टोळक्याने केलेले समर्थन नीट तपासले की कर्मयोग समजणे सोपे होईल.
निष्क्रियता…… निरनिराळ्या पातळीवर आणि वेगवेगळ्या परीघातून प्रत्येकासमोर उभी असणारी संभ्रमाची अवस्था.
प्रत्येकाला या निष्क्रियतेचा अनुभव सतत कोणत्यातरी संदर्भात येत असतो, तसेच प्रत्येकजण स्वतःही अनेकदा निष्क्रियतेचा भाग असतो.
राजकारणी आणि उद्य़ोजकांच्या पातळीवर निर्णय घेण्याबाबत निष्क्रियता, नोकरशाहीमध्ये निर्णय राबविण्याबाबत निष्क्रियता, सामाजिक पातळीवर सार्वजनिक हिताबाबत निष्क्रियता तर वैयक्तिक पातळीवर क्षमतेच्या पुरेशा वापराबाबत निष्क्रियता…
मानवी जग आणि मानवी मन ज्या एका मजेदार कसोटीवर विलक्षण साम्य दाखवते ते म्हणजे निष्क्रियता! दोघांचाही मुळ स्वभाव निष्क्रियतेकडे झुकतो. म्हणजे जोपर्यंत गरज अथवा संकट (दबाव किंवा आपत्ती) समोर उभे ठाकत नाहीत तोपर्यंत दोघेही निष्क्रिय राहणे पसंत करतात. म्हणजेच जर गरज किंवा संकट नसेल तर दोघे स्वतःहून कृती करतीलच असे नाही, जसे कट्ट्यावरील टोळके! गंमतीचा भाग असा की निष्क्रियतेबद्दल प्रत्येक जण वैयक्तीक आणि सामुहीक पातळीवर इतरांना दोष देत असतो पण जोडीने स्वतःच्या निष्क्रियतेकडे मात्र दुर्लक्ष करत असतो!
विश्वशांतीच्या किंवा पर्यावरणाच्या बाबतीत विकसित आणि विकसनशील देश एकमेकांना निष्क्रिय मानतात. धोरणांच्या बाबतीत जगभरातले (फक्त भारतीयच नव्हे!) उद्योजक सरकारला निष्क्रिय मानतात. नोकरशाही एकमेकाला तर सामान्य माणूस स्वतः सोडून जवळपास सगळ्यांना निष्क्रिय मानतो. ‘कोणी काही करत नाही आम्ही एकटेच धडपडतोय’ हे भरतवाक्य संयुक्त राष्ट्रांपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत आणि पंतप्रधानांपासून ते घरातल्या सूनेपर्यंत प्रत्येक जण ऐकवत असतो. प्रत्येक जण एकाच वेळी स्वतः निष्क्रिय असतो आणि इतरांना ते निष्क्रिय असल्याबद्दल दोषही देत असतो.
या अशा अवस्थेमुळे माणूस व पर्यायाने समाज किंकर्तव्यमूढ होतो. संभ्रमामुळे त्याला काय करायचे हे ठरवता येत नाही. मग योग्य अयोग्य गोष्टी हातून घडत राहतात आणि संपूर्ण व्यवस्था बिघडते. याचाच अर्थ असा की कर्म करण्याची प्रेरणा आणि प्रत्यक्ष कर्म यात सुसंगती आणल्यास माणसाची व्यक्तीगत आणि सामाजिक गोंधळाची अवस्था संपुष्टात येईल आणि तो योग्य कर्म करून सुखी होईल.
कर्मयोग………….निष्क्रियता आणि निष्कामता यातला फरक म्हणजे कर्मयोग. कर्मापासून फारकत न घेता उलट कर्म तन्मयतेने करणे परंतु त्याच्या बंधनात न पडता आत्मा मुक्त ठेवणे म्हणजे कर्मयोग.
कर्ममार्ग पुरेसा न उमगल्याने अर्जुन गोंधळात पडतो आणि घोर कर्म टाळण्यासाठी निष्क्रियतेकडे झुकणारे मत मांडतो.
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ ३-१ ॥
व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे । तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम् ॥ २ ॥
श्रीकृष्णा, जर तुला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग, मला हे युद्धासारखे भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहेस? तेव्हा एक काहीतरी निश्चित सांग जेणेकरून मला योग्य तो मार्ग मिळेल
मग कर्मयोगाच्या माध्यमातून कृष्ण अर्जुनाचा संभ्रम दुर करतो आणि केवळ युद्धच नव्हे तर संपुर्ण आयुष्य अर्थपूर्ण रीतीने जगण्याचा मार्ग सांगतो.
ऩिष्क्रियता……….
वर चर्चा केलेला ऩिष्क्रियतेचा जो गोंधळ उभा राहतो तो केवळ विचारांचा आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. कारण तो पुढे हे स्पष्ट करतो की आत्मज्ञान किंवा परमात्म प्राप्ती हे उद्दीष्ट्य साध्य करण्यासाठी दोन मार्ग सांगितले आहेत. एक ज्ञानमार्ग आणि दुसरा कर्ममार्ग…
लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ। ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम्।।३-३।।
ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग स्वीकारणे हे सर्वस्वी व्यक्तीच्या जीवनशैली, विचारसरणी आणि कुवतीवर अवलंबुन आहे.
अर्जुनाचा वैचारीक गोंधळ होतो कारण त्याची जीवनशैली कर्मयोगास योग्य असून केवळ युद्धप्रसंगापुरता तो ज्ञानमार्गाचा विचार करतोय. सोयीप्रमाणे दोन्ही मार्गांचा एकाच वेळी अवलंब करण्याचा प्रयत्न हा गोंधळाला निमंत्रण देतो.
ज्ञानी किंवा योगी व्यक्ती हा ज्ञानप्राप्तीतून आलेली निष्कामता (निष्क्रियता नव्हे) स्वीकारतो आणि आत्मानंदी लीन होतो. समाधिस्थ अवस्थेतून अशी निष्कामता त्याला प्राप्त होते. तो निष्क्रिय नसतो. अशा व्यक्तीच्या गरजा अत्यंत सीमीत असतात म्हणूनच त्यांचे कर्मही. कर्मविचार आणि प्रत्यक्ष कर्म यांचे एकत्रित स्वरूप त्याला उमगलेले असते. त्यामुळे तो आळसाने कर्म टाळत नाही. कर्म आणि मनःसंयमाच्या मार्गातून तो निष्कामता प्राप्त करतो.
परंतु बहुसंख्य लोकांना या मार्गाने जाणे शक्य नसते. रोजचे कर्म करत आयुष्य जगणा-या बहुसंख्य समाजाला कर्ममार्ग जास्त सुलभ वाटणे सहाजिक आहे. कारण अर्थातच ते रोजच्या आयुष्यात आधीच कार्यमग्न असतात. स्वतःच्या, कुटुंबाच्या, व्यवसायाच्या, इच्छा, आकांक्षा आणि गरजांच्या पूर्तीमध्ये ते गुंतलेले असतात. कधी त्यांना करायचे म्हणून तर कधी त्यांना करावे लागते म्हणून तर कधी सगळे करतात म्हणून निरनिराळ्या कर्माचा ते भाग बनतात. अशाप्रकरे इच्छेने किंवा इच्छा नसूनही कर्माला बांधले गेलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी कर्मयोग आहे.
कर्मयोग……….
न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् । कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ३-५ ॥
कर्म करणे हा प्रकृतीचा स्वाभाविक धर्म आहे. मनुष्याला कर्म करणे भाग आहे. शरीराच्या किमान गरजा भागविण्यासाठी तरी कर्म करणे आलेच. आणि हेच कर्माचे मूळ आहे.
आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक माणूस बुद्धी, कुवत आणि परीस्थितीप्रमाणे निरनिराळे मार्ग निवडतो आणि त्यातून त्याच्या कर्माचा पसारा वाढत जातो. म्हणजे काय तर इतर अनेक घटक, व्यक्ती, परीस्थिती या कर्मावर परीणाम करू शकतात. यातूनच मग इच्छा, आकांक्षा, अपेक्षा आणि अर्थातच सुख आणि दुःख निर्माण होते. हे आत्म्याला कर्मबंधनात टाकते.
तेव्हा आता कर्म करायचे आणि आत्म्याचे बंधनही टाळायचे ही कसरत करायची, तर मग गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. यातूनच निष्क्रियता येते. म्हणून कर्मविचार आणि कृती यातील एकतानता समजून घेणे आणि तसे कर्म करणे हे आवश्यक आहे.कर्माचे बंधन लागणार नसल्याची खात्री पटलेला मनुष्य निष्क्रिय राहणार नाही. ते बंधन न लागता कर्म कसे करावे हे जाणणे म्हणजे कर्मयोग….
फलाची अपेक्षा न करता कर्म केले तर त्या कर्माचे बंधन आत्म्याला बाधत नाही.ही अवस्था शारीरीक तितकीच मानसिकही आहे. मनुष्याची इंद्रिये त्याला निरनिराळ्या अपेक्षांच्या जाळ्यात ओढतात आणि कर्मासाठी प्रवृत्त करतात. तेव्हा शरीराने कर्म करायचे आणि मनाने त्याच्या फळाची अपेक्षाही न बाळगता रहायचे याला निष्कामता म्हणता येईल. उदाहरणार्थ जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तेव्हा त्याचा गर्व न बाळगणे (सेल्फी पोस्ट न करणे!) किंवा मदत झालेल्याने आपल्याविषयी कृतज्ञ असावे अशी अपेक्षा न ठेवणे हे निरपेक्ष कर्म होय.
माणसाची इंद्रिये त्याच्या मनात सतत कर्मफळाची आसक्ती निर्माण करत असतात. चांगले खायची आसक्ती, मग ते मिळवायचे कर्म, ते मिळेपर्यंतची अवस्था, मग ते मिळाले तर सुख नाही मिळाले तर दुःख, दुस-याला मिळाले तरी अधिक दुःख आणि आपल्याला मिळाले तर त्याला दुःख… हे सर्व मनाचे खेळ इंद्रियांच्या माध्यमातून सतत घडत असतात.
कर्मयोगी तो असतो ज्याचे शरीर कर्म करते आणि मन इंद्रियांना फळाच्या आसक्तीपासून दूर ठेवते. वरवर पाहता कर्म करणारा पण मनातून त्याच्या फळाची लालसा बाळगणारा ढोंगी असतो. असे दुटप्पी वागणा-यांना तुकोबा भोंदु म्हणतात.
ऐसे कैसे झाले भोँदु। कर्म करुनि म्हणति साधू। अंगा लावुन राख। डोळे झाकुनि करिति पाप।।।
कारण इंद्रिय संयमन हा कर्मयोगाचाच भाग आहे.
मग कर्म कसे असावे…..
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ३-७ ॥
इंद्रियांवर संयम राखून, निरपेक्ष बुद्धीने कर्मामध्ये जो लीन होतो तो अनासक्त कर्मयोगी होय.
यज्ञ……
अनासक्त कर्म करण्याला श्रीकृष्ण यज्ञाची उपमा देतो. पुरातन काळापासून यज्ञ हे अत्यंत श्रेष्ठ कर्म मानलं गेलंय कारण ते निष्काम आणि अनासक्त आहे. वैदिक काळात यज्ञ हा देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केला जाई. त्यामुळे यज्ञात आहुति देताना कोणतीही अपेक्षा नसे.
आहुति देताना ‘इदं न मम’ म्हणजेच ‘हे माझे नाही’ असे म्हटले जाते. माणसानेही त्याचे विहीत कर्म करताना मी पणा टाकून ते कर्म केले तरच त्याचे बंधन त्याला लागणार नाही. कर्माला यज्ञ म्हणण्यामागे हा दृष्टीकोन आहे.
यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः ।तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ३-९ ॥
यज्ञ…. दृष्टीकोन…
विश्वकल्याणाच्या उदात्त तत्त्वावर यज्ञाची कल्पना उभी आहे. वेदकालीन समाजाच्या सुखाच्या कल्पना अनेक वैदिक प्रार्थनांमध्ये येतात. त्यातील प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे ती प्रार्थना विश्वकल्याण आणि सर्वांच्या सुखासाठी आहे. वैयक्तीक सुख हे समाज, राष्ट्र आणि संपूर्ण विश्वाच्या व्यापक हिताचाच भाग आहे असा दृष्टीकोन बाळगल्यामुळे तत्कालिन समाजाला एक व्यवस्था आणि दिशा होती. समाजाचे हित साधले की त्यातील व्यक्तीचे हित आपसुकच साधले जाईल.
‘सर्वेSपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः’ किंवा ‘सहनौ भुनक्तु’
यासारख्या प्रार्थनांमध्ये सगळ्यांचा सुखाचा विचार केला आहे. त्यामुळेच सामुहीक आणि वैयक्तिक अशा दोनही पातळीवर कल्याण होते ही दृढ भावना त्या काळात होती. हाच विचार मांडताना श्रीकृष्ण म्हणतो की व्यक्तीने कर्म करताना व्यापक हिताचा दृष्टिकोन ठेवावा.
कर्म मनुष्याला चुकणार नसल्याने ते करावेच लागणार. केवळ त्यामागचा दृष्टीकोन योग्य असल्यास आत्म्याला बंधनात न टाकता कर्म घडेल. कृष्ण पुढे सांगतो की मी स्वतःही जेव्हा अवतार घेतो तेव्हा मी त्या अवतारातील सर्व विहीत कर्मे करतो. कारण एक ते त्या देहाला स्वाभाविक आहे आणि दुसरे असे की समाज अशा व्यक्तींचे अनुकरण करतो. कर्मयोग्याने स्वतः निष्काम कर्म करत असताना त्यातून इतरांना कर्मयोगाचे दिशादर्शन करावे. यालाच लोकसंग्रह अशी संज्ञा तो वापरतो.
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन । नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ ३-२२ ॥
हे पार्था मला या तिन्ही लोकांत काहीही कर्तव्य नाही आणि मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो.
उपसंहार
अशाप्रकारे कर्मयोगाचे विवेचन करताना कर्माची अपरिहार्यता, अनासक्त कर्म, इंद्रियसंयम आणि लोकसंग्रह अशा क्रमाने श्रीकृष्ण संपुर्ण मानवजातीच्या वैचारीक गोंधळावर आणि कर्माच्या एकतानतेवर भाष्य करतो.
मनुष्यसमाज मग तो राष्ट्र, राज्य, धर्म अशा कोणत्याही स्वरुपाचा असो त्याचे व्यापक हित आणि त्यातील माणसांचे वैयक्तीक हित हे सहसा भिन्न नसते. केवळ मनुष्य जेव्हा वैयक्तिक इच्छा, आकांक्षा आणि स्वार्थाला प्राधान्य देतो तेव्हाच समाजहिताला अडथळा निर्माण होतो. तसेच जेव्हा प्रत्येकजण आपल्या वैयक्तिक इच्छा, आकांक्षा आणि स्वार्थ साधण्याची धडपड करतो तेव्हा गोंधळाची स्थिती निर्माण होते, कोणी काय करायचे आणि काय नाही करायचे याचा संभ्रम निर्माण होतो आणि समाजाव्यवस्था निष्क्रिय होते. आजची सर्वव्यापी वैचारिक गोंधळाची आणि निष्क्रियतेची स्थिती ही या कर्मयोगाच्या पुरेशा ज्ञानाच्या अभावी प्राप्त होते. हीच स्थिती अर्जुनाच्या काळात होती आजही आहे. त्यामुळे अर्जुनाची जी अवस्था होती तशीच आपल्यातील प्रत्येकाची होते.
केवळ अर्जुनच नव्हे तर त्याकाळातील संपूर्ण समाज हा युद्धाच्या मार्गाने विनाशापर्यंत येण्याचे कारण कर्मयोगाचे अज्ञान हेच होते. भीष्मादि ज्येष्ठांपासून ते दुर्योधनादि कनिष्ठांपर्यंत व्यक्तींनी इंद्रियसंयम, अनासक्त कर्म, लोकसंग्रह आणि व्यापक समाजहित हा कर्मयोगाचा सोपान न अवलंबल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि संपुर्ण समाजाचे हित धोक्यात आले. तेव्हा आणि आजही माणसाने निरपेक्ष वृत्तीने जर स्वतःचे वैयक्तिक कर्म केले तर त्याचे आणि संपुर्ण मानवजातीचे कल्याण होईल.
इंद्रियांच्या आहारी न जाता योग्य ते कर्म व्यापक समाजहीत डोळ्यासमोर ठेऊन निष्काम वृत्तीने करणे म्हणज कर्मयोग……. गीतेतील तत्त्वज्ञान हे सार्वकालिक व आजही तितकेच सुसंगत नाही का?
भक्तीचे महत्व सांगताना कबीर कर्मयोगाचेच निकष मांडतात. भक्तीमध्ये भक्त जसे निरपेक्षपणे भगवंताचे नाव घेत राहतो. तसेच निष्काम वृत्तीने मानव कोणत्याही भ्रमात न राहता कर्म करत राहीला तर कर्मयोग आणि त्यायोगे मोक्ष साध्य होईल.
और कर्म सब कर्म है , भक्ति कर्म निह्कर्म । कहै कबीर पुकारि के, भक्ति करो ताजि भर्म ।।
मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ५ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ७
Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach