परामर्ष – Confab…

प्रश्न विचारा/Send Query or Feedback

परामर्ष Confab

नमस्कार, लेखमालेला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार. या लेखांच्या संदर्भात अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी अधिक माहीतीसाठी प्रश्नही विचारले. काही शब्द, संकल्पना किंवा ओळींसंदर्भात अधिक स्पष्टीरकणही मागीतले. या सगळ्या चर्चेतून शंका समाधानासाठी हे पान तयार करत आहे.
परामर्ष….
फोरमवरील लेखांसंदर्भात काही प्रश्न  किंवा सूचना असल्यास तुम्ही या लिंकवर (प्रश्न विचारा) पाठवू शकता. उत्तरे वाचण्यासाठी प्रश्नावर क्लिक करा …

Hello Readers, Thanks a lot for the overwhelming response to the articles. I have received a lot of feedback including suggestions and queries. A bunch of them asked for more clarification regarding some terms, concepts or verses. This page is being prepared for resolving doubts from all these discussions.
Confab……
If you have any questions/feedback regarding the articles on the forum, you can send them through this link (Ask a Question). Click on the questions to read answers and discussions…

गीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय?
अक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते?
भगवद्‌गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत?
धर्माची नेमकी व्याख्या कशी करावी? मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत? ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर उतरतात हे सांगू शकाल का?
Does Lord Krishna in Bhagavad Gita ask us to stop enjoying worldly pleasures?
CAN YOU SHARE YOUR THOUGHTS ON BHAGVAD GITA IN LIGHT OF DIFFERENCE BETWEEN BUDDHISM AND HINDUISM?
भगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय?
मनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे ?
श्रेयस आणि प्रेयस या संकल्पना काय आहेत? स्पष्ट करू शकाल का?
अध्यात्म म्हणजे काय?
‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे काय?



गीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय?

मूळ श्लोक – मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः।आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत।।१४।।
अन्वय – (हे) कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः मात्रास्पर्शाः तु आगमापायिनः (च) अनित्याः (अतः) भारत तान् तितिक्षस्व।
अर्थ – हे कुन्तीपुत्रा! इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता! ते तू सहन कर.
तितिक्षा हा शब्द वापरून माणसाने आयुष्यातील सुख दुःखावर कशी मात केली पाहीजे हे या श्लोकात सांगितले आहे.
आदि शंकराचार्य विवेकचुडामणी आणि अपरोक्षानुभूति या दोन ग्रंथांत तितिक्षा या शब्दाची व्याख्या करतात.
सहनम् सर्वदुःखानाम् अप्रतिकारपूर्वकम् चिन्ताविलापरहीतं सा तितिक्षा निगद्यते।।२४।। विवेकचुडामणी
चिन्ता किंवा शोकरहीत तसेच प्रतिकाराशिवाय सर्व दुःख सहन करणे म्हणजे तितिक्षा
विषयेभ्य: परावृति: परमोपरतिही सा |सहनं सर्वदुखानाम तितिक्षा सा शुभा मता।।७।। अपरोक्षानुभुति
विषयापासून विमुख होणे ही उपरति ची उच्चावस्था आहे, सर्व दुःख किंवा त्रास सहन करणे म्हणजेच तितिक्षा होय जी आनंद/प्रसन्नता वाढवते.
स्पर्श, गंध किंवा चव या निरनिराळ्या माध्यमातून माणसाला सुख किंवा दुःख अनुभवास येते. जसे चांगला किंवा वाईट गंध किंवा चांगली किंवा वाईट चव. हे किंवा असे सर्वच सुख-दुःख, जय-पराजय किंवा शीतउष्णभाव हे क्षणिक असून ते केवळ इंद्रियांद्वारे आपल्याला वाटणारे भ्रम आहेत. त्यामुळे हर्ष किंवा शोक न करता ते भोगून पार केले पाहीजेत. सुख प्राप्तिमुळे होणारा आनंद किंवा दुःख प्राप्तिमुळे होणारा त्रास दोन्हीचाही परिणाम न होता ते निस्संग मनोवृत्तीने सहन करणारा व्यक्ती मोक्ष प्राप्त करतो असा साधारण अर्थ या श्लोकातून व्यक्त होतो.
ज्ञानदेवांनी याचे सुरेख विश्लेषण केले आहे.
इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती ।ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥
जयां विषायांचां ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।तेथ दुःख आणि कांहीं । सुखहि दिसे ॥
देखें हे शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।तेथ द्वेषाद्वेष उपजति । श्रवणद्वारें ॥
मृदु आणि कठीण । जे स्पर्शाचे दोन्ही गुण ।जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां ॥
भ्यासुर आणि सुरेख । हें रुपाचें स्वरूप देख । उपजवी सुखदुःख । नेत्राद्वारें ॥
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।जो घ्राणसंगे विषादु – । तोषु देता ॥
देखें इंद्रियां आधीन होईजे ।तें शीतोष्णांते पाविजे ।आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपें ॥
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु ।म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥
या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥
हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥
देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं ।हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥

अक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते?

महाभारताच्या सभापर्व आणि आदिपर्वात सैन्यगणतीची परिमाणे आढळतात.
अक्षौहिण्या: परीमाणं नराश्वरथदन्तिनाम्।यथावच्चैव नो ब्रूहि सर्व हि विदितं तव॥
पायदळ, रथ, अश्व आणि हत्ती अशा चार विभागांचे मिळून चतुरंग सैन्य मानले जाते. संख्या आणि विभागवार वाटणीवरून सैन्याचे गट पडतात ते खालीलप्रमाणे

  1. पत्ती    १ हत्ती + १ रथस्वार + ३ घोडे + ५ पदाती
  2. सेनामुख (३ x पत्ती)- ३ हत्ती + ३ रथस्वार + ९ घोडे + १५ पदाती
  3. गुल्म   (३ x सेनामुख)- ९ हत्ती + ९ रथस्वार + २७ घोडे + ४५ पदाती
  4. गण    (३ x गुल्म)- २७ हत्ती + २७ रथस्वार + ८१ घोडे + १३५ पदाती
  5. वाहीनी (३ x गण)- ८१ हत्ती + ८१ रथस्वार + २४३ घोडे + ४०५ पदाती
  6. पृतना   (३ x वाहिनी)- २४३ हत्ती + २४३ रथस्वार + ७२९ घोडे + १२१५ पदाती
  7. चमू    (३ x पृतना)- ७२९ हत्ती + ७२९ रथस्वार + २१८७ घोडे + ३६४५ पदाती
  8. अनीकिनी (३ x चमू)- २१८७ हत्ती + २१८७ रथस्वार + ६५६१ घोडे + १०९३५ पदाती
  9. अक्षौहिणी (१० x अनीकिनी)- २१८७० हत्ती + २१८७० रथस्वार + ६५६१० घोडे + १०९३५० पदाती
    साधारण १८ अक्षौहिणी म्हणजे जवळजवळ ३९,३६,६०० इतके सैन्य होते.
भगवद्‌गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत?

गीता हे सार्वकालिक तत्त्वज्ञान आहे. सफल आणि समाधानी आयुष्य जगण्याचा मार्ग आणि त्यासंबंधीचे ज्ञान गीतेतून प्राप्त होते. ज्ञान, कर्म असे निरनिराळे मार्ग, स्थितप्रज्ञासारखी वृत्ती, सत्व, रज आदि गुण अशा अनेक विषयांवर गीता भाष्य करते. प्रत्येक अध्याय हा स्वतःचे वैशिष्ट्य जपतो आणि संपूर्ण गीतेचा भागही होतो. गीता आपण कोणत्या दृष्टीकोनातून अभ्यासतो तसेच त्यातील आपल्याला भावणारा विषय कोणता यावर प्रत्येकाच्या आवडीचे श्लोक ठरतात. कोणताही एक श्लोक दुस-यापेक्षा जास्त किंवा कमी उत्तम असा ठरवणे अशक्य वाटते.
उदाहरणादाखल काही श्लोक पाहू
१. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥
२. सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।।२-३८।।
३. योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय । सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २-४८।।
४. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्‌ ॥ २-५० ॥

हे सर्व श्लोक ज्ञान आणि कर्मावर भाष्य करतात

५. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ।।२-२२।।
६. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ।।२ २३।।
७. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि।

हे श्लोक आत्म्याच्या स्वरूपावर भाष्य करतात.

८. अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः। यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ ३-१४ ॥
९. कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌। तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ ३-१५ ॥

हे श्लोक सृष्टी आणि कर्मचक्रावर भाष्य करतात.

१०. दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।    वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २-५६ ॥

स्थितप्रज्ञाची लक्षणे हा तर केवळ गीतेतच आलेला विषय आहे.

११. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ।।२-२८।।

यासारखे गुढ श्लोक आहेत.

याव्यतिरीक्त बोधवाक्ये म्हणून वापरले गेलेले अनेक श्लोकही आहेत जसे

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
श्रद्धावान् लभते ज्ञानम्।
योगः कर्मसु कौशलम्।
योगक्षमेम् वहाम्यहम्।
नभः स्पृशं दीप्तम्।

अशी अनेक उदाहरणे देता येतील. या सर्व श्लोकांची आपसात तुलना करणे केवळ अशक्य आहे कारण त्यात केलेले भाष्य, काव्य, विचार आणि संकल्पना या सर्वार्थानी अद्वितीय आहेत. माझ्या गीतेच्या अध्ययनात ७०० पैकी असा एकही श्लोक आढळलेला नाही जो उत्तम नाही!

धर्माची नेमकी व्याख्या कशी करावी? मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत? ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर उतरतात हे सांगू शकाल का?

धर्म हा शब्द धृ या संस्कृत धातुपासून तयार होतो. याचा अर्थ धारण करणे असा होतो. धारण किंवा धारणा या अर्थाने हा शब्द येतो. धर्म ही भाषेप्रमाणेच ठरवून तयार करण्याची गोष्ट नव्हे. मनुष्यस्वभावाच्या निरनिराळ्या धारणा म्हणजेच समजांच्या आधारे प्राचीन धर्म उत्क्रांत होत गेले.
शिकार करणारा, भटका आणि गुहेत राहणारा असा आदिम मानव, प्राथमिक अवस्थेत निसर्गाच्या कृपेवरच अवलंबून होता. ऊन, पाऊस, वीजेचा लखलखाट, नद्यांचे लोट, वणवा, वादळे, मोठाले वृक्ष या निसर्गाच्या विविध रुपांबद्दल त्याला सहाजिकच कुतुहल, भीती आणि आश्चर्य वाटत असे. आपले आयुष्य अवलंबून असणा-या या निसर्गालाच त्याने आपले पहीले दैवत मानले. नदी, वृक्ष, सूर्य, प्राणी यासारख्यांना देव मानून त्यांची पूजा करणे ही धर्मव्यवस्थेची पहीली पायरी जवळपास प्रत्येक मानवी संस्कृतीमध्ये आढळते. चिनी, इजिप्शिअन, वैदिक भारतीय, ग्रीक किंवा माया अशा सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये धर्मविचार याच मार्गाने रुढ होत गेला.
शेतीच्या शोधानंतर जसे मानवाच्या जीवनाला अधिकाधिक स्थैर्य प्राप्त झाले तसेच प्रथम निसर्ग आणि त्यानंतर निसर्गरुपांची प्रतीकात्मक पूजा करण्यात येऊ लागली. यात मुर्ती किंवा प्रतीके वापरली जात असत. येथूनच उपासनांच्या विविध पद्धती आणि अर्थातच ती करणारा वर्ग निर्माण झाला. साधारणतः सर्वात प्राचीन धर्म हे अशाप्रकारे उत्त्क्रांत म्हणजेच अत्यंत सावकाश व क्रमाने उभे राहीले.
परंतु हे सर्व अर्थातच नैसर्गिकपणे कोणत्याही व्याख्या किंवा नियमप्रणालीशिवाय झाले कारण आधी घडलेल्या कोणत्याही समान व्यवस्थेचा येथे संदर्भ, व्याख्या किंवा प्रणाली अस्तीत्त्वातच नव्हती. जीवन जसे आणि जे घडवत आणि शिकवत गेले तसे ते समाज स्वीकारत गेला. तो त्याच्या संस्कृतीचा आणि पर्यायाने पुढे धर्माचा भाग बनला. त्यामुळेच निसर्ग आणि प्राणीपूजा, बळी, दफन किंवा दहनविधी, यात्रा, पुजारी वर्ग यासारख्या कित्येक गोष्टी सर्व प्राचीनतम धर्मात समान आहेत.
व्यापार व संघर्षाच्या निमित्ताने जेव्हा दोन संस्कृतींची एकमेकांशी जवळीक होत असे त्यातून मग सांस्कृतीक चिन्हे, विचार, धर्म, भाषा आणि मुल्ये यांची देवाणघेवाण होत राहीली. धर्म हा कालांतराने समाजव्यवस्थेचा भाग आणि सांस्कृतिक व्यवस्थेची ओळख बनत गेला. निरनिराळे पंथ उपपंथही यात निर्माण झाले. मनुष्यसमाजही तोपर्यंत विस्तृत आणि प्रगत बनलेला होता.
भाषेप्रमाणेच प्रथा आणि परंपरा आधी रुढ झाल्या आणि मगच त्यांना धर्माच्या धाग्यात गुंफले गेले. त्यामुळे धर्माच्या अनेक व्याख्या किंवा लक्षणे तत्त्वज्ञांनी नंतरच्या काळात सांगितली. जसे

धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचं इन्द्रियनिग्रहः । धीर्विद्या सत्यं अक्रोधो दशकं धर्मलक्षणम् । (मनुस्मृति अध्याय ६ – श्लोक ९२)
अहिंसा सत्यं अस्तेयं शौचम् इन्द्रियनिग्रहः ।दानं दमो दया क्षान्तिः सर्वेषां धर्मसाधनम्। (याज्ञवल्क्यस्मृति १-१२२)

उत्तम धर्माची लक्षणे जरी सांगितली गेली त्यांचा सर्वस्वी योग्य तोच अर्थ तत्कालिन समाजव्यवस्थेने घेतला गेला असे नाही. उदा. अक्रोध, अहींसा किंवा सत्य यासारख्या तत्त्वे निरनिराळ्या अर्थानी वापरली गेली. धर्मव्यवस्थेचे अवडंबर जेव्हा जेव्हा समाजातील घटकांवर वर्चस्व गाजवू लागले तेव्हा तेव्हा धर्मांमध्ये पंथ उपपंथ किंवा नवीन धर्म निर्माण झाले. ख्रिश्चन, इस्लाम किंवा बौद्ध हे धर्म आधीच्या व्यवस्थेच्या विरुद्ध चळवळ म्हणून उभे राहीले. त्यामुळेच त्यांना आधारभूत अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आधीची व्यवस्था मार्गदर्शक ठरली. त्यांनी आधीच्या व्यवस्थेतील त्याकाळातील त्यांना अयोग्य वाटणारे घटक दुर करून नवीन प्रणाली निर्माण केली. कालांतराने त्याही धर्मांमध्ये उपपंथ निर्माण झाले. तत्त्वे तीच राहीली पण अर्थ/व्य़ाख्या बदलत राहीली.
त्यामुळेच धर्माची लक्षणे किंवा व्याख्या ही केवळ अल्पजीवी व कालसुसंगत तत्त्वे असून ती कायम बदलत राहतात. त्यामुळेच एक निश्चित अशी व्याख्या आणि एकच कसोटी ज्यावर धर्म ही संकल्पना पडताळून पाहता येणे अशक्य आहे. प्रत्येक धर्मात उभे राहणारे नवीन पंथ उपपंथ ती व्या्ख्या अधिक सुधारीत करत असतात किंवा कालांतराने नवीन धर्मप्रणाली उभी राहते.
आश्चर्याची बाब ही की आजच्या युगात कोणताही धर्म हा प्राचीन धर्माच्या कोणत्याच व्य़ाख्येत पूर्णपणे बसत नाही हे जितके खरे तितकेच हेही खरे की जगात अनेक नवेजुने धर्म आले, लुप्त झाले आणि येत राहतील परंतु प्रत्येक धर्माचे मूलतत्त्व हे एकच राहील मानवजातीचे आणि पर्यायाने सर्वांचे कल्याण. म्हणून या तत्त्वावर निष्ठा ठेऊन असेल त्या धर्माचे पालन करणे जास्त योग्य राहील.

DOES LORD KRISHNA IN BHAGAVAD GITA ASK US TO STOP ENJOYING WORLDLY PLEASURES?

Lord Krishna never asks you to stop enjoying worldly pleasures. He says we’ve to restrain the senses from temptations and expectations. It doesn’t mean not enjoying at all.

There is nothing wrong with enjoying material pleasures but it is inappropriate to fall prey to the senses for those pleasures. Senses are constantly pulling us towards pleasures, destabilizing strongest minds by creating expectations. Such Karma with an expectation towards its result, creates attachment and further drags us into joys or sorrows about the results.

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः । इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ २-६० ॥

For example, Krishna would not say that one should not enjoy good food. He also approves working hard for earning that good food. But it is inappropriate to feel happy or disappointed if you succeed or fail within your efforts because that drags you to attachment, disturbs your mind. If the mind understands the inevitability of either success or failure, then the bond of Karma will not bind the soul. This is exactly what we forget while we strive to get what we like. If we don’t succeed, we get angry and then invite array of disorders from anger eventually losing our ultimate goal.

क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः । स्मृतिभ्रंशाद्‌ बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ २-६३ ॥

That is why Krishna says that it is not wrong to enjoy worldly pleasures, but it is wrong to be attached to them That attachment traps our soul in the bondage of bad Karma.

रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ । आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ २-६४ ॥

But the self-controlled being, freed from attachment and aversion, who follows the conscious injunction despite being surrounded by the objects of the senses (material pleasure), with senses governed by the self; attains the precious union with the Ultimate Being.

So the gist is to enjoy the gifts of life without letting the gifts enjoy toying with your equanimity 🙂 Karma without expectations backed up by the intellect’ is what Chapter 2 and 3 explain.

CAN YOU SHARE YOUR THOUGHTS ON BHAGVAD GITA IN LIGHT OF DIFFERENCE BETWEEN BUDDHISM AND HINDUISM?

Buddhism and Gita (Hinduism) share certain views and differ on certain. Both of them believe in the illusory state of existence i.e. the material world. To an extent both of them agree on sensory perceptions being the reason for suffering.

Buddhism believes in withdrawal from the material world and resorts to meditation leading to Nirvana. Which is kind of detachment from almost everything including self.

Gita, on the other hand promotes constant action (Karma) towards collective wellness backed up by the intellect (Sankhya). This is how a sole soul  self dissolves/unifies into the omnipresent. (Karma in Sankhya Yoga Chapter II)

Buddhism denounces everything as suffering while Gita upholds it as the beauty of the creator. Buddhism believes Salvation/Nirvana means Death since it frees one from suffering and pleasure. Wherein Gita makes Salvation achievable to a being by uniting Aatman (आत्मन् – Individual Self) with the Param Aatman (परम आत्मन् – The Ultimate) describing it as bliss which is eternal and above all material notions.

We have to understand why Buddhism tends to differ from the Gita. Buddhism emerged as a reaction to Hinduism (has its own reasons). Hence Buddha deliberately kept the theory of eternity away from his preaching while Gita preaches it.

Logically though, detachment from entire existence is not practical. Gita in the Chapter III describes it. Denouncing Karma isn’t possible since one at least has to pacify his bodily needs. He has to be a part of the material world to do that. Hence Gita’s view of appreciating the creation of the Ultimate and trying to be one with Him through Intellect (Sankhya) based Karma stands stronger.

I have already written about the greatness of Gita and why has it been relevant to generations after generations.

भगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय?

श्लोक – यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः।। गीता २.४६।।
अन्वय – सर्वतः सम्प्लुतोदके (प्राप्ते सति) उदपाने, यावान् अर्थः (अस्ति) विजानतः ब्राह्मणस्य सर्वेषु वेदेष तावान् (अर्थः अस्ति)।

शब्दार्थ – सर्वतः = सर्व बाजूंनी, सम्प्लुतोदके = परिपूर्ण असा जलाशय, (प्राप्ते सति) = प्राप्त झाला असताना, उदपाने = लहानशा जलाशयात (माणसाचे), यावान्‌ = जितके, अर्थः = प्रयोजन, (अस्ति) = असते, विजानतः = ब्रह्माला तत्त्वतः जाणणाऱ्या, ब्राह्मणस्य = ब्रह्मज्ञान्याचे, सर्वेषु = समस्त, वेदेषु = वेदांमध्ये, तावान्‌ = तितकेच, (अर्थः) = प्रयोजन, (अस्ति) = असते ॥ २-४६ ॥

अर्थ – सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञान्याला वेदांची उरते. ॥ २-४६ ॥

हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मज्ञानाचे मोठेपण समजावून सांगण्यासाठी एक साधी सोपी कल्पना वापरली आहे की परमात्मा म्हणजेच आत्मा (आत्मन्) चे ज्ञान स्वतःच पूर्ण आहे आणि ते एखाद्याच्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट्य पूर्ण करते. जर एखाद्याने ते प्राप्त केले तर त्याला नंतर इतर कोणत्याही शास्त्रवचनाचा किंवा मजकूर किंवा उपदेशाचा अवलंब करावा लागणार नाही. जसे एकदा पाण्याचा जलाशय प्राप्त केला की मग आपल्याला तहान भागवण्यासाठी पुन्हा पेलाभर पाणी वेगळे शोधायची आवश्यकता भासत नाही.

सोपे उदाहरण घेऊ यात. जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा तेथील मेन्यूकार्डवर (Menu Card) अनेक पदार्थ असतात. त्यातला कोणत्याही पदार्थाने आपण भूक भागवू शकतो. आपण त्यातला एक पदार्थ निवडतो आणि तो खाऊन आपली भूक भागवतो आणि आनंदी होतो. आता मेन्युकार्डवरील इतर अनेक पदार्थ आपल्याला दिसत असले तरी एकदा भूक भागल्यानंतर त्यांचा आपण उपयोग करत नाही कारण त्याची गरजच उरलेली नाही. असा विचार करू यात की आपल्याला आता कधीच भूक लागणार नाही तर मग आपल्याला कोणत्याची पदार्थाची, मेन्युकार्डची किंवा हॉटेलची गरज लागणार नाही. परमात्मप्राप्ती हा अक्षय आऩंद आहे. तो एकदा प्राप्त झाला की मग मेन्युकार्डवरील इतर कर्मकांडे, जपतप इतकेच काय वेद, उपनिषदे इ. ची गरजच उरणार नाही. एकदा त्या प्रकाशाने तुमचे जीवन उजळून गेले की पुन्हा वेगळा दिवा लावायची गरजच काय.

बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य ऋषी राजा जनकाला वर्णन करून सांगतात की एकदा हे ज्ञान झाले की कोणतीच इच्छा, तहान किंवा भूक अपूर्ण रहात नाही ना इतर काही साध्य करायची इच्छा. कारण हे परीपूर्ण असा परमानंद देणारे अनंत आणि अवीट ज्ञान आहे.

सलिल एको द्रष्टाद्वैतो भवति, एष ब्रह्मलोकः सम्राडिति हैनमनुशशास याज्ञवल्क्यः, एषास्य परमा गतिः, एषास्य परमा संपत्, एषोऽस्य परमो लोकः, एषोऽस्य परम आनन्दः; एतस्यैवानन्दस्यान्यानि भूतानि मात्रामुपजीवन्ति।। (बृहदारण्यक उपनिषद अध्याय ४, ब्राह्मण ३ श्लोक ३२)

हे राजा, तो परमात्मा समुद्रासारखा एकमेवाद्वीतीय आहे. (आत्म्यासाठी परमात्मप्राप्ती) हाच ब्रह्मलोक आहे. असा उपदेश याज्ञवल्क्याने (जनक) राजाला केला. ब्रह्मप्राप्ती हीच या जीवात्म्याची परम गती (अवस्था/ध्येय) होय. हीच त्याची सर्वोत्तम संपत्ती आहे. हेच जीवात्म्याचे परम (श्रेष्ठ/अंतिम) साध्य आहे. हाच याचा सर्वोत्कृष्ट आनंद आहे. समस्त प्राणीमात्र याच आनंदाचा अंश घेऊन जीवन जगतात. (म्हणजेच जीवात्मा हा याच परमात्म्याचा अंशरुप आहे)

अशाप्रकारे गीतेतील या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण – साध्य आणि साधने यातील भेद, आत्मज्ञानप्राप्तीची साधने/मार्ग आणि साधकाचा दृष्टीकोन या विषयांवर भाष्य करतात. वेदात सांगितल्या प्रमाणे ‘एकं सत् विप्रा बहुदा वदन्ति’। म्हणजेच परमात्मा एकच आहे जरी तो आपण निरनिराळ्या रुपात पाहतो. तसेच परमात्मप्राप्ती हे एकमेव साध्य आहे जे आपण निरनिराळ्या साधनांनी प्राप्त करू शकतो. कोणत्याही एका साधनाने आत्मा आणि परमात्मा एकरूप झाल्यावर पुन्हा इतर साधनांची आवश्यकता भासत नाही हेच या श्लोकातून भगवंताला सुचवायचे आहे.

मनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे ?

भारतीय तत्वज्ञानातील ग्रंथांपैकी ज्याविषयी सगळ्यात जास्त गैरसमज असणारा आणि पुरेसा अभ्यास न करता एकांगी मते मांडण्यासाठी अनेकांनी वापर केलेला ग्रंथ म्हणजे म्हणजे मनुस्मृती.
प्रथम स्मृती म्हणजे काय ते जाणून घेऊ यात. ‘श्रुती स्मृती पुराणोक्त’ असा वाक्प्रचार आपण अनेकदा ऐकतो. वेदांना श्रुती म्हणतात. ते अपौरुषेय आहेत. म्हणजेच त्यांचे लेखक नाहीत. स्मृती म्हणजे ग्रंथ जे त्यांच्या लेखकाच्या नावांवरूनच ओळखले जातात. जसे याज्ञवल्क्य स्मृती, पराशर स्मृती इ. स्मृतीग्रंथ हे निरनिराळ्या काळात विविध विषयांना अनुसरुन थोर ऋषींनी किंवा ऋषीकुलांनी लिहीलेले ज्ञानाचे कोष आहेत. यातील ज्ञान हे त्या ऋषींनी स्वतः प्राप्त केलेले, शिकलेले किंवा संपादित केलेलेही असते. त्यामुळे स्मृतीग्रंथांतील माहीती ही ग्रंथांच्या पूर्वसूरींनी संकलीत केलेली, त्याकाळी प्रचलित असलेली किंवा परंपरेने शिक्षणआणि इतर व्यवस्थेचा भाग झालेली असते.
आता मनुस्मृती संबंधी गैरसमज पाहू
१ ) मनुस्मृती हा हिंदुंचा धर्मग्रंथ आहे – हा एक अर्धवट माहीतीवर आधारीत गैरसमज आहे. मुळात हिंदू धर्म हि संज्ञाच मनुस्मृती लिहीली गेली तेव्हा अस्तीत्वात नव्हती. भारतीय संस्कृतीला हिंदू धर्म किंवा संस्कृती ही संज्ञा पाश्चात्यांनी वापरली. भारतीय धर्म हा वैदिक धर्म होता आणि वेद हेच त्याचे प्रमाण ग्रंथ मानले जातात. किंबहूना मनुस्मृतीतही असेच लिहीले आहे.
वेदोऽखिलो धर्ममूलं स्मृतिशीले च तद्विदाम् । आचारश्चैव साधूनामात्मनस्तुष्टिरेव च ॥ मनुस्मृती २.६॥
मनुस्मृतीतील विवेचन हे परंपरा, तत्कालीन प्रचलीत व्यवस्था, समाजमन आणि पुर्वसूरींचे विचार यांचे संकलन आहे. त्यामुळेच धर्माचा प्रमाण विचार वेदात व्यक्त होतो असेच स्वतः मनुस्मृतीही सांगते.
२) मनुस्मृती जातीपाती आणि वर्णव्यवस्थेतून भेदभाव शिकवते – याउलट मनुस्मृतीत केवळ जन्माने व्यक्ती ब्राह्मण किंवा शिष्ट होत नाही तर योग्य शिक्षणाने होतो असे प्रतिपादन केले आहे.
अव्रतानाममन्त्राणां जातिमात्रोपजीविनाम् ।सहस्रशः समेतानां परिषत्त्वं न विद्यते ॥ १२.११४॥
श्रेष्ठतेचे कारण जन्म नसून विद्या आणि त्याधारीत व्यवसाय आहे असे स्पष्टपणे मनुस्मृतीत लिहीले आहे.
अज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठा ग्रन्थिभ्यो धारिणो वराः ।धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिनः ॥ १२.१०३॥
असे किमान २५ श्लोक मनुस्मृतीतून देता येतील जे ज्ञान, विद्या किंवा कौशल्याला प्राधान्य देतात जात किंवा जन्मकुलाला नाही.
३) मनुस्मृती स्त्रीयांना दुय्यम स्थान दिले आहे – हा अत्यंत हास्यास्पद समज आहे. सुभाषित म्हणून वापरला जाणारा खालील श्लोक मनुस्मृतीतला आहे.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ॥ ३.५६॥
त्याअनुषंगाने पुढे येणारे अनेक श्लोक स्त्रीयांच्या सन्मानाबद्दल तसेच त्यांना विशेष अधिकार देण्याबदद्ल बोलतात त्यामुळे यावर काही लिहायची आवश्यकता नाही.
हे झाले मनुस्मृतीबद्दलच्या गैरसमजांवर. धर्म सोडून या ग्रंथात दुसरे काहीच नाही का? आहे. अनेक विषय आहेत. राजा, प्रजा, व्यवहार जगाच्या उत्पत्तीपासून ते माणसाच्या अंत्येष्टीपर्यंत अनेक विषयांवर मनुस्मृती भाष्य करते जे आजही मार्गदर्शक ठरू शकते. येथे हे ध्यानात ठेवले पाहीजे की हे सर्व विवेचन तत्कालिन समाज, राज्य आणि धर्मव्यवस्थेला अनुसरुन केलेले संकलन आहे. त्यामुळे एकच एक मनुस्मृती हाच धर्मग्रंथ आहे आणि त्यात लिहिलेले सर्वकाही धार्मिकच लेखन आहे असे मानणे गैर आहे.
अशाप्रकारे अनेक विषयात मार्गदर्शक ठरु शकणारा आणि मूल्यव्यस्थांचे योग्य निरुपण करणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. केवळ अयोग्य भाषांतर किंवा अर्थप्रतिपादन केल्याने या ग्रंथांचे अयोग्य विद्रुपीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण मनुस्मृती वाचून त्यातील श्लोकांचा अर्थ समजाऊन घेऊन नंतर त्यावर टिका करण्याचा प्रयत्न आजतागायत तरी झाल्याचे ऐकीवात नाही.
प्राचीन ग्रंथ आणि त्यातील ज्ञान याचा गैरवापर कोणी केला याची चर्चा जितकी होते त्यापेक्षा अधिक प्रयत्न आज ते ग्रंथ भाषांतरासहीत उपलब्ध असताना वाचून समजून घेण्यासाठी करण्याने समाजाचे कल्याण होणार आहे.

श्रेयस आणि प्रेयस या संकल्पना काय आहेत? स्पष्ट करू शकाल का?

श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही शब्द कठोपनिषदाच्या प्रथम अध्याय द्वितीय वल्लीतील दुसऱ्या श्लोकात येतात. या दोन्ही शब्दांचे व्यावहारीक आणि तात्विक असे दोन्ही अर्थ आपल्याला अनुभवास येतात. श्लोकाचा अन्वय, अर्थ आणि स्पष्टीकरण पाहूयात
मूळ श्लोक

श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः तौ सम्परीत्य विविनक्ति धीरः । श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्षेमाद्वृणीते।।
अन्वयः – श्रेयः च प्रेयः च मनुष्यम् एतः । धीरः तौ सम्परीत्य विविनक्ति । प्रेयसः श्रेयः हि अभि वृणीते । मन्दः योगक्षेमात् प्रेयः वृणीते ।

श्रेयस आणि प्रेयस याचे येथे अभिप्रेत असणारे अर्थ हे कल्याणकारक आणि आनंददायक असे आहेत. माणसाला त्याच्या आयुष्यात अनेकदा दोन किंवा अधिक पर्यायातून निवड करावी लागते ज्यात काही सोपे आनंददायक मार्ग असतात तर काही कठीण पण कल्याणकारक मार्ग असतात. अशा प्रसंगी बुद्धीमान व्यक्ती दोन्हीमधला फरक नीट ध्यानात घेऊन कठीण पण कल्याणकारक मार्ग निवडतो आणि सोपा व आनंददायक मार्ग डावलतो. असा साधारण अर्थ या श्लोकातून ध्वनीत होतो.
माणसाचे आयुष्य ही सुखदुःखांची अतूट साखळी असते. असे अनेक प्रसंग माणसापुढे येत राहतात ज्यात त्याला सोपा आणि अवघड असे दोन मार्ग दिसतात. मार्गाप्रमाणेच त्यांचे फलित असते. वरकरणी सोप्या आणि कमी कष्टप्रद मार्गानी मिळणारे फलितही सीमीत असते तर अवघड आणि कष्टदायक मार्गाचे फलित निरंतर आणि दीर्घकालीन असते.
अगदी सोपे उदाहरण घ्यायचे झाल्यास विद्यार्थीदशेत किंवा उमेदवारीच्या काळात जास्तीत जास्त अभ्यास किंवा कष्ट करणारी व्यक्ती शिक्षणात आणि व्यवसायात यशस्वी होते आणि उर्वरीत काळ सुखाने घालवते. परंतु जी व्यक्ती हा काळ फार तोशीस न घेता माफक कष्टात घालवते ती शिक्षणात आणि व्यवसायात यशस्वी होण्यात अधिक वेळ घालवते आणि उर्वरीत आयुष्यही अधिक कष्टप्रद बनवते. कारण अर्थातच निवड…. योग्य वेळी अधिक कष्टाचा मार्ग निवडल्याने दीर्घकालीन उत्तम फल मिळते तर त्याच वेळी कमी कष्टाचा सुखकर मार्ग स्वीकारल्यास तेच फलित लांबते. शिक्षण असो, गुंतवणूक असो किंवा संपत्तीची निर्मिती हेच तत्व सगळीकडे लागू पडते.
हे अर्थातच श्रेयस आणि प्रेयसाचे सर्वसामान्य अर्थविवेचन आहे. तात्विक दृष्ट्या पहायचे झाल्यास या दोन्ही शब्दांचा खुप गहन अर्थ अभिप्रेत आहे. प्रेयस हे क्षणिक सुख आहे तर श्रेयस हे अंतिम किंवा शाश्वत सुख आहे.
अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण इतक्या सा-या सुविधांमध्ये मानव खरंच सुखी आहे का? जर असेल तर अजुनही सतत नवनवीन सुखसाधनांचा शोध घेतला जातो, तो कशासाठी? प्रत्येक व्यक्तीचं सुख निराळ्या गोष्टीत आहे, तर मग सुखी असणं म्हणजे नक्की काय आहे?
प्रेयस हे ते क्षणिक सुख आहे जे भौतिक साधनांतून प्राप्त होते तर श्रेयस हे ते सुख आहे जे व्यक्ती समाधानातून आणि स्थितप्रज्ञ वृत्तीतून प्राप्त करते. प्रेयसात न गुंतता श्रेयसाकडे जाणे हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असावे असे भारतीय तत्वज्ञान उपनिषदे आणि गीतेच्या माध्यमातून मांडते.

अध्यात्म म्हणजे काय?

अध्यात्म ही एक बहुआयामी संकल्पना आहे. ती समजून घेण्यात जितका स्पष्टीकरणाचा भाग आहे तितकाच अनुभूतीचाही आहे. कसे ते उत्तराच्या अंती स्पष्ट होईलच.

अध्यात्म शब्दाची साधारण फोड अधि + आत्म अशी होते. यात अधि हे अव्यय विशेषत्वाने किंवा प्रकर्षाने अशा अर्थाने येते. आत्म याचा अर्थ आत्मन् म्हणजे आत्मा किंवा स्व.
त्यामुळे अध्यात्माचा शब्दशः अर्थ – प्रकर्षाने किंवा विशेषत्वाने स्वतःला जाणणे. कसे जाणणे.
भगवद्गीतेच्या आठव्या अक्षरब्रह्मयोग या अध्यायात. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण अध्यात्म या संज्ञेचा अर्थ सांगतो. अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुना प्र्श्न करतो की –

तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥
तू ज्या संकल्पना वापरल्यास त्यांचे अर्थ सांग. ते ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव कोणाला म्हणायचे? अधियज्ञ म्हणजे काय आणि तो कोठे असतो? अंतकाळी चित्त स्थिर असणाऱ्या व्यक्तीने काय जाणायचे आहे?

श्रीकृष्ण सांगतो –

अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते। भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः॥
ब्रह्म हे परम (तसेच) अक्षर आहे. स्वभावाला अध्यात्म म्हणावे. भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो.

अध्यात्म म्हणजे स्वभाव असे श्रीकृष्ण सांगतो

मग आता स्व-भाव म्हणजे काय हे नीट समजून घेऊ यात.
कारण आपल्या रोजच्या वापरातला शब्द असल्याने त्याच्या अर्थाकडे नीटसे लक्ष जात नाही. स्वभाव म्हणजे वागण्याची रीत असा आपला वापरातला अर्थ आहे.
वास्तविक स्व म्हणजे आपण स्वतः आणि भाव म्हणजे त्याच्या मागचे तत्व. जसे आपण भक्तीभाव किंवा आपपरभाव हे शब्द वापरतो. मग स्व च्या मागचा भाव कोणता? जो स्व ला भाव (जिवंतपणा) प्राप्त करून देतो तो. म्हणजेच चैतन्य किंवा आत्मतत्व. जे शरीराला चलायमान करतं. म्हणूनच मृत शरीराला स्व-भाव नसतो जिवंत शरीराला असतो.
श्रीकृष्ण सांगतो.
अध्यात्म म्हणजे जड शरीर आणि चैतन्य यांचे द्वैत. ज्या तत्वाने या सृष्टीचे सर्जन झाले ते तत्व म्हणजे अध्यात्म. म्हणूनच अध्यात्म जाणायचे म्हणजेच स्वतःला जाणायचे. स्व-भाव जाणायचा. स्वतःला जाणा, तत्वमसि, Know Thyself वगैरे तत्वज्ञान जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेथे हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रकर्षाने स्वतःला जाणायचे तर त्यासाठी स्वतःशिवाय इतर कोणतेही बाह्य साधन उपयुक्त ठरणार नाही. स्वतः प्रयत्न करून स्वतःला जाणणे भाग आहे. स्वतः च स्वतःवर प्रयोग करुन स्वतःच त्याचे निष्कर्ष तपासून पहायचे म्हणूनच अध्यात्मात अनुभूतीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे.
अधिक वाचनासाठी –‘अंतरंग – भगवद्गीता’

‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे काय?

उपनिषदे भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा आहेत. परब्रह्म किंवा आत्मतत्त्वाचा अभ्यास हा उपनिषदांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय आहे. अहं ब्रह्मास्मि । हे बृहदारण्यक (१/२/४/१०) उपनिषदातील असून मूळ श्लोक असा आहे तद्धैतत्पश्यन्नृषिर्वामदेवः प्रतिपेदेऽहं मनुरभवं सूर्यश्चेति ।
तदिदमप्येतर्हि य एवं वेदाहं ब्रह्मास्मीति स इदं सर्वं भवति ।

उपनिषदांधील जी ४ महावाक्ये किंवा अथांगसार सांगणारी वाक्ये आहेत त्यातील हे एक. अहम् म्हणजे मी आणि ब्रह्म अस्मि म्हणजे ब्रह्म आहे. अहम् ब्रह्मास्मि म्हणजे मी ब्रह्म आहे असा शब्दशः अर्थ होतो.
वास्तविक अर्थ काय –
आत्मज्ञान किंवा आत्मतत्त्व जाणणा-या व्यक्तीला झालेली ही उपरती आहे की सृष्टीचे कारक जे ब्रह्म तत्त्व, मी त्याचाच अंश किंवा आहे किंवा तत्त्वतः मी आणि तो कोणी निराळे नसून एकच आहोत. शारीर देह नश्वर तत्त्व असून आत्मा हे अविनाशी अविकारी आणि अनंत तत्त्व असून ते, मी, ब्रह्म आणि परब्रह्म हे एकस्वरूप आहेत. ज्याप्रकारे सर्व जलस्त्रोत जसे शेवटी समुद्रात एकरुप होतात तसेच हा अंश परमात्म्याशी तद्रुप होतो.
तत् त्वम् असि । (छान्दोग्य उपनिषद ६/८/१६) म्हणजेच ते (ब्रह्म) तू आहेस हे महावाक्यही याच अर्थाने येते.
जीवात्म्यात परमात्म्याचा अंश असतो या व्यापक अर्थाने ही महावाक्ये येतात.
वेदातही परब्रह्म हे एक तत्त्व असून त्याला ज्ञाते अनेक नावांनी ओळखतात असे म्हटले आहे एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु:। – ऋग्वेद १/१६४/४६
गीतेतही भगवंत आपला अंश प्रत्येकात आहे हे सांगतो.
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्।।१५.१५।।

मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन (दोषनाश) ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांतांचा कर्ता आणि वेदांना जाणणारासुद्धा मीच आहे.

अंतरंग – भगवद्गीता – भाग ३

दृष्टीकोन …. अर्जुन विषाद योग!

दृष्टीकोन……….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. शेक्सपिअरचे ‘ऑथेल्लो’ आणि देवलांचे ‘संशयकल्लोळ’ ही एकाच प्रकारच्या प्रसंगावर आधारीत नाटके असूनही एक दुःखांत (Tragedy) तर दुसरे विनोदी! कारण काय तर विषयाकडे पाहण्याचा कलाकाराचा दृष्टीकोन. एकाला इष्ट परीणाम साधण्यासाठी दुःखांत योग्य वाटला तर दुस-याला विनोद.

अर्जुनविषाद. गीतेतील पहिल्या अध्यायाचे असेच आहे. केवळ अर्जुनाचा विलाप या एकाच दृष्टीकोनातून सातत्याने मांडला गेल्याने बहुतकरून वाचकांना हा अध्याय म्हणजे रडगाणे आणि अर्जुन हा काहीसा भावनिक (Emotional Fool) वाटतो. दृष्टीकोन बदलून पाहील्याशिवाय त्यातली विवेकाची बाजू आपल्यासमोर येणार नाही.

विवेक… योग्य आणि अयोग्य या दोनहीतील फरक जाणण्याची बुद्धी. विवेक…. कोणतेही पाउल टाकण्यापुर्वी ब-यावाईट परीणामांचा पुरेसा विचार करायला लावणारा संयम.

विवेक…. अमानुष आणि विनाशी शक्ती बाळगणारे आणि युद्धासाठी उत्सुक असणारे इतर योद्धे आणि अर्जुन यांच्यातील फरक..

महाभारतीय युद्धातील अनेक महारथी योद्धे हे अपरिमित शक्ती आणि दिव्य अस्त्रांनी सज्ज होते. त्यातील बहुसंख्यांना त्या शक्तींच्या वापराची खुमखुमी होती. परंतु त्या शक्तीच्या आणि दिव्य अस्त्रांच्या वापराने होणा-या अपरीमित हानीची पुरेशी जाणीव कितीजणांकडे होती? प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्वार्थाच्या किंवा सुडाच्या अग्निने पेटलेला होता. दृष्टीकोन……..

सुड, शत्रुत्व, विजय हाच दृष्टीकोन म्हणून अभिव्यक्ती? जास्तीत जास्त संहार…!

एक सैनिक म्हणजे एक परीवार. वास्तविक असे लक्षावधी परीवार उद्ध्वस्त करण्याचे सामर्थ्य बाळगणा-या वीराचा विवेक कितीतरी जास्त पटीने जागा हवा ना? या विवेकाचे, संयमाचे दर्शन घडवणारा अर्जुन, अर्जुनविषादातून प्रकट होतो.

युद्धाची आणि संहाराची अपरीहार्यता पटल्याशिवाय तो शस्त्र उचलायला धजावत नाही. तो दुबळा किंवा कमकुवत मनाचा आहे म्हणून नव्हे तर आपल्या संहारक क्षमतेवर त्याचा दृढ विश्वास आहे म्हणून. संहाराच्या सर्वस्पर्शी विपरीत परीणामांची त्याला जाणीव आहे म्हणून.

केवळ शक्तिमान योद्धा म्हणूनच नव्हे तर एक परिपक्व, प्रगल्भ आणि विवेकी शासक म्हणून अर्जुन या अध्यायात उभा राहतो. आपण उद्याचे शासक झालो तर समाज आपलाच आदर्श समोर ठेवणार आहे, आपण जसे वागलो तसेच वागणार आहे याची त्याला खात्री आहे. त्यामुळेच युद्धाचे होणारे भयानक परीणाम तो निरनिराळ्या भुमिकांमधून ताडून पाहतो. व्यक्ती, कुटुंब, समाज, धर्मकारण, अर्थकारण, राजकारण, मुल्यव्यवस्था अशा सर्व घटकांवरचे परीणाम.. दृष्टीकोन….

हे सर्व जाणूनही युद्ध का करायचे याचे समाधानकारक उत्तर त्याला हवे आहे. कारण एक विवेकी व्यक्ती आणि भावी शासक म्हणून या युद्धाचे नैतिक उत्तरदायित्व तर त्याला घ्यावे लागणर आहेच वर पुढील पिढीला समजावूनही सांगावे लागणार आहे. म्हणूनच हे समाधान मिळाल्याशिवाय शस्त्र उचलण्याची त्याला भीती वाटते.

दृष्टीकोन.. जिज्ञासा….

युद्धाची भीषणता, अर्जुनाची परिपक्वता याखेरीज अजूनही एक वैशिष्ट्य मांडता येईल. जे अर्जुनाच्या विवेचनातून पहिल्या आणि पुढील जवळपास सर्व अध्यायात दिसुन येते.

जिज्ञासा…. ज्ञानलालसा….

महाभारतात एक कथा आहे. असं म्हणतात की कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकविताना द्रोण एक युक्ती करत असत. सकाळी सर्व विद्यार्थ्यांना पाणी भरून आणण्यासाठी ते एक एक पात्र देत असत. त्यातले अश्वत्थाम्याला दिलेले पात्र सर्वात जास्त रुंद तोंडाचे असल्याने तो सर्वात आधी पाणी भरून परत येत असे. मग इतर शिष्यवृंद येईपर्यंत द्रोणाचार्य त्याला काही खास गोष्टी शिकवत असत. फक्त अर्जुनाला ही मेख कळते. तोही अश्वत्थाम्याबरोबर पोहोचून या विशेष शिक्षणाचा लाभार्थी होतोच वर द्रोणाचार्यांचाही अधिक लाडका बनतो. ही गोष्ट किंवा पांडव भावंडात श्रीकृष्णाच्या अधिक जवळही अर्जुनच असणे. दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठीची तपश्चर्या आणि देशाटनही अर्जुनालाच करायला सांगीतले जाणे. यातून एक गोष्ट नक्की सिद्ध होते की अर्जुन हा केवळ शक्तीमान योध्दा नव्हता तर एक जिज्ञासु अभ्यासकही होता. तसं नसतं तर केवळ “दादा सांगतोय ना” किंवा “मी सांगतोय ना” “मग कर युद्ध” असं कृष्णाने म्हटलं असतं तरी तो युद्धाला तयार झाला असता!!!

उलट विषादातून त्याला हवे असणारे समाधान हे बहुआयामी आहे. भिन्न भिन्न दृष्टीकोनातून त्याला ते समजून घ्यायचंय. कृष्णासारख्या ईश्वरी अंशाला १७ अध्यायातून जे ज्ञान विस्तृतपणे मांडावे वाटले याला कारण ज्याचे समाधान करायचे तो अर्जुनासारखा जिज्ञासु आणि ज्ञानाची खरी उपासना करणारा साधक होता. जितकी साधकाची जिज्ञासा मोठी तितकीच ज्ञानाची व्याप्तीही. म्हणून गीतेसारखं साध्य हे अर्जुनासारख्या साधकाच्या जिज्ञासेचं फलित आहे.

आणि हो अर्जुनविषादच नसता तर कृष्णाने गीता सांगीतली असती का? आणि आपल्याला ती अनायासे प्राप्त झाली असती का?!!!!

त्यामुळे गीतेतील १७ अध्यायातील ज्ञान ही अर्जुनाची पर्यायाने अर्जुनविषादाची देणगी आहे.

काय आहे ही देणगी… सांख्ययोग….. पुढील भागात…

मागील भाग- अंतरंग- भगवद्गीता- भाग २ पुढील भाग- अंतरंग- भगवद्गीता- भाग ४

Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach

Translate »
error: Write to us for sharing the writeup https://sheetaluwach.com/contact