**आत्तापर्यंतचे सर्व लेख वाचलेल्या (कमाल आहे!) वाचकांच्या हे ध्यानात आले असेल की पहील्या लेखापासून लेखांची लांबी उत्तरोत्तर वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे लेखागणिक भाषाही किंचीत क्लिष्ट होत गेली आहे. याचे कारण अर्थातच गीतेचे ज्ञान दुस-या आणि तिस-या अध्यायाय अधिकाधिक गहन होत जाते. त्याचे सोपे स्पष्टीकरण देणे कठीण नाही पण त्यासाठी शब्दव्यापार खुप वाढवावा लागेल. शब्द कमी ठेवावे तर भाषा कठीण होते. त्यामुळे शब्द आणि भाषेचा पोत दोन्हीचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नात लेख थोडे क्लिष्ट होणे स्वाभाविक आहे.***
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात. व्यक्ती तिचा हुद्दा , अधिकार किंवा स्थान मग ते लौकिकार्थाने कितीही मोठे असले तरी अंतःप्रेरणेशिवाय ते गायन करत नाहीत असे तानसेन सांगतो. अकबराच्या हट्टापायी दोघेही गायन ऐकण्याचा प्रयत्न करण्यासाठी तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेमध्ये सध्या गुरुदेवांचे वास्तव्य असल्याचे त्यांना कळते. आपल्या प्रिय शिष्याला, तानसेनाला पाहून गुरुदेव अतिशय आनंदीत होतात, तानसेनासह आलेल्या ‘पांथस्थाचेही’ ते स्वागत करतात. दोनेक दिवसांच्या वास्तव्यानंतर एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय….. निसर्गासह आपल्या शरीरातील रंध्र आणि रंध्र केवळ गाणं ऐकतंय असा भास अकबराला होतो! संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव तो भाग सोडून निघुन गेलेले असतात. अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो की मी मनुष्यमात्रातील एका राजासाठी गातो तर माझे गुरुदेव हे अखिल सृष्टीच्या निर्मात्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला! कर्माचे उद्दीष्ट्य जितके उद्दात्त तितका त्याचा परीणाम उन्नत…….
या एकाच गोष्टीतून चौथ्या अध्यायाचे सार प्रकट होते. किंबहुना कर्म आणि ज्ञानकर्मसंन्यास या दोनही अध्यायांचा एकत्रित बोध या गोष्टीतून होतो.
विहीत कर्म हे जर फलाची अपेक्षा न करता परमात्म्याला अर्पण करण्याच्या वृत्तीने केले तर त्याचे बंधन कर्त्याला बाधत नाही. अशा वृत्तीतून कर्ता ज्ञाता होतो आणि परमात्म्याला प्राप्त करतो.
ज्ञानकर्मसंन्यास……
‘ज्ञानकर्मसंन्यासयोग’ हा गीतेतील चौथा अध्याय आहे. या शब्दाची नीट फोड केल्यास संपुर्ण अध्यायाचा सारांश कळावा. फोड दोन प्रकारे करता येईल.
१. संन्यस्त वृत्तीने कर्म करण्याचे ज्ञान
२. कर्म करता करता संन्यस्तवृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे
पहीली फोड ज्ञानयोगी तर दुसरी कर्मयोगी आहे. दुस-या आणि तिस-या अध्यायात सांगितलेले कर्मविचार या अध्यायात किंचीत विस्ताराने मांडले आहेत. साधारणपणे या अध्यायाचे चार प्रमुख भाग पडतात.
पहील्या भागात कृष्ण आपल्या अवतारी कृष्णरुपावर भाष्य करतो आणि त्या अनुषंगाने कर्मयोग मांडतो. तोच कर्मयोग योगी आणि महात्मे कसे आचरणात आणतात हे तो दुस-या भागात सांगतो. तिसरा भाग हा प्रामुख्याने यज्ञ या विषयावर आहे तर चौथ्या भागात तो ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करतो.
अध्यायाच्या सुरुवातीला कृष्ण सांगतो की जे ज्ञान तो अर्जुनाला देतोय ते त्याने पुर्वी विवस्वानाला (सूर्य) दिले होते. अर्जुनाला याचे आश्चर्य वाटते. कारण अर्थातच अर्जुनापुढे उभा असणारा कृष्ण हा सूर्याच्या आधी जन्मणे शक्य नाही. तेव्हा श्रीकृष्ण सांगतो की माझे आणि तुझेही अनेक जन्म झाले आहेत. ते तूला आठवत नसले तरी मला आठवतात. मी जन्मरहीत आणि अविनाशी आहे. केवळ योगमायेने मी प्रकट होत असतो. कधी प्रकट होतो? तर –
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ४-७ ॥
जेव्हा अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्याची वेळ येते तेव्हा मी प्रकट होतो.
भगवंत जेव्हा सगुण साकार असा कृष्णावतार धारण करतो तेव्हा त्याही शरीराची सर्व विहीत कर्मे तो करतो परंतु त्या कर्माचे बंधन त्याला बाधत नाही. कारण त्याला कर्माच्या फलांची आसक्ती नाही. यामुळे जो कोणी परमात्म्याच्या अनासक्त कर्माचे तत्त्व जाणतो तोही कर्मबंधनातून मुक्त होतो.
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥
म्हणूनच सृष्टीचे सर्जन असो किंवा गुणकर्मानुसार वर्णांची निर्मिती असो भगवंत एकाच वेळी कर्ता आणि अकर्ता दोन्ही होतो.
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः । तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम् ॥ ४-१३ ॥
हे सर्व तो निर्माण करतो म्हणून कर्ता, परंतु यातून कोणत्याही फलाची आसक्ती त्याला नाही म्हणूनच अकर्ता.
मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणा-या तुझ्या पुर्वजांनीही माझे हे स्वरुप जाणले आणि त्याचे अनुकरण केले. म्हणूनच हे अर्जुना तू ही याच मार्गाचे अनुकरण असे कृष्ण सांगतो.
अशाप्रकारे प्रत्यक्ष सृष्टीचा कर्ता, परमात्मा जसे निरपेक्ष कर्म करतो तसे कर्म करावे असे सांगून कृष्ण दुस-या भागाकडे वळतो.
असे ज्ञानयुक्त कर्म करायचे तर कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणणे आवश्यक आहे. कारण हा भेद जाणणाराच कर्माचे तात्विक स्वरुप समजु शकतो. ज्याला हे स्वरूप कळाले तो योगी कर्म करूनही अलिप्त राहतो.
मग कर्म, अकर्म आणि विकर्म नावाची तीन वेगवेगळी कार्ये किंवा कृती आहेत का? तर नाही. कृष्ण म्हणतो कर्मातच अकर्म किंवा विकर्म पाहता आले पाहीजे. म्हणजेच आपल्या कर्माकडे मनुष्य कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ते महत्वाचे आहे.
शरीराचे कर्म जे कर्म आहे परंतु निस्पृहपणे आचरल्याने ते कर्म इंद्रियांपर्यंतच मर्यादित राहते आणि आत्म्याला त्याचे बंधन लागत नाही. कर्म असूनही ते भासमान किंवा नसल्यासारखेच आहे म्हणून त्याला अकर्म म्हणता येईल. म्हणजे कर्म हे वास्तविक कर्म नसून केवळ भास आहे जो इंद्रियांमुळे घडतो. जो व्यक्ती नित्य आणि विहीत कर्माला अकर्म मानतो. म्हणजे विहीत कर्म करताना अहंकार बाजूला ठेवतो आणि ते कर्म जणु आपण केलेले नाहीच असे मानुन निस्पृहपणे करतो तो अकर्म जाणतो. तो ज्ञानी होय. येथे उदाहरणासाठी ज्ञानदेवांचा आधार घेऊ.
जैसा जो जलापासिं उभा ठाके । तो जऱ्हैं आपणपें जलामाजि देखे । तऱ्हीं निभ्रांत ओळखे । म्हणे मीं वेगळा आहें॥
जसे पाण्यांत दिसणारे प्रतिबिंब आपले असले तरी ते आपण नव्हे तर भास आहे हे आपण जाणतो. तसेच कर्म हा शरीराचा धर्म आहे, आत्मा त्यापासून वेगळा आहे हे जाणणे. व्यक्ती जेव्हा अशा अलिप्त किंवा निस्पृह वृत्तीने कर्म करते तेव्हा ते कर्म अकर्म होते कारण त्याचे शरीर कर्म करते पण आत्मा त्यापासून मुक्त राहतो.
मग विकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे विशेष कर्म. अकर्माचे स्वरुप जाणणे किंवा आत्म्याचे स्वरूप जाणणे म्हणजे विकर्म. विकर्म हे कर्म नसून केवल ज्ञान आहे. त्याची आसक्ती म्हणजेच मोक्षाची आसक्ती किंवा मुमुक्ष वृत्ती.
म्हणूनच कृष्ण म्हणतो की जो व्यक्ती कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म (मुमुक्षुत्व) पाहतो तो योगी होय.
कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥ ४-१८ ॥
असा ज्ञानी पुरुष आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने कर्मबंधन नष्ट करतो आणि ज्ञानियांचाही ज्ञानी होतो. असा व्यक्ति कर्म करूनही बंधमुक्त राहतो. उपभोग घेऊनही भोगमुक्त राहतो. त्याच्या कर्माचा केवळ भास होतो अंतरी मात्र तो निष्कर्मी राहतो. त्यामुळे नित्यकर्म हे दृष्य कर्म असूनही त्याच्या लेखी ते अकर्म आहे. तर मोक्षप्राप्तिची साधना हे दृष्य कर्म नाही परंतु त्याच्यासाठी ते एकमेव कर्म आहे.
ज्ञानदेव म्हणतात
आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें। जैसे न चलतां सूर्याचे चालणे। तैसें नैष्कर्म्यत्वीं जाणे। कर्मीचि असे ।
तो मनुष्यासारिखां त-हैं आवडे। परि मनुष्यत्व तेयांसि न घडें।।जैसे जली जलामाजिं न बुडे। भानुबिंब।।
सूर्य ज्याप्रमाणे उदय आणि अस्त झालेला दिसतो परंतू तो आपल्याला घडलेला भास असतो वास्तविक सूर्य अचल असतो. तसाच निष्कामता प्राप्त केलेला कर्मयोगी वरून माणसासारखा माणूस दिसतो परंतू अंतस्थ योगी असतो. सूर्यबिंब जसे पाण्यात बुडाल्याचा भास सायंकाळी होतो तसा त्याच्या कर्माचा आणि सामान्य माणूस असण्याचा केवळ भास असतो. वरून कृष्ण, राम वगैरे असतो पण अंतरी योगीराज असतो.
अशा व्यक्तीच्या आयुष्याला यज्ञाची उपमा देत कृष्ण तिस-या भागाकडे वळतो.
पुर्वी सांगितल्याप्रमाणे यज्ञभाव हा एक निरपेक्ष कर्माप्रमाणे आहे. मनुष्याने यज्ञभावनेने म्हणजेच निरपेक्ष वृत्तीने कर्म करावे असे तिस-या अध्यायात भगवंताने सांगितले होते. संन्यस्त कर्मही यज्ञच आहे असे कृष्ण म्हणतो. असा यज्ञ ज्यात आहुति देणारा (कर्मयोगी), हविभाग (यज्ञात अर्पण करायची वस्तु) (कर्म) आणि यज्ञ ज्याला समर्पित करायचा ते (परब्रह्म) सर्व ब्रह्मरुप आहेत. कारण यज्ञ करणारा भक्त, अग्नि आणि यज्ञ ज्याला अर्पण केला तो परमात्मा तिघेही अंतिमतः एकरुप होतात.
निरनिराळ्या यज्ञांच्या माध्यमातून आत्मसंयम आणि इंद्रियनियमन करून योगी आत्मज्ञान प्राप्त करण्याचा यत्न करतात. हे सर्व यज्ञ म्हणजेच साधनेची जंत्रीच कृष्ण सादर करतो.
श्रोत्र, वाचा इत्यादि इंद्रियांच्या क्रिया संयमित करणे, द्रव्यादि आसक्ती संयमित करणे, हिंसादि अतिचार संयमित करणे, आहारादि भोग नियमित करणे, प्राणायामादि योगातून शरीरक्रिया संयमित करणे अशा अनेक यज्ञांद्वारे योगी कर्मबंधनातून मुक्त होतात.
ज्ञानकर्मसंन्यास शब्दाची दुसरी फोड म्हणजे कर्म करता करता त्यात संन्यस्त वृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे हे आपण पाहीले.कर्म, संन्यस्त वृत्ती आणि आत्मज्ञान अशा मार्गाने जाण्याऐवजी आधी ज्ञानयुक्त होऊन मगच कर्म करणे म्हणजेच दुसरी फोड. ज्ञानप्राप्ती……..
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥
या सर्व दृष्य वस्तु किंवा इंद्रियस्वरूप यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असे सांगून कृष्ण अंतिम भाग म्हणजेच ज्ञानाच्या महतीकडे वळतो.
कर्म करताना ज्या मोहाचा त्याग करायचा, हे ज्ञान त्या मोहात तुला पडूच देणार नाही. जसे पेटलेला अग्नि इंधनाची राख करतो तसे हे ज्ञान तुझे कर्मबंधनच भस्मसात करेल. कर्मयोगी कालांतराने अंतकरण शुद्ध झाल्यावर हेच ज्ञान प्राप्त करून घेतो. त्यामुळे असे ज्ञान तू साक्षात्कारी व्यक्तींकडून प्राप्त करून घे असे कृष्ण अर्जुनाला सांगतो. हे ज्ञान कसे प्राप्त करावे याचा वस्तुपाठही तो पुढील श्लोकात देतो
तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥
ते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील.
कारण इंद्रिय संयमन करणा-या श्रद्धावान व्यक्तीलाच हे ज्ञान लाभते या ज्ञानासारखे पवित्र जगात दुसरे काही नाही. ते प्राप्त झालेल्या व्यक्तीला परम शांतीचा लाभ होतो.
उपसंहार
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
परित्राणाय साधूनां….।
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
श्रद्धावान् लभते ज्ञानम्।
चौथा अध्याय नसता तर भारतातल्या बहुतांश संस्थांना बोधवाक्यांसाठी वणवण भटकावे लागले असते!
कर्मयोगाच्या विस्तृत वर्णनानंतरही ज्ञानकर्मसंन्यास सांगण्याचे मुख्य कारण माणसाचा स्वभाव. कर्माची आसक्ती इतकी प्रबळ असते की ती मोठ्या मोठ्या ज्ञानी पुरुषांनाही त्या मोहात अडकवून ठेवते. ते कर्म करण्याचा आनंदच त्यांना इतका भावतो की आपले ध्येय हे कर्म पार करून पुढे मिळणारे आत्मज्ञान आहे याचा त्यांना विसर पडतो! विनोबा भावेंचे एक सुंदर वाक्य आहे –
एकवेळ मोहाचा त्याग करता येईल पण त्यागाचा मोह आवरता येणे कठीण.
त्यागी, कर्मयोगी या शब्दांच्या मोहापायी त्या कर्माच्या आसक्तीत गुरफटलेले अनेक ‘भोंदु’ कर्मयोगी आपण आसपास पाहतोच मग सामान्य माणसाची काय कथा. न आवडणारे कर्म टाकता येते पण आवडणारे कर्मही टाकायचे आहे. कारण ते आवडते किंवा नावडते हे इंद्रियांनी निर्माण केलेले भास आहेत. ते खरे मानून चालायचे तर आत्मा बंधनात अडकेल आणि मग कर्मांची बरीवाईट फळे भोगण्यासाठी पुनर्जन्माच्या चक्रात अडकेल. आपले ध्येय हे आत्मा बंधमुक्त करणे आहे मरणोत्तर पुतळा उभा रहावा म्हणून प्रयत्न करणे नव्हे. हे परिणाकारकरित्या पटवून देण्यासाठी कृष्ण ज्ञानकर्मसंन्यास उभा करतो. अर्जुनालाही हे पटले पाहीजे की केवळ युद्धोत्तर लोक आपल्याला चांगले म्हणतील म्हणून धर्माची बाजू घेणे हे तितकेच अयोग्य आहे जितके स्वार्थाने अधर्माची बाजू घेणे. कारण दोन्ही मध्ये कर्माच्या फलाची आसक्ती आहे. या ब-या आणि वाईट आसक्तीवर संन्यास शब्दाने आघात करून कृष्ण अर्जुनाला अंतिम ध्येयाच्या मार्गावर दृढ करतो.
कुमारजींनी अमर केलेला कबीराचा दोहा इंद्रियसंयमावर आणि कर्मसंन्यास निराळ्या शब्दात व्यक्त करतो ।
हिरना समझ बुझ बन चरना || एक बन चरना दूजे बन चरना।।तीजे बन पग नहीं धरना ||
तीजे बन में पंछ पारधी।।उन के नजर नहीं पड़ना ||
पांच हीरन पच्चीस हिरनी।।उन में एक चतुर ना ||तोए मार तेरो मॉस बिकावे। खलका करेंगे बिछोना ||
कहे कबीर जो सुनो भाई साधो।।गुरु के चरन चित धरना||
पाच पारधी म्हणजे पंचेंद्रिये जी आपापल्या मोहाच्या जाळ्यात अडकवतात आणि मग आपली फरफट होते. या इंद्रियांचे वन म्हणजे तिसरे वन, यात पाऊलही न ठेवता दुस-या वनात चरायचे म्हणजेच निष्काम वृत्तीचे कर्मयोगी शरीर. याच शरीराने मग पुढे ज्ञान प्राप्त करून पहील्या वनातही चरायचे म्हणजेच आत्मा आणि परमात्म्याचे एक होणे. हे सगळं ‘समज बुझ’ आणि ‘गुरु के चरन चित’ धरून करायचे आहे. कारण अर्थातच ‘उन मे एक चतुर ना’, पाचही इंद्रिये चतुर नाहीत त्यांना बांधायचे काम हरणाचे म्हणजे अर्थातच आपले आहे. अन्यथा जसे त्या हरणाचे मांस विकले जाईल आणि चामडीचे आसन केले जाईल तसेच आपलेही जन्ममृत्यू आणि कर्म असे चर्मचक्र चालुच राहील!
मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ६ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ८
Copyright sheetaluwach.com 2020 © #sheetaluwach