विश्वरुपदर्शन – अद्वैतानुभूतीकडे जाणाऱ्या भारतीय तत्त्वज्ञानाचा अंतःप्रवास!
विश्वरुपदर्शन या अध्यायाकडे पहाताना अनेकदा परमेश्वराच्या जगड्व्याळ स्वरुप अचंबित करुन जातेच परंतु केवळ त्या दृष्यासाठी हा अध्याय भगवंताने अर्जुनाला दिला असावा असे वाटत नाही. परमेश्वराचे सर्वव्यापी स्वरुप विभूतीयोगातून समोर येते आणि विश्वरुपदर्शन म्हणजे केवळ त्याचे एकत्रित दृष्यमान प्रमाण इतकाच अर्थ या अध्यायातून ध्वनीत होते असे मानणे धाडसाचे ठरेल.
थोडा अधिक खोलवर विचार करता, मूलतः विश्व-रूप-दर्शन हे – प्रत्यक्ष स्वरूपाचे दर्शन आणि त्या पाठीमागचा विचार या दोन्ही अर्थाने एक संकल्पना म्हणून पहाता येते असे जाणवते. विश्वरूप दर्शन याचा अर्थ विश्वाचे एकसंध असणे आणि त्यातील अद्वैताचा बोध घेणे. विश्व-रूप -दर्शन , अविद्या, मोह आणि माया या संकल्पनांचा एकत्रित विचार केल्यास हे पटावे.
विश्वरूपदर्शनयोग — हा केवळ अर्जुनाला श्रीकृष्णाने दाखवलेल्या विराट रूपाचा प्रसंग नाही; तो मानवी चेतनेच्या उत्क्रांतीचा एक तात्त्विक नकाशा आहे. गीतेतील हा अध्याय तेव्हाच पूर्णपणे समजतो जेव्हा त्याचा विचार अविद्या, मोह आणि माया या भारतीय तत्त्वज्ञानातील मूलभूत संकल्पनांच्या संदर्भात केला जातो. कारण विश्वरूपदर्शन हा केवळ दृश्य अनुभव नसून अविद्येचे क्षालन, मोहाचा अंत आणि मायेच्या आवरणातून सत्याच्या दर्शनापर्यंत पोहोचण्याचा अंतर्मनाचा प्रवास आहे.
अध्यायाच्या प्रारंभी अर्जुन म्हणतो—
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसञ्ज्ञितम् । यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥
माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला, त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले.
हे विधान समजून घेणे आवश्यक आहे. कारण अर्जुनाला अजून विश्वरूप दिसलेले नाही; पण त्याचा मोह आधीच ढासळू लागला आहे. यावरून एक गोष्ट समजायला हवी की—विश्वरूपदर्शनाची सुरुवात डोळ्यांनी होत नाही, ती विवेकाने होते. अर्जुनाला प्रदान केलेले दिव्य चक्षु हे केवळ चर्मचक्षू नसून विवेकाचे अंतःचक्षुसुद्धा आहेत.आता या मोहाचे मूळ समजून घेऊयात.
अविद्या
आदि शंकराचार्यांच्या मते
अविद्यालक्षणः आत्मानात्मविवेकाभावः
आत्मा आणि अनात्म यांचा विवेक न होणे हेच अविद्येचे लक्षण आहे.
भारतीय तत्त्वज्ञानात अविद्या म्हणजे केवळ माहितीचा अभाव नव्हे. ते अस्तीत्वाच्या चुकीच्या ओळखीचे नाव आहे. मनुष्य स्वला शरीर समजतो, विचारांना मी समजतो, नातेसंबंधांना अंतिम सत्य समजतो आणि नश्वर गोष्टींमध्ये स्थैर्य शोधतो. पतंजली योगसूत्रातील अविद्येची व्याख्या याच अर्थाला अधिक स्पष्ट करते—
अनित्याशुचिदुःखानात्मसु नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या
अनित्याला नित्य समजणे, अनात्म्याला आत्मा समजणे आणि दुःखाला सुख समजणे म्हणजे अविद्या.
ज्ञानेश्वर माउली अविद्येला अहंकाराचा धूर म्हणतात. जसा ढग सूर्याला झाकतो पण सूर्याचा नाश करू शकत नाही, तशी अविद्या आत्म्याला झाकते; आत्मस्वरूपाचा नाश करत नाही. म्हणूनच अविद्या ही सत्याचा अभाव नसून सत्यावरील पडदा आहे. याच अविद्येतून पुढे निर्माण होतो मोह.
मोह : अविद्येचा मानसशास्त्रीय परिणाम
अविद्या ही तात्त्विक संकल्पना आहे; मोह हा तिचा अनुभवात्मक परिणाम आहे. अविद्या म्हणजे सत्याचा विसर, तर मोह म्हणजे त्या विसरामुळे निर्माण झालेली मानसिक गुंतवणूक. गीतेतील अर्जुन युद्धभूमीवर उभा आहे; पण त्याचा प्रश्न युद्धाचा नाही. त्याची समस्या आहे—मी कोण? आणि माझे कोण? या चुकीच्या समजुतीतून निर्माण झालेली भावनिक गुंतागुंत.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात—
सूर्योदयासरिसी । रात्री पळोनि जाय अपैसी । गेली देहाहंता तैसी । अविद्येसवें ।
ज्याप्रमाणे सूर्य उगवताच अंधार आपोआप नाहीसा होतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर (‘मी देह आहे’) ही अहंता (अहंकार) अविद्येसह नष्ट होऊन जाते.
(बोरकरांच्या – “उरी उगवला आत्मसुधाकर” आणि पाडगांवकरांच्या “अमृताचा चंद्रमा” चा संदर्भ द्यायचा ‘मोह’ येथे टाळतो आहे!)
गीतेच्या दुसऱ्या अध्यायातही श्रीकृष्ण मोहकलिलम् हा शब्द वापरतो. कलिल म्हणजे दलदल. मोह ही अशी दलदल आहे की ज्यात बुद्धी अडकते. इंद्रियसुख, देहाभिमान, कर्तेपणा, ममता आणि अहंकार यांच्या गुंत्यातून मनुष्य वास्तव पाहू शकत नाही. म्हणूनच शंकराचार्यांसाठी मोह हा अविद्येचा परिणाम आहे, तर ज्ञानेश्वरांसाठी तो देहाभिमानाचा विस्तार आहे. दोघेही वेगवेगळ्या भाषेत एकच गोष्ट सांगतात—मोह म्हणजे मी स्वतंत्र आहे या चुकीच्या भावनेचा मानसिक आकार. पण आता हा मोह टिकून राहतो कशामुळे? त्याचे उत्तर आहे—माया.
माया : अविद्या आणि मोह यांची वैश्विक पार्श्वभूमी
भारतीय तत्त्वज्ञानात माया ही अत्यंत विस्ताराने मांडलेली संकल्पना आहे. माया म्हणजे फक्त भ्रम किंवा असत्य नव्हे. गीता आणि उपनिषदांच्या दृष्टीने ती ईश्वराची विश्वप्रकट करणारी शक्ती आहे.
श्रीकृष्ण म्हणतो—
दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया।
ही माझी त्रिगुणात्मक दैवी माया आहे.
येथे खरंतर माया म्हणजे विश्वाला प्रकट करणारी शक्ती. पण जीवाच्या दृष्टीने तीच शक्ती बंधनाचे कारण बनते. कारण माया एकत्वात अनेकता दाखवते. जिथे मूलतः एकच चैतन्य आहे, तिथे ती मी,तू,माझे, परके, यश, अपयश अशा असंख्य भेदांची निर्मिती करते.
ज्ञानेश्वरांनी या स्थितीचे अप्रतिम चित्र मायानदी या रूपकातून रेखाटले आहे. त्या नदीत अहंकाराच्या लाटा आहेत, विषयवासनेचे प्रवाह आहेत, मोहाचे महापूर आहेत आणि अज्ञानाचे भोवरे आहेत. जीव त्या प्रवाहात वाहत जातो आणि स्वतःच्या मूळ स्वरूपाचा विसर पडतो.
अहंकाराचिया चळिया । वरि मदत्रयाचिया उकळिया । जेथ विषयोर्मीच्या आकळिया । उल्लाळ घेती।
म्हणूनच माया आणि अविद्या यांमध्ये सूक्ष्म भेद आहे. माया ही वैश्विक शक्ती आहे; अविद्या हे तिचे वैयक्तिक अनुभवातील रूप आहे. माया विश्व निर्माण करते, अविद्या त्या विश्वाला अंतिम सत्य समजायला लावते, आणि त्यातून मोह निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर विश्वरूपदर्शनयोगाचा खरा अर्थ समजतो.अर्जुनाने जे विश्वरूप पाहिले ते केवळ हजारो मुख, लाखो नेत्र किंवा कोट्यवधी सूर्यांचे तेज नव्हते. ते प्रत्यक्षात त्याच्या द्वैतदृष्टीचा भंग करणारे दृष्य होते.
दिव्यं ददामि ते चक्षुः या वचनाचा अर्थ ज्ञानेश्वरांच्या भाषेत असा आहे—
आतां शरीरें बहुतें । देखोनि न भेदें हो चित्तें । जे मनबुद्ध्यादि भूतें । एकेंचि येथें ॥
आता निरनिराळी शरीरे पाहून तुझ्या चित्तात भेद येऊ देऊ नकोस. कारण की या सर्व शरीरात मन, बुद्धि, अहंकार व पंचमहाभूते, ही जी जगातील आठ तत्वे आहेत, ती एकच आहेत.
हां गा एकाचि देहीं । काय अनारिसें अवयव नाहीं ? । तेवीं विचित्र विश्व पाहीं । एकचि हें ।
अरे अर्जुना, एकाच देहामधे निरनिराळे (भिन्न भिन्न प्रकारचे अवयव नाहीत काय ? त्याप्रमाणे हे विचित्र विश्व एकच आहे, असे समज.
विश्वरूपात अर्जुनाला एकाच वेळी सृष्टी आणि संहार, जन्म आणि मृत्यू, देव आणि दानव, सौंदर्य आणि भय, सर्व काही एकाच चैतन्यात विलीन झालेले दिसते. येथे मायेने निर्माण केलेले सर्व भेद वितळतात.छांदोग्य उपनिषदातील सर्वं खल्विदं ब्रह्म हे विधान येथे अनुभवात उतरते. म्हणूनच विश्वरूपदर्शन म्हणजे बाह्य विश्व पाहणे नव्हे; तर विश्वाला वेगळे समजणाऱ्या दृष्टीचा अंत होणे.
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः…: अहंकाराचा अंतिम भंग
या अध्यायातील सर्वांत उत्तम क्षण म्हणजे श्रीकृष्णांचा उच्चार— कालोऽस्मि लोकक्षयकृत्
येथे अर्जुनाला विश्वाच्या नश्वरतेचे दर्शन घडते. मायेने निर्माण केलेल्या सर्व ओळखी, सत्ता, नाती, विजय, पराभव, शरीर आणि इतिहास—सर्व काही काळाच्या प्रवाहात विरघळून जाणारे आहे. अविद्येला वाटते की जग स्थिर आहे आणि मोहाला वाटते की हे सर्व माझे आहे. परंतु विश्वरूपातील काळ अर्जुनाला दाखवतो की काहीही कायमचे नाही. याच क्षणी मी कर्ता हा अहंकारही तुटतो. म्हणून श्रीकृष्ण पुढे म्हणतात—
निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्
जेव्हा अविद्या नाहीशी होते, मोह वितळतो आणि मायेचे आवरण पारदर्शक होते, तेव्हा मनुष्य स्वतःला स्वतंत्र कर्ता मानत नाही; तो विश्वचैतन्याच्या प्रवाहातील एक माध्यम असल्याचे जाणतो.
विश्वरूपदर्शनयोगाचे सार केवळ विराट रूपाच्या वर्णनात नाही. त्याचा खरा आशय अविद्या, मोह आणि माया यांच्या परस्परसंबंधात दडलेला आहे. अविद्या मनुष्याला स्वतःचे स्वरूप विसरायला लावते.त्या विस्मृतीतून मोह निर्माण होतो. मोहाला पोषक वातावरण माया निर्माण करते. आणि विश्वरूपदर्शन या तिन्हींचा भंग करते. म्हणूनच हा अध्याय हा केवळ अर्जुनाने पाहिलेल्या विश्वरुपाचा अध्याय नाही; तो अर्जुनाच्या अंतर्मनात घडलेल्या क्रांतीचा अध्याय आहे. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचे तर, हा विश्वरूपाचा चमत्कार नसून अहंकाराचे वितळणे आहे. आणि शंकराचार्यांच्या भाषेत तो आत्मा आणि अनात्म यांतील विवेक जागृत होण्याचा क्षण आहे. अखेरीस उरते ते एकच सत्य – उपनिषदांच्या भाषेत—
अहं ब्रह्मास्मि
विश्वरूपदर्शनयोगाचा अंतिम संदेश हाच आहे की, माया भेद दाखवते, मोह त्या भेदांना सत्य मानतो, अविद्या त्यांचे मूळ कारण असते; परंतु ज्ञान, भक्ती आणि अनुभूती यांच्या संगमातून जेव्हा दिव्यदृष्टी जागृत होते, तेव्हा सर्वत्र एकच परमचैतन्य अनुभवास येते. तेथे ना जीव उरतो, ना जग वेगळे उरते—उरते केवळ अद्वैत. विराटाचे दर्शन केवळ आपले खुजेपण दर्शवण्यासाठी नाही तर त्याच विश्वव्यापी शक्तीशी असणाऱ्या आपल्या अद्वैताची जाणीव घडवण्यासाठी आहे.
Copyright https://sheetaluwach.com/2021 © #sheetaluwach