अन्नमयादन्नमयमथवा, चैतन्यमेव चैतान्यात्| द्विजवर दूरीकर्तुम् वान्छसि, किम् ब्रूहि गच्छ गच्छेति।।
प्रातःकालचे गंगास्नान करुन देवदर्शनासाठी निघालेल्या शंकराचार्यांच्या मार्गात एक चांडाळ आपल्या कुत्र्यांसह आडवा येतो. सवयीने त्याला ‘दुर हो’ असे आचार्य म्हणतात. तेव्हा तो चांडाळ त्यांना प्रश्न करतो – “हे महात्मन् नक्की काय दूर करू? माझे शरीर? ते तर तुमच्यासारखेच पंचमहाभूतांनी बनलेले आहे आणि नश्वरही आहे. बरं शरीरस्थ चैतन्य/आत्मा दूर करू? तो तर तुमच्या माझ्यासकट सर्व विश्व व्यापून आहे मग त्याला त्याच्यातूनच दूर कसा करणार?” आपल्या सिद्धांताचे व्यावहारीक दर्शन घडवणाऱ्या त्या शब्दांनी भानावर आलेले शंकराचार्य त्या चांडाळातील ईशतत्व जाणून त्याला प्रणाम करतात.
या एका छोट्या कथेतून कित्येक गोष्टींचा उलगडा होतो!! चांडाळ असो वा आचार्य, कर्मयोगी असो वा संन्यासी, परमतत्वाचा स्पर्श झालेला प्रत्येक व्यक्ती समान असतो. त्यांच्या साध्याच्या आड त्यांच्या मार्गाचे भिन्नत्व येत नाही. चांडाळाला झालेले ज्ञान आणि संन्यस्त आचार्यांना झालेले ज्ञान हे एकाच परमेश्वराशी निगडीत आहे. प्राप्तीचा मार्ग भिन्न असणे हे त्यांच्या अंतःप्रेरणेशी निगडीत आहे पण त्यांचे साध्य एकच आहे त्यामुळेच त्यांनी अंगिकारलेले मार्गही तितकेच श्रेष्ठ आहेत. ज्ञान मोठे आणि कर्म गौण असा भेद येथे नाही.
आपल्यालाही असा अनुभव अनेकदा येतो जेव्हा एखाद्या सिद्धांतामागील तत्व उमगलेले असते परंतू व्यवहारात ती गोष्ट अंगिकारणे साधलेले नसते. साधे उदाहरण घ्यायचे तर रस्त्यावरील रहदारीच्या नियमांचे पालन!! हे नियम पाळणे हे प्रत्येकाला तत्व म्हणून पटलेले असते परंतू ते प्रत्यक्ष व्यवहारात आणणे जमत नसते. त्यासाठी अर्थातच प्रत्येकाची आपली कारणेही असतात. मग ते तत्व चुकीचे आहे असे मानायचे का? तर ते तर्काला पटत नाही. अशी मग गोंधळाची अवस्था माणसाला अनुभवाला येते. जे रहदारीच्या साध्या नियमांच्या बाबतीत खरे आहे ते आत्मज्ञानासारख्या दुष्प्राप्य गोष्टीत वेगळे कसे असेल? त्या बाबतचा गोंधळ अर्जुनाचाही होतो. मग येथे चुकते काय…..? तर तत्वावरील निष्ठा…. चांडाळाच्या शब्दांनी भानावर आलेले आचार्य त्याला प्रणाम करून अद्वैतावरील आपली निष्ठा सिद्ध करतात. बहुसंख्य व्यक्ती मात्र येथे गोंधळून जातात. काय करावे आणि काय करु नये हे ठरवता येत नाही. सोपा पण तर्काला न पटणारा मार्ग स्वीकारावा की कठीण पण शाश्वत कल्याण करणारा मार्ग स्वीकारावा? बहुतांशी लोक चटकन सोपा मार्ग स्वीकारतात आणि सिग्नल तोडून निघून जातात!! असे अनेक सिग्नल, प्रसंग, विचार चुकवून तर्काला मागे सारत एके दिवशी आयुष्यात अशा ठिकाणी येऊन पोचतात की जेथे तर्काला मागे सारणे अशक्य होते आणि वैचारीक गोंधळापेक्षा सिग्नलला थांबणे सोपे वाटायला लागते. अर्जुनही याच संभ्रमात आहे. कृष्णाच्या म्हणण्याप्रमाणे त्याला कर्माचे बंधन टाळून कर्म करायचे आहे पण मग त्यापेक्षा कर्मच टाळणे सोपे नाही का?
गीतेचा पाचवा अध्याय याच प्रश्नावर सुरु होतो. अर्जुन कृष्णाला प्रश्न करतो की एकीकडे कर्म टाकण्याचा उपदेश करतोस आणि कर्माची प्रशंसाही करतोस असे कसे. दोन्हीपैकी कल्याणकारक असे एक काहितरी सांग.
संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि । यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्।।
यावर कृष्णाचे उत्तर आजच्या परिस्थितीला सुसंगत असेच आहे. संन्यास आणि कर्मयोगात, कर्मयोग आचरण्यास सुलभ आहे असे कृष्ण सांगतो.
सर्वप्रथम आत्मज्ञानासारखे उदात्त ध्येय साध्य करण्यासाठी निवडलेला मार्ग मग तो ज्ञान असो कर्म असो की भक्ती यात उणेअधिक काहीच नसते. ध्येय जितके उन्नत त्याच्या प्राप्तीचा मार्गही तितकाच श्रेष्ठ आहे असे आग्रही प्रतिपादन या अध्यायातून श्रीकृष्ण करतो. अर्थात व्यक्तीच्या परिस्थिती प्रमाणे मार्ग हे आचरण्यास सुलभ किंवा कठीण असू शकतात.
संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ । तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो विशिष्यते।।
संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही कल्याणकारक आहेत. परंतु या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे.
श्रीकृष्णाच्या मते निष्क्रियता आणि निष्कर्मता यातील फरक जाणून खरी संन्यस्त वृत्ती अंगिकारणे हे प्रत्येकाला साध्य होणे कठीण आहे. त्यापेक्षा कर्मयोग आचरणात आणणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे अधिक सुलभ आहे. परंतु येथे हे नीट ध्यानात घेतले पाहीजे की कर्मयोग आणि संन्यस्त वृत्ती या दोन भिन्न गोष्टी असल्याचे समजणे हे मात्र चुकीचे आहे. कारण कर्मयोगी व्यक्ती शरीराने कर्म करत असते परंतु वृत्तीने संन्यस्त असते तर संन्यस्त व्यक्ती यातील कर्माच्या भागातूनही निवृत्ती पत्करते. त्यामुळे केवळ सर्वसंगपरित्याग करून अंगाला राख फासून ध्यानस्थ बसणे म्हणजेच संन्यास असे जर कोणी मानत असेल तर ते अयोग्य आहे. भगवंत पुढे असेही म्हणतात की संन्यस्त किंवा कर्मयोगी व्यक्तीला वेगवेगळी फळे मिळतात असे मानणेही मूर्खपणाचे आहे. दोन्हीतही मिळणारे फलित हे एकच असते. जो हे जाणतो तो खरा ज्ञाता.
मग कर्मयोगाला सुलभ म्हणायचे कारण काय? याचे विवेचन भगवंत पुढे करतात.
संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः। योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति॥
परंतु हे महाबाहो अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. भगवत्स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो.
इंद्रियांशी निगडीत कर्म करत राहणे परंतु त्या कर्माचे कर्तेपण स्वतःकडे न घेणे ही कला साध्य होणे अतिशय कठीण असते. त्यासाठी लागणारी साधना कर्मयोगाने सुलभ होते. व्यक्ती कर्माच्या बंधनाचे स्वरुप कर्म करता करता जाणायला लागते, आपल्या मनावर संयम प्राप्त करण्यास सक्षम होते आणि कालांतराने कर्म करूनही त्यापासून अलिप्त राहण्याचे ज्ञान प्राप्त करते.
आजच्या युगात व्यक्तीला शिक्षण, व्यवसाय, चरितार्थ, संसार आणि संगोपन अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडाव्या लागतात अशा वेळी आपले विहित कर्म प्रामाणिकपणे पार पाडणे त्याचवेळी मन कर्मफलाच्या बंधनातून मुक्त ठेवण्याचा यत्न करणे हे जास्त तर्कसंगत आहे असे भगवंत सांगतात. यातूनच कर्माचे कर्तेपण नाकारणे ही ज्ञात्याची अवस्था कर्मयोगीही प्राप्त करतो. फलाची आसक्ती नष्ट झाल्याने तो निरंतर मनःशांतीचा अनुभव घेतो आणि कमळावरील जलबिंदूप्रमाणे पापापासून अलिप्तही राहतो असे भगवंत सांगतात.
ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः।लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा॥
अशा चिरंतन मनःशांतीचा अनुभव घेणाऱ्या ज्ञात्याला भगवंत योगी आणि मुनी अशा संज्ञा वापरतात. अशा व्यक्तीला बाह्य विषयांची आसक्ती नसते, काम आणि क्रोध यामुळे उत्पन्न होणारा आवेग आवरण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी असते. इच्छा, भय आणि क्रोध या विकारांना दूर सारून परमात्म्याचे ध्यान करणारा असा व्यक्ती सात्विक आणि अक्षय आनंदात लीन असतो असे श्रीकृष्ण प्रतिपादन करतो.
कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् । अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम्॥
गीता वाचत/शिकवत असताना अनेक प्रश्न असे येतात की त्यातून प्रश्नकर्त्याची गोंधळाची अवस्था ध्यानात येते. पहिल्याच लेखात आपण असे म्हणालो होतो की – बहुसंख्य वाचक गीतेचा तयार उत्तराच्या (Instant Remedy) अपेक्षेने अभ्यास करतात. त्यातील ज्ञान समजून घेण्याचा पुरेसा प्रयत्न करतातच असे नाही. खरी मेख येथे आहे. गीता एका विशिष्ट दृष्टीकोनाचे समर्थन करत नाही. किंबहूना गीता केवळ योग्य दृष्टीकोन विकसित करण्याचा मार्ग सुचवते. त्यानुसार वागून योग्य तो मार्ग निवडणे हे अभ्यासकाचे कार्य आहे. गीतेत ज्ञानयोग, कर्मयोग या दोन्ही योगांवर भगवंताने भाष्य केलेले आहे. व्यक्तीने आपल्या अंतःप्रेरणेने आणि परिस्थितीनुरुप भगवत्प्राप्तीचा कोणताही एक मार्ग निवडणे अपेक्षित आहे. याचा अर्थ निवडलेला एक मार्ग योग्य आणि दुसरा अयोग्य किंवा आपल्यापेक्षा भिन्न मार्गाने जाणारे चूक असा घेतला जातो. हे अभ्यासातले अपरिपक्वतेचे लक्षण आहे. ज्ञानयोग उजवा आणि कर्मयोग उणा असे मानणे मूर्खपणाचे आहे असे गीता स्पष्टपणे म्हणते. आत्मज्ञ होण्यासाठी व्यक्ती कोणता मार्ग निवडते यापेक्षा त्या मार्गावरून किती निष्ठेने वाटचाल करते हे जास्त महत्वाचे आहे. मार्ग हा व्यक्तीपरत्वे भिन्न असणार यात शंकाच नाही. अचल राहते ती निष्ठा जी कर्ममार्गी व्यक्तीला इंद्रियनिग्रह आणि ज्ञानी संन्यासाला नैष्कर्म्याप्रत नेते. ज्ञानकर्मसंन्यास, कर्मसंन्यास आणि आत्मसंयमयोग हे याच दृष्टीकोनाचे समर्थन करतात.
मागील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ७ पुढील भाग – अंतरंग – भगवद्गीता – भाग ९
Copyright sheetaluwach.com 2021 ©