महादेवाच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करणाऱ्या पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मचाऱ्याच्या वेषात भगवान शंकर प्रकटतात. पार्वतीच्या घोर तपस्येकडे पाहून म्हणतात की ‘तपःसाधनेसाठी आवश्यक अशी सामग्री, स्नानासाठी पाणी इ. सोयी उपलब्ध आहेत ना? कारण तू हे जाणतेस की शरीर हे धर्म (येथे ध्येय) साध्य करण्याचे प्रथम साधन आहे.’
कालिदासाच्या कुमारसंभवातील पाचव्या सर्गात खरेतर मजेदार संवाद आहेत. परंतु नांदीचा हा श्लोक मात्र एक गंभीर बोधवाक्य बनून गेला! त्याचे कारण या श्लोकाचा अंतिम चरण
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्।।
शरीर हे धर्मसाधनेचे आद्य साधन आहे….
योगारूढ व्यक्ती आपल्या इंद्रियांवर पर्यायाने मनावर ताबा मिळवते त्याची सुरुवात ही अर्थातच ते मन ज्या शरीरात वास करते ते शरीर संयमन करुन होते.
भगवंत सांगतात की अर्जुना हा योग साध्य करण्यासाठी संयमनाची आवश्यकता आहे. जे व्यक्तीच्या सर्व शारीर क्रियांमध्ये प्रथम हवे. कारण
नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः। न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन।
हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला तसेच अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपणाऱ्या तसेच सदा जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही.
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु । युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा।
दुःखांचा नाश करणारा योग यथायोग्य आहार-विहार करणाऱ्याला, कर्मांमध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा-जागरण करणाऱ्याला साध्य होतो
‘अति सर्वत्र वर्जयेत्’ असे एक संस्कृत वचन आहे. श्रीकृष्णालाही हेच सांगायचे आहे. शरीर संयमन करणे म्हणजे शारिरीक क्रियातील अती ला दूर सारणे. आहार-अनाहार, निद्रा-जागरण यासारख्या क्रिया संतुलित केल्याने शरीर निरोगी आणि उत्साही राहते. असे शरीरच मग मन एकाग्र करण्याची साधना करू शकते.
अशा प्रकारे भौतिक आणि अधिभौतिकाचा सुंदर मेळ घालण्याचे कार्य श्रीकृष्ण करतो.
अनेकदा असा प्रश्न पडतो की मानवासहित निसर्गातील प्रत्येक घटक हा ईश्वराचीच देणगी असेल तर मग त्याचा अव्हेर करून संन्यासी बनण्यात काय हशील आहे? श्रीकृष्णाच्या लेखी योगी यातील कशाचाच अव्हेर करत नाही. रंग, रस, गंध,नाद या सर्व माध्यमातून जीवनातला आनंद योगीही लुटतोच परंतु त्याचे मन या कशाचाही आहारी जात नाही, अतिरेक करत नाही. बाह्य सृष्टीतील सुख आणि त्याचप्रमाणे दुःखही नश्वर आहे याची त्याला जाणीव असते. परमात्मप्राप्तीचा आनंदच केवळ शाश्वत असा आनंद आहे हे तो जाणतो आणि त्यासाठी जागरुकतेने प्रयत्न करतो.
भारतीय तत्वज्ञानाच्या बाबत असा एक गैरसमज पसरलेला दिसतो की त्यात केवळ संन्यस्त वृत्तीचा अंगिकार केलेला आहे. भौतिक किंवा गोचर सृष्टी म्हणजे माया आणि तिचा त्याग करणे म्हणजेच खरा संन्यासी होणे असा टोकाचा अर्थ घेतला जातो. भारत म्हणजे संन्यासी, साधू, अन्नपाणी त्यागून तपश्चर्या करणे, अस्थिपंजर झालेले योगी….. असेच चित्र रंगवले जाते.
श्रीकृष्णाचे मत या विचाराला छेद देते. वेदकालापासून प्रत्येक तत्वज्ञाचा दृष्टिकोन हा सृष्टीचे अंतर्बाह्य स्वरूप जाणण्याचा होता. ब्रह्म जाणणे केवळ अंगाला राख फासून साधू झाल्यानेच प्राप्त होते असे त्यांनी कधीच मानले नाही. आनंद देणा-या प्रत्येक तत्त्वाला त्यांनी जाणलं आणि त्याला ब्रह्म मानलं. जसं नादब्रह्म, अन्नब्रह्म, अक्षरब्रह्म… गायनाचार्य पलुस्करांच्या एक गोष्टीचा संदर्भ येथे पुन्हा देण्याचा मोह आवरत नाही.
एकदा गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर जंगलातून प्रवास करत असताना एका देवळात विश्रांतीसाठी थांबतात. तेव्हा तेथे एक संन्यासी येतो. संध्याकाळची वेळ असते. आपल्याच विश्वात रममाण झालेला तो संन्यासी गायला लागतो. पलुस्करांना असं जाणवतं की जिकडंतिकडं केवळ ते गाणंच भरून राहीलंय. सगळं जग मंत्रमुग्ध होउन केवळ ते गायन ऐकतंय आणि देउळ लख्ख प्रकाशाने भरून गेलंय. काही काळानंतर ते जेव्हा भानावर येतात तेव्हा गाणं संपलेलं असतं आणि तो प्रकाशही निवलेला असतो. त्या संन्यासाला पलुस्कर विचारतात की “असा अलौकीक प्रभाव पाडणारं गाणं मला शिकवाल का? मी यासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी संन्यासीसुद्धा व्हायला तयार आहे.” तो संन्यासी उत्तरतो – “संन्यासी झाल्यामुळे असं गाणं येणार नाही. पण असं गाणं आल्यावर तू आपसुकच संन्यासी झाला असशील!!”
येथे नादब्रह्माची उपासना करणारा गायक आणि परब्रह्माची उपासना करणारा संन्यासी दोघेही योगीच मानले गेले आहेत. कलाकारालाही आणि संन्यास्तालाही पथ्ये पाळून आणि अति टाळून योगी होता येते हेच श्रीकृष्णाला येथे सांगायचे आहे. एकाला साधनेसाठी शरीरनियमन आवश्यक आहे तर दुसऱ्याला रियाजासाठी! भगवत्प्राप्तीसाठी प्रत्येकाने संन्यास घेऊन जंगलाचाच मार्ग स्वीकारायला हवा इतका एकांगी विचार मांडण्यासाठी कृष्णाने गीता सांगितली नाही.
हे अर्थातच सोपे नाही याची श्रीकृष्णाला जाण आहेच. अर्जुनही ती बोलून दाखवतो. सगळेच जण गायनाचार्य किंवा सिद्धयोगी होत नाहीत. प्रयत्न करुनही अनेकजण मनावर विजय मिळवू शकत नाहीत मग असे लोक मार्गातून विचलित होतात. त्यांना पापी समजायचे का?
अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः । अप्राप्य योगसंसिद्धिं कां गतिं कृष्ण गच्छति ॥
कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति । अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि।।
जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे; परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योगसिद्धीला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो?भगवत्प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला पुरुष छिन्न-विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत?
अर्थातच नाही. आत्मोद्धारासाठी कर्म करणारी व्यक्ती अधोगतीला प्राप्त होत नाही. जरी तो आपल्या उद्दीष्ट्यापर्यंत पोचू शकला नाही तरी केलेल्या श्रेष्ठ कर्माच्या फलस्वरुप त्याला उत्तम गती प्राप्त होते आणि कालांतराने तो आपले ध्येय साध्य करतो असे श्रीकृष्ण सांगतो. कर्मसिद्धांताच्या तर्कानेही पाहिले तर हे पटावे की उत्तम कर्माची फलेही उत्तमच असतात. मग ते कर्म जर भगवत्प्राप्तीच्या उद्देशाने केले तर त्याचे फलस्वरूप सकाम कर्म करणारा भक्तही कालांतराने भगवंताशी एकरुप होतोच.
प्रत्येक मनुष्य मग तो सामान्य गृहस्थ असो, असामान्य कलाकार किंवा व्रतस्थ योगी आत्मसंयमनाच्या मार्गाने कोणीही भगवंताशी एकरुप होऊ शकतो हेच श्रीकृष्ण अर्जुनाला पटवून देतो. जीवनाचा आस्वाद घेत प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाणे हे खरे ज्ञान आहे कारण सर्वाभूती परमेश्वर आहेच म्हणूनच मग त्याचे स्वरुप कलेतून, तपस्येतून, कर्मातून किंवा निव्वळ भक्तीतूनही जाणता येईल. आवश्यक आहे तो त्या त्या मार्गावरील साधकाचा आत्मसंयम…….
If I were to look over the whole world to find out the country most richly endowed with all the wealth, power, and beauty that nature can bestow—in some parts a very paradise on earth—I should point to India.
If I were asked under what sky the human mind has most fully developed some of its choicest gifts, has most deeply pondered on the greatest problems of life, and has found solutions of some of them which well deserve the attention even of those who have studied Plato and Kant—I should point to India.
And if I were to ask myself from what literature we, here in Europe, we who have been nurtured almost exclusively on the thoughts of Greeks and Romans, and of one Semitic race, the Jewish, may draw that corrective which is most wanted in order to make our inner life more perfect, more comprehensive, more universal, in fact more truly human, a life, not for this life only, but a transfigured and eternal life—again I should point to India.1
………..Friedrich Max Müller
मॅक्सम्युल्लर ने केम्ब्रिज विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानातील या एका वाक्यातूनच वेद, वेदवाङ्मय आणि पर्यायाने भारतीय संस्कृतीचा प्रभाव किती क्षितिजांवर विस्तारला होता हे लख्खपणे दिसते. केवळ तत्वज्ञानच नव्हे तर साहित्य, संगीत, कला, विज्ञान आणि तंत्रज्ञान या सर्व विद्याशाखांत मानवाने साधलेला समतोल पहायचा तर भारताकडे पहा असे तो म्हणतो. सर्वार्थाने पृथ्वीवरील स्वर्ग अशी उपमा भारतीय भूमीला तो देतो.
एक पाश्चात्य विद्वान प्राचीन भारतीय भाषा आणि वाङ्मयाची बाजू इतकी पोटतिडकीने मांडतो हे विस्मयकारक आहे. त्याहीपेक्षा ज्या अर्थी तो ही बाजू मांडतोय त्या अर्थी आपण जुनं म्हणून दुर्लक्षित केलेल्या वाङ्मय तितकं टाकाऊ नक्कीच नसणार. बरं ही भाषणं तो पुराणातल्या गोष्टी ऐकायला आलेल्या भजनी मंडळातल्या बायकांसमोर देत नाहीये. केम्ब्रिज सारख्या मान्यवर विद्यापीठाने इ.स. १८८० च्या दशकात खास आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतील भाषणांत त्याने हे उद्गार काढलेत. व्याख्यान ऐकणारे श्रोते केवळ पुस्तकी प्राध्यापक नव्हते. भारतात नुकतीच स्थिरावलेली इंग्रजी सत्ता राबवणारे मंत्री, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी (Civil Servants) असे भारताशी प्रत्यक्ष संबंध येणारे आणि भारतात काम करणारे इंग्लिश लोकही त्यात होते.
भाषणात अनेक विषयांचा उल्लेख मॅक्सम्युल्लर करतो. जसे भूशास्त्र? (Geology), वनस्पतीशास्त्र (Botany), प्राणीशास्त्र (Zoology), मानवंशशास्त्र (Ethnology), पुरातत्वशास्त्र (Archaeology), नाणकशास्त्र (Numismatics), न्यायशास्त्र (Jurisprudence) आणि अर्थातच तत्वज्ञान (Philosophy). या आणि अशा अऩेक विद्यांच्या अभ्यासासाठी भारत ही एक मोठी प्रयोगशाळाच आहे. केवळ अभ्यासाचा विषय म्हणून नव्हे तर अनेक मार्गदर्शक तत्वांचा उगम या भूमीत होतो म्हणून भारताकडे पहावे असे तो सांगतो. इतकेच काय पण पाश्चात्य जगताच्या ज्ञानाचा उगम मानल्या जाणाऱ्या ग्रीसमधील्या अनेक बोधकथा, दंतकथा मूळच्या भारतीय बौद्ध आणि इतर संप्रदायातील असू शकतात असा तर्क तो मांडतो.
गेल्या आठ लेखात आपण वेद आणि वेदवाङ्मयाची ओळख करून घेतली. आपण हेही पाहिलं की केवळ अध्यात्म नव्हे तर ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा अनेक विद्या शाखांचा विचार आणि अभ्यास प्राचीन भारतीय ऋषीमुनी करत होते हे ही वेदवाङ्मयात दिसून येते. वेदकालीन ऋषींनी मानव जीवनाशी संबंधीत जवळपास सर्व विषयांवर भाष्य केलेले आहे. यात शिकारीपासून ते शेतीपर्यंत, युद्धापासून ते वैद्यकापर्यंत आणि यज्ञापासून ते ज्योतिषापर्यंत अनेकविध विषय कौशल्याने हाताळले गेले आहेत. इतके की त्या विषयांचे सखोल ज्ञान या ऋषींना होते हे सहज कळून येते.
पण मग वैद्यक, ज्योतिष, तत्त्वज्ञान वगैरे विषयांवरील ग्रंथ पाश्चात्य संस्कृतीतही आहेतच की! आजच्या लेखात आपण इतकंच पाहणार आहोत की विज्ञान आणि तंत्रज्ञानानी समृद्ध होणाऱ्या पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीत असा काय फरक आहे की ज्यायोगे आज हजारो वर्षानंतरही जगभरातील विद्वान त्या वाङ्मयाचा अभ्यास करतात? केवळ तत्त्वज्ञानच नव्हे तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि वैद्यकासारख्या अत्याधुनिक ज्ञानशाखातील संशोधकही कमी अधिक प्रमाणात वेदवाङ्मयाचा अभ्यास करतात. त्यांना मार्गदर्शक असे कोणते ज्ञान किंवा विचार वेदवाङ्मय पुरवते? दृष्टिकोन……..
एखाद्या विषयाची पद्धतशीर हाताळणी करून त्याची वेगळी विद्याशाखा बनवणे आणि त्याचा काटेकोर अभ्यास करणे ही तर पाश्चात्यांची देणगी आहे. अगदी उदाहरण द्यायचे तर आधुनिक विज्ञानाची कोणतीही शाखा घ्या, जसे जीवशास्त्र (Biology) या विषयाची पद्धतशीर हाताळणी करून वनस्पतीशास्त्र(Botany), सूक्ष्मजीवशास्त्र(Microbiology), जनुकिय विज्ञान(Genetics) वगैरे विद्याशाखा पाश्चात्यांनी बनवल्या, त्याचे अभ्यासक्रम बनवले, पदव्या (मराठीत डिग्र्या!) निर्माण केल्या. वैद्यकातही डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयवाची वेगळी शाखा बनवली. अगदी चव आणि गंध निर्माण करणारी शास्त्रेही विकसित केली गेली. वैज्ञानिक प्रगती हे ध्येय समोर ठेऊन विभागशः अनेक विद्याशाखा पाश्चात्यांनी दिल्या. अशा वैज्ञानिक प्रगतीचा मुख्य उद्देश अर्थातच मानव जातीचे कल्याण हा होता. मग तो उद्देश साधला गेला का? खरंतर नाही. विज्ञान जितके अधिक प्रगल्भ आणि प्रगत झाले तितकेच ते संहारकही झाले. मानवजातीचे कल्याण हा मूळ उद्देश बाजूला पडला आणि मानवजात किंवा विशिष्ट मानव समुदायाला इतर समुदाय आणि जीवजंतूंपेक्षा अधिक शक्तीमान बनवणे हा स्वार्थी उद्देश प्रबळ झाला. वर्चस्वाच्या हव्यासापोटी विज्ञानाच्या शाखांची इतकी अजस्त्र वाढ झाली की प्रत्येक शाखा मानवाच्याच नव्हे संपूर्ण जीवसृष्टीच्या मुळावर उठावी इतकी संहारक होऊ लागली. आधी अण्वस्त्रे, मग रासायनिक अस्त्रे(Chemical Weapons), जैविक अस्त्रे(Biological Weapons) आणि आता तर जनुकिय तंत्रज्ञान (Genetics) यासारख्या अत्याधुनिक आयुधांनी मानवाच्या सुखापेक्षा चिंताच अधिक वाढवल्या. निसर्गाचा घटक म्हणून जन्माला आलेला मानव निसर्गावरच विजय मिळविण्याच्या अघोरी मार्गाला लागला आणि आता ते थांबवणे त्याच्या स्वतःच्याही हातात राहिले नाही. वैज्ञानिक प्रगती हा देशागणिक मानवी संस्कृतींच्या स्पर्धेचा विषय बनला. या स्पर्धेत टिकण्याची आणि जिंकण्याची इर्षा इतकी पराकोटीला गेली की मानवानेच त्याच्या आणि पर्यायाने पृथ्वीच्याही संहाराची बीजे पेरली. परीणामी आज आपण प्रदूषण(ध्वनी, वायु, पाणी आणि विचारसुद्धा), अस्त्र-शस्त्र, रोगराई, विकृत-दहशतवाद अशा अनेक समस्यांनी घेरलो गेलो आहोत. समतोल…….
वैदिक ऋषीमुनी हे जसे तत्त्ववेत्ते होते तसेच शास्त्रवेत्तेही होते. वैज्ञानिक प्रगती वेदकाळातही होत होतीच. परंतु भारतीय शास्त्रवेत्त्यांचे मोठेपण यात आहे की त्यांनी या प्रगतीचा आणि निसर्गाचा योग्य समतोल राखणे महत्वाचे आहे हे जाणले आणि प्रत्येक शास्त्र हे विकसित होताना त्यातून निसर्ग, पर्यावरण आणि व्यापक सृष्टीशी माणसाची नाळ तुटणार नाही याची खबरदारी घेतली. त्यांनी वैद्यक विकसित केले पण औषधांनी होणारे अनुषंगिक परीणाम (Side Effects) टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करूनच. औषधी विकसित केल्या पण त्या नैसर्गिक तत्त्वांशी तादात्म्य बाळगून. त्यांनी आयुर्वेद हा निरोगी आयुष्य जगण्यासाठीचे शास्त्र म्हणून विकसित केला. रोगांवर इलाज करण्याची पॅथी म्हणून नव्हे. त्यामुळे आहार(Diet), व्यायाम(Exercise), साधना (Meditation) आणि औषधी(Medicine) अशा सर्व अंगांनी समतोल साधणारी ज्ञानशाखा म्हणून आयुर्वेदाकडे पाहीले जाते. याच प्रकारे योग असो ज्योतिष असो किंवा अध्यात्म….. प्रगती साधताना तिची दिशा आणि ध्येय हे एका सूत्रात बांधून निसर्गाच्या सर्व घटकांच्या कल्याणाचे उद्दीष्ट्य साध्य करणे ही वेदवाङ्मय आणि पर्यायाने भारतीय शास्त्रांची देणगी आहे. विद्या, कला आणि तंत्र अतिरेकी अनियंत्रित आणि संहारक न होता विकसित करण्याचे तारतम्य वेदवाङ्मयाने जगाला शिकवले. त्यामुळेच रसायनशास्त्र (Chemistry), पदार्थविज्ञान(Physics), वैद्यक(Medicine), जीवशास्त्र(Biology), वनस्पतीशास्त्र(Botany), धातुशास्त्र (Metallurgy) असो किंवा अगदी अणुविज्ञान (Automic Science), या सर्व शास्त्रांचा भारतीय भूमीतील उगम आणि विकास हा याच तत्त्वांना अनुसरुन झाला. तुकड्या तुकड्यात वेगवेगळी शास्त्रे म्हणून विकसित न होता ती कल्याणकारक आणि सर्वसमावेशक जीवनवेद म्हणून विकसित झाली. आपल्याला वेदांसह अनेक ग्रंथात हे सर्वच विषय कमीअधीक प्रमाणात आढळतात ते यामुळेच. जीवनाशी संबंधीत असे ज्ञान असल्याने त्याचा केवळ वेगळी विद्याशाखा म्हणून अभ्यास करणे जितके गरजेचे आहे तितकेच ते ज्ञान सृष्टीचा समतोल राखण्यात किती यशस्वी ठरते हेही काटेकोरपणे अभ्यासणे गरजेचे मानले गेले. त्यामुळे शास्त्रे विकसितही झाली आणि त्यांची अनुषंगिक संहारकताही सीमीत केली गेली. वैज्ञानिक प्रगती आणि विवेकी तत्वज्ञान यांचा हा समतोल…..
आधुनिक जगात सातत्याने नवनवीन शोध लागत आहेत, तंत्रज्ञान विकसित होत आहे पण ते विवेकाने वापरण्याचे किंवा त्याचा गैरवापर टाळण्याचे शिक्षण देणारी मुल्यव्यवस्थाच अस्तीत्व हरवून बसली आहे. त्यामुळे प्रगतीच्या पायरीगणीक आपण विनाशाच्या चिंतेने अधिकाधिक ग्रासले गेलो आहोत. हा विवेक जागवणारी आणि प्रसृत करणारी तत्वप्रणाली वेदवाङ्मयाने दिली. सर्वेSपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग्भवेत्। किंवा
……सह नौ भुनक्तु।
किंवा
..वसुधैव कुटुम्बकम्। असो
यासारख्या प्रार्थनातून साधकाच्या मनावर हे तत्त्व कायम बिंबवले गेले की प्रत्येक कार्य, प्रत्येक पाऊल हे विश्वकल्याणाच्या हेतूतून उचलायचे आहे. संपुर्ण वसुधा (पृथ्वी) हे एकच कुटुंब आहे. यातील भूतमात्रांसह आपण सर्वजण एकाच साखळीतील कड्या आहोत. एक जरी कडी कमकुवत झाली तरी ही संपूर्ण साखळी दुर्बल होणार आहे. त्यामुळे प्रगती मग ती वैज्ञानिक असो तांत्रिक असो किंवा तात्त्विक तिच्यातून ही साखळी अधिक मजबूतच झाली पाहीजे. भौतिक आणि अध्यात्मिक प्रगती, मानवी जीवन आणि निसर्ग तसेच पर्यायाने मन आणि शरीर यांचा समतोल साधला तरच ज्या सुखाच्या अपेक्षेने अधिकाधिक विकासाची ईर्षा आपण बाळगतो ते चिरंतन सुख प्राप्त होईल. हा विचार निःसंशयपणे प्राचीन भारतीय वेदवाङ्मयाने जगाला दिला. तात्पर्य काय तर आज विकसनशील वगैरे शिक्का असलेल्या भारताने स्वतःच जगाला दिलेल्या विवेकी अभ्यासकाच्या भूमिकेत परत शिरुन आपल्याच प्राचीन वाङ्मयाचा आणि आधुनिक विद्यांचा तारतम्याने अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. धर्मग्रंथ म्हणून नुसते अंधश्रद्धेने कवटाळून बसणे हे जसे चुकीचे आहे तसेच ते जुने कालबाह्य वाङ्मय म्हणून झिडकारणेही तितकेच चुकीचे आहे. कोणत्याही टोकाच्या भूमिकेपेक्षा विवेकी वृत्तीने चतुरस्त्र अभ्यास करून वेद आणि वैदिक साहित्यातून मिळणारे सर्वांगीण ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
समारोपापुर्वी मॅक्सम्युल्लरच्या भाषणातील काही उतारे जसेच्या तसे वानगीदाखल देत आहे. त्याच्या भाषांतराची गरज पडू नये कारण अर्थातच आपल्याकडे इंग्रजी मराठीपेक्षा अधिक अभ्यासली जाते!!
If you care for geology, there is work for you from the Himalayas to Ceylon.
If you are a zoologist, think of Haeckel, who is just now rushing through Indian forests and dredging in Indian seas, and to whom his stay in India is like the realization of the brightest dream of his life.
The study of Mythology has assumed an entirely new character, chiefly owing to the light that has been thrown on it by the ancient Vedic Mythology of India. But though the foundation of a true Science of Mythology has been laid, all the detail has still to be worked out, and could be worked out nowhere better than in India.
Again, if you are a student of Jurisprudence, there is a history of law to be explored in India, very different from what is known of the history of law in Greece, in Rome, and in Germany, yet both by its contrasts and by its similarities full of suggestions to the student of Comparative Jurisprudence.
You know how some of the best talent and the noblest genius of our age has been devoted to the study of the development of the outward or material world, the growth of the earth, the first appearance of living cells, their combination and differentiation, leading up to the beginning of organic life, and its steady progress from the lowest to the highest stages. Is there not an inward and intellectual world also which has to be studied in its historical development, from the first appearance of predicative and demonstrative roots, their combination and differentiation, leading up to the beginning of rational thought in its steady progress from the lowest to the highest stages? And in that study of the history of the human mind, in that study of ourselves, of our true selves, India occupies a place second to no other country. Whatever sphere of the human mind you may select for your special study, whether it be language, or religion, or mythology, or philosophy, whether it be laws or customs, primitive art or primitive science, everywhere, you have to go to India, whether you like it or not, because some of the most valuable and most instructive materials in the history of man are treasured up in India, and in India only.
तळटीप:
1. INDIA: WHAT CAN IT TEACH US?
(A Course of Lectures – DELIVERED BEFORE THE UNIVERSITY OF CAMBRIDGE
BY – F. MAX MÜLLER, K.M.)
आरण्यक या नावातून अनेक अर्थ ध्वनीत होतात. त्या सर्व अर्थांचा समुच्चय केला तर आरण्यक म्हणजे काय हे समजणे सोपे जाईल. पहिला अर्थ – अर्थातच अरण्यात किंवा जंगलात लिहिले गेलेले ग्रंथ, असा सोपा अर्थ निघतो. ‘अरण्ये भवम् इति आरण्यकम्।‘ दुसरा अर्थ सायणाचार्यांच्या भाष्यात येतो तो म्हणजे – वेदाचा जो अंश अरण्यात पठण/मनन केला जातो त्याला आरण्यक म्हणता येईल.
हे झाले शब्दाची फोड करणारे अर्थ.
अरण्यात माणूस कशासाठी जातो? शांतता मिळविण्यासाठी, चिंतन/तप करण्यासाठी. निसर्गाच्या सहवासात माणसाला परमात्म्याचा सहवास अधिक प्रकर्षाने जाणवतो. (**जंगलातील शांततेचा अनुभव घेतलेल्यांना हे चटकन् पटावे) अर्थातच नागरी जीवन आणि मोहाचा त्याग करून तत्वचिंतनात आयुष्य घालविण्यासाठी लोक अरण्याची वाट धरतात. म्हणूनच तत्वचिंतन हा विषय सांभाळणारे कोणते वैदिक ग्रंथ त्याने वाचावेत तर आरण्यके! हा आरण्यकांचा विषय सांगणारा अर्थ आहे.
आधीच्या भागात (वाचा – ब्राह्मण ग्रंथ) आपण पाहिलेत की वेदातील मंत्रांचा यज्ञीय कर्मकांडाशी निगडीत अर्थ लावण्याचे काम ब्राह्मण ग्रंथ करतात. याच कर्मकांडांचा तात्विक अभिप्राय मांडण्याचे काम आरण्यके करतात. कर्मकांड सांगणाऱ्या ब्राह्मण ग्रंथांना पूरक असे तत्वज्ञान सांगणे आणि पुढे येणा-या उपनिषदांची नांदी करणे असे दुहेरी कार्य आरण्यके करतात. त्यामुळे आरण्यके ही वेदवाङ्मयातीला कर्मकांड आणि ज्ञानकांड यांची सांगड घालणारा दुवा आहेत. वेदवाङ्मयात आरण्यकांचे स्थान अतिशय महत्वाचे आहे. उपनिषदे जर भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया मानली तर आरण्यके ही या उपनिषदांचा पाया मानायला हरकत नाही असे म्हणतात. (**जाता जाता हे ही सांगायला हवे की भाषिकदृष्ट्या पाहिल्यास आरण्यके ही वैदिक आणि लौकिक संस्कृत भाषेतीला दुवा मानली जातात)
रचना/स्वरूप
सर्वसाधारणपणे ब्राह्मण किंवा उपनिषदांप्रमाणेच प्रत्येक वेदांशी निगडीत अशीच आरण्यकांची रचना झाली असे मानतात त्यामुळेच ब्राह्मण ग्रंथांप्रमाणेच शाखा उपशाखा व्यापून आरण्यकांची संख्याही ११३० च्या आसपास असावी असा विचार मांडला जातो. परंतू दुर्दैवाने आज उपलब्ध असणाऱ्या आरण्यकांची संख्या केवळ ७ आहे. ऋग्वेद – ऐतरेय आरण्यक, शांखायन आरण्यक शुक्लयजुर्वेद – माध्यंदिन बृहदारण्यक, काण्व बृहदारण्यक (बृहदारण्यक हे वास्तविक आरण्यक आहे. परंतु त्याचा आकार, विषयव्याप्ती इ. अनेक कारणांमुळे त्याची गणना उपनिषदांमध्ये होते.) कृष्णयजुर्वेद – तैत्तिरिय आरण्यक, मैत्रायणी आरण्यक सामवेद – तवलाकर(तवल्कर?) (जैमिनीय) आरण्यक, छान्दोग्य आरण्यक
अथर्ववेदाची आरण्यके उपलब्ध नाहीत किंवा त्याबद्दल पुरेशी माहितीही नाही.
विषय
नवनीतं यथा दध्नो मलयाच्चंदनं यथा, आरण्यकं च वेदेभ्य ओषधिभ्योsमृतं यथा।१
(साधारण अर्थ) – दह्याचे (सार) जसे लोणी, मलयवृक्षाचे (सार) जसे चंदन किंवा औषधी(वनस्पतीं)चे (सार) जसे अमृत तसे वेदांचे (सार) आरण्यकांमध्ये आहे.
महाभारतातील या श्लोकातील उक्ती योग्य की अतिशयोक्ती, यात न पडता जर अर्थ पाहिला तर आरण्यकांचा विषय आणि त्याचे महत्व दोन्ही लक्षात येते.
वर सांगितल्याप्रमाणे यज्ञकर्म आणि तत्वज्ञान हे आरण्यकांचे प्रमुख विषय आहेत. यज्ञातील विधी, त्यातील वैदिक मंत्र आणि त्यांचे तत्त्वज्ञान असा एक विषय आहे. ब्राह्मण ग्रंथातील यज्ञ हे अनेक विधी, समारंभ इ. नी परीपूर्ण आणि गुंतागुंतीचे आहेत. आरण्यकातील यज्ञ मात्र अतिशय साधे व सोपे असून अरण्यवासी ऋषीमुनी किंवा सामान्य माणसालाही सहज साध्य आहेत.
सृष्टीची उत्पत्ती या विषयावर विस्तृत मंथन आरण्यकात आढळते. वेदांप्रमाणेच आरण्यकातही ‘प्राण’ याच तत्त्वाला दृष्य अदृष्य सृष्टी आणि महाभूतांचे मूळ मानले गेले आहे. ऐतरेय आरण्यकात –
स्थूल आणि सूक्ष्म सर्वकाही प्राण तत्वातून उगम पावते, अंतरीक्ष आणि वायुचेही सर्जन प्राणातूनच होते असे वर्णन आहे.
प्राणेन सृष्टावन्तरिक्षं च वायुच्क्षान्तरिक्षं वा……….। 2
मैत्रायणी संहितेत प्राण तत्वालाच सर्व तत्वांचा जनक म्हणले आहे.
मनुष्यासह संपूर्ण चराचर सृष्टीच्या मुळाशी प्राण हे एकच तत्व आहे. त्यामुळेच सृष्टीतील या सर्व घटकांशी सहभावनेने राहणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे हा विचार ऐतरेय आरण्यकात येतो. केवळ माणसा माणसात नव्हे तर सृष्टीच्या प्रत्येक दृष्य अदृष्य घटकातील हे साधर्म्य लक्षात घेऊन त्यांच्यासह कृतज्ञभावनेने राहण्याचा आग्रह आरण्यके करतात. याच कर्तव्याचा विसर पडल्याने मनुष्याला आज पर्यावरण आणि निसर्गाच्या अवकृपेचा सामना करावा लागतोय.
आजकाल पर्यावरण, प्रदुषण, वायु उत्सर्जन, कार्बन न्युट्रल वगैरे शब्द वापरून सर्वत्र प्रसिद्ध होत चाललेल्या चळवळी ज्या गोष्टी घसा फोडून सांगत आहेत त्याचे मूळ तत्व आरण्यकात अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात उभं केलंय.
आरण्यकात याच तत्वाला अनुसरुन पंचमहाभूत यज्ञाची कल्पना मांडली आहे. हे पाच यज्ञ किंवा त्याला अनुसरुन नेहमी वागले पाहिजे असे आरण्यकात आवर्जून सांगितले आहे
पंच वा एते महायज्ञः सतति प्रजायन्ते।3
हे यज्ञ म्हणजे केवळ हवन नसून वर सांगितल्याप्रमाणे चराचर सृष्टीशी बांधिलकी जपण्याचे कार्य आहे.
ब्रह्मयज्ञ – ऋषींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे पितृयज्ञ – पूर्वज/पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे देवयज्ञ – देवतांबद्दल यज्ञाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे भूतयज्ञ – प्राणीमात्र आणि वनस्पतींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे / कृतज्ञ राहणे अतिथियज्ञ – अभ्यागतांचा आदर करणे.
या यज्ञांच्या माध्यमातून भोवतालच्या परिसरासह पर्यावरणाशी एकरूप राहणे महत्वाचे आहे हे आज भयानक वास्तव म्हणून समोर आलेले ज्ञान आरण्यकांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगितले आहे.
सृष्टीतील प्रत्येक तत्व जसे वायु, पाणी, अग्नि आणि वनस्पती यांचे महत्व जवळपास सर्व आरण्यकांमध्ये येते. वायुचे महत्व सांगताना अशुद्ध वायुमुळे आजारपण येते हे ऐतरेय आरण्यक सांगते. इतकेच नव्हे तर यज्ञातील समिधा निवडताना भोवतालचा वायु शुद्ध करणाऱ्या औदुंबर किंवा पळसासारख्या वनस्पती वापराव्यात असे सांगून यज्ञकर्माचेही महत्व स्पष्ट करते.
यज्ञकर्म आणि तत्वज्ञान याची सांगड घालून वेद आणि उत्तरवेदकालीन समाजाला संतुलित धर्म कसा असतो याचा वस्तुपाठ आरण्यके घालून देतात. म्हणूनच ज्ञानकर्मसमुच्चय या उपनिषदांच्या प्रमुख विषयाची बीजे आरण्यकात आढळतात असे म्हटले जाते.
अशाप्रकारे वेदवाङ्मय ही केवळ कोणत्याही एका धर्मासाठी किंवा विशिष्ट पंथासाठी रचलेली धार्मिक ग्रंथसंपदा नसून विश्वकल्याणाच्या उदात्त हेतून प्रेरित झालेल्या तत्कालिन ऋषीमुनीनी उभे केलेले जीवनकोश आहेत. वेदवाङ्मयाच्या महत्वाविषयी पुढील भागात……
तळटीप
१. महाभारत, शांतिपर्व ३३१-३
२. ऐतरेय आरण्यक २/१/७
३. तैत्तिरिय आरण्यक
छान्दोग्य उपनिषदात एक सुंदर गोष्ट आहे. गुरुगृही शिक्षण समाप्त करून श्वेतकेतु आश्रमातून परत येतो. ज्ञानप्राप्तीचा गर्व त्याच्या चेहेऱ्यावर दिसत असतो. त्याचे वडील आरुणि ऋषी चिंतेत पडतात. केवळ लौकिक शिक्षणानंतर आपला मुलगा अहंकारी बनला तर पारलौकिक किंवा आत्मविद्येचे ज्ञान त्याला कसे होणार? त्याला पुढील टप्पा गाठायला उद्युक्त कसे करणार? त्यांना एक युक्ती सुचते. ते श्वेतकेतुला बोलावतात. छाती पुढे काढून अतिशय उत्साहात श्वेतकेतु येतो.
आरुणि – बाळ श्वेतकेतु, गुरुकुलातून आल्यापासून तू किंचित गर्विष्ठ वाटत आहेस. श्वेतकेतु – नाही बाबा, मी सखोल अभ्यासाने विद्या प्राप्त केली आहे. या ज्ञानामुळे मी परीपक्व झालोय. मला याचा अभिमान आहे गर्व नाही. आरुणि – तू गुरुकुलातून उच्च ज्ञान प्राप्त करून आला आहेस. इतक्याच अभ्यासाचा तूला अभिमान वाटतोय? हरकत नाही, तर मग मला हे सांग की अशी कोणती गोष्ट आहे जी जाणल्यावर अप्राप्यही प्राप्त होते किंवा अज्ञातही ज्ञात होते ?
हा प्रश्न ऐकल्यावर श्वेतकेतु गोंधळात पडतो. अज्ञातही ज्ञात होण्याची विद्या कोणती? हे त्याला गुरुकुलात शिकवलेले नसते. आरुणि – बाळा, विद्या शिकल्याने प्राप्त होणारे ज्ञान हे श्रेष्ठ असतेच परंतू ते अंतिम ज्ञान नव्हे. तू गुरुकुलात जे ज्ञान शिकलास ते बाह्य जगाबद्दलचे ज्ञान होते. ते जग जे आपल्याला पाहता येते तसेच स्पर्श, रस आणि गंध यांच्या माध्यमातून अनुभवता येते. परंतु त्या जगाचे अंतरंग आपल्या दृष्टीस पडत नाही. ते जाणून घेण्याची विद्या साध्य करता आली पाहिजे. श्वेतकेतु – मी पुरेसे समजलो नाही बाबा. आपण थोडे विस्ताराने सांगाल काय? आरुणि – हे तांब्याचे पात्र पहा. आपल्या डोळ्यांसमोर हे पात्र आहे. त्याचा उपयोग आपण करतो. अशा अनेक तांब्याच्या वस्तू आपण वापरतो. ही पात्रे आणि त्याचे उपयोग वेगवेगळे आहेत. मात्र त्याचे मूळ मात्र ‘ताम्र’ हा एकमेव धातूच आहे. तसेच आपल्याला दिसणारे जग हे सुद्धा वेगवेगळ्या स्वरुपात दिसत असले तरी त्याचे मूळ हे एकच तत्त्व आहे. ते तत्वच एकदा जाणले की संपूर्ण सृष्टीचे स्वरूप उलगडेल. पाण्यात विरघळलेले मीठ आपल्याला दिसत नाही परंतु त्याच्या खारट चवीवरून आपण ओळखतो तसेच सृष्टीतील प्रत्येक घटकात हे तत्व अंतर्भूत आहेच. सृष्टीच्या अंतरंगात शिरून ते जाणण्याचे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान.
छान्दोग्य उपनिषदातील ही कथा/संवाद केवळ छान्दोग्यच नव्हे तर सर्वच उपनिषदांच्या विषयावर प्रकाश टाकते. सृष्टीचे कोडे उलगडण्यासाठी तिच्या अंतरंगात डोकावण्याचे कार्य उपनिषदे करतात. त्यामुळेच उपनिषदांचे विषय हे अदृष्याचे ज्ञान, आत्मज्ञान, तत्त्वज्ञान, ज्ञानोपासना असेच आहेत.
(** यावरून हे ही लक्षात यायला हरकत नाही की उपनिषदांचा विषय फक्त आणि फक्त आत्मानुभूतीचे तत्वज्ञान आहे. कोणत्याही देवाची उपासना किंवा पर्यायाने धर्माचा उपदेश प्रमुख उपनिषदात येत नाही. त्यामुळेच जगातील जवळपास सर्व जाती, धर्म आणि पंथाच्या तत्त्वज्ञांना उपनिषदे आकर्षित करतात.)
संवाद अर्थात (One on One Discussion)
आपण मागच्या लेखात पाहिले की उपनिषद शब्दाचा अर्थ (गुरुजवळ) बसून प्राप्त केलेले ज्ञान असा होतो. याच अर्थाला साजेसे असे हे संवाद सर्व प्रमुख उपनिषदांमध्ये येतात. गुरु-शिष्य, पिता-पूत्र, पती-पत्नी किंवा देव-मानव अशा अनेक प्रकारच्या संवादातून उपनिषदे अतिशय सहज सोप्या भाषेत गहन तत्वज्ञान मांडतात. आजकाल जसे Talk Shows किंवा Expert Interviews/Dialogues होतात तसेच.
आरुणि – श्वेतकेतु प्रमाणेच याज्ञवल्क्य – मैत्रेयी (बृहदारण्यक उपनिषद),
याज्ञवल्क्य – गार्गी (बृहदारण्यक उपनिषद),
याज्ञवल्क्य – जनक राजा (*सीता फेम नसावा पण त्याच वंशातला)(बृहदारण्यक उपनिषद),
अजातशत्रु – गार्ग्य बालाकि (कौषितकी उपनिषद),
यमराज-नचिकेता (कठोपनिषद),
शौनक – अंगिरस (मुण्डकोपनिषद),
कामलायन – सत्यकाम जाबाल (छान्दोग्य उपनिषद),
नारद – सनत्कुमार (छान्दोग्य उपनिषद)
असे अनेक संवाद उपनिषदांमध्ये येतात.
संख्या –
उपनिषदांची एकूण संख्या किती आणि त्यातील प्रमुख उपनिषदे कोणती हा नेहेमीच चर्चेचा विषय राहिला आहे. वेदवाङ्मयाचा भाग असल्याकारणाने प्रत्येक वेद व त्याच्या सर्व शाखांची उपनिषदे होती असा एक मतप्रवाह आहे. त्यानुसार उपनिषदांची संख्या जवळपास ११८० च्या आसपास भरते. मुक्तिकोपनिषदात १०८ उपनिषदांची नावे सांगितली आहेत त्यातील पहिल्या श्लोकात दहा प्रमुख प्राचीन उपनिषदे येतात. ती अशी
ईशकेनकठप्रश्नमुण्डमाण्डूक्यतित्तिरिः । ऐतरेयम् च छान्दोग्यं बृहदारण्यकम् तथा।।
(ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्ड/मुण्डक, माण्डूक्य, तैत्तिरिय, ऐतरेय , छान्दोग्य तसेच बृहदारण्यक)
आदि शंकराचार्यांनी ११ उपनिषदांवर भाष्ये लिहीली यात वरील १० आणि श्वेताश्वतर उपनिषदाचा समावेश होतो. याखेरीज निरनिराळ्या विद्वानांनी गौरवलेली कौषीतकी, प्रश्न, मैत्री अशी इतरही काही उपनिषदे प्रमुख मानली जातात. यातील ईश, कठ आणि मुण्डक ही उपनिषदे पद्य तर बाकीची गद्य स्वरूपात आहेत.
विषय
संख्या आणि विषयाची खोली लक्षात घेता उपनिषदातील विषयांवर भाष्य करणे हे एका लेखाचे काम नव्हे.
बाह्य सृष्टी आणि ब्रह्मरुप आत्मा या दोन्हीचे यथार्थ स्वरूप उपनिषदे मांडतात. श्वेतकेतु, मैत्रेयी, नचिकेत या सारख्या अनेक जिज्ञासुंच्या शंका आणि त्याचे गुरुतुल्य ऋषींनी विस्तृतपणे केलेले समाधान अशी मांडणीची सोपी पद्धत उपनिषदे अंमलात आणतात. मी कोण? हे जग कसे निर्माण झाले? याचा कर्ता कोण आहे? अशा वरवर साध्या वाटणाऱ्या परंतु अत्यंत गुढ अशा या शंका आहेत.
याखेरीज उत्कृष्ट वचने (वाक्ये), गोष्टी, वर्णने आणि भाष्य या माध्यमांचाही उपनिषदात उपयोग होतो.
आत्मा आणि ब्रह्मज्ञान हा उपनिषदांचा मुख्य विषय असला तरी त्या अनुषंगाने सृष्टीच्या जवळपास प्रत्येक घटकाचा तात्त्विक अंगाने उपनिषदे अभ्यास करतात.
साधे उदाहरण घ्यायचे तर आजकाल प्रसिद्धीस आलेल्या ‘योग’ (आजच्या भाषेत योगा (Yoga)) चे मूळ हे श्वेताश्वतर उपनिषदात आढळते. प्राणाचा अवरोध, इंद्रियदमन आणि समाधी स्थिती यावर विस्तृत भाष्य या उपनिषदाच्या दुसऱ्या अध्यायात येते. अगदि योगाभ्यासासाठी योग्य जागेच्या निवडीपासून ते समाधी स्थितीतील जीवात्म्याला होणाऱ्या परमात्म्याच्या दर्शनपर्यंतचे विचार या उपनिषदात मांडले आहेत.
अशाच प्रकारे ॐकार (प्रणव) तसेच इतर प्रतीकांची उपासना, यज्ञ, कर्म, वर्तन, वाणी, विचार अशा असंख्य विषयांवरचे तत्वज्ञान उपनिषदातून मिळते.
महावाक्ये
ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत. तांब्याच्या पात्राच्या उदाहरणात सांगितल्याप्रमाणे – स्वतः कोण आहोत याचे रहस्य जाणणे म्हणजेच सृष्टीचे रहस्य जाणणे होय. ही उपनिषदांची शिकवण आहे. या अर्थाची जी वाक्ये उपनिषदात येतात त्यांना महावाक्ये म्हणतात. प्रत्येक वाक्य एकेका वेदाशी संबंधित उपनिषदात येते.
१. प्रज्ञानं ब्रह्म। (ऐतरेय उपनिषद) (प्रकट ज्ञान हेच ब्रह्म आहे)
२. अहं ब्रह्मास्मि। (बृहदारण्यक उपनिषद) (मी (आत्मा) ब्रह्म आहे), सोSहम्। (ईशोपनिषद) (तो मीच आहे)
३. तत्त्वमसि। (छान्दोग्य उपनिषद) (ते (ब्रह्म) तू आहेस)
४. अयमात्मा ब्रह्म। (माण्डूक्य उपनिषद) (हा आत्मा ब्रह्म आहे)
गूढ तसेच अर्थगर्भ अशी ही वाक्ये वाचली की उपनिषदांना भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया का म्हणतात ते लक्षात येते.
आपल्या परिचयाचे
आपल्या भारताच्या राष्ट्रीय चिन्हातील ‘सत्यमेव जयते’१ हे वाक्य उपनिषदातलेच आहे. आश्चर्याचा भाग म्हणजे याच अर्थाचे Pravda vítězí (सत्याचाच विजय होतो) हे वाक्य चेक प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय चिन्हात येते.
हा ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातला मंत्र माण्डूक्य उपनिषदाच्या सुरुवातीला येतो.
‘स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः’ हा स्वस्तिमंत्र याच उपनिषदात पुढे येतो.
महत्व
केवळ भारतीयच नव्हे तर तत्वज्ञानाच्या एकूणच इतिहासात उपनिषदांचे स्थान अजोड आहे. दारा शिकोह ने स्वतःच म्हटल्याप्रमाणे ‘नव्याने प्रचलित होणा-या अनेक धर्मांची शिकवण ही केवळ उपनिषदातील तत्वांचेच पुनःप्रक्षेपण आहे.’ पाश्चात्य आणि पौर्वात्य अशा सर्वच विद्वानांनी उपनिषदांचा गौरव केला आहे. यात केवळ तत्त्वज्ञच नव्हे तर कवि, लेखक, शास्त्रज्ञांसह सर्व धर्मीय अभ्यासकांचा समावेश होतो. उपनिषदांचा हा प्रचंड प्रभाव १७९६ च्या पहिल्या पाश्चात्य भाषांतरानंतर केवळ गेल्या २०० वर्षात पडलाय. यावरून हजारो वर्षांपूर्वी हे तत्त्वज्ञान सोप्या आणि सहज मांडणाऱ्या भारतीय ऋषींच्या बुद्धीसामर्थ्याची कल्पना येते.
तळटीप
१. सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः।
येनाक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत् सत्यस्य परमं निधानम् ॥ (मुण्डकोपनिषद – तृतीय मुण्डक – खंड १ मंत्र ६)
२. भ॒द्रं कर्णे॑भिः शृणुयाम देवा भ॒द्रं प॑श्येमा॒क्षभि॑र्यजत्राः ।
स्थि॒रैरङ्गै॑स्तुष्टु॒वांस॑स्त॒नूभि॒र्व्य॑शेम दे॒वहि॑तं॒ यदायुः॑ ॥ ऋग्वेद मंडल १.सूक्त ८९ ऋचा ०८
शहाजहान बादशहाचे नाव घेतले की दोन गोष्टी अपरिहार्यपणे समोर येतात. एक अर्थातच ताजमहाल आणि दुसरा औरंगजेब! त्यापैकी ताजमहाल हा शहाजहान बादशहाने भारताला दिला की तो आधीपासूनच अस्तीत्वात होता हा वादाचा विषय आहे आणि औरंगजेब………… असो! परंतु फार प्रसिद्ध नसलेली आणि केवळ आपल्या कार्यामुळे भारताला उपयुक्त ठरलेली शहाजहानची आणखी एक देणगी म्हणजे त्याचा ज्येष्ठ पुत्र – दारा शिकोह.
इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात औरंगजेबाने मारलेल्या भावंडाच्या यादीतला एक भाऊ, केवळ इतकाच काय तो दाराचा आणि आपला परिचय. यापेक्षा त्याबद्दल अधिक काही वाचनात येत नाही.
भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया असणारी उपनिषदे पाश्चात्य जगतापर्यंत पोचवण्यात सिंहाचा वाटा असणारा पहिला ऐतिहासिक दुवा म्हणून दारा शिकोह चे नाव घेतले तर आश्चर्य वाटेल की नाही?!
पण हे खरं आहे. हिंदु आणि इस्लाम या दोन्ही धर्मांचा तौलनिक अभ्यास दारा शिकोह ने केला होता. १६५७ च्या आसपास दारा शिकोह ने जवळपास ५० उपनिषदांची पर्शियन भाषेत भाषांतरे केली. पाश्चात्यांना पुरेशी माहीती नसणाऱ्या या महान ग्रंथांची ही भाषांतरे अब्राहम अंकेतिल द्युपरॉं (Abraham Hyacinthe Anquetil-Duperron) या फ्रेंच विद्वानाच्या हाती आली. त्याने १७९६ पर्यंत या सर्व भाषांतरीत उपनिषदांची लॅटिन भाषेत Oupnek’hat या नावाने भाषांतरे केली आणि पाश्चात्य जगताला भारतीय तत्त्वज्ञानाच्या या थोर परंपरेची ओळख करून दिली.
उपनिषदांवर खरेतर लिहायला लागू नये इतकी ती आता प्रसिद्ध झाली आहेत. जगभरात भारतीय तत्त्वज्ञानाचा कोणताही उल्लेख हा उपनिषदांशिवाय पूर्णच होत नाही. शॉपेनहाउएर (Arthur Schopenhauer) पासून आजतागायत अनेक पाश्चात्य विद्वानांनी उपनिषदांचा आणि त्यातील तत्त्वज्ञानाचा गौरव केला आहे.
आत्तापर्यंत आपण चारही वेद आणि ब्राह्मण ग्रंथांबाबत माहिती घेतली. यातून वैदिक धर्म, त्यातील देवता, यज्ञसंस्था, वेदकालीन लोक, त्यांचे जीवन या सर्व गोष्टींचा परिचय करून घेतला. यात वैदिक धर्मातील कर्मकांडांचा भागही आला. आता थोडे पुढे जाउयात. वैदिक धर्माची ज्ञानकांडे म्हणजे उपनिषदे.
उत्तरवेदकाळात यज्ञसंस्थेचे महत्व वाढत गेले. निरनिराळ्या देवता यज्ञ केल्याने संतुष्ट होऊन यज्ञ करणाऱ्या यजमानाच्या इच्छा पूर्ण करतात अशी धारणा पक्की होत गेली. परंतु त्यामुळे सुरुवातीला असणारे यज्ञसंस्थेचे उदात्त स्वरूप बदलले. अनेक प्रकारचे यज्ञ प्रचारात येऊन यज्ञसंस्थेची आणि पर्यायाने कर्मकांडाची बेसुमार वाढ होऊ लागली. देवदेवतांचे ‘प्रस्थ’ प्रमाणाबाहेर वाढत गेले. यातूनच देवाच्या अस्तीत्वाबद्दलच संशय निर्माण होऊ लागला. देव किंवा प्रत्यक्ष परमात्मा म्हणजे नक्की काय या संदर्भातील जिज्ञासा वाढीस लागली. कर्मकांडरहित शुद्ध ज्ञान, ज्ञानोपासना आणि ब्रह्मजिज्ञासा दृढ होत गेली. हाच उपनिषदांचा आरंभ होय. आत्मा किंवा ब्रह्म यांचे एकरुपत्व स्पष्ट करणारे ज्ञान विस्तृतपणे मांडणे या उद्देशाने उपनिषदांची रचना झाली असे म्हणता येईल.
उपनिषदांमध्ये दोन प्रकारच्या विद्यांचा उल्लेख येतो.
परा विद्या – आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञानाशी संबंधित विद्येला परा१ विद्या अशी संज्ञा आहे. अपरा विद्या – आपल्या डोळ्यासमोर असणाऱ्या दृष्यमान जगताशी संबंधित विद्येला अपरा विद्या म्हणता येईल.
**(जाता जात हे ही सांगायला हरकत नाही की परा किंवा परोक्ष म्हणजे मागे किंवा दृष्टीआड आणि अपरा किंवा अपरोक्ष म्हणजे समोर. आपल्याकडे मराठीत हाच अपरोक्ष शब्द सर्वस्वी उलट अर्थाने वापरला जातो!!)
उपनिषदांचा मुख्य विषय पराविद्य़ा हाच आहे.
उपनिषद या शब्दाचेही अनेक अर्थ प्रचलित झाले. यातील समजण्यासाठी सगळ्यात सोपा अर्थ म्हणजे –
उप + नि + सद् अर्थात जवळ बसणे, म्हणजेच गुरुच्या जवळ बसून साधकाने प्राप्त केलेले ज्ञान.
आदि शंकराचार्यांच्या मते अज्ञान नाहीसे करणारी ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद्.
उपनिषदांचा विषय त्याच्या नावातूनच नीट स्पष्ट होतो. डोळ्यासमोर असणाऱ्या दृष्यमान जगाच्या पलिकडे जाऊन तर्क आणि बुद्धीसामर्थ्याने ही सृष्टी समजून घेण्याचे ज्ञान म्हणजेच उपनिषदे.
वेदान्त – उपनिषदांना वेदान्त अशीही संज्ञा आहे. साधारणपणे वेदवाङ्मयाचे जर भाग पाडायचे झाले तर मंत्र, कर्म आणि ज्ञान असे तीन विभाग करता येतील. याची ग्रंथविभागणी खालीलप्रमाणे होईल.
मंत्र – मंत्रमय संहिता (प्रत्यक्ष वेद)
कर्म – कर्मकांड आणि उपासनापद्धतीचे वर्णन करणारी ब्राह्मणे आणि आरण्यके
ज्ञान – ज्ञानस्वरूप उपनिषदे
अशाप्रकारे उपनिषदे वेदवाङ्मायाच्या अंतिम टप्प्यात येतात म्हणून त्यास वेदान्त अशी संज्ञा वापरली जाते.
मुक्तिकोपनिषदात भगवान श्रीराम व हनुमंताचा संवाद आहे. कैवल्यरूप मुक्ति कोणत्या उपायाने प्राप्त होईल असे हनुमंताने विचारल्यावर भगवान राम उत्तर देतात –
मोक्षाची इच्छा करणाऱ्या साधकांना मुक्ती देण्यासाठी (एकटे) माण्डूक्य उपनिषद पुरेसे आहे. त्यातूनही जर ज्ञान किंवा उपरती साध्य झाली नाही तर (मात्र) दहा उपनिषदांचे अध्ययन कर. त्यामुळे (आत्म)ज्ञानासह माझे परमधाम (वैकुंठ?) प्राप्त होईल.
ही दहा उपनिषदे कोणती आणि त्यात काय सांगितले आहे. हे पुढील भागात……………
तळटिप
१. अथ परा, यया तदक्षरमधिगम्यते । – मुण्डकोपनिषद् १-१-६
समग्र वेदवाङ्मयाचा परिचय करुन घेण्याच्या उपक्रमात आपण सर्वप्रथम चारही वेदांची ओळख करून घेतली. वेदांनंतर अर्थातच क्रमाने ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदांचा समावेश होतो. यातील ब्राह्मण ग्रंथांचा परिचय करून घेऊयात. (जातीने ब्राह्मण असण्याचा आणि या ग्रंथांच्या नावाचा आपापसात काही संबंध नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे.)
वेदवाङ्मयातील वेद आणि उपनिषदे ही सर्वसाधारणपणे आपल्या बोलण्यात किंवा ऐकण्यात येतात. त्यांचा थोडाफार परिचयही आपल्याला असतो. परंतु ब्राह्मण ग्रंथ हे त्यामानाने किंचित कमी परिचयाचे आणि ऐकण्यातही कमी येतात. याचे मुख्य कारण अर्थातच त्यांचे विषय आहेत. वेदांचे महत्त्व अर्थातच वेगळे सांगायला नको. उपनिषदे ही भारतीय तत्त्वज्ञानाचा पाया म्हणून प्रसिद्ध आहेतच. ब्राह्मण ग्रंथांचा विषय हा प्रामुख्याने यज्ञ आणि यज्ञप्रक्रिया यांचे विस्तृत विवेचन हा असल्याने याज्ञिकी जाणणाऱ्या, आचरणाऱ्या किंवा अभ्यासणाऱ्या लोकांव्यतिरिक्त या ग्रंथांबद्दल माहित असणारे लोक खुप कमी आढळतात. गंमतीचा भाग असा की आपल्या नैमित्तिक पूजाकर्मात किंवा निरनिराळ्या व्रतांच्या संदर्भातील पूजनांमधील अनेक विधींचे मूळ हे ब्राह्मण ग्रंथांतील यज्ञविधीच्या विवेचनात आढळते पण ते आपल्या ध्यानात येत नाही. आपण आधीच्या लेखात पाहिल्याप्रमाणे रोजच्या पठणातील अऩेक मंत्र जसे वेदातील आहेत हे आपल्याला ठाऊक नसते तसेच.
उत्तरवेदकालामध्ये यज्ञसंस्थेचे महत्त्व वाढत गेले. यज्ञसंस्थेतील प्रत्येक अंगाची सांगोपांग माहिती असणे हे अतिशय आवश्यक कार्यच झाले. यज्ञ, यज्ञातील मंत्र, त्यांची पठण पद्धती, त्या अनुषंगाने केले जाणारे विधी, विधी करण्यामागची भूमिका, त्यासाठी लागणारी साधने, विधी सिद्ध करण्याचे योग्य तंत्र यासाठी अचूक संहितांची आवश्यकता भासत गेली. ब्राह्मण ग्रंथांची रचना याच कारणाने करण्यात आली असे मानले जाते.
काही तासांच्या छोट्या यज्ञापासून ते १५ किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांचे यज्ञ हे – आयोजन, शेकडो व्यक्ती, वस्तू आणि विधी यांचा बारीक सारीक गोष्टींचा विचार करून अत्यंत नियोजनबद्ध पार पाडले जात असत.कार्यक्रमाच्या रुपरेषेपासून ते उपकराणांच्या मांडणीपर्यंत प्रत्येक चरण (step) पूर्वनियोजित असे. यावरून कार्यक्रम व्यवस्थापन (Event Management) सारख्या आजकालीन शास्त्रातील तत्कालीन लोकांनी केलेली प्रगती ठळकपणे दिसून येते.
व्याख्या किंवा अर्थ –
ब्राह्मण शब्दाची उत्पत्ती किंवा अर्थ काय असावा यावर अनेक विद्वानांची भाष्ये आहेत. ब्रह्म या शब्दाच्या दोन प्रचलित अर्थांचा संदर्भ येथे घेतला जातो. ब्रह्म म्हणजे मंत्र किंवा यज्ञ. शतपथ ब्राह्मणात ‘ब्रह्म वै मन्त्रः’ असा उल्लेख आहे. याचा अर्थ वैदिक मंत्रांचे (ब्रह्म) विवेचन करतात ते ब्राह्मण असा होतो.
विषय –
आधी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मण ग्रंथांमध्ये प्रामुख्याने यज्ञ आणि यज्ञ प्रयोगाची माहिती येते. याचे अर्थातच दोन भाग पडतात. एक विधी आणि दुसरा अर्थवाद. साधारणतः विधी म्हणजेच यज्ञाच्या सविस्तर प्रयोगाची माहिती तर अर्थवाद म्हणजे प्रयोगाचा उद्देश, त्यातील तंत्र, मंत्र आणि कृतीचे समर्थन करणारा युक्तिवाद किंवा माहिती. ब्राह्मण ग्रंथांचा विषय आणि त्याची विभागणी कशी आहे यावर शाबरभाष्यात स्पष्टिकरण मिळते. ऋषी शबरांच्या मते ब्राह्मणग्रंथात यज्ञविधीचा विस्तार आणि विचार दहा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून केला जातो.
यातील प्रमुख संकल्पना सहा आहेत त्यांची थोडक्यात माहिती पाहू
१. विधि – कोणताही यज्ञ कधी आणि कसा करावा तसेच त्याची साधने काय असावीत, यज्ञातील प्रमुख पुरोहित कोण असावेत इ. चा विचार येथे केला जाई. तैत्तिरिय संहितेत औदुंबराची फांदी वापरण्याचा उल्लेख आहे. यजमानेन सम्मिता औदुम्बरी भवति।१ यात ही फांदी यजमानाच्या मापाची असावी असे म्हटले आहे. यावरून यज्ञसाधनांचा किती खोलवर विचार केला जाई हे समजून येते.
२. विनियोग – विनियोग म्हणजे अर्थातच उपयोग किंवा वापर. कोणत्या मंत्राच्या विनियोगाने (वापराने/उच्चारणाने) कोणता उद्देश सफल होतो याचा विचार म्हणजे विनियोग. उदाहरणार्थ प्राण्यांच्या रोगनिवारणार्थ ‘सः नः पवस्व शं गवे’२ हा मंत्र म्हटला जावा.
३. हेतु – हेतु म्हणजे अर्थातच कारण. एखादा विशिष्ट विधी करण्यासाठीचे कारण किंवा एखादे उपकरण किंवा मंत्र वापरण्यामागचा हेतू काय आहे याचा येथे विचार केला जाई.
४. अर्थवाद – अर्थवाद म्हणजे यज्ञविधीसाठी उपयुक्त गोष्टींची प्रशंसा आणि निषिद्ध किंवा त्याज्य गोष्टींची निंदा करणे. उदाहरणार्थ यज्ञात उडीद हे निषिद्ध मानले जातात म्हणून तैत्तिरिय संहितेत ‘अमेध्या वै माषा’ असा उल्लेख आहे.
५. निरुक्ति – निरुक्त या यास्काचार्यांच्या प्रसिद्ध ग्रंथाच्या संदर्भातीलच अर्थ येथे येतो. निरुक्ति म्हणजे शब्दांची व्याख्या. यज्ञादि कर्माच्या संदर्भात वापरल्या जाणा-या शब्दांचा अर्थ स्पष्ट करणे म्हणजे निरुक्ति. ब्राह्मण ग्रंथात याचा खुप खोलवर विचार झाल्याचे दिसते.
६. आख्यान – आख्यान म्हणजे खरंतर गोष्ट किंवा कथा. येथेही यज्ञविधीचा विषय रंजक पद्धतीने मांडणे म्हणजे आख्यान होय. यात यज्ञातील विधी त्यामागील उद्देश यांच्या संदर्भातील कथा येतात. अशाप्रकारे बोध करून देणाऱ्या अनेक सुंदर कथांचा संग्रह ब्राह्मण ग्रंथातून आपल्याला पहायला मिळतो. उदाहरणार्थ – स्वार्थ आणि निःस्वार्थ प्रवृत्तीवर भाष्य करणारी शुनःशेपाची कथा (ऐतरेय ब्राह्मण), अपात्री विद्यादान न करण्यासंदर्भातील दध्यंग अथर्वणाची कथा इ.
या विवेचनावरून हे ध्यानात येईल की भारतीय संस्कृतीचे प्रत्येक अंग मग ते तत्त्वज्ञान असो की यज्ञासारखे कर्मकांड, अतिशय विचारपूर्वक व सर्वसमावेशक पद्धतीने मांडले जात असे. यज्ञविधीत वापरल्या जाणा-या साध्या पळी पासून ते यज्ञाच्या अंतिम टप्प्यात केल्या जाणा-या अवभृथस्नानापर्यंत प्रत्येक विधी, मंत्र, साहित्य, वस्तू आणि व्यक्तीच्या संदर्भात या १० वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून मगच त्याचा स्वीकार केला जात असे. यावरून तत्कालीन ऋषीमुनींची जीवनदृष्टी किती सखोल होती हे लक्षात येते. आजही आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा संकल्पापासून ते क्षमापनापर्यंतचे सर्व विधी करतो त्या प्रत्येक कृती, कर्म आणि मंत्रामागचा विचार हा ब्राह्मण ग्रंथांची देणगी आहे.
ब्राह्मण ग्रंथांची विभागणी –
प्रत्येक वेदात आणि वेदशाखेत ब्राह्मण ग्रंथांची रचना करण्यात आली. आजही विभागशः जवळपास १८ ब्राह्मण ग्रंथ उपलब्ध आहेत ते असे
ऋग्वेद – ऐतरेय ब्राह्मण आणि शांखायन/कौषीतकि ब्राह्मण
शुक्लयजुर्वेद – शतपथ ब्राह्मण
कृष्णयजुर्वेद – तैत्तिरिय ब्राह्मण
सामवेद – सामवेदाची ताण्ड्य, षड्विंश, सामविधान, आर्षेय, देवताध्याय, उपनिषद, संहितोपनिषद, वंश, जैमिनीय अशी एकूण ९ ब्राह्मणे मानतात.
अथर्ववेद – गोपथ ब्राह्मण
वेदातील मंत्रांचे अर्थ, यज्ञातील विधी आणि प्रयोग याबरोबरच ब्राह्मण ग्रंथात भारतीय उपखंडाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचीही माहिती मिळते. विशेषतः प्राचीन तसेच उत्तरवेदकालीन इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये ऋगवेदाइतकेच शतपथ ब्राह्मण प्रसिद्ध आहे. आकाराने सर्वात मोठ्या अशा या ब्राह्मणात यज्ञविधी तर आहेतच पण त्याबरोबरच इतिहासाच्या दृष्टीने महत्वाच्या अशा कुरु, पांचाल, कोसल, विदेह या राज्यांचा तसेच जनक, दुष्यन्त, जनमेजय इ. राजांचेही उल्लेख आढळतात. एकूण काय तर वेदवाङ्मय समृद्ध करून त्याचा दैनंदिन जीवनाशी संबंध ब्राह्मण ग्रंथ जोडतात. उपनिषदांसारखे तत्त्वचिंतन करणारे ग्रंथही ब्राह्मण ग्रंथाचाच भाग म्हणून विकसित होतात. त्या उपनिषदांबद्दल पुढच्या भागात.
तळटिप
१ तैत्तिरिय संहिता ६/२/१०/३
२ ताण्ड्य ब्राह्मण
हिरण्यवर्णाः शुचयः पावका यासु जातः सविता यास्वग्निः ।
या अग्निं गर्भं दधिरे सुवर्णास्ता न आपः शं स्योना भवन्तु ॥ अथर्ववेद १, ३३।।
सोन्यासारख्याच रंगाने प्रकाशणारे (पावसाचे) पाणी, शुद्धीदायक होवो, ज्यामधून सविता देव आणि अग्निदेव यांचा जन्म होतो. सोन्यासारखी (झालर) असणारे म्हणजे जणु अग्निगर्भ. ते पाणी आपल्या सर्व समस्या दूर करो आणि आपल्याला आनंद आणि शांती प्रदान करो.
पावसाळ्याचे दिवस आहेत तर अथर्ववेदातीलच आप(जल)सूक्तापासूनच लेखाची सुरुवात करु यात.
अथर्ववेद….
चार वेदातील अंतिम परंतु विषयांच्या विविधतेत ऋग्वेदाच्या तोडीचा वेद म्हणजे अथर्ववेद. रचनेच्या दृष्टीकोनातून आणि भाषिक वैशिष्ट्यांवरून अथर्ववेदाचा काळ आणि स्थान याबाबत विद्वानांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते अथर्ववेदाचे संकलन जरी ऋग्वेदोत्तर काळातील वाटले तरी त्यातली मंत्र ऋग्वेद काळापासून रचनेत होते असेही मानले जाते.
असाही एक विचारप्रवाह आहे जो असे मानतो की अथर्ववेद हा वेदच नाही. कारण अथर्ववेदातील यज्ञ सोडून इतर अनेक विषय जसे यातु विद्या किंवा अभिचार मंत्र हे वैदिक धर्म, परंपरा किंवा संस्कारांचा भाग नाहीत. यासाठी इतर काही ग्रंथातील दाखले दिले जातात जसे ‘त्रयोवेदा अजायन्त’ (ऐतरेय ब्राह्मण) , ‘वेद शून्यैस्त्रिभिरेति सूर्यः’ (तैत्तिरिय ब्राह्मण) किंवा ‘यम् ऋषयस्त्रयी विदो विदुः ऋचः सामानि यजुष’ (तैत्तिरिय ब्राह्मण). आपण अर्थातच त्या वादात पडण्याचे कारण नाही कारण त्याचे खंडन अनेक थोर विद्वानांनी केले आहे. आज अथर्ववेदाचे स्वरुप आणि त्याचे भारतीय ज्ञानशाखातील योगदान पाहता अथर्ववेद हा वेदच होता यात शंकाच उरत नाही.
अथर्व …..
‘थर्व’ या धातूपासून ‘थर्वन्’ हा शब्द तयार होतो. निरुक्तात१ याचा अर्थ गतीशील असा होतो. म्हणून अथर्वन् म्हणजेच – गतिहीन, निश्चल किंवा स्थिर. अथर्ववेद म्हणजे अढळ ज्ञान देणारा अशा अर्थाने हा शब्द येतो. अथर्वन् आणि अंगिरस ऋषींनी रचलेला म्हणून ‘अथर्वांगिरस’ असेही या वेदाचे नाव आहे. अथर्वन् ऋषीकुलाने यज्ञादी कर्मे तर अगिरसांनी अभिचारादि मंत्राची रचना केली असे मानतात. याशिवाय ब्रह्मवेद, छन्दोवेद, भैषज्यवेद, क्षत्रवेद अशी अनेक नावे अथर्ववेदाला दिली जातात.
एकाच वेदाची इतकी नावे येण्याचे मुख्य कारण म्हणजे या वेदात अंतर्भूत असलेले विषय. चारही वेदात सर्वात जास्त विविधता असलेला वेद म्हणजे अथर्ववेद. ब्रह्मज्ञानापासून ते शापापर्यंत, आयुष्यवर्धक मंत्रांपासून ते शत्रुनाशक सूक्तांपर्यंत, औषधी उपचारांपासून ते जादुटोण्यापर्यंत, शेती पासून ते राज्यकर्मापर्यंतचे आणि भूगोलापासून ते खगोलापर्यंत अनेकविध विषय अथर्ववेदात येतात. म्हणूनच तर एकाच वेळी आयुर्वेद, अर्थशास्त्र (राजनीती) आणि शिल्पशास्त्र असे तीन सर्वस्वी भिन्न विषय अथर्ववेदाला आपले उगमस्थान मानतात.
रचना….
अथर्ववेद हा वेदवाङ्मयातील एक असला तरी त्याची रचना ऋग्वेदाइतकी काटेकोर नाही. अथर्ववेदात अध्यायाऐवजी रामायणासारखा कांड हा शब्द वापरलाय. एकूण २० कांडे मिळून ७३१ सूक्ते आहेत, ज्यात साधारण ५९८७ मंत्र आहेत. यातील जवळपास १२०० मंत्र ऋग्वेदातले आहेत. अथर्ववेदात काव्य आणि गद्य अशा दोन्ही स्वरूपात विवेचन आढळते हे त्याचे अजून वैशिष्ट्य आहे.
काय आहे अथर्ववेदात…
एकदा अथर्ववेदातील विषयांची नुसती सुची पाहिली तरी अथर्ववेदात काय नाही असे म्हणावे लागेल! वैदिक कालखंडातील जनजीवनाचा विश्वकोश म्हणजे अथर्ववेद आहे. त्याकाळातील तत्त्वज्ञान, समाजव्यवस्था, शैक्षणिक व्यवस्था, राज्यतंत्र, शेती, तंत्रज्ञान आणि वैद्यक या सर्वविषयांवर सविस्तर भाष्य अथर्ववेदात येते. अथर्ववेदातील विषयांची सूक्तवार लहानशी सूची पाहूयात म्हणजे अथर्ववेदाची व्याप्ती समजून येईल.
भैषज्यसूक्ते – अथर्ववेदातील या सूक्तात निरनिराळ्या ८९ रोगांची माहिती आणि त्यांची चिकित्सा सांगितली आहे. या मंत्रात औषधे, औषधी वनस्पती आणि पाण्याचे वर्णन आणि प्रशंसा आढळते. कौशिक सूक्तात या मंत्रांच्या सहाय्याने केल्या जाणा-या जादूटोण्याचे वर्णन आहे. दन्तपीडा (दातदुखी), अतिसार, कुष्ठरोग, यक्ष्मा (क्षय) असे असंख्य आणि आजही आपल्याला माहिती असणारे रोग यात येतात. भैषज्यसूक्तात अनेक किटक, किटाणु, भूत, राक्षस यांचीही वर्णने आहेत.
आपल्या माहितीतले सांगायचे तर आजच्या भाषेत ज्याला ‘ओपन फ्रॅक्चर’ (Open Fracture) म्हणतात त्याचीही चिकित्सा अथर्ववेदात आढळते२. रोहीणी वनस्पतीच्या सहाय्याने ती जखम कशी बांधावी याचे साद्यंत वर्णन त्या सूक्तात आढळते.
आयुर्वेदाचे मुळ अथर्ववेदात आहे असे का म्हणतात ते आपल्याला यातून उमगते. केवळ उपचारच नव्हेत तर अनेक वनस्पतींचे औषधी उपयोग आणि त्यावरील मंत्रांवरून त्याकाळी वनस्पतीशास्त्र(Botany) हे ही अभ्यासाचा भाग होते हे लक्षात येते.
पौष्टिक सूक्त – सुखसमृद्धिसाठी करण्यात येणा-या प्रार्थना या सूक्तातून व्यक्त होतात. घर बांधताना, हंगामाच्या सरुवातीला शेतात नांगर धरताना, पेरणीच्या वेळी तसेच उत्तम पीक आणि त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या समृद्धीसाठीच्या प्रार्थना या सूक्तात येतात.
आयुष्य सूक्त – स्वास्थ्य आणि दीर्घायुषी जीवनासंबंधित अनेक सूक्ते अथर्ववेदात येतात. या मंत्रातून निरोगी आणि शतायुषी जीवनाची प्रार्थना केली जात असे.
प्रायश्चित्त सूक्त – पाप किंवा अपराधाच्या क्षमापनार्थ करण्यात येणा-या प्रायश्चित्तांशी संबंधित मंत्र या सूक्तात येतात. केवळ पापच नव्हे तर यज्ञ करताना जर चूक झाली तर त्यावरील प्रायश्चित्त विधानेही या मंत्रात येतात. ग्रह किंवा नक्षत्रांना शांत करण्याचे मंत्रही या सूक्तात येतात.
स्त्रीकर्माणि सूक्त – विवाह संस्कार, त्याचे विधी तसेच पती पत्नीच्या परस्परप्रेमाची वाढ या विषयांवरील सूक्ताना स्त्रीकर्माणि सूक्ते म्हणता येईल. या मंत्राद्वारे वर किंवा वधू प्राप्त करता येईल असा विचार असे. याच सूक्तात असे अनेक मंत्र आहेत जे इन्द्रजाल, शाप, अभिशाप किंवा वशीकरण अशा विषयांशी संबंधित आहेत.
**(एकता कपूर किंवा झी मराठीच्या टि.व्ही सिरियलना उपयोगी पडतील असे पुरुष वशीकरण, सवतीचा नाश करणे, स्त्री-दुर्लक्षण निवारण अशा विषयांवरचे मंत्रही या सूक्तात येतात!)
राजकर्माणि सूक्ते – राजाच्या आणि राज्याच्या व्यवहारासंबंधी मंत्र या सूक्तात येतात. शत्रुवर विजय मिळविण्याची प्रार्थना करणारे, अस्त्र आणि शस्त्रांची माहिती देणारे मंत्रही यात आहेत.
अभिचारात्मक सूक्ते– अभिचार म्हणजे जादू. शत्रुचा नाश करणे, शत्रुने केलेली जादू परतावून लावणे, शत्रुच्या जादूटोण्यापासून स्वतःचे रक्षण करणे, शत्रुपक्षात रोगाच्या साथी पसरवणे अशा अनेक विषयांवरचे मंत्र या सूक्तात येतात.
याच बरोबर पृथ्वीसूक्तासारखे मातृभूमीचे प्रेम दर्शवणारे नितांतसुंदर सूक्तही यात येते.
यज्ञिक सूक्त – दैनंदिन जीवनात केल्या जाणऱ्या पूजाअर्चा, उत्सवात केले जाणारे होम आणि इतर काही यज्ञांचे विधी या सूक्तांत येतात.
कुंताप सूक्त – अथर्ववेदाच्या २० व्या कांडात अनेक कूट आणि गूढ सूक्ते आहेत. अनेक कोडी आणि त्यांची उत्तरे, गूढ अर्थाचे मंत्र या सूक्तात येतात. ऋग्वेदातील अस्यवामीय किंवा नासदीयसूक्ताच्या तोडीची काही सूक्ते येथे आढळतात.
दार्शनिक सूक्त – ईश्वर, प्रजापति, ब्रह्म, मन, प्राण इ. वर भाष्य असणारे मंत्र या सूक्तांत येतात. गायीच्या रुपात केलेले ईश्वराचे वर्णनही या सूक्तात येते.
अशा प्रकारे अनेक रंजक, गुढ आणि अभ्यासपूर्ण विषयांचे उगमस्थान असणारा अथर्ववेद हा तत्कालिन समाजाचे चित्रण आणि आजच्या समाजाला मार्गदर्शन असे दोन्ही हेतू साध्य करतो.
उपसंहार
चारही वेदांच्या ओळख करून घेतल्यावर आपल्या लक्षात येते की केवळ चार धार्मिक पुस्तके इतकी संकुचित ओळख वेदांची नाही. समृद्ध, सुसंस्कृत आणि स्वाभिमानी भारताची ओळख वेदांतूनच जगाला होते. वेद हे भारतीय संस्कृती आणि उपखंडतील ज्ञानाचे उगमस्थान आहेत. परमात्म्याचे तत्त्वज्ञान असो की आयुर्वेदाचे विज्ञान…… लौकीक आणि पारलौकीक जीवनाकडे अत्यंत जिज्ञासु वृत्तीने पहायला वेद शिकवतात. आयुर्वेद, धनुर्वेद, स्थापत्य, शिल्प, पानक अशा अनेक शास्त्रांचा पाया वेदच रचतात. ऋग्वेदातले ऋषी आयुष्य निखळ आनंदाने जगतात, त्याचबरोबर त्याचे रहस्यही मांडतात. तर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद आपल्यालाही ते आयुष्य कसे जगता येईल ते समजावून सांगतात. रंग, रस, गंध, नाद आणि स्पर्श या सर्व अनुभुतीतून आयुष्याला आकार द्यायला वेद शिकवतात. जीवनाकडे सर्वांगीण दृष्टिकोनातून पहात त्याचा आनंद घेण्याचे तात्त्विक आणि शास्त्रीय ज्ञान वेदातून प्राप्त होते म्हणूनच हजारो वर्षानंतरही आज अनेक भारतीय आणि अभारतीय विद्वान वेदांचा अभ्यास करतात. वेदांच्या या ज्ञानशाखांबद्दल पुढील भागात……..
तळटिप –
१. “अथर्वाणोsथर्वणवन्तः। थर्वतिश्चरतिकर्मा, तत्प्रतिषेधः।” (निरुक्तः–११.१८)
२. सं मज्जा मज्ज्ञा भवतु समु ते पुरुषा परुः। अथर्ववेद पै. – ४/१५
ऋग्वेदाची ओळख मागील भागात आपण करून घेतली. पहिला वेद म्हणून त्यातल्या त्यात ऋग्वेद आपल्याला माहिती असतो. यजुर्वेदाच्या नशीबात ते नाही. देशस्थ कोकणस्थ वादाशिवाय यजुर्वेद किंवा यजुर्वेदी वगैरे शब्दच कानी पडत नाहीत! वास्तविक सर्वांगीण जीवनाचे दर्शन घडवणारा जीवनवेदच म्हणावा इतकं यजुर्वेदाचं महात्म्य आहे. ते शब्दात मांडायचा प्रयत्न करु यात.
यजुर्वेदातील मंत्रांना ‘यजु’ असे म्हणतात हे मंत्र गद्यात्मक आहेत. यजुर्वेदातले पद्यात्मक मंत्र प्रामुख्याने ऋग्वेद आणि अथर्ववेदातून घेतले आहेत. यज् या संस्कृत धातूपासून यजु शब्द तयार होते. यज् याचे तीन अर्थ१ पाणिनी सांगतो. देवाची पूजा, एकत्र येणे आणि दान. यजुर्वेदाचा प्रमुख वापर हा यज्ञकर्मासाठी केला जातो. ऋचांनी प्रशंसा करावी व यजुंनी यज्ञ अशा अर्थाचे संस्कृत वचन निरुक्तात२ आढळते. यज्ञामध्ये प्रत्येक वेदाचा भाग सांभाळणारा एक प्रमुख वैदिक/ पुरोहीत असतो त्याला ऋत्विज असे म्हणतात. ऋत्विजांची वेदानुसार नावे अशी – ऋग्वेद – होता (हे नाव आहे), यजुर्वेद – अध्वर्यु, सामवेद – उद्गाता, अथर्ववेद – ब्रह्मा. अध्वर्यु ज्या वेद मंत्रांचा प्रयोग करतात तोच यजुर्वेद म्हणून यजुर्वेदाला ‘अध्वर्युवेद’ असेही म्हणतात.
शुक्ल आणि कृष्ण असे यजुर्वेदाचे दोन भाग पडतात. शुक्लयजुर्वेदात केवळ मंत्र आहेत तर कृष्णयजुर्वेदात मंत्र आणि त्यांच्या विनियोगाची माहीती आहे. कृष्णयजुर्वेदाच्या निर्मितीची एक कथा आहे. वैशंपायन ऋषींनी याज्ञवल्क्यांना वेदाचे शिक्षण दिले. परंतु दोघांमध्ये वेदार्थनिर्णयावरून काही वाद निर्माण झाला. वाद वाढल्यावर संतप्त झालेल्या वैशंपायन ऋषींनी याज्ञवल्क्यांना दिलेले ज्ञान परत मागितले. याज्ञवलक्यांनी ते ज्ञान ओकून टाकले. वैशंपायनांच्या काही शिष्यांनी तित्तिर पक्षाचे रुप घेऊन ते ज्ञान ग्रहण केले. वैशंपायनांनी याज्ञवल्क्यांना जे ज्ञान दिले ती मूळ संहिता म्हणजे शुक्लयजुर्वेद तर तित्तिर पक्षांनी ग्रहण करून जे स्वीकारले ते ज्ञान म्हणजे कृष्ण यजुर्वेद असे मानतात. नवे व जुने ज्ञान आणि त्यांचे संपादन यामुळे यजुर्वेदाच्या काही शाखा आणि त्यांच्या संहिता निर्माण झाल्या जसे वाजसनेयी, तैत्तिरीय इ. याच्या अधिक तपशीलात न जाता आपण दोन्ही मिळून यजुर्वेदाची ओळख करून घेउ यात.
काय आहे यजुर्वेदात?….. यजुर्वेदाची रचना अध्यायात केली आहे. एकूण ४० अध्याय आहेत. त्यात मुख्यत्वेकरून यज्ञासंबंधी माहिती आहे.
यज्ञ– यज्ञासाठी वेदी, कुंड तसेच इतर साधने तयार करणे, हवन, हवनसामग्री तसेच त्यासंबंधीचे नियम आणि मंत्र यजुर्वेदात विस्ताराने येतात. गाईचे दूध काढणे, पाणी आणणे येथपासून ते यज्ञकुंडाची जागा, वेदी उभी करणे, यज्ञसाहित्य निवडणे, वेगवेगळ्या आहुति देणे येथपर्यंत प्रत्येक बारीक सारीक कृतींची माहीती यजुर्वेदात येते. आपल्या ऐकण्यात विशेषकरून येणारे ‘अश्वमेध’ आणि ‘राजसूय’ (युधिष्ठिराने महाभारतात केलेला) हे यज्ञ संपूर्ण विधिवत यजुर्वेदात येतात. याखेरीज दर्श पूर्णमास (अमावस्या आणि पौर्णिमेला करायचे याग/यज्ञ), अग्निष्टोम (पाच दिवसांचा मिनि यज्ञ), चातुर्मास्य, काम्येष्टी, वाजपेय, नक्षत्रेष्टि अशा अनेक छोट्या मोठ्या यज्ञांचा अंतर्भाव यजुर्वेदात होतो.
यजुर्वेदातील माहितीचा परीघ किती मोठा होता हे समजून घेण्यासाठी यज्ञ ही काय संस्था होती हे पाहिले पाहिजे. त्याकाळातील यज्ञ हा केवळ एक धार्मिक विधी नव्हता. आधी सांगितल्याप्रमाणे ‘यज’ याचा एक अर्थ एकत्र येणे असाही होतो. त्यामुळेच यज्ञ हा एक प्रकारचे सामाजिक समारंभ (मराठीत सोशल गॅदरींग) असे. यात विविध विधींसह अनेक मनोरंजक खेळ किंवा स्पर्धाही असत. जसे सामगायन असेल, रथांची शर्यत असेल, वाद्य वादन असेल अगदी पाण्याच्या घागरी घेतलेल्या दासींच्या नृत्यापासून ते रस्सीखेच सारख्या खेळांपर्यंत मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम यज्ञात होत. यज्ञ हे संपुर्ण समाजाचे एकत्रिकरण करणे, त्यांचे मनोरंजन करणे, त्यांच्यात एकी आणि समभाव वाढवणे आणि त्यांचे सर्वांगिण कल्याण साधणे अशी उद्दीष्ट्ये साध्य करण्याचे साधन होते. हिलेब्रॅन्ट (Hillebrandt) सारखा विद्वान या खेळांची तुलना थेट ऑलिम्पिकशी (प्राचीन) करतो ३.
अश्वमेध किंवा राजसूय यज्ञ करणारा राजा आहुति देताना म्हणत असे आ ब्रह्म॑न् ब्राह्म॒णो ब्र॑ह्मवर्च॒सी जा॑यता॒मा रा॒ष्ट्रे रा॑ज॒न्यः शूर॑ इष॒व्योऽतिव्या॒धी म॑हार॒थो जा॑यतां॒ योगक्षे॒मो न॑: कल्पताम् ।।यजुर्वेद मा.वा संहिता अ २२.२२ ।। संपूर्ण मंत्र मोठा आहे पण याचा अर्थ असा की – ‘ब्रह्मतेजाने संपन्न आणि शूर असे वीर आमच्या राष्ट्रात उत्पन्न होवोत, आमचा योगक्षेम (निर्वाह) उत्तम चालो.’
गोष्टी – यजुर्वेदाचा प्रमुख विषय यज्ञ असल्याने ऋग्वेदाइतक्या गोष्टी यजुर्वेदात नाहीत. पण निरनिराळ्या विषयांवरील काही आख्यायिका यजुर्वेदाच्या चर्चेत येतात. इंद्राने वायुदेवतेच्या मदतीने देवांच्या भाषेचे व्याकरण लिहिले अशी एक आख्यायिका४ यजुर्वेदात आहे. पुर्वी देव जी भाषा बोलत असत ती काहीशी नियमविरहीत किंवा व्याकरणरहीत होती. देवांच्या विनंतीवरून इंद्राने वायुदेवतेच्या सहाय्याने त्या भाषेला नियमबद्ध व व्याकृत केले असा उल्लेख यजुर्वेदात आहे.यजुर्वेदात मांडलेल्या विषयांचा विस्तारही यातून लक्षात येतो.
यजुर्वेदात आपल्या परीचयाचे काय आहे?…..
खुप काही… आपण निरनिराळ्या वेळी ऐकलेला आणि वापरलेला – भूर्भुव॒: स्व॒: तत्स॑वि॒तुर्वरे॑ण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि ।धियो॒ यो न॑: प्रचो॒दया॑त्। हा गायत्री मंत्र यजुर्वेदातला आहे. (अध्याय ३६, मंत्र ३)
ग॒णानां॑ त्वा ग॒णप॑ति हवामहे। हा अजून एक माहितीतला मंत्र यजुर्वेदातीलच आहे. (अध्याय२३-मंत्र १९)
आपण घरी किंवा महादेवाच्या देवळात ऐकलेले ‘रुद्र पठण’ हे यजुर्वेदातील आहे. (अध्याय १६)
भाषेतील चमत्कृती म्हणून सांगायचे तर वाजपेय या यज्ञात सहभागी असणारे किंवा तो यज्ञ करणारे म्हणून ‘वाजपेयी’ हे नाव रुढ झाले.
हाच वाजपेय यज्ञ पुण्यात १९५५ साली संपुर्ण विधिवत अगदी रथांच्या शर्यतीसकट एक प्रयोग म्हणून करण्यात आला हे ही जाता जाता सांगायला हरकत नाही.
तत्त्वज्ञान – वैदिकांच्या कर्मकांडाचे स्वरूप, त्यामागचा उदात्त विचार आणि त्याचे व्यापक तत्त्वज्ञान यजुर्वेदाच्या सर्व म्हणजे ४० अध्यायात येतेच. विशेषतः आपल्याला माहिती असलेला भाग म्हणजे ‘ईशावास्योपनिषद’ जे यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेचा ४० वा अध्याय आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यस्विद्धनम्। या प्रसिद्ध मंत्रातून परमेश्वर सर्वव्यापी आहे. माणसाने संग्रह न करता आवश्यकतेनुसार पदार्थांचा उपभोग घ्यावा असा उपदेश केला आहे.
अशाप्रकारे मनोरंजनासह आयुष्याचा आनंद घेत तत्त्वज्ञान शिकवणारा यजुर्वेद… अगम्य तर नाहीच किंबहूना चतुरस्त्र जीवनशैली (मराठीत वर्क लाईफ बॅलन्स) शिकवणा-या आजच्या युगातील कोणत्याही पुस्तकावर मात करणारा पुस्तकरुपी जीवनवेदच आहे.
तळटीप १. यज देवपूजा – संगतिकरण – दानेषु (अष्टाध्यायी ३.३.९०) २. यजुर्भिः सामभिः यत् एनम् ऋग्भिः शंसन्ति यजुर्भिः यजन्ति सामभिः स्तुवन्ति ।निरुक्त १३.७। ३. Alfred Hillebrandt एक जर्मन विद्वान त्याच्या Vedische Mythologie (१, २४७) या पुस्तकात हा उल्लेख आढळतो. ४. तैत्तिरिय संहिता ७/४
ऋग्वेद – वेद म्हटलं की प्रत्येक भारतीयाचे हात जोडले जातात. यातले श्रद्धेने जितके असतात तितकेच अज्ञानाने! वेद हे काहीतरी अतिशय अवघड आणि गुंतागुंतीचे प्रकरण असून त्याच्या वाटेला न जाणे बरे! ते काम विद्वान, अभ्यासक आणि पुरोहीत इत्यादिंवर सोपवून त्यानी सांगितले की हात जोडायचे इतकंच काम अनेकजण करतात. एकदा वेदात सांगितलंय म्हटलं की झालं मग कोणी त्याच्या वाटेला जाणार नाही!!
वेद खरोखर इतके अगम्य आणि अवघड आहेत का? नक्कीच नाहीत. एकाच वेळी अत्युच्च दर्जाचे तत्त्वज्ञान सांगणारे आणि साहित्याचा अजोड नमुना असणारे वेदांसारखे दुसरे ग्रंथ सापडणे खरोखर कठीण आहे. केवळ अगम्य धार्मिक पुस्तके इतके तोकडे स्वरूप वेदांचे नक्की नाही.अत्यंत सुंदर प्रार्थना, रसाळ कथा, मजेदार वर्णने, कलाकुसर, तत्कालीन तंत्रज्ञान, चालीरिती, समारंभ आणि अर्थातच गहन तत्त्वज्ञान हे सर्वकाही वेदात आढळते. या लेखमालेत सर्वप्रथम वेद आणि वेदवाङ्मयाची प्राथमिक माहिती करून देणे हा उद्देश आहे.
आपल्याकडे १४ विद्या आणि ६४ कला असा वाक्प्रचार खुपदा ऐकण्यात येतो. या चौदा विद्या कोणत्या?
४ वेद, ६ वेदांगे, न्याय, मीमांसा, पुराण आणि धर्मशास्त्रे अशा एकूण चौदा विद्या किंवा विद्याशाखा होत. यातील वेद सोडून इतर ग्रंथ तूर्तास दूर ठेऊयात.
संस्कृतात विद् म्हणजे जाणणे, वेद हा शब्द येथून उगम पावला. वेद ४ आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.
ऋग्वेद
ऋग्वेद हा प्राचीनतम वेद आहे. ऋग्वेद म्हणजे ऋचांचा वेद किंवा ऋचांनी बनलेला वेद१. देवतांना आवाहन करण्यासाठीच्या मंत्रांना (आजच्या भाषेत श्लोकांना) ऋक्२ किंवा ऋचा असे म्हणता येईल.
ऋग्वेदात अनेक सूक्ते आहेत. सूक्त म्हणजे ज्या मंत्रातून ऋषींची कामना पूर्णपणे व्यक्त होते असा ऋचांचा समूह (आजच्या भाषेत स्तोत्र). ऋषीसूक्त, देवतासूक्त, अर्थसूक्त आणि छंदसूक्त असे सूक्तांचे प्रकार आहेत. ऋग्वेदात जवळजवळ अशी १०२८ सूक्ते (स्तोत्रे) आहेत एकूण ऋचांची संख्या ही १०५८० इतकी भरते.
हे सर्व मंत्र एकाच ऋषींनी रचले का? अर्थातच नाही. असे मानतात की वेद हे लिहिले गेले नसून ते ऋषींना आसमंतात दिसले आणि त्यांनी ते परंपरेने जपले. म्हणून वेदांना अपौरुषेय३ म्हणजेच पुरुषाने (माणसाने) न रचलेले असेही म्हणतात.
आजच्या व्हॉटसॅप आणि फेसबुकच्या युगात एखादी माहिती किंवा बातमी जर सकाळी सांगितली तर संध्याकाळपर्यंत त्याला इतके फाटे फुटतात की खरं खोटं तर दूर मूळ बातमी काय होती हे ही विसरायला होतं! अशा वेळी ऋग्वेदासारखा ग्रंथ हजारो वर्षांपूर्वी जसा रचला गेला तसाचा तसा बदल न होता आपल्यापर्यंत पोचलाच कसा? याचे उत्तर ऋग्वेदाच्या रचनेत आहे. असे म्हणतात की ऋग्वेदाच्या रचनेच्या काळात लेखनकलाच अस्तीत्त्वात नव्हती. शाकल (शाकाल नव्हे!) सारख्या ऋषींनी ऋग्वेदाची रचना आणि पठणाच्या पद्धतींची मांडणी अशा पद्धतीने केली की त्यात कोणताही पाठभेदच होणार नाहीत.
आता ऋग्वेदाची रचना थोडी समजाऊन घेऊ. ऋग्वेदात १० मंडले आहेत. मंडल म्हणजे अध्यायासारखे विभाग. प्रत्येक मंडलाला नाव आहे. २ ते ८ ही मंडले ऋषींच्या नावाने आहेत. यात त्या त्या ऋषीकुलातील ऋषींचे मंत्र आहेत. १ले आणि १० वे मंडल संमिश्र म्हणजे वेगवेगळ्या ऋषींच्या मंत्रांचे आहे. ९ व्या मंडलात केवळ सोमरसावरची निरनिराळ्या ऋषींची सूक्ते येतात. ही दहा मंडले खालील प्रमाणे.
१) संमिश्र २) गृत्समद ३) विश्वामित्र ४) वामदेव ५) अत्रि ६) भरद्वाज ७)वसिष्ठ ८) कण्व व अंगिरस(?) ९) पवमानसोम (संमिश्र) १०) संमिश्र
प्रत्येक मंडलातील सूक्ते ही देवता, शब्दसंख्या इ च्या पूर्वनिश्चित क्रमाने येतात त्यामुळे त्यातही मागेपुढे होण्याचा संभव नाही.
काय आहे या सूक्तात?…….
गोष्टी! चांदोबातसुद्धा नसतील इतक्या रंजक कथा ऋग्वेदात आहेत. निसर्गाशी, देवतांशी आणि आपापसातल्या संवादाच्या, सण समारंभांच्या, भक्तीच्या, युद्धांच्या, धर्माच्या अगदी लग्न, शर्यती, राजकारण, शाब्दिक कोट्यांपासून ते थेट देवतांच्या उत्पत्तीपर्यंत अनेक गोष्टी वेदात आढळतात.
तत्त्वज्ञान…. ऋग्वेदात जितके तत्कालिन समाजजीवनाचे प्रतिबिंब आढळते तितकेच तत्कालिन मानवाच्या प्रगल्भ तत्वचिंतनाचेही. सृष्टीची उत्पत्ती, जडणघडण, चलनवलन, देवतांचे स्वरूप, नश्वर तसेच शाश्वत तत्त्वे, परमात्मा अशा अनेक गुढ विषयांवरचे चिंतनही ऋग्वेदातील सूक्तांत आढळते.
देवता… उषा, अश्विनौ, भग, पूषन्, अर्यमा, सोमरस, सूर्य, सविता, रुद्र, सोम (ग्रह), ब्रह्मणस्पती, अदिती, इंद्र, मरुत्, मित्रावरुण अशा अनेक देवतांची स्तुती ऋग्वेदातले मंत्र करतात. त्याकाळी देवतास्वरुपात प्रामुख्याने निसर्गाच्या विविध रुपांची पुजा केली जात असे. अशा देवतांना आवाहन करणारी, त्यांची स्तुती करणारी अनेक सूक्ते ऋग्वेदात आहेत. एकाच देवतेच्या संदर्भात येणा-या मंत्रांच्या गटाला देवतासूक्त म्हणतात.
ऋग्वेदातील अनेक मंत्र आपल्या परिचयाचे आहेत पण ते ऋग्वेदातले आहेत याचा आपल्याला पत्ता नसतो. उदाहरणार्थ
आपल्याकडे हिंदी किंवा मराठी मालिकांमध्ये बारशापासून ते अंत्येष्टीपर्यंत काहीही मंगल अमंगल कार्य असले की ते भटजी एक मंत्र म्हणताना दाखवतात, ‘स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः….’ हा ऋग्वेदातला मंत्र आहे. विश्वकल्याण आणि सर्वांच्या सुखाची प्रार्थना करणा-या ऋग्वेदातल्या पहिल्या मंडलातल्या १० मंत्रांचा तो समूह आहे.
पुर्वी दुरदर्शनवर लागणा-या ‘भारत एक खोज’ या मालिकेचे शीर्षकगीत (मराठीत टायटल सॉंग!) आठवतंय का? ‘पृथ्वीसे पहीले सत नही था……’ ऋग्वेदातल्या नासदीयसूक्ताचे ते भाषांतरीत गाणं होतं. ऋग्वेदातल्या काही गोष्टीही या मालिकेत दाखवल्या होत्या…
सृष्टीच्या उत्पत्तीविषयक गुढ चर्चा करणारे हे सूक्त आहे.
याचप्रकारे पुरुषसूक्तासारखे आपल्या ऐकण्यातले सूक्त हे ही ऋग्वेदातलेच आहे.भारतीय नौदलाचे ‘शं नो वरूणः’ हे बोधवाक्यही ऋग्वेदातलेच आहे.
एकुण काय तर वेद हे अपौरुषेय आहेत की नाहीत हा मुद्दा वादाचा असला तरी ते अगम्य आणि अज्ञेय नक्कीत नाहीत.. यजुर्वेदासह इतर वेदांबद्दल पुढील भागात……
तळटिप
१. ऋचां समूहो ऋग्वेदः।
२. ऋच्यते – स्तूयते प्रतिपाद्यः अर्थः यथा या ऋक्
३. अपौरुषेयम् वाक्यं वेद। – सायण
नमस्कार, लेखमालेला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनःपुर्वक आभार. या लेखांच्या संदर्भात अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी अधिक माहीतीसाठी प्रश्नही विचारले. काही शब्द, संकल्पना किंवा ओळींसंदर्भात अधिक स्पष्टीरकणही मागीतले. या सगळ्या चर्चेतून शंका समाधानासाठी हे पान तयार करत आहे. परामर्ष…. फोरमवरील लेखांसंदर्भात काही प्रश्न किंवा सूचना असल्यास तुम्ही या लिंकवर (प्रश्न विचारा) पाठवू शकता. उत्तरे वाचण्यासाठी प्रश्नावर क्लिक करा …
Hello Readers, Thanks a lot for the overwhelming response to the articles. I have received a lot of feedback including suggestions and queries. A bunch of them asked for more clarification regarding some terms, concepts or verses. This page is being prepared for resolving doubts from all these discussions. Confab…… If you have any questions/feedback regarding the articles on the forum, you can send them through this link (Ask a Question). Click on the questions to read answers and discussions…
गीता अध्याय २ श्लोक १४ चा अर्थ अधिक स्पष्ट करून हवाय?
मूळ श्लोक – मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः।आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत।।१४।। अन्वय – (हे) कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः मात्रास्पर्शाः तु आगमापायिनः (च) अनित्याः (अतः) भारत तान् तितिक्षस्व। अर्थ – हे कुन्तीपुत्रा! इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता! ते तू सहन कर. तितिक्षा हा शब्द वापरून माणसाने आयुष्यातील सुख दुःखावर कशी मात केली पाहीजे हे या श्लोकात सांगितले आहे. आदि शंकराचार्य विवेकचुडामणी आणि अपरोक्षानुभूति या दोन ग्रंथांत तितिक्षा या शब्दाची व्याख्या करतात. सहनम् सर्वदुःखानाम् अप्रतिकारपूर्वकम् चिन्ताविलापरहीतं सा तितिक्षा निगद्यते।।२४।। विवेकचुडामणी चिन्ता किंवा शोकरहीत तसेच प्रतिकाराशिवाय सर्व दुःख सहन करणे म्हणजे तितिक्षा विषयेभ्य: परावृति: परमोपरतिही सा |सहनं सर्वदुखानाम तितिक्षा सा शुभा मता।।७।। अपरोक्षानुभुति विषयापासून विमुख होणे ही उपरति ची उच्चावस्था आहे, सर्व दुःख किंवा त्रास सहन करणे म्हणजेच तितिक्षा होय जी आनंद/प्रसन्नता वाढवते. स्पर्श, गंध किंवा चव या निरनिराळ्या माध्यमातून माणसाला सुख किंवा दुःख अनुभवास येते. जसे चांगला किंवा वाईट गंध किंवा चांगली किंवा वाईट चव. हे किंवा असे सर्वच सुख-दुःख, जय-पराजय किंवा शीतउष्णभाव हे क्षणिक असून ते केवळ इंद्रियांद्वारे आपल्याला वाटणारे भ्रम आहेत. त्यामुळे हर्ष किंवा शोक न करता ते भोगून पार केले पाहीजेत. सुख प्राप्तिमुळे होणारा आनंद किंवा दुःख प्राप्तिमुळे होणारा त्रास दोन्हीचाही परिणाम न होता ते निस्संग मनोवृत्तीने सहन करणारा व्यक्ती मोक्ष प्राप्त करतो असा साधारण अर्थ या श्लोकातून व्यक्त होतो. ज्ञानदेवांनी याचे सुरेख विश्लेषण केले आहे. इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती ।ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥ जयां विषायांचां ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।तेथ दुःख आणि कांहीं । सुखहि दिसे ॥ देखें हे शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।तेथ द्वेषाद्वेष उपजति । श्रवणद्वारें ॥ मृदु आणि कठीण । जे स्पर्शाचे दोन्ही गुण ।जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां ॥ भ्यासुर आणि सुरेख । हें रुपाचें स्वरूप देख । उपजवी सुखदुःख । नेत्राद्वारें ॥ सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।जो घ्राणसंगे विषादु – । तोषु देता ॥ देखें इंद्रियां आधीन होईजे ।तें शीतोष्णांते पाविजे ।आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपें ॥ तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु ।म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥ देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं ।हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥
अक्षौहीणी सैन्याची विभागणी कशी होते?
महाभारताच्या सभापर्व आणि आदिपर्वात सैन्यगणतीची परिमाणे आढळतात. अक्षौहिण्या: परीमाणं नराश्वरथदन्तिनाम्।यथावच्चैव नो ब्रूहि सर्व हि विदितं तव॥ पायदळ, रथ, अश्व आणि हत्ती अशा चार विभागांचे मिळून चतुरंग सैन्य मानले जाते. संख्या आणि विभागवार वाटणीवरून सैन्याचे गट पडतात ते खालीलप्रमाणे
पत्ती १ हत्ती + १ रथस्वार + ३ घोडे + ५ पदाती
सेनामुख (३ x पत्ती)- ३ हत्ती + ३ रथस्वार + ९ घोडे + १५ पदाती
गुल्म (३ x सेनामुख)- ९ हत्ती + ९ रथस्वार + २७ घोडे + ४५ पदाती
गण (३ x गुल्म)- २७ हत्ती + २७ रथस्वार + ८१ घोडे + १३५ पदाती
अक्षौहिणी (१० x अनीकिनी)- २१८७० हत्ती + २१८७० रथस्वार + ६५६१० घोडे + १०९३५० पदाती साधारण १८ अक्षौहिणी म्हणजे जवळजवळ ३९,३६,६०० इतके सैन्य होते.
भगवद्गीतेतील सर्वोत्तम श्लोक कोणते आहेत?
गीता हे सार्वकालिक तत्त्वज्ञान आहे. सफल आणि समाधानी आयुष्य जगण्याचा मार्ग आणि त्यासंबंधीचे ज्ञान गीतेतून प्राप्त होते. ज्ञान, कर्म असे निरनिराळे मार्ग, स्थितप्रज्ञासारखी वृत्ती, सत्व, रज आदि गुण अशा अनेक विषयांवर गीता भाष्य करते. प्रत्येक अध्याय हा स्वतःचे वैशिष्ट्य जपतो आणि संपूर्ण गीतेचा भागही होतो. गीता आपण कोणत्या दृष्टीकोनातून अभ्यासतो तसेच त्यातील आपल्याला भावणारा विषय कोणता यावर प्रत्येकाच्या आवडीचे श्लोक ठरतात. कोणताही एक श्लोक दुस-यापेक्षा जास्त किंवा कमी उत्तम असा ठरवणे अशक्य वाटते. उदाहरणादाखल काही श्लोक पाहू १. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥ २. सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ । ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ।।२-३८।। ३. योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय । सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २-४८।। ४. बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥ २-५० ॥
स्थितप्रज्ञाची लक्षणे हा तर केवळ गीतेतच आलेला विषय आहे.
११. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ।।२-२८।।
यासारखे गुढ श्लोक आहेत.
याव्यतिरीक्त बोधवाक्ये म्हणून वापरले गेलेले अनेक श्लोकही आहेत जसे
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते । श्रद्धावान् लभते ज्ञानम्। योगः कर्मसु कौशलम्। योगक्षमेम् वहाम्यहम्। नभः स्पृशं दीप्तम्।
अशी अनेक उदाहरणे देता येतील. या सर्व श्लोकांची आपसात तुलना करणे केवळ अशक्य आहे कारण त्यात केलेले भाष्य, काव्य, विचार आणि संकल्पना या सर्वार्थानी अद्वितीय आहेत. माझ्या गीतेच्या अध्ययनात ७०० पैकी असा एकही श्लोक आढळलेला नाही जो उत्तम नाही!
धर्माची नेमकी व्याख्या कशी करावी? मुख्य लक्षणे कोणती असली पाहिजेत? ही व्याख्या आणि लक्षणे यानुसार कोणते प्रचलित धर्म कसोटीवर उतरतात हे सांगू शकाल का?
धर्म हा शब्द धृ या संस्कृत धातुपासून तयार होतो. याचा अर्थ धारण करणे असा होतो. धारण किंवा धारणा या अर्थाने हा शब्द येतो. धर्म ही भाषेप्रमाणेच ठरवून तयार करण्याची गोष्ट नव्हे. मनुष्यस्वभावाच्या निरनिराळ्या धारणा म्हणजेच समजांच्या आधारे प्राचीन धर्म उत्क्रांत होत गेले. शिकार करणारा, भटका आणि गुहेत राहणारा असा आदिम मानव, प्राथमिक अवस्थेत निसर्गाच्या कृपेवरच अवलंबून होता. ऊन, पाऊस, वीजेचा लखलखाट, नद्यांचे लोट, वणवा, वादळे, मोठाले वृक्ष या निसर्गाच्या विविध रुपांबद्दल त्याला सहाजिकच कुतुहल, भीती आणि आश्चर्य वाटत असे. आपले आयुष्य अवलंबून असणा-या या निसर्गालाच त्याने आपले पहीले दैवत मानले. नदी, वृक्ष, सूर्य, प्राणी यासारख्यांना देव मानून त्यांची पूजा करणे ही धर्मव्यवस्थेची पहीली पायरी जवळपास प्रत्येक मानवी संस्कृतीमध्ये आढळते. चिनी, इजिप्शिअन, वैदिक भारतीय, ग्रीक किंवा माया अशा सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये धर्मविचार याच मार्गाने रुढ होत गेला. शेतीच्या शोधानंतर जसे मानवाच्या जीवनाला अधिकाधिक स्थैर्य प्राप्त झाले तसेच प्रथम निसर्ग आणि त्यानंतर निसर्गरुपांची प्रतीकात्मक पूजा करण्यात येऊ लागली. यात मुर्ती किंवा प्रतीके वापरली जात असत. येथूनच उपासनांच्या विविध पद्धती आणि अर्थातच ती करणारा वर्ग निर्माण झाला. साधारणतः सर्वात प्राचीन धर्म हे अशाप्रकारे उत्त्क्रांत म्हणजेच अत्यंत सावकाश व क्रमाने उभे राहीले. परंतु हे सर्व अर्थातच नैसर्गिकपणे कोणत्याही व्याख्या किंवा नियमप्रणालीशिवाय झाले कारण आधी घडलेल्या कोणत्याही समान व्यवस्थेचा येथे संदर्भ, व्याख्या किंवा प्रणाली अस्तीत्त्वातच नव्हती. जीवन जसे आणि जे घडवत आणि शिकवत गेले तसे ते समाज स्वीकारत गेला. तो त्याच्या संस्कृतीचा आणि पर्यायाने पुढे धर्माचा भाग बनला. त्यामुळेच निसर्ग आणि प्राणीपूजा, बळी, दफन किंवा दहनविधी, यात्रा, पुजारी वर्ग यासारख्या कित्येक गोष्टी सर्व प्राचीनतम धर्मात समान आहेत. व्यापार व संघर्षाच्या निमित्ताने जेव्हा दोन संस्कृतींची एकमेकांशी जवळीक होत असे त्यातून मग सांस्कृतीक चिन्हे, विचार, धर्म, भाषा आणि मुल्ये यांची देवाणघेवाण होत राहीली. धर्म हा कालांतराने समाजव्यवस्थेचा भाग आणि सांस्कृतिक व्यवस्थेची ओळख बनत गेला. निरनिराळे पंथ उपपंथही यात निर्माण झाले. मनुष्यसमाजही तोपर्यंत विस्तृत आणि प्रगत बनलेला होता. भाषेप्रमाणेच प्रथा आणि परंपरा आधी रुढ झाल्या आणि मगच त्यांना धर्माच्या धाग्यात गुंफले गेले. त्यामुळे धर्माच्या अनेक व्याख्या किंवा लक्षणे तत्त्वज्ञांनी नंतरच्या काळात सांगितली. जसे
उत्तम धर्माची लक्षणे जरी सांगितली गेली त्यांचा सर्वस्वी योग्य तोच अर्थ तत्कालिन समाजव्यवस्थेने घेतला गेला असे नाही. उदा. अक्रोध, अहींसा किंवा सत्य यासारख्या तत्त्वे निरनिराळ्या अर्थानी वापरली गेली. धर्मव्यवस्थेचे अवडंबर जेव्हा जेव्हा समाजातील घटकांवर वर्चस्व गाजवू लागले तेव्हा तेव्हा धर्मांमध्ये पंथ उपपंथ किंवा नवीन धर्म निर्माण झाले. ख्रिश्चन, इस्लाम किंवा बौद्ध हे धर्म आधीच्या व्यवस्थेच्या विरुद्ध चळवळ म्हणून उभे राहीले. त्यामुळेच त्यांना आधारभूत अशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी आधीची व्यवस्था मार्गदर्शक ठरली. त्यांनी आधीच्या व्यवस्थेतील त्याकाळातील त्यांना अयोग्य वाटणारे घटक दुर करून नवीन प्रणाली निर्माण केली. कालांतराने त्याही धर्मांमध्ये उपपंथ निर्माण झाले. तत्त्वे तीच राहीली पण अर्थ/व्य़ाख्या बदलत राहीली. त्यामुळेच धर्माची लक्षणे किंवा व्याख्या ही केवळ अल्पजीवी व कालसुसंगत तत्त्वे असून ती कायम बदलत राहतात. त्यामुळेच एक निश्चित अशी व्याख्या आणि एकच कसोटी ज्यावर धर्म ही संकल्पना पडताळून पाहता येणे अशक्य आहे. प्रत्येक धर्मात उभे राहणारे नवीन पंथ उपपंथ ती व्या्ख्या अधिक सुधारीत करत असतात किंवा कालांतराने नवीन धर्मप्रणाली उभी राहते. आश्चर्याची बाब ही की आजच्या युगात कोणताही धर्म हा प्राचीन धर्माच्या कोणत्याच व्य़ाख्येत पूर्णपणे बसत नाही हे जितके खरे तितकेच हेही खरे की जगात अनेक नवेजुने धर्म आले, लुप्त झाले आणि येत राहतील परंतु प्रत्येक धर्माचे मूलतत्त्व हे एकच राहील मानवजातीचे आणि पर्यायाने सर्वांचे कल्याण. म्हणून या तत्त्वावर निष्ठा ठेऊन असेल त्या धर्माचे पालन करणे जास्त योग्य राहील.
DOES LORD KRISHNA IN BHAGAVAD GITA ASK US TO STOP ENJOYING WORLDLY PLEASURES?
Lord Krishna never asks you to stop enjoying worldly pleasures. He says we’ve to restrain the senses from temptations and expectations. It doesn’t mean not enjoying at all.
There is nothing wrong with enjoying material pleasures but it is inappropriate to fall prey to the senses for those pleasures. Senses are constantly pulling us towards pleasures, destabilizing strongest minds by creating expectations. Such Karma with an expectation towards its result, creates attachment and further drags us into joys or sorrows about the results.
For example, Krishna would not say that one should not enjoy good food. He also approves working hard for earning that good food. But it is inappropriate to feel happy or disappointed if you succeed or fail within your efforts because that drags you to attachment, disturbs your mind. If the mind understands the inevitability of either success or failure, then the bond of Karma will not bind the soul. This is exactly what we forget while we strive to get what we like. If we don’t succeed, we get angry and then invite array of disorders from anger eventually losing our ultimate goal.
That is why Krishna says that it is not wrong to enjoy worldly pleasures, but it is wrong to be attached to them That attachment traps our soul in the bondage of bad Karma.
But the self-controlled being, freed from attachment and aversion, who follows the conscious injunction despite being surrounded by the objects of the senses (material pleasure), with senses governed by the self; attains the precious union with the Ultimate Being.
So the gist is to enjoy the gifts of life without letting the gifts enjoy toying with your equanimity 🙂 Karma without expectations backed up by the intellect’ is what Chapter 2 and 3 explain.
CAN YOU SHARE YOUR THOUGHTS ON BHAGVAD GITA IN LIGHT OF DIFFERENCE BETWEEN BUDDHISM AND HINDUISM?
Buddhism and Gita (Hinduism) share certain views and differ on certain. Both of them believe in the illusory state of existence i.e. the material world. To an extent both of them agree on sensory perceptions being the reason for suffering.
Buddhism believes in withdrawal from the material world and resorts to meditation leading to Nirvana. Which is kind of detachment from almost everything including self.
Gita, on the other hand promotes constant action (Karma) towards collective wellness backed up by the intellect (Sankhya). This is how a sole soul self dissolves/unifies into the omnipresent. (Karma in Sankhya Yoga Chapter II)
Buddhism denounces everything as suffering while Gita upholds it as the beauty of the creator. Buddhism believes Salvation/Nirvana means Death since it frees one from suffering and pleasure. Wherein Gita makes Salvation achievable to a being by uniting Aatman (आत्मन् – Individual Self) with the Param Aatman (परम आत्मन् – The Ultimate) describing it as bliss which is eternal and above all material notions.
We have to understand why Buddhism tends to differ from the Gita. Buddhism emerged as a reaction to Hinduism (has its own reasons). Hence Buddha deliberately kept the theory of eternity away from his preaching while Gita preaches it.
Logically though, detachment from entire existence is not practical. Gita in the Chapter III describes it. Denouncing Karma isn’t possible since one at least has to pacify his bodily needs. He has to be a part of the material world to do that. Hence Gita’s view of appreciating the creation of the Ultimate and trying to be one with Him through Intellect (Sankhya) based Karma stands stronger.
I have already written about the greatness of Gita and why has it been relevant to generations after generations.
भगवद्गीतेतील श्लोक २.४६ चा अर्थ अधिक स्पष्ट करून सांगाल काय?
अर्थ – सर्व बाजूंनी भरलेला मोठा जलाशय मिळाल्यावर लहान जलाशयाची मनुष्याला जेवढी गरज असते, तेवढीच गरज चांगल्या प्रकारे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मज्ञान्याला वेदांची उरते. ॥ २-४६ ॥
हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मज्ञानाचे मोठेपण समजावून सांगण्यासाठी एक साधी सोपी कल्पना वापरली आहे की परमात्मा म्हणजेच आत्मा (आत्मन्) चे ज्ञान स्वतःच पूर्ण आहे आणि ते एखाद्याच्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट्य पूर्ण करते. जर एखाद्याने ते प्राप्त केले तर त्याला नंतर इतर कोणत्याही शास्त्रवचनाचा किंवा मजकूर किंवा उपदेशाचा अवलंब करावा लागणार नाही. जसे एकदा पाण्याचा जलाशय प्राप्त केला की मग आपल्याला तहान भागवण्यासाठी पुन्हा पेलाभर पाणी वेगळे शोधायची आवश्यकता भासत नाही.
सोपे उदाहरण घेऊ यात. जेव्हा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा तेथील मेन्यूकार्डवर (Menu Card) अनेक पदार्थ असतात. त्यातला कोणत्याही पदार्थाने आपण भूक भागवू शकतो. आपण त्यातला एक पदार्थ निवडतो आणि तो खाऊन आपली भूक भागवतो आणि आनंदी होतो. आता मेन्युकार्डवरील इतर अनेक पदार्थ आपल्याला दिसत असले तरी एकदा भूक भागल्यानंतर त्यांचा आपण उपयोग करत नाही कारण त्याची गरजच उरलेली नाही. असा विचार करू यात की आपल्याला आता कधीच भूक लागणार नाही तर मग आपल्याला कोणत्याची पदार्थाची, मेन्युकार्डची किंवा हॉटेलची गरज लागणार नाही. परमात्मप्राप्ती हा अक्षय आऩंद आहे. तो एकदा प्राप्त झाला की मग मेन्युकार्डवरील इतर कर्मकांडे, जपतप इतकेच काय वेद, उपनिषदे इ. ची गरजच उरणार नाही. एकदा त्या प्रकाशाने तुमचे जीवन उजळून गेले की पुन्हा वेगळा दिवा लावायची गरजच काय.
बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य ऋषी राजा जनकाला वर्णन करून सांगतात की एकदा हे ज्ञान झाले की कोणतीच इच्छा, तहान किंवा भूक अपूर्ण रहात नाही ना इतर काही साध्य करायची इच्छा. कारण हे परीपूर्ण असा परमानंद देणारे अनंत आणि अवीट ज्ञान आहे.
हे राजा, तो परमात्मा समुद्रासारखा एकमेवाद्वीतीय आहे. (आत्म्यासाठी परमात्मप्राप्ती) हाच ब्रह्मलोक आहे. असा उपदेश याज्ञवल्क्याने (जनक) राजाला केला. ब्रह्मप्राप्ती हीच या जीवात्म्याची परम गती (अवस्था/ध्येय) होय. हीच त्याची सर्वोत्तम संपत्ती आहे. हेच जीवात्म्याचे परम (श्रेष्ठ/अंतिम) साध्य आहे. हाच याचा सर्वोत्कृष्ट आनंद आहे. समस्त प्राणीमात्र याच आनंदाचा अंश घेऊन जीवन जगतात. (म्हणजेच जीवात्मा हा याच परमात्म्याचा अंशरुप आहे)
अशाप्रकारे गीतेतील या श्लोकातून भगवान श्रीकृष्ण – साध्य आणि साधने यातील भेद, आत्मज्ञानप्राप्तीची साधने/मार्ग आणि साधकाचा दृष्टीकोन या विषयांवर भाष्य करतात. वेदात सांगितल्या प्रमाणे ‘एकं सत् विप्रा बहुदा वदन्ति’। म्हणजेच परमात्मा एकच आहे जरी तो आपण निरनिराळ्या रुपात पाहतो. तसेच परमात्मप्राप्ती हे एकमेव साध्य आहे जे आपण निरनिराळ्या साधनांनी प्राप्त करू शकतो. कोणत्याही एका साधनाने आत्मा आणि परमात्मा एकरूप झाल्यावर पुन्हा इतर साधनांची आवश्यकता भासत नाही हेच या श्लोकातून भगवंताला सुचवायचे आहे.
मनुस्मृती या ग्रंथाबद्दल सतत नकारात्मक चर्चा कानावर पडते त्यात कितपत तथ्य आहे ?
भारतीय तत्वज्ञानातील ग्रंथांपैकी ज्याविषयी सगळ्यात जास्त गैरसमज असणारा आणि पुरेसा अभ्यास न करता एकांगी मते मांडण्यासाठी अनेकांनी वापर केलेला ग्रंथ म्हणजे म्हणजे मनुस्मृती.
प्रथम स्मृती म्हणजे काय ते जाणून घेऊ यात. ‘श्रुती स्मृती पुराणोक्त’ असा वाक्प्रचार आपण अनेकदा ऐकतो. वेदांना श्रुती म्हणतात. ते अपौरुषेय आहेत. म्हणजेच त्यांचे लेखक नाहीत. स्मृती म्हणजे ग्रंथ जे त्यांच्या लेखकाच्या नावांवरूनच ओळखले जातात. जसे याज्ञवल्क्य स्मृती, पराशर स्मृती इ. स्मृतीग्रंथ हे निरनिराळ्या काळात विविध विषयांना अनुसरुन थोर ऋषींनी किंवा ऋषीकुलांनी लिहीलेले ज्ञानाचे कोष आहेत. यातील ज्ञान हे त्या ऋषींनी स्वतः प्राप्त केलेले, शिकलेले किंवा संपादित केलेलेही असते. त्यामुळे स्मृतीग्रंथांतील माहीती ही ग्रंथांच्या पूर्वसूरींनी संकलीत केलेली, त्याकाळी प्रचलित असलेली किंवा परंपरेने शिक्षणआणि इतर व्यवस्थेचा भाग झालेली असते.
आता मनुस्मृती संबंधी गैरसमज पाहू १ ) मनुस्मृती हा हिंदुंचा धर्मग्रंथ आहे – हा एक अर्धवट माहीतीवर आधारीत गैरसमज आहे. मुळात हिंदू धर्म हि संज्ञाच मनुस्मृती लिहीली गेली तेव्हा अस्तीत्वात नव्हती. भारतीय संस्कृतीला हिंदू धर्म किंवा संस्कृती ही संज्ञा पाश्चात्यांनी वापरली. भारतीय धर्म हा वैदिक धर्म होता आणि वेद हेच त्याचे प्रमाण ग्रंथ मानले जातात. किंबहूना मनुस्मृतीतही असेच लिहीले आहे. वेदोऽखिलो धर्ममूलं स्मृतिशीले च तद्विदाम् । आचारश्चैव साधूनामात्मनस्तुष्टिरेव च ॥ मनुस्मृती २.६॥
मनुस्मृतीतील विवेचन हे परंपरा, तत्कालीन प्रचलीत व्यवस्था, समाजमन आणि पुर्वसूरींचे विचार यांचे संकलन आहे. त्यामुळेच धर्माचा प्रमाण विचार वेदात व्यक्त होतो असेच स्वतः मनुस्मृतीही सांगते. २) मनुस्मृती जातीपाती आणि वर्णव्यवस्थेतून भेदभाव शिकवते – याउलट मनुस्मृतीत केवळ जन्माने व्यक्ती ब्राह्मण किंवा शिष्ट होत नाही तर योग्य शिक्षणाने होतो असे प्रतिपादन केले आहे. अव्रतानाममन्त्राणां जातिमात्रोपजीविनाम् ।सहस्रशः समेतानां परिषत्त्वं न विद्यते ॥ १२.११४॥
श्रेष्ठतेचे कारण जन्म नसून विद्या आणि त्याधारीत व्यवसाय आहे असे स्पष्टपणे मनुस्मृतीत लिहीले आहे. अज्ञेभ्यो ग्रन्थिनः श्रेष्ठा ग्रन्थिभ्यो धारिणो वराः ।धारिभ्यो ज्ञानिनः श्रेष्ठा ज्ञानिभ्यो व्यवसायिनः ॥ १२.१०३॥
असे किमान २५ श्लोक मनुस्मृतीतून देता येतील जे ज्ञान, विद्या किंवा कौशल्याला प्राधान्य देतात जात किंवा जन्मकुलाला नाही. ३) मनुस्मृती स्त्रीयांना दुय्यम स्थान दिले आहे – हा अत्यंत हास्यास्पद समज आहे. सुभाषित म्हणून वापरला जाणारा खालील श्लोक मनुस्मृतीतला आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ॥ ३.५६॥
त्याअनुषंगाने पुढे येणारे अनेक श्लोक स्त्रीयांच्या सन्मानाबद्दल तसेच त्यांना विशेष अधिकार देण्याबदद्ल बोलतात त्यामुळे यावर काही लिहायची आवश्यकता नाही.
हे झाले मनुस्मृतीबद्दलच्या गैरसमजांवर. धर्म सोडून या ग्रंथात दुसरे काहीच नाही का? आहे. अनेक विषय आहेत. राजा, प्रजा, व्यवहार जगाच्या उत्पत्तीपासून ते माणसाच्या अंत्येष्टीपर्यंत अनेक विषयांवर मनुस्मृती भाष्य करते जे आजही मार्गदर्शक ठरू शकते. येथे हे ध्यानात ठेवले पाहीजे की हे सर्व विवेचन तत्कालिन समाज, राज्य आणि धर्मव्यवस्थेला अनुसरुन केलेले संकलन आहे. त्यामुळे एकच एक मनुस्मृती हाच धर्मग्रंथ आहे आणि त्यात लिहिलेले सर्वकाही धार्मिकच लेखन आहे असे मानणे गैर आहे.
अशाप्रकारे अनेक विषयात मार्गदर्शक ठरु शकणारा आणि मूल्यव्यस्थांचे योग्य निरुपण करणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. केवळ अयोग्य भाषांतर किंवा अर्थप्रतिपादन केल्याने या ग्रंथांचे अयोग्य विद्रुपीकरण करण्यात आले आहे. संपूर्ण मनुस्मृती वाचून त्यातील श्लोकांचा अर्थ समजाऊन घेऊन नंतर त्यावर टिका करण्याचा प्रयत्न आजतागायत तरी झाल्याचे ऐकीवात नाही.
प्राचीन ग्रंथ आणि त्यातील ज्ञान याचा गैरवापर कोणी केला याची चर्चा जितकी होते त्यापेक्षा अधिक प्रयत्न आज ते ग्रंथ भाषांतरासहीत उपलब्ध असताना वाचून समजून घेण्यासाठी करण्याने समाजाचे कल्याण होणार आहे.
श्रेयस आणि प्रेयस या संकल्पना काय आहेत? स्पष्ट करू शकाल का?
श्रेयस आणि प्रेयस हे दोन्ही शब्द कठोपनिषदाच्या प्रथम अध्याय द्वितीय वल्लीतील दुसऱ्या श्लोकात येतात. या दोन्ही शब्दांचे व्यावहारीक आणि तात्विक असे दोन्ही अर्थ आपल्याला अनुभवास येतात. श्लोकाचा अन्वय, अर्थ आणि स्पष्टीकरण पाहूयात
मूळ श्लोक
श्रेयस आणि प्रेयस याचे येथे अभिप्रेत असणारे अर्थ हे कल्याणकारक आणि आनंददायक असे आहेत. माणसाला त्याच्या आयुष्यात अनेकदा दोन किंवा अधिक पर्यायातून निवड करावी लागते ज्यात काही सोपे आनंददायक मार्ग असतात तर काही कठीण पण कल्याणकारक मार्ग असतात. अशा प्रसंगी बुद्धीमान व्यक्ती दोन्हीमधला फरक नीट ध्यानात घेऊन कठीण पण कल्याणकारक मार्ग निवडतो आणि सोपा व आनंददायक मार्ग डावलतो. असा साधारण अर्थ या श्लोकातून ध्वनीत होतो.
माणसाचे आयुष्य ही सुखदुःखांची अतूट साखळी असते. असे अनेक प्रसंग माणसापुढे येत राहतात ज्यात त्याला सोपा आणि अवघड असे दोन मार्ग दिसतात. मार्गाप्रमाणेच त्यांचे फलित असते. वरकरणी सोप्या आणि कमी कष्टप्रद मार्गानी मिळणारे फलितही सीमीत असते तर अवघड आणि कष्टदायक मार्गाचे फलित निरंतर आणि दीर्घकालीन असते.
अगदी सोपे उदाहरण घ्यायचे झाल्यास विद्यार्थीदशेत किंवा उमेदवारीच्या काळात जास्तीत जास्त अभ्यास किंवा कष्ट करणारी व्यक्ती शिक्षणात आणि व्यवसायात यशस्वी होते आणि उर्वरीत काळ सुखाने घालवते. परंतु जी व्यक्ती हा काळ फार तोशीस न घेता माफक कष्टात घालवते ती शिक्षणात आणि व्यवसायात यशस्वी होण्यात अधिक वेळ घालवते आणि उर्वरीत आयुष्यही अधिक कष्टप्रद बनवते. कारण अर्थातच निवड…. योग्य वेळी अधिक कष्टाचा मार्ग निवडल्याने दीर्घकालीन उत्तम फल मिळते तर त्याच वेळी कमी कष्टाचा सुखकर मार्ग स्वीकारल्यास तेच फलित लांबते. शिक्षण असो, गुंतवणूक असो किंवा संपत्तीची निर्मिती हेच तत्व सगळीकडे लागू पडते.
हे अर्थातच श्रेयस आणि प्रेयसाचे सर्वसामान्य अर्थविवेचन आहे. तात्विक दृष्ट्या पहायचे झाल्यास या दोन्ही शब्दांचा खुप गहन अर्थ अभिप्रेत आहे. प्रेयस हे क्षणिक सुख आहे तर श्रेयस हे अंतिम किंवा शाश्वत सुख आहे.
अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण इतक्या सा-या सुविधांमध्ये मानव खरंच सुखी आहे का? जर असेल तर अजुनही सतत नवनवीन सुखसाधनांचा शोध घेतला जातो, तो कशासाठी? प्रत्येक व्यक्तीचं सुख निराळ्या गोष्टीत आहे, तर मग सुखी असणं म्हणजे नक्की काय आहे?
प्रेयस हे ते क्षणिक सुख आहे जे भौतिक साधनांतून प्राप्त होते तर श्रेयस हे ते सुख आहे जे व्यक्ती समाधानातून आणि स्थितप्रज्ञ वृत्तीतून प्राप्त करते. प्रेयसात न गुंतता श्रेयसाकडे जाणे हे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय असावे असे भारतीय तत्वज्ञान उपनिषदे आणि गीतेच्या माध्यमातून मांडते.
अध्यात्म म्हणजे काय?
अध्यात्म ही एक बहुआयामी संकल्पना आहे. ती समजून घेण्यात जितका स्पष्टीकरणाचा भाग आहे तितकाच अनुभूतीचाही आहे. कसे ते उत्तराच्या अंती स्पष्ट होईलच.
अध्यात्म शब्दाची साधारण फोड अधि + आत्म अशी होते. यात अधि हे अव्यय विशेषत्वाने किंवा प्रकर्षाने अशा अर्थाने येते. आत्म याचा अर्थ आत्मन् म्हणजे आत्मा किंवा स्व.
त्यामुळे अध्यात्माचा शब्दशः अर्थ – प्रकर्षाने किंवा विशेषत्वाने स्वतःला जाणणे. कसे जाणणे.
भगवद्गीतेच्या आठव्या अक्षरब्रह्मयोग या अध्यायात. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण अध्यात्म या संज्ञेचा अर्थ सांगतो. अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुना प्र्श्न करतो की –
तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम । अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते॥ तू ज्या संकल्पना वापरल्यास त्यांचे अर्थ सांग. ते ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव कोणाला म्हणायचे? अधियज्ञ म्हणजे काय आणि तो कोठे असतो? अंतकाळी चित्त स्थिर असणाऱ्या व्यक्तीने काय जाणायचे आहे?
श्रीकृष्ण सांगतो –
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते। भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसञ्ज्ञितः॥ब्रह्म हे परम (तसेच) अक्षर आहे. स्वभावाला अध्यात्म म्हणावे. भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो.
अध्यात्म म्हणजे स्वभाव असे श्रीकृष्ण सांगतो
मग आता स्व-भाव म्हणजे काय हे नीट समजून घेऊ यात.
कारण आपल्या रोजच्या वापरातला शब्द असल्याने त्याच्या अर्थाकडे नीटसे लक्ष जात नाही. स्वभाव म्हणजे वागण्याची रीत असा आपला वापरातला अर्थ आहे.
वास्तविक स्व म्हणजे आपण स्वतः आणि भाव म्हणजे त्याच्या मागचे तत्व. जसे आपण भक्तीभाव किंवा आपपरभाव हे शब्द वापरतो. मग स्व च्या मागचा भाव कोणता? जो स्व ला भाव (जिवंतपणा) प्राप्त करून देतो तो. म्हणजेच चैतन्य किंवा आत्मतत्व. जे शरीराला चलायमान करतं. म्हणूनच मृत शरीराला स्व-भाव नसतो जिवंत शरीराला असतो. श्रीकृष्ण सांगतो.
अध्यात्म म्हणजे जड शरीर आणि चैतन्य यांचे द्वैत. ज्या तत्वाने या सृष्टीचे सर्जन झाले ते तत्व म्हणजे अध्यात्म. म्हणूनच अध्यात्म जाणायचे म्हणजेच स्वतःला जाणायचे. स्व-भाव जाणायचा. स्वतःला जाणा, तत्वमसि, Know Thyself वगैरे तत्वज्ञान जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेथे हाच अर्थ अभिप्रेत असतो. आता प्रकर्षाने स्वतःला जाणायचे तर त्यासाठी स्वतःशिवाय इतर कोणतेही बाह्य साधन उपयुक्त ठरणार नाही. स्वतः प्रयत्न करून स्वतःला जाणणे भाग आहे. स्वतः च स्वतःवर प्रयोग करुन स्वतःच त्याचे निष्कर्ष तपासून पहायचे म्हणूनच अध्यात्मात अनुभूतीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे.
अधिक वाचनासाठी –‘अंतरंग – भगवद्गीता’
‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे काय?
उपनिषदे भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा आहेत. परब्रह्म किंवा आत्मतत्त्वाचा अभ्यास हा उपनिषदांच्या अभ्यासाचा एक प्रमुख विषय आहे.
अहं ब्रह्मास्मि । हे बृहदारण्यक (१/२/४/१०) उपनिषदातील असून मूळ श्लोक असा आहे
तद्धैतत्पश्यन्नृषिर्वामदेवः प्रतिपेदेऽहं मनुरभवं सूर्यश्चेति ।
तदिदमप्येतर्हि य एवं वेदाहं ब्रह्मास्मीति स इदं सर्वं भवति ।
उपनिषदांधील जी ४ महावाक्ये किंवा अथांगसार सांगणारी वाक्ये आहेत त्यातील हे एक.
अहम् म्हणजे मी आणि ब्रह्म अस्मि म्हणजे ब्रह्म आहे. अहम् ब्रह्मास्मि म्हणजे मी ब्रह्म आहे असा शब्दशः अर्थ होतो.
वास्तविक अर्थ काय –
आत्मज्ञान किंवा आत्मतत्त्व जाणणा-या व्यक्तीला झालेली ही उपरती आहे की सृष्टीचे कारक जे ब्रह्म तत्त्व, मी त्याचाच अंश किंवा आहे किंवा तत्त्वतः मी आणि तो कोणी निराळे नसून एकच आहोत. शारीर देह नश्वर तत्त्व असून आत्मा हे अविनाशी अविकारी आणि अनंत तत्त्व असून ते, मी, ब्रह्म आणि परब्रह्म हे एकस्वरूप आहेत. ज्याप्रकारे सर्व जलस्त्रोत जसे शेवटी समुद्रात एकरुप होतात तसेच हा अंश परमात्म्याशी तद्रुप होतो. तत् त्वम् असि । (छान्दोग्य उपनिषद ६/८/१६) म्हणजेच ते (ब्रह्म) तू आहेस हे महावाक्यही याच अर्थाने येते.
जीवात्म्यात परमात्म्याचा अंश असतो या व्यापक अर्थाने ही महावाक्ये येतात.
वेदातही परब्रह्म हे एक तत्त्व असून त्याला ज्ञाते अनेक नावांनी ओळखतात असे म्हटले आहे
एकं सद्विप्रा बहुधा वदन्त्यग्निं यमं मातरिश्वानमाहु:। – ऋग्वेद १/१६४/४६
गीतेतही भगवंत आपला अंश प्रत्येकात आहे हे सांगतो. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्।।१५.१५।।
मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे. माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि अपोहन (दोषनाश) ही होतात. सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे. तसेच वेदांतांचा कर्ता आणि वेदांना जाणणारासुद्धा मीच आहे.
**आत्तापर्यंतचे सर्व लेख वाचलेल्या (कमाल आहे!) वाचकांच्या हे ध्यानात आले असेल की पहील्या लेखापासून लेखांची लांबी उत्तरोत्तर वाढलेली आहे आणि त्याप्रमाणे लेखागणिक भाषाही किंचीत क्लिष्ट होत गेली आहे. याचे कारण अर्थातच गीतेचे ज्ञान दुस-या आणि तिस-या अध्यायाय अधिकाधिक गहन होत जाते. त्याचे सोपे स्पष्टीकरण देणे कठीण नाही पण त्यासाठी शब्दव्यापार खुप वाढवावा लागेल. शब्द कमी ठेवावे तर भाषा कठीण होते. त्यामुळे शब्द आणि भाषेचा पोत दोन्हीचा समन्वय साधण्याच्या प्रयत्नात लेख थोडे क्लिष्ट होणे स्वाभाविक आहे.***
सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात. व्यक्ती तिचा हुद्दा , अधिकार किंवा स्थान मग ते लौकिकार्थाने कितीही मोठे असले तरी अंतःप्रेरणेशिवाय ते गायन करत नाहीत असे तानसेन सांगतो. अकबराच्या हट्टापायी दोघेही गायन ऐकण्याचा प्रयत्न करण्यासाठी तानसेनाच्या गुरुंच्या शोधार्थ निघतात. काही काळानंतर हिमालयातील एका गुहेमध्ये सध्या गुरुदेवांचे वास्तव्य असल्याचे त्यांना कळते. आपल्या प्रिय शिष्याला, तानसेनाला पाहून गुरुदेव अतिशय आनंदीत होतात, तानसेनासह आलेल्या ‘पांथस्थाचेही’ ते स्वागत करतात. दोनेक दिवसांच्या वास्तव्यानंतर एके दिवशी सुर्योदयाच्या वेळी अकल्पितपणे गुरुदेव गायनास सुरुवात करतात. संपुर्ण विश्व स्तब्ध झालंय….. निसर्गासह आपल्या शरीरातील रंध्र आणि रंध्र केवळ गाणं ऐकतंय असा भास अकबराला होतो! संपूर्ण भारावलेल्या अवस्थेतून जेव्हा तो भानावर येतो तेव्हा गायन संपवून गुरुदेव तो भाग सोडून निघुन गेलेले असतात. अशा प्रकारचे गायन तानसेन का करू शकत नाही या प्रश्नावर तानसेन उत्तरतो की मी मनुष्यमात्रातील एका राजासाठी गातो तर माझे गुरुदेव हे अखिल सृष्टीच्या निर्मात्यासाठी गातात. तानसेनाचे गायन मानवाला अर्पण होते आहे तर गुरुदेवांचे परमात्म्याला! कर्माचे उद्दीष्ट्य जितके उद्दात्त तितका त्याचा परीणाम उन्नत…….
या एकाच गोष्टीतून चौथ्या अध्यायाचे सार प्रकट होते. किंबहुना कर्म आणि ज्ञानकर्मसंन्यास या दोनही अध्यायांचा एकत्रित बोध या गोष्टीतून होतो.
विहीत कर्म हे जर फलाची अपेक्षा न करता परमात्म्याला अर्पण करण्याच्या वृत्तीने केले तर त्याचे बंधन कर्त्याला बाधत नाही. अशा वृत्तीतून कर्ता ज्ञाता होतो आणि परमात्म्याला प्राप्त करतो.
ज्ञानकर्मसंन्यास……
‘ज्ञानकर्मसंन्यासयोग’ हा गीतेतील चौथा अध्याय आहे. या शब्दाची नीट फोड केल्यास संपुर्ण अध्यायाचा सारांश कळावा. फोड दोन प्रकारे करता येईल.
१. संन्यस्त वृत्तीने कर्म करण्याचे ज्ञान
२. कर्म करता करता संन्यस्तवृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे
पहीली फोड ज्ञानयोगी तर दुसरी कर्मयोगी आहे. दुस-या आणि तिस-या अध्यायात सांगितलेले कर्मविचार या अध्यायात किंचीत विस्ताराने मांडले आहेत. साधारणपणे या अध्यायाचे चार प्रमुख भाग पडतात.
पहील्या भागात कृष्ण आपल्या अवतारी कृष्णरुपावर भाष्य करतो आणि त्या अनुषंगाने कर्मयोग मांडतो. तोच कर्मयोग योगी आणि महात्मे कसे आचरणात आणतात हे तो दुस-या भागात सांगतो. तिसरा भाग हा प्रामुख्याने यज्ञ या विषयावर आहे तर चौथ्या भागात तो ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करतो.
अध्यायाच्या सुरुवातीला कृष्ण सांगतो की जे ज्ञान तो अर्जुनाला देतोय ते त्याने पुर्वी विवस्वानाला (सूर्य) दिले होते. अर्जुनाला याचे आश्चर्य वाटते. कारण अर्थातच अर्जुनापुढे उभा असणारा कृष्ण हा सूर्याच्या आधी जन्मणे शक्य नाही. तेव्हा श्रीकृष्ण सांगतो की माझे आणि तुझेही अनेक जन्म झाले आहेत. ते तूला आठवत नसले तरी मला आठवतात. मी जन्मरहीत आणि अविनाशी आहे. केवळ योगमायेने मी प्रकट होत असतो. कधी प्रकट होतो? तर –
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ४-७ ॥
जेव्हा अधर्माचा नाश करून धर्माची पुनर्स्थापना करण्याची वेळ येते तेव्हा मी प्रकट होतो.
भगवंत जेव्हा सगुण साकार असा कृष्णावतार धारण करतो तेव्हा त्याही शरीराची सर्व विहीत कर्मे तो करतो परंतु त्या कर्माचे बंधन त्याला बाधत नाही. कारण त्याला कर्माच्या फलांची आसक्ती नाही. यामुळे जो कोणी परमात्म्याच्या अनासक्त कर्माचे तत्त्व जाणतो तोही कर्मबंधनातून मुक्त होतो.
न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥
म्हणूनच सृष्टीचे सर्जन असो किंवा गुणकर्मानुसार वर्णांची निर्मिती असो भगवंत एकाच वेळी कर्ता आणि अकर्ता दोन्ही होतो.
हे सर्व तो निर्माण करतो म्हणून कर्ता, परंतु यातून कोणत्याही फलाची आसक्ती त्याला नाही म्हणूनच अकर्ता.
मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा करणा-या तुझ्या पुर्वजांनीही माझे हे स्वरुप जाणले आणि त्याचे अनुकरण केले. म्हणूनच हे अर्जुना तू ही याच मार्गाचे अनुकरण असे कृष्ण सांगतो.
अशाप्रकारे प्रत्यक्ष सृष्टीचा कर्ता, परमात्मा जसे निरपेक्ष कर्म करतो तसे कर्म करावे असे सांगून कृष्ण दुस-या भागाकडे वळतो.
असे ज्ञानयुक्त कर्म करायचे तर कर्म, अकर्म आणि विकर्म यातील भेद जाणणे आवश्यक आहे. कारण हा भेद जाणणाराच कर्माचे तात्विक स्वरुप समजु शकतो. ज्याला हे स्वरूप कळाले तो योगी कर्म करूनही अलिप्त राहतो.
मग कर्म, अकर्म आणि विकर्म नावाची तीन वेगवेगळी कार्ये किंवा कृती आहेत का? तर नाही. कृष्ण म्हणतो कर्मातच अकर्म किंवा विकर्म पाहता आले पाहीजे. म्हणजेच आपल्या कर्माकडे मनुष्य कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ते महत्वाचे आहे.
शरीराचे कर्म जे कर्म आहे परंतु निस्पृहपणे आचरल्याने ते कर्म इंद्रियांपर्यंतच मर्यादित राहते आणि आत्म्याला त्याचे बंधन लागत नाही. कर्म असूनही ते भासमान किंवा नसल्यासारखेच आहे म्हणून त्याला अकर्म म्हणता येईल. म्हणजे कर्म हे वास्तविक कर्म नसून केवळ भास आहे जो इंद्रियांमुळे घडतो. जो व्यक्ती नित्य आणि विहीत कर्माला अकर्म मानतो. म्हणजे विहीत कर्म करताना अहंकार बाजूला ठेवतो आणि ते कर्म जणु आपण केलेले नाहीच असे मानुन निस्पृहपणे करतो तो अकर्म जाणतो. तो ज्ञानी होय. येथे उदाहरणासाठी ज्ञानदेवांचा आधार घेऊ.
जैसा जो जलापासिं उभा ठाके । तो जऱ्हैं आपणपें जलामाजि देखे । तऱ्हीं निभ्रांत ओळखे । म्हणे मीं वेगळा आहें॥
जसे पाण्यांत दिसणारे प्रतिबिंब आपले असले तरी ते आपण नव्हे तर भास आहे हे आपण जाणतो. तसेच कर्म हा शरीराचा धर्म आहे, आत्मा त्यापासून वेगळा आहे हे जाणणे. व्यक्ती जेव्हा अशा अलिप्त किंवा निस्पृह वृत्तीने कर्म करते तेव्हा ते कर्म अकर्म होते कारण त्याचे शरीर कर्म करते पण आत्मा त्यापासून मुक्त राहतो.
मग विकर्म म्हणजे काय? विकर्म म्हणजे विशेष कर्म. अकर्माचे स्वरुप जाणणे किंवा आत्म्याचे स्वरूप जाणणे म्हणजे विकर्म. विकर्म हे कर्म नसून केवल ज्ञान आहे. त्याची आसक्ती म्हणजेच मोक्षाची आसक्ती किंवा मुमुक्ष वृत्ती.
म्हणूनच कृष्ण म्हणतो की जो व्यक्ती कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म (मुमुक्षुत्व) पाहतो तो योगी होय.
कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥ ४-१८ ॥
असा ज्ञानी पुरुष आपल्या ज्ञानाच्या सहाय्याने कर्मबंधन नष्ट करतो आणि ज्ञानियांचाही ज्ञानी होतो. असा व्यक्ति कर्म करूनही बंधमुक्त राहतो. उपभोग घेऊनही भोगमुक्त राहतो. त्याच्या कर्माचा केवळ भास होतो अंतरी मात्र तो निष्कर्मी राहतो. त्यामुळे नित्यकर्म हे दृष्य कर्म असूनही त्याच्या लेखी ते अकर्म आहे. तर मोक्षप्राप्तिची साधना हे दृष्य कर्म नाही परंतु त्याच्यासाठी ते एकमेव कर्म आहे.
ज्ञानदेव म्हणतात
आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें। जैसे न चलतां सूर्याचे चालणे। तैसें नैष्कर्म्यत्वीं जाणे। कर्मीचि असे । तो मनुष्यासारिखां त-हैं आवडे। परि मनुष्यत्व तेयांसि न घडें।।जैसे जली जलामाजिं न बुडे। भानुबिंब।।
सूर्य ज्याप्रमाणे उदय आणि अस्त झालेला दिसतो परंतू तो आपल्याला घडलेला भास असतो वास्तविक सूर्य अचल असतो. तसाच निष्कामता प्राप्त केलेला कर्मयोगी वरून माणसासारखा माणूस दिसतो परंतू अंतस्थ योगी असतो. सूर्यबिंब जसे पाण्यात बुडाल्याचा भास सायंकाळी होतो तसा त्याच्या कर्माचा आणि सामान्य माणूस असण्याचा केवळ भास असतो. वरून कृष्ण, राम वगैरे असतो पण अंतरी योगीराज असतो.
अशा व्यक्तीच्या आयुष्याला यज्ञाची उपमा देत कृष्ण तिस-या भागाकडे वळतो.
पुर्वी सांगितल्याप्रमाणे यज्ञभाव हा एक निरपेक्ष कर्माप्रमाणे आहे. मनुष्याने यज्ञभावनेने म्हणजेच निरपेक्ष वृत्तीने कर्म करावे असे तिस-या अध्यायात भगवंताने सांगितले होते. संन्यस्त कर्मही यज्ञच आहे असे कृष्ण म्हणतो. असा यज्ञ ज्यात आहुति देणारा (कर्मयोगी), हविभाग (यज्ञात अर्पण करायची वस्तु) (कर्म) आणि यज्ञ ज्याला समर्पित करायचा ते (परब्रह्म) सर्व ब्रह्मरुप आहेत. कारण यज्ञ करणारा भक्त, अग्नि आणि यज्ञ ज्याला अर्पण केला तो परमात्मा तिघेही अंतिमतः एकरुप होतात.
निरनिराळ्या यज्ञांच्या माध्यमातून आत्मसंयम आणि इंद्रियनियमन करून योगी आत्मज्ञान प्राप्त करण्याचा यत्न करतात. हे सर्व यज्ञ म्हणजेच साधनेची जंत्रीच कृष्ण सादर करतो.
श्रोत्र, वाचा इत्यादि इंद्रियांच्या क्रिया संयमित करणे, द्रव्यादि आसक्ती संयमित करणे, हिंसादि अतिचार संयमित करणे, आहारादि भोग नियमित करणे, प्राणायामादि योगातून शरीरक्रिया संयमित करणे अशा अनेक यज्ञांद्वारे योगी कर्मबंधनातून मुक्त होतात.
ज्ञानकर्मसंन्यास शब्दाची दुसरी फोड म्हणजे कर्म करता करता त्यात संन्यस्त वृत्ती प्राप्त करणे आणि त्यायोगे आत्मज्ञान प्राप्त करणे हे आपण पाहीले.कर्म, संन्यस्त वृत्ती आणि आत्मज्ञान अशा मार्गाने जाण्याऐवजी आधी ज्ञानयुक्त होऊन मगच कर्म करणे म्हणजेच दुसरी फोड. ज्ञानप्राप्ती……..
या सर्व दृष्य वस्तु किंवा इंद्रियस्वरूप यज्ञांपेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे असे सांगून कृष्ण अंतिम भाग म्हणजेच ज्ञानाच्या महतीकडे वळतो.
कर्म करताना ज्या मोहाचा त्याग करायचा, हे ज्ञान त्या मोहात तुला पडूच देणार नाही. जसे पेटलेला अग्नि इंधनाची राख करतो तसे हे ज्ञान तुझे कर्मबंधनच भस्मसात करेल. कर्मयोगी कालांतराने अंतकरण शुद्ध झाल्यावर हेच ज्ञान प्राप्त करून घेतो. त्यामुळे असे ज्ञान तू साक्षात्कारी व्यक्तींकडून प्राप्त करून घे असे कृष्ण अर्जुनाला सांगतो. हे ज्ञान कसे प्राप्त करावे याचा वस्तुपाठही तो पुढील श्लोकात देतो
ते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील.
कारण इंद्रिय संयमन करणा-या श्रद्धावान व्यक्तीलाच हे ज्ञान लाभते या ज्ञानासारखे पवित्र जगात दुसरे काही नाही. ते प्राप्त झालेल्या व्यक्तीला परम शांतीचा लाभ होतो.
उपसंहार
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
परित्राणाय साधूनां….।
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
श्रद्धावान् लभते ज्ञानम्।
चौथा अध्याय नसता तर भारतातल्या बहुतांश संस्थांना बोधवाक्यांसाठी वणवण भटकावे लागले असते!
कर्मयोगाच्या विस्तृत वर्णनानंतरही ज्ञानकर्मसंन्यास सांगण्याचे मुख्य कारण माणसाचा स्वभाव. कर्माची आसक्ती इतकी प्रबळ असते की ती मोठ्या मोठ्या ज्ञानी पुरुषांनाही त्या मोहात अडकवून ठेवते. ते कर्म करण्याचा आनंदच त्यांना इतका भावतो की आपले ध्येय हे कर्म पार करून पुढे मिळणारे आत्मज्ञान आहे याचा त्यांना विसर पडतो! विनोबा भावेंचे एक सुंदर वाक्य आहे –
एकवेळ मोहाचा त्याग करता येईल पण त्यागाचा मोह आवरता येणे कठीण.
त्यागी, कर्मयोगी या शब्दांच्या मोहापायी त्या कर्माच्या आसक्तीत गुरफटलेले अनेक ‘भोंदु’ कर्मयोगी आपण आसपास पाहतोच मग सामान्य माणसाची काय कथा. न आवडणारे कर्म टाकता येते पण आवडणारे कर्मही टाकायचे आहे. कारण ते आवडते किंवा नावडते हे इंद्रियांनी निर्माण केलेले भास आहेत. ते खरे मानून चालायचे तर आत्मा बंधनात अडकेल आणि मग कर्मांची बरीवाईट फळे भोगण्यासाठी पुनर्जन्माच्या चक्रात अडकेल. आपले ध्येय हे आत्मा बंधमुक्त करणे आहे मरणोत्तर पुतळा उभा रहावा म्हणून प्रयत्न करणे नव्हे. हे परिणाकारकरित्या पटवून देण्यासाठी कृष्ण ज्ञानकर्मसंन्यास उभा करतो. अर्जुनालाही हे पटले पाहीजे की केवळ युद्धोत्तर लोक आपल्याला चांगले म्हणतील म्हणून धर्माची बाजू घेणे हे तितकेच अयोग्य आहे जितके स्वार्थाने अधर्माची बाजू घेणे. कारण दोन्ही मध्ये कर्माच्या फलाची आसक्ती आहे. या ब-या आणि वाईट आसक्तीवर संन्यास शब्दाने आघात करून कृष्ण अर्जुनाला अंतिम ध्येयाच्या मार्गावर दृढ करतो.
कुमारजींनी अमर केलेला कबीराचा दोहा इंद्रियसंयमावर आणि कर्मसंन्यास निराळ्या शब्दात व्यक्त करतो ।
हिरना समझ बुझ बन चरना || एक बन चरना दूजे बन चरना।।तीजे बन पग नहीं धरना || तीजे बन में पंछ पारधी।।उन के नजर नहीं पड़ना || पांच हीरन पच्चीस हिरनी।।उन में एक चतुर ना ||तोए मार तेरो मॉस बिकावे। खलका करेंगे बिछोना || कहे कबीर जो सुनो भाई साधो।।गुरु के चरन चित धरना||
पाच पारधी म्हणजे पंचेंद्रिये जी आपापल्या मोहाच्या जाळ्यात अडकवतात आणि मग आपली फरफट होते. या इंद्रियांचे वन म्हणजे तिसरे वन, यात पाऊलही न ठेवता दुस-या वनात चरायचे म्हणजेच निष्काम वृत्तीचे कर्मयोगी शरीर. याच शरीराने मग पुढे ज्ञान प्राप्त करून पहील्या वनातही चरायचे म्हणजेच आत्मा आणि परमात्म्याचे एक होणे. हे सगळं ‘समज बुझ’ आणि ‘गुरु के चरन चित’ धरून करायचे आहे. कारण अर्थातच ‘उन मे एक चतुर ना’, पाचही इंद्रिये चतुर नाहीत त्यांना बांधायचे काम हरणाचे म्हणजे अर्थातच आपले आहे. अन्यथा जसे त्या हरणाचे मांस विकले जाईल आणि चामडीचे आसन केले जाईल तसेच आपलेही जन्ममृत्यू आणि कर्म असे चर्मचक्र चालुच राहील!